(मागील भागावरून पुढे)
इ.स.पहिल्या शतकात अस्तित्वात असलेल्या धेनुकाकट गावाचा शोध घेण्याचे आपले प्रयास पुढे चालू ठेवण्याच्या आधी या गावाच्या बाबतीतील काय माहिती आपल्या जवळ आहे त्याचा एक आढावा आपण घेऊया. भरभराटीस आलेली एक मोठी समृद्ध बाजारपेठ या गावामध्ये होती. ग्रीक किंवा रोमन वंशाच्या बर्याच व्यक्ती धेनुकाकट बाजारात व्यापार तरी करत होती किंवा या गावामध्ये ठेवण्यात आलेल्या सेना तुकडीमधे भाडोत्री सैनिक म्हणून आणल्या गेलेल्या होत्या. गावामधल्या व्यापार्यांची एक संघटना सुद्धा या गावामध्ये होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गाव कार्ले मठाच्या परिसरात आणि दखखनच्या साम्राज्यातील कोणत्या तरी महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले होते.
यावरून असे म्हणणे सयुक्तिक ठरेल की एका बाजूला दख्खनचे साम्राज्य आणि दुसर्या बाजूला रोम किंवा ग्रीस या मध्ये चालणारा बराचसा व्यापार धेनुकाकट मधील व्यापाऱ्यांच्या मार्फत निदान एका विविक्षित कालखंडामध्ये तरी होत असला पाहिजे. हे जर मान्य केले तर असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक वाटते की पैठण आणि रोम यामधील व्यापार ज्या मार्गांवरून होत असे अशा व्यापारी मार्गांपैकी फक्त एका व्यापारी मार्गाजवळ, धेनुकाकट सारखी भरभराटीस आलेली बाजारपेठ प्रस्थापित होण्याइतकी मोठी, या आयात-निर्यात व्यापाराची व्याप्ती खरोखरीच होती का?
प्लिनी द एल्डर (Pliny the Elder) या नावाने ओळखला जाणारा एक रोमन तत्वज्ञानी, लेखक आणि विचारवंत ( Gaius Plinius Secundus (CE 23 – CE 79) याच काळात होऊन गेला. तो रोमच्या नौसेनेचा आणि पायदळाचा सेनापतीही होता. त्याने भारत आणि रोम मधील त्या काळातील व्यापाराबद्दल मोठे परखड आणि मार्मिक मत व्यक्त केले होते. रोमच्या दृष्टीने मोठ्या तुटीत चालतअसलेल्या या व्यापाराबद्दल तो म्हणतो:
” आमचे विलास, चैन आणि रोमन स्त्रियांचे लाड यासाठी आम्ही मोजत असलेली ही किंमत आहे. अलीकडेच केलेल्या हिशोबाप्रमाणे भारत, चीन आणि अरेबिया यांनी व्यापारात रोमचे निदान शंभर मिलियन sesterces तरी काढून घेतलेले आहेत.”
“This is the price we pay for our luxuries and our women. At the last reckoning one hundred million sesterces are taken away by India, Seres and Arabia.”
जुन्या रोमन कागदपत्रांवरून असे दिसते की त्या कालात विलासी आणि चैनीच्या आयुष्यासाठी, रोमन स्त्री पुरुषांना हव्याहव्याशा वाटणार्या वस्तूंनी भरलेली निदान 40 गलबते तरी प्रत्येक वर्षात रोम आणि भारत यामधील फेर्या करत होती. भारताकडून येणार्या आयातीत मसाले, मोती, मलमल, हस्तिदंत या सारख्या वस्तू असत तर निर्यातीत अतिशय किरकोळ प्रमाणातील वस्तूंचा समावेश असे. यात मुख्यत्वे दारू किंवा वाइन भरलेल्या भाजलेल्या मातीच्या सुरया, वाद्ये आणि गायक तरूण आणि नर्तकी या भारतात पाठवल्या जात. दर वर्षीच्या आयात-निर्यातीमधील या तफावतीमुळे, रोमचा भारताबरोबरचा व्यापार एवढ्या तुटीत चालत असे की सोन्याच्या स्वरूपात रोमला त्याची किंमत भरावी लागणे अपरिहार्य बनत असे.
रोम आणि भारत यांच्यामधील त्या कालातील व्यापाराचा आढावा एवढ्या बारकाईने मी वर घेण्याचे कारण हेच आहे की रोमबरोबरच्या व्यापाराची व्याप्ती प्रत्यक्षात केवढी मोठी होती हे वाचकांच्या लक्षात यावे. धेनुकाकट सारख्या समृद्ध बाजारपेठा त्या काळी भारतीय प्रदेशामध्ये प्रस्थापित होण्यामागे हेच कारण आहे आणि त्यात नवलाईचे असे काही दिसत नाही. यापुढचा प्रश्न म्हणजे ज्या व्यापारी मार्गांवरून रोम आणि भारत यामधील व्यापार त्या काली चालत असे ते व्यापारी मार्ग कोणते होते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, आपण भारतातील ज्या बंदरांवरून रोमला जाणारी गलबते प्रस्थान करत असत आणि रोमहून येताना दारू भरलेल्या सुरया घेऊन ज्या बंदरांना लागत असत, अशा बंदरांपासून सुरूवात करणे योग्य ठरेल.
क्लॉडियस टॉलेमी Claudius Ptolemy (CE 90 – CE 168) हा अलेक्झांड्रिया शहरामधील एक ग्रीक-रोमन वंशाचा नागरिक होता. एक लेखक, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, भूगोल तज्ञ, भविष्यवेत्ता आणि कवी असलेला टॉलेमी तसा सुप्रसिद्धच आहे. अनेक शास्त्रीय ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत. नंतरच्या काळात, इस्लामी जगात आणि युरोपमधे झालेल्या शास्त्रीय प्रगतीला त्याच्या किमान तीन ग्रंथांचे तरी ऋण हे मान्य करावेच लागते. ‘द जिऑग्राफी’ ‘The Geography’ (also known as Geographia, Cosmographia, or Geographike Hyphegesis) हा ग्रंथ टॉलेमीने लिहिलेल्या ग्रंथांपैकी एक प्रमुख ग्रंथ म्हणून मानला जातो. नकाशे काढण्याचे तंत्र आणि इ.स. दुसर्या शतकातील रोमन साम्राज्याच्या भूगोलाविषयीची एकत्रित केलेली माहिती, अशा विषयांवर हा ग्रंथ लिहिलेला आहे.
रोम बरोबर चालत असलेला बहुतांशी व्यापार ज्यांच्या मार्फत होत असे अशा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या चार प्रमुख बंदरांची नावे या ग्रंथामध्ये टॉलेमीने दिलेली आहेत. ती अशी आहेत; भडोच(Barygaza) डौंगा (Salsette island) वसई जवळील सोपारा ( Suppara) आणि चौल (Semylla or Cemūla.)). ही चार बंदरे आणि या व्यतिरिक्त असलेले कल्याण हे बंदर, यांच्यामधूनच रोम बरोबरचा भारताचा व्यापार चालत असल्याने, आपण शोधत असलेले व्यापारी मार्ग या 5 ठिकाणांपासून सुरू होऊन पूर्वेकडे जात असले पाहिजेत हे स्पष्ट आहे. या मार्गांवर येणारी पहिली मोठी अडचण म्हणजे पूर्व पश्चिम पसरलेली सह्याद्री पर्वतराजी ही होती. ही पर्वतराजी पार करण्यासाठी, व्यापारी तांड्यांना. या महाकाय पर्वतराजीमध्ये त्या काळापासूनच अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या, घाटरस्त्यांपैकी एकामधून वाट काढावी लागत होती. दख्खनमधील बहुतांशी बौद्ध मठ या व्यापारी मार्गांजवळच स्थापले गेले असल्याने असे मार्ग या बौद्ध मठांच्या परिसरातूनच जात होते.
भडोच बंदरापासून पूर्वेकडे जाणारा व्यापारी मार्ग, तो कार्ले मठापासून खूपच दूरच्या अंतरावर असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. उरलेल्या म्हणजे, कल्याण, सालसेट, सोपारा आणि चौल या बंदरांपासून निघालेले असे काही व्यापारी मार्ग विख्यात व्यासंगी दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी शोधलेले आहेत. या मार्गांचे त्यांनी केलेले वर्णन मी खाली उद्धृत करत आहे.
” उत्तरेकडचा व्यापारी मार्ग, कल्याण किंवा सोपारा येथून सुरू होऊन तो सह्याद्रीच्या पायथ्यालगत नाणेघाटापर्यंत जात असे व नाणेघाट ओलांडल्यावर तो सरळ थेट जुन्नर गावात पोचत असे. दुसरा एक शक्य असलेला व्यापारी मार्ग, लोणावळे गावाजवळच्या ‘सावा’ किंवा ‘कुरवंडे’ घाटातून वर चढून बेडसे मठाजवळून जात असला पाहिजे. या शिवाय खंडाळा गावाजवळ घाट चढून आलेला आणखी एक रस्ता, कोंडाणे मठाच्या परिसरातून जात असला पाहिजे. परंतु यापैकी बहुतेक सर्व घाट रस्ते अतिशय दुर्गम आणि चढण्यास कठीण असल्याने बहुधा फारसे लोकप्रिय नव्हते.”
“The northern feeder route starting from Kalyan, Sopara went right along the foot of the western Ghats and reached Junnar town through Naneghat. One possible route might have climbed up Sava or Kurvanda pass near present town of Lonavala and would have passed in the vicinity of Bedse monastery. .Another route came up the vally near today’s hill station Khandala and passed in the vicinity of Kondane monastery. However all these routes were difficult and were not popular.”
दक्षिणेकडे असलेल्या चौल बंदरापासून सुरू होणारा आणखी एक व्यापारी मार्ग या शिवाय अस्तित्वात होता. सध्याच्या मुळशी तलावाजवळ असलेल्या पिंपरी गावाजवळून हा घाट वर चढत असल्याने त्याला पिंपरी घाट या नावाने बहुधा ओळखले जात होते. (सध्याचा ताम्हणी घाट म्हणजे बहुधा हाच घाट् असावा.) घाटमाथ्यावर आल्यानंतर हा रस्ता पवना खोर्यातून उत्तरेकडे शेलारवाडी मठाच्या परिसरातून जात असे व नंतर भाजे व कार्ले येथील मठांच्या परिसरात पोचल्यानंतर, नवलाख उंबर गावामधून हा रस्ता कार्ले डोंगराला वळसा घालून प्रथम चाकण गावाकडे व तेथून जुन्नर गावाकडे जात असला पाहिजे. धेनुकाकट गावातील एका रहिवाशाने शेलारवाडी मठाला दिलेल्या एकुलत्या एक देणगी मागचे कारण, वरील मार्ग शेलारवाडी मठाजवळून जात होता हेच बहुधा असले पाहिजे.
हे सर्व संभाव्य मार्ग मी गूगल अर्थ नकाशांवर प्रत्यक्ष काढून बघितल्यावर माझ्या हे लक्षात आले की त्या काळातील व्यापाराचे पश्चिम घाटातील सर्वात प्रमुख केंद्र असलेल्या जुन्नरला पोचण्यासाठी नाणेघाट्चा रस्ता हा सर्वात कमी अंतराचा, सुकर आणि म्हणूनच सर्वात सोईस्कर असा मार्ग होता. यावरून कोणालाही असा संभ्रम पडेल की इतका सोईस्कर रस्ता उपलब्ध असताना, रोमवरून आलेली ही गलबते चौल बंदराकडे का वळत असावीत? त्याच प्रमाणे चौलहून निघाल्यावर, पिंपरी घाटातून वर येऊन नंतर पवना खोर्यातून, कार्ले मठाला वळसा घालून जुन्नरकडे जाणारा लांबचा आणि जास्त त्रासाचा मार्ग व्यापारी तांडे का आणि कशासाठी वापरत असत? या प्रश्नाचे उत्तर शोधणे ही खरी तर अशक्य कोटीतीलच बाब होती. परंतु सुदैवाने ‘पेरिप्लस ऑफ द युरेथ्रियन सी’ (Periplus of the Erythraean Sea) या नावाने ओळखल्या जाणार्या एका ग्रीक ग्रंथामध्ये, याचे कारण थोडक्यात दिलेले आहे. इ.स.पहिले आणि तिसरे शतक या कालखंडामध्ये लिहिलेल्या आणि सतत अपग्रेड गेल्या गेलेल्या या ग्रंथामध्ये, रोम किंवा इजिप्त मधील Berenice सारख्या बंदरांवरून निघणार्या गलबतांसाठी, कोणते समुद्री मार्ग उपलब्ध आहेत? प्रवासात काय अडचणी संभवनीय आहेत? तसेच, तांबड्या समुद्राच्या काठावर असलेली बंदरे, वायव्य आफ्रिकेतील बंदरे आणि भारतीय उपखंडातील बंदरे यांच्याबरोबर व्यापाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबद्दलची सर्व उपलब्ध माहिती संकलित करून ती सतत अपग्रेड करून ठेवण्यात येते असे.
मी या लेखमालेच्या सुरवातीच्या भागातच, इ.स.पहिल्या शतकाच्या सुरूवातीस दख्खनमध्ये सतत चालू असलेला संघर्ष आणि राजकीय अस्थिरता यांचा उल्लेख केला होता. या कालात क्षत्रप नहापन याच्या सैन्याने सातवाहन साम्राज्याचा बराचसा भाग जिंकून घेतलेला होता. जिंकलेल्या भूप्रदेशात, कार्ले मठाच्या परिसरातील भूप्रदेश तर होताच पण या शिवाय किनारपट्टीजवळ असलेल्या कल्याण, सोपारा वगैरे बंदरांवर सुद्धा नहापन याच्या सैन्याचेच प्रभुत्व होते. पेरिप्लस ग्रंथ या राजकीय परिस्थितीला दुजोरा देताना म्हणतो:
” या भू प्रदेशातील बाजारपेठा भडोच, सोपारा आणि कल्याण या असल्या तरी कायदेशीर रितीने त्यांचा उपयोग सातवाहन शासन कालात करणे सहज शक्य होते. मात्र जेव्हापासून या बाजारपेठा क्षत्रपांच्या अंमलाखाली आल्या आहेत तेंव्हापासून या बंदरात गलबतांना प्रवेश नाकारला जातो आहे आणि तरीही एखादे ग्रीक गलबत जर या बंदराला लागलेच तर त्याला अटक करून ते सैनिकांच्या संरक्षणात भडोचला नेले जाते. मात्र कल्याणच्या पुढेही (दक्षिणेला) या प्रदेशातील चौल सारख्या इतर बाजारपेठा आहेतच…..”
“The market-towns of this region are, in order, after Barygaza (Bhadoch): Suppara, (Sopara)and the city of Calliena (Kalyan), which in the time of the elder Saraganus (Satavahanas) became a lawful market-town; but since it came into the possession of Sandares (Kshatraps or Nahapana’s forces), the port is much obstructed, and Greek ships landing there may chance to be taken to Barygaza (Bhadoch) under guard. Beyond Calliena there are other market-towns of this region; Semylla (Chaul)..…”
पेरिप्लस मधील या संदर्भाच्या सुमारे एक शतकानंतर, लिहिल्या गेलेल्या आपल्या ग्रंथात क्लॉडियस टॉलेमी, भडोच आणि कल्याण बंदरांचा उल्लेख सुद्धा करत नाही आणि फक्त गोवरी नदीच्या मुखाजवळ असलेले सोपारा, डौंगा किंवा सालसेट आणि चौल एवढ्याच बंदरांचा उल्लेख करतो, यावरून या भागात सतत चालू असलेल्या संघर्षामुळे व्यापारासाठी परिस्थिती कशी धोकादायक बनलेली होती याला एका प्रकारे अप्रत्यक्ष रितीने दुजोरा देतो आहे असे म्हणता येते.
वरील संदर्भांवरून, इ.स.पहिल्या शतकामध्ये दख्खनमधील परिस्थितीची वाचकांना कल्पना येईल. ग्रीक किंवा रोमन गलबतांना भडोच, कल्याण, या सारख्या उत्तरेकडच्या बंदरांमध्ये मालाची चढ-उतार करणे शक्य होत नव्हते. सोपारा बंदर सुद्धा उत्तरेलाच होते आणि उपयोग करण्यास तितकेसे सोईस्कर नव्हते. यामुळे दक्षिणेकडे असलेल्या सालसेट आणि चौल बंदरांचा वापर प्रामुख्याने ही गलबते करत असत. जुन्नर वरून कल्याणला माल नेण्यासाठी जरी नाणेघाट हा सर्वात जवळचा आणि सोईस्कर असला तरी दक्षिणेकडे असलेल्या चौल बंदरात चढवला जाणारा माल तेथे नेण्यासाठी, नाणेघाट फारच उत्तरेला असल्याने, लांबचा आणि सोईस्कर नव्हता. त्यामुळे चौल बंदराकडे नेण्यात येणार्या मालासाठी, दक्षिणेकडे असलेला आणि सध्याच्या ‘ताम्हिणी’ घाटामधून जाणारा रस्ता लोकप्रिय बनला असावा आणि त्यामुळे या व्यापारी मार्गाजवळ असलेल्या विशाल कार्ले मठाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले असावे.
या दक्षिणेकडच्या व्यापारी मार्गाच्या जवळपास आर्थिक समृद्धी प्राप्त झालेले धेनुकाकट गाव वसलेले असावे असा अंदाज या परिस्थितीजन्य पुराव्यामुळे केल्यानंतर या भागात धेनुकाकटचा ठावठिकाणा कोठे लागतो का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण पुढे करूया.
(क्रमश:)
मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करावे.
27 एप्रिल 2014