दोन कविता!
एखादा राग खूप भिनला कि कधीकधी त्यात नसलेले स्वर देखील ऐकू येऊ लागतात.. तसेच काहीसे.. माझे मित्र आनंद थत्ते ह्यांनी लिहिलेली ही कविता वाचल्यावर झाले.. एक विसंवादी सूर लागला बहुधा दिलतितलीचा . इथे आनंदची मूळ कविता व त्याखाली दिलतितली हिचा प्रतिसाद असे दोन्ही देत आहे.. !!
"वेळ फार राहिला नाहिए
नीट निरवानिरव केली पाहिजे.
सगळ्य़ा कविता फाडून टाकल्या.
सगळी चित्रं आणि गाणी.
एकही खूण चुकून
रहायला नको.
संबंधांच्या गाठी सोडाव्यात
तर सगळ्या निरगाठी.
अणकुचीदार दाभण घेतला
गाठी रक्तबंबाळ.
जखमा अजून ओल्या?
बाहेर पडली
गोट्या,पिसं आणि शिंपले
नंतर खडे, मणी, रुमाल.
किती फसवावं स्वतःला?
हे निर्विकार पणे बाजूला सारलं
समोर उसळणा-या वासनांचा
डोह
आता याचं ... "
- आनंद थत्ते
***
"वेळ च वेळ.. पसरलाय चोहीकडे..
वाटले होते आता तरी.. होईल निरवानिरव..
होईल एकदाची लिहून माझी कविता..
होतील रंगवून चित्रे आणि म्हणून गाणी..
पण... नुसत्याच खूणा राहतात..
आणि ह्या संबंधाच्या गाठी,,
वाटले होते.. दाभण घेईन सोडवायला... करीन रक्तबंबाळ..
तर.. सगळ्याच सूरगाठी.. विशविशीत.. आधीच सुटलेल्या..
भरून यायला जखमाही नाहीत..
साचून राहतात आतल्या आत
गोट्या,पिसं आणि शिंपले
वर खडे, मणी, रुमाल.
फसवाफसवीची नशा
आणि विकारांचा मोह
उसळणा-या वासनांच्या डोहात लोळत पडलेय..
ह्या डोहाचे.. ह्या मोहाचे काय करणार.. कधी करणार.. ??
हे प्रश्नही नाहीत सोडवायला
नुसताच वेळ..
वेळ च वेळ.. पसरलाय चोहीकडे..
आता याचं ... !!"
For Anand!
- दिलतितली
प्रतिक्रिया
फर्मास
फर्मास जुगलबंदी
त्यातही
हे फारच आवडले.. अतिशय अस्सल प्रतिसाद दिला आहे तुम्ही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
क्या बात है
निरगाठींवरून इतकं काही झालं आहे की, ती कल्पनाच आता विसविशीत झाली आहे. त्या तुलनेत सुरगाठींच्या विसविशीतपणाची कल्पनाच एकदम पक्की, बांधलेली जाणवली. मी दोन्ही कवितांचा स्वतंत्रच विचार करू शकलो.
+१
दोन्ही कविता तितक्याच आवडल्या. विसविशीत गांठी ही कल्पना विशेष आवडली.
वा!
दोन्ही कविता आवडल्या...भिडणार्या आहेत अगदी!
झकास
फर्मास जुगलबंदी
अजून येउ द्या
.
तर.. सगळ्याच सूरगाठी..
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त!
मूळ कविता आणि उत्तर दोन्ही आवडल्या.
विशेषत: आजकाल नात्यांच्या गाठी विसविशीत झाल्याची जी सार्वत्रिक भावना बळावत चालली आहे ती तुमच्या कवितेत यथार्थतेने उतरल्यामुळे तुमची कविता कांकणभर जास्तच आवडली असे म्हणेन.
त्याच अनुषंगाने
यात वासना उसळणार्या ऐवजी नुसत्याच तरंग उमटवणार्या असत्या तर सुसंगत झाले असते असे वाटते.
छान पण :-|
आनंद थत्ते यांची कविता छान आणि तुमचे उत्तरही.
तुमच्या कवितेत कल्पकपणा आहे. पण आनंद थत्ते यांच्या कवितेला समांतर करण्याच्या भानगडीत त्या हव्या तशा खुलल्या नाहीत. थोड्याशा विस्कळित आणि आणि घुसमटलेल्या आहेत. ऋषिकेशना आवडल्या त्याच ओळी (दाभण... विसविशीत गाठी) मला आवडल्या, पण वाया गेल्यासारख्या वाटल्या.
खरे आहे..
होय, आनंदची कविताच मूळ आहे.. माझ्या ओळी ह्या उत्स्फूर्त प्रतिसाद / प्रतिक्रिया ह्या स्वरूपाच्याच आहेत त्यामुळे त्यात काही काव्यगुण सापडेलच असे नाही.. मला गम्मत वाटली ती एकदम एक विसंवादी सूर लागतो ना कधी कधी त्याची.. अर्थातच इथे सर्व मित्रांनी दिलेले प्रतिसाद माझ्या साठी महत्वाचे आहेत.. त्यामुळे मी हळूहळू मराठीतून लिहायला धजावेन.. खूप धन्यु.. !!
- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!
अपिल
दोन्ही कविता स्वतंत्र म्हणुन पण मनाला अपिल झाल्या, आणि जुगलबंदी म्हणुन तर मन जिंकुन घेतलं!