क्रिकेट निवेदक - कालचे आणि आजचे

क्रिकेट आणि इंग्रजी भाषा या दोन गोष्टींसाठी इंग्राज माणसाला त्याचा सगळा खडूसपणा माफ करुन टाकला पाहिजे. ( लेखाची सुरवात पुलंपुरस्कृत वाक्याने केली की वाचकाची सहानुभूती आपोआप लेखकाल्या बाजूला वळते हा माझा आजवरचा अनुभव आहे!) क्रिकेट म्हटल्यावर मराठी माणूस सामान्यतः आजच्या क्रिकेटआधी कालच्या क्रिकेटविषयी बोलायला लागतो. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेची शिंगे फुंकली गेली आहेतच, पण येणारी मालिका कशी होईल आणि तीत मिडियाने डोक्यावर उचलून उचलून ज्याच्या चिंध्या केल्या आहेत ते तेंडुलकरचे महाशतक होईल की नाही याआधी सिम्प्सन, क्लार्क, थॉमसन, गावसकर, अमरनाथ, बेदी यांची मालिका कशी झाली होती हा विचार मनात येतो. कितीही नोस्टाल्जिक व्हायचं नाही असं ठरवलं तरी आज जगताना पायात अडकलेली कालची सुतं काही सुटत नाहीत. आज टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघताना बिनटीव्हीचे जुने दिवस आठवतात.
तेंव्हा टीव्ही नव्हता आणि म्हणून रेडीओवरची क्रिकेट कॉमेंट्री आणि चित्रपटांच्या सुरवातीला असलेल्या 'इंडियन न्यूज' ची रिळं यातूनच क्रिकेटचा जो काय व्हायचा तो परिचय होत असे. ती रिळंही काळ्यापांढर्‍या रंगात असायची आणि त्यांना अतिशय नाटकी आवाजात कॉमेंट्री असे. 'मुंबईत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा क्रिकेट सामना सुरु.... बेदीचे पहिल्या दिवशीच पाच बळी...' या शब्दांमागचा नाटकी स्वर लिहून दाखवता येणार नाही. कॉमेंट्रीला 'धावते वर्णन' वगैरे म्हणण्याच्या आधीचे हे दिवस होते. पण ही 'इंडियन न्यूज' ची रिळं बघून काही समाधान होत नसे. क्रिकेटची खरी मजा यायची ती रेडिओवर क्रिकेट कॉमेंट्री ऐकतानाच. ऑस्ट्रेलियात मॅचेस असल्या की पहाटे पाचाच्या सुमारास कॉमेंट्री सुरु होत असे. डोळ्यावर झोप असे, हवेत प्रचंड थंडी. कसबसं तोंड धुवून अंगाभोवती वाकळा गच्च गुंडाळून आम्ही ट्रान्झिस्टरभोवती बसत असू. गरम चहा प्यावासा वाटत असे, पण आई अजून उठलेली नसे. आधी दहपंधरा मिनिटं नुसतचं वाद्यसंगीत आणि खरखर, मग 'पूंक...पूंक...पूंक...पूंक..' अशी अगम्य इलेक्ट्रॉनिक खरखर आणि मन 'नमस्कार. आकाशवाणी. सकाळचे सव्वापाच वाजताहेत. आमची पहिली सभा आता सुरु होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यांत मेलबर्न इथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट सामन्याचं उपहारापर्यंतच्या खेळाचं इंग्रजी आणि हिंदीमधून समालोचन आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन प्रसारित करण्यात येत आहे. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत' ही उद्घोषणा ऐकली की डोळ्यांवरची झोप उडून जात असे. त्या काळात सुशील दोशी या हिंदी समालोचकानं मनावर गारुड घातलं होतं. त्या काळात जिंकण्यापेक्षा हरण्यातच प्रसिद्ध असलेल्या भारतीय संघाच्या खेळाचं समालोचन दोशींच्या खानदानी हिंदीमुळे सुसह्यच नव्हे तर आनंददायी होत असे. इंग्रजीची मनात भीती होती आणि मराठी समालोचन बाळबोध वाटे. बाळ पंडीतांचे ( 'चेंडू फलंदाजानं संथपणे परत गोलंदाजाकडे ढकललेला आणि अशा रीतीनं शिवरामकृष्णनचं निर्धाव षटक संपलेलं' वगैरे) आणि अत्यंत गंभीरपणे बोलणार्‍या वि.वि. करमरकरांचे मराठी समालोचन थोड्या वेळाने ऐकायला नकोसे वाटे.त्यामुळे हिंदी समालोचन आपलं वाटत असे. अर्थात आमची हिंदी ही संपूर्णपणे हिंदी चित्रपटोद्भव आणि बरीचशी गावाकडे बोलल्या जाणार्‍या 'मुसलमानी' भाषेच्या जवळपास जाणारी असल्याने ('सुबोको गजर न्है हुवासो मैं देरसे उट्या और पैलेपैले टाईमपिस मिस्त्रीके पास सटाके आया. अब्बा नमाजकु गै र्‍हैले और अम्मीको कालवनके वास्ते बैदे न्है मिलेसो वो बोंबाबोंब करती र्‍हैली...' वगैरे) सुशील दोशींची हिंदी ऐकताना स्वच्छ अंघोळ केल्यासारखे वाटत असे. दोशींची भाषा निर्मळ, शालीन आणि आदबशीर होती. क्रिकेटचे त्यांचे वर्णन मनोहर असे. 'मनोवैग्यानिक दबाव' हा त्यांचा आवडता शब्द असावा. 'पहले धैर्य खोया, फिर विकट खोया' असली चमकदार असलेली वाक्ये ते सहज म्हणून जात.बॅटला हिंदीत 'बल्ला' म्हणतात या ज्ञानाचं श्रेय सुशील दोशींना द्यायला हवं. एरवी 'बल्ला' या शब्दाच्या अर्थाविषयी आमच्या काही भलत्याच कल्पना होत्या. बेदी, प्रसन्ना, चंद्राचे ते दिवस. गावसकरची लांबलचक उतरण सुरु झाली होती आणि कपिलदेवचा उदय होत होता. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारची गोलंदाजी करणारा 'करसन घावरी' त्याच्या वैशिष्ट्यामुळे आणि नावामुळे आवडायचा. 'घावरी' हे कुठल्यातरी गोड पदार्थाचं नाव असेल असे वाटत असे. (तसेच पुढे 'मुदस्सर नजर' हेही नाव आवडून गेले होते!). पण जुने क्रिकेट आठवले की हटकून आठवते ते सुशील दोशींचे हिंदी समालोचन. बाकी इंग्रजी समालोचक होते बरेच, पण आठवणीत आहेत ते सुशील दोशी.
आता जरा नोस्टाल्जिया सोडून वर्तमानकाळात. अलीकडच्या काळातले मनावर पगडा टाकणारे दोन क्रिकेट समालोचक म्हणजे हर्षा भोगले आणि नवज्योतसिंग सिद्धू. हर्षा भोगलेचं कौतुक अनेक कारणांसाठी आहे. एकतर मराठी माणूस असूनही तो उत्तम संवाद साधू शकतो. इंग्रजी, हिंदी, मराठी या तीनही भाषा तो उत्तम बोलतो. त्याचं इंग्रजी तर इंग्रजाला लाजवेल असं आहे. प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याची पार्श्वभूमी नसूनही त्याला या खेळाची अत्यंत बारीकसारीक तांत्रिक माहिती आहे. व्यवस्थापन क्षेत्रात त्याचे सल्लागार म्हणून मोठे नाव आहे. असं असूनही माणूस म्हणून तो अगदी 'डाऊन-टू-अर्थ' वाटतो. त्याच्या बोलण्यात अलंकारांचा भरपूर वापर असतो पण तरीही त्याचा रमेश वांजळे होत नाही. क्रिकेटव्यतिरिक्त इतर विषयांवरही तो बोलत असताना त्याचं बोलणं ऐकत रहावसं वाटतं. नवज्योतसिंग सिद्धूची गोष्टच न्यारी आहे. सरदार असल्याने तो अत्यंत सणकी आहे. आणि हे अत्यंत थोर आहे. त्याची मतं चुकीची असतील, पण ठाम असतात. इंग्रजी तोही बोलतो उत्तम, आणि त्याची स्वतःची म्हणून एक शैली आहे. 'सिद्धूइझम' या नावाने प्रसिद्ध झालेल्या त्याच्या अनेक एकोळ्या कधीकधी श्लीलाश्लीलतेच्या सीमेवर घोटाळतात. एखाद्या गोंधळलेल्या फलंदाजाला तो सहजपणे 'अ‍ॅज कन्फ्यूज्ड अ‍ॅज अ बेबी इन अ टॉपलेस बार' म्हणून जातो आणि ( ते चित्र डोळ्यासमोर येऊन!) आपल्याला हसू फुटतं. (या लेखाच्या निमित्तानं वाचकांना आठवणार्‍या सिद्धूच्या एकोळ्या येथे संग्रहित झाल्या तर त्यांचं स्वागत आहे) सिद्धूच्या नि:पक्षपातीपणाचं, देशाभिमानाचं आणि सडेतोडपणाचंही विशेष कौतुक व्हायला पाहिजे. कदाचित असं करताना तो 'ओव्हरबोर्ड' जात असेल आणि हीच गोष्ट त्याच्या एक समालोचक म्हणून बहरत असलेल्या करीयरला मारक ठरली असावी. इतरही अनेक गोष्टी असाव्यात. त्याच्यावर झालेले गंभीर आरोप, त्याची भाजपची खासदारकी आणि 'रिअ‍ॅलिटी शो'ज मधला त्याचा नको इतका वावर. पण ते असो. सडेतोडपणाची हीच गोष्ट काही प्रमाणात सुनील गावसकरलाही लागू होते. 'हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानते हैं' असं नूरजहांसमोर सुनावणारा हा माणूस आहे. गावसकरचेही इंग्रही निर्दोष असले तरी ते प्रयत्नसाध्य वाटते. त्यात हर्षा भोगलेची सहजसाध्य नजाकत नाही. इंग्रजी बोलताना गावसकर मराठी शब्दही सहजपणे वापरतो. सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीला तो 'मिक्स भजी' ची प्लेट असं म्हणतो तेंव्हा आपण एखाद्या आंतरदेशी वाहिनीवर बोलत आहोत याची फिकीर करण्याचे त्याला कारण वाटत नाही. भारतियत्वाचा न्यूनगंड नसलेला हा आंतरदेशीय माणूस आहे. आजच्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना त्यानं दिलीपकुमारच्या यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर शुभेच्छा दिल्या. हे गावसकरचे वैशिष्ट्य आहे. मनात आले की तो ते करुन, बोलून टाकतो. असाच आदर वाटावा असा माणूस म्हणजे रमीज राजा. हा माणूसच खानदानी आहे.भारताविषयी कोणत्याही प्रकारचा विखार रमीज राजाच्या बोलण्यात आढळत नाही. आणि त्याचे इंग्रजीही अगदी लालित्यपूर्ण आहे. वासिम अक्रमही तसाच. संजय मांजरेकर बाकी सदाशिवपेठी इंग्रजी बोलतो. मांजरेकरचा आवाज छान आहे. त्याचं क्रिकेटचं ज्ञानही अचूक आहे. पण यशस्वी समालोचक व्हायला याच्यापलीकडे जे काही लागते ते त्याच्याजवळ नाही. रवी शास्त्री हा माणूस आवडणार्‍यांपेक्षा न आवडणारीच माणसे मला अधिक भेटली आहेत. तरीही त्याच्या काळात 'नो शास्त्री, नो मॅच' कसे काय झाले होते कुणास ठाऊक. त्याचीही भाषा निर्मळ आहे, पण तिलाही हर्षा भोगलेच्या इंग्रजीची नजाकत नाही. विशेषतः हर्षा भोगले आणि जेफ्री बॉयकॉट यांची जुगलबंदी ऐकावी. दिवाळीची आठवण येते. लक्ष्मण शिवरामकृष्णन बाकी सौरव गांगुलीइतकंच रटाळ बोलतो. शिवरामकृष्णनला इतक्या वर्षांत त्याच्या इंग्रजीवरचा दाक्षिणात्य प्रभाव पुसता आलेला नाही. त्याचे प्रेशरला 'प्रेजर' म्हणणे पटवून घेणे जरा अवघड जाते. गांगुली बाकी कोणत्याही भावभावनांच्या पलिकडे जाऊन एकसुरी , निर्विकार आवाजात बोलत असतो. दर वाक्यात एकदा तरी 'देअर यू सी' आलेच पाहिजे असा कायसासा त्याचा नियम असावा. का कुणास ठाऊक, त्याच्या बोलण्यात मला 'मी रिटायर झालो नसतो तर...' (किंवा 'मला रिटायर व्हायला लागले नसते तर...') असला 'मनात आणिन तर बच्चमजी'पणा जाणवतो.
(क्रमशः)

field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

क्रिकेट आणि भाषा या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि अस्मितेच्या विषयांचा संगम होतो ते समालोचनात. त्यामुळे हा लेख रंगणार हे वाटलंच होतं. वाचून झाल्यावर सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या. आणि शिवाय क्रमशः पाहिल्यावर आंधळ्याला दुसरा डोळा अगदी मिळाला नाही, तरी प्रॉमिसरी नोट मिळाल्याचं समाधान झालं.

मला आठवतंय ते आमच्या वडलांकडून ऐकलेलं नाव म्हणजे बॉबी तल्यारखान. पाडगावकरांसारखा जाड चष्मा आणि दाढी असलेल्या या माणसाची टीव्हीवर झालेली मुलाखत पाहिल्याचं अंधूकपणे आठवतंय. त्याच्या तोंडचं समालोचन ऐकल्याचं आठवत नाही.

आमच्या घरी जेव्हा टीव्हीवर मॅच दिसायची तेव्हा बाबा टीव्हीचा आवाज बंद करून रेडियो लावायचे. कारण टीव्हीची कॉमेंटरी फारच जुजबी असायची. रेडियोवर बोलताना सगळं चित्र स्पष्ट करण्यासाठी समालोचकांना कष्ट घ्यावे लागतात. म्हणून हे कॉंबिनेशन मस्त जमायचं.

सिद्धूचे सिद्धूइझम्स ऐकणं ही पर्वणी असते. हा माणूस विनोदी लेखक म्हणून नाव काढू शकेल अशी खात्री वाटते. इतरांनी भर घालावी ही विनंती.

गेली बरीच वर्षं टीव्ही आणि रेडियोवरच्या समालोचनाला फुकट सहज ऐकण्याची सोय नसल्याने मी क्रिकइन्फोवरचं लेखी समालोचन वाचत असे. काम करता करता ते वाचणं ही देखील गंमत होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रविवार. सुट्टी असूनही काही कामं अंगावर आलेली. अशात असं लेखन वाचायला मिळालं. आधी ठरवलं की काही वाक्यं प्रतिसादात टाकायची, पण एकूण निवड अवघड आहे हे लक्षात आलं म्हणून तो प्रयत्न सोडून दिला. त्यात क्रमशः आहे. मग म्हटलं थांबावंच. तुमच्यातल्या (सन्जोप रावांमधल्या) इंग्रजाकडं दुर्लक्ष होतं, ते सहज शक्यही होतं ते यामुळेच. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटचा परिच्छेद आवडला. क्रमशः बघून अधिकच आनंद झाला.
सिद्धूचं बोलणं सुरुवातीला रंजक वाटलं. नंतरनंतर तो loud वाटू लागला. त्याला टाळायचाच हल्ली प्रयत्न करतो.
पण हो, त्याच्या पगडितून कधी कुठला धमाल वाक्प्रचार बाहेर येइल सांगता येत नाही.भारत विश्वचषक जिंकत असताना स्वारी भलतीच फॉर्मात(मराठी क्रिकेटने शिकवलेला शब्द) आलेली होती.

गांगुलीने एकदा द्रविडला धावचित केला. कॉल देउनही अचानक परत पाठवलं, द्रविड बाद झाला.
तेव्हा सिद्धू जे बोलला, ते आमचं सर्वात आवडलेलं वाक्यः-
"Ganguly has thrown a drowning man both ends of the rope."

विकिपिडियावर हे ही सापडलं :-
Deep Dasgupta is as confused as a child is in a topless bar!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्तच ! क्या खूब दिन थे वो, बेमिसाल. तुम्ही ट्रान्झिस्टर म्हणता पण आम्ही क्रिकेटवेडे पोरे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत असलेल्या 'मधुरा कोल्ड्रिंक्स हाऊस' कडे मॅचेसच्या दिवसात पळत सुटत असू. त्यावेळी वन-डे वगैरे मसाला नव्हता, होते ते पांढर्‍या शुभ्र शुध्द कपड्यांचे तितकेच शुध्द "जंटलमन" क्रिकेट. त्या कोल्ड्रिंक्स हाऊसवाल्याकडे एक मोठा जर्मन मेकचा व्हॉल्व्हचा रेडिओ होता ज्याला क्रिकेट कॉमेन्ट्रीच्या दिवसात खास कर्णे बसविले जायचे म्हणजे दुकानात आत गर्दी झाली तरी बाहेर कान लावून "लिसनर्स क्लब मेम्बर्स" कबुतरांसारखी गर्दी करायचे त्या भोवती. शिवाय एक मोठा ब्लॅक बोर्डही, ज्यावर हौशी कलाकार मिनिटामिनिटाचा स्कोअर लिहित असत. ज्याला रेडिओ ऐकू यायचा नाही, ते मग स्कोअर बोर्डकडे लक्ष देत असत. गल्लीत एखाद्या दुसर्‍याकडे रेडिओ होता, नाही असे नाही, पण 'एकत्र जमून' कॉमेन्ट्री ऐकण्यात जी नशा आहे ती एकट्याने (हाय, कंबख्त, तूने पीही नही - या चालीवर) ऐकण्यात कधीच नसायची.

श्री.राव यानी हिंदी समालोचनाचा (काय शब्द आहे, ऐकायला छान वाटते, पण कॉमेन्ट्रीची नशा नाही समालोचनात !) उल्लेख केला आहे आपल्या लेखात, पण मी ज्यावेळी फक्त आणि फक्त 'इंग्रजी'चेच कॉमेन्ट्रीचे दिवस होते तो काळ "ऐकला" आहे. बॉबी तल्यारखान याना ऐकले नाही, आणि तो विजयनगरच्या महाराजांचा ("विझी" नावाने फेमस) उतरता काळ होता, तरीही विजय मर्चंट त्यांना सायंकाळी ५.०० च्या सुमारास दिवसभराच्या खेळाचा लेखाजोखा सांगण्यासाठी खास आमंत्रित करत. विझींच्या आवाजात जडपणा आला होता, तरीही त्यांच्या एक्सपर्ट कॉमेन्टस ऐकायला थांबणारी बरीच मंडळी आम्हाला दिसत. अर्थात आमचे हीरो म्हणजे प्रामुख्याने 'अनंत सेटलवाड, डिकी रत्नागर, पीअरसन सुरिता, चक्रपाणी, बालु अलगनन, सुरेश सरैय्या आणि अर्थातच विजय मर्चंट' ही मंडळी होती. पुढे वेस्ट इंडिजकडून "टोनी कोझिअर' यानी रेडिओ कॉमेन्ट्रीमध्ये भारतात जे नाव कमाविले त्याला तोड नव्हती. टीव्हीचा जमाना नव्हताच, आणि खरे तर त्याची गरजही कुणाला भासत नव्हती. त्याला कारण म्हणजे रेडिओवरून अगदी जातिवंत वर्णन, हास्यविनोद, जुन्या आठवणी, रेकॉर्डस सांगण्याच्या विविध तर्‍हा इतक्या खमंगपणे होत असत की, असे वाटायचे की प्रत्यक्ष स्टेडिअममध्येच आम्ही हजर आहोत.

हिंदीचे केव्हा आगमन झाले रेडिओवर हे नक्की आठवत नाही, पण हा बदल सुखद केला तो "सुशील दोशी" आणि 'नरोत्तम पुरी" यानी. या दोघांचे आकाशवाणीवरून "प्रजासत्ताक दिन परेड" चे समालोचन यापूर्वी ऐकले असल्याने त्यांच्या आवाजाची आणि वर्णन सांगण्याची हातोटी याची मोहिनी मनावर होतीच. आता ही नावे क्रिकेटशी जोडली म्हटल्यावर त्या आनंदात भरच पडली. पुढे यात सामील झाले ते रवि चतुर्वेदी आणि प्रेम नारायण. भारताने सुनिल गावस्कर, दिलीप सरदेसाई आणि विश्वनाथ यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर बलाढ्य अशा वेस्ट इंडिजवर त्यांच्याच मैदानावर पहिलावहिला विजय मिळविला त्यावेळी मैदानावर ब्रिजेश पटेल होता आणि त्याने घेतलेल्या धावेवर तो विजय नोंदविला गेला, ती कॉमेन्ट्री प्रथम 'हिंदी' त सांगावी की 'इंग्रजी' त यावर प्रेस बॉक्समध्ये रवि चतुर्वेदी आणि सुरेश सरैय्या यांच्या तू-तू-मै-मै झाल्याच्या बातम्या (नंतर) वि.वि.करमरकर यानी म.टा. मध्ये छानपैकी रंगवून सांगितले होते.

प्रेम नारायण या कॉमेन्टटरवर आकाशवाणीने कायमची बंदी घातल्याचे स्मरते. त्याला कारण म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या एका सामन्यात अगदी अटीतटीच्या क्षणी वेंकटराघवन 'पायचित' झाल्याचे जाहीर झाले आणि तो स्वतःवरच संतापत बॅट आपटत पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. खरे तर ही नित्याचीच बाब, पण प्रेम नारायण यानी त्या बॅट आपटत येण्याचे कृतीचे 'असे दिसते की वेंकट बाद नाही, आणि अंपायरच्या अन्यायाविरूद्ध तो आपला संताप दाखवत परत येत आहे" अशा अर्थाची कॉमेन्ट्री रेडिओवर केली. त्यावेळी स्टेडियममध्ये ट्रान्झिस्टर्स घेऊन जाण्यास अटकाव नसल्याने भरगच्च भरलेल्या स्टेडियममध्ये हजारो ट्रान्झिस्टर्समधून प्रेम नारायण यांचे ते 'अस्थानी वर्णन' प्रेक्षकांच्या कानी पडले, जे सत्य मानले गेले आणि मग पंचाविरूद्ध जो दंगा सुरू झाला तो थांबला नाही, आणि सर्व खेळाडूंजा जीव बचावत तंबूकडे पळण्याची पाळी आली. दोन्ही पंचांना खास पोलिस संरक्षण देण्यात आले. स्टेडियमचेही भरपूर नुकसान झाले.

हे सर्व झाले समालोचकाच्या नको तितक्या खोलवर जाऊन कॉमेन्ट्री करण्याच्या वृत्तीमुळे. पुढे यावर एक कमिशनही बसले आणि त्यातून समालोचकांसाठी आचारसंहिता लागू झाली, त्यानुसार त्यानी फक्त 'बॉल टु बॉल' एवढेच वर्णन करायचे आणि स्वतःच्या मताचा तिथे अजिबात उल्लेख करायचा नाही अशी त्याना सक्त ताकीद मिळाली.

(लिहिल तेवढे थोडेच आहे. पण टीव्हीवरील कॉमेन्ट्री हा पचनी न पडणारा प्रकार असल्याने त्याविषयी मत नोंदवित नाही.)

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख खुसखुशीत आहे, वरचा अशोक पाटील यांचा प्रतिसादही आवडला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

(क्रमशः)

हे काय ! यु टु सन्जोप! Smile

फार रिलेट करू शकलो नाहि तरी स्मरणरंजन आवडलं हे नक्की! शैली छान आहे हे नेहमी सांगितले जाणार नाहि याचई नोंद घ्यावी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हणजे बघा, बाय हियरींग कंमेट्री इन इंग्लिश, आमचे इंग्रजी फारच सुधारले ब्वॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

क्रमश: पाहून अजुन असचं खुमासदार वाचायला मिळेल म्हणून उत्सुक आहे! Smile

सिद्धूइझम
एका मॅचमध्ये भारतीय फलदांजी ढेपाळत असताना सिद्धू बोलला होता.
The way Indian wickets are falling reminds of the cycle stand at Rajendra Talkies in Patiala one falls and everything else falls!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लास लेख. आवडलाच.

लहानपणी रेडिओवर मराठी समालोचन ऐकायला खूप मजा यायची. मग गेले ते दिन गेले पण ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्सची क्लासिक टीम (हर्षा-बॉय्क्स-विल्को-सनी आणि मग शॅझ 'एन वॅझ, सिद्धू वगैरे!) आली. त्या टीमनं कॉमेंट्रीजगतात बहार आणली.

'तुझ्या दृष्टीनं क्रिकेट कमेंटरीची स्मरणीय उदाहरणं कोणती?' असं मला कुणी विचारलं तर पहिली आठवण होते ती २२ एप्रिल १९९८ ची. शारजाह मधला 'तो' वादळी दिवस, तेंडल्याची ती 'वादळी' खेळी आणि त्याला स्ट्रोक बाय स्ट्रोक मॅच करणारी टोनी ग्रेगची ती एक्सायटिंग कमेंटरी! तेंडुलकर पेटला होताच सोबत कमेंटरी बॉक्सात हा मनुष्य अक्षरशः उधळला होता! दुसरी आठवण होते ती २००६ सालचा 'तो' जोहानसबर्गमधला ४३४-४३८ ऐतिहासिक सामना. त्यातले शेवटचे काही क्षण, पुन्हा टोनी ग्रेगच! म्हणजे या दोन्ही वेळी तो जे काही बोलत होता ते काही लै भारी होतं अशातला प्रकार नव्हे पण समोर काहीतरी अद्भुत घडतंय याची ग्वाही समालोचकाच्या शब्दाशब्दातून मिळाली पाहिजे. ती एक्साईटमेंट त्याच्या आवाजात जाणवली पाहिजे. आणि ते टोनीला बरोब्बर जमलं.
"This is the best ODI i have ever witnessed. Oh look at them, they are in tears!" किंवा
"It's gone high.. Oh there's a fielder coming under it...is he gonna take it??? Yes he has taken it...that's the end of Tendaulkar... No, he's dropped it...he's dropped it... Damien Martyn has dropped Sashin Tendaulkar!"
या वाक्यांत काय खास आहे? काहीही नाही. पण टोनी ग्रेगच्या त्या भारावलेल्या आवाजात ते ऐकणं ही पर्वणीची गोष्ट आहे. आम्ही या दोन्ही सामन्यांच्या हायलाईट्सची पारायणं करण्यामागं टोनी ग्रेगची कॉमेंट्री हेही एक महत्त्वाचं कारण आहे. शब्दशः Live-wire आहे हा मनुष्य! मागं विक्रम साठ्येनं त्याच्या मिमिक्री कार्यक्रमात 'सचिनच्या प्रसिद्धीत टोनी ग्रेगच्या कॉमेंट्रीचाही महत्त्वाचा वाटा आहे" असंही म्हटलं होतं - अर्थात विनोदात! Smile

याच्या अगदी उलटचं रत्न म्हणजे आमचा अरुण. परवा सेहवागनं २०० पूर्ण केल्या तेव्हा अरुण लाल होता कॉमेंट्री बॉक्सात. अरे त्यानं दोनशे केल्यायत. जरा एक्साईटमेंट, निदान तोंडीलावण्याला म्हणून तरी? "Oh has he done it? Oh yes, he has scored 200 runs!" असं काहीतरी म्हणून टाकलं त्यानं! मला अरूण लाल आवडत नाही अशातला भाग नाही. पण तो आला की मला हसायलाच येतं. एकदा सगळे मॅच बघायला बसलो असता, आजोबा-बाबा-काका सगळे मिळून अरूणलालची खिल्ली उडवत होते (तेव्हा डीडी नॅशनलवर तो आणि मनींदरसिग कमेंट्री करत) मी विचारलं का हसताय म्हणून तर आबा म्हणाले - "एक काळ होता अरूणलाल ओपन करत असे. तेव्हा आमच्याकडे टीव्ही नव्हते. रेडिओवरच कॉमेंट्री लागायची. ती लागायची दहा मिनिटं उशिरा. आपली पहिली बॅटींग असली म्हणजे रेडिओवर कॉमेंट्री लागेपर्यंत हा गेलेला असायचा. नेहमीच!" मला तेव्हापासून कधीही अरुण लाल हे नाव घेतलं की हसायलाच येतं. हा मनुष्य कितीही वेळ काहीही बडबडू शकतो. आणि सतत स्वतःच्या वाईटातल्या वाईट विनोदावर हसू शकतो! त्याचीही "He's a fast bowler who bowls fast" किंवा "Marriage makes cricketers cool down a bit" अशी माणिकं त्याला जनतेनं दिलेलं Arun LOL हे नावं सार्थ करतात!

सध्या इतकंच. वाचता वाचताच म्हटलं अरे यात अ‍ॅलन विल्किन्स, टोनी ग्रेग, रिची बेनॉ इ.ची नावंसुद्धा नाहीत? मग क्रमशः बघून हायसं वाटलं! रणजित फर्नांडो वगैरे 'विकट' लंकन कॉमेंटेटर्सबद्द्ल पुढल्या भागात वाचायला मिळेल काय?! Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवड्या!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंगभूत खडूसपणामुळेच मला ब्रिटीश लोकं आवडतात त्यामुळे पहिलं वाक्य फारसं आवडलं नाही. Wink पण एकूण लेख मस्तच आहे. क्रिकेट कॉमेंट्री ऐकूनतरी माझं इंग्लिश सुधारेल असं वाटल्यामुळे मी क्रिकेट बघण्याचा प्रयत्न केला. तो फसलाच, पण थोडं थोडं इंग्लिश समजायला लागल्यानंतर जेफ्री बॉयकॉटच्या यॉर्कशर उच्चारांची फार मजा वाटायची. आजही कोणी मुनी (money) वगैरे उच्चार करायला लागलं की मला जेफ्री बॉयकॉटच आठवतो. यॉर्कशरच्या लोकांना जेफ्री बॉयकॉट शक्यतो आवडत नाही, पण तो भारतात मात्र लोकप्रिय झाला.
त्याने केलेल्या कॉमेंट्रीतलं एक वाक्य आठवतं. राहुल द्रविड कोणत्याशा टेस्टमधे बोल्ड झाला, तेव्हा जेफ्री महाराज, "I could have driven my car through his bat and pads." बॉयकॉट आणि गावसकर किंवा हर्ष भोगलेची आपसांतली मारामारीही मजेशीर असते.

सिद्धूच्या बोलण्याची, उपमांची मला अजूनही गंमत वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्रिटीश लोक मलाही आवडतातच. (कुणाच्या तुलनेत ते लिहीत नाही Wink ). त्यामुळे ब्रिटिशांचा खडूसपणाही आवडतो. ब्रिटिशांचे जुन्याला चिकटून राहाणे तर फारच आवडते आणि लॉर्ड, अर्ल, बटलर वगैरे वुडहाऊसच्या कादंबर्‍यांमधले इंग्लंड तर क्रिकेटइतकेच आवडते.
बाकी क्रिकेट कॉमेंट्री ऐकून इंग्रही सुधारेल ही माझीही अपेक्षा फोल ठरली. काही लोकांच्या नशिबात काही गोष्टी नसतात हेच खरे. बाकी इतर कोणत्याही गोष्टीची खंत नाही, पण ही बया (इंग्रजी!) जर पटली असती तर बरे झाले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

पण ही बया (इंग्रजी!) जर पटली असती तर बरे झाले असते.

भाषा शिकण्याचा पटणारा असा शॉर्टकट मी तुम्हाला सांगायला हवा का? Wink

ब्रिटीशांच्या जुन्याला चिकटून रहाण्यामुळे बाकी काही नाही तरी काही लोकांना (तोंडावरची माशी न उडवता घोड्यावर बसण्याची) नोकरी मिळते, जुन्या गोष्टी व्यवस्थित जपतात, पर्यटन वाढतं हे खरंच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इंग्रज आवडतात की नाही यावर विचार केला नाही कधी ( नक्की आवडत नाहीत असे मात्र नाही ). पण इंग्रजीवर आमचा भारी जीव हो ( अगदी मातृभाषेपेक्षाही कांकणभर जास्तच असे एकेकाळी म्हट्ले असते )पण ती आम्हाला वाचायलाच जास्त पसंत असे, क्रिकेट्च्या इंग्रजी कॉमेन्ट्रीचे आम्ही वडिलांना भाषांतर करून मागत असू ( अर्धे उच्चार समजत नसत).
बाळ पंडित आणि दोशी ही नावे कित्ती दिवसांनी ऐकली, खूप आठ्वणी जाग्या झाल्या ( कोण रे तो डाउन विथ नॉस्टॅल्जिया म्हणतोय?). रावांनी क्रिकेट, समालोचन आणि आमचा प्रिय वुडहाउस यांच्या आठवणी काढून दिल्यात... आता काय, मज्जाच मज्जा... रात्रभर हे वर्ष कुठले आहे ते विसरून परत मनमुराद त्या जुन्या आठवणीत रमणार.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

रेडिओवर कॉमेंट्री मी कधीच ऐकली नाही. एकदाच कलकत्त्याला चाललेल्या कसोटीचे मराठीत धावते (खरं तर पेंगते) समालोचन ऐकायचा प्रयत्न केला होता. दोन मिनिटे कसेबसे ऐकले आणि रेडिओ बंद करून टाकला. त्यामुळे नो कमेंट्स ! बाळ करमरकरांच्या कॉमेंट्रीमुळे चिडलेला जमाव त्यांना शोधत ("कुठाय तो बाळ्या करमरकर?) आकाशवाणीवर (बहुतेक मुंबई आ.वा.) चालून गेला होता अशी गोष्ट बाबांनी सांगितली तेव्हा इतके लोक मराठी समालोचन ऐकताना जागेच कसे राहू शकतात असा प्रश्न पडला होता.

हिंदी कॉमेंट्रीबद्दल म्हणाल तर दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर मनिंदर सिंग आणि अरुण लाल यांची हिंदी कॉमेंट्री सामन्याच्या थेट प्रक्षेपणाबरोबर ऐकायला मिळते तीही छान असते. याच मनिंदर सिंगला कोकेन घेताना अटक झाली होती तेव्हा मला खूप धक्का बसला होता. कारण आवाजावरून तरी तो माणूस खिलाडू आणि खेळीमेळीने वागणारा वाटला होता. आता निओ स्पोर्सच्या काळात अनेक दिवसात ही हिंदी कॉमेंट्री ऐकायला मिळालेली नाही याचं वाईट वाटतं.

हर्ष भोगले आणि सुनील गावस्कर यांची कॉमेंट्री आवर्जून ऐकावीशी वाटते. सिद्धूने कॉमेंट्री करणं बंद केल्यावर मला वाईट वाटलं. त्याची आणि जेफ्री बॉयकॉटची जुगलबंदी बघायला मजा यायची. एम टीव्हीच्या एका कार्यक्रमात सिद्धू फाड फाड इंग्रजी बोलतोय आणि जेफ्री बॉयकॉट ऑक्सफर्ड डिक्शनरी घेऊन न कळलेल्या शब्दांचे अर्थ शोधतोय असा एक विनोदी प्रसंग दाखवला होता त्याची मला हटकून आठवण होते.

रवी शास्त्री कॉमेंट्रीला असला की मी टीव्हीचा आवाज बंद करून टाकते. मला त्याचं बोलणं ऐकवत नाही.

२००७च्या विश्वचषकाच्या आसपास विक्रम साठ्ये नावाच्या एका माणसाने बर्‍याच क्रिकेट खेळाडूंची आणि कॉमेंटेटर्सची उत्तम नक्कल केली होती. वर्ल्ड कपच्या मॅचदर्म्यान खुद्द जेफ्री बॉयकॉटसमोर त्याने जेफ्रीची नक्कल करून दाखवली होती. यानंतर मात्र तो गायब झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

तुम्हाला समालोचक असे म्हणायचे आहे असे मला वाटते. निवेदक केवळ सांगतो .. समालोचक प्रत्यक्ष घडते आहे ते वर्णन करून सांगतो.
असो .. विषय अत्यंत आवडीचा निवडलात.
जसदेवसिंग राहीला की. अत्यंत संथ आवाजात, पण सुंदर हिंदीमधे समालोचन करायचा.
टीव्ही आल्यावर सुशील दोशी बिचारा मागेच पडला, त्या मानाने डॉ. नरोत्तम पुरी लगेच टीव्हीकडे वळले.
हर्ष भोगले बद्दलच्या मताशी एकदम सहमत. सध्या तो आघाडीचा टीव्ही समालोचक आहे. तो पडद्यावर काय सुरू आहे हे नीट समाजावून सांगतोच, शिवाय सामान्य माणसाला समजेल अशा ओघवत्या भाषेत त्या द्रुश्याची कारणमिंमांसाही करतो.
सध्याच्या इतर समालोचकांमधे सुनिल गावसकर (अर्थातच), वसिम अक्रम हे आवडतात.
तुम्ही अरुणलालला विसरलात - मुद्दाम की काय ? Wink पण अरुणलाल हा अत्यंत साधा वाटतो आणि म्हणून माझ्या बर्‍याच मित्रांना आवडतो. तो कधीही ऊत्तेजित होऊन ओरडेल असे मला सारखे वाटत असते.
तुम्ही सौरव गांगुली व संजय मांजरेकरला एकसूरी म्हटले आहेत .. पण त्यांच्या समालोचनात जे समीक्षण असते, ज्या तांत्रिक गोष्टी ऊघड करून दिलेल्या असतात, त्या हर्ष भोगलेच्या समालोचनात नसतात. गावसकर अर्थातच या गोष्टींचा दादा आहे, खासकरून फलंदाजीतले बारकावे तो सोप्या भाषेत समजावतो.
गावसकर आणि शास्त्री सचिन तेंडूलकरच्या प्रत्येक लहानसहान गोष्टींचे समर्थन करतात (आम्हीही करतो .. भांडतो, पण ते आंतरराष्ट्रिय प्रेक्षकांसमोर नव्हे). त्यामुळे, ईंग्लिश व ऑस्ट्रेलियन समालोचक त्यांच्यापुढे ऊजवे वाटतात.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पियर्सन सुरीटा हा एक बाप कॉमेंटेटर होता.
माझे इंग्रजी जे काही थोडे सुधारले त्या ह्या माणसामुळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रिकेटची खरी मजा खेळ + कॉमेंट्री अशीच आहे. टीव्हीचा आवाज बंद करून क्रिकेट बघणारे महाभाग मी बघितलेत. गावस्कर, शास्त्री, भोगले यांची कॉमेंट्री संपली कि शिवरामकृष्णन वगैरे मंडळीनी येऊन जरा हजेरी लावावी आणि गपगुमान नारळ, कोक, पेप्सी, आईसक्रीम विकायला निघून जावं. गावस्करांचा खेळ समजवायची पद्धत, रवी शास्त्रीचा रोखठोकपणा आणि या दोघांसोबत हर्ष भोगलेच कॉमेंट्री + प्रेझेंटर शैली जाम आवडतात. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते हर्ष भोगलेविषयी कि, आपल्यासोबत कोण कॉमेंट्री करतंय याचं पूर्ण भान त्याला असतं. त्यानुसार तो बाजुच्याला बोलतं करतो. जर सोबत बॉयकॉट असेल तर फुल टू धम्माल. खडूस बॉयकॉट vs खडूस गावस्कर + हजरजबाबी रवी शास्त्री + वात्रट हर्ष भोगले, मग क्रिकेट हा फक्त खेळ उरत नाही. वसीम अक्रम, दादा, संजय मांजरेकर हि लोक पण चांगलीच आहेत. संजय मांजरेकरची कॉमेंट्री सदाशिव पेठे पेक्षा मला खडूस मुंबईकर बॅटिंग सारखी वाटते. सचिन तेंडूलकर मधला 'तें' चा परफेक्ट उच्चार संजय मांजरेकरच करतो.
मराठी कॉमेंट्री करणारे चंद्रशेखर संत आठवतात. काही वर्षांपूर्वी रणजी सामन्यांचे समालोचन मराठीत रेडिओवर असायचं, मुंबईची रणजी मॅच असेल तर नक्कीच. त्या वेळी मुंबई टीमचा खूप दरारा होता, अधून मधून सचिन पण रणजीत खेळायचा. षटक, यष्टी, धावफलक असले शब्द आम्ही पण क्रिकेट खेळताना हमखास वापरायचो. चंद्रशेखर संतांची एक खासियत म्हणजे मुंबई च्या टीमला जबरदस्त फेवर करायचे. खेळाडूंची ओळख पण "अतिशय गुणी खेळाडू" या पेटंट वाक्याने कराचे. उदा. 'अमोल मुझुमदार उजव्या हाताचा, मधल्या फळीतील भरवश्याचा, तंत्रशुद्ध, असा अतिशय गुणी खेळाडू'.
हिंदीतले सुशील दोशी नेहमीच लक्षात राहिले. मनिंदरसिंग, अरुण लाल कधी काळी हिंदीत कॉमेंट्री करायचे. असं अंधुक अंधुक आठवतंय.
डोक्यात जाणारे कॉमेंटेटर्स म्हणजे अतुल वासन, श्रीलंकेचा रणजीत फर्नांडो, बांगलादेशचा कोणतरी चौधरी, चारू शर्मा ( कधी काळी केली होती याने कॉमेंट्री), विनोद कांबळी ( बालाजी के मंदिर आठवतंय कोणाला? ) माईक हेझमन अजून बरीच आहेत नावं, सध्या टाकत नाही इथे.
ऑस्ट्रायलियन समालोचक रिची बेनॉ, बिल लॉरी पण क्लासिक!!! या सर्वांमध्ये सिद्धू इज सिद्धू. 'सिद्धूइझम'चा मी तर फॅन आहे. हा माणूस कधी काय बोलेल याचं नेम नाही 'When everything is coming your way, you might just be in the wrong lane of traffic असली वाक्य सिद्धूइझम मधेच असू शकतात.

अजून बरंच लिहिता आलं असतं... पण आत नको

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेव्हाचे मुख्य समालोचक म्हणजे इंग्रजीत अनंत सेटलवाड, सुरेश सरैया आणि हिंदीत सुशील दोषी , मुरली मनोहर मंजूळ.

अनंत सेटलवाड हे बहुधा निष्पक्ष समालोचन करत. (म्हणजे फालतू भारतीय खेळाडूंना फालतूच म्हणत) त्यामुळेच की काय आमचा त्यांच्यावर विशेष राग असे. सुशील दोषी थोडेसे भारतीय खेळाडूंबाबत ममत्व दाखवत. मुरली मनोहर मंजूळ यांचे समालोचन (मराठीत- कॉमेण्टरी) हे ओघवते आणि रसाळ थाटाचे असे. वाक्यातल्या शब्दांचा क्रम मागे पुढे करत ते समालोचन करत.

आणखी जसदेवसिंग नावाचे हिंदी एक समालोचक होते. ते एकसुरी समालोचन करीत. आणि ते क्रिकेटच्या, हॉकीच्या सामन्याशिवाय इंदिरा गांधी यांच्या अंत्ययात्रेचे, स्वातंत्र्य/प्रजासत्ताक दिनाच्या परेडचेही समालोचन करत.

त्या काळी एक्स्पर्ट कॉमेंटेटर नावाचा एक प्रकार होता. सहसा यात माजी खेळाडू असत. मुख्यत्वे लाला अमरनाथ, चंदू सरवटे असत. हे लोक नेहमी इंग्रजीतच बोलत. म्हणजे हिंदी कॉमेण्टरी चालू असताना विकेट पडली तरी यांची कॉमेण्ट इंग्रजीतच असे.

अवांतर : पूर्वी टिव्हीचा एकच चॅनेल असल्याने बातम्यांच्या वेळेला सामन्याचे प्रक्षेपण थांबवले जाई आणि मग टीव्ही अधिकारी क्रिकेटरसिकांच्या रोषाचे धनी होत. खेरीज मशहूर महल नामक एक टुकार प्रायोजित क्विझ कार्यक्रम रविवारी दुपारी लागत असे. त्या कार्यक्रमासाठीही प्रक्षेपण न चुकता थांबवले जाई. (या क्विझ कार्यक्रमात "खालील पैकी कुठल्या फळाचा रंग लाल असतो?" पर्याय- आंबा, सफरचंद, चिकू, संत्रे अश्या लेव्हलचे प्रश्न असत). Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख फार छान झाला आहे... प्रतिसादही खूप मस्त आहेत...

हा सिद्धुचा ईएस्पीएन टीव्हीसमालोचनादरम्यान स्वतः ऐकलेला किस्सा... ( जालावरचा प्रसिद्ध नाही)...

२००२ च्या वेस्ट इन्डीजच्या दौर्‍याच्या वेळी वेस्ट इन्डियन क्रिकेट फ्यानविषयी सांगताना त्याने सांगितलेली ही १९८९च्या दौर्‍याच्या वेळची आठवण... .( त्या वेळी सिद्धु कमी अनुभवी खेळाडू होता आणि त्या त्या दौर्‍यात त्याने द्विशतक वगैरे केले होते...)

टेस्ट म्याचेस चालू असताना खेळ संपल्यानंतर नेट सरावादरम्यान एकदा त्यावेळचा भारताचा कप्तान वेंगसरकरने मैदानात फिरणार्‍या एका अनोळखी वेस्ट इन्डियन माणसाला बोलिन्ग टाकायला सांगितले... त्या किडकिडीत दिसणार्‍या सामान्य माणसाने वेंगसरकराला इतक्या फास्ट बोलिन्ग केली की वेंगसरकरला बॉल जोरात लागला आणि वेंगसरकरने आश्चर्याने " आईचा घो" असे म्हणत त्या माणसाला अपशब्दांनी मानवंदना दिली... अर्थात दुरून हे दृश्य पाहणार्‍या खेळाडूंची हसता हसता पुरेवाट झाली...

हे सांगतानाही सिद्धु जाम हसत होता आणि त्याच्या तोंडून ते " आईचा घो" ऐकतानाही मजा आली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजा आली. अध्या क्रिकेटवर्णने ऐकायचा प्रसंग फारसा येत नाही. पण स्मृतिरंजनाच्या भागात रमलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लाला अमरनाथ वरून आठवण झाली... "ओक्के लाला" आणि "ओक्के गायकवाड" ची. आम्ही मोठे झाल्यानंतर एक काळ असा होता की कुठ्लीही गोष्ट फक्त ओके असायची नाही, ती अगदी ओक्के लालाच असायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यातले जोग नावाचे एक गृहस्थ त्यांच्या गच्चीवरून सामन्याचे समालोचन करायचे असे ऐकून आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0