खजिना (३/८)

~~~मंदार~~~

सकाळी माझे डोळे उघडले ते डोळ्यावर आलेल्या उन्हाने. काही क्षण आपण कुठे आहोत हेच कळेना. डोळे उघडताच तंबूबाहेर समोर दिसली ती उंचच उंच भिंत. मग हळू हळू जागा झालो. कालचा दिवस काही काम केले नसले तरी थकवा फार आल्याने झोप गाढ लागली होती. बाहेर आल्यावर बघितले तर साळवी, मानकामे आधीच उठून बसले होते आणि शेकोटीवर पाणी गरम करत होते. साळवींना अश्या कामांची माहिती असल्याने या गोष्टी आमच्यासाठी विना-त्रास होतील या कल्पनेने उभारी आली. आमच्या स्लिपिंग बॅग्ज गुंडाळून तंबूंची घडी करेपर्यंत 'इन्स्टंट' चहा मिळाला. चहा पीत असताना फातिमाकडे लक्ष गेले. नुकत्याच झोपेतून उठल्याने तिचे केस विस्कटलेले होते. डोळ्यावरची झोप उडत असली तरी पूर्ण उडालेली नव्हती. बाजूच्या झाडांतून सूर्याची किरणे थेट तिच्या कानशिलांवर विसावली होती. कानाभोवतीचे नाजूक लव त्या प्रकाशात सोनेरी चमकत होते. हातातील कप दोन्ही हातात पकडून ती विचार करत बसली होती. मी तिच्यावरून नजर हटवूच शकत नव्हतो. मी चहा प्यायचा सोडून तिच्यावरच नजर खिळवून बसलो होतो.
"अह्हं" कोणी तरी खाकरल्यावर माझी तंद्री भंग पावली. आवाजाच्या दिशेने बघितले तर मानकामे मिश्किल चेहरा करून बोलत होते "तर मग आता काय?"
मला कळले नाही, मी फातिमाकडे पाहिले. ती ही आता चाचपून, पूर्ण जागी झाली होती आणि अत्यंत नाजूक हास्य चेहर्‍यावर ठेवून आमचे बोलणे ऐकत होती
"आता काय म्हणजे?"
"म्हणजे आता पुढे काय? तो नकाशा बघितला तर 'ती' जागा किल्ल्याच्या मध्यावर आहे परंतू तिथे पोचायला या झाडांमधून जावे लागेल असे दिसतेय. यातील बरीचशी झाडे काटेरी आहेत, बोरी, बाभळींबरोबरच इतरही खुरटी झुडुपे आहेत. बहुतेक आपल्याला बरेच शारीरिक बळ वापरावे लागेलसे दिसतेय"
"मला नाही वाटत तसं" अचानक फातिमा बोलली आणि सगळे तिच्याकडे पाहू लागले
"का गं? दुसरा कोणता मार्ग दिसतोय तुला?"
"त्या तटबंदीच्या जवळ निरखून बघा, ती जी झाडी आहे ती वाकलेली आहेच शिवाय त्याच्या मागे मोकळी जागा दिसतेय." सगळे जण अधिक निरीक्षणासाठी त्या दिशेला गेले.
जवळ पोहोचताच फातिमाचं म्हणणं बरोबर आहे हे सगळ्यांना दिसून आलं. तिथे तटबंदीला काटकोनात एक पडझड झालेली एक कमान झाडीच्या मागे दडलेली होती. आणि त्या कमानी पलीकडे बरीच मोकळी जमीन दिसत होती. त्यावर आश्चर्यकारकरीत्या कोणतेही झाड नव्हते. त्या कमानीपासून आम्ही उभे होतो तोपर्यंत मात्र बरीच झुडपे उगवलेली होती. तटबंदीच्या बाजूने मी आणि फातिमा आणि दुसर्‍या बाजूने मानकामे आणि साळवी झाडे कापू लागले.

~~~मानकामे~~~

मला खरंच वाटत नव्हते की मी लहानपणापासून वस्तीवर यायचं बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालंय. मात्र माझ्या अपेक्षेपेक्षा हे आव्हान अधिक शारीरिक श्रमाचं दिसतंय. इतकी वर्षे बंद असलेल्या जागेत बरेच वृक्ष, वेली असतील अशी मी कल्पना केली होती. परंतू त्यामानाने मोठे वृक्ष सध्यातरी नजरेच्या टप्प्यात नव्हते. त्याऐवजी एखाद-दोन पुरूष उंचीची खुरटी झुडपं होती. आधी झुडपे साफ करत रस्ता बनवायचा म्हणजे बरेच जास्त श्रम पडणार होते. नशीब फातिमाला एक रस्ता दिसला.
मी आणि साळवी झुडपे तोडत असताना बरेच विचार डोक्यात येत होते. या गावत गेलेले लहानपण, माझी देवभोळी आई, तिच्या अतिरेकी देवधर्मामुळे माझे एका नास्तिकात झालेले परिवर्तन असे बरेच काही. चित्रमालिकेपेक्षा एखाद्या चित्रपटाचे ट्रेलर बघावे तशी क्षणचित्रे डोळ्यांपुढून सरकत होती. इतक्यात मंदारचा आवाज आला आणि माझी विचारमालिका खंडीत झाली.
"अरे हे बघा काय?"
आम्ही सगळे तिथे धावलो. आमच्या बाजूचे बरीच झुडुपे कापून व्हायची होती, मंदार, फातिमा तरुण असल्याने अर्थातच त्यांची अर्ध्याहून अधिक झुडुपे कापून झाली होती. आणि आता दोघे तटबंदी कडे बघत होते. तिथे एका विटेवर काहीतरी कोरले होते.
खरे तर ते कोरलेले नसून तांब्याच्या पट्ट्यांनी काहीतरी लिहिलेले होते. त्या अक्षरांवर धुळीची पुटे चढली होती. मंदारने लगेच बॅगेतून आपली काही नाजूक शस्त्रे बाहेर काढली आणि मोठ्या सफाईने वरची पुढे काढली. त्याची हातसफाई बघून मला त्याच्या कसबाचे अत्यंत कौतुकही वाटले आणि मी त्याला बोलावल्याबद्दल समाधान वाटत होते. काहीशा केमिकल्सने ती लेखपट्टी पुसली आणि मग ती अक्षरे अत्यंत स्पष्टपणे समोर आली:

आम्ही सगळेच एकमेकांकडे बघू लागलो. हे काय आहे कोणालाच कळेना. इतक्यात मंदार म्हणाला
"अरे ही ब्राह्मी आहे. मात्र निजामाने बांधलेल्या किल्ल्यात ब्राह्मी लिपीचा वापर कसा?"
"ते जाऊदे तुला वाचता येतंय का हे काय आहे ते?" फातिमाने विचारले
"लिहिण्याची पद्धत नेहमीपेक्षा वेगळी आहेच शिवाय अक्षरांची ढबही भिन्न आहे. माझ्याकडे काही चार्टस आहेत का ते बघतो." असे म्हणून मंदारने आपल्या बॅगेतून एक गुंडाळी बाहेर काढली.
"तू शोध तोपर्यंत मी झाडे कापते." असे म्हणून फातिमा कामाला लागली. मी आणि साळवी दोघांकडे बघत उभे होतो. साळवी पेक्षा मी अत्यंत दमलेलो होतो. साळवीलाही एकट्याला कामाला सुरवात करायची इच्छा दिसत नव्हती.

थोडी झाडे कापून झाल्यावर फातिमा ओरडली, "अरे इथे बघा काय आहे". आम्ही पुन्हा तिथे गेलो तर जमिनीवर पुन्हा एक तांब्याची पट्टी होती. त्यावर काही लिहिलं आहे नाही कळायला मार्ग नव्हता. पुन्हा आम्ही मंदारला बोलावलं. त्याने आजूबाजूच्या जमिनीवरून माती बाजूला केली. ही २-३ इंच रुंद पट्टी जमिनीवरच चिकटवल्यासारखी होती. ती कुठून आली होती कुठे चालली होती काहीच कळायला मार्ग नव्हता. त्या पट्टीचा जितका भाग वर दिसत होता त्याची साफसफाई केल्यावर त्या तांब्याच्या पट्टीवरची कोरून लाल रंगात रंगवलेली अक्षरं दिसू लागली

आता मात्र मंदार म्हणाला
"हे पहिले अक्षर आणि तिसरे अक्षर 'अ' आहे हे नक्की. दुसरे ल, ह किंवा प आहे. माझ्याकडे असणारे हे चार्ट तितकेसे स्पष्ट नाहियेत. कोणाकडे भिंग आहे का?"
मी आणि साळवी नी आणलेली भिंग शोधू लागलो.
फातिमा म्हणाली "आता कमान तशीही जवळ आली आहे, एका बाजूची उरलेली झाडे तोडून ठेवते."

~~~साळवी~~~

त्या तटबंदीच्या विटेवर काय किंवा त्या जमिनीत रुतलेल्या पट्टीवर काय काय लिहिले आहे ते मला, मानकामेला किंवा फातिमाला कळणे शक्य नव्हते. मंदार ती उकल करेल तोपर्यंत नुसते बसून राहणे मला रुचत नव्हते आणि ते समजेपर्यंत पुढे काम करावेसे वाटतही नव्हते. मी आणि मानकामे तिथेच उभे राहिलो. एवाना फातिमाची तटबंदीच्या बाजूची झाडे तोडून झाली होती.
"मेजर, मंदार अरे त्या कमानीपर्यंत पोहोचता येईल असा बारीकसा रस्ता साफ झाला आहे. इथे काय लिहिलंय हे वाचता येईलच आधी पलीकडे जाऊया का?"
आम्हाला तिचं म्हणणं योग्य वाटलं. मी ही तिला सहमती दिली. मानकामे काहीच बोलले नाहीत तर मंदार म्हणाला
"एक पाच मिनिटं थांब आता हे काय लिहिलंय सांगतो"
" अरे पलीकडे गेल्यावर बघ की. तू असा ऐकायचा नाहीस तू बस शोधत मी ही चालले"
असे म्हणून फातिमा तिथे जाऊ लागली. मी सुद्धा तिच्या मागे निघालो पण का कोण जाणे झाडीच्या आधीच थांबलो.
"फातिमा, थांब, सगळे मिळून जाऊया, इथे आपण चौघेच आहोत."
"अहो मेजर, घाबरता काय असे? मी बाई असून एकटी जातेय आणि तुम्ही इतके घाबरताय"
"तसं नाही गं पण इथली भयाण शांतता मला अस्वस्थ करतेय. इथे इतकी झाडं आहेत पण एका तरी पक्ष्याचा आवाज तुला आला आहे का?"
"बरं थांबा तुम्ही, तुम्हीही मंदारसारखे हट्टी दिसताय. जाऊदे, मी नुसती तिथे जाऊन आलेच"

फातिमा झुडपांपर्यंत जाईपर्यंत मी तिथेच थांबलो. ती आत गेली, काही क्षण शांतता होती आणि मग अचानक एका मिनिटात मोठी किंचाळी ऐकू आली आणि पाठोपाठ "वाचवा, वाचवा" ची आरोळी. फातिमाचा आवाज होता.

मी तिथे धावलो, त्या मोकळ्या केलेल्या जागेतून एका माणसाला सहज जाता येईल इतकी झुडपे साफ केलेली होती. मी आत जाऊ लागेपर्यंत अत्यंत वेगात पळत मंदार तिथे पोहोचला. पाठोपाठ मानकामे येत असावेत. बघायला वेळ नव्हता. आम्ही दोघे एकाच वेळी तिथे पोचलो आणि जे बघितले त्याने दोन क्षण बघतच राहिलो. समोर फातिमा गळ्यापर्यंत दलदलीत रुतलेली होती आणि बाहेर पडायची धडपड करत होती आनि त्यामुळे अधिकच वेगाने रुतत चालली होती.

मला आणि मंदारला काही सुचेना. भानवर येताच "हातपाय हलवू नकोस अधिक खोलात जाशील" असे मी ओरडलो पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत फातिमा नव्हती. आमच्या बॅगेत दोर होता. तो आणायला मी मागे जाऊ लागलो तोवर मानकामे त्या झुडुपात शिरला होता. तोही पुन्हा मागे सरकून मग मी दोर आणायला पळालो. मी दोर आणेपर्यंत दलदल फातिमच्या नाकापर्यंत पोहोचली होती. मंदारने झुडपाची एक लांब फांदी तोडली होती पण ती फातिमापर्यंत पोचत नव्हती.

मी तिच्यापर्यंत दोर फेकला पण अरेरे तोपर्यंत फातिमाच्या नाकाच्यावर चिखल गेला होता. आणि ती बेशुद्ध झाली होती. अर्थातच ती दोर पकडत नव्हती मात्र तिची हालचाल थांबल्याने तिचे रुतणे अधिक धीमे झाले होते. मंदार जोरात ओरडत होता, रडत होता. तो आता तिला वाचवायच्या इराद्याने दलदलीत जाणार इतक्यात त्याला मी अडवले, घट्ट पकडून ठेवले. मला युद्धप्रसंगी मृत्यू नवा नसला तरी आपल्या प्रियजनाला असे समोर जाताना पाहून मंदारला काय होत असेल याची मात्र कल्पना करवेना.

मंदार माझ्या पोलादी पकडीतून सुटायचा प्रयत्न करत होता काही वेळातच त्याचे प्रयत्न मंदावले मी समोर बघितले तर फातिमा पूर्णपणे दलदलीखाली गेली होती आणि दलदल पुन्हा एकसंध झाली होती. आधीसारखीच, शांत, निश्चल, एकही जीव उगवू न देणारी!

(क्रमशः)
इतर भागांचे दुवे: - - - - - - -
श्रेयअव्हेरः सदर कथेतील पात्रे, स्थळे ही पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती अथवा स्थळांशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

बापरे डेँजर आहे हे...
लै भारी झालाय हा भागपण. मस्तच चालुय खजिन्याचा शोध.
पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांय हों यवनीस मारुन टाकलेंनीत एकदाचें Wink ब्राह्मी प्रकारदेखील टाकोन उत्सुकता वाहाडल्या गेली हाये.

हाही भाग उत्तम जमेश, आउर जल्दीच आंदो!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरोबर आहे. कथेतल्या एकमेव तरूणीला गाळात बुडवल्यावर बॅटमॅनसारखं तरूण रक्त उसळणारच! Wink

झकास काम सुरू आहे रे. हा ही भाग मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो मग नै तं काय!!!

(समजून घेतल्याबद्दल धन्यवाद हेवेसांनल Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शेवटी शेवटी एकदम धक्का बसला..
आता रंग भरत चालला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कम्माल रंगतेय!
पण फातिमा मेली नसावी असं का कोण जाणे, पण वाटतंय. की एकेक करून एक सोडून सगळे जाण्याचा हॉलिवूडी प्रकार असेल?
पुढचा भाग लवकर टाकणे.

छिद्रान्वेषः चाचपून नव्हे रे, चपापून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ फातिमा मेली नसावी असं वाटतयं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0