Skip to main content

कॉपिराइट आणि मराठी साहित्य

आज कोलटकरांच्या कवितेच्या हक्काबाबत सुप्रिम कोर्टाने प्रकाशक अशोक शहाणे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर -
१. लोकसत्ता या दैनिकाने ही बातमी पहिल्या पानावर सर्वात वर मुख्य बातमी म्हणून छापली.
२. एबीपी माझा या वाहिनीने ही बातमी लावून धरली. रात्री ९ वाजताच्या कार्यक्रमात त्यावर चर्चाही झाली. अशोक शहाणे व संदीप खरे या दोघांशी झालेली बातचित पुन्हा रात्री अकरा वाजता दाखवणार आहेत.
याविषयी फेसबुकवरची पहिली प्रतिक्रिया मी गणेश मतकरी यांची वाचली. त्यांच्या भिंतीवर याबाबत चर्चा सुरू झाली; तिथं प्रतिक्रिया नोंदवून मी ती चर्चा माझ्या भिंतीवर शेअर केली.
माझी प्रतिक्रिया भावनिक उद्रेकाची होती, तिला अनुभवांचा पाया होता. त्यात 'विचार' कमीच होता. ती जागा भरून काढावी असं प्रामाणिकपणे वाटलं म्हणून इथं हे लिहितेय.


कष्ट घ्यायची तयारी नाही
शॉर्टकट हवे असतात सगळीकडे
वेळ नाहीये हो
कारण खूप चिल्लर खर्चायचीय...
ती सगळीकडे मोजून देण्यात वेळ लागतोच.

एबीपी माझा वरची कॉपिराइटची चर्चा ऐकली. त्यात संदीप खरे यांचं म्हणणं ऐकलं. त्यांना म्हणे यानंतर अशी सीडीही काढायची होती; पण एकेका कवीचे कॉपिराइट कोण शोधत बसणार या विचाराने त्यांनी तो बेत अखेर रद्द केला.
हुश्श!

कोलटकर हा कवी एकेका कवितेचे दोनदोनशे खर्डे करायचा. गांडू होता.
शहाण्यांनी पदरमोड करत माजोरडे कवितासंग्रह छापले.
'भिजकी वही' कागदापासून, मांडणीपासून, टाइपपासून पहावा... माज आहे.
असला कवितासंग्रह निघणार असेल तर कवीनं त्या प्रकाशकाच्या तळहातावर प्राण ठेवावेत. शहाणेंच्या 'प्रास'इतकी 'समजूत' दुसरीकडे, अगदी मौजेतही नाही दिसली मला कधी. मोजकीच पुस्तकं, पण एकेक खणखणीत बंदा. वाजवून घ्यावा.

त्यांनी माझी अर्धी ओळ छापली तरी मी गहाण राहीन...

जाहिरातींमधली जागा मजकुराने भरण्याची सवय असलेल्यांना हे समजणार नाही.
कोलटकरांची कविता 'पोचवण्या'च्या बाता संदीप खरेने करूच नयेत. 'एक तरी ओवी अनुभवावी...' इतकं त्याला 'एक तरी ओळ...' म्हणता आलं तरी गडाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवायला लायक म्हटलं असतं.
सगळ्याच लेखक-कवींचा आपला असा एक वाचकवर्ग असतो, आपलं स्थान असतं; पण आपला वर्ग, आपली यत्ता आपापल्याला कळतेच ना राव. कशाला उंटाच्या बुडाचा मुका घ्यायला जातात? आणि त्याला साहित्य प्रसार, साहित्य सेवा असली नावं का देता? साधी परवानगी घ्यायचा आळस आहे, तर या उठाठेवी हव्यात कशाला?
हेमंत जोगळेकर यांनी 'अंतर्नाद' या मासिकात असंच एक सदर चालवलं. रितसर सर्व कवींची परवानगी घेतली. त्यांचा अद्ययावत परिचयही सोबत छापला गेला. अशी चांगली उदाहरणं दिसत नाहीत?
फेसबुकवर / ब्लॉगवर विडंबनं लिहिणारा आपला मित्र अनिरुद्ध अभ्यंकर परवानग्यांचा विचार करून ब्लॉगवर ज्या कवितांचं विडंबन केलंय, त्या मूळ कविता देण्याआधी चौकशा करतोय, तो काय येडा आहे?
आपलं जरा कुठे नाव झालं, एका वर्तुळात ओळख तयार झाली की आपण हे उद्योग परस्पर करायला मोकळे असा आत्मविश्वास नडला संदीप खरेला. कवितेविषयी 'ललित' लिहायचं आणि कवितेला कविता न वाचणार्‍या पब्लिकपर्यंत पोचवायचं हा शुद्ध हेतू होता म्हणे. मग शुद्ध हेतूची सुरुवात सरळ मार्गाने का करावी वाटली नाही?
कवितासंग्रहांवर हक्क कुणाकडे त्याचा उल्लेख असतो, प्रकाशकांचा पत्ता असतो; आणि ज्या साहित्य प्रकाराविषयी तुम्हांला इतकं कुतूहल, आदर, प्रेम इत्यादी आहे, असं तुम्ही म्हणता, त्या प्रकारात लिहिणार्‍यांची प्राथमिक माहिती ठेवण्याची आस्थाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कचकड्याचेच आहात!! आणि तुमचं प्रेम, आपुलकी, आदर हे तकलादूच आहे.

'कविता' हा मजकूर 'बारीक / कमी जागा व्यापणारा / शब्द कमी / शाई कमी' म्हणून कुणीही कॉपीपेस्ट करावा इतका स्वस्त आहे का खरोखर?
कथा अशा छापल्या तर? कादंबर्‍यांच्या पीडीएफ नेटवर टाकल्या तर? एखाद्या दिवाळी अंकानं एखादी कादंबरी अशी पुनर्मुद्रित केली तर? एखादा अभ्यासपूर्ण लेख वा शोधनिबंध उचलून आपल्या ब्लॉगवर डकवला तर?
वृत्तपत्रांचे संपादक आणि फिचर एडिटर आळस कधी झटकणार आहेत? असं तर आम्हीही केलंय, करतो, असं सांगताना त्यांना अजिबात ओशाळं वाटत नाही?
वर्तमानपत्रातल्या लेखाचेही 'मानधन' मिळत असतेच. पूर्ण कविता उद्धृत करायची असेल तर परवानगी घेतलीच पाहिजे. सदर हे काही वेळेवर, तात्कालिक लिहिलेले नसते. पुरेसा वेळ असतो.

चोरांच्या राज्यात साव गुन्हेगार ठरतात लेको!
स्वतंत्र लिहू नका. चोर्‍या करा चोर्‍या!! >

ही माझी भावनिक प्रतिक्रिया.
आणि हा अनुभव :
कॉपिराइटबाबत लेखकांनाही धड माहिती नसते, हे आपलं दुर्दैव. अनेक गोष्टी छापून आल्यानंतर वाचकांकडून समजतात. एका प्राध्यापक बाईंनी दहा-पंधरा कवीयत्री निवडून त्यांच्या प्रत्येकी पाच कवितांचं एक संकलन छापलं. त्याचा एक बाळबोध प्रस्तावना लिहिली. त्यांना बायोडेडा वाढवायच्या युक्त्या सापडल्या आहेत. मग हे चालतं. कुणाचीही परवानगी नाही. हे पुस्तक आता त्यांना अभ्यासक्रमात चिकटवायचं आहे.
नागपूरच्या एका प्राध्यापकाने सहा-सात कवयित्रींच्या कवितांचं पोस्टर तयार करून छापलं. महाविद्यालयांमध्ये लावायला. हेतू चांगला, पण परवानगी नाही. वर्षभराने त्यांनीच ते मला 'भेट' म्हणून पाठवलं, तेव्हा समजलं. भोसडून उपयोग नव्हता. "घाई झाली त्यामुळे परवानगी घ्यायला वेळ मिळाला नाही" म्हणाले. म्हटलं,"आर्टवर्क करायला, छापायला वेळ लागला ना... मग सात फोन करायला कितिक वेळ लागला असता?" यावर गप्प.
एका नामवंत अभिनेत्रीने काव्यवाचनाची एक सीडी केली. "तुझी कविता खूप आवडली म्हणून मी आग्रहानं त्यात घ्यायला लावली आणि वाचली गं. तुला विचारायचं राहूनच गेलं. प्लीज रागावू नकोस हं... पण नवं काय ते वाचकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना..." असा लाडीक खुलासा. बायकांशीही लाडीकपणे जिभेवर शब्द घोळवत बोलणार्‍या बायका आधीच जाम डोक्यात जातात; त्यात हा घोळ. आजतागायत त्या सीडी बनवणार्‍यांना माझा पत्ता सापडलेला नाही.
मनसेची स्थापना झाली, तेव्हा शिवाजी मैदानात एक कार्यक्रम झाला. पुस्तकप्रदर्शन + शस्त्रप्रदर्शन! त्यात एक दिवस ग्लॅमरस अभिनेत्यां/त्रींनी आवडत्या कविता सादर केल्या. परवानगी नाहीच.
साहित्यसेवा करताहेत म्हणे आणि भाषेचं प्रेम!
तुकड्या-तुकड्याने छापणे हे निराळेच! एकेक ओळ छापलीत तरी...! वर मी ज्या पोस्टरचं उदाहरण दिलं आहे, त्यांनी तर मेघना पेठेच्या कवितेतल्या मधल्या ओळी ( त्यांना असभ्य / अश्लील इ. वाटल्या म्हणून ) गाळल्या होत्या. एकदा आकाशवाणीसाठी मी कविता वाचल्या, तेव्हाही एका कवितेत 'ब्रेसियर' या शब्द आला, म्हणून त्यांनी मधल्याच ओळी गाळल्या होत्या व प्रसारणाच्या काही मिनिटं आधी मला त्यांनी तसं कळवलं; तेव्हा ती पूर्ण कविता वगळा किंवा कार्यक्रमच रद्द करा असं मी सांगितलं होतं.
आस्वाद असेल तरी कवीची वा ज्यांच्याकडे कॉपिराईट असेल त्यांची परवानगी घ्यायला कितिक वेळ लागतो? कुणीही अडवून धरत नाही अशावेळी. अनुवादासाठी देखील नाही. मी इस्मत चुगताईंच्या कथांचा अनुवाद केला, तो छापयला १०-१२ वर्षं गेली; कारण त्यांच्या नातवाचा संपर्क मिळत नव्हता आणि परवानगीशिवाय छापायचं नाही असं ठरवलं होतं. 'प्रत्येक वेळी' असं लिहिणार्‍यावर संशय नसतोच; आणि अशावेळी कुणी आक्षेप घेतही नाही. कविता तर 'एकाच ओळी'चीही असू शकते. जुन्या कवितांचे कॉपिराइट काहीवेळा संपलेलेही असतात. ज्यांच्या जुन्या कवितांवर पुनःपुन्हा लिहिलं जातं अशी मोजकीच कवीमंडळी आहेत. कुणी 'अभ्यासक / संशोधक' असेल, तर तो अपवादच आजच्या काळात. अशावेळी संदर्भांच्या यादीत, ऋणनिर्देशात स्पष्टपणे 'क्रेडिट' देता येतं.
सुभाष भेंडे यांनी माझा दत्तू बांदेकरांवरचा शोधनिबंध चोरून मजकूर जसाच्या तसा 'ललित' दिवाळी अंकात छापला होता. तेव्हा माझी काहीही 'ओळख' नव्हती आणि भेंडे मान्यवर होते. ललितने दुर्लक्ष केलं. भेंडेंनी पत्रांची उत्तरं दिली नाही. तेव्हा अशोक जैन यांनी 'कानोकानी'त 'प्राचार्यांची चोरी' या शीर्षकाखाली मजकूर लिहून वाचा फोडली. साधा संदर्भ म्हणूनही भेंडेंना उल्लेख करावा वाटला नव्हता. एकदा का गृहित धरलं की अशा गोष्टी होतच राहतात. त्यामुळे निदान नियम करताना तो सर्वांसाठीच करावा.

आणि या मुद्याविषयी चिन्मय दामले या मित्राने दिलेली ही माहिती :
एखादा लेखक जेव्हा आपलं लेखन प्रकाशकाला छापायला देतो, तेव्हा तो त्या प्रकाशकाला प्रकाशनाचे हक्क देत असतो. इथे भाषांतर, अन्य माध्यमांमध्ये रूपांतर हे बाजूला ठेवू. तर एकदा लेखकानं प्रकाशकाला त्या माध्यमात पुस्तक छापायची परवानगी दिली, मानधन घेऊन, की त्या प्रकाशकाकडे प्रकाशनाचे हक्क येतात. उदाहरणार्थ, मी एखादी कविता लिहिली, आणि ती कविता असलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहाचा स्वामित्वहक्क माझ्याकडे असला तरी मी प्रकाशकाला प्रकाशनाचा हक्क दिला आहे. हीच कविता आता जर मला दुसरीकडे छापायची असेल, तर तो त्या प्रकाशकाच्या प्रकाशनाच्या हक्काचा भंग ठरतो. माझ्याकडे त्या कवितेचा स्वामित्वहक्क असला तरी. त्यामुळे ती कविता पुन्हा दुसरीकडे (म्हणजे मासिकात, पुस्तकात, वर्तमानपत्रात, फेसबुकवर किंवा इतर संकेतस्थळावर) प्रकाशित करायची असेल, तर माझी, म्हणजे कवीची, आणि प्रकाशकाची परवानगी अत्यावश्यक ठरते. हाच निकाल न्यायालयानं दिला आहे. अवमानकारक किंवा भावना दुखावणारं लेखन प्रकाशित झाल्यास लेखकाबरोबर प्रकाशकाविरुद्धही गुन्हा नोंदवला जातो. तो का? याच कारणामुळे. पुस्तकं छापण्याचा आणि ती वितरित करण्याचा परवाना प्रताधिकारधारकानं प्रकाशकाला दिलेला असतो. त्यामुळे एखादा मजकूर पुनर्मुद्रित करताना प्रताधिकारधारकाबरोबरच तो मजकूर वितरित करण्याचा परवाना ज्याच्याकडे आहे, त्याची परवानगी घ्यावी लागते.

आणि म्हणूनच नियतकालिकांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये छापलेल्या लेखांचं पुस्तक करताना आधीच्या प्रकाशकांची परवानगी लागते. माझ्या समजुतीनुसार काही मराठी वर्तमानपत्रं आता अशा परवानग्यांचा आग्रह धरतात.

आजचा निकाल आला यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. परदेशात हीच पद्धत रूढ आहे. प्रताधिकारधारक कोणीही असो, प्रकाशकाची परवानगी लागतेच.

http://www.randomhouse.com/about/permissions.html
http://www.harpercollins.com/footer/permissionsnew.aspx

राजहंस प्रकाशनासारखे काही प्रकाशकही त्यांच्या पुस्तकात प्रकाशकाच्या लेखी परवानगीचा उल्लेख करतात आणि तो आवश्यकही आहे.
गूगलनं विनापरवानगी पुस्तकांचे अंश वापरले म्हणून अगोदरच लेखकांना आणि प्रकाशकांना कोर्टाबाहेर तडजोड करून पैसे दिले आहेत.

*

कवितेच्या ओळी किंवा लेखाचा काही भाग उद्धृत करणं हे भारतात ’फेअर डीलिंग’ आणि अमेरिकेत ’फेअर यूज’ या अंतर्गत येतं.

The legal provision for fair dealing provides that:

The following acts shall not constitute an infringement of copyright, namely:

(a) a fair dealing with a literary, dramatic, musical or artistic work for the purposes of —

(i) research or private study;
(ii) criticism or review, whether of that work or of any other work;

(b) a fair dealing with a literary, dramatic, musical or artistic work for the purpose of reporting current events —

(i) in a newspaper, magazine or similar periodical or
(ii) by broadcast or in a cinematograph film or by means of photographs.
(iii) the reading or recitation in public of any reasonable extract from a published literary or dramatic work;

मात्र संपूर्ण कविता किंवा लेखाचा मोठा / महत्त्वाचा भाग तुम्ही फेअर डीलिंग अंतर्गत छापू शकत नाही.
संपूर्ण कविता ही एक कलाकृती मानली जाते.See Translation
Random House - Permissions
www.randomhouse.com
Welcome to the Random House Copyright & Permissions Web Page. All published material by Random House, Inc. and its divisions is protected under copyright law. Written permission is required from the publisher if you wish to reproduce any of our material.
Random House - Permissions
www.randomhouse.com
Welcome to the Random House Copyright & Permissions Web Page. All published material by Random House, Inc. and its divisions is protected under copyright law. Written permission is required from the publisher if you wish to reproduce any of our material.

नीरा Mon, 07/10/2013 - 23:43

अतिशयच पटलं. चर्चा अर्धवटच पाहिली, त्यामुळे नीट कुणाचं म्हणणं कळलं नाही. पण एक चष्मेवाले गृहस्थ (मेहता किंवा जोशी नव्हेत) वापरामागचं 'इन्टेन्शन' वगैरे काहीतरी बोलत होते. ते झेपलं नाही. ज्याने सदर लिहिलं त्याला त्याबद्दल मोबदला मिळाला, ज्यांनी छापून विकलं त्यांनीही पैशांची कमाई केली - शुद्ध व्यावसायिक हेतू लेखन आणि प्रकाशनामागे होता.
आणि कॉपीराईट कायदा पाळावा लागतो हे मान्य नसेल तर आधी खरेंनी, त्यांना पाठिंबा देणार्‍या लेखकुंनी स्वतःचं साहित्य पूर्ण प्रताधिकारमुक्त करावं आणि कशाचा मोबदला घेऊ नये. तरीही इतरांच्या बाबतीत कायदा पाळावाच लागेल ते अलाहिदा!

अरविंद कोल्हटकर Tue, 08/10/2013 - 08:49

लोकसत्तेमधील मुख्य बातमी येथे पाहावी.

त्याच संदर्भातील अजून एक बातमी येथे.

पहिल्या बातमीमधील 'मराठी साहित्य व्यवहारातील गैर प्रकारांवर क्ष-किरण टाकणारे ज्येष्ठ समीक्षक' ह्या उल्लेखामागील पार्श्वभूमि त्या घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून येथे नोंदवितो. ह्या घटना १९६३-६४ सालच्या असल्याने 'ऐसीअक्षरे'च्या बहुसंख्य वाचकांच्या आठवणीपलीकडे असाव्यात म्हणून हा उपद्व्याप.

१९६३ किंवा १९६४ सालात एका महिन्याच्या एरवी कोणी वाचत नसे अशा 'मनोहर'च्या अंकात अशोक शहाणे नावाच्या एका सर्वांस अज्ञात अशा तरुणाचा 'मराठी साहित्यावर क्ष-किरण' असा एक लेख प्रसिद्ध झाला. तो बाहेर पडताच मराठी साहित्यात - पक्षी मसापच्या टिळक रोडवरील कार्यालयाच्या परिसरात - भयंकर खळबळ माजली. मी स्वतः आणि शहाणे तेथून हाकेच्याच अंतरावर खोल्या घेऊन राहात होतो आणि माझी एक दोन दिवसांनी शहाणे ह्यांच्या खोलीत चक्कर असे.

आपल्या लेखात शहाण्यांनी तोपर्यंत मराठी साहित्यसमीक्षकांना अश्रुतपूर्व असलेला 'सामाजिक बांधिलकी' नावाचा साहित्यिक मूल्याची मोजणी करण्याचा नवा निकष वाचकांच्या पुढे आणला आणि त्या निकषाच्या आधारे तुकाराम, लक्ष्मीबाई टिळक असे अपवाद वगळता बहुतेक सर्व मराठी लेखकांना मोडीत काढले. विशेषतः टिळकांच्या (लोकमान्य) संदर्भात असे विधान केले की त्यांचे लिखाण वाण्याच्या पुडया बांधण्याच्या लायकीचे आहे (किंवा तत्सम शब्द). ह्याला आधार म्हणून त्यांनी कीर्केगार्ड, विटगेन्ष्टाइन असल्या सातासमुद्रापलीकडील आणि इकडे कोणी न ऐकलेल्या विचारवंतांच्या नावांची मोकळेपणे पेरणी केली होती.

ह्या पावित्र्यहननामुळे मराठी साहित्यक्षेत्रात मोठीच खळबळ माजून दोनतीन दिवसातच साहित्य परिषदेच्या सभागृहात एक निषेधसभा बोलाविण्यात आली. आम्ही बॅकबेंचर्स तेथे होतोच. सभेचे अध्यक्षस्थान ना.सी. फडके ह्यांच्याकडे होते. ते अतिशय चिडलेले होते. शेवटी अध्यक्षाचे भाषण करतांना त्यांनी संतापाने 'असे लिहू पाहणार्‍या लेखाकांचे हातपाय तोडले पाहिजेत' असे तालिबानी उद्गार - शब्द नंतरच्या काळातील आहेत पण विचार तोच - काढले.

सारांश म्हणजे शहाणे ह्यांची लोकांना चिडवायची सवय जुनीच आहे!

अरविंद कोल्हटकर Fri, 20/12/2013 - 21:30

In reply to by अरविंद कोल्हटकर

मी वर दिलेली अशोक शहाणे ह्यांची माहिती आणि त्यांचा 'मराठी साहित्यावर क्ष-किरण' हा लेख ह्याबद्दल आत्ताच हे संस्थळ पुढे आले. मी वर लिहिलेले ह्या जागी अधिक खुसखुशीत पद्धतीने लिहिले आहे. जरूर वाचा...

राजेश घासकडवी Tue, 08/10/2013 - 18:27

कळकळीने लिहिलेला उत्तम लेख. भाषांतरं, उद्धृतं, यांसाठी लेखकाची/प्रकाशकाची परवानगी घेणं, त्यांना मोबदला देणं याबाबत प्रचंड अनास्था असते. किंबहुना असं काही करायचं असतं हे एकतर गावीच नसतं. आणि असलं तरी 'काय फरक पडतोय?' ही मानसिकता! पुलंच्या लेखनाबाबत अशीच निर्लज्ज निष्क्रियता दिसल्यावर सुनीताबाईंनी काही लोकांना कोर्टात खेचलं होतं. आणि तसं करण्याबद्दल त्यांना उलट अनेकांचा रोष पत्करावा लागला.

"घाई झाली त्यामुळे परवानगी घ्यायला वेळ मिळाला नाही"

यातला 'घाई' हा शब्द नेहमीच गमतीदार वाटलेला आहे. इतकी घाई झाली की दार लावून घ्यायलाही वेळ झाला नाही असं म्हणण्यासारखं वाटतं. काही वर्षांपूर्वीच हॅरी पॉटरच्या पुस्तकांच्या भाषांतराबाबतही अशीच सबब पुढे आली होती. आणि ही सबब लिहिणारे गृहस्थ मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे आहेत!

अजो१२३ Tue, 08/10/2013 - 19:06

In reply to by राजेश घासकडवी

इति टिकाकार:
लेखकावर हॅरी पॉटर संबंधी पुस्तकाचे अनुवाद करताना कॉपीराईट प्रकरणी कारवाईपण झाली होती म्हणे.

इति सोनवणी:
येथे Haary Potter चा विषय माझ्या एका मित्राने छेडला आहे, त्याबद्दलही लिहिणे आवश्यक आहे. पुष्प प्रकाशन लि. ही मराठीतीलच नव्हे तर भारतातील पहिली पब्लिक लिमिटेड कंपनी मी १९९२ साली स्थापन केली होती. २५ ते ५० रुपयांत उत्तम मराठी साहित्य वाचकांना मिळावे हा हेतु होता व तशी आम्ही ४८ पुस्तके प्रकाशितही केली. १९९६ पर्यंत मी या संस्थेचा कारभार पहात होतो व माझा भाऊ विनोद मला मदत करत असे. त्यानंतर मी गडचिरोली येथे लोह भुकटी बनवण्याचा मोठा कारखाना काढला आणि पुष्पची धुरा भावाकडे सोपवली आणि माझा संबंध एक लेखक एवढाच या संस्थेशी राहिला. स्वस्त पुस्तक योजना बंद पडली. Harry Potter चा अनुवाद विकास शुक्ल यांनी स्वता:च परस्पर केलेला होता. (त्यांची प्रस्तावनाच पुरेशी बोलकी होती.) हा अनुवाद प्रकाशित करायचा प्रस्ताव विनोदने माझ्याशी चर्चिला होता, कारण त्याला स्वत:ला इंग्रजी मुळीच येत नाही. त्यानुसार मी मुळ प्रकाशकांशी मेलवरुन संपर्क साधला होता आणि वाटाघाटी सावकाश पण अनुमतीच्या दिशेने चालल्या होत्या. पण प्रत्यक्ष करार होण्याची वाट पाहण्याचा संयम सुटला आणि पुस्तक प्रकाशितही झाले.. त्याची परिणती copy right act चा भंग झाल्याच्या गुन्ह्यात झाली. माझे बंधु, दुसरे संचालक व अनुवादकांना अटकही झाली. मी कंपनीचा संस्थापक अध्यक्ष असल्याने अर्थात माझ्यावरही गुन्हा दाखल झाला. पुढे मी लेखिका जे के रोलिंग यांच्याशी संपर्क साधला, वस्तुस्थिती विषद केली आणि त्यंच्याच सांगण्यावरून प्रकाशकातर्फे गुन्हा मागेही घेण्यात आला. पण मी दोन्ही संचालकांचा (विनोदसह) राजीनामा घेतला आणि सारा स्टोक ९०% कमिशनने व्होलसेलमद्धे विकून टाकला आणि प्रकाशन संस्थाच बंद करून टाकली. यात काय नुकसान झाले, मनस्ताप झाला आणि एक अत्यंत वेगाने वाढणारी संस्था बंद करण्याचे दु:ख कसे सहावे लागले ते येथे महत्वाचे नाही. चुक झाली होती हे खरे होते आणि त्याची फळे भोगलीच पाहिजे होती आणि ती तशी भोगलीही आहेत.

बॅटमॅन Tue, 08/10/2013 - 19:12

In reply to by अजो१२३

पुष्प प्रकाशन लि. ही मराठीतीलच नव्हे तर भारतातील पहिली पब्लिक लिमिटेड कंपनी मी १९९२ साली स्थापन केली होती.

बाकीचीही अनेक वाक्ये विनोदी लिहिण्याबद्दल सदर गृहस्थांची ख्याती आहे, परंतु वरचे वाक्य स्पेशल विनोदी आहे.

अवकाश-ताण सिद्धांतासारखी रत्ने प्रसवणार्‍या त्यांच्या प्रज्ञेचे मोल युवरूप-आम्रविका खंडातल्या अज्ञ जनांना अजून कळलेले नाही हा बाकी दैवदुर्विलास असल्याचे नमूद करून तूर्तास आपली रजा घेतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/10/2013 - 19:26

In reply to by बॅटमॅन

अवकाश-ताण सिद्धांतासारखी रत्ने प्रसवणार्‍या त्यांच्या प्रज्ञेचे मोल युवरूप-आम्रविका खंडातल्या अज्ञ जनांना अजून कळलेले नाही हा बाकी दैवदुर्विलास असल्याचे नमूद करून तूर्तास आपली रजा घेतो.

हा 'अवकाश-ताण' वाचून माझ्या मेंदूला आलेला ताण कमी करण्यासाठी गेल्याच आठवड्यात फेसबुकीय लिखाण केलं होतं. ते इथे (अवांतर आहे हे माहित असूनही) डकवण्याचा मोह आवरत नाही याचा दोष बॅटमॅनचाच.

------

अवकाशताण: निरुपण आणि माहितीचे आदानप्रदान -- भाग १

सरांनी २००७ साली मराठीतून विश्वनिर्मितीचा सिद्धांत मांडला. मराठी भाषेवर एवढे थोर उपकार केल्याबद्दल विज्ञान नेहेमीच सरांचे ऋणी असेल. सरांच्या ब्लॉगवर हा सिद्धांत इंग्लिशमधे आहे; तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे. (कृपया माझ्या अशुद्धलेखनाला हसू नये.) सरांच्या सिद्धांताचं नाव आहे "अवकाशताण आणि विश्वनिर्मितीचा सिद्धांत"

पण त्यातले पहिले काही मुद्दे आपण विचारार्थ घेऊ:

सर प्रस्तावनेच्या पहिल्याच परिच्छेदात म्हणतात की विश्वाची निर्मिती झाली तीच गुरूत्वाकर्षण, पुंज क्षेत्र गुरूत्वाकर्षण (quantum field gravity), कृष्णविवरं, प्रकाशाचा वेग आणि बावचळून टाकणार्‍या इतर अनेक प्रश्नांची उत्तरं माणसाला मिळावीत म्हणून! (अर्थातच विश्वाची निर्मिती कोणी केली, या प्रश्नाचं उत्तर सर सरळ सांगून टाकत नाहीत. निश्चितच हा सरांचा विनय आहे.) तर या सिद्धांताचा सारांश आपण क्रमाक्रमाने पाहू या.

1. Unmodified, non-geometric primordial space is the only element that existed before creation of the Universe.
2. Being non Geometric and in the presence of absolute time the space was filled up with absolute negative energy.
3. The event moment is shift of absolute time to relative time begins the moment the negative energy has reached to the extreme.

१. अनाघ्रात, अभौमितीय मूलभूत अवकाश हे विश्वनिर्मितीच्या आधी निर्माण केलं गेलं होतं. (विश्वाची निर्मिती कोणी केली, हे न सांगणं हा सरांचा विनय आहे.) पण विश्वनिर्मितीच्या आधी अनाघ्रात, अभौमितीय मूलभूत अवकाश विश्वाच्याही आधी निर्माण झालं हे खुद्द सरांनी, थेट अथवा दुर्बिणीतून, पाहिल्याचं आपल्याला या पहिल्या मुद्द्यातून सुस्पष्ट होतं.

२. हे अवकाश अभौमितीय असल्यामुळे शिवाय तेव्हा निरपेक्ष काळ सुरू असल्यामुळे त्या अवकाशात उणे ऊर्जा भरलेली होती. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपल्यासारख्या सामान्य माणसांना युक्लीडीय आणि अयुक्लीडीय भूमिती माहित असते, पण जे काही असतं ते सगळं भूमितीमधलंच असतं. सरांनी अभौमितीय अवकाशाचाही अभ्यास केला आहे. माझी तर खात्रीच आहे की अभौमितीय अवकाशाचा सिद्धांतही सरांनी किंवा सरांच्या मार्गदर्शनाखालीच मांडला गेला आहे. इच्छुक अभ्यासकांनी सरांची भौतिकशास्त्राची पुस्तकं आणि ब्लॉग तपासावेत.

३. घटना क्षण हा निरपेक्ष काळ आणि सापेक्ष काळ यांच्यातला फरक आहे; ऋण ऊर्जा सर्वाधिक होते तेव्हा हा घटना क्षण सुरू होतो. सरांचा महास्फोटाच्या सिद्धांतावर विश्वास नाही. पण हे (क्षुल्लक, क्षुद्र) महास्फोट सिद्धांतवाले ज्याला काळ = ० असं म्हणतात, त्यालाच सर घटना क्षण असं म्हणतात. (शैवधर्मानुसार घटना क्षण हा साडेतीन मुहूर्तांपैकी उणे पहिला आहे.) अशा रितीने सर महास्फोटाचा सिद्धांत मोडीत काढतानाच नवा सिद्धांत अतिशय खमकेपणे रूजवत आहेत.

((सरांची थोरवी पटेपर्यंत) क्रमशः)

बॅटमॅन Tue, 08/10/2013 - 19:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती ताई, शैवधर्माच्या अनादी प्राक्रुत भाषेत केलेले विश्वरचनाशास्त्राचे वर्णन पुन्हा एकदा खुलवून सांगितल्याबद्दल आभारी आहे. सरांच्या या सिद्धांताच्या आधारे केंब्रिज आणि प्रिन्स्टन विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी त्यांचे सिद्धांत एकदम त्यागून तुमचाच सिद्धांत आजपासून योग्य असे सांगू अशी तयारी दर्शवली. नेचर नामक मासिकात माझा शोधनिबंध मराठीत प्रकाशित करण्याचीही तयारी दाखवली. आजपर्यंत अख्ख्या जगात असा सन्मान कुणाला मिळाला नव्हता. ही बाब "निच्छितच" अतिशय गौरवास्पद असूनसुद्धा ब्राह्मणी माध्यमान्नी त्याची मुद्दामच नेहमीच्या खवटपणे नजरेआड केली. हे लोकांच्या लक्षात पुन्हा एकदा आणून देण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे.

आबा Tue, 08/10/2013 - 20:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जबरदस्त,
सुन्न झालो वाचून
पाश्चात्य शास्त्रज्ञ ग्रीक पुराणांमधून वेगवेगळे मूलकण शोधत आहेत. आणि भारतिय शास्त्रज्ञ इकडच्या पुराणांमधून त्यांचं स्टॅटॅस्टिक्स शोधताहेत
असलं काहीतरी डोळ्या समोर आलं
नोबेल कमिटीने साली घाईच केली

च्यायला माणसाचा आवाका आहे का चेष्टा? कॉस्मोलॉजी पासून जातींच्या इतिहासापर्यंत सगळ्या विषयांवर लेखणी चालवलीय !

नितिन थत्ते Tue, 08/10/2013 - 21:39

In reply to by आबा

>>कॉस्मोलॉजी पासून जातींच्या इतिहासापर्यंत सगळ्या विषयांवर लेखणी चालवलीय !

मी मागे असे वाचले होते.... क्वांटम मेकॅनिक्स आणि रिलेटिव्हिटीची अजून सांगड घालता आलेली नाही. ती जेव्हा घातली जाईल तेव्हा विश्वातल्या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण करता येईल (Theory of everything).

अशी थिअरी (थिअरी ऑफ एव्हरीथिंग) सरांनी शोधलेली असल्यामुळे कॉस्मॉलॉजी पासून जातीच्या इतिहासापर्यंत सगळ्या विषयांचा आवाका सरांना असणारच ना?

बॅटमॅन Tue, 08/10/2013 - 21:44

In reply to by नितिन थत्ते

मार्मिक श्रेणी कमी पडावी असा प्रतिसाद. नितीनजी थत्तेजी, सरांच्या कार्याचे महत्त्व तुम्हाला कळल्याचे पाहून आनंद वाटला. या संकेतस्थळावरच्या लोकांना अजून सरांची पारख नाहीये, पण पाहू...काळानुरूप त्यांनाही नक्की कळेल.

(रोज रात्री सावकाश ताणून देणारा) बॅटमॅन.

अजो१२३ Wed, 09/10/2013 - 10:58

In reply to by बॅटमॅन

१. सोनवणींमधे आपली चूक वर्णण्याची आणि मान्य करण्याची क्षमता आहे. मला हे स्तुत्य वाटते. हरीपुत्राच्या प्रतिसादात त्यांच्या विधानांतील प्रांजळपणा मला तरी भावला.
२. मूळ बिग बँग थेरीचे विनोदमूल्य सोनवणींच्या थेरीपेक्षा अनंतपट आहे, विशेषतः in the light of world wide recognition it enjoys.
३. वाहिलेल्या निष्ठा नाहीत (मी केवळ त्यांच्या ब्लॉगांमधले तुरलक लेख वाचले आहेत) हे त्यांचे मूल्य मला विशेष आवडते.

मिहिर Wed, 09/10/2013 - 11:17

In reply to by अजो१२३

२. मूळ बिग बँग थेरीचे विनोदमूल्य सोनवणींच्या थेरीपेक्षा अनंतपट आहे, विशेषतः in the light of world wide recognition it enjoys.

हाहा! भलतेच विनोदी हो तुम्ही!

३. वाहिलेल्या निष्ठा नाहीत (मी केवळ त्यांच्या ब्लॉगांमधले तुरलक लेख वाचले आहेत) हे त्यांचे मूल्य मला विशेष आवडते.

त्यांचे ऐसीवरील लेख, प्रतिसादही वाचून बघा!

बॅटमॅन Wed, 09/10/2013 - 12:54

In reply to by अजो१२३

वाहिलेल्या निष्ठा नसोत (तेही पुरेसे खरे नाहीच), पण बेशिस्त लै आहे. सरसकटीकरण आहे, अन कधी याला तर कधी त्याला झोडप असे काहीसे आहे. तथाकथित "ब्राह्मणी" अन "बहुजनवादी" यांपेक्षा वेगळा एक वैचारिक "थर्ड फ्रंट" निर्माण करण्याचा लेखक प्रयत्न करीत असतो.

अन चूक मान्य वगैरे कधी धडपणी केली असे दिसत नाही. उलट आपल्याच चष्म्यातून जगाकडे बघण्याचा आग्रहदेखील असतो. पण इतके असले तरी किमान काही लेख तसे पूर्वग्रहविरहित आहेत असे वाटते खरे.

बाकी बिग बँग थेरीबद्दलची कमेंट कशाच्या आधारावर केलेली होती हे पहायला आवडेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/10/2013 - 19:09

In reply to by अजो१२३

२. मूळ बिग बँग थेरीचे विनोदमूल्य सोनवणींच्या थेरीपेक्षा अनंतपट आहे, विशेषतः in the light of world wide recognition it enjoys.

खुद्द जॉर्ज गॅमॉसुद्धा महास्फोटाचा सिद्धांत सद्यस्थितीत परिपूर्ण आहे असं म्हणणार नाही. पण सोनवणींना हा सिद्धांत (घंटा) काही समजलेला नाही. त्यांचीच काही मुक्ताफळं:

1. The Big Bang theory considers space being abundantly available to consume rapid expansion of the universe.
2. It is conceived that the space has no role of itself in the creation of the universe.
3. Space-Time factors are considered to be together having no separate entity and qualities. This is why General Theory of Relativity holds no water in the case of Quantum Mechanics.
4. As Space is coupled with Time by the Theory in itself is a mistake as relative Time will be independent in case of every cluster, object or galaxy.
5. It is accepted in the big band theory that space can be stretched…they have given an example of a rubbery net upon which if a ball is placed and the net is stretched the distance grows though the ball is in same place. However the idea in itself unscientific as space cannot be stretched. Same time idea of balloon too is baseless.

जो सिद्धांत खोडून काढायचा त्यातलं एक अक्षर सोनवणींना समजलेलं नाहीये हे पहिल्याच वाक्यातून स्पष्ट दिसतंय. महास्फोटाच्या सिद्धांतानुसार, अवकाश विश्वप्रसरणातून निर्माण झालं. आहे त्या अवकाशात विश्वाचं प्रसरण झालं, असं स्वत:च मानून, स्वत:च त्यावर आक्षेप घेणं याला स्कीझोफ्रेनिया म्हणायचं का खोटारडेपणाचा कहर का अडाणीपणातून आलेला आत्मविश्वास?

नीरा Tue, 08/10/2013 - 19:27

विकास शुक्लना इंग्रजी येत नाही असं सोनावणींनी लिहिलंय - मग भाषांतर कसं काय केलं?
एकूणच सोनावणींची टिप्पणी महान विनोदी आहे

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/10/2013 - 19:35

In reply to by नीरा

त्यांना बहुदा, त्यांचे बंधू विनोद यांना इंग्लिश येत नाही, असं म्हणायचं आहे.

तरीही टिप्पणीचं विनोदमूल्य कमी होत नाही, हे झालंच.

अक्षय पूर्णपात्रे Wed, 09/10/2013 - 19:20

प्रकाशक, लेखक वर्गात कॉपीराइटविषयी असलेली उदासिनता लेखातून समजली. तसेच काही प्रख्यात लेखक-प्रकाशकांचा भामटेपणाही. संदीप खर्‍यांनी कोलटकरांची कविता नामोल्लेख न करता त्यांच्या सदरात वापरणे यात मूर्खपणा अधिक आणि दांभिकपणा कमी वाटतो.

हा प्रश्न प्रकाशन-लेखन याबाबतच मर्यादीत आहे असे नाही. आपल्या समाजात बौद्धिक मालमत्तेविषयी उदासिनता हा व्यापक मुद्दा आहे. सॉफ्टवेअर, चित्रपट, संगीत, शोधनिबंध, औषधे सगळीकडेच अशा चोर्‍यांचा सुळसूळाट आहे. उदा. या संकेतस्थळावरच 'चित्रपट डाउनलोडवून पाहिला' वगैरे प्रतिसाद सहजच सापडतील.

प्रदीप Fri, 11/10/2013 - 11:11

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

उदा. या संकेतस्थळावरच 'चित्रपट डाउनलोडवून पाहिला' वगैरे प्रतिसाद सहजच सापडतील.

हॅ, हॅ... पण 'दुसर्‍यास एक न्याय, आमच्यासाठी मात्र वेगळा' हा तर मध्यमवर्गीयांचा स्थायीभाव आहे, साहेब!

चिंतातुर जंतू Fri, 11/10/2013 - 13:41

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

>> संदीप खर्‍यांनी कोलटकरांची कविता नामोल्लेख न करता त्यांच्या सदरात वापरणे यात मूर्खपणा अधिक आणि दांभिकपणा कमी वाटतो.

किंचित दुरुस्ती : खऱ्यांनी कविता कोलटकरांच्या आणि कवितासंग्रहाच्या नावानिशीच वापरली होती. त्यांनी 'सकाळ'च्या रविवारच्या 'सप्तरंग' पुरवणीत इतरांच्या त्यांना भावलेल्या कवितांविषयी एक सदर चालवलं होतं. उदा : हे किंवा हे पाहा. पण अशी कविता उद्धृत करण्याआधी परवानगी घेणं कायद्यानं अपेक्षित असतं. ते 'सकाळ'नं केलं नाही. त्यावर प्रकरण न्यायालयात गेलं असता सुनावणीला हजर राहून स्वत:ची बाजू मांडण्याचीही तसदी 'सकाळ'नं घेतली नाही अशी बातमी होती.

चायवाला Mon, 23/12/2013 - 16:13

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

कायद्याचे पालन केले गेलेच पाहीजे. पण अरुण कोल्हटकर कोण हे या खटल्याच्या निमित्ताने अनेकांना समजले. त्याबद्दल तरी सकाळ व खरेंचे अभिनंदन ;)

पुष्कर जोशी Thu, 10/10/2013 - 11:48

अशोक शहाणे या माणसाची कवी , कविता , हक्क आणि अस्मिता या बद्द्लची तळमळ थोर आहेच.
जे झालं त्याची गरज होतीच. पण सहज एक हलकट प्रश्न मनात आला.
"माझी वही भिजो शाई फ़ुटो ही अक्षरं विरघळोत माझ्या कवितांचा लगदा होवो या नदीकाठचं गवत गवत खाणारया म्हशींच्या दुधात माझ्या कवितांचा अंश सापडो." याचा आणि गेल्या २ दिवसातल्या प्रताधिकार प्रकरणाचा एकत्र अर्थ कसा लावायचा ?

मेघना भुस्कुटे Sat, 12/10/2013 - 19:47

झाल्या प्रकरणात ’सकाळ’ची चूक होती हे सरळच आहे. झालं ते ठीकच झालं. माजोरडी माध्यमं आणि कलाकाराचे हक्क यांतला तो प्रतीकात्मक झगडा होता, त्याचा निकाल कोलटकरांच्या बाजूनं लागणं सर्वार्थानं उचित आहे.

पण या निमित्तानं ’पाहा, पाहा, आपल्या नीतिमत्तेचा अध:पात पाहा.. सरळ टॉरेण्टवरून सिनेमे ढापता? नि तरी ’सकाळ’ला हसता? थू: तुमच्या जिंदगानीवर. चोर साले...’ चा जो काही गदारोळ उठला आहे, तो गंमतीशीर आहे. सिनेमा काय किंवा पुस्तक काय किंवा गाणं काय - या गोष्टींच्या निर्मितीचा खर्च - कलाकाराच्या मानधनासकट, दलालांना मिळणारे पैसे, कलाकृतीचा दर्जा आणि मला मोजावे लागणारे पैसे हे समीकरण शंभरातल्या नव्वद वेळा माझ्यावर सरळसरळ अन्याय करणारं असतं. (कलाकारांना नक्की किती पैसे मिळाले असता ते न्याय्य असेल, या गहन आणि चिरकालीन वादात तर पडायलाच नको.) नि जालावर मात्र हे सगळं सहजगत्या, चुटकीसरशी उपलब्ध असतं. तरी यातल्या न्यायान्यायाचा हिशेब न करता, कायदा असं असं सांगतो असं आंधळेपणानं मानून मी पदोपदी फुकट मिळणार्‍या गोष्टींचा मोह टाळून माझ्याच खिशाला कात्री लावायची? अजब आहे राव. (नि 'आमच्यावर अन्याय होतोय' असा गळा काढून आमीर खानसारखे कोट्यवधी रुपये मानधन मोजून घेणारे लोक मोर्चा काढणार, हे तर निव्वळ विनोदी आहे.) त्याहून हे जालावर उपलब्ध होण्याआधीच निर्मितीत सहभागी असणार्‍या प्रत्येकला योग्य ते मानधन देता येईल, अशी काही व्यवस्था तयार करा की. म्हणजे मग पुढचं नुकसान वा फायदा निव्वळ मधल्या विक्रेत्यांचा / दलालांचा असेल, कलाकारांवर अन्याय होणार नाही आणि सगळ्यांनाच गोष्टी रास्त किंमतीत उपलब्ध होतील.

रास्त किंमतीत मिळणार्‍या गोष्टी अशा फुकटच्या फाकट ढापण्याकडे लोकांची प्रवृत्ती सहसा नसते - निदान बहुतांश लोकांची तरी नसते.

मराठीत इ-बुक्स सहजी नि मोठ्या प्रमाणावर मिळायला लागली की (नि लागली तर) हे वाद पुन्हा नव्यानं होणारच आहेत. तेव्हा कागदी पुस्तकांच्या निर्मितीचा खर्च आणि इ-बुकाच्या निर्मितीचा खर्च यांत तुलना करून, ती जाहीर करून प्रकाशक इ-बुकांची किंमत कमी ठेवणार आहेत का? तर मी पायरेटेड पुस्तकं वाचणं टाळीन. नाहीतर मी पापी आहे? आहे. ठीक.

हा या विषयावरचा एक रोचक लेख.

मिलिंद Sat, 12/10/2013 - 20:36

In reply to by मेघना भुस्कुटे

लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. ह्या विषयाकडे साकल्याने व शांत डोक्याने पाहणार्‍या कोणाच्याही मनात येतील ते विचार ब्लॉगलेखकाने व्यवस्थित मांडले आहेत. 'सकाळ' प्रकरणासारखे काही समोर आले की गुंतागुंतीच्या प्रताधिकार विषयावर टोकाची भूमिका घेऊन अभिनिवेषाने बोलताना आपण ग्रे एरिया विसरून किंवा तिच्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करून ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट, चोर/साव करू लागतो. त्या वेळी ब्लॉगलेखक म्हणतात त्याप्रमाणे आपण स्वतः यूट्यूबवर काय काय पाहिलेले असते, किती एमपी३ उतरवल्या आहेत, ईबुके उतरून घेतली आहेत हे विसरतोच, “He that is without sin among you, let him first cast a stone,,, ” विसरतोच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आज प्रताधिकार कायदा ज्या स्वरूपात आहे त्यात त्याचे पूर्णपणे पालन करणे अव्यवहार्य, किंबहुना अशक्य आहे, ह्याकडे कानाडोळा करतो. जालीय तंत्रज्ञानाचा जिन पुन्हा बाटलीबंद करणे कोणालाच शक्य नाही, आणि मानवी स्वभाव बदलणेही शक्य नाही. तेव्हा पायरसी होत राहणार. कायद्यात बदल करणे, व चित्रपट कंपन्या, संगीत कंपन्या, ईप्रकाशक इत्यादींनी कधीही जिंकता न येणारी लढाई लढणे सोडून आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल करणे हाच ह्यावर उपाय आहे.

नितिन थत्ते Sun, 13/10/2013 - 22:19

In reply to by मेघना भुस्कुटे

मुळीच पटलं नाही.

ते करतात तो गुन्हा आणि मी करतो तो नाइलाज असे आर्ग्युमेंट कधीच रास्त नसते.

>>म्हणजे मग पुढचं नुकसान वा फायदा निव्वळ मधल्या विक्रेत्यांचा / दलालांचा असेल, कलाकारांवर अन्याय होणार नाही आणि सगळ्यांनाच गोष्टी रास्त किंमतीत उपलब्ध होतील.

त्यांचं तरी नुकसान का व्हावं? दलाल आणि विक्रेत्यांवर अन्याय झालेला चालेल असा विचार का आहे?

>>रास्त किंमतीत मिळणार्‍या गोष्टी अशा फुकटच्या फाकट ढापण्याकडे लोकांची प्रवृत्ती सहसा नसते - निदान बहुतांश लोकांची तरी नसते.

असं निरीक्षण नाही. उलट बहुतांश लोकांची प्रवृत्ती अशी असते असं म्हणायला हवं.

>>नि 'आमच्यावर अन्याय होतोय' असा गळा काढून आमीर खानसारखे कोट्यवधी रुपये मानधन मोजून घेणारे लोक मोर्चा काढणार, हे तर निव्वळ विनोदी आहे.

आनिरखान स्वतःच्या मानधनासाठीच मोर्चा काढत असेल असे नाही. आजसुद्धा आमिरखानला त्याचे मानधन मिळालेलेच असते. नुकसान वितरकांचे होत असते. सिनेमा या कलाव्यवहारातील संपूर्ण साखळीच्या वतीने मोर्चा असू शकतो. [त्यात साखळी नष्ट झाली तर त्याचे स्वतःचे नुकसान होईल हा विचार असणारच].

शेवटचं मटेरिअल कॉस्टप्रमाणे किंमत ठरवायची झाली तर किशोर कुमार आणि नितिन थत्ते यांची गाण्याची कॅसेट समान किंमतीला विकावी लागेल. किशोरकुमार जेवढे खायचा तेवढे नितिन थत्ते पण खातो. कोर्‍या कॅसेटची किंमत आणि रेकॉर्डिंगचा खर्च दोघांना सारखाच येणार (कदाचित किशोरकुमारच्या कॅसेटला कमीच खर्च येईल कारण त्याचे गाणे एका टेकमध्ये ओके होईल नितिन थत्तेला कदाचित चार टेक घ्यावे लागतील).

[आता नाही आणखी संपादन करणार]. ;)

ऋषिकेश Mon, 14/10/2013 - 13:07

In reply to by नितिन थत्ते

समजा आम्ही डाऊनलोडवून चित्रपट पाहत असु तर ते योग्य आहे कायदेशीर आहे असे नाही, पण आम्ही असे करतो म्हणून एखाद्याने तसे करणे (इथे सकाळने) योग्य ठरण्याचा तर्क असु शकत नाही. आमची कृती ही योग्यायोग्यतेचा मानदंड होऊ शकत नाही. त्यासाठी घटनात्मक कायदाच अंतीम आहे.

वर मिलिंद म्हणतात तसे कायदा बदलणे - कालानुरुप करणे हा योग्य मार्ग असेल - आहे, पण तोपर्यंत सकाळच्या वर्तणूकीचे समर्थन करण्यासाठी डाऊनलोड करून बघण्यात येणार्‍या चित्रपटांच्या वापरलेल्या कुबड्या कचकड्याच्या आहेत इतकेच मेघना यांना म्हणायचे असावे.

ॲमी Mon, 14/10/2013 - 17:44

In reply to by नितिन थत्ते

मी सहमत आहे मेघनाशी. काय रेड्डी, बॉडीगार्ड, चेन्नई एक्सप्रेस सारखे चित्रपट ५००रु च तिकीट काढुन बघा म्हणता काय??? ऑ??? फुकटात बघतोय म्हणुन कमी शिव्या घालतोय ते पुरेस नाही का ;-)

ॲमी Mon, 14/10/2013 - 18:55

In reply to by अनामिक

याला नाइलाज वगैर मीतरी म्हणत नाही. असल्या चित्रपटांचा तिकीटखरेदी प्रेक्षक मी नसणारच होते. सध्या माझ्याकडे वेळ आहे आणि युट्युबवर सहज दिसला चित्रपट म्हणुन पाहीला. तर यात निर्माता डिस्ट्रिब्युटरच नक्की काय नुकसान झालं?
मी एक पुस्तक विकत घेतलं आणि माझ्या १०० मित्रांनी ते माझ्याकडुन घेउन वाचलं तर चालत. पण त्याऐवजी नेटवर पिडीएफ चढवल्याने १००० जणांनी वाचल त्याने मात्र कॉपीराइट भंग होतो...एकंदरच कंफ्युजन आहे यासगळ्यात.

नितिन थत्ते Mon, 14/10/2013 - 21:08

In reply to by ॲमी

>>युट्युबवर सहज दिसला चित्रपट म्हणुन पाहीला

यूट्यूब "कॉपीराइट असलेले मटेरिअल अपलोड करू नये" अशी ताकीद देत असते. त्यामुळे यूट्यूबवरसुद्धा कॉपीराइट असलेले मटेरिअल पाहणे योग्य नाही हे उघडच आहे.

दुसर्‍याने चोरी केलेल्या मालातील सांडलेला माल उचलणे हाही गुन्हाच* आहे.

*कायद्याने गुन्हा असला नसला तरी मॉरली गुन्हाच आहे.

>>असल्या चित्रपटांचा तिकीटखरेदी प्रेक्षक मी नसणारच होते.

(बेकायदेशीरपणे) डाउन लोडवून फक्त "असलाच" चित्रपट पाहिला जातो का?

(डिसक्लेमरः सकाळने जे काही केले त्याचे समर्थन करणे हा हेतू नाही. पण ज्याने पाप केले आहे त्याने दगड मारायला अग्रस्थानी राहू नये असे म्हणणे आहे].

ॲमी Mon, 14/10/2013 - 22:17

In reply to by नितिन थत्ते

हो कॉपीराइटभंग क्लेमनंतर गायब होतात विडीओ युट्युबवरुन.

दुसर्याने चोरी केलेल्या मालातील सांडलेला माल उचलणे हाही गुन्हाच* आहे. *कायद्याने गुन्हा असला नसला तरी मॉरली गुन्हाच आहे. >> याबाबतीत मी थोडी कंफ्युज्ड आहे. भारतात पॉर्नला जो कायदा आहे, 'कंझंप्शन इज नॉट क्राइम' तोच इथे लावावा असं वाटतय.

(बेकायदेशीरपणे) डाउन लोडवून फक्त "असलाच" चित्रपट पाहिला जातो का? >> जंतु सांगतात तसले इराणी चित्रपट पण असतात युट्युबवर, पण ते काही आपल्याला झेपत नाहीत :-( म्हणुन हे पाहतो.

(डिसक्लेमरः सकाळने जे काही केले त्याचे समर्थन करणे हा हेतू नाही. पण ज्याने पाप केले आहे त्याने दगड मारायला अग्रस्थानी राहू नये असे म्हणणे आहे). >> सकाळ खरे शाहणे एपिसोड बद्दलदेखील मी कंफ्युज्डच आहे.

अनामिक म्हणतायत केबलवर पहा. चित्रपट प्रदर्शित व्हायचा आधीच केबल राइट्स विकले गेलेले असतात. म्हणजे निर्मात्याला पैसे मिळालेत. चेनलला रिवेन्यु जाहिरातीतून मिळतो. आता एका टिवीसमोर १डोक आहे की १० यांनी कोणाला नक्की काय फरक पडणार आहे? जाहिरात आली की चेनल बदलल जातं. मग त्यांनी विकत घेतलेल्या प्राइम टाइमचा उपयोग काय? एकंदरच सब कंफ्युजन हय.

अनामिक Tue, 15/10/2013 - 15:13

In reply to by ॲमी

अनामिक म्हणतायत केबलवर पहा. चित्रपट प्रदर्शित व्हायचा आधीच केबल राइट्स विकले गेलेले असतात. म्हणजे निर्मात्याला पैसे मिळालेत. चेनलला रिवेन्यु जाहिरातीतून मिळतो. आता एका टिवीसमोर १डोक आहे की १० यांनी कोणाला नक्की काय फरक पडणार आहे?

प्रश्न कोणाला काय फरक पडणार हा नाही आहे. कायदेशीर बघता की नाही हा आहे.

मंदार कात्रे Sat, 21/12/2013 - 19:13

In reply to by ॲमी

मी एक पुस्तक विकत घेतलं आणि माझ्या १०० मित्रांनी ते माझ्याकडुन घेउन वाचलं तर चालत. पण त्याऐवजी नेटवर पिडीएफ चढवल्याने १००० जणांनी वाचल त्याने मात्र कॉपीराइट भंग होतो...

+ १००

नितिन थत्ते Sat, 21/12/2013 - 19:55

In reply to by मंदार कात्रे

माझी समजूत बरोबर असेल तर तुमच्याकडून १०० जणांनी फुकट घेऊन वाचले (पक्षी तुम्ही त्यातून काही पैसे मिळवले नाहीत) तर त्यात कॉपीराइट भंग होत नाही. [वाचनालयाच्या बाबतीत काय होते ते ठाऊक नाही].

समजा तुम्ही तुमच्या उपहारगृहात चित्रपट संगीत ऐकवता. त्याबद्दल तुमच्या ग्राहकांकडून अधिक पैसे घेत नाहीत तर कॉपीराइट भंग होत नाही. पण समजा तुमच्या उपहारगृहात दोन दालने आहेत. एका दालनात तुम्ही गाणी ऐकवता आणि त्या दालनाचे (दुसर्‍या दालनापेक्षा) दर जास्त आहेत तर कॉपीराइट भंग होतो असे वाटते.

अनामिक Mon, 14/10/2013 - 17:40

In reply to by ऋषिकेश

वर मिलिंद म्हणतात तसे कायदा बदलणे - कालानुरुप करणे हा योग्य मार्ग असेल - आहे, पण तोपर्यंत सकाळच्या वर्तणूकीचे समर्थन करण्यासाठी डाऊनलोड करून बघण्यात येणार्‍या चित्रपटांच्या वापरलेल्या कुबड्या कचकड्याच्या आहेत इतकेच मेघना यांना म्हणायचे असावे.

मान्य. पण डाऊनलोडवून चित्रपट बघताना आमचा नाईलाज आहे अशी भालवणही न केलेली बरी! आम्ही करतो ते पण चूकच, आणि त्यासाठीही कायदा आमलात आणावा असे का सांगू नये? घेतो आमीर खान करोडो रूपये, पण त्याला ते देणारे आहेत म्हणून! तो आपल्या दारात येऊन त्यांची कलाकृती बघायचा आग्रह करत नाही; मग त्याच्या कायदेशीररित्या कलाकृती बघा ह्या निवेदनाला विनोदी म्हणण्यात याव यापेक्षा विनोदी ते काय?

अनुप ढेरे Mon, 14/10/2013 - 13:04

ग्रे एरीआ वगैरे विशेषणं स्वतःच्या चुका रॅशनलाइझ करण्यासाठी आहेत. टोरेंटवरचे सिनेमे किंवा प्रताधिकारीत एम्पीथ्री हे काही कोणी डोळ्यासमोर नाचवत नसते. आपल्याला सस्त्यात मजा पाहिजे असते म्हणून आपण फुकट गाणी/सिनेमे जालावर शोधतो. एखादा कायदा तोडणं सोपं आहे म्हणून तो तोडणं समर्थनीय आहे असं नाही.

चिंतातुर जंतू Mon, 14/10/2013 - 15:38

काल टी.व्ही.वर 'भाग मिल्खा भाग' लागला होता. त्यातल्या एका प्रसंगात रेडिओवरचं स्टेशन बदलता बदलता मध्येच लागलेल्या स्टेशनवर एका गाण्याची एक ओळ ऐकू येते ('आ जा सनम मधुर चाँदनी में हम'). नायक-नायिकेच्या प्रियाराधनाच्या प्रसंगात नायकाच्या तोंडी एका गाण्याच्या ओळी येतात ('नन्हा मुन्हा राही हॅंू, देश का सिपाही हॅंू'). चित्रपटाच्या अ़़खेरीला आलेल्या श्रेयनामावलीमध्ये दोन्ही गाण्यांच्या वापरासाठी 'सारेगम इंडिया'ची परवानगी घेतल्याचा उल्लेख होता. व्यावसायिक हिंदी सिनेमा अशा बाबतींत व्यावसायिकपणेच वागतो असं दिसतं. त्यामुळे 'सकाळ'चं वर्तन म्हणजे 'मराठी व्यावसायिकांची अव्यावसायिक पद्धतीनं व्यवसाय करण्याची सवय' म्हणता येईल का? म्हणजे एखाद्या शहाण्यानं नेटानं पिच्छा पुरवला तरच काही दाद मिळेल, अन्यथा आम्ही आमचे राजे, आणि आम्ही ठरवू ते नियम, असं?

अक्षय पूर्णपात्रे Mon, 14/10/2013 - 20:06

आधीचा प्रतिसाद देतांना श्री खरे यांनी नेमका कसा प्रताधिकाराचा भंग केला हे लेखातील भावनाकल्लोळात ध्यानी आले नव्हते. संकेतस्थळांवर नावानिशी उल्लेख करून पूर्ण कविता देऊन तिचे रसग्रहण करणे, ब्लॉगावर ब्लॉगमालकास चांगल्या वाटणार्‍या कवितांचे संकलन हे अनेकदा मराठी आंजावर पाहीले आहे पण क्वचितच मूळ कवी/प्रकाशकाच्या पूर्वसंमतीचा उल्लेख पाहण्यात आहे. तेव्हा श्री खरे यांच्या निष्काळजीपणाचे अजिबातच आश्चर्य वाटले नाही.

बर्‍याच प्रसंगी बौद्धिक मालमत्तेचा युक्तिवाद/कायदा वापरून भांडवलदार संशोधनाची गळचेपी करतात, अव्वाच्यासव्वा किंमती ग्राहकांवर लादतात या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. सरसकटपणे बौद्धिक मालमत्तेला नेहमीच गोंजारत बसावे असे प्रतिसादातून सूचवायचे नव्हते. वर काही प्रतिसादांतून ज्या प्रकारचे युक्तिवाद वापरले जात आहेत ते अशा व्यापक शोषणाच्या विरोधात नसावेत. आम्ही व्यक्तिगत जीवनात नैतिक शुचिता पाळतो आणि चित्रपट वगैरेही पैसे न देता पाहतो, त्यात अनैतिक असे काही नसून निव्वळ सोयीचा मामला आहे वगैरे वगैरेंचा प्रतिवाद करण्यासारखे काही वाटत नाही.

नितिन थत्ते Mon, 14/10/2013 - 21:10

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

मला वाटते कायद्याने मीठ बनवायला बंदी असेल तर मीठ बनवून कायदा मोडता येतो. पण कायदा मोडला असे सांगून लाठी खाण्याची/तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी लागते. मीठ बनवणे हा माझा नाइलाज होता आणि 'त्यात गुन्हा घडलाच नाही'* असा युक्तिवाद करता येत नाही.

*[तुमचे कायदे मी मानत नाही म्हणजे मी कायदा मोडला नाही असाही युक्तिवाद करता येईल. पण मग त्यासाठी हे 'कायद्याचे राज्य 'तुमचे' आहे माझे नाही असे समजावे लागते आणि "माझे राज्य" आणण्यासाठी लढण्याचीही जबाबदारी घ्यावी लागते].

चौकात पोलीस दिसत नाही (पक्षी पकडले जाऊन शिक्षा होण्याची शक्यता नाही) असे पाहून कायदा मोडण्यात काही मर्दुमकी नाही आणि तसे करण्याने कायदा अन्याय्य आहे अशी मांडणी होण्यासही त्याचा काही उपयोग होत नाही.

अक्षय पूर्णपात्रे Mon, 14/10/2013 - 22:19

In reply to by नितिन थत्ते

'कन्फ्युजन वाढले' असे शीर्षक पाहून मी गोंधळात पडलो आहे. म्हणून कुठे गोंधळ आहे? याचा अंदाज बांधून खालचा खुलासा करत आहे. श्री खरे आणि सकाळ यांना चपराक बसली हे योग्यच झाले. पण श्री खरे यांचे वर्तन निष्काळजी/मूर्खपणाचे आहे, दांभिकपणाचे नाही. सिनेमा वगैरे चोरीने पाहण्यासाठीचे युक्तिवाद बाळबोध वाटल्याने प्रतिवाद करावेसे वाटले नाही.

नितिन थत्ते Tue, 15/10/2013 - 08:42

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

माय बॅड.....

त्यात अनैतिक असे काही नसून निव्वळ सोयीचा मामला आहे वगैरे वगैरेंचा प्रतिवाद करण्यासारखे काही वाटत नाही.

हे वाचल्यावर तुम्ही आधीच्या प्रतिसादाच्या उलट प्रतिसाद देत आहात असा ग्रह झाला. त्यातल्या "वगैरे वगैरे" या शब्दाकडे नीट लक्ष न गेल्याने असे झाले. तुम्हीच चित्रपट डाउनलोडवण्याचा प्वाइंट काढला आणि आता त्यात अनैतिक काही नाही असे म्हणत आहात असे वाटून कन्फ्यूजन वाढले असा प्रतिसाद दिला.

पण तुम्ही कन्सिस्टंट आहात असे जाणवले. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/10/2013 - 21:48

मला काही वर्षांपूर्वी कोलटकरांच्या कवितांचे संग्रह विकत घ्यायचे होते, दुकानात काही मिळाले, काही मिळाले नाहीत.

नंतर अमेरिकेतल्या एका स्थानिक विद्यापीठातल्या ग्रंथालयात, विकत न मिळालेल्या एका कवितासंग्रहाची प्रत असल्याचं इन्व्हेंटरीत दिसलं. ती प्रत घेऊन तर एका मित्रासाठी या संग्रहाची अनधिकृत प्रत (फोटोकॉपी/स्कॅनिंग करून) बनवण्याचा माझा विचार होता. न पेक्षा हे ही बरं असा विचार तेव्हा केला होता. पकडलं जाण्याची भीती नगण्यच. प्रत्यक्षात ती प्रत कोणीतरी आधीच लंपास करून मला या 'पातका'तून सोडवलं. संग्रहाचं नाव (बहुदा) 'भिजकी वही'.

---

गेले काही महिने, कदाचित दीडेक वर्ष मी आठवड्याला (किमान सरासरी) दीड एवढे चित्रपट पाहिले आहेत. या प्रती संपूर्ण कायदेशीर आहेत. दोन उपायांनी सिनेमे मिळतात. १. नेटफ्लिक्स या कंपनीला पैसे देते, बदल्यात सिनेमे पहाते. मासिक वर्गणी साधारण हॉटेलात दीड लंचच्या किंमतीएवढी - मध्यमवर्गीयांना सहज परवडेल अशी. २. स्थानिक ग्रंथालयात रहाण्याच्या जागेचा पत्ता पुरावा म्हणून दाखवला, पैसे भरले नाहीत, ना काही काम त्यांच्यासाठी केलं. पण तिथून चित्रपट आणि पुस्तकं मिळतात. या दोन्ही स्रोतांमधून जे चित्रपट पाहिले ते भारतात सहजी उपलब्ध नाहीत; उपलब्ध असतील तर किंमती, मी भरते त्यापेक्षा फारच जास्त. चित्रपटांची यादी मिळते, पण चित्रपट मिळत नाही, किंवा अवाच्या सवा किंमत द्यावी लागते अशी व्यवस्था असेल तर चोरी हाच राजमार्ग समजला जाणार. (एकेकाळी सोन्याची तस्करी होत असे; आता नियम शिथील केले, तस्करी कमी झाली, करांमधून मिळणारं उत्पन्न वाढलं.)

लोकांना परवडेल/योग्य वाटेल अशा किमतीपेक्षा फार जास्त किंमतीला, सहज चोरी होऊ शकणारा माल विकण्याचे दुष्परिणाम?

चिंतातुर जंतू Mon, 14/10/2013 - 22:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> संग्रहाचं नाव (बहुदा) 'भिजकी वही'.

'आमची कोठेही शाखा नाही'च्या मराठी बाण्याशी तुमची ओळख झालेली दिसत नाही; अज्ञानात सुख असतं; यू आर नोन बाय द कंपनी यू कीप, वगैरे.
एखाद्या उच्चभ्रू अभिजाततावाद्याला (पक्षी : माझ्यासारख्याला) विचारलं असतं तर पुस्तक सहज मिळालं असतं. पण तुम्ही पडलात पक्क्या भांडवलशाहीच्या, पक्षी : 'सरकार बंद पडलं तरी माझ्या घराचा नळ आणि नेटफ्लिक्सचा नळ वाहता राहो' ह्या जीवनदृष्टीच्या पाईक. देव (आणि कोलटकरसुद्धा) वरून सगळं पाहत असतो बरं.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/10/2013 - 22:23

In reply to by चिंतातुर जंतू

मग आमचे कोणी मित्रमंडळ भारतातून अमेरिकेत येणार असेल तर कॉपीराईटचा भंग न करता, मैत्रीखात्यात ते पुस्तक मला द्या. मी यथेच्छ कायदेभंग करून ती प्रत परत पाठवेन. पुन्हा आपल्याकडे प्रत असण्याबद्दल कूल पॉईंट्स मिळवा. किंबहुना, तुम्हाला कूल पॉईंट्स मिळावेत म्हणूनच हा संग्रह दुकानात मिळत नाही, अशी शंका आता येते आहे.

चिंतातुर जंतू Tue, 15/10/2013 - 13:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मी यथेच्छ कायदेभंग करून ती प्रत परत पाठवेन. पुन्हा आपल्याकडे प्रत असण्याबद्दल कूल पॉईंट्स मिळवा. किंबहुना, तुम्हाला कूल पॉईंट्स मिळावेत म्हणूनच हा संग्रह दुकानात मिळत नाही, अशी शंका आता येते आहे.

आमच्याकडे कूल पॉइंट्स इतके आहेत की एक वेळ नवी कोरी प्रत तुम्हाला विकत घेऊन देऊ (किंमत अर्थात तुमच्याकडून वसूल करू), आणि कायदेभंगापासून तुमचा बचाव करू. पण आमची प्रत वाहत्या नळात हात धुणाऱ्या भांडवलशहांकडे? कदापि नाही...

मी Mon, 14/10/2013 - 22:00

पायरेटेड सॉफ्टवेअर संकल्पनेत एक कथा(दंत)अशी आहे - उत्पादक कंपन्या पायरेटेड सॉफ्टवेअर इन्डिविज्युअल युजरला उपलब्ध असेल अशी काळजी घेतात. हा मार्केटिंगचा एक प्रकार आहे, इतर प्रतिभासंबंधीत क्षेत्रांबद्दल तसेच बोलता येईल असे नाही, तरीपण एका नवकविला जाहिरातीची गरज असणारच नाही का?

बेफिकीर Tue, 15/10/2013 - 18:55

हा लेख वाचून मला काही नवीन गोष्टी समजल्या.

१. कोलटकर गांडू होता.
२. संदीप खरेला कवितेतला 'क'ही कळत नाही.
३. काही बायका ब्रेसियर (हा शब्द) वगळतात.
४. बायकांशीही लाडीकपणे बोलणार्‍या बायका असतात.
५. इस्मत चुगताईंचा नातू बारा बारा वर्षे भेटत नाही.

असो!

आधी मराठीतील कविता दिव्य, त्यात कवीला लाभलेल्या सूक्ष्म वलयानेही त्याचे स्वतःला व्यास मानायला लागणे दिव्य, त्याची कविता तिसर्‍यानेच चौथ्याच वर्तमानपत्रात छापवून आणणे दिव्य आणि त्यावरून वाद पेटून न्यायालयाने निकाल देणे अधिकच दिव्य!

हा सगळा कोणीतरी उभारलेला स्टंट तर नव्हे? मी तर म्हणतो की कवी आणि लेखकांनी फुकटात लेखन छापणार्‍यांचे आभार मानावेत.

ही सगळी तडजोड आहे. कोलटकर आज वाचणार कोण, ह्यामुळे सकाळने त्यांची कविता छापणे हे त्यांचे भाग्य आणि ती छापली नाही तर सकाळ चापणार काय म्हणून सकाळला ती छापायचे सुचले हे सकाळचे भाग्य!

-'बेफिकीर'!

मेघना भुस्कुटे Mon, 21/10/2013 - 14:50

पुन्हा एकदा: बैल गेला झोपा केला इत्यादि. असो. वर फारच उलटसुलट प्रतिसाद आहेत आणि ते गोंधळवणारे आहेत.
जोवर कायदेभंगाकरता तुरुंगात जाण्याची तयारी नाही, तोवर 'होय, मी मोडला कायदा' या बाणेदारपणाला काहीच अर्थ नाही, हे मला मान्य आहे. त्यामुळे जालावरून गोष्टी उतरवून पाहण्याचं / ऐकण्याचं माझं समर्थन तोकडंच. पण दोनदोनदा पत्र पाठवूनही, त्या पत्राला / हरकतीला केराची टोपली दाखवणारं 'सकाळ' आणि जालावरच्या महापुरात अपराधी भावनेसह हातपाय ओले करून घेणारा सर्वसामान्य माणूस या दोहांच्या लुच्चेगिरीला एकाच तागडीत तोलायला मन घेत नाही.
कदाचित मी फारच पक्षपाती असेन. ;-)

बॅटमॅन Mon, 21/10/2013 - 14:52

In reply to by मेघना भुस्कुटे

कदाचित मी फारच पक्षपाती असेन. (डोळा मारत)

मान गये! आप का पक्षपाती स्वभाव और सत्यवचनी अ‍ॅटिट्यूड, दोनों को ;)

विसुनाना Mon, 21/10/2013 - 15:19

एक शंका : चित्रपटाचे परीक्षण लिहिताना त्याचे कथानक (लेखक आणि निर्मात्याची पूर्वपरवानगी न घेता) लिहिले तर तो कॉपीराईट कायद्याचा भंग ठरू शकतो का?

चिमणराव Mon, 21/10/2013 - 19:10

शहाणे पूर्वी वेड्यासारखे वागले होते का ? किती वेळा ? खरे नेहमीच खरेपणाने वागतात का ?सगळेचजण चोरून शिनुमा बघतातत ,बरेचजण विनातिकीट प्रवास करतात मलाच का धरता अशा प्रकारच्या प्रतिसादांनी चर्चा उगाच लांबली आहे .आता तुम्ही गुन्हा केला असा आरोप आहे ते पडताळून पाहू एवढेच न्यायालय करणार .

ग्लोरी Mon, 23/12/2013 - 16:00

>>जाहिरातींमधली जागा मजकुराने भरण्याची सवय असलेल्यांना हे समजणार नाही.
कविताजी, खरेंनी शहाणेंची परवानगी घ्यायलाच हवी होती. पण अशी समज येण्यासाठी खरेंनी किंवा कुणीही कुठल्या व्यवसायात असायला हवे, असे तुम्हाला वाटते ?

नितिन थत्ते Tue, 24/12/2013 - 22:14

In reply to by ग्लोरी

>>पण अशी समज येण्यासाठी खरेंनी किंवा कुणीही कुठल्या व्यवसायात असायला हवे, असे तुम्हाला वाटते ?

हे जर खरे यांच्या कायद्याबाबत अनभिज्ञ असण्याविषयी असेल तर इग्नरन्स इज नॉट अ डिफेन्स अंडर एनी लॉ हे येथे नमूद करतो.