संस्कार

परवा घडलेल्या एका प्रसंगानं डोक्यात ठाण मांडून ठेवलंय. त्यानंतर दररोज तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय म्हणून तुमच्यासमोर मांडतोय.

बिल्डिंगमधून मी, माझा ८ वर्षाचा मुलगा आणि त्याची आजी असे बाहेर पडत होतो. मुलगा नेहमीप्रमाणे धावत सर्वात पुढे होता. बाहेर आल्या आल्या त्याला वर्तमान पत्रातून येणारी पत्रकं असतात तसला एक कागद (इथल्याच कुठल्यातरी बिजनेसच्या जाहिरातीचा) पडलेला दिसला. त्याने तो उचलला. मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अंगावर ओरडलो "जमिनीवरचा कचरा कशा उचलतोस?" त्याची आज्जीपण त्याला समजावत म्हणाली "अरे असं जमिनीवर पडलेले कागद तू कशाला उचलतोस? तू टाकला नाहीस ना कागद, ज्याने टाकला तो उचलेल".. तो मला सांगायचा प्रयत्न करत होता की तो कागद उचलून जिथे पोस्ट बॉक्सेस असतात त्याच्याच खाली असली पत्रकं ठेवण्यासाठी जागा केलेली असते, तिथे तो टाकून देणार होता. पण वेळ निघून गेलेली होती. माझ्या ओरडण्यामुळे त्याने कागद खाली टाकून दिला आणि आम्ही पुढे गेलो.

तसा अगदी साधाच प्रसंग. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येणारा. पण बर्‍याचदा आपण त्याचा फार विचार करत नाही.
नंतर पुन्हा जेव्हा ह्या प्रसंगाचा विचार डोक्यात आला तेव्हा मला वाटलं, की माझं चुकलंच. खरं तर तो जे करत होता ते बरोबर होतं. मी उगाच त्याने रस्त्यातला कचरा उचलू नये म्हणून त्याला ओरडलो. त्याने स्वतः कचरा करू नये हे जितकं खरं आहेत तितकंच जर जिथे काही चूक असेल तर त्या बाबतीत काहीतरी करून ती चूक सुधारणंही तितकंच जरूरी आहे. पण मला वाटतं आपल्या सगळ्यांवरच हे संस्कार होतात 'तू चूक करू नकोस .. पण जर दुसर्‍याने चूक केली असेल तर ती सुधारायला तूच एक उरला आहेस का?' आपणही नकळत हेच संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर करतोय ? अशाने पुढची पिढीपण नाकर्तीच होणार! थोड्या व्यापक प्रमाणावर बघितलं तर समाजात सगळीकडेच चुका करणारे लोक असतात, नेत्यांपासून चपराशापर्यंत. पण त्या चुकांबद्धल काहीही न करता बहुतांशी लोक आपण बरं आणी आपला संसार बरा ह्याच मनोवृत्तीची का असतात? चूक करणारा चूक सुधारेल असा विचार केला तर त्या चूका कधीच सुधारल्या जाणार नाहीत. इथे 'चूक' हा शब्द मी 'जे जे काही बरोबर नाही' या अर्थी वापरतोय.. म्हणजे भ्रष्टाचारापासून आपल्याहून दुबळ्या लोकांना त्रास देणे किंवा अगदी सिग्नल तोडून जाण्यापर्यंत सगळंच! जे आपल्या अवती भवती नेहमी घडत असतात पण आपण त्याविषयी काहीच करत नाही. आणि हेच आपण आपल्या पुढच्या पिढीला तर शिकवत नाही का?

(मला शब्दांत नीट मांडता आलेलं नाही हे मला समजतंय.. तुम्ही सगळे सांभाळून घ्याल अशी खात्री आहे)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

मुद्दा समजला आणि काही अंशी मान्यही आहे.

भारतात चॉकलेटच्या चांद्या रस्त्यावर टाकणारे किंवा चालत्या ट्रेनमधून कचरा फेकणारे "मीच का एकटा/एकटी साफसफाई करू" असं विचारतात. देशी-अनिवासी असा वाद उकरायची माझी इच्छा नाही, पण मुलाला शाळेमधे असं शिकवतात का? इतरत्र कचरा टाकू नये, इतर कोणी टाकला असेल आणि आपल्याला शक्य असेल तर आपण कचराकुंडीत टाकावा?

भारताबाहेर असणारे भारतीय सहसा शिस्त तोडताना दिसत नाहीत. बाहेरच्या देशातली शिस्त आणि बहुदा वेगळं पडण्याची भीतीही, लहान मुलांनाच काय मोठ्या लोकांनाही शिस्तशीर बनवत असावी.

माझ्या एका बॉसच्या घरी आम्ही बार्बेक्यूसाठी जमलो होतो. खाणंपिणं आटोपल्यावर त्याचा सहा वर्षांचा मुलगा बागडत होता. आमचं खाणं आटोपताना कोणीतरी कागदी प्लेट्स कुठे टाकू अशी चौकशी केली. तो धावत जाऊन आतून एक कचर्‍याची पिशवी घेऊन आला. आणि अगदी साठ वर्षाच्या दुसर्‍या बॉसलाही त्याने शब्दशः दम मारून कचरा या पिशवीतच टाक असं सांगितलं. सगळे लोकं शिस्तबद्ध वागत आहेत याची खात्री करून तो तिथेच अंगणात बागडत "इथे तिथे कचरा टाकू नका" अशा अर्थाचं काहीतरी गात होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेमकं पकडलं आहे! संस्कार संस्कार म्हणजे काहीतरी दिव्य आहे आणि त्यासाठी खास "संस्कार वर्गात" मुलांना घातलं की झालं (आपण सुटलो). तिथे गेलं की मुलांवर "सुसंस्कार" झालेच असा हल्ली सुर अनेकदा कानावर पडतो.

संस्कार संस्कार असं ओरडण्यापेक्षा अश्या छोट्या छोट्या शिकवणीतूनच ते घडत असतात. कचरा दिसल्यास तो उचलणे, आपले पालक दुसर्‍याला दिलेली वेळ काहिहि करून पाळताहेत हे दिसणे, मुलांना न फसवणे, त्यांना कोणतेही काम करण्यासाठी अमिष न दाखवणे यातुनतच स्वच्छता, वक्तशीरपणा, सच्चेपणा, भ्रष्टाचारी वृत्ती न बाळणे वगैरेंचे बाळकडू पाजत असतो असे वाटते.

याची दुसरई बाजु अशी की समाज कोडगा झाला आहे. त्यांच्यावर असा परिणाम होणार नाही. मागे कोणीतरी सांगत होतं की त्यांच्या इथे कोणीतरी रस्त्यावरचा कचरा बघुन स्वतः झाडू हातात घेतला तर आठवडाभराने ते गृहस्थ एक दिवस आले नाहित तर तिथल्या मंडळींनी "काय हो काल आला नाहित झाडायला" म्हणून विचारायला सुरवात केली

शिवाय असाही प्रतिवाद होतो की हे सगळं "आदर्श"वादी झाली. प्रत्यक्ष व्यवहारी जगात मात्र "थोडे थोडे" सगळे काही करावेच लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वर लिहिलेले योग्यच आहे पण मला त्यावरून 'हास्यसम्राट' मधला विनोद आठवला.

शाळेतलं इब्लिस कार्टं गुर्जींना विचारते,"टिळक म्हणतात, 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही', गांधीजी म्हणतात, 'परिसर स्वच्छ ठेवा'". आता आम्ही करायचं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' ही मराठी म्हण कधी ऐकली नव्हती काय त्या कार्ट्याने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0