कोरा करकरीत!

समोरचा कागद कोरा तसाच पडलाय. तास झाला, तरी माझी नजर त्या कागदाच्या कोरेपणावरच खिळलेली. काहीतरी शोधत शोधत कपाट उघडलं आणि खाली पडला तो कागद. कोराकरकरीत.

कितीतरी वर्षापूर्वी तो कागद आवडला म्हणून विकत घेतला. आवडला कागद म्हणून एकच घेतला. ढीगभर घेऊन काय करायचे होते? एकाच कागदाचा तो कोरेपणा पुरला असता आयुष्यासाठी. त्यानंतर कितीतरी कागद पाहिले, त्यातले कितीतरी आवडले, काही विकत घेतले, काहींवरती वाणसामानाच्या याद्या लिहिल्या आणि काही चुरगळून फेकून दिले. हा कागद मात्र जपून ठेवला. कायम!!

खिडकीतून बाहेर बघितलं तर समोरचं आंब्याचं झाड दिसतंय. कैर्‍यांनी पुरतं भरलेलं. उन्हाळ्याच्या रखरखाटाला वैतागून मी मघाशी कूलर लावलेला. पण माझ्या त्या कृत्रिम थंडपणापेक्षा तो उन्हात उभा असलेला आंबा अधिक गार भासतोय. समोरचा तो कोरा कागद घेऊन मी झाडाखाली येते. अहा! काय थंड आहे ही सावली. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला तृप्त करत जाणारी. झाडाखाली कधी कुण्या फकिरासाठी कुण्या सावकाराने बांधलेला पार आहे. त्या पारावर खेळत खेळत माझं आयुष्य गेलं. त्या पारावर खेळत आणि या हातातल्या कागदाचं कोरेपण जपत.

आजूबाजूला अर्ध्या-कच्च्या पडलेल्या कैर्‍या आहेत. आज्जी अशा कैर्‍यांना बाळकैर्‍या म्हणायची.... अशा कशा काय पडल्या असतील या बाळकैर्‍या? पडल्यावर रडल्या असतील का? आणि अशा कैर्‍या पडून गेल्या तरी झाडाला त्याचं काही दु:ख वगैरे वाटले असेल का? की झाडाला जाणीवच नसेल कधी या कैर्‍यांची.. शेकड्यांनी फळं डवरलेली असताना दहापंधराचा हिशोब कोण ठेवतंय??या आंब्याचं काही माझ्या मनासारखं नाही... हजारोंनी रक्ताबंबाळ जखमा झालेल्या असताना माझ्या मनाला मात्र खपली धरलेल्या काही जखमांचं कोण कौतुक...

हातातला कोरा कागद तसाच अजून आहे. या उन्हाच्या सावलीमधे तो अजूनच कोरा वाटतोय. कधी वाटतं फाडून फेकून द्यावं हे सर्व... कशासाठी जपायचं? किती जपायचं? उन्हापासून, पावसापासून, फोफाट्यापासून, पाण्यापासून.. जर कोरा कागद जपायचाच आहे तर मग लिहायचं कधी त्यावर? आणि जर लिहायचंच आहे तर मग हाच कोरा कागद हवा कशाला? काय गरज या कोरेपणाची...

सरळ काही न लिहिता चुरगाळून करून फेकून द्यावा तो कागद.. याच बाळकैर्‍यांच्या आजूबाजूला. तसाच, कोराकरकरीत.

पण नाही, हातातला हा कोरा कागद फेकवणार नाही माझ्याच्यानं. चुरगळवला तर बिल्कुल जाणार नाही.

आणि त्यावर कधी काही लिहून तर कदापि होणार नाही.

(समाप्त)
http://nandinidesai.blogspot.in/2013/04/blog-post.html

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

ऐसी अक्षरेवर स्वागत. लेख आवडला. कागदाचा जपलेला कोरेपणा, कैऱ्यांचा कच्चेपणा या रूपकांचा विस्तार चांगला केलेला आहे.

जीएंची एक अस्तिस्तोत्र म्हणून कथा आहे. त्या कथेत समुद्र या रूपकाचा विस्तार केलेला आहे. हे लिखाण काहीसं त्या अंगाने जाणारं वाटलं. अर्थात अस्तिस्तोत्रमध्ये हा विस्तार अधिक व्यापक, आणि जास्त खोलवर जाऊन केलेला आहे. माझ्या मते या लेखावर अजून संस्करण करून परिणामकारक लेख-कथा-स्फुट तयार होऊ शकेल. 'त्या पारावर खेळत खेळत माझं आयुष्य गेलं.' किंवा 'आज्जी अशा कैर्‍यांना बाळकैर्‍या म्हणायची' या वाक्यांतून निर्माण होणाऱ्या चित्रांत काही ओळींची भर घालून जास्त मनोहर करता येतील. कथेलाही त्यातून एक भरीवपणा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी, हे लिहिल्यावर फक्त एवढंच लिहावं असं वाटलं होतं. त्यामध्ये अजून संस्करण करण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही काही लोकांच्या लिखाणाच्या शैलीत मनाची सहजी पकड घ्यायची शक्ती असते. एक दोन ओळीनंतरच लेखक आणि वाचक असे दोन वेगळे दृष्टीकोन राहत नाहीत. घराची आणि मनाची अडगळ धुंडाळताना काही काही गोष्टी फेकून देणं किती जीवावर येतं, ही द्विधा जीवाची कशी परीक्षा पाहते हे फार समर्पकपणे समोर उभं राहीलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद. समर्पक शब्दात मांडले तुम्ही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहा! आवडले!

ऐसीवर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वागतासाठी आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक वेगळे लेखन आवडले. थोड्या शब्दांत आणि रुपकांत, बरेच काही सांगून गेलात.

मेरा जीवन, कोरा कागज, कोराही रह गया, या गाण्याची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0