हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत....... भाग - १

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत.

पंड्त बिरेंद्र किशोर रॉय यांच्या लेखावर आधारीत.

हिंदूस्थानी संगीत परंपरा इतकी जूनी आणि थोर आहे की त्याचे मुळ शोधायला गेले तर असे वाटले तर आश्चर्य वाटायला नको की हे संगीत दैवी आहे. हे देवानेच जन्माला घातले आहे. प्राचीन काळी गांधर्व संगीत आणि वैदिक संगीत या दोन्ही पद्धती ऋषीमूनींच्या आश्रमातच जोपासल्या गेल्या असे मानायला भरपूर जागा आहे. अर्थात ज्या राजांच्या आश्रयाला हे ऋषीमूनी होते, ज्यांचा सक्रीय आधार या गुरूकूलांना लाभला होता, त्यांनाही या परंपरेचे श्रेय द्यायलाच लागेल.

पुराणकाळाच्या शेवटी शेवटी देवळात पूजेसाठी संगीताचा वापर चालू झाला आणि संगीताची आणि इतर कलांची एक संस्कृती निर्माण झाली. हीच संस्कृती राजदरबारांतून पूढे जनताजनार्दनात पसरली कारण हे राजे स्वत: या देवळातल्या त्यांच्या कुलदैवतांची पूजा करण्यात धन्यता मानत असत आणि त्यावेळी या संगीताचा पुरेपूर केला जाई. या संगीताला “मार्ग संगीत” असे संबोधले जाऊ लागले कारण हे संगीत साधकाला मार्ग दाखवत असे. नैसर्गिकरित्या या संगीताचा पूढचा प्रवास हा त्या देवळांच्या पूजारी वर्गाच्या हातात होता आणि अर्थातच त्याला राजाश्रय होता. या संगीताचा वापर पूढे पुढे देवालयात होता होता राजदरबारीही मनोरंजनासाठीही होऊ लागला.

या देवळांच्या स्थापत्यामधे त्यामुळे एक वैशिष्ठ्य होते, ते म्हणजे प्रत्येक देवळात कला सादर करण्यासाठी असलेली प्रशस्त जागा. गाणे, प्रार्थना, नृत्य अशा विवीध कला येथेच सादर केल्या जात आणि त्यासाठी लागणार्‍या कलाकरांना राजांचा व सरदारांचा उदार राजाश्रय असायचा. हा राजाश्रय रहायला जागा, वेतन, बिदागी, उदरनिर्वाहासाठी जमीन इ. या स्वरूपात दिला जायचा आणि या कलाकारांच्या पिढ्यानपीढ्य़ा याच्यावर उपजिवीका करत आपल्या कलेची परंपरा अखंड जपत या देवळात आपली कला सादर करण्यात धन्यता मानत असत. उदा. हे खालचे देऊळ बघा –

हे हंपीतील एक देऊळ आहे. डावीकडे दिसतो आहे तो देव्हारा आणि पूढे कला सादर करण्यासाठी सभामंडप. अर्थात हे तसे तुलनेने नवीन आहे. आपण बोलतोय ते यापेक्षाही प्राचीन आहे.

ही जी संगीताची व कलेची परंपरा होती त्याचे मनोरंजनाचे मुल्य ओळखून पठाण बादशहांनी बंद न करता चालू ठेवलीच, पण त्यात फारसी कलाकारांचीही भर घातली. उदा. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारी नायक गोपाल नावाचा एक गायक ध्रूपद सादर करायचा तर अमीर खूस्रो आपली परमेश्वराची प्रार्थना कव्वाली गायन करून सादर करायचा.

आणि हा महाल –

ही कला या कलेचे जाणकारांमोर सादर केली जायची, त्यात ना केवळ दरबारी अमीर उमराव असायचे तर गावातील जाणकार मंडळीही असायची. उत्तरेची पहिली संगीतसभा ही जौनपूरच्या सुलतान हुसेन साक्री याने आयोजीत केली होती आणि त्यात त्याने अनेक ध्रूपदीये, कव्वाल, संगीततज्ञ यांना आमंत्रण होते. या त्याच्या दरबारातील संगीत तज्ञांनीच या सुलतानाने गायलेल्या दोन रागांना “राग” म्हणून मान्यता दिली होती. त्या रागांची नावे आपल्या परिचयाची आहेत -जौनपूरी तोडी आणि हुसेनी कानडा आणि त्यानीही ती मान्यता या तज्ञांकडून घेतली होती.

ग्वाल्हेरचे राजे “राजा मान तोमार” यांनी तर एका संगीत विद्यालयाची स्थपना केली होती आणि त्यात चार थोर नायक संगीत शिकवायचे काम करत होते. राजा मान हे कायम संगीतसभा भरवत आणि वेगवेगळ्या संगीततज्ञांमधे चर्चा घडवून आणत. या चर्चांमधून अनेक शोध लागत व अनेक नवीन राग रचले जात. यानंतर सम्राट अकबर याने हीच परंपरा चालू ठेवली आणि हिंदूस्तानी संगीताचे सुवर्ण युग अवतरले असे म्हणायला हरकत नाही. अकबराने राजा बाघेला यांच्या दरबारातून मियॉं तानसेन यांना आपल्या दरबारात आमंत्रण देऊन एक गायकांची मैफिल जमवली. त्यात तानसेन सोडून अजून आठ गायक व वादक होते.

अकबराबद्दल अनेक प्रवाद असतील. काही चांगले तसेच काही इतर अनेक मुगल बादशहांबाबत असतात तसे वाईट. पण त्याचे संगीताबद्दलच्या प्रेमाबद्दल कोणी शंका व्यक्त केलेली आढळत नाही. या बाबतीत तरी त्याची सर्वधर्मसमभाव हीच वृत्ती दिसून येते. त्याने सर्व धर्मातील चांगल्या गोष्टींना उत्तेजनच दिले होते. अर्थात काही लोकांचे म्हणणे याच्या उलट आहे. ते म्हणतात त्याने फक्त मुसलमान धर्मियांनाच उत्तेजन दिले. पण संगीताच्या बाबतीत तसे वाटत नाही. अकबराने देवळात चालणार्‍या या संगीत व नृत्य यांचा जो अभ्यास चालत असे, जी परंपरा निर्माण होत होती त्याचा चांगला अभ्यास केला होता आणि याचाच चांगला परिणाम म्हणून त्याच्या दरबारात ध्रूपद गायकीला मानाचे स्थान देण्यात आले. संगीतातील अनमोल खजिने मियॉ तानसेन बादशासमोर दिवान-ए-खास मधे खाली करायचा पण सामान्यजनही या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून त्यातील काही मोजके पण उत्कृष्ट दिवान-ए-आम मधे सादर केले जायचे. संगीतदरबारांचा हा सिलसीला मोगलांचा शेवटच्या बादशहा “मोहम्मद” पर्यंत चालू राहीला. ही परंपरा मोगल दरबारापुरती सिमीत न राहता इतरही दरबारातून जोपासली गेली, त्याची उदाहरणे पुढे येतीलच. जयपूर, लखनौ, बनारस, बेतीया, बिशनपूर, ग्वाल्हेर आणि रामपूर या संस्थानामधे आधार मिळाल्यामुळे उच्च दर्जाच्या संगीताची जपणवूक झाली हे नाकारण्यात अर्थ नाही. याच संस्थानिकांमुळे हे संगीत जिवंत राहिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनतेचे व या संस्थानिकांचे लक्ष शिक्षणाकडे व इतर बाबींकडे ( जे योग्यच होते) अधिक वळल्यामुळे जरी संगीताकडे जनतेचे दुर्लक्ष झाले नाही तरी या कला जोपासण्यासाठी जी आर्थिक मदत लागते त्याचाच झरा आटल्यामुळे दुर्दैवाने या परंपरेवर जबरदस्त आघात झाला. अनेक बुजूर्ग गायक, कलाकारांचे मृत्यू झाल्यावर त्यांची परंपरा चालवायला कोणीच नव्हते. सरकारलाही या कलांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. (आणि दुर्दैवाने सध्याही नाही). जे काही सध्या शिल्लक आहे त्याचे श्रेय एका महान व्यक्तीला दिले पाहिजे. ती म्हणजे पंडीत भातखंडेजी. या थोर माणसाने संगीताचे जे काही अवशेष इतस्तत: भारतात विखरून पडले होते, ते गोळा करून त्यातून आपल्या महान संगीत परंपरेला एक मूर्त स्वरूप दिले. त्यांनी अनेक संगीत शाळा काढल्या आणि घराण्याच्या परंपरा व त्यांची वैशिष्ठ्ये जपून ठेवली. ज्या गायकांना दोन वेळच्या खायची भ्रांत होती त्यांना मदत केली अथवा मिळवून दिली. त्यांचे हे तळमळीचे कार्य बघून रामपूरचे नवाब, बडोद्याचे गायकवाड आणि काही इतर यांनीही संगीत दरबार परत चालू केले आणि या कलाकारांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर त्यांनी पंडितजींना अखिल भारतीय संगीत सभा भरवायला भरघोस आर्थिक मदतही केली आणि संगीतसभेचा नवीन पायंडा पडला. समाजाला भारतीय संगीताची फेरओळख करून देणे हे या संगीतसभांचे मुळ उद्दिष्ट असायचे. बडोदा, बनारस, लखनौ, इ. शहरातून या सभा व्हायच्या आणि त्यात बाप माणसे आपले गाणे सादर करायची. त्यांची नावे ऐकलीत तर आपण त्या काळात का जन्माला आलो नाही असे आपल्याला निश्चित वाटेल. बघा त्यांची नावे – अलबोंडेखान, नसरुद्दीनखान, राधिका गोस्वामी, गोपेश्वर बॅनर्जी, अल्लादिया खान, अब्दूल करीम खान, बरकतूल्लाखान, जमालुद्दीन व चंदा चौबे, इ..... त्यातच केसरबाई केरकर आणि हिराबाई ऐन उमेदीत होत्या..

पंडीत भातखंडेजीनंतर या संगीतसभांना श्रीमंत उद्योगपतींचा व धनिकांचा आश्रय लाभला व सुदैवाने ही परंपरा कशीबशी का होईना चालू राहिली हे आपले नशीब.
नंतर क्रांती झाली ती आकाशवाणीमुळे. आकाशवाणीमुळे जनतेला थोर लोकांचे गाणे फुकट ऐकायला मिळू लागले तसेच कलाकारांचीही काही प्रमाणात आर्थिक विवंचना मिटली. आकाशवाणीवरून जनतेचे संगीताचे शिक्षणही होण्यास मदत झाली ते वेगळेच. दिल्ली आकाशवाणीकडे अशा कार्यक्रमाचा मोठा म्हणजे खूपच मोठा खजिना आहे. आणि त्याची किंमत किती हे जाणकारच सांगू शकतील. या ठेव्याचा उपयोग पुढच्या पिढ्यांना निश्चितच होणार याची मला खात्री आहे फक्त तो बाहेर यायला पाहिजे. सरकारही आता नवीन नवी कलाकारांना खुपच प्रोत्साहन देत आहे, पण ते पुरेसे नाही. शास्त्रीय संगीताची एक वेगळी वाहीनी वा रेडिओ केंद्र त्वरीत चालू करून लोकांना चांगले संगीत ऐकवायला पाहिजे आणि या कामाला प्राधान्य देवून ते पूरे केले पाहिजे. या आपल्या कलेचा वारसा पुढे चालावा असे वाटत असल्यास चांगले गायक आणि गाणे समजण्यासाठी चांगले कानसेन तयार करणे ही आपली जबाबदारी आहे...

मधे मी एका पाश्चात्यसंगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणी डेनमार्कचे एक पथक आले होते. पिआनो, चेलो, आणि व्हायोलीन असा कार्यक्रम होता. त्याच्या प्राथमिक भाषणात त्यांनी डेनमार्कच्या राणीचे आभार मानले. याचे कारण ऐकल्यावर मी खरोखरच आश्चर्यचकीत झालो. राणी दर वर्षी संगीताच्या स्पर्धा भरवते. प्रत्येक वाद्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा. मग प्रत्येक वाद्यस्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना एकत्र वाजवायची संधी देऊन जगभर त्यांचे कार्यक्रम भरवण्यासाठी पूर्ण आर्थिक मदत देण्यात येते. पुढचे ऐकून मी चाटच झालो. राणीने एक मोठी गाडी तयार केली आहे ज्यात साधारणत: ३० मुले बसू शकतात आणि उच्च दर्जाच्या साऊंड सिस्टीमवर ते शास्त्रीय संगीत ऐकू शकतात. त्याच गाडीत एक छोटेसे व्यासपीठःइ आहे ज्यावर एखाद्या वाद्याचा कार्यक्रमही होऊ शकते. ही गाडी रोज एखाद्या शाळेत जाते आणि त्यातील सर्व मुलांना हे संगीत ऐकवते आणि ते कसे ऐकावे हेही शिकवते...कारण ते त्यांचे उद्याचे श्रोते आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचे संगीत व परंपरा जिवंत राहणार आहेत...

चांगले काय हे कळण्याचेही प्रशिक्षण द्यावे लागते या मताचा मी आहे........
जयंत कुलकर्णी.
क्रमश:.............
पुढच्या भागात संगीताचा इतिहास..........

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

बीजे च्या गदगकर म्युझिक काँपिटिशनची आठवण आली.

बी.जे. मेडीकल कॉलेज पुणे, दर वर्षी एक गदगकर म्युझिक काँपिटिशन घेत असे. इंटरकॉलेजिएट.
५ दिवस चालणार्‍या या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत, क्लासिकल व्होकल (शास्त्रीय गायन), क्लासिकल इन्स्ट्रूमेंटल (शास्त्रीय वादन), सेमिक्लासिकल व्होकल (भावगीत), क्लासिकल डान्स (शास्त्रीय नृत्य), अन ऑर्केस्ट्रा काँपिटिशन (वाद्यवृंद स्पर्धा) होत असे. दररोज एक. सुंदर स्पर्धा असे. अन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतील या सर्व कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम ही स्पर्धा करीत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शास्त्रीय संगीताच्या उगमाचा आढावा घेणारा लेख आवडला.

लेखात जागोजागी शास्त्रीय संगीताला राजाश्रय किंवा धनिकांनी आश्रय केल्याचा उल्लेख आहे. ही कला जनसामान्यांत कधीच लोकप्रिय नव्हती का? म्हणजे शास्त्रीय संगीत गाणारा स्वतःच्या गायनाने स्वतःची उपजीविका करू शकत नसे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुराणकाळाच्या शेवटी शेवटी देवळात पूजेसाठी संगीताचा वापर चालू झाला

म्हणजे नक्की किती वर्षांपूर्वी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)