हिंदुस्थानी संगीत व संगीतसम्राट तानसेन- २

स्वामी हरिदास तानसेनला विद्या शिकवताना.

मागे बादशहा अकबर उभा आहे. खरे खोटे माहीत नाही पण या चित्रामागे एक आख्यायिका आहे. अकबराने तानसेनला त्याच्या गुरूचे नाव विचारले आणि त्यांचे गाणे ऐकायची इच्छा व्यक्त केली. तानसेनाने बादशहाला सांगितले की ते फक्त परमेश्वराच्या दरबारात गातात, त्यामुळे ते आपण ऐकणे शक्य नाही. असे म्हणतात बादशाह स्वत: त्यांचे गाणे ऐकायला स्वामींच्या आश्रमात गेला व ते गाणे ऐकून धन्य झाला. मला हे जरा अशक्य वाटते पण सांगता येत नाही.

संस्कॄत ज्या संगीताचा पाया होता त्या शास्त्रीय संगीतात मुळ रागांना ग्रामराग म्हणत. आजच्या सर्व रांगांचे मुळस्थान हेच राग आहेत. ग्रामराग म्हणजे बहुतेक ग्रामीण लोकसंगीत असावे. हे राग गायच्या बर्यांच पद्धती होत्या. तेराव्या शतकात सारंगधर यांनी लिहिलेल्या संगीत रत्नाकर या संगीतावरील टिका ग्रंथात या पाच पद्धतींचा उल्लेख सापडतो.

शूद्ध गिती: यात एकच पण मृदू आवाजात स्वर लावून पण कानाला अत्यंत गोड लागेल अशी गायची पद्धत होती
भिन्न गिती: यात स्वरांना गमकांमधे वेगवेगळ्या लयीत गाण्याची पद्धत होती.
गौडी गिती: यात गायक तिसर्‍या सप्तकात स्वरांच्या कंपनांचा व थांबून थांबून परत स्वरांची आळवणी करत रंग भरत असे.
वेगस्वर गिती: याच्यात स्वरांना गतीत म्हटले जायचे व स्वरांची कंपनेही जलद गतीत देण्यात येत.
साधारण गिती: यात वेगळे काही नसून वरील चारांचे वेगवेगळ्या कल्पना वापरून एकत्रीत सादरीकरण केले जायचे.

संस्कृत संगीतानंतर मुळ ढाच्याला धक्का न लावता हिंदूस्थानी संगीत त्यातूनच निर्माण होत गेले. त्यातच ध्रूपद गायन हा एक महत्वाचा प्रकार अस्तित्वात आला. ध्रुपद गायकीचे आपल्याला ज्ञात असलेले चार प्रकार आहेत ( ज्याला बाणी/बानी म्हणतात ). वरील ज्या गिती आहेत त्यांचा वापर करून या चार पद्धती विकसीत झाल्या असे म्हणायला हरकत नाही.

गौधरबानी – शुद्ध गितीतून तयार झाली. स्वत: तानसेन याच पद्धतीने ध्रूपद गायचा. एकाच शूद्ध स्वरात सरळ साध्या मिंड घेऊन ध्रूपद गाणे हे फार अव्हानात्मक असे. असे गाऊन संगीतात रंग भरणे हे त्याहूनही अवघड असणार. तानसेन व त्याचा मुलगा बिलासखान या बाणीचे खंदे पुरस्कर्ते होते.

डागोरबानी : ही तयार झाली भिन्नगितीतून. चक्राकार गतीने मिंड घेऊन भरफूर गमकांचा वापर करून एका वेगळ्या प्रकारची अनुभुती ऐकणार्यांिना येत असे. तानसेन यांचे गुरू हरिदास स्वामी हे वृंदावन येथे देवळात कृष्णाच्या मुर्तीसमोर या प्रकारचे गायन करत असत. ही परंपरा चालू ठेवली सरस्वती देवी या स्त्रीने. ती तानसेनची मुलगी आणि त्यावेळी अत्यंत प्रसिद्ध अशा वीणा वादक मिस्रीसिंग यांची पत्नी होती.

खंडरबानी – ही तयार झाली वेगस्वरातून. याच्यात वेगवान गमकांनी संगीतात रंग भरण्यात येई. बज बहादूर व मिस्रीसिंग हे या गायकीचे प्रसिद्ध कलाकार होते. यांच्या पुढच्या पिढीने डागोर व खंडर या दोन्ही पद्धतींचा स्विकार केला.

नौहरबानी – ही तयार झाली गौडगिती मधून. एका स्वरांवरून दुसर्याढ स्वरांवर सहजपणे गमक घेत हे कलाकार संगीतात रंग भरायचे. या गायकीचे प्रमूख गायक होता श्रीचंद जो हरिदास स्वामींचा शिष्य होता.

संगीतसम्राट तानसेन याने स्वत: एक रचना करून या चार बाणींचे महत्व विशद करून सांगितले आहे. तो म्हणतो – सर्व बाणींचा राजा आहे गौधर. खंदर हा सेनापती, डागोर हे मंत्री तर नौहर ही कारभार सांभाळणारा अधिकारी आहे.. तानसेन जरी स्वत: गौधरबाणी गात होता तरीही त्याने इतर पद्धतींनाही तेवढेच महत्व दिले होते आणि तो या सगळ्यांची गरज आहेच असे ठामपणे प्रतिपाद करायचा.

दुर्दैवाने आता फक्त डागोरबाणीच आपल्याला ऐकायला मिळते. बाकीच्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या ऐकायलाही मिळत नाहीत. त्यांच्या बद्दल फक्त काही गाण्यातून उल्लेख सापडतो.
डागोरबानीचे हल्लीचे स्वरूप-गायक डागर बंधू

संस्कृतमधील “पंचगीतात” ज्या प्रमाणे शब्दांना महत्व होते त्या प्रमाणे ध्रूपदगायनातसुद्धा त्या काळात शब्दांना महत्व होतेच. काही जणांना असे वाटते हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतात शब्दांना एवढे महत्व दिले जात नाही. उलट बाणी/बानी याचा अर्थच शब्द. म्हणजे ध्रूपद गायनात शब्द, भावना, रस व राग यांचा इतका सुरेख ताळमेळ घातला जायचा की बस्स... गौधरबाणीमधे असे राग व शब्द निवडले गेले की त्यातून शांतरसाची निर्मिती व्हायची. डागोरबानी मधे कर्णमधूर आणि भावना यांना जागा दिली गेली होती. त्यातून निर्मिती व्हायची मधूर/करूण रसाची. खंडरबानीमधे वीररस आणि नौहरबाणीमधे अद्‌भूतरसाची. हळू हळू हा ताळमेळ कमी होत गेला आणि अकबराच्या काळानंतर याचे महत्व कमी होत गेले.

मुगलसत्ता लयास गेली आणि ज्याप्रमाणे केंद्रस्थानी असलेली सत्ता लयास गेल्यावर इतर राज्यांना स्वातंत्र्य उपभोगायला मिळते त्याप्रमाणे या चार घराण्यांनीही स्वातंत्र्य उपभोगायला सुरवात केली. म्हणजे झाले काय की सर्व घराण्यांनी सर्व पद्धती आत्मसात करायला सुरू केले आणि ध्रूपदाच्या बाणींमधे सरमिसळ झाली. काही घराणी दोन किंवा तीन बाणीसुद्धा आपली मानू लागले.

१८व्या शतकात तानसेनच्या वंशजांनी तीन घराणी स्थापन केली. जयपूरच्या सेनीया/सेनी घराण्याने डागोरबाणी आपली मानली आणि त्यात प्रावीण्य मिळवले. याच घराण्यांच्या लखनौ, बनारस, रामपूर येथे या घराण्याच्या दोन शाखा उदयास आल्या. तानसेनच्या मुलाने जे घराणे स्थापन केले होते ते खरे तर गौधरबाणीचे पण त्यांनीही डागोरबानीही आत्मसात केली. याचे मुख्य कारण म्हणजे डागोरबानीचे रंजनमुल्य खूपच होते. जाफर खान, प्यारेखान आणि बसतखान यांनी त्यांच्या घराण्याची परंपरा चालू ठेवली. सेनीया घराण्याचे बीनवादक मिस्रीसिंह यांनी खंडरबानी आणि डागोरबानी स्विकारली. बेतीयामधे जे ध्रूपद गायक होते त्यांनी त्यांचे मुळ गुरू स्वामी हरिदास यांची खंडरबानी चालू ठेवली तर बिशनपूरला गौधरबानी गायकीचा अभ्यास केला गेला. मथुरेला डागोरबानी तर जयपूरलाही उस्ताद बहरामखान यांनी डागोरबानी स्विकारली आणि हे घराणे अजूनही डागोर/डागर या नावाने ओळखले जाते. हे घराणे आपली सुरवात खुद्द स्वामी हरदास यांनीच केली असे सांगतात आणि ते खरेही असावे. वर उल्लेख केलेल्या सर्व संगीतमार्तंडांनी नौहरबानी आपल्या संगितात वापरली त्यामुळे मला वाटते त्याचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट झाले असावे.

मुगलांच्या या आमदानीत उत्तर भारतात हिंदुस्थानी संगीताचा सोनेरी काळ अवतरला होता असे म्हणायला हरकत नाही. स्वामी हरिदास यांचे शिष्य संगीतसम्राट तानसेन यांच्या ज्ञानाच्या बिजाभोवती संगीतजगाची स्थापना होत होती, त्यात वेगवेगळे कलाकार प्रयोग करू लागले. या काळात हिंदुस्थानी संगीतात जे फेरबदल झाले ते कधीच बाजूला सारता येणार नाहीत. सगळ्यात महत्वाचा बदल झाला तो फार्सी आणि अरेबीक संगीताशी झालेल्या मिलापामुळे. अरेबीक आणि फार्सी संगीतावर अगोदरच ग्रीक संस्कार झाले असल्यामुळे त्यातील काही अंश हिंदुस्थानी संगीतातही उतरला असणार. या सगळ्या संगीतांचे एकत्रीकरण करून कानाला अत्यंत गोड लागेल असे संगीत जन्माला घालण्याची किमया साधली आपल्या येथील संगीतकारांनी.
संगीतसम्राट तानसेन -

रामपूर आणि जयपूरच्या राजघराण्यांनी तानसेन यांच्या वंशजांना दरबारात मानाच्या जागा दिल्या त्यामुळे तेथील संगीत शिक्षणात तानसेनचे संगीत शिकवले जावू लागले. रामपूरचे नवाब तर स्वत:च संगीत शिकायचे आणि ते नंतर संगीततज्ञ म्हणूनही ओळखले जायचे. या नवाबांच्या पदरी थोर गायक होते. उदा. बहादूर हुसेनखॉ, वज़ीरखॉ जे प्रसिद्ध अल्लाउद्दीनखॉसाहेबांचे गुरू होते, मोहम्मद अलीखॉ इ. हे सर्व तानसेनच्या गायकीचे वंशज होते. वज़ीर खान हे स्वत: संगीततज्ञ असून त्यांनी संगीतावर अनेक पुस्तके लिहीली होती. त्यातील एक होते रिसाला मौसिकी. चमनसाहेबांनीही अनेक पुस्तके लिहीली त्यात रिसाला तानसेन हे पुस्तक फार महत्वाचे होते. हे सर्व ग्रंथ अजूनही रामपूरच्या ग्रंथालयात जपून ठेवली आहेत असे मानले जाते. काही जण ती बघितली असे सांगतात तर काही जण ती नष्ट झाली असेही सांगतात. पण मला वाटते ती तेथे असावीत.

त्या काळात राजे महाराजे कलाकारांना आश्रय देत त्यांचे कुटूंब चालवत, त्यांच्या संगीतविद्यालयाला मदत करत त्यामुळे नाही म्हटले तरीही कलाकारांना थोडे त्यांच्या मिंध्यात रहावेच लागे. थोडे हांजी हांजी करावे लागत असे आणि महाराज जर गाणारे असले तर मग विचारूच नका. त्यांना दाद देण्याशिवाय गत्यंतर नसे. पण काही अवलिये हे असले शिष्टाचार झुगारून देत. अशाच एका अवलिया कलाकाराची गोष्ट तुम्हाला सांगतो –
यांचे नाव होते रजब अली खान -

हे स्वत: देवास आणि कोल्हापूर दरबारचे राजगायक होते. फार म्हणजे फार थोर वादक, गायक.... यांना म्हणतच “रज़ब गाते गज़ब”. गाण्याबरोबर ते रुद्रवीणा व जलतरंगही वाजवायचे. येथे जेव्हा मी म्हणतो वाजवायचे/गायचे त्याचा अर्थ एकच घ्यायचा स्वर्गीय वाजवायचे, गायचे.... त्या काळात सर्व महाराजे आपले दरबारी कलाकार दुसर्याज़ दरबारात त्यांची कला सादर करण्यासाठी पाठवायचे. त्यात दोन हेतू असत. एक माझ्याकडे कसले रत्न आहे हे दाखवायचे आणि ज्या संस्थानिकांना खरेच संगीत कळायचे ते त्याचा आनंद घ्यायचे. कोल्हापूरच्या महाराजांचे पत्र घेऊन हे साहेब शेवटी रामपूरला पोहोचले. त्या काळात या संस्थानाचे नाव संगीत क्षेत्रात कसे दुमदुमत असेल त्याची कल्पना आपल्याला तेथील राजगायकांची नावे वाचून आली असेलच. असो. रामपूरच्या नवाबांना भेटायच्या अगोदर त्यांचे राजगायक वज़ीर खान यांना भेटणे क्रमप्राप्त आहे हे समजल्यामुळे रज़ब अली वज़ीर खान यांच्या महालावर गेले. त्यांना तेथे घेऊन जाणारा माणूस आणि हे आत गेले. त्या माणसाने अनेक वेळ कुर्निसात करून तेथेच जमिनीवर आपले बूड आदराने टेकवले. वज़ीर खान एका चांदीच्या खुर्चीवर बसले होते. रज़ब अलींनी तेथीलच एक खुर्ची फर्रकन ओढली आणि त्यांच्या शेजारी बसले. एवढेच नाही तर त्यांनी समोरच्या हुक्क्यातील दोन तीन कशही माराले. या सगळ्या उर्मट वागण्याचा खरे तर वज़ीर खानांना खूपच राग आला होता पण बिचारे गप्प बसले. त्यांनी अत्यंत दरबारी अदबीने त्यांची चौकशी केली. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपली ओळख करून दिली. : मी गातो, वीणाही वाजवतो आणि माझे गुरू आहेत खॉसाहेब बंदेअली....”
“हो हो मला माहीत आहे. फार थोर गृहस्थ ! पण त्यांचे वाद्य जरा विचित्रच होते नाही?”
“ हो पण त्याचा आवाज तुमच्या त्या डमरूच्या आकाराच्या रामपूरी विणेपेक्षा हजारपटींनी चांगला होता” वज़ीर खासाहेबांचा चेहरा पडला व त्यांनी ती भेट तातडीने आवरती घेतली. या अशा ओळखीनंतर त्यांची नवाबांशी भेट होणे कठीणच होते पण कोल्हापूरच्या महाराजांचे पत्र बरोबर असल्यामुळे त्यांना नाही ही म्हणता येईना. त्यांना भेट नाकारणे म्हणजे कोल्हापूरच्या राजांचा अपमान होणार म्हणून नवाबांनी त्यांची भेट घ्यायची ठरविली. रज़ब अलींना नवाबाच्या संगीत प्रेमाची पूर्ण कल्पना होती. त्यांना हेही माहीत होते की नवाबांना संगिताची उत्तम जाण होती. त्यांना असंख्य ध्रुपदे अवगत होती (असे म्हणतात १०००) तसेच ते स्वत: उत्तम गायक होते आणि त्यांचे लयकारीकडे जास्त लक्ष असायचे. रज़ब अलींच्या मते त्यांनी स्वरांच्या शुद्धतेकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे होते. हे सर्वांनाच माहीत होते पण नवाबांना कोण सांगणार ? त्याच रात्री नवाबांनी रज़ब अलींना आमत्रंण दिले. नवाबांनी काहीतरी पेश केले आणि सर्व उपस्थित लोकांना विचारले “ लयकारी मधे आणि स्वरांमधे माझा हात धरणारा आपल्यापैकी कोणी बघितले किंवा ऐकले आहे का ?
अर्थातच याचे एकच उत्तर होते “ नाही महाराज अजून तरी आम्ही आपल्यासारखे गाणे ऐकले नाही”.
नवाबांनी आपला मोहरा रज़बा अलींकडॆ वळवला आणि त्यांना तोच प्रश्न केला.
“माझेही मत इतरांसारखेच आहे” पण त्या उत्तरात दम नव्हता. नवाबांनी परत परत तोच प्रश्न रज़ब अलींना विचारला. त्यांनीही तेच उत्तर दिले. समाधान न होऊन नवाबांनी सरळ सरळ प्रश्न केला “ रज़ब आम्ही तुला असे विचारतोय की बाकीच्या संस्थानिकांचे जाउदेत. संगीताचे आमच्या इतके ज्ञान त्यांना नाही हे आम्हाला माहीत आहे. इतर गायकांच्या तुलनेत आमचे स्थान कोठे आहे?”

“महाराज आमच्या घरातील लहान मुलेसुद्धा आपल्यापेक्षा चांगली गातात”.

हे ऐकल्यावर नवाबांचा चेहरा काळानिळा पडला आणि ते चिडून म्हणाले “ मी तुला आत्ताच गोळी घातली असती पण माझ्या दुर्दैवाने तुझ्याकडे कोल्हापूरच्या महाराजांचे पत्र आहे. पण आत्ताच्या आत्ता रामपूर सोडून चालता हो.”

५०० रुपये देऊन त्यांची रामपूर संस्थानामधून त्वरित हकालपट्टी करण्यात आली....

असो पण नवाब काय, रज़ब अली काय, आणि वज़ीर खान काय हे सगळे संगीताच्या दरबारातील सम्राट होते....

सेनी घराण्यातील दोन दिग्गजांची येथे नोंद घेतलीच पाहिजे. एक होते बसत खान जे उत्तम गायक व बीनकार होते. त्यांनी काही पुस्तकेही लिहीली उदा. नगमा-ए-आसरी. त्यांच्याच एका शिष्याचेही (निआमतउल्ला खान – एक थोर सरोदवादक) पुस्तक बरेच वाचले गेले त्याचे नाव – नगमा-ए-निआमत. याच बसत खान यांचे शिष्य होते त्यांचे सुपुत्र मोहम्मद अली खान जे ज्यांच्या लेखावर हा लेख आधारित आहे त्यांचे गुरू होते. वज़ीर खान यांचीही शिष्यपरंपरा मोठी होती. अल्लाउद्दीन खान, मुस्ताक हुसेन खान, हाफिज अली खान. पंडीत भातखंडे यांनी ही काही काळ वज़ीर खान यांच्या कडे शिक्षण घेतले होते.

बसत खान आणि वज़ीर खान यांनी तानसेन यांची गायकीपासून अजिबात न ढळता अत्यंत शुद्ध स्वरूपात ती गायकी पूढे शिकवली. त्याच्या या शुद्ध स्वरूपामुळे त्याचा पाया हा शेवटी सांरंगधराचा संगीत रत्नाकर हा ग्रंथ व संगीत हाच होता असे म्हणयला हरकत नाही......

जयंत कुलकर्णी
क्रमश:.....

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय छान परिचय. पुढील लेखांची वाट बघत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय.
महत्वाचा, वेगळ्या प्रकारचा विषय पुढे आनल्याबद्द्दल तुमचे मानावेत तेव्हढे आभार कमीच आहेत.
अवांतर:- चीन बद्दलच्या मालिकेचीही वाट फातोय/.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुढील भागांची वाट पाहत आहे.

इतिहासाच्या ओघात संगीतात मुधल राजवटीमुळे का आणि कसे बदल होत गेले हे वाचायलाही आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0