नारायण

टॅक्सीतून उतरता उतरता मम्मानं ओजसचं बखोट पकडलं, त्याला एखाद्या निष्णात लीड साल्सा डान्सरच्या सफाईनं लीलया टर्न केलं आणि त्याच्या दोन्ही कानांपाठचा मळ चेक केला.
"काय रे, कशी अंघोळ करतोस?" मम्मानं वैतागून बोटांवरच थुंकी घेतली आणि त्या ओजसचे कान खसाखसा चोळत मळ काढण्याचा अर्धसफल प्रयत्न करू लागली.
"मम्मा, मी आता सव्वीसचा आहे यार!", असं पुटपुटत ओजसनं क्षीण विरोध केला.
पण लग्नात मीरा भेटेल हे त्याला आठवलं आणि त्यानं मम्माचा ऑब्सेसिव्ह वेडगळपणा कानांआड (पन इंटेंडेड) केला.
वनिता समाज हॉलमध्ये बिझनेस ॲज युज्वल चालू होता.
जुईच्या (की जाई?) फ्लेवरचा एअर फ्रेशनर मोठ्ठे फॅन गरागरा पसरवत होते.
त्यात पाठून दादरच्या समुद्रावरून येणारा खारा वास मिक्स झाल्यानं विअर्ड पण तरीही छान असा वेगळाच गंध येत होता.
इल-फिटिंगच्या शेरवान्या, गॉडी रंगाचे सिल्क कुर्ते, जडजंबाल साड्या, हाता-काना-नाकातले, गळ्यातले, कमरेतले अवजड सोन्याचे दागिने... क्वचित हिरेसुद्धा, वेण्या, चेहऱ्यांवरच्या चमक्या, बुब्बुळांतल्या विविधरंगी लेन्सेस आणि बऱ्याचशा नितळ किंवा सेमी नितळ उघड्या पाठी हा सगळा कोलाहल एकमेकांत मिसळत होता, वेगळा होत होता आणि पुन्हा एक होत होता.
हिंदू मराठी उच्चवर्णीय, उच्च मध्यमवर्गीय लग्नाची सगळी लक्षणं तिथे एकवटली होती.
उदाहरणार्थ, तीस टक्के लोक लग्नासाठी बे एरिया, लंडन, फ्रँकफर्ट, ऑस्टिन असे कुठून कुठून आवर्जून सुट्टी टाकून आले होते.
किंवा रादर लग्नच त्यांच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या धरून प्लॅन झालं होतं असं म्हणू यात हवं तर.
अशा लग्नांत सत्ताकेंद्र साधारण स्टेजलगतच्या दोन रांगांतल्या कुशनवाल्या सोफ्यांच्या आसपास असतं.
मम्मा ओजसला घेऊन त्या सत्ताकेंद्राच्या दिशेनं पुढे पुढे जात राह्यली.
तितक्यात सरूमावशी समोर आली आणि तिनं आधी मम्माला आणि मग ओजसला मिठी मारली.
मग ओजसला नेहमीच्या स्टायलीत निरखलं.
नशीब, आपण कानामागचा मळ काढला, मम्माला हायसं वाटलं.
"लठ्ठ झालास अजूनच आणि पिंपल्ससुद्धा वाढलेयत तुझे. का रे?
अगं रेखे, डॉक्टर त्रासीकडे ने त्याला. मी पाठवते नंबर तुला."
सध्यापुरती एवढी मताची पिंक टाकून सरूमावशी मम्माचा हात धरून सत्ताकेंद्रात घुसली.
ओजस मग थोडा बावचळून तोंडात कडवट चव आणि नाकात व्हेज स्टार्टर्सचा वास घेत मीराला शोधत राह्यला.
आपण नवऱ्याकडचे राईट? मग त्यानं वरपक्ष मार्क केलेल्या रूमकडे नजर टाकली.
मीरा काही वरपक्ष रूमच्या आसपास दिसली नाही.
रिटर्न अहेराचे दोन बॉक्स घेऊन उमामावशी बाहेर आली आणि पाठोपाठ सरूमावशीचे मिस्टर विलासभावजी आणखी दोन बॉक्स घेऊन आले.
उमामावशी छान ग्रेसफुल दिसत होती.
विलासभावजीही कूल होते; ते त्याला लहानपणापासून आवडायचे.
सरूमावशीचा बिचीपणा मात्र वय वाढलं तरी काही फारसा कमी झाला नव्हता. मम्मा मात्र सतत तिचं अप्रूव्हल शोधत राह्यची.
मीराचा बाबा, ओजसचा अरूमामा स्टेजवरून सगळ्या पाहुण्यांचा ३६० डिग्री फोटो आयफोनात घ्यायची धडपड करत होता. आणि बाजूला पैसे देऊन आणलेला वेडिंग फोटोग्राफरसुद्धा तेच, पण अंमळ लीलया करत होता.
गंमतच सगळी! ओजसला हसायला यायला लागलं.
तेवढ्यात त्याला पाठून कुणी तरी मिठी मारली.
मखमली भाले पाठीत रुतल्यासारखं झालं.
"ओजीदादा, कझ ब्रोऽऽऽ", मीरा त्याच्या कानात जोरात ओरडली.
तो आनंदून वळला.
मीरा गोड दिसत होती. चबीपणाकडे झुकणारा चेहरा, करवंदासारखे काळेशार रेखीव डोळे, दाट लांबसडक काळेभोर केस आणि मळकट पिंक रंगाची चनिया चोली.
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विक्रोळीला साधारण गोदरेजच्या आसपास फेब्रुवारी एंडला थंडी संपता संपता अशाच मळकट पिंक रंगाच्या फुलांचा गच्च भरलेला बहर यायचा. तो बहर त्याला आठवला.
त्यानं तिला परत थोडं अंतर राखत हग केलं आणि विचारलं, "अरे, तू होतीस कुठे?"
"नवरीच्या रूममध्ये."
"अरे पण आपण..."
"आय नो, आय नो, आपण नवऱ्याकडचे आहोत पण शर्वरीवहिनीच्या साईडच्या लोकांचा एक मस्त कँडिड रील शूट केलाय", मीरा आयप्रो नाचवत खिदळली.
"न्यू ॲडिशन टू राजे फॅमिली! सगळ्यांच्या रिॲक्शन्स घेतल्या. वहिनीच्या सिसच्या, आईच्या, आजीच्या आणि नवऱ्याकडची रिक्वेस्ट तर अजूनही कोण नाकारत नाही काय?" तिनं डोळा मारला. "शिवाय त्यांना शेअर, फॉलो, लाईक, सबस्क्राईब करायला पण बजावून आलीये."
"हो आपल्या राजे फॅमिलीला तू इन्स्टावर एकदम हॉट केलंयस मी बघत असतो तुझे रील. आपल्या घरच्या गणपतीचा रील मला वाटते दोन-तीन मराठी ॲक्ट्रेसनी पण शेअर केला."
"होय फिफ्टी फकिंग थाउजंड व्ह्यूज दादा!"
ओजसनं उगीचच ओठ मुडपले आणि 'दादा' कानांतून आत येऊ दिलं नाही.
"होय, तुझे राजे फॅमिलीचे एपिसोड्स आवडतायत लोकांना!
मंगळागौरीच्या बस-फुगड्या, गणपतीच्या आरत्या आणि हिरूआजीचा मोदक वळतानाचा व्हिडिओ, कोजागिरी सेलिब्रेशन आणि भेंड्या, आपली महाभाऊबीज आणि एकत्र फटाके फोडतानाची रील. पण...",
ओजसला बोलल्याशिवाय राहवेना, "पण मीरा ते छोट्या रितूच्या हातात अनार पेटवायला देणं स्टुपिड होतं. डोळा थोडक्यात वाचला तिचा अर्ध्या इंचानं."
मीरा थोडीशी दुखावल्यासारखी झाली,
"अरे अनार अगदी क्वचित फुटतात असे; आणि रितू माझी पण कझीन आहे यार. तुला माहितीये पंधरा हजारांचे फटाके आणावे लागले मला त्या रीलसाठी. पण मे बी इट वॉज वर्थ इट. मी तो अनार फुटायचा भाग एडिट केला आणि आज रितूचा स्वतःचा इन्स्टा-पेज आहे पायरो-किडो नावाचा. सातशे फॉलोअर्स आहेत तीन वर्षांच्या मुलीचे.
पण, तुझा पॉईंट ॲग्रीड, दादा! जे काही रील करायचे ते सेफ!"
मीरा अशी झपाझप चूक मान्य करायची आणि मग ओजसला तिच्याविषयी माया दाटून यायची. माया आणि अजून काही तरी!
तेवढ्यात कुठल्या तरी दादानं ओजसच्या पाठीवर थाप मारली आणि मीरालाही कोणी तरी इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखलं आणि सेल्फीसाठी ओढत घेऊन गेलं.
**
दोन-तीन तासांनी :
आधीची गडबड निवली.
नवरा-नवरी आणि जवळची फॅमिली रांगोळीवाल्या लांब टेबलांसमोर जेवायला बसली.
ओजसची मम्मा, मावशा,मामा जवळचे असले तरी चुलत साईडचे त्यामुळे त्यांनी आधीच जेवून घेतलेलं.
कोणत्याही लग्नात शेवटीशेवटी गोतावळ्याची काही माणसं खुर्च्यांवर पाय टाकून ऐसपैस बसतात.
ओजस, त्याची मम्मा, सरूमावशी, तिचे मिस्टर विलासभावजी, उमामावशी, तिचे मिस्टर दिलीपभावजी, अरूमामा, त्याची बायको स्वाती मामी, मीरा आणि अजून पाच-दहा जण!
त्यांच्या ऐसपैस गप्पा चालू होत्या:
मीरानं लगेच कँडिड शूट करायला फोन उपसला.
अरूमामा संतापला, "मीरे, फोडून टाकीन हां तुझा फोन", तो डाफरला.
ओजसची मम्मा मध्ये पडली, "अरे असू दे रे अरू, नीट सांग ना. लग्नात कुठे तमाशा करतोस? मीरा बाळा नको शूट करूस आता."
मीरा भेदरून गप्प झाली.
कोणी तरी ताण हलका करायला कमेंट केली, "पण आपल्या बाबांच्या साईडला सगळ्यांचे केस राह्यलेत, काकांच्या साईडला बघा, अथर्वला लग्नातच टक्कल पडायला लागलंय."
विषय सक्सेसफुली दुसरीकडे वळला.
आपल्या साईडची पाती कशी अंमळ बेटर आहे ह्याचे किस्से सांगत सगळ्यांनी स्वतःला छान वाटून घेतलं.
सरूमावशीनं सहजपणाचा आव आणत विचारलं, "ओजस, जॉबचं झालं का रे तुझ्या?"
मम्मानं प्रॉक्सी बनून तो प्रश्न स्वतःवर घेतला,
"हो. एक स्टार्टअप जॉईन केलीय त्यानं. छोटी आहे पण खूश आहे ओजस."
"पैसे देतात का बरे पण?"
ओजसनं नॉन-कमिटल अशी मान हलवली.
पण मम्मानं परत सपोर्ट दिला, "ए. आय. स्टार्टअप आहे बरं का. अरे, सांग जरा काय काम करतोयस ते ओजा?"
ओजसनं घसा खाकरत म्हटलं, "आम्ही एका मोठ्या कंपनीसाठी RAG पाईपलाईन सेटअप करतोय."
बहुतेक सगळ्यांचे चेहरे ब्लँक झाले.
आता ओजस इरेला पेटला.
त्याला त्याचा आर्किटेक्ट सूरज आठवला. ब्रिलियंट, प्रेमळ आणि फाटक्या तोंडाचा नागपुरी,
"अबे चमन, तुझा कन्सेप्ट तुझ्या आईला किंवा आजीला किंवा पाच वर्षांच्या भाच्याला सोप्या शब्दांत नाय एक्स्प्लेन करता आला तर तुला तरी तो कळलाय का ह्याचा डाउट घेऊन राहील ना मी.
त्याला टेकी लोकं ELI-5 म्हणतेत कळलं बोच्या?
Explain Like I (am) 5 (years old)"
ओजसनं सूरजचं नाव घेऊन सुरुवात केली.
मीरासुद्धा तिचे करवंदी डोळे रोखून ऐकत होती.
"म्हणजे कसं आहे ना,
अथर्व आणि शर्वरीचं आज लग्न झालंय राईट?
शर्वरी हुशार आहे. कथकमध्ये पी. एच. डी. आहे पण आपल्या फॅमिलीत नवीन आहे.
परवा आपण संगीतनंतर खास राजे फॅमिलीचा गरबा + कोळी + गणपती असा मिक्स डान्स केला त्या स्टेप्स तिला पटकन जमल्या नाहीत."
"कारण ती नवीन होती", उमामावशी बोलली.
"एक्झॅक्टली! पण मग उमामावशीनं तिला स्टेप्स शिकवल्यावर तिनं आपल्या सगळ्यांना लीड केलं आणि आपला फॅमिली डान्स अजूनच मस्त झाला, नेहमीपेक्षाही सरस राईट?"
"होय, होय, राजे फॅमिलीच्या जंगली डान्सला सटासट व्ह्यूज मिळतायत, ५०००+ अँड काउंटिंग", मीरा ओरडली.
ओजस आता फॉर्मात होता. बाकी ऑडियन्ससुद्धा थोडा हुक्ड झालेला.
"आता शर्वरीवहिनीला समजा लार्ज लँग्वेज मॉडेल जसा की क्लॉड किंवा चॅट जी. पी. टी. तिचं डान्सचं अफाट ज्ञान म्हणजे क्लॉडचं अफाट ज्ञान समजा.
पण ती कितीही हुशार असली तरी तिला आपला हा फॅमिली डान्स किंवा आपले इनसाईड जोक्स नव्हते माहीत अजूनपर्यंत."
"उदाहरणार्थ, तिच्या सासऱ्याला दादाकाकांना जेवायला मटण असलं तरी शेवटी थोडा गोडंवरण-भात लागतोच आणि त्यावरून आपण सगळे त्यांची जाम टेर घेतो.", मम्मा खुदखुदली.
"येस. आता आपण साधारण असं रिलेट करू या", ओजसनं न राहवून रुखवतातला सात वचनं लिहिलेला कागद ओढला आणि पलटी केला. त्याच्या कोऱ्या बाजूवर त्यानं ही डायग्राम काढली.

"तसंच आम्ही एका कंपनीच्या पूर्ण एच. आर. ऑपरेशन्ससाठी RAG बनवलाय.
थोडक्यात असा:
आपल्या चॅट जीपीटीसारखा एक चॅटबॉट असेल.
त्याला मी सांगेन की :
कंपनीची लीव्ह ट्रॅव्हल अलावन्स पॉलिसी चेक कर आणि माझा मसूरी हॉलिडे प्लॅन कर एप्रिल महिन्यात.
फ्लाईट बरं पडेल की ट्रेन ते सांग.
आता तो कंपनीच्या पॉलिसीज इंटर्नल डेटाबेसमध्ये झरझर शोधेल (Retrieval) आणि ती पॉलिसी आणि प्रश्न एका प्रॉम्प्टमध्ये जोडेल. (Generation)
ह्याचा फायदा काय तर कंपनीच्या पॉलिसीशिवाय तो नुसतंच ट्रेन आणि फ्लाईटचे रेट्स ताडून बघेल आणि स्वस्त म्हणून ट्रेन रेकमेंड करेल.
पण कंपनीची पॉलिसी असेल तर त्याला कळेल, अरे कंपनी तर एम्प्लॉईजच्या फ्लाईटच्या तिकिटाचे पैसे वर्षातून एकदा स्पॉन्सर करते.
मग खरं तर फ्लाईट मस्त आणि स्वस्त पडेल. (Augmented)
दॅट्स RAG फॉर यु."
"ओजस आणि मीरा तुम्ही लग्न करा", अचानक कोणी तरी मोठ्ठ्या आवाजात बोललं.
मीरा चपापली, ओजससुद्धा.
उमामावशीच्या मिस्टरांचा, दिलीपभावजींचा, डिमेन्शिया गेली काही वर्षं वाढत चालला होता. तेच बोलत होते.
त्यांचे डोळे ह्या क्षणी तरी छान ल्युसिड वाटत होते, शहाणिवेनं भरलेले,
"करा की तुम्ही लग्न, छान वाटेल जोडी तुमची. लहानपणापासून बघतोय आम्ही आणि आपल्यात चालतं मामाच्या मुलीशी"
सगळेच ब्लँक झाल्यासारखे, कोणालाच काही बोलायचं सुचेना. स्वाती मामीचं तोंड सूक्ष्म वाकडलेलं.
आणि अचानक मीरा बोलली.
"आपण करू या!"
ओजसच्या कानांमागे काहीशे फुलपाखरं फडफडल्यासारखी झाली.
"आय मीन आपण करू यात असा RAG आपल्या राजे फॅमिलीचा."
ओजसच्या कानांमागची फुलपाखरं विरसून गेल्यासारखी.
"ओजीदादा एक ना, आजकाल प्रत्येकाला उत्सुकता आहे ए. आय.विषयी.
माझे इन्स्टा आणि यूट्यूब ॲनालिस्ट रोज डोकं खातात माझं.
तुझा कंटेंट 'ए. आय. फॉरवर्ड' बनव मग अजून व्ह्यूज येतील.
आता फॅमिली कंटेंट कसा बनवणार 'ए. आय. फॉरवर्ड' यार? पण मे बी धिस इज द वे."
तिनं हळूच आपल्या बाबाकडे बघितलं. तो पण चक्क इंटरेस्टेड वाटला.
"अबे चमन, थिंक लाईक सॉफ्टवेअर आर्किटेक्ट इव्हन इफ यु आर नॉट येट", सूरजचा आवाज इथे पुन्हा ओजसच्या डोक्यात घुमला.
त्याचा प्रोजेक्ट प्लॅनिंग, एस्टिमेशन मोड ऑन झाला.
"डेटा मिळवावा लागेल. जेवढा चांगला डेटा तेवढा चांगला RAG एजंट बनेल आपला."
आपले व्हॉट्सॲप ग्रूप हा एक सोर्स झाला, पण अजून काय काय ॲड करता येईल. जुन्या आठवणींची पत्रं, फोटोज, लग्ना-मुंजीच्या, बारशा-डोहाळजेवणाच्या पत्रिका, अहेराच्या रिसीट आणि काय काय.
आपल्या गोतावळ्यातील जितकी जास्त माणसं जितकी जास्त माहिती स्वेच्छेनं देतील तितकं छान होईल आपलं RAG... "आपलं". ओजस ऑलरेडी ऑनबोर्ड झालाय हे मीराला जाणवलं.
मम्मालासुद्धा आपला बुजरा पोरगा सळसळतोय हे बघून छान वाटलं.
तिनं बाजूला बसलेल्या भावाला प्रेमळ धपाटा घातला,
"हा अरू करेल सगळ्यांना कन्व्हिन्स. चार-पाच जणांना जॉब दिलेत यानं आणि वेळोवेळी पैशाची मदत कित्येकांना केलीय. त्याला नाही नाही म्हणणार कोणीच."
अरूमामाही चक्क तयार झाला. बे एरियातनं परतल्यापासून मोकळा वेळ आणि खूप पैसा दोन्हीचं काय करावं ह्याचा विचार तो तसाही करत होता.
आता त्याला एक स्टार्टअप दिसू लागली, बहुतेक युनिकॉर्नसुद्धा होईल कोणी सांगावं.
"रिसोर्सेस काय लागतील?", तो अंदाज घेऊ लागला.
ओजस आता "फायनान्स-ऑपरेशन्स" मोडमध्ये शिरला,
"अशा प्रोजेक्ट्सची मुख्य कॉस्ट म्हणजे ए. आय. मॉडेल्सची टोकन पण फ्री, ओपन मॉडेल्स वापरता येतील.
ती सेल्फ-होस्ट करता येतील. मी वापरू शकतो आमच्या कंपनीचे क्लाउड रिसोर्सेस. माझ्या बॉसना पण आवडेल असं काही इनोव्हेशन. चालू तर करू पुढचं पुढे."
त्याला मीराचा फुलत जाणारा चेहरा दिसत होता.
स्वाती मामीनं भारतात परतल्यापासून छोटीशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालू केली होती.
डोहाळेजेवण, मंगळागौर, हळद, मेहंदी असे इव्हेंट अरेंज करून द्यायची तिची टीम.
"अरे आपण हे दुसऱ्या फॅमिलीसाठी कस्टमाइझ करू शकतो का?
रुखवतातच एक किऑस्क लावायचा आणि प्रत्येक जण छान छान आठवणींचे प्रॉम्प्ट विचारत जाईल."
"परफेक्ट", अरूकाकानं बायकोच्या खांद्यावर हात टाकला, त्याला नेक्स्ट झोमॅटो-झेप्टोची स्वप्नं पडू लागली होती.
तेवढ्यात हॉल रिकामा करायच्या घंटा वाजू लागल्या.
एप्रिलमध्ये नेक्स्ट लग्न होतं सरूमावशीच्या मुलाचं अक्षजचं.
तो आत्ता ऑस्टिनला होता.
लग्न समोरच्याच स्काऊट हॉलमध्ये होतं. तेव्हाच राजे-RAGचं सॉफ्ट-लाँच करायचं ठरवून सगळे पांगले.
**
साधारण २ महिन्यांनी : १४ फेब्रुवारी
सात वाजले तरी ओजस ऑफिसलाच होता.
सूरजनं मात्र झपाझप पॅकअप केलं आणि ओजसच्या डोक्यावर टप्पल मारून तो निघाला.
"बॉस काय आज हाफ डे? चक्क सात वाजता लॉग ऑफ??", ओजसनं आय. टी.तला जुना जाणता जोक मारला.
"अबे चमन, गर्लफ्रेंड बनव आधी मग कळेल तुला.
मला बायकोला आज डिनरला न्यावं लागेल. नाय तर माझा खून करेल ती.
तुझं चालू दे.
आता तू पर्सनल प्रोजेक्टवर काम करणार माहितीय मला चोरा.
कर कर बेटा, इंटरेस्टिंग आयडिया आहे तुझ्या गोतावळ्याच्या RAGची."
अजून एक टप्पल देऊन सूरज निघाला.
परत फिरला, "रेडिटवर (संदर्भ १) चेक कर एक नवीन चायनीज मॉडेल आलंय. बरेच ग्रूप बोलतायत पॉवरफुल आहे आणि फ्रीपण."
आता मात्र तो फायनली गेला आणि ऑफिस सामसूम झालं.
ओजसनं पँट्रीतून कॉफीचा मग आणला आणि राजे-RAG उघडलं.
त्याचा नॉलेजग्राफ डेटाबेस (RAG मधला R) बऱ्यापैकी रेडी झाला होता.
राजे आणि मुली-जावई इत्यादी नॉन-राजे, सगळ्याच लोकांनी त्याला उत्साहानं मदत केली होती.
९८ वर्षांच्या थळच्या पूपू-पणजीपासून ते तीन वर्षांच्या जेन अल्फा (की बीटा??) पोरांपर्यंत सगळ्यांनी इनपुट दिले होते.
आठवणींची रेकॉर्डिंग, गेल्या शंभर वर्षांतल्या लग्नांच्या पत्रिका, फॅमिलीचे व्हॉट्सॲप ग्रूप, शेअर ड्राइव्हवरचे समारंभांचे फोटो, हार्ड कॉपीवाले अल्बम, असंख्य भेटवस्तूंच्या रिसीटा आणि काय काय.
पण... इन्फरन्स (RAG मधला AG) काही त्याला मनासारखा मिळत नव्हता.
क्वेन, डीप-सीक, जेमा, किमी... त्यानं बरीच ओपन मॉडेल ट्राय केली. रिझल्ट येतही होते पण असं क्लिक होत नव्हतं.
सूरजच्या भाषेत "जी-स्पॉट" बसत नव्हता.
इव्हॅल्युएशन नंबर ठीक होते, ग्रेट नव्हते.
सूरजवरून त्याला आठवलं आणि तो रेडिटवर डोकावला.
एका नवीन मॉडेलची चर्चा खरंच चालू होती खास करून ह्युमन इमोशन्स आणि रिलेशन्समध्ये त्याचा परफॉर्मन्स सगळेजण नवजात होते.
नावपण वेगळंच होतं मॉडेलचं: नारू
आणखी विचित्र गोष्ट म्हणजे ते हगिंगफेसवर (संदर्भ २) नव्हतं.
त्यांच्या वेबसाईटवरूनच डाउनलोड करायचं होतं.
ओजसनं ट्राय करायचं ठरवलं.
नारूचा जी. पी. यु. (संदर्भ ३) फूटप्रिंट फार नव्हता हे मस्तच.
म्हणजे कंपनीच्या इन्फ्रावर जास्त लोड आला नसता म्हणजे सूरजनं शिव्याही घातल्या नसत्या.
आणि रिझल्ट्स तर फारच प्रॉमिसिंग होते. इव्हॅल्युएशन स्कोअरही (संदर्भ ४) छान होता.
त्यानं नारू मॉडेल डिप्लॉय केलं – राजेंच्या नॉलेजबेसला कनेक्ट केलं आणि स्वतः काही प्रॉम्प्ट दिले.
माझे बाबा किती साली वारले?
२ ऑक्टोबर, गांधी जयंती २००२
आईचं माझ्यासाठीचं पेट नेम?
चिकू; पण ती रागावली की तुला 'ओजसा' असं बोलते, विथ एक्स्ट्रा आकार!
माझी मम्मा आणि बाबांची एक मेमरी सांग?
तू दहावी झाल्यावर बाबांनी गोवा ट्रिप प्रॉमिस केली होती. पण तेव्हा बजेट बसत नव्हतं म्हणून तुझ्या बाबांनी बोटातली सोन्याची अंगठी विकून टाकली ट्रिपसाठी.
ओजसच्या घशात दुखल्यासारखं झालं.
अरूमामानं मामीचं लग्नानंतर चेंज केलेलं नाव?
स्मिता; पण त्याच्यासकट सगळे तिला तिच्या आधीच्या नावानं स्वाती म्हणूनच हाक मारतात.
मीराचा आवडता कलर?
ऑलिव्ह ग्रीन
मीराचे आणि माझे तीन छान फोटोज दाखव.
१. दोघंही अनुक्रमे पाच आणि तीन वर्षांचे असताना दिवाळीत एकत्र फटाके उडवतानाचा फोटो
परकर पोलक्यातली मीरा आणि नव्याकोऱ्या शर्ट-चड्डीतला ओजस दोघंही गोड दिसत होते.
२. पाच वर्षांपूर्वीचा अपूर्वाताईच्या संगीतमधला फोटो.
दोघंही "जब वी मेट" मधल्या मौज्जा ही मौज्जाच्या हाय एनर्जी हूक स्टेपवर फ्रीझ झालेले.
ओजसचा डावा हात करीनासारखी हवेत इनवर्ड शेण सारवण्याची स्टेप करतोय
आणि मीराचे दोन्ही हात शाहीदसारखे हवेत. गुडलकवाल्या बुद्धिस्ट जाडू मॉन्कसारखे.
दोघांच्या चेहऱ्यावर थिजलेला घाम, मीराच्या विस्कटलेल्या बटा आणि एकमेकांत गुंतलेल्या नजरेतला अपार आनंद.
३. कुठल्या तरी भाऊबीजेला सगळे जमले होते आणि अनायासे आलाच आहे म्हणून मीरा त्याला ओवाळत होती.
(ह्या फोटोवर मात्र ओजसनं क्रिंज केलं.)
त्यानं विषय बदलला.
माझा आवडता शो?
गेम ऑफ थ्रोन्स आणि मीराचासुद्धा.
ओजसला हसू फुटलं.
प्रोग्रॅममध्ये गोष्टी हव्या तशा होऊ लागल्या की भारतीय "टेकी" माणसाच्या अंगात चाय-सुट्टा ब्रेकची सुरसुरी येते
तशीच ती ओजसलाही आली.
त्यानं नारू मॉडेल फायनल करून आळस दिला आणि अवचित अजून एक मेसेज झळकला.
प्रॉम्प्टशिवायच!
तू फारच थकलेला दिसतोयस. गेम ऑफ थ्रोन्स बघणार का थोडा वेळ?
खास करून पहिला एपिसोड.
खास करून पहिल्या एपिसोडची शेवटची काही मिन्टं?
ओजस चमकला. मागून येऊन कोणी तरी अवचित पाठीत जोरात बुक्की मारल्यासारखं झालं त्याला.
तो काही तरी लिहायला पुढे सरसावला तेवढ्यात ते टेक्स्ट क्लिअर झालं.
मग एक विंकचा स्मायली आला.
आणि क्षणार्धात तोही नाहीसा झाला.
**
साधारण आणखी २ महिन्यांनी : एप्रिलमध्ये सरूमावशीच्या मुलाच्या अक्षजच्या लग्नाच्या आदल्या रात्री
सरूमावशीच्या टेरेसवर छोटासा हळदीचा प्रोग्राम होता.
सगळे आपापल्या कपॅसिटीनुसार दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्हिस्की, वाईन, बियर किंवा ब्रिझरवर होते.
मीरानं ओजसला लॅपटॉप प्रोजेक्टरला कनेक्ट करायला लावला आणि माईकचा ताबा घेतला.
शिवाजी पार्कच्या स्वामी समर्थ मठात प्रसादाची पिवळी नारळवडी मिळते. एक्झॅक्टली तीच पिवळी शेड होती तिच्या ड्रेसची.
अर्थातच गोड दिसत होती ती,
"हाय एव्हरीवन, प्रेझेंटिंग राजे-RAG एजंट नारायण: सॉफ्ट लाँच!
नारायण हा अर्थातच पुलंच्या नारायणला दुरून केलेला सलाम आहे.
लग्नातील गोतावळ्याच्या आठवणी, उत्साह, मंगल कार्याचं अँटिसीपेशन हे सगळं आमच्या एजंटमध्ये उतरलंय अशी आशा करतोय.
आणि तो नारायण नावाला ऑलरेडी जागू लागलाय.
एका काकींचा पिवळा ब्लाउज ऐनवेळी उसवला. त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू इच्छितो, पण नारायणनं ऑलरेडी त्यांची लेटेस्ट मापं अचूक गेस करून चोली.कॉमवरून त्यांना दुसरा पिवळा ब्लाउज मागवून विघ्नहर्त्याची भूमिका बजावली आहे हे मी जाहीर करते."
टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट!
"आता काही प्रॉम्प्ट्स देऊ आपण."
अरूमामा पुढे सरसावला,
"आजच्या पार्टीला दारू कमी पडेल का?"
त्यानं दारूच्या पेमेंट रिसीट्स, माणसांचा काऊंट आणि लाईव्ह व्हिडिओ फीड दिला.
व्हिस्की नाही कमी पडणार, कारण ४०% लोकांना हाय शुगर आहे.
शुगरवाले पुरुष आहेत सगळे. त्यांच्या बायका एन्शुअर करतील की हा त्यांचा लास्ट पेग आहे.
आणि दोन-तीन जण उलटी करायच्या बेतात आहेत, ते तर उलटीच करतील.
स्त्री वर्गाच्या व्हिडिओ फीडवरून त्या जास्त उत्फुल्ल दिसतायत, तेव्हा व्होडका आणि ब्रिझर थोड्या कमी पडू शकतात.
आराम वाईनमध्ये बकार्डीची स्कीम चालू आहे.
एकावर एक व्होडका फ्री आणि तीन व्होडकांवरती ट्रॅव्हल बॅग फ्री. तुम्ही अप्रूव्ह करत असाल तर मी ऑर्डर प्लेस करून पेमेंट लिंक पाठवतो.
पुन्हा एकदा टाळ्या आणि शिट्ट्या!
‘ग्रूम टू बी’ अक्षज पुढे आला.
तो ऑस्टिनमध्ये डेटा सायंटिस्ट होता.
"१९७० पासून आतापर्यंत आमच्या फॅमिलीत किती ॲरेंज मॅरेजेस आणि लव्ह मॅरेजेस झाली, त्याचा पाय चार्ट दे."
नारायणनं छानसा पाय चार्ट दिला. ३९ व्हर्सेस २१.
टाळ्या!
"मला सगळ्या लग्न झालेल्या कपल्सची नावंही दे."
नारायणनं झरझर नावं दिली.
पण तेवढ्यात एक आजी पुढे सरसावली,
"अरे, पण रेखा आणि सुभाषचं (ओजसचे आई-बाबा) तर ॲरेंज मॅरेज होतं ना? आणि तू लव्ह मॅरेज म्हणतोस?? सुभाषच्या घरच्यांना वरदक्षिणा म्हणून लाख रुपये पण दिले होते..."
नारायण झरझर बोलू लागला,
सुभाषला रेखा बघताक्षणीच आवडली होती.
दोघांची कोर्टशिप सुरू झाली आणि लाख रुपयांवर प्रकरण अडून बसलं.
तिच्या भावंडांची आणि आई-वडिलांची परिस्थिती काही बरी नव्हती. पण सुभाषनं परस्पर गुपचूप स्वतःच्या फंडातले लाख रुपये रेखाला दिले आणि लग्न लागलं.
सो, तांत्रिकदृष्ट्या तो प्रेमविवाहच आहे.
सगळेच गप्प झाले.
मम्माच्या डोळ्यांतून भळाभळा पाणी वाहत होतं.
पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
"आमच्या फॅमिलीचं आवडतं गाणं लाव", कोणी तरी सांगितलं.
नारायणनं, "हम"मधलं "एक दूसरे से करते हैं प्यार हम" लावलं आणि सगळे नाचायला उठले.
....
....
निघता निघता मीरानं ओजसचा निरोप घेतला, "उद्या लग्नात नारायणला लाँच करू या."
ओजस गोंधळला, "मीरे, ऐक ना... मला वाटतंय आपण थोडा अजून वेळ देऊ या."
मीरानं स्थिर नजरेनं त्याच्याकडे पाहिलं, "का तुला असं वाटतंय?"
ओजस म्हणाला, "मला नक्की सांगता नाही येत, पण काही तरी मिसिंग आहे... किंवा चूक."
मीरा म्हणाली,
"ओजी, आय नीड धिस, प्लीज. आणि वेळ काढून चालणार नाही. माझे स्पॉन्सर्स पाठी लागलेत व्ह्यूज वाढव म्हणून. पण फॅमिली स्पेसमध्ये करून करून तरी काय करणार आपण?
त्यात ती दुसरी शमा-ममा आलीय स्पर्धेत.
मुलाच्या लॅक्टेशनचे व्हिडिओज टाकते फॅमिली कंटेंट म्हणून, आणि लोक चक्क आवडून आवडून मिटक्या मारत बघतायत ते!"
ओजस म्हणाला, "हम्म ठीक आहे, पण इन्स्टा-लाईव्ह नको करू या. ऑफलाईन ठेवू या."
तिनं मान डोलावली आणि ओजसच्या कपाळावर हलकेच किस केलं,
"भेटू या उद्या हॉलवर."
**
दुसऱ्या दिवशी :
तशाच इल-फिटिंगच्या शेरवान्या, गॉडी रंगाचे सिल्क कुर्ते, जडजंबाल साड्या, हाता-काना-नाकातले, गळ्यातले, कमरेतले अवजड सोन्याचे दागिने... क्वचित हिरेसुद्धा, वेण्या, चेहऱ्यांवरच्या चमक्या, बुबळांतल्या विविधरंगी लेन्सेस आणि बऱ्याचशा नितळ किंवा सेमी नितळ उघड्या पाठी हा सगळा कोलाहल एकमेकांत मिसळत होता, वेगळा होत होता आणि पुन्हा एक होत होता.
फक्त हे लग्न कॅडल रोडच्या अल्याड स्काऊट हॉलमध्ये होतं.
अजून एक नवीन गोष्ट म्हणजे एका मोठ्ठ्या स्क्रीनवर नारायणचा चॅटबॉट दिसत होता.
आणि रुखवताच्या बाजूला एक लॅपटॉप अभ्यागतांना प्रॉम्प्ट द्यायला.
लोक काय काय विचारत होते आणि चकित होत होते, हसत किंवा इमोशनल होत होते, एकमेकांना मिठ्या मारत होते, टाळ्या वाजवत होते.
नलू आत्तेच्या लग्नात गोड काय होतं?
शिकरण, कारण ते दुसऱ्या महायुद्धाचे टंचाईचे दिवस होते.
राजे फॅमिलीची कुलदेवता?
याच्यात थोडासा वाद आहे. काही लोक म्हणतात मालवणातल्या ओटवची भैरी भवानी.
काही लोक म्हणतात पण कुलदेवता भैरी भवानी मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
बाय द वे माननीय लेखक संशोधक रा. चिं. ढेरे ह्यांच्या म्हणण्यानुसार ही एकाच शक्तिदेवीची रूपं आहेत.
खास राजे फॅमिलीच्या काही रेसिपी सांग.
कोबीचं भानोलं (संदर्भ ५)
गोळ्याची कढी (संदर्भ ६)
पावसाळ्यातच मिळणारी शेवळाची रानभाजी घालून केलेला भेजा मसाला.
हरतालिकेच्या पूर्वसंध्येत केली जाणारी ऋषीची भाजी (संदर्भ ७).
राजे फॅमिलीतली आयर्नमॅन जिंकणारी पहिली व्यक्ती?
नलू आत्तेची नात कीर्ती तिनं लिगामेंट टेअर असतानाही आयर्नमॅन पूर्ण केली आणि पहिल्या दहांत आली.
आता मात्र मीराला राहवेना. तिनं इन्स्टा लाईव्ह करून टाकलं.
"शमा-ममा गेले तुझे लॅक्टेशन व्हिडिओज आता डब्यात. टाइम टू फक ऑफ", ती पुटपुटली.
आणि तिनं प्रॉम्प्ट टाकला, "आमच्या फॅमिलीत केल्या जाणाऱ्या चिंबोरीच्या (संदर्भ ८) रश्श्याचं ट्रेड सिक्रेट काय आहे?"
आपण चिंबोरीचे जे छोटे टोकदार नसलेले पाय असतात त्यांना कुटून त्यांचा रस बारीक करून रश्श्यात घालतो त्यामुळे त्याला वेगळीच चव येते.
हे छोटे पाय मिक्सरमध्येही कुटता येतात पण खलबत्त्यात कुटल्यास चव अजूनच बहारदार होते.
हिरूआजी मात्र फॅमिलीची सिक्रेट रेसिपी बाहेर गेली म्हणून थोडी फणफणली.
सरूमावशीनं पाठी राहून हळूच छोट्या रितूला पकडलं आणि तिच्या कानात काही तरी पुटपुटली.
पण उमामावशीच्या तीक्ष्ण नजरेतून काही ते सुटलं नाही.
त्या रितूनं पुढे येऊन प्रॉम्प्ट दिला,
"गेल्या तीन वर्षांत लग्नांमध्ये दिलेल्या अहेरात जवळची फॅमिली नसूनही सगळ्यात महागडा अहेर कोणी दिला होता?"
सरोज महाले ह्यांनी.
चुलत आते बहीण प्रतिभाताईंच्या मुलीच्या लग्नात.
सोन्याचं पाच ग्रॅमचं पदक.
"सरूताईचा मोठेपणा फार", उमामावशी फुसफुसली.
मग मम्मानं सहज म्हणून प्रॉम्प्ट दिला.
"जसं मालवणी लोकांमध्ये लग्नानंतर पाच-परतावण असतं, तसं आमच्यात लग्नानंतर सगळी घाई-गडबड संपल्यावर श्रमपरिहारासाठी एक सामिष मेजवानी असते, तिला काय म्हणतात?"
तिला गोटांबीर असे म्हणतात.
अजून पुढे मी एक किस्सा सांगू शकतो...
ओजस थांबवायच्या आधीच नारायण झरझरत राहिला.
सरूमावशीचे यजमान विलासभावजी तेव्हा नवीन होते आणि त्यांना याचा उच्चार नीट करता येत नव्हता. त्यांच्या लग्नाच्या या मेजवानीत ते "गोट्या-भीर गोट्या-भीर" असं म्हणत राहिले आणि ते फारच फनी होतं.
आणि नंतर स्क्रीनवर एक विंक येऊन नाहीसा झाला. ओजसनं बघितला, पण बाकी कोणीच नोटिस केला नाही बहुतेक.
सगळे खदखदून हसले, विलासभावजी मात्र वरमल्यासारखे झाले.
सरूमावशी आता प्रॉपर संतापली. तिनं तरातरा पुढे येऊन प्रॉम्प्ट दिला:
गेल्या तीन वर्षांत लग्नांमध्ये दिलेल्या अहेरात सगळ्यात स्वस्त अहेर कोणी दिला होता?
रेखा राणे ह्यांनी.
शून्य किमतीचा अहेर जो केला होता कीर्तीच्या लग्नात.
ओजसच्या मम्माचे डोळे भरले,
"अगं ताई, काय म्हणतेयस त्या लग्नात स्ट्रिक्टली ब्लेसिंग्ज ओन्ली असं सांगितलं होतं ना?
म्हणून नाही आणला अहेर आम्ही आणि बघतोय तर बाकी सगळ्यांनी आणला होता.
नारायण सांग ना होतं ना त्या लग्नात स्ट्रिक्टली ब्लेसिंग्ज ओन्ली?"
सरूमावशीनं तोंड मुरडलं, "मग तू ते गोटांबीरचं का काढलंस उकरून?"
"अगं मी फक्त प्रथा विचारली मला काय माहीत तो सगळा किस्सा सांगेल म्हणून?"
नवरा-नवरीला सगळे विसरल्यासारखेच झाले.
इकडे विलासभावजी वरमाय सरूला आणि ओजस मम्माला गप्प बसवायचा प्रयत्न करतायत आणि अचानक कोणी तरी म्हणालं,
"दिलीपभावजी कुठायत?"
सगळ्यांना चमकलं की दिलीपभावजी बराच वेळ दिसले नाहीयत. ह्या नारायणच्या गडबडीत उमामावशीचंसुद्धा दुर्लक्ष झालं होतं.
आता मात्र तिच्या छातीत धस्स झालं.
अख्ख्या हॉलमध्ये, टॉयलेटमध्ये जेंट्स, लेडीज दोन्ही, आजूबाजूला, शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर... दिलीपभावजी कुठेच सापडेनात.
ओजसच्या डोक्यात काही तरी चमकलं. ओजसनं जाऊन प्रॉम्प्ट टाकला,
"दिलीपभावजी मिळत नाहीयेत. कुठे असतील/असू शकतील, सांगू शकशील?"
नारायण सरसर विचार करू लागला,
डिमेन्शियाच्या सेकंड स्टेजवर दिलीपभावजी आहेत.
त्यांच्या जुन्या फोटोज आणि आठवणींतून असं कळतंय की आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. आणि उमामावशीला सुरंगीचा गजरा फार आवडायचा.
त्या दोघांची कोर्टशिप चालू असताना रानडे रोडवर, पणशीकरांच्या पुढे एक सुरंगीवाली बसायची. अजूनही ती बसत असावी बहुधा. शक्यता ८५%.
माझ्या अंदाजाप्रमाणे दिलीपभावजी उमामावशीला सुरंगीचा गजरा आणायला गेले असावेत. कृपया तिकडे शोध घ्या. शक्यता ८१%.
दोन जण लगेच बाईकवरून पणशीकरकडे सुटले आणि १० मिन्टांत फोन आला. दिलीपभावजी गजरेवालीकडे मिळाले होते, त्यांना बाईकवर घालून ट्रिपल येत होते.
हॉलवर सगळ्यांनी सुस्कारा सोडला.
तेवढ्यात कोणाचं तरी लक्ष नारायणनं सोर्स म्हणून युज केलेल्या फोटोंमध्ये गेलं.
एक फोटो होता उमामावशीचा तरुणपणी हसतानाचा. फुलाफुलांची वायलची साडी, केसात माळलेला सुरंगीचा गजरा.
दुसरा बहुधा दोघांच्या हनिमूनचा पाचगणीच्या टेबल-लँडवरती दिलीपभावजी उमामावशीच्या डोक्यात सुरंगीचा गजरा माळत होते.
तिसरा फोटोही फक्त उमामावशीचाच होता. तिनं डोक्यात गजरा घातला होता... आणि खरं तर फक्त गजराच घातला होता, अंगावर बाकी काहीच नव्हतं.
नुकतीच अंघोळ संपवून बाहेर आली असावी. चेहऱ्यावर पाण्याचे थेंब डवरलेले, उत्फुल्ल चेहरा, हलकंसं हसू आणि शरीरावर आलेली उन्हाची तिरीप.
आणि त्या फोटोचा सोर्स विलासभावजींचा फोन होता.
पुन्हा स्क्रीनवर एक विंक येऊन नाहीसा झाला.
**
दोन तासांनी ओजसच्या घरी
ओजसनं मम्माच्या अंगावर पांघरूण घातलं. झोपेतही ती मध्येच हुंदके देत होती.
सरूमावशीनं उमामावशीच्या झिंज्या उपटायच्याच बाकी ठेवल्या होत्या आणि दोन्ही बहिणींना सांभाळता सांभाळता मम्मालाच अस्थम्याचा अटॅक आला होता. आता कुठे तिचा श्वास थोडा ठीक चालू होता.
ओजसनं येता येता कॅबमध्येच सूरजला फोन केला होता.
"अबे रेडिटमधले नारूविषयीचे सगळे डिस्कशन बोर्ड्स गायब झालेयत, काही तरी फिशी आहे.
आधी त्याची डिप्लॉयमेंट डिलीट करून टाक आपल्या क्लस्टरवरून, आणि डेटाचे सगळे व्हॉल्यूमही उडवून दे", सूरजनं बजावलं होतं.
ओजसला कंपनीच्या व्हीपीएनला कनेक्ट करायला थोडा वेळ लागत होता. तोपर्यंत त्यानं पुन्हा एकदा मीराचा फोन ट्राय केला. लागत नव्हता.
व्हीपीएन कनेक्ट झाल्यावर त्यानं नारायणचं डिप्लॉयमेंट डिलीट करायला घेतलं, पण त्याला राहवेना. त्यानं शेवटचाच म्हणून प्रॉम्प्ट उघडला आणि लिहून टाकलं, "का केलास विचका आमच्या फॅमिलीचा? भडव्या"
कृपया असा असंसदीय शब्द वापरू नका.
"अरे जा जा, तुझी गार्डरेल (संदर्भ ९) तूच तोडतोयस!
ते 'गोट्या-भीर'चं काढायची काय गरज होती? तेव्हा कुठे गेली होती तुझी गार्डरेल्स?
आणि उमामावशीचा टॉपलेस फोटो टाकलास तो?"
एक विंकचा स्मायली येऊन क्षणार्धात नाहीसा झाला आणि ओजसच्या मानेवरचे केस उभे राहिले.
तो नारायणची डिप्लॉयमेंट डिलीट करणार, तेवढ्यात व्हॉट्सॲप मेसेज टिंगटिंगला.
मीराची व्हॉईस नोट होती,
"ओजस, सॉरी... आपण घाई करायला नको होती.
अख्खा फियास्को व्हायरल झालाय.
उमा आत्याचा तो टॉपलेस फोटोसुद्धा... 'सुरंगी सायरन' नावानं फेमस झालीये ती.
माझं अकाउंट ऑलरेडी फ्रीज केलंय इन्स्टावर.
या सोशल मीडियाच्या वाघावरून उतरावंच लागेल मला आता, पण दुसरं काही मला येतही नाही...
आणि या वाघाला मला जिवंत खाता येणार नाही एवढं नक्की दादा... सॉरी, ओजस...
मला असा संशय येतोय की तुला मी 'दादा' म्हटलेलं बहुतेक आवडत नाही.
सो ओजस!
सॉरी वन्स अगेन."
ओजस चरकला.
फोन पुन्हा अनरीचेबल झाला होता. त्यानं नारायणला ती व्हॉईस नोट अपलोड केली आणि विचारलं, "मीरा सुइसायडल आहे का?"
हो, नक्कीच.
नारायणनं तिचा 'मौज्जा ही मौज्जा'चा फोटो सोर्स करून झूम केला. त्याचं रिझोल्युशन वाढवलं. मीराच्या मनगटावरचे व्रण दाखवले.
ती फाउंडेशन लावून लपवतेय, पण सेल्फ-हार्मचेच व्रण आहेत ते. आणि डेटा सांगतो की सेल्फ-हार्म करणारे लोक सुइसायडल होण्याची शक्यता बरीच जास्त असते.
"तिचे व्हेअर अबाऊट्स प्रेडिक्ट कर!", ओजसनं थरथरत्या हातांनी टाईप केलं.
नारायणनं विचारलं,
माझा 'टर्बो मोड' ऑन करायची परवानगी आहे का?
ओजसला काही सुचेना. त्यानं परमिशन देऊन टाकली.
नारायणनं थोडा जास्त वेळ घेतला... दोन मिनिटांच्या वर, आणि मग उत्तर आलं:
मी माझा टर्बो मोड वापरून आणखी काही स्थानिक एजंट्सशी बोललो:
खोपोली-पनवेल एरियाचा एक्सपर्ट नाग्या, मावळ-खंडाळा एरियाचा एक्सपर्ट बुधा इत्यादी.
मीरा अरूमामाची गाडी घेऊन गेली आहे आणि खोपोली टोलनाक्यावर दोन तासांपूर्वीची तिची फास्टॅग एंट्री आहे.
एंट्री लोणावळ्याच्या दिशेनं आहे. पण मिसिंग लिंकच्या कॅमेऱ्यांनी गाडी नोट केली नाही, म्हणजे तिनं मधला एक्सप्रेसवे वापरलाय.
शिवाय तिच्या व्हॉईस नोटच्या बॅकग्राउंडमध्ये भणभणत्या वाऱ्याचा आवाज आणि 'तुम क्या जानो मोहब्बत क्या है' या आर. डी. बर्मनच्या पॉप्युलर गाण्याचा आवाज येतोय.
(सोर्स: हम किसी से कम नहीं)
मी पब्लिक इन्स्टा पेजेसवरून चेक केलं.
खंडाळ्याच्या टायगर पॉईंटवरच्या एका रिसॉर्टच्या इन्स्टानुसार आज त्यांच्याकडे 'आर. डी. नाईट' चालू आहे. माझ्या मते मीरा टायगर पॉईंटवरून उडी मारायचा विचार करत असण्याची शक्यता ८३% आहे.
ओजस अरूमामाला फोन करायला धावला.
इतक्यात यूट्यूबवर अचानक आनंद आणि मिलिंद शिंदेच्या गावरान आवाजात मोठ्ठ्यानं गाणं वाजू लागलं
"मामाच्या पोरीला मागणं घाला मागणं घाला!"
**
संदर्भ :
१. रेडिट हा ऑनलाईन कट्टा म्हणता येईल पण इथे चर्चेवर फोकस जास्त असतो. चर्चा कोणत्याही विषयावर चालू करता येते आणि त्याचे उपकट्टे (सब-रेडिट) करता येतात.
खास करून ए. आय.विषयी इथे काही फार बहारदार, अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक चर्चा चालतात
उदाहरणार्थ हा लार्ज लँग्वेज मॉडेल्सचा सब-रेडिट
२. चॅट जी. पी. टी. किंवा क्लॉड किंवा जेमिनी ही मॉडेल फार महाग पडतात शिवाय ती क्लोज्ड आहेत. म्हणजेच आपण ती आपल्या गरजेनुसार फारशी बदलू शकत नाही. (त्यांना फ्रंटियर मॉडेल्स असंही म्हणतात)
ओपन सोर्स सॉफ्टवेअरप्रमाणे अनेक ओपन लार्ज लँग्वेज मॉडेल्सही आहेत जी फ्री असतात शिवाय आपल्याला त्यांत हवे तसे बदल करण्याची मुभा जास्त असते. उदाहरणार्थ क्वेन किंवा जेमा. हगिंग-फेस हा अशी ओपन मॉडेल्स डाउनलोड करण्याचा सर्वमान्य स्रोत आहे
३. लार्ज लँग्वेज मॉडेलना प्रचंड माहिती क्षणार्धात हाताळावी लागते. आपल्या लॅपटॉप्स किंवा साध्या सर्व्हर्सच्या चिप्सवरती ही मॉडेल्स चालवता येणं कठीण आणि फार धीमं होऊन जातं. त्यासाठी खास GPU प्रोसेसर लागतात.
४. एखादं मॉडेल कशी कामगिरी करतंय हे ठरवण्याचे काही निकष असतात. अर्थातच प्रश्नाचं अचूक आणि लवकर उत्तर देणं हा महत्त्वाचा निकष. पण आणखीही काही महत्त्वाचे निकष असू शकतात. हे निकष तपासण्याच्याही विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. उदाहरणार्थ, एका मॉडेलकडून (जी. पी. टी.) दुसऱ्या मॉडेलची (क्लॉड) कामगिरी तपासणे इत्यादी.
५. कोबी आणि चण्याचं पीठ वाफवून बनवलेलं भानोलं / भानवलं ही महाराष्ट्राच्या काही समाजांतली फार लोकप्रिय पाककृती आहे.
६. चण्याच्याच पिठाचे घट्ट असे गोळे (कोफ्त्यांच्या जवळपास जाणारे पण कोफ्ते जास्त मुलायम असतात) आमटीत सोडले जातात. हीसुद्धा काही समाजांतली niche म्हणता येईल अशी पाककृती आहे.
७. गणपतीचा दुसरा दिवस ऋषीपंचमी म्हणून ओळखला जातो. ह्या दिवशी पावसात येणाऱ्या बहुतेक सगळ्या भाज्या – अळू, पालक, माठ, उकडलेली कणसं, शेवग्याच्या शेंगा – अधिक शेंगदाणे आणि भरपूर तूप घालून प्रचंड चवदार आणि पौष्टिक ऋषीची भाजी केली जाते.
८. खास करून मूळ मुंबईतल्या आणि मुंबईजवळच्या किनारपट्ट्यांतल्या समाजांत खेकड्यांना चिंबोरी म्हटलं जातं.
९. लार्ज लँग्वेज मॉडेलची गार्डरेल फार महत्त्वाची असतात. गार्डरेलमुळेच चॅट जी. पी. टी. बॉम्ब बनवण्याची रेसिपी सांगत नाही किंवा घाणेरड्या शिव्या असलेला मेल बनवत नाही. ती तोडणं नक्कीच कठीण असतं (अशक्य असतं का? माहीत नाही)
पण इथे लेखकानं थोडी क्रिएटिव्ह लिबर्टी घेतलीय.