अ‍ॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३

अ‍ॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते. पण हा रोग झाल्यावर खालचा वॉल्व्ह जास्त घट्ट होतो आणि पाहिजे तेंव्हा उघडत नाही किंवा उघडला तरी पूर्ण उघडत नाही. असे झाले की अन्न अन्ननलिकेत साचू लागते आणि दाटते. मग खाणार्‍याचा जीव थोडावेळ कासावीस होतो, खाण्याचा वेग त्याला कमी करावाच लागतो. ते काही जीवघेणे क्षण गेले की एकदाचा तो एलईएस उघडतो आणि आपली सुटका होते. अहा वेळेस जर पाणी पिऊन तो घास खाली ढकलायचा प्रयत्न केला तर बॅकप्रेशर येते आणि क्षणार्धात सर्व अन्न नाकातोंडावाटे बाहेर पडते. अशा वेळेस जर तुम्ही काही झणझणीत खात असाल तर नाक व घशाची असह्य आग होऊ लागते. सुरवातीला हे प्रकार तुरळकपणे होतात मग सातत्याने होऊ लागतात. अन्न वर येण्याच्या प्रकाराने( Reflux) सुरवातीला पोटात आम्लता वाढल्याचे चुकीचे निदान होते. या रोगाच्या स्टेज-१ ते स्टेज-३ या अवस्था आहेत. पहिल्या स्टेजमधे अर्धघन अन्न खाता येते. पेशंट आपोआप अन्न सरबरीत करुन खाऊ लागतो. पण पुढच्या स्टेजेस मधे द्रव पदार्थही मुष्किलीने आत जातो. एवढे झाल्यावर पेशंटला एन्डोस्कोपी करावीच लागते. ती केल्यावर मात्र लगेचच या रोगाचे निदान होते. खालचा वॉल्व्ह घट्ट झाल्यामुळे वरची अन्ननलिका विस्तारते आणि तिला एखाद्या निमुळत्या होत गेलेल्या टेस्ट ट्युबचा आकार येतो.

एकदा निदान झाले की त्याची खात्री करण्यासाठी मॅनोमेट्री ही टेस्ट करायला सांगतात. ह्यांत नाकावाटे एक बारीक प्लास्टिकची नळी आंत घालून मोजलेले पाणी गिळायला सांगतात आणि अन्ननलिकेतील वेगवेगळ्या उंचीवरची बॅरोमेट्रिक प्रेशर्स मोजली जातात. किती प्रेशर डेव्हलप होते त्यावरुन स्टेज-१ ते ३ ही ठरवतात. आता आपल्याला पुन्हा सर्जनकडे पाठवण्यात येते. तो सर्व रिपोर्टस बघून कुठली ट्रीटमेंट करायची ते ठरवतो.

पूर्वी स्नायु विस्तारणार्‍या औषधांनी काहीकाळ भागत असे. त्यानंतर बलून डायलेशन ही पद्धत निघाली. यांत एलईएसमधे एक चपटा फुगा खुपसतात आणि तो अचानक ठराविक प्रेशरने फुगवतात. असे तीन्-चार वेळा केल्याने तिथले स्नायु सैल होतात आणि वॉल्व्ह काम करायला लागतो. यांत सक्सेस रेट ५०-६० टक्के असतो. नाहीतर कालांतराने हे पुन्हा करावे लागते. पण यातला धोका हा अन्ननलिकेला छिद्र पडण्याचा असतो आणि तसे झाल्यास ते गंभीर होऊ शकते. तसे झाल्यास ती तातडीने शिवणे वा स्टेंट घालणे हे उपाय करावे लागतात. कारण त्याकडे दुर्लक्ष झाल्यास जठरातले पाचकरस त्या छिद्रातून बाहेर पडून बाहेरच्या इतर अवयवांना 'पचवण्याचा' प्रयत्न करु लागतात आणि इंग्रजीत ज्याला 'मेस' म्हणतात ते होते. (माझ्याबाबतीत तातडीने स्टेंट घातल्याने हे वाचले पण मेस झालाच!)

सर्जरीत जसा नवीन रिसर्च झाला तशी 'लॅप्रोस्कोपिक सर्जरी' जास्त वापरली जाऊ लागली. कारण त्याने कुठल्याही स्टेजचा रुग्ण बरा होतो.

या सर्जरीत पोटाला चार पाच छोटे कटस घेऊन आयुधे आंत घुसवतात आणि पडद्यावर बघून सर्जन शस्त्रक्रिया करतो. प्रथम तो, त्या एलईएसच्या स्नायुंचे दोन भाग करतो. अर्ध्या भागातून अन्न खाली जाण्यासाठी रस्ता तयार करतो. त्यानंतर जठराचे तोंड तो अन्ननलिकेवर चढवतो आणि त्यावर हे उरलेले अर्धे स्नायु गुंडाळतो. अशा प्रकारे तो एक कृत्रिम एलईएस तयार करतो कारण ओरिजिनल फाडलेलाच असतो. ह्या स्नायु गुंडाळण्याचे प्रकाराला फंडोप्लिकेशन असे म्हणतात. या शस्त्रक्रियेचा फायदा हा की सक्सेस रेट चांगला पण जठरावरचा नवीन वॉल्व्ह ओरिजिनल प्रमाणे नसतो त्यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्स आयुष्यभर सहन करावा लागतो.

जपानी शास्त्रज्ञांनी नवीन POEM Surgery हा प्रकार शोधला आहे. यातील शस्त्रक्रिया कुठलीही कापाकापी न करता घशातून आंत नळी सोडूनच करता येते. पण भारतात त्याचा अजून तितका प्रसार झाला नाहीये. ग्लोबल हॉस्पिटल्,परेल इथले डॉ. मायदेव यातले तज्ञ समजले जातात.

आता कुणालाही प्रश्न पडेल की हा विकार होतोच का ? तर त्याचे उत्तर नेटवर तरी 'माहित नाही' असे लिहिले आहे. पण माझ्या स्वानुभवावरुन, रात्री उशीरा जेवणे, मुंबईसारख्या शहरातल्या मजबुरीमुळे जेवणाच्या व रात्री झोपण्याच्या वेळांत फार अंतर नसणे, अतिगरम चहा पिणे, दातांचे पार्टियल डेंचर करुनही ते प्रत्येक जेवणाला लावायचा कंटाळा करणे ही असावीत. जपानमधे याचे प्रमाण जास्त आहे कारण तिथे ते स्मोकी अन्न जास्त खातात असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.

तरी, माझी सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारचा कुठलाही त्रास होऊ लागल्यास लगेच तपासण्या कराव्यात व माझ्यासारखे हे दुखणे जास्त दिवस अंगावर काढू नये.

अधिक वाचनासाठी :- http://www.laparoscopyindia.com/abdominal-diseases/achalasia-cardia/

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेख.
लवकर बरे व्हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
लवकर बरे व्हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!