रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन

२-३ आठवड्यांपूर्वी 'आसक्त'तर्फे राबवल्या जाणार्‍या "रिंगण" नावाचा उपक्रमाबद्दल कळलं. त्याअंतर्गत या विकांताला शनिवारी (८-ऑगस्टला) पु.शि.रेगे यांच्या "सावित्री"चे अभिवाचन तर रविवारी श्री.सुधन्वा देशपांडे यांच्या "बहुत रात हो चली है" या नाटकाचा ज्योती सुभाष यांनी अनुवाद केलेल्या "रात्र काळी" या नाटकाचे नाट्यवाचन होते.
=======

मुळात पु.शि.रेग्यांची "सावित्री" माझे आवडते पुस्तक. एवढ्याशा पुस्तकाने मला पुरते भारावले आहे. त्यामुळे त्याच्यावर आधारित 'नाट्यरुपांतर' वगैरे प्रकारचा कार्यक्रम ऐकला की मी जात नसे. मात्र निव्वळ "अभिवाचन" आहे म्हटल्यावर जावं अशी इच्छा मुळ धरू लागली. आणि सुमित्रा भावे यांचे दिग्दर्शन या अभिवाचनाला आहे म्हटल्यावर जाण्याचे नक्की केले. सदर कथेचे अभिवाचन अमृता सुभाष करणार होत्या.

पु.शि.ची सावित्री, सुमित्रा भावे आणि अमृता सुभाष ही तीन नावे बर्‍यापैकी गर्दी तयार व्हायला पुरेशी होती. आम्ही वेळेआधीच पोचून तिकीटे काढल्याने निश्चिंत होतो. ठरली वेळ उलटून गेली तरी आतमध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईना. शेवटी नियोजित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशीराने प्रयोग सुरू झाला. उशीराबद्दल दिलगिरी व्यक्त करत आयोजकांना कोणतेही भाषण, सत्कार वगैरे आन्हिकांना फाटा देऊन थेट कार्यक्रम सुरू केला याचे बरे वाटले. स्टेजवरील नेपथ्य नेटके होते. एका बाजुला लाकडी टेबल, त्यावर नक्षीकाम केलेला टेबल लँप, तर स्टेजच्या दुसर्‍या भागात एक ठोकळा. टेबलच्या पार्श्वभूमीवर एका देवीचे मोठे चित्र, तर ठोकण्याशेजारी जपानी कॅलिग्राफी रेखाटलेले एक चित्र. अमृता सुभाष केसांची लांब वेणी, मंद जांभळ्या रंगाची चोपून नेसलेली- पुढे पदर घेतलेली - साडी, हातात कथेची संहिता आणि पेन घेऊन टेबलवर येऊन बसल्या. मागील देवीच्या चित्रावरील प्रकाश आणि टेबल लॅम्पचा प्रकाश तीव्र होत गेला आणि कथावाचनाला सुरूवात झाली. स्पष्ट सांगायचं तर मला कथावाचन तितकंस आवडलं नाही. किंबहुना एका कथावाचनासाठी पुरक अशा तांत्रिक रचना, नेपथ्य, पेहराव वगैरे गोष्टी यथासांग असल्या तरी अमृता सुभाष यांचे मुळात कथावाचनच मला तृटीपूर्ण वाटले.

अभिवाचन करताना वाचनासोबत अल्पसा 'वाचिक अभिनय' असावा असे मला वाटते. नुसते एवढेच नाही तर कथेच्या शक्तीस्थानाला श्रोत्यांसमोर अलगद उलगडणारे चढ-उतार, वाचनाचा वेग, आवाजाची पट्टी, भावचिन्हांचे राखलेले भान कोणत्याही अभिवाचनाचे महत्त्वाचे अंग असते. मात्र अमृता सुभाष यांचे वाचन मला अनेकदा एकसुरी वाटले. मुळात या पुस्तकातील रेग्यांची भाषा काहिशी कठीण आहे - प्रसंगी किंचितशी कृत्रिम सुद्धा. लेखनात - लेखन स्वतः वाचताना - अशी भाषा फारशी खटकत नाही. मात्र दुसर्‍याने केलेले कथन ऐकताना मात्र या प्रकारची भाषा कानाला त्रास देऊ शकते याचे भान ठेवायला हवे होते. अमृता सुभाष यांचे वाचन अनेकदा एकाच पट्टीतील व ठेक्यातील वाटले. आता मुळ कथा पत्राद्वारे मांडलेली असल्याने, मुद्दाम तसा ठेका म्हणा लय म्हणा मेंटेन केली असेलही - पण ऐकताना ते एकसुरी होत जाते. अशा पुस्तकात कित्येक वाक्ये अतिशय सौंदर्यपूर्ण आहेत, तर कधी अंगभूत लय असणारी आहेत. अशावेळी वाचन करताना बदलायचा वेग, शब्दांवरचे आघात अधिक विचारपूर्वक येणे अपेक्षित होते. थोडक्यात कथेचे बलस्थान दाखवायच्या ऐवजी त्याची काहिशा कृत्रिम भाषेची मर्यादा (जी स्वतः वाचताना फारशी दखलयोग्यही वाटली नव्हती)अधिक प्रकर्षाने जाणवून देणारे अभिवाचन माझ्या पसंतीस तितकेसे उतरले नाही. बाकी कुठेही आवाजची लय न बदल्याने, कित्येकदा विषय बदलताना घेतलेले पॉज मोठे वाटत होते, प्रसंगी रसभंग करणारे सुद्धा! पूर्णविरामांचे पॉजही अनावश्यकरित्या मोठे वाटले - मुळ गती विनाकारण बिघडवणारे. असो.

बाकी तांत्रिक अंगांबद्दल बोलायचे तर तिथे मात्र नावे ठेवायला जागा नाही. नेमकी प्रकाशयोजना, नेपथ्य, प्रकाश, वेशभुषा, केशभुषा, संगीत - सारेच जमून आलेले. भारतात असताना सुरूवातीच्या प्रसंगात असलेला वेणीचा लांबलचक शेपटा नी साडी (शेपट्याचा काहिशा लाडीक प्रसंगात चाळा म्हणून केलेला वापरही छान), जपानमधील वास्तव्यात आखुड हातांचा टॉप आणि मागे गोल गुंडाळलेले केस लांब आकडा खोचून दिसतात (बसायची पद्धतही वज्रासनात बदलते), तर पुन्हा भारतात आल्यावर मोकळे सोडलेले - स्टेप कट मधील केस असे बदल बरेच वेधक, बोलके आणि चपखल वाटले.

मात्र मुळ वाचनच फारसे न आवडल्याने ६/१० चे रेटिंग देईन Smile (अर्थात माझ्या रेटिंगला एका पिटातील अनभ्यस्ताचे रेटिंग इतकेच महत्त्व याची जाण आहे))
=======

शनिवारच्या अनुभवानंतर दिग्गज नावे असुनही रविवारी जावे की नाही याबद्दल साशंक होतो. मात्र नाटकानंतर कलाकारांशी जाहिर गप्पांचाही कार्यक्रम पत्रिकेत बघितला नी ज्योती सुभाष आणि गिरीश कुलकर्णी यांचे नाटकाविषयी विचार ऐकायला मिळतील, अगदीच आवडलं नाही तर प्रश्नही विचारता येतील असं गृहित धरून कार्यक्रमाला गेलो. सावित्री न आवडायची जी कारणं होती ती कितपत योग्य होती अशीही शंका होती. मात्र ज्योती सुभाष आणि गिरीश कुलकर्णी यांच्या तुफान दमदार वाचनानंतर सावित्रीवरील आक्षेप अधिकच प्रकर्षाने जाणवले व टोकदार झाले.

दिल्लीकर सुधन्वा यांचे हे नाटक (कार्यक्रमानंतर त्यांनीच सांगितल्या प्रमाणे) २००१-०२च्या काळात लिहिलेले. भारतातील राजकीय परिस्थितीवर अतिशय नेमके आणि सशक्त भाष्य करणारे नाटक असे त्याचे वर्णन करावे लागेल. ज्योती सुभाष यांनी केलेला अनुवादही अगदी उत्तम आणि अकृत्रिम होता. एकतर नाटक या फॉर्ममध्ये एकमेकांशी प्रकट संवाद असल्याने अभिव्यक्तीला (सावित्रीसारख्या) पत्रवाचनाच्या मर्यादा नसतात हे मान्य करूनही या वाचनाआधी व्यवस्थित विचार झाल्याचे "दिसून" आले. (किमान ते माझ्यापर्यंत पोचले). माझे जे जे आक्षेप सावित्रीवर होते त्यातील प्रत्येक आक्षेपाला या प्रयोगात जागाच नव्हती. अतिशय सुस्पष्ट तरीही नैसर्गिक संवाद, स्वगतं, एकतर्फी फोनवर बोलणं, न लिहीलेलं चाचरणं, आवाजाचे चढ उतार सगळंच "पर्फेक्ट".

<पांढर्‍या ठशात नाटकाची कथावस्तु, रसभंग संभवतो>
नाटक सुरू होते तेव्हा एक पस्तिशीची नायिका - निशा - स्वतः निशाची सेक्रेटरी आहे असे सांगूनही न ऐकणार्‍या पत्रकारांचे फोन घेऊन मेटाकुटीला आलेली दिसते. हळु हळु कळते की ती एक चित्रकार आहे व कोणत्याशा एका चित्रामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत नी त्यामुळे तीचे प्रदर्शन बंद करण्यात येतेच शिवाय तिच्यावर माफी मागायचा दबाव वाढतो आहे. ही चित्रकार अशी माफि मागायला नकार देते. कोणाच्या भावना दुखावल्याबद्दल खेद व्यक्त करायला तयार असते किंवा अगदी माफी मागायलाही. मात्र हे चित्र काढल्याबद्दल माफी मागायला ती साफ व स्पष्ट नकार देते.

रात्री उशीरा फोन घेऊन थकल्यावर दुरच्या शहरात रहाणार्‍या भावाशी फोनवर बोलून झोपायला चाललेल्या निशाला कोणीतरी दुसरे खोलीत असल्याचे जाणवते. तो तिचा विभक्त होण्यापूर्वीचा नवरा - अरविंद - असतो. त्याचे म्हणणे पडते की देशातील बदलती परिस्थिती बघता निशाने माफी मागितली पाहिजे. त्याच्याच भाषेत सांगायचं तर "इमोशनल फुल" न होता "प्रॅक्टिकल" निर्णय घेणे योग्य ठरेल. मग संवादांतून समजते की, अरविंद हा एके काळी - १९९२ च्या दंगलीत - अतिशय मोठ्या दबावाला झुगारून रिपोर्टिंग करणारा पत्रकार होता. अती दारूच्या व्यसनाने त्याला रिहॅबिलेटेशनला पाठवले गेले होते वगैरे.

आणि मग सुरू होतो, वैयक्तिक पातळीवर तुटलेल्या नात्याची कहाणी आणी पार्श्वभूमीवर देशातील बदलत्या - उजवीकडे झुकत गेलेल्या - वातावरणाचा त्या जोडप्यावर होत गेलेला परिणाम. मग आपले जुने नाते शोधताना होणारी बाचाबाची ते निशाला माफी मागण्यामागच्या कारणांना नी तिचा नकाराचा उहापोह, उच्च दर्जाची डिबेट प्रेक्षकांसमोर उभी करतो. पुढे काय होतं? निशा माफि मागायला तयार होते का? वगैरेंची उत्तरे मी मुद्दामच देत नाहिये.
<कथावस्तु संपली>

२००२मध्ये लिहिलेले हे नाटक तेव्हापेक्षाही आज २०१४मध्ये अतिशय रिलेवंट झाल्यासारखे मला वाटले होतेच. पुढे तसे खुद्द लेखकालाही वाटल्याचे समजले.

या नाट्यवाचनाला लेखक सुधन्वा देशपांडे (प्रसिद्ध लेखक गो.पु.देशपांडे यांचे पुत्र) सुद्धा होते. नाटकानंतरच्या गप्पा या रिंगणाचा सर्वोच्च बिंदु ठरावा. सुधन्वा आणि गिरीश कुलकर्णी यांची एकुणच सद्य राजकीय परिस्थितीवरील खुली चर्चा, मते आणि त्याच बरोबर त्यांनी लेखनात वापरलेली प्रतिके, संकेत वगैरेंवर रंगलेली चर्चा संपूच नये असे वाटत होते. गिरीश कुलकर्णी यांचे एका प्रतिसादात आलेले उत्तर मला अतिशय मार्मिक वाटले. आठवणीतून देतो आहे (चुभुद्याघ्या

"हल्ली आपल्याकडे पूर्ण "डावे" असे काही राहिलेच नाहिये, सगळेच उजवे किंवा उजव्याची छटा झालेय. नाटकाच्या एका कथेतील सर्व मुलांना भुरळ पाडणारे आईस्क्रीमचे डोंगर आता सर्वत्र दिसू लागले आहेत, त्याचे दुष्परिणाम अजून समजणार नाहीत कारण सध्या अच्छे दिन असल्याचे वातावरण तयार केले गेले आहे. पण अशावेळी माझ्यासारख्याची पंचाईत ही होते की मला पर्याय सोडला जात नाही. जमावाच्या उजवीकडे जाणार्‍या रेट्यापुढे मी हतबल होतो, आणि जर इथेच टिकायचे असेल मलाही उजवीकडे रेटले जाईल का अशी भिती मला वाटू लागते. जे जे 'त्यांना' अयोग्य वाटते ते ते मांडायची परवानगीच न मिळणे किंवा मांडल्यावर धमक्या येणे याचा अनुभव मी ही घेतला आहे. अशावेळी हे नाटक अगदीच रिलेवंट वाटू लागल्यास गैर नाही."

इतर चर्चाही अतिशय रोचक होती. सुधन्वा यांच्या पिढीवर १९८४, बाबरी - १९९२ आणि गुजरात दंगली हे तीन माईलस्टोन्सचा मोठा प्रभाव असला, नी त्यावेळी सुचलेले ते नाटक असले तरी त्याचा प्रभाव २०१४मध्ये अधिक तीव्रतेने, स्पष्टपणे जाणवतो इतके नक्की

सुधन्वा, गिरिश आणि ज्योती सुभाष तिघांच्याही कामाची स्तुती करावी तितकी कमीच आहे.

याचे मंचन किंवा पुन्हा कुठे वाचन होईल का माहिती नाही, पण संधी मिळाली तर जरूर वाचा/ऐका अशी शिफारस! आसक्तचे हा अनुभव दिल्याबद्दल आभारही!

बाकी जाता जाता: "मी दिल्लीत रहातो. तिथे एका नाटकाच्या केवळ वाचनासाठी इतकी लोकं तिकीट काढून येतील असा विचारही मी करू शकत नाही" ही टिपणी उगाच छाती फुलवून गेली Wink

टीपः लेखनाची शुद्धीचिकित्सा केलेली नाहि. वेळ मिळताच शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करेन. आता घाईत असल्याने (मात्र प्रसिद्ध करायचीही घाई असल्याने Smile ) लेखन एकटाकी लिहिलेय तसेच प्रकाशित करतोय.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

परिचय (ताज्या कलमासह आणि तळटिपेसह) खूप आवडला.

संधी मिळाली तर नक्की प्रयोग बघण्यात येईल. पण गप्पा कशा मिळायच्या? Sad

असो. या परिचयामुळे त्याही काही अंशी अनुभवता आल्या, म्हणून अनेकानेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अभिवाचन करताना वाचनासोबत अल्पसा 'वाचिक अभिनय' असावा असे मला वाटते. नुसते एवढेच नाही तर कथेच्या शक्तीस्थानाला श्रोत्यांसमोर अलगद उलगडणारे चढ-उतार, वाचनाचा वेग, आवाजाची पट्टी, भावचिन्हांचे राखलेले भान कोणत्याही अभिवाचनाचे महत्त्वाचे अंग असते.

या अपेक्षा अति किंवा अस्थानी वाटत नाहीत.

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिचय आवडला. अमृता सुभाषचा अभिनयपण मला जरा विचित्र वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

परिचय करुन दिलात बरं झालं.
ह्या वीकांताला एक मित्र जायचं म्हणत होता, पण फार प्रयत्न करुनही त्याच्यासोबत जाता आलं नाही Sad

आता पुन्हा कधी योग येतोय पाहुत.
६/१० रेटींग म्हणजे विशेष अगत्यानं जाण्यासारखं नाही; असं सुचवायचं असावं.
तरीही एकदा जावेसे वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>६/१० रेटींग म्हणजे विशेष अगत्यानं जाण्यासारखं नाही
हे फक्त सावित्रीच्या अभिवाचनापुरतं आहे.
नाट्यवाचनाला पैकीच्या पैकी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर वर्णन ...

धन्यवाद ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0