(जुन्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. जुन्या भागांचे दुवे इथेच देण्याची आवश्यकता नाही. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)
---
'द स्क्वेअर' नामक इजिप्शियन माहितीपट पाहिला. जानेवारी २०११ मध्ये इजिप्तच्या तहरीर चौकात क्रांती सुरू झाली. दोन महिन्यांना अध्यक्ष होस्नी मुबारक पायउतार झाले. त्याला आता तीन वर्ष उलटून गेली. या तीन वर्षांत पुढे काय झालं याचा धांडोळा तीन मित्रांच्या नजरेतून घेणारा हा माहितीपट.
मगदी हा मुस्लिम ब्रदर किंवा ब्रदरहूडचा कार्यकर्ता, दाढी वाढवलेली, घरातल्या स्त्रिया बुरखा घालणार निदान डोकं झाकणाऱ्या. अहमद हा गरीब, अनाथ, म्हणून वाढलेला, स्वतःच्या हिमतीवर शिकलेला आणि आता आधीच्या तुलनेत सुस्थित असणारा तरुण आणि खालिद अब्दल्ला हा 'द काईट रनर' चित्रपटातला मुख्य अभिनेता, उच्च मध्यमवर्गीय, घरात विचारवंताची पार्श्वभूमी, आई आणि वडलांशी या विषयासंदर्भात भरपूर वैचारिक देवाणघेवाण होते असा. माहितीपटातला 'थिंक टँक' म्हणजे खालिद. त्यांच्या सोबत त्यांची एक मैत्रीण, आईदा. ही सुद्धा सुशिक्षित, विचार करणारी तरुणी. आणि यांचे इतर काही मित्र, कोणी संगीतकार, कोणी साधी माणसं, त्यांच्यातलेच कोणी ख्रिश्चन. अहमद, खालिद, नावापुरतेच मुस्लिम, खरंतर निधर्मी किंवा सेक्युलर.
गेली तीस वर्ष होस्नी मुबारक यांच्या मनमानी राजवटीत मगदीवर बरेच अन्याय झाले आहेत. मुस्लिम म्हणून राहण्याची बरीच शिक्षा त्याने गुप्त पोलिसांकरवी भोगलेली आहे. अहमदला स्थिर अशी नोकरी, काम काहीही नाही. आणि खालिद देशातली ही अशी स्थिती पाहून अस्वस्थ आहे. (खालिदच्या इंग्लिशवरून तो ब्रिटनमध्ये वाढलेला आहे हे लक्षात येतं. त्यामुळे लोकशाहीतलं सुराज्य आणि मनमानी राजवटीतले अत्याचार यातला फरक त्याला वेगळा सांगावा लागत नाही.)
या लोकांच्या मते क्रांती सुरू झाली ती यांच्यासारख्या सामान्य लोकांनी सुरू केली. या लोकांना धर्मनिरपेक्ष, मुस्लिम-ख्रिश्चनांना समान वागणूक देणारं सरकार आणि मुळात ते सुरू करण्यासाठी भक्कम पायाची घटना हवी होती. तहरीर चौकात आंदोलन सुरू केलं तेव्हा मगदीसारखे थोडकेच मुस्लिम ब्रदर त्या आंदोलनात होते आणि ते सगळे धर्मनिरपेक्षतेसाठी तिथे ठिय्या देऊन बसले होते. "माझा धर्म माझ्या हृदयात" असं म्हणत. दोन महिन्यांत होस्नी मुबारक पायउतार झाले आणि सैन्याने ताबा घेतला. सहा महिन्यांत घटना, निवडणूका, सरकार येईल असं वचन सैन्याने पाळलं नाही. पुन्हा आंदोलन. आणि या वेळेस सैन्याने आंदोलकांबद्दल दयामाया दाखवली नाही. सैन्याकडून, काही लोक तिथेच, तहरीर चौकात मारले गेले. आणि आपल्याकडे होते तशीच सारवासारव करण्याचा प्रयत्न. त्यातल्या एकाच्या, बुरख्यातल्या आईचा शोकही मेलोड्रमाटिक (मुस्लिम स्त्रिया छाती बडवून घेताना दाखवतात) असा काही नाही, ती फक्त रडत म्हणत होती, "तू देशासाठी हुतात्मा होण्याचं दुःख नाही रे मला. पण तुझ्यापासून लांब राहणं ही शिक्षा वाटते."
पुन्हा आंदोलन चालू राहिलं. तेव्हा मुस्लिम ब्रदरहुडने आंदोलन पळवलं आणि इस्लामिक आंदोलन बनवलं. पुढे त्यांनीच सैन्याशी हातमिळवणी केली. काही प्रमाणात हिंसा आणि मग निवडणूका जाहीर झाल्या. अध्यक्षपदाचे दोन उमेेदवार - एक होस्नी मुबारक राजवटीतला पंतप्रधान, दुसरा मुस्लिम ब्रदरहूडचा नेता. खालिद अब्दल्लापुढे पेच पडला, कोणाला मत द्यावं? द्यावं का न द्यावं? दोघंही समान प्रमाणात तिरस्करणीय. एक अंदाधुंद राजवटीतलाच, आणि दुसरा कट्टर धार्मिक. प्रगतीशील, धर्मनिरपेक्ष कोणीच नाही. पण निवडणूका पार पडून मुस्लिम ब्रदरहूडचा डॉ. मोहम्मद मोरसी निवडून आला.
वर्षभरात त्याने स्वतःकडे होस्नी मुबारकांपेक्षाही जास्त सत्ता जमा केली. त्यासाठी मुस्लिम ब्रदरहुडला आवडतील असे अनेक निर्णय घेतले. इजिप्तमधल्या ख्रिश्चनांची गळचेपी सुरू झाली. मोरसींच्या राज्यकारभाराला एक वर्ष झालं तेव्हा तहरीर चौकात पुन्हा लोक निषेधासाठी जमा झाले. हे जगातलं सगळ्यात मोठं निदर्शन असेल असा अंदाज आहे. मोरसी समर्थक विरुद्ध मोरसी विरोधक असा नवा संघर्ष सुरू झाला. ते विरुद्ध आपण असं न राहता, आपण विरुद्ध आपण असा. सरकार, राजवट, सैन्य यापासून लांब राहून सामान्य लोकच एकमेकांचे वैरी झालेले आहेत. (इथे मोदी विरोधक आणि मोदी समर्थक अशी 'जगाची' विभागणी करणाऱ्यांची आठवण होणं साहजिक आहे.)
आजही इजिप्त स्थिर नाही. खालिदने शेवटी उत्तम विचार दिलेला आहे, दोन वर्षांत इजिप्त झटपट सुधारेल अशी माझी अपेक्षा नाही. आज जे काम केलंय ते पुरेसं आणि योग्य रस्त्याने जाणारं आहे का, हे अजून तीस वर्षांनी समजेल. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आत्ता योग्य राज्यघटना आणणं महत्त्वाचं आहे. अहमद अजूनही सुस्थित नाही. मगदी आता वयस्कर झाला आहे. स्वतः मुस्लिम ब्रदर असूनही, मोरसींच्या राज्यकारभारावर तो खूष नाही. पण मोरसींना अजून काही काळ मिळावा असं त्याचं मत. हा माहितीपटाच्या संस्थळाचा दुवा.
खालिद, आईदा यांच्यासारख्या उदारमतवादी लोकांचं पुढे काय होणार असा प्रश्न पडतो. हे लोक कोणत्याही राजवट - regime ला विरोध करणारे आहेत, मुस्लिम घरात जन्माला आले तरीही मुस्लिम नाहीत, त्यांची ओळख तेवढीच मर्यादित नाही, मुस्लिम ब्रदरहूड कधी जोशात असते, कधी नसते, या लोकांना राग आला तर हातात दगड घेऊन भिरकवावा अशी इच्छा होत नाही, तहरीर चौकात पहिला तंबू टाकला आईदाने, तिला आणि खालिदला कसली भीती असेल तर ती फक्त धर्मांध, सत्तांध लोकांच्या हातात पुन्हा सत्ता येण्याची! कॅमेरा (किंवा लेखन, कुंचला) हेच अस्त्र समजणाऱ्यांची अडचण सगळीकडे सारखीच. एकीकडे बुलेट्स आणि दुसरीकडे दगड.
माहितीपटाच्या संस्थळावर त्यांच्या ग्राफिटीचं चित्र पीडीएफ रूपात आहे. ते जरूर पहा.
अमेरिकन, कनेडीयन, आणि काही युरोपीय देशांमध्ये हा माहितीपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. (नेटफ्लिक्सची मदत या माहितीपटाला झालेली आहे ही आणखी एक समाधानाची बाब.)
---
परवा हा चित्रपट पाहिला आणि आत्ताच बातमी वाचली. Egypt court sentences hundreds of Muslim Brotherhood supporters to death