ऐसी अक्षरे ट्रेडिंग सेंटर - भाग २

ऐसी अक्षरे वर ट्रेडिंग सेंटर काढण्याची कल्पना गेल्या लेखातच मांडली. ती मांडून झाल्यानंतर आम्हा संपादक मंडळींत पुन्हा एकदा सखोल चर्चा झाली. त्या चर्चेचा बहुतांश वेळ इतकी उत्तम कल्पना मांडून लोकांना आश्चर्याने दिपवून टाकल्याबद्दल स्वतःचं व थोड्याफार प्रमाणात एकमेकांचं अभिनंदन करण्यात गेला. दरम्यान तंदूरी चिकन, मटण बिर्याणी वर ताव मारून झाला. त्यात काही घासफूस खाणाऱ्यांनी तंदूरी पनीर आणि व्हेज बिर्याणी चापली. एवढं सगळं रिचवून मग आमच्यापैकी एकजण (तोच तो, ज्याच्या डोक्यावर ढगात दिवा चमकला होता तो) इतरांना म्हणाला, " या कल्पनेच्या यशावर आपण समाधानी होता कामा नये. आपण कायम नवीन काहीतरी करण्यासाठी भुकेलं राहिलं पाहिजे. नाहीतर मग ऐसी अक्षरे वर वेगळं काय?" त्यापुढे सावकाश तिरामिसूचा फन्ना उडवता उडवता ही भूक कशी जिवंत ठेवायची याबाबत साधकबाधक चर्चा झाली.

बहुतेक चांगले शोध हे चर्चेतून वगैरे लागत नाहीत. न्यूटनने कोणाशीतरी चर्चा करून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता का? डार्विनने उत्क्रांतीवादाचा शोध लावताना कोणाला सांगितलं तरी होतं का? 'चर्चे चर्चे जायते कंठशोषः' असं कोणा एका पाद्रिबाबाने म्हटलेलंच आहे. पण तरीही काही उपयुक्त मुद्दे अंगावर चढलेल्या जेवणानंतरच्या डुलक्यांप्रमाणे बाहेर आलेच. ऐसी अक्षरेच्या मार्गदर्शक धोरणांमध्ये दिल्याप्रमाणे त्या चर्चेचा गोषवारा इथे देतो.

एकदा खरेदी-विक्रीसाठी लोक जमले की त्यांना इतर गोष्टीही विकत घ्याव्याशा वाटतात. म्हणजे साधीशी टूथपेस्ट घ्यायला मॉलमध्ये गेलेल्या व्यक्तीला अचानक मोठ्ठ्या स्क्रीनचा टीव्ही असल्याशिवाय आपलं आयुष्य अपुरं आहे असं वाटायला लागतं. तेव्हा आपल्याला विक्रीसाठी 'अ' प्रकारच्या वस्तू ठेवायच्या असतील तर त्या विकल्या जाण्यासाठी इतर काही असंबद्ध 'ब' गोष्टीही विकायला ठेवायला हव्या. कारण पैशाकडे पैसा जातो त्याप्रमाणे गरजेकडे दुसरी गरज जाते. गरजा अमर्याद असतात, साधनं मर्यादित असतात. मग मर्यादित साधनं संपलेली नसतात तेव्हाच इतर गरजांची आठवण करून दिलेली बरी नाही का? वगैरे वगैरे वगैरे.

अगदी थोडक्यात गोषवारा म्हणजे आणखीन काहीतरी विकायला पाहिजे! प्पॉण क्कॉय? हा शेवटचा उच्चार तोंडात पान कोंबल्यामुळे आला होता. त्या 'प्पॉण क्कॉय' वर बैठक पांगली.

भणभणलेलं डोक्यात सैतानाने कुटिरोद्योग उघडलेला असतो हे गेल्या लेखात आपण पाहिलंच. मात्र भरपेट जेवणानंतर हे उद्योग थंडावतात. कुटिरोद्योगाची अवस्था पुण्यातल्या (सिंगल ण वालं, पुणे शहर) दुपारी बंद झालेल्या दुकानांप्रमाणे होते. सगळे विचार सुस्तावतात. मग आपण जगाच्या भवितव्याविषयी साधकबाधक चिंतन करत तूरियावस्थेत कधी जातो ते कळतही नाही. ही तूरियावस्था अत्यंत सृजनशील असते. कारण त्यावेळी आपण आणि आपलं मन यांमध्ये अडथळा आणायला फोन, टीव्ही, बायको, संस्थळं यासारखे अडथळे नसतात. 'आपुलाचि संवादु आपणाशी' निवांतपणे चालू शकतो. एक प्रकारचा तात्पुरता सन्यासच असतो. म्हणून आपणच आपल्याला गमतीदार चित्रं दाखवत बसतो. त्यात बहुतेक वेळा आपलं अंतर्मन आपल्याला काहीतरी अगम्य भाषेत संदेश देत असतं. बहुतेक वेळा ते कळत नाहीत. पण त्या दिवशी त्या संपादकाच्या मनश्चक्षुंसमोर जी चित्रं उभी राहिली ती अविस्मरणीय होती.

सुरूवात झाली तेव्हा कसं कोण जाणे शरीर सूक्ष्मरूपात गेलं. शिल्लक राहिल्या त्या प्रतिमा. तो एका मोठ्या मैदानात फिरत होता. मग अचानक हळुहळू वर जायला लागला. मैदान, त्या आसपासच्या बिल्डिंगी यांच्याकडे गूगल मॅप्स मध्ये झूम आउट केल्यासारखं दिसायला लागलं. ही प्रक्रिया वेगाने सुरू झाली. मग विमानात बसल्याप्रमाणे शहरं दिसायला लागली. अजून वर गेल्यावर देशांच्या रेषा दिसायला लागल्या. शेवटी पृथ्वी आणि चंद्र, मग आख्खी सूर्यमाला दिसायला लागली. विज्ञानाच्या पुस्तकात दाखवल्याप्रमाणे ग्रहांच्या भ्रमणाच्या लंबवर्तुळाकार कक्षाही आखल्याप्रमाणे दिसायला लागल्या व ग्रहांशेजारी त्यांच्या नावांची लेबलंही सोयीसाठी होती. पण नंतर गंमत म्हणजे या ग्रहांच्या कक्षा आकुंचन प्रसरण पावायला लागल्या. एकमेकांना ओलांडून अलिकडे पलिकडे जाऊ लागल्या. नऊ नव्हे नव्हे आठ ग्रहांच्या कक्षा बदलायला लागल्या. मग अचानक त्या कक्षा पुसल्या गेल्या आणि त्या ग्रहांना सामावणारं कुंडलीचं चित्र दिसायला लागलं. ग्रह आपल्या जागा वेगाने बदलतच होते. मात्र आता ते एका घरातून दुसऱ्या घरात जाताना दिसत होते.

ही तूरियावस्था अजून पुढे चालवावी अशी त्याची इच्छा होती. पण अचानक फोन खणखणला, टीव्हीचा आवाज ऐकायला यायला लागला, आणि बायकोचं 'जळ्ळं मेलं ते संस्थळ, कॉंप्युटरवर जेव्हा बघावं तेव्हा तेच उघडून ठेवलेलं असतं' असं प्रेमळ बोलणं ऐकू आलं. थोडक्यात काय, बाह्य जगाने या तात्पुरत्या सन्यासावर अतिक्रमण केल.

तरी तूरियावस्थेतून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी चहा वगैरेची गरज असते. तो कार्यक्रम यथास्थित झाल्यावरच बहिर्मन कार्यरत होऊन अंतर्मनाने दिलेल्या संदेशाचा विचार करायला लागतं. आता हे अंतर्मन असं कोड्यात का बोलतं हे कधी कळलेलं नाही. अशी चित्रं वगैरे दाखवण्याऐवजी सरळ लिहून द्यायचं ना, 'ग्रह आपली जागा बदलतात'... हा विचार आला आणि पुन्हा तो दोनशे वॉटचा दिवा खाडकन् लागला!

त्याचं असं झालं की सकाळच्या चर्चेत 'ऐसी अक्षरेवरच्या पुण्य गुणांऐवजी खरं खुरं पुण्य खरेदी विक्री केलं तर?' असा एक प्रस्ताव आला होता. पण अर्थातच तो फेटाळला गेला होता. कारण कर्मविपाक सिद्धांत वगैरे कोणीतरी मांडलेला असला तरी खऱ्या पुण्याला मुळात फारसा भाव नाही (पुण्ण्याला.. पुण्ण्याला.. पुणे शहराला प्रचंड भाव आहे. कारण तिथल्या अनेकांनी तो भरपूर खाऊन ठेवलेला आहे. असो, पुन्हा एकदा पुण्याला मानाचा मुजरा वगैरे...). आणि मुळात प्रत्येकाकडे किती पुण्य आहे हे मोजणार कसं? आता अण्णा हजारेंसारखे सत्शील, पुण्यवान, अहिंसकदेखील 'एकही मारा?' वगैरे बोलायला लागले. मग पुण्य ही इतकी डिग्रेडबल वस्तू केवळ कशी मोजणार? जनमतावरून पुण्य मोजणं हे प्रतिसादसंख्येवरून धाग्याचा दर्जा ठरवण्यासारखं झालं. पण समजा प्रत्यक्ष पाप पुण्य खरेदी विक्री करण्याऐवजी पाप पुण्याचे इंडिकेटर्स खरेदी विक्री केले तर? असे सर्वमान्य निर्देशांक कुठचे? अर्थात कुंडलीवरचे ग्रहयोग!

ताबडतोब सर्व संपादक मंडळाशी चॅट करण्यात आला. सगळेच आपापल्या तूरियावस्थेतून नुकतेच बाहेर येत असल्याने या भन्नाट कल्पनेला होकार मिळायला फार अडचण आली नाही. आणि हे कसं करायचं याचा आराखडाही ठरला. तो मी तुमच्यासमोर मांडतो.

तुम्हाला जो एक्स्चेंज सेंटरचा टॅब दिसेल तो उघडल्यावर तुम्हाला आता दोन भाग दिसतील. पहिल्या भागात तुमचं ऐसीअक्षरेवरचं पुण्याचं बॅलन्स दिसेल. त्याबरोबरच सध्याचा पुण्याचा एक्स्चेंज रेटही दिसेल. तिथून तुम्हाला हवं तितकं पुण्य खरेदी विक्री करता येईल. हे आधी सांगितल्याप्रमाणेच. शिवाय त्याखाली तुम्हाला तुमच्या ग्रहयोगाचं थोडक्यात वर्णन दिसेल. (त्यासाठी तुमची जन्मवेळ एकदा द्यावी लागेल, पण त्याची प्रक्रिया इथे सांगत बसत नाही) सद्यपरिस्थितीसाठी तुमचे कुठचे ग्रह वाईट स्थानी आहेत व कुठचे चांगल्या स्थानी आहेत यांची ग्रहवार यादी असेल. त्या प्रत्येकापुढे ही परिस्थिती बदलण्यासाठी कुठची स्थानं विकत घेता येतील, त्यांचा सध्याचा बाजारभाव काय आहे वगैरे दिसेल. मग काही क्लिक्समध्ये तुम्हाला इतर सदस्यांकडून ग्रहस्थानं खरेदी करता येतील, किंवा तुमची ग्रहस्थानं विकता येतील.

आमच्या मार्केट रीसर्चप्रमाणे सर्वात महत्त्वाचे ग्रह असतील ते म्हणजे मंगळ आणि शनि. मंगळ व शनि हे दोन्ही प्रथमं वंदे आहेत. लग्न ठरण्यासाठी मुलींना अस्थानी असलेल्या मंगळाने जितकं छळलेलं असेल तितक्या अस्थानी असलेल्या वाकड्या नाकाने किंवा तिरळ्या डोळ्यांनीही छळलं नसेल. तेव्हा कोणाला जर आपल्या मंगळाच्या लग्नस्थानाचं एक्स्चेंज करण्यासाठी लागले थोडे पैसे द्यावे तर काय बिघडलं? तसेही जास्त हुंडा देणे, कमी प्रतीचा वर स्वीकारणे यातून खर्च होतोच. त्यापेक्षा रीतसर जागा बदलून घेण्यासाठी आला थोडा खर्च तर एकंदरीत सौदा सस्त्यातच पडेल अशी खात्री आहे.

शनिमहाराजांचं महत्त्व काय वर्णावं? एकदा त्यांची पीडा सुरू झाली की ती साडेसात वर्षं संपत नाही. मग तुम्हाला ग्रहस्थान एक्स्चेंज करून ती खूप पुढे ढकलता येईल. हा थोडा स्वस्तातला पर्याय आहे. कारण नंतर पुन्हा थोडे पैसे खर्च करून ती आणखीन पुढे ढकलणं येतं. पण जास्त खर्च केलात तर असेही लोक सापडतील जे काही रुपड्यांसाठी आपली संपलेली साडेसाती पुन्हा स्वीकारायला तयार होतील.

आता तुम्ही म्हणाल की आम्ही पैसे देऊन नवीन चांगली स्थानं भले विकत घ्यायला तयार असू, पण विकणारे सापडले पाहिजेत ना! मंगळ, शनि वगैरे बला कोण गळ्यात घालून घेणार आहे? त्याचं दोन शब्दांत उत्तर म्हणजे मार्केट फोर्सेस. बाजाराची शक्ती. तिला कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात, आणि वेगवेगळ्या वस्तूंबाबत असलेलं मूल्यमापन वेगवेगळं असतं. आता मंगळाच्या बाबतीत तर गंमतच आहे. लग्नस्थानी मंगळ थोड्या लोकांनाच असतो. नवरा बायको दोघांनाही तो असला तर काहीच हरकत नसते. त्यामुळे तुमचा मंगळ विकणं किंवा जोडीदाराचा मंगळ चालून जावा यासाठी स्वतःसाठी मंगळ विकत घेणं हे दोन पर्याय असतात. जागोजागी पत्रिका दाखवून मंगळ आहे म्हणून लग्न न होणाऱ्या मुली या विकत घेणार, तर ज्यांच्या प्रेयसीला मंगळ आहे पण घरच्यांना न दुखावता लग्न करायचं आहे ते गुपचूप मंगळ विकत घेऊ शकतील.

शनिच्या बाबतीत मार्केट फोर्सेस वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. बहुतेकांचा ठाम विश्वास असतो की आपल्या गाठीला पुरेसे पैसे नसणं हीच खरी साडेसाती. आता किती पैसे म्हणजे पुरेसे पैसे हे प्रत्येकाच्या कुवतीवर ठरतं. दिवसाला प्रतिमाणशी बत्तीस रुपये खर्च करणाऱ्याला दोन पाच लाख रुपये ही अगडबंब रक्कम वाटेल. आणि गेल्या वेळी साडेसाती आली तशीच पुन्हा आली तर तोंड देता येईल अशी खात्री वाटेल. तेव्हा खरेदी विक्री निश्चितच होईल.

या सगळ्यांत आपण ग्रहयोगांवर विश्वास असलेली लोकंच हिशोबात धरलेली आहेत. पण आता काही कर्मदरिद्री विज्ञानवादी वगैरे लोक असतात. ज्यांना हे सगळं प्रकरण थोतांड वाटतं. थोड्या पैशासाठी त्यांना काहीही उपयोग नसलेले ग्रहयोग त्यांना विकता येतील. खरेदी करणाऱ्यांना आपली पत्रिका सुधारल्यातून येणारं भौतिक समाधान, विकणाऱ्यांना पैसे मिळवण्याचं भौतिक समाधान मिळेल. या नतद्रष्ट नास्तिकांच्या माथी आपले वाईट ग्रह मारून त्यांच्या जीवनाचं वाटोळं केल्याचं मानसिक समाधान सश्रद्धांच्या पदरी पडेल. तर या थोतांडांवर विश्वास ठेवणाऱ्यांचे पैसे लाटल्याचं मानसिक समाधान अश्रद्धांच्या पदरी पडेल. संस्थळाला त्या खरेदीविक्रीतलं कमिशन मिळालं की ते लेखकांना मानधन म्हणून देता येईल. त्याने उत्तम लेखन वाचकांना वाचायला मिळेल. वाचकसंख्या वाढेल आणि मग खरेदी विक्री वाढेल. हे सुष्टचक्र चालूच राहील. एव्हरीबडी विन्स.

या सुविधेबरोबर इतरही काही सुविधा देण्याचं मनात आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुण्यगुणांची खरेदी विक्री आणि ग्रहयोगांची खरेदीविक्री या दोन्हींचं शिवणरेषाविरहित एकसंधीकरण - सामान्य मराठीत सीमलेस इंटिग्रेशन. म्हणजे ग्रहयोगाच्या खरेदी विक्रीसाठी तुमचे पुण्यगुण तुम्ही सहज वापरू शकाल. याहीपलिकडे जाऊन आम्ही काही डे ट्रेडर्ससाठी वेगवेगळी प्रॉडक्ट्स तयार करणार आहोत. उदाहरणार्थ पुण्यगुणांप्रमाणे मंगळांची साठेबाजी तुम्ही करू शकाल. जेव्हा तुम्हाला पत्रिका प्रसिद्ध करायची असेल तेव्हा अर्थातच एकच मंगळ असायला पाहिजे त्यामुळे तेव्हा ते सर्व तत्कालीन बाजारभावाने विकावे लागतील. हे टाळायचं असेल तर मंगळाचे किंवा शनिचे लॉंग व शॉर्टचे केवळ ऑप्शन्स विकत घेता येतील. हे ऑप्शन्स पूर्णपणे पुण्यगुणांच्या खरेदीविक्री प्रमाणेच असतील.

अरे हो, अंतिम पत्रिकेविषयी सांगायचं राहिलंच. तुमची खरेदी विक्री करून तयार झालेली पत्रिका आमच्या खास ज्योतिर्विदांकडून सर्टिफाय करून दिली जाईल. ती बरोब्बर येण्यासाठी तुमच्या वयानुरुप जन्मतारीख व वेळदेखील बदलून दिली जाईल. या पत्रिकेचं प्रिंटिंग तुम्हाला हव्या त्या फॉर्मॅटमध्ये करता येईल. त्यामुळे ती कुठच्याही ज्योतिषाकडे चालून जाईल याबाबत काळजी करण्याची काहीच गरज नाही.

खास डे ट्रेडर्ससाठी कुठचा ग्रह सध्या तेजीत आहे आणि कुठचा ग्रह मंदीत आहे याचा सल्ला देणारं एक सल्लागार मंडळ आम्ही तयार करू. त्यात अर्थातच आधीच्या काही टेक्निकल ऍनालिसिस करणाऱ्यांचा समावेश असेलच. शिवाय ज्योतिर्विदांनाही त्यांचं भविष्य जाणण्याचं ज्ञान लक्षात घेऊन या मंडळात स्थान दिलं जाईल. काही बुद्धीवादी अतिरेकी 'दोन्ही मंडळी असंबद्ध गोष्टींवरून अर्थ लावत असल्याने त्यांची भाकित करण्याची क्षमता सारखीच आहे' असं म्हणतात. पण आम्ही संस्थळ चालवत असल्यामुळे कोणाचं गुणमूल्यांकन करत नाही. आम्हाला सगळेच सारखे.

एकंदरीत ही दोन्ही ट्रेडिंग एक्स्चेंजं एकमेकांना पूरक ठरतील अशी खात्री आहे. पन्नास लाख मराठी लोक तर संस्थळावर येतीलच, पण शिवाय इतरभाषीयही आपलं भविष्य बदलून घ्यायला येतील. तुमच्या सध्याच्या पुण्यगुणाच्या किमती वारेमाप वाढतील. आणि त्यातलं थोडंसं खर्च केलंत तर तुम्हाला तुमच्या पत्रिका, व त्यातून तुमचं भविष्यही उज्ज्वल करून घेता येतील. तेव्हा जरूर या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

>>एकंदरीत ही दोन्ही ट्रेडिंग एक्स्चेंजं एकमेकांना पूरक ठरतील अशी खात्री आहे. पन्नास लाख मराठी लोक तर संस्थळावर येतीलच, पण शिवाय इतरभाषीयही आपलं भविष्य बदलून घ्यायला येतील. <<

Sayre's law नुसार:

"In any dispute the intensity of feeling is inversely proportional to the value of the issues at stake. That is why academic politics are so bitter."

असा विचार केला तर मराठी आंतरजालावर अधिकाधिक लोक यावेत या घासकडवी यांच्या धडपडीमागचा कावा लक्षात येतो - जर अधिकाधिक लोक आले तर स्टेक्स वाढतील खरे, पण आताच्या टिकलीएवढ्या मराठी आंतरजालावर ज्यात त्यात दिसणारी भावनाप्रधानता मग नष्ट होईल आणि उठसूठ कांगावे करणार्‍या ट्रोलांचंही महत्त्व नष्ट होईल. अशा आंजात कसली आलेय मजा? ते तर मग मृतप्राय होईल. त्यामुळे आमचा या स्कीमला त्रिवार निषेध!!!

- चिंतातुर जंतू कूपमंडूक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुर्जींना गुर्जी का म्हणावं हे गुर्जी पुन्हा एकदा सिद्ध करत आहेत.
बाकी हा कसा बोगसपणा आहे हे दर्शवण्यासाठी मी एक स्वतंत्र लेख लिहीनच. तोपर्यंत प्रतिसादासाठी रूमाल टाकून ठेवत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.