सिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती

सिनेमाच्या बाबतीत एकंदरीत तंत्रज्ञानामुळे झालेला बदल प्रचंड आहे. एके काळी सिनेमा बघण्याचा आणि दाखवण्याचा फॉर्म्युला खूपच सोपा होता. ३५ एमेम फिल्मची रिळं थिएटरमध्ये पोचवायची, खेळ लावायचा आणि लोकं बघायची. टीव्ही आल्यावर त्यात थोडा बदल झाला. म्हणजे सिनेमा काढला की आधी थिएटरमध्ये आणि नंतर तो टीव्हीवर सादर करायचा. त्यानंतर स्टोअरेज मीडियाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. व्हिडियो कॅसेट्स आल्या. त्यानंतरचा प्रवास कॅसेट, व्हीसीडी, डीव्हीडी, ब्लूरेज ते ऑनलाइन. टीव्हीचंही माध्यम बदललं. एके काळी दूरदर्शन किंवा प्रादेशिक टीव्ही होता. तो जाऊन सॅटेलाइट टीव्ही आला. त्यामुळे सिनेमा बघण्याच्या आणि दाखवण्याच्या पद्धतीतही मोठा बदल झाला. प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्यापेक्षा काही वेळा घरच्या घरी व्हिडियो किंवा डीव्हीडीवर बघण्याची सोय झाली.

३५ एमेम पासून डिजिटल तंत्रज्ञान वापरामुळे सिने-डिस्ट्रिब्यूशनमध्ये क्रांती झाली. पूर्वी फिल्मच्या रिळांचे आठ मोठमोठे डबे प्रत्येक शहरात-गावात पाठवावे लागत. कारण सिनेमा त्या माध्यमात बंदिस्त होता. आता संपूर्ण सिनेमा डिजिटल पद्धतीने DCI2000 फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड होतो. त्यामुळे रिळं पाठवण्याची, ती वाटेत हरवण्याची भानगड नाही. फक्त एक हार्ड डिस्क असते. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे सिनेमा पाठवायचा असेल तर ती डिस्क न पाठवता, त्यातला डेटा सुरक्षित लाइनवरून पाठवला जातो. त्यामुळे एकाच वेळी शेकडो सिनेमाथिएटर्समध्ये एकाच वेळी सिनेमा सादर करणं सोपं जातं.

हा बदल गेल्या दहाएक वर्षात झालेला आहे. कुठचाही बदल होताना काहीसा विरोध होतो, तसा इथेही झाला. पण त्यातला मुख्य आक्षेप होता तो यासाठी लागणाऱ्या प्रचंड भांडवलाचा. हे पाच स्टुडियोजनी एक कंपनी स्थापन केली. त्यांनी प्रोड्यूसरना आणि थिएटर मालकांना आधुनिक प्रोजेक्टर सिस्टिम लावायला, संपूर्ण डिस्ट्रिब्यूशन मॉडेल बदलण्यासाठी पैसा पुरवला. अर्थात हा फुकटचा पैसा नव्हता. प्रत्येक शोपाठी काही कमिशन मिळण्याच्या बोलीवर हे पैसे मिळाले. हा सर्वांसाठीच फायद्याचा सौदा होता. प्रत्येक शो दाखवण्याचा खर्च प्रचंड कमी झाल्यामुळे त्यातून होणारा थोडा फायदा फायनान्सिंग कंपनीला देण्यात काहीच हरकत नव्हती. अत्याधुनिक दर्जाची थिएटर तयार झाल्यामुळे प्रेक्षकांचाही दर्जाच्या दृष्टीने फायदाच होता.

या बदलामुळे झालेले बदल आपल्याला आता जागोजागी दिसत आहेत. मुख्य फरक झाला तो थिएटरच्या आकारांत. पूर्वी ७०० ते ८०० लोकं मावू शकणारी मोठ्ठी थिएटर्स असत. व एके ठिकाणी दोन ते तीन थिएटर्स असत. आता त्याजागी २० ते २५ स्क्रीन्स असलेली मल्टिप्लेक्सेस जिथे तिथे दिसतात. त्यातल्या प्रत्येक मिनी थिएटरमध्ये २०० च्या आसपास लोक बसू शकतात. त्याचा एक मुख्य फायदा असा की गरजेप्रमाणे एका सिनेमासाठी आवश्यक असलेल्या थिएटर्सची संख्या कमी अधिक करता येते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा सिनेमा तरुणांना जास्त अपील होणारा असेल तर त्या भागात तरुणांची गर्दी जेव्हा होते तेव्हा अधिक स्क्रीन्सवर दाखवता येतो. म्हणजे असलेली प्रदर्शन क्षमता जास्तीत जास्त परिणामकारकपणे वापरता येते. हीच गोष्ट फारशा न चालणाऱ्या सिनेमांबाबत. कधीकधी ज्या सिनेमांबाबत चांगला चालेल अशी अपेक्षा असते, त्यांना तितका प्रतिसाद मिळत नाही. अशा पडलेल्या सिनेमांना ७०० पैकी ५०० खुर्च्या रिकाम्या सोडणं कसं परवडणार? पण पूर्वी याबाबत काहीच ताबा नव्हता. आता असा मागे पडणारा सिनेमा कमी क्षमतेच्या छोट्या थिएटरमध्ये ट्रान्स्फर करता येतो. दुसरा, अनपेक्षितपणे गाजणारा सिनेमा मोठ्या थिएटरमध्ये दाखवून तेवढ्याच कपॅसिटीत जास्तीत जास्त प्रेक्षक बसवता येतात. याचं मुख्य कारण म्हणजे या सर्व स्क्रीनवर काय दाखवलं जाणार हे प्रोग्रामने ठरतं. त्यासाठी एखाद्या सिनेमाचं रीळ त्या थिएटरमध्ये असण्याची आवश्यकता नसते. शिवाय वीस थिएटरमधल्या वीस प्रोजेक्टर्ससाठी प्रत्येकी किमान एक दाखवणारा माणूस ठेवण्याची गरज नसते. कारण हे सर्व प्रोजेक्टर एकदा प्रोग्राम केले की झालं. या सर्व फायद्यांमुळे मल्टिप्लेक्समधलं प्रोग्रामिंग हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे.

एका मल्टिप्लेक्समध्ये जसे डिजिटल टेक्नॉलॉजीचे फायदे होतात तसेच देशी किंवा परदेशी डिस्ट्रिब्यूशन करतानाही होतात. फिल्मची रिळं तयार करणं, ती सर्वत्र पाठवणं हे महागाचं असल्यामुळे छोट्या छोट्या गावांत ती रिळं पाठवायला प्रोड्यूसर उत्सुक नसत. त्यामुळे पूर्वी रिळांचं 'शटलिंग' करावं लागायचं. जर एखाद्या छोट्या गावात दोन थिएटरमध्ये एक सिनेमा लावला, तरी प्रोड्यूसर म्हणत असे की मी एकच फिल्म पाठवीन, वेळा तुम्ही वाटून घ्या. मग एका थिएटरमध्ये तो सिनेमा ६ वाजता तर दुसरीकडे तो ६:३० वाजता लावायचा. मग पहिली रिळं दाखवून झाली की ती कोणीतरी सायकलवरून दुसऱ्या थिएटरमध्ये नेणार. आणि सिनेमा संपेपर्यंत हे चालू रहायचं. जर एकापेक्षा अधिक शो दोन्ही ठिकाणी असतील तर हे रिळं इथून तिथे नेणं चक्राप्रमाणे चालत रहायचं.

पूर्वी भारतात तयार झालेला सिनेमा अमेरिकेत दाखवायची असेल तर आठवडाभर आधी फिल्म पाठवावी लागत असे. त्यात प्रत्यक्ष फिल्म सुरक्षित पाठवणं, कस्टम क्लिअरन्स, ती योग्य ठिकाणी नेऊन पोचवणं या कटकटी असत. आता ३०० ते ४०० गिगाबाइटचा डेटा अंडरवॉटर फायबर ऑप्टिकल जोडणीतून चार तासात जाऊन पोचतो. ती न्यूयॉर्कमध्ये मध्यवर्ती ठिकाणी जाते. तिथे हार्डड्राइव्ह तयार करून देशभर इतरत्र पाठवली जाते. डिजिटल स्वरूपात मीडिया असल्यामुळे तो सिनेमा केवळ अमुक एक थिएटरमध्ये, अमुक एक काळापर्यंतच दाखवता येईल अशी सुरक्षा व्यवस्था करता येते. पायरसीचं प्रमाणही डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे आटोक्यात ठेवता येतं. उदाहरणार्थ, एखाद्या सिनेमाचं मूळ रेकॉर्डिंग हातात पडलं तरी ते एन्क्रिप्टेड असल्यामुळे कोणाला लावता येत नाही. मग दुसरी पद्धत रहाते ती म्हणजे कोणीतरी स्क्रीनसमोर कॅमेरा घेऊन बसून ती रेकॉर्ड करतो. असं रेकॉर्डिंग पाहून ते कुठच्या थिएटरमध्ये, किती वाजता झालं हे ओळखता येतं. कारण त्यात डिजिटल पद्धतीने चित्रांमध्येच ही माहिती भरलेली असते. यामुळे जर काही विशिष्ट थिएटरमधून हे होतं आहे असं दिसून आलं तर त्यांवर दबाव आणून त्यांची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची सोय करता येते.

या सर्व बदलांचा परिणाम प्रेक्षकांवरही झाला आहे. किंबहुना प्रेक्षकांच्या मागणीमध्ये झालेला बदल, त्यांच्या सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची बदलती जीवनपद्धती, आणि बदलतं तंत्रज्ञान या गोष्टी डिजिटल रिव्होल्यूशनच्या एकाच फेऱ्याचे भाग आहेत. एक दुसऱ्याचं कारण असं बोट ठेवून सांगता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर एके काळी छायागीत बघण्यासाठी साडेसातला घरी जावं लागायचं. आता आपल्याकडे टीव्ही असण्याचीही गरज पडू नये इतक्या प्रमाणात करमणूकीची साधनं व तोच कंटेंट इंटरनेटवर उपलब्ध आहे. घरगुती वापरही गेल्या दहाएक वर्षांत कॅसेट, सीडी, डीव्हीडी ऐवजी नेटवरून स्ट्रीमींगकडे गेलेला आहे. ऑन डिमांड. स्टोअरेज मीडिया हा नामशेष होत चाललेला आहे.

या सहज उपलब्धतेबरोबरच पायरसी वाढेल ही भीती तशी वृथा आहे. पायरसी ही शेवटी प्लॅटफॉर्मची गोष्ट आहे. जेव्हा इंटरनेटची बॅंडविड्थ कमी होती तेव्हा नुसतं लिहिणं बोलणं होतं. बॅंडविड्थ वाढली तेव्हा लोकांनी संगीत ऐकायला सुरूवात केली.सोनी मूव्हीच्या वेबसाइटवर जाऊन विकत घेता यायचं. पण नंतर नॅपस्टर आलं आणि पायरसीचं प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढलं. याचा दोषही थोड्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा आहे, आणि थोड्या प्रमाणात संगीत व्यावसायिकांच्या द्रष्टेपणाच्या अभावाचा आहे. जर कोणाला एखादंच गाणं आवडलं तर त्यासाठी आख्ख्या सीडीचे १० डॉलर का खर्च करावे? संगीत उतरवून घेण्याची आणि एकमेकांना देण्याची सोय वाढल्यावर लोकांनी मूळ मालकाला पैसे न देण्याची प्रवृत्ती वाढली यात नवल नाही. यामागे असणारे तंत्रज्ञानातले बदल, आणि आपल्या ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांकडे लक्ष पुरवण्याऐवजी त्यांनी नॅप्स्टरबरोबर युद्ध पुकारलं. आपलं संगीत चोरणाऱ्या या हरामखोरांना चांगला कायमचा धडा शिकवावा, व असं करणारांत दहशत बसावी म्हणून त्यांनी नॅप्स्टरच्या चालकांना कोर्टात खेचलं. ते केस जिंकलेही. नॅप्स्टर चालवणाऱ्यांना शिक्षा झाली, साइटही बंद पडली. पण त्याचनंतर काही वर्षांत म्युझिक इंडस्ट्रीही मेली.

कारण विशिष्ट संगीताच्या फाइल्स एकमेकांना पाठवणं बेकायदेशीर ठरलं तरी त्या एन्क्रिप्ट करून वेगळी नावं देऊन ती शेअर करणं यात बेकायदेशीरपणाच्या बाबतीत साइटला पकडता येत नाही. ती फाइल एमपीथ्री स्वरूपात कन्व्हर्ट करून ती ऐकण्याचं काम त्या शेअरिंग साइटच्या दृष्टिआड म्हणजे लोकांच्या कंप्युटरवर होतं. याच तत्वावर टोरेंट चालतं. त्यामुळे कोलंबिया, सोनी वगैरे कंपन्या आता जवळपास मेल्या आहेत. विशिष्ट संगीतावर एखाद्या विशिष्ट कंपनीची मक्तेदारी चालण्याचे दिवस आता गेले आहेत.

संगीतावर ताबा ठेवण्यासाठी संगीत व्यवसायाने आत्तापर्यंत त्याच्या माध्यमावर नियंत्रण ठेवलेलं आहे. जोपर्यंत सीडी किंवा डीव्हीडी च्या आत संगीत बंद होतं, तोपर्यंत त्या वस्तू विकणं हे त्यांच्या ताब्यात होतं. तसंच जोपर्यंत संगीत निर्माण करण्यासाठी व अनेक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्या माध्यमाची गरज होती तोपर्यंत निर्मितीही त्यांच्या ताब्यात होती. हे चित्र मोडून जातं आहे, आणि आपली गरज रहाणार नाही, हे या मोठ्या कंपन्यांनी लक्षात घेतलं नाही. जगून रहाण्यासाठी शक्य तितके निर्बंध माध्यमांवर, ती वाजवणाऱ्या प्लेअर्सवर घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एखाद्या कलाकाराला जर आपलं संगीत विकायचं असेल तर त्याला कुठच्यातरी मोठ्या कंपनीकडे जाणं भाग होतं. मग ते म्हणत की तुझ्या या दहा गाण्यांची सीडी आम्ही दहा डॉलरला विकणार. पण या वस्तू तयार करायला आणि मार्केट करायला इतका खर्च होतो की मी तुला फक्त त्यातले ३० सेंट देऊ शकेन. मधला मोठा फायदा त्या कंपनीला आणि प्रचंड खर्च त्या सीडीसारख्या वस्तू तयार करायला, विकायला, आणि साठवून ठेवायला व्हायचा.

याउलट स्टीव्ह जॉब्जसारख्याने या नव्या माध्यमाची शक्ती जाणली. त्याने म्हटलं की मी ग्राहकांना एकत्र करतो, त्यांना तुमची गाणी विकतो. माझ्याकडे एक नवीन प्लॅटफॉर्म आहे, आणि त्याला बांधलेले कोट्यवधी ग्राहक आहेत. मात्र अट एक की एक गाणं एक डॉलरला विकायचं. त्यामुळे कलाकारही या कंपन्यांकडे न जाता आपलं संगीत सरळ इंटरनेटवर प्रसिद्ध करू शकतो. कोलावेरी डी सारख्या गाण्यांना कोट्यवधीमध्ये श्रोते मिळतात. त्यातून यूट्यूबतर्फे मिळणारं उत्पन्न हे आख्ख्या सिनेमाच्या बजेटइतकं होऊ शकतं. त्यामुळे मार्केटिंग म्हणजे काय हेही बदललेलं आहे.

नीट बघितलं तर संगीत क्षेत्रात घडलेल्या या घटना म्हणजे बाजाराच्या रेट्याचा परिणाम आहे. वितरणव्यवस्थेतले दलाल आपली दलाली खातात. तशी प्रचंड दलाली या कंपन्या व त्याहीपेक्षा ते संगीत बांधून ठेवणारी माध्यमं खात असत. जेव्हा त्यांची गरज नष्ट झाली तेव्हा त्या व्यवस्थेतल्या इनएफिशियन्सी नष्ट होणार हे उघड होतं. वीस वर्षांपूर्वी सर्वसाधारण सीडीची किंमत १० डॉलर होती. त्यात हवीच आहेत अशी फारतर २ गाणी असायची. त्यामुळे गाण्यामागे ५ डॉलर पडायचे. आता ते साधारण गाण्यामागे १ डॉलर पडतो. म्हणजे महागाईने होणारी किंमतवाढ धरली तर गाण्यामागचे पैसे किमान पंधरा पटीने कमी झाले. जर गाण्यामागची किंमत इतकी कमी झाली, तर सरळसोट पैसे देऊन खरेदी करायला कोणाला काही वाटत नाही. पायरसी अजूनही चालते, पण त्यातून होणारा फायदा आता फारच कमी झालेला आहे.

संगीत व्यवसायाने जी चूक केली ती सिनेमा व्यवसाय करताना दिसत नाहीये. ब्लॉकबस्टरसारख्या व्हिडिओ डिस्क भाड्याने देणाऱ्या कंपन्या अस्तंगत पावत आहेत. नेटफ्लिक्सनेही आपल्या डिव्हिडी व्यवसायापासून ते ऑनलाइन व्यवसायापर्यंतचा प्रवास साधलेला आहे. सिनेमाचीही गोष्टही तशीच आहे. सिनेमा आला की तो बघणं म्हणजे मोठा खर्च होऊ शकतो. कारण अमेरिकेत कुटुंबाला घेऊन जायचं म्हणजे ६०-७० डॉलर पडतात. त्यासाठी घालवायला लागणारा वेळाचा खर्च वेगळाच. त्याऐवजी जर ऑनलाइन तोच सिनेमा ४ डॉलरला रेंट करायला मिळाला तर तो घरीच बघणं लोक पसंत करतील यात काही नवल नाही.

याचा अर्थ थिएटरं नष्ट होतील असं नाही. कारण कितीही चांगला टीव्ही घेतला तरी थिएटरमध्ये मिळणारा भव्यतेचा अनुभव मिळत नाही. अजूनही थिएटरमध्ये मिळणारा गल्ला हा एकंदरीत उत्पन्नाचा मोठा भाग असतो. सिनेमा प्रोड्यूसरकडे वेगवेगळ्या प्रकारचे हक्क विकायला असतात. बॉलिवूडमध्ये सर्वात सुरूवातीला म्यूझिक विकतो. गाणी यशस्वी झाली की लोक आकर्षित होतात. त्यानंतर थिएट्रिकल राइट्स विकले जातात. त्यानंतर होम व्हिडियो राइट्स विकले जातात. त्यानंतर इंटरनॅशनल सॅटेलाइट रिलीज. त्यानंतर ऑनलाइन मीडिया. हे कंपार्टमेंटलायझेशन जरूरीचं आहे. कारण थिएटर मालक तशी अट घालतो. अजूनही बॉलिवूडमध्ये ७० टक्के रेव्हेन्यू थिएटर ३ इडियटच्या ५०० कोटीपैकी सुमारे ३५० कोटीचा धंदा केला. मोठासा २५०० स्क्रीन्स गुणिले ३०० सीट्स गुणिले १५० रुपये गुणिले दिवसाला ४ शोज गुणिले दिवस.... म्हणजे साधारण गल्ल्याचा आणि त्यातून होणाऱ्या फायद्याच्या आकड्यांचा अंदाज येतो. इंटरनेट अजूनही धंद्याच्या बाबतीत मागे आहे.

कुठच्या प्रकारचे सिनेमे बनवले जातात यामध्ये देखील या सगळ्यामुळे बदल झालेला आहे. पूर्वी एक विशिष्ट ऑडियन्स डोळ्यासमोर ठेवून सिनेमा बनवला जायचा. आता बहुतांशी तरुणांना डोळ्यासमोर ठेवून केला जातो. आता क्लायेंटेल बदलेलेलं आहे. तमाशा आजकाल दिसत नाहीत. त्याऐवजी जास्त तरुण शहरी आणि वैविध्यपूर्ण विषयांवर येताना दिसतात. काही हिंदी सिनेमे फक्त इतर प्लॅटफॉर्म्साठी बनवलेले दिसतात. म्हणजे कोणी म्हणेल की माझ्या सिनेमाचं बजेट इतकं कमी आहे की मला थिएटर डिस्ट्रिब्यूशनचा खर्च परवडणं शक्य नाही. अशा वेळी फक्त टीव्हीवर किंवा इंटरनेटवर तो सादर केला जाऊ शकतो. मोबाइल कंपन्या पाच पाच मिनिटांच्या क्लिप्स विकत घेतात. आणि रिप्लेजदेखील दिसतात. त्यामुळे ऑफिसात असताना मॅच बघणं शक्य नाही, पण पडलेल्या विकेट्स आणि मारलेल्या फोर्स/सिक्सर्स दिसू शकतात. म्हणजे आख्ख्या मॅचमधली महत्त्वाची पाच मिनिटं बघता येतात.

आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकाच्या गरजा यांचा मेळ झाल्यामुळे प्रस्थापित व्यवसायांत प्रचंड बदल होत आहेत. बॅंडविड्थ वाढल्यामुळे, आणि उत्पादन व डिस्ट्रिब्यूशन स्वस्त झाल्यामुळे प्रयोगही जास्त चालू आहेत. शेवटी ग्राहक हा राजा असतो हे सिनेमा व संगीत कंपन्यांच्या लक्षात येतं आहे.

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

चित्रपट आणि संगीतात जे बदल झाले ते अनुभवले आहेत पण त्यामागची माहिती कळली या लेखातून.
प्रेक्षक आणि श्रोते यांचा प्राधान्यक्रम कसकसा तयार होतो (मार्केट, फॅशन, चॉईस ..) याबाबत अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0