Skip to main content

फॉर द लव्ह ऑफ स्टोरीज’ (पुस्तकपरिचय)

चरित्र आणि आत्मचरित्र हा नेहमीच वाचकप्रिय साहित्यप्रकार राहिला आहे. कोणत्याही ग्रंथालयात किंवा पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर त्याची लोकप्रियता सहज लक्षात येते. गेल्या काही महिन्यांत विद्यापीठीय क्षेत्रात दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्द घडवलेल्या दोन आंतरराष्ट्रीय किर्तीच्या विदुषींची आत्मचरित्रे प्रकाशित झाली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे भारतातील ज्येष्ठ इतिहासकार रोमिला थापर, तर दुसऱ्या म्हणजे अमेरिकन मिथकाभ्यासक (Mythologist) वेंडी डोनिजर. संस्कृत साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, पुराणकथा आणि मिथकांचा त्यांनी आयुष्यभर अभ्यास केला आणि त्याच विषयाचे अध्यापनही केले.

 

सामान्य वाचकांमध्ये वेंडी डोनिजर यांचे नाव विशेषतः त्यांच्या The Hindus: An Alternative History या पुस्तकामुळे चर्चेत आले. या पुस्तकावर वाद निर्माण झाल्यानंतर Penguin India या त्यांच्या प्रकाशकाने ते भारतातून मागे घेतले होते. मात्र नंतर Aleph Book Companyकडून त्याची नवीन आवृत्ती प्रकाशित आली.

 

विशेषतः २०१४नंतर भारतीय परंपरा, संस्कृत साहित्य, पुराणकथा आणि मिथकांच्या पाश्चात्त्य अभ्यासावर अनेक भारतीय अभ्यासकांनी टीका करण्यास सुरुवात केली. राजीव मल्होत्रा यांच्यासह अनेक विद्वानांनी वेंडी डोनिजर यांच्या मांडणीवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे त्या अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या.

 

मात्र त्यांचे आत्मचरित्र वाचताना वेगळीच वेंडी डोनिजर आपल्याला भेटते. त्या निर्भय, मनस्वी, जीवनावर मनापासून प्रेम करणाऱ्या, विद्यार्थ्यांमध्ये रमणाऱ्या आणि गोष्टी रंगवून सांगण्यात पटाईत अशा त्या प्राध्यापिका होत्या. शैक्षणिक क्षेत्रातील गंभीर वातावरण असूनही त्यांच्यात विनोदबुद्धी आणि सहजता कायम होती.

 

याउलट रोमिला थापर यांचे लेखन अत्यंत गंभीर, नेमके आणि संशोधनप्रधान आहे. त्यांच्या लिखाणात खळखळून हसवणारा विनोद फारसा आढळत नाही. परंतु भारतीय इतिहासाचा जागतिक स्तरावर अभ्यास आणि प्रसार करण्याचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात. विशेषतः त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव असल्याची टीका केली जाते. अर्थातच त्यामुळे त्यांच्या संशोधनाचे महत्त्व कमी होत नाही.

 

रोमिला थापर यांचा जन्म एका सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबात झाला. त्यांचे वडील लष्करात डॉक्टर असल्याने त्यांची सतत बदली होत असे. रावळपिंडी येथे असताना त्यांनी अनेक पठाण रुग्णांवर उपचार केले. त्या लोकांना कॅन्टोनमेंटमध्ये प्रवेश नव्हता, त्यामुळे ते बाहेर उभे राहून कृतज्ञतेपोटी मिठाई पाठवत. लहानग्या रोमिला यांना ही सामाजिक विषमता खटकत असे. विषमतेविषयीची त्यांची संवेदनशीलता तेव्हाच रुजली. नंतर त्या पुण्यात शिक्षणासाठी आल्या. स्वातंत्र्यानंतर भारतातील अनेक शहरांत त्यांचे शिक्षण झाले. पुढे दिल्लीत आल्यानंतर त्यांचा अनेक लेखक, विचारवंत आणि राजकीय नेत्यांशी परिचय झाला.

 

एक मनोरंजक प्रसंगही त्यांच्या आत्मचरित्रात येतो. प्रसिद्ध चित्रपट निर्माते हिमांशू राय आणि अभिनेत्री देविका राणी यांनी त्यांच्या आईला चित्रपटात काम करण्याची विचारणा केली होती; मात्र त्यांनी नकार दिला. नंतर एका नामवंत दिग्दर्शकाने स्वतः रोमिला थापर यांनाही चित्रपटात काम करण्याची संधी देऊ केली. परंतु त्यांच्या आईने तीही नाकारली. त्या म्हणाल्या, "मी कदाचित जुन्या विचारांची वाटेन; पण मला वाटतं, तू या क्षेत्रात जाऊ नकोस." त्या चित्रपटसृष्टीत गेल्या असत्या तर भारतीय इतिहास संशोधनाला एक मोठी अभ्यासक मिळाली नसती.

 

तरुणपणी त्या काही वर्षे लंडनमध्ये राहिल्या. त्या काळात तेथील भारतीय विद्यार्थी आणि बुद्धिजीवी एकत्र येत आणि अनेकदा रवींद्रनाथ टागोर यांचे एकला चलो रे हे गीत उत्साहाने गात.

 

पुढे भारतात परतल्यानंतर त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) मध्ये अध्यापनाची संधी मिळाली. त्या आधी एका छोट्या महाविद्यालयात कार्यरत होत्या. JNUमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी कुलगुरूंना भेटून इतिहास शिकवण्याच्या नवीन पद्धती, अभ्यासक्रमातील बदल आणि इतिहासलेखनाच्या नव्या दृष्टीकोनाबद्दल चर्चा केली. त्या काळात एका तरुण प्राध्यापिकेने इतक्या आत्मविश्वासाने आपल्या कल्पना मांडणे हे धाडसाचेच मानले जात होते. ज्ञानातून आलेली ही निर्भयता रोमिला थापर आणि वेंडी डोनिजर या दोघींमध्ये समानपणे दिसून येते.

 

वेंडी डॉनिजर आत्मचरित्र

वेंडी डोनिजर यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पदवी मिळवली आणि संस्कृतचे नामवंत अभ्यासक डॅनियल एच. एच. इन्‌गॉल्स यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. रामायण, महाभारत आणि पुराणांचा सखोल अभ्यास करणारे इन्‌गॉल्स यांच्याविषयी त्यांना आयुष्यभर आदर होता. 

 

हार्वर्डमध्ये त्यांनी भगवान शिवावरील आपल्या संशोधनावर आधारित पीएच.डी. प्रबंध लिहिला. एके दिवशी इन्‌गॉल्स यांनी त्यांना तातडीने भेटायला बोलावले. त्या घाबरल्या आणि काही चूक झाली का, असे विचारले. त्यावर ते म्हणाले, "तुझी पीएच.डी.ची तोंडी परीक्षा झालेलीच नाही; ती आता लगेच घ्यायला हवी."

 

तोंडी परीक्षेत त्यांनी महाभारत, रामायण आणि पुराणांवर अनेक प्रश्न विचारले. रावणाबद्दल प्रश्न विचारल्यावर वेंडी डोनिजर यांनी प्रामाणिकपणे सांगितले की, "रावणाच्या विविध कथांबद्दल मला अजून फारसे माहिती नाही." त्यावर इन्‌गॉल्स यांनी स्वतःच रावणाविषयीच्या अनेक कथा सांगायला सुरुवात केली. अशा प्रकारे प्रश्न विचारणारे प्राध्यापकच अनेक उत्तरेदेखील सांगत होते आणि ही तोंडी परीक्षा एका संस्मरणीय अनुभवात बदलली. वेंडी डोनिजर सांगतात की, आजही जेव्हा त्यांच्या पीएच.डी.चे विद्यार्थी तोंडी परीक्षेच्या भीतीने तणावाखाली असतात, तेव्हा त्या हा किस्सा त्यांना आवर्जून सांगतात.

 

विद्यार्थ्यांशी संबंधित आणखी एक मजेशीर प्रसंगही त्या सांगतात. त्यांचा नामग्याल नावाचा एक विद्यार्थी अतिशय हुशार होता. सुट्टीत त्याला त्यांनी एक निबंध लिहून आणण्यास सांगितले. सुट्टी संपल्यानंतर तो रिकाम्या हाताने आला. कारण विचारल्यावर तो म्हणाला, "आमच्या राजवाड्याला वेढा घालण्यात आला होता."

 

तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, इतर सर्वांना माहिती असलेली एक गोष्ट त्यांना माहिती नव्हती, तो प्रत्यक्षात सिक्कीमचा युवराज होता. राजकीय घडामोडींमुळे त्याला राजवाडा सोडून जावे लागले होते.

 

हा किस्सा सांगताना वेंडी डोनिजर नेहमी विद्यार्थ्यांना हसत म्हणतात, "निबंध न लिहिण्यासाठी कोणतेही कारण चालणार नाही. पण तुमच्या राजवाड्यावर हल्ला झाला असेल आणि तुम्हाला पळून जावे लागले असेल, तर मात्र मी तो अपवाद मान्य करेन." अशी त्यांची मिश्कील विनोदबुद्धी विद्यार्थ्यांना कायमच आपलीशी वाटत असे.

 

ज्यू कुटुंबात जन्मलेल्या वेंडी डोनिजर यांना लहानपणापासूनच कॅथलिक धर्माबद्दल आकर्षण होते. तरुणपणी त्यांनी भारतात एक वर्ष वास्तव्य केले. त्याआधी काही काळ त्या हिमालयातील एका ननरीमध्ये (nunnery) राहिल्या होत्या. The Nun's Story या चित्रपटाचाही त्यांच्यावर प्रभाव पडला होता. त्यामुळे काही काळ त्यांना स्वतः नन व्हावे, असेही वाटू लागले होते. मात्र, ही कल्पना प्रत्यक्षात येणे शक्य नव्हते.

 

भारतात आल्यानंतर त्यांनी एक वर्ष शांतिनिकेतन येथे घालवले. त्यांचा मूळ उद्देश संस्कृत शिकण्याचा होता; परंतु त्या काळात त्यांनी बंगाली भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवले, मणिपुरी नृत्याचे शिक्षण घेतले आणि भारतीय संस्कृतीचा जवळून परिचय करून घेतला.

 

अमेरिकेत परतल्यानंतर त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये अध्यापन केले. त्यामध्ये शिकागो विद्यापीठ (University of Chicago) आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले (University of California, Berkeley) यांचा समावेश होतो. संस्कृत आणि भारतीय धार्मिक वाङ्मयाचा अभ्यास करणे, हेच आपल्या शैक्षणिक आयुष्याचे प्रमुख ध्येय असावे, असे त्यांनी ठरवले होते.

 

त्यांचे मार्गदर्शक इन्‌गॉल्स यांच्यावर ज्यूविरोधी (Anti-Semitic) असल्याचा आरोप केला जात असे. मात्र, डोनिजर सांगतात की त्यांना स्वतःला त्यांच्या वागणुकीत असा अनुभव कधीच आला नाही. तथापि, इन्‌गॉल्स यांचे एक मत त्यांना अजिबात पटले नाही. ते म्हणत असत की, “मुलींना शिकवून काही उपयोग नाही; त्या पुढे लग्न करून संसारात रमून जातात आणि शिक्षणाचा उपयोग करत नाहीत.” स्त्रीवादी विचारांकडे झुकत असलेल्या डोनिजर यांना हा दृष्टिकोन मान्य नव्हता. तरीही, इन्‌गॉल्स यांनी त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. इन्‌गॉल्स यांच्या ओळखीतून त्यांची भेट जगप्रसिद्ध धर्म-अभ्यासक मीर्चा एलियाद यांच्याशी झाली आणि त्यातून त्यांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली.

 

पुढे डोनिजर यांच्यावर एलियाद यांचा मोठा प्रभाव पडला. एलियाद धर्मविषयक एक महत्त्वाचे नियतकालिक संपादित करत असत आणि मिथकशास्त्राचा (Mythology) त्यांचा गाढा अभ्यास होता. नंतर एलियाद यांच्या एका शिष्यामुळे डोनिजर यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या अनुभवातून विद्यापीठीय क्षेत्रात तीच माणसे आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटत राहतात, तसेच काळानुसार त्यांचे वैचारिक प्रवाहही बदलत जातात, हे स्पष्ट होते.

 

इन्‌गॉल्स यांच्या प्रेरणेने डोनिजर यांनी पुराणे, ऋग्वेद, उपनिषदे आणि इतर प्राचीन भारतीय ग्रंथांचा सखोल अभ्यास सुरू केला. भारतीय मिथककथा आणि धार्मिक परंपरांवर लेखन करण्याची संधी त्यांना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळाली. याच काळात त्यांचा पेंग्विन प्रकाशन संस्थेशी निकटचा संबंध प्रस्थापित झाला. पुढे The Hindus: An Alternative History या त्यांच्या पुस्तकामुळे मोठा वाद निर्माण झाला.

 

यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले आणि तेथून डी.फिल. (पीएच.डी.शी समकक्ष) पदवी प्राप्त केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय भारतीय मिथककथांशी संबंधित होता. शंकराचार्यांवरील संशोधनानंतर त्यांनी भारतीय देव-देवता, पुराणे आणि धार्मिक परंपरांचा व्यापक अभ्यास केला. पुढे त्यांनी स्त्रियांचे स्थान, युद्ध, घोड्यांचे सांस्कृतिक महत्त्व अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासक्रम विकसित केले.

 

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध विषयांबद्दल असलेली उत्सुकता. त्या बॅले नृत्य शिकल्या, घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले आणि पुढे दोन घोडेही विकत घेतले. काही काळ त्या एका मित्राच्या शेतावर राहिल्या. तेथे डुकरांच्या पिल्लांचा जन्म, गायींचे दूध काढणे अशा ग्रामीण जीवनातील अनेक अनुभव त्यांनी उत्सुकतेने घेतले. नव्या गोष्टी शिकण्याची ही वृत्ती त्यांना आयुष्यभर बौद्धिकदृष्ट्या ताजेतवाने ठेवत गेली.

 

मात्र, त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक आघात आणि मानसिक संघर्षही कमी नव्हते. त्या विनोदी शैलीत लिहितात, “वर्गात मला तीन मुलगे आवडत होते; त्यांपैकी दोघांशी मी लग्न केले आणि तिसऱ्याशी जवळपास लग्न होणारच होते.” हा तिसरा म्हणजे पुढे जागतिक किर्तीचे चित्रपट दिग्दर्शक ठरलेले फ्रान्सिस फोर्ड कोपोला (Francis Ford Coppola). त्यांची आणि डोनिजर यांची अनेक वर्षे घनिष्ठ मैत्री टिकून राहिली. त्या अनेकदा कोपोला यांच्या निवासस्थानी राहत असत आणि ते त्यांच्यासाठी खासगी विमानही पाठवत असत. २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या Megalopolis या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेशीही त्या काही प्रमाणात संबंधित होत्या.

 

डेनिस नावाच्या एका सहाध्यायाशी त्या विवाह करणार होत्या. मात्र, त्याला दारूचे व्यसन होते. त्यांनी त्याला सांगितले की, “तू जर एक वर्ष दारूला हात लावला नाहीस, तर मी तुझ्याशी लग्न करेन.” पण त्या काळात त्यांनी अल्फ्रेड नावाच्या दुसऱ्या मित्राशी विवाह केला. त्यामुळे डेनिस दुखावला. काही वर्षांनी अल्फ्रेड यांच्याशी त्यांचा घटस्फोट झाला. त्या काळी अमेरिकेत घटस्फोटाची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने काही काळ त्या कायदेशीरदृष्ट्या त्यांच्याच पत्नी राहिल्या. त्यानंतर त्यांनी डेनिसशी विवाह केला. या विवाहातून त्यांना एक मुलगा झाला.

 

डेनिसचे मद्यपान मात्र थांबले नाही. एकदा त्याने त्यांना सांगितले, “तू मला लग्नाचे वचन दिलेस; पण दुसऱ्याशी लग्न केलेस. ते मी कधीच स्वीकारू शकलो नाही. माझ्या मद्यपानामागे तेच कारण आहे.” पुढे दोघे वेगळे राहू लागले आणि डोनिजर आपल्या मुलासोबत स्वतंत्र राहत होत्या.

 

या काळात त्या गंभीर नैराश्यातून (Depression) जात होत्या. वडिलांचे निधन आणि त्याच सुमारास मुलाचा जन्म, या दोन अत्यंत भावनिक घटना अल्प कालावधीत घडल्यामुळे त्यांच्यावर मोठा मानसिक ताण आला. त्या लिहितात की, एकदा त्या रस्त्यावर उभ्या असताना समोरून बस येत होती; आत्महत्येचा क्षणभर विचार मनात आल्याने त्या बाजूला सरकल्या नाहीत. मात्र, बसचालकाने प्रसंगावधान राखून बस वळवली आणि अपघात टाळला. त्यानंतर तो संतापून त्यांच्या मागे धावत आला आणि उर्दूमध्ये शिव्याही दिल्या. आयुष्यातील अशा अत्यंत गंभीर प्रसंगांचेदेखील त्या आत्मकथेत हलक्या, विनोदी आणि आत्मपरीक्षणात्मक शैलीत वर्णन करतात.

 

त्या सांगतात की, त्यांच्या मानसोपचारतज्ज्ञाने त्यांना एकदा म्हटले होते, “वडिलांचे जाणे आणि मुलाचे येणे आयुष्यातील या दोन टोकाच्या घटना इतक्या कमी कालावधीत एकत्र घडणे, हा अनुभव पुन्हा कधीच येणार नाही. त्यामुळे स्वतःला वेळ द्या.”

 

१९६५ साली पीएचडीच्या निबंधावर काम करत असताना त्या कामासाठी ऑक्सफर्डला गेल्या. त्यानंतर त्यांनी शंभर पानी निबंध इन्‌गॉल्स यांना सादर केला. निबंधाचे नाव अमरत्वाचे अमरत्व असे होते. सुरुवातीला त्यांना शंकराबद्दल लिहायचे होते, पण नंतर त्यांना इंद्रदेवाबद्दलही कुतूहल निर्माण झाले आणि ते सगळे वाचल्यानंतर त्यांनी दोन्हींचा समावेश असलेला, दोन्हींच्या पुराणकथा आणि मिथ्यकथा यांचा समावेश असलेला कच्चा खर्डा इन्‌गॉल्स यांना दाखवला.

 

त्यांनी निबंध काळजीपूर्वक वाचून अजून वाचनासाठी वेगवेगळ्या ग्रंथांची नावे सुचवली. त्याहीपेक्षा त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे की वैदिक देव इंद्र आणि हिंदू देव शंकर अशा दोघांवरचे दोन वेगवेगळे निबंध यांच्यात दिसतात. तेव्हा ते तसेच दोन वेगवेगळे निबंध लिहावे म्हणून त्यांनी हार्वर्डच्या पीएचडीसाठी शंकरावर, तर ऑक्सफर्डच्या डी.फिल.साठी इंद्रावर निबंध लिहिला. दोन्हींचे मिळून हे ९५० पानांचे दोन खंड झाले.

 

तेव्हा इन्‌गॉल्स यांनी मिर्चा एलियाद यांना ते खंड पाठवले. एलियाद यांची निवड वेंडी यांच्याकरता चकित करणारी होती,  कारण ‘योगा: इमॉर्‌टॅलिटी अँड फ्रीडम’ या नावाने त्यांचा फ्रेंच ग्रंथ इंग्रजीत १९५८ साली प्रसिद्ध झाला होता. तो वेंडी यांनी वाचला होता. वेंडी ह्यांच्या मते एलियाद हे संस्कृततज्ज्ञ अभ्यासक नव्हते, ते फक्त मायथॉलॉजी आणि धर्म यांबद्दलच्या तात्त्विक आणि कल्पित असे भाष्यकार होते. पण तरीही त्यांच्या लक्षात आले की इन्‌गॉल्स यांनी निबंध पाठवलाय, त्यात त्यांच्या मनात काहीतरी असणार. पण शिवाला योगी समजून काही त्यांनी लिहिलं नव्हतं.

 

त्या सांगतात की एलियाद यांच्या सहवासाने माझे आयुष्य बदलले. त्यांनी माझे निबंध वाचून खूप दीर्घ नोंद पाठवली आणि त्यामध्ये एक वाक्य लिहिले होते की याच्यामध्ये अनेक ठिकाणी कंटाळवाणा भाग आहे. ९५० पानांत तो असणारच, असे म्हणून त्यांनी ते सोडून दिले. पण पुढची दहा वर्षे एलियाद यांच्या सहवासाने आणि त्यांच्याबरोबर केलेल्या अभ्यासाने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली, असे त्या सांगतात. एलियाद ह्यांच्याकडे आपल्याला पाठवून, इन्‌गॉल्स यांनी आपल्याला ही उलटी गुरुदक्षिणा दिली होती, असं डोनिजर यांनी नोंदवले आहे. 

 

१९६८ साली त्यांना हार्वर्डने पीएचडी दिली आणि १९७३मध्ये ‘ॲसेटिसिझम अँड इरॉटिसिझम इन मायथॉलॉजी ऑफ शिवा’ या नावाने ते पुस्तक प्रसिद्ध झाले. School of Oriental and African Studies (SOAS) यांनी त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. पुढे त्याच्या पॉकेट बुक आवृत्तीला ‘शिवा: द एरोटिक ॲसेटिक’ असे नाव मिळाले.

 

आजतागायत हा ग्रंथ खपतो आहे. २००९ साली हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही मानद पदवी देण्यासाठी बोलावले आणि त्या वेळी त्यांची भेट सुप्रसिद्ध स्पॅनिश सिनेदिग्दर्शक पेड्रो अल्मोदोवारशी झाली. त्यालाही त्याच प्रसंगी पदवी मिळाली होती. जोन डिडियन या लेखिकेलाही त्याच वेळी सन्माननीय पदवी दिली गेली.

 

हार्वर्डमधून बाहेर पडल्यानंतरच्या त्यांच्या कारकिर्दीकडे दृष्टिक्षेप टाकला असता, त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांत स्वतः तयार केलेले कोर्स दिसतात. या विद्यापीठांमधे अर्थातच शिकागो आघाडीवर होते. पण बर्कले विद्यापीठातदेखील त्यांनी तीन वर्षे शिकवले. कोणी तरी त्यांना विचारले की बर्कले विद्यापीठातला अनुभव कसा होता, तर त्यांनी उदाहरण दिलं आहे की डॉरिस लेसिंगने एका नाटकाबद्दल लिहिले होते की नाटकात उभारलेले नेपथ्य फारच छान होते, पण नट-नट्या मध्येमध्ये कडमडत होते.

 

१९६५ ते ७५ हा दीर्घ काळ त्यांनी इंग्लंडमध्ये घालवला तो ऑक्सफर्डमध्ये शिकण्यात आणि शिकवण्यात. त्याच काळात त्यांच्या नवऱ्यानेदेखील हार्वर्डमधून रशियन साहित्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि ऑक्सफर्डमध्ये रशियन इतिहासामध्ये. मधल्या काळात डोनिजर यांना एक अपघात झाला होता, पण त्यातून त्या बऱ्या होऊन पुढे दहा वर्षे डेनिसबरोबर ऑक्सफर्डला  जाऊन राहिल्या. खर्‍या अर्थाने तिथूनच त्यांच्या अकॅडमिक आयुष्याला सुरुवात झाली.

 

पहिले वर्ष त्यांनी हार्वर्डच्या पीएचडीसाठी निबंध लिहिण्यातच घालवले. ऑक्सफर्डमधल्या निबंधावर चार्ल्स जेनर या तितक्याच ताकदीच्या अभ्यासकाने त्यांच्याबरोबर काम केले आणि हळूहळू त्या तिथल्या वातावरणात रुळल्या. त्यांच्या संपूर्ण पुस्तकात त्यांनी जागोजागी ही तक्रार नोंदवली आहे की विद्यापीठीय हे जग तेव्हा आणि जवळपास आताही पुरुषांनी भरलेले  आहे आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा त्यावर मोठा पगडा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला वाद घालावे लागले, भांडावे लागले हे त्यांनी उदाहरणांसकट नोंदवले आहे. 

 

एलियाद यांच्याच एका विद्यार्थ्याने तर त्यांना इतका त्रास दिला की वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी त्या विद्यार्थ्याचा खून झाल्यावर वेंडी यांची भावना आपण विचित्र मार्गाने का होईना, पण त्याच्यापासून सुटलो अशी होती. ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी १९६६ ते १९६८ या काळात काम केले. या काळात जे नियम इतके जाचक होते की परीक्षेला विशिष्टच पोशाखच घालावा लागायचा. नियमांच्या जाचातून आणि विद्यापीठांच्या चौकटीतून स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व अबाधित राखणे ही एक मोठी गोष्ट होती.

 

१९७४मध्ये त्यांच्या पुस्तकाची दखल घेतली गेली. एडमंड लीच यांनी प्रतिष्ठित टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये त्यावर दीर्घ लेख लिहिला. त्यातून त्यांना अनेक चाहते आणि अभ्यासक मित्र मिळाले. वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या आणि मायथॉलॉजी यांची गुंफण करताना त्यांना एक मैत्रीण म्हणाली की तुला जे हवे आहे, ते क्लॉड लेव्ही-स्ट्रॉस या फ्रेंच अभ्यासकाने मांडले आहे. ते होते स्ट्रक्चरालिझम. पुढे लेव्ही-स्ट्रॉस यांची मैत्री तर झालीच, पण मिथ्स अँड रियालिटी या त्यांच्या ग्रंथाला वेंडीने प्रस्तावना लिहावी, असे स्ट्रॉस यांनी सुचवले. लेव्ही-स्ट्रॉस शंभर वर्षे जगले आणि त्यांच्या शंभरीच्या महत्त्वाच्या पार्टीत आपण आनंदाने सामील झाल्याचे त्या आपल्या पुस्तकात नोंदवतात.

 

ऑक्सफर्डच्या School of Oriental and African Studiesमध्ये वेंडी यांची अध्यापनासाठी नियुक्ती झाली खरी; मात्र तेथील संस्कृतचे प्राध्यापक क्ले फोरराइट यांनी त्यांना स्पष्ट सांगितले, "इथे तुम्हाला संस्कृत शिकवता येणार नाही." ज्या विषयात त्यांनी बी. ए. आणि एम. ए. केले होते, तोच विषय शिकवण्याची संधी न मिळणे, हे त्यांना आश्चर्यकारक वाटले. मात्र इतिहास विभागाचे प्रमुख बर्नार्ड लुईस यांनी त्यांना भारताचा आणि धर्माचा इतिहास शिकवण्याची परवानगी दिली.

 

सप्टेंबर १९६८ ते जून १९७५ या काळात त्यांनी दक्षिण आशियाच्या इतिहासाच्या प्राध्यापिका म्हणून अध्यापन केले. याच काळात त्यांच्या वडिलांनी तेथे एक घर घेतले आणि तेही काही काळ लंडनमध्ये राहत होते.

 

या काळात त्यांना अनेक उत्कृष्ट विद्यार्थी लाभले. त्यांपैकी नामग्याल हा सिक्कीमचा राजपुत्र असल्याचे त्यांना नंतर समजले. तसेच डेव्हिड शुलमन हा प्रतिभावान विद्यार्थी त्यांना लाभला. डेव्हिडने तमिळ पौराणिक साहित्यावर प्रबंध लिहिताना शेकडो उताऱ्यांचे अत्यंत उत्कृष्ट इंग्रजी भाषांतर केले होते. अशा विद्यार्थ्यांमुळे प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा आनंद अधिकच वाढतो, असे त्या नमूद करतात. पुढे डेव्हिड त्यांचा जिवलग मित्र झाला आणि दोघांनी मिळून अनेक अभ्यासक्रमही शिकवले.

 

एका ठिकाणी त्या एका प्रसिद्ध उक्तीचा संदर्भ देत म्हणतात, "जशी इटनच्या सुट्ट्यांमध्ये मी खूप काही शिकले, तसेच ऑक्सफर्ड आणि लंडनमधील अध्यापनाच्या सुट्ट्यांमध्ये मीही खूप काही शिकले." याच काळात भारतात पूर्वी भेटलेल्या ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित एका मैत्रिणीशी त्यांची पुन्हा भेट झाली. तिने वेंडी यांना घोडेस्वारी शिकवली. पुढे घोडेस्वारी हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला. त्यांनी घोडेस्वारीवर विपुल लेखन केले आणि संस्कृत साहित्यातील घोड्यांच्या वर्णनांवर आधारित एक स्वतंत्र अभ्यासक्रमही तयार केला.

 

यानंतर त्या जवळपास वर्षभर रशियात राहिल्या. त्यांचे पती डेनिस यांचा अभ्यासविषय रशिया असल्यामुळे त्यांना तेथे राहण्याची संधी मिळाली. रशियातील वास्तव्यात त्यांना अनेक वेगळे अनुभव आले. अमेरिकन दूतावासातून त्यांना काव्हियार, विविध खाद्यपदार्थ आणि द न्यूयॉर्करसारखी मासिके मिळत असत. त्या काळी अशा वस्तूंची रशियात मोठी टंचाई होती. त्यामुळे तेथील अमेरिकन आणि रशियन मित्र या वस्तूंचा विशेष आनंद घेत असत.

 

तेथे त्यांची एका रशियन इतिहास संशोधकाशी मैत्री झाली. तिने वेंडींकडे काव्हियार मागितले. वेंडींनी ते दिल्यानंतर तिने आधी ते धुऊन आपल्या वर्षभराच्या बाळाला खाऊ घातले. वेंडींनी आश्चर्याने विचारले, "असं का?" त्यावर ती म्हणाली, "माझ्या मुलाला काव्हियार म्हणजे काय, याची चव तरी समजली पाहिजे."

 

त्या काळात परदेशी नागरिक राहत असलेल्या प्रत्येक खोलीत संभाषण ऐकण्यासाठी गुप्त यंत्रे बसवलेली असतात, अशी वदंता होती. एकदा वेंडी डेनिसला म्हणाल्या की, "इथला आरसा खूप छोटा आहे; त्यात कमरेपर्यंतच दिसतं." ते दोघे बाहेर जाऊन परत आले, तेव्हा तो आरसाच बदललेला होता. हा हेरगिरीचा ठोस पुरावा नव्हता; पण अशा अनेक खेळकर आठवणी त्या आत्मचरित्रात रंगवून सांगतात.

 

मैत्रिणींसोबत त्या अनेकदा जंगलात घोडेस्वारीसाठी जात. नैसर्गिक विधीसाठी कोणतीही सोय नसल्याने त्या घोड्याच्या डोक्यावर टोपी घालत, एका हाताने घोडा धरत आणि दुसऱ्या हाताने पँटची बटणे सोडवत. या प्रसंगाचे वर्णन करताना त्या विनोदाने म्हणतात, "आम्हा स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे फक्त घोडा धरून ठेवण्यासाठी एखादा माणूस का मिळत नाही?"

 

ऑक्सफर्डनंतर त्यांनी शिकागो विद्यापीठात अध्यापन सुरू केले. त्या काळी हे विद्यापीठ पौर्वात्य अध्ययनासाठी जगप्रसिद्ध होते आणि अनेक नामवंत विद्वान तेथे कार्यरत होते. शिकागो विद्यापीठातील वातावरणामुळे वेंडी यांच्या संशोधनाला आणि लेखनाला मोठी चालना मिळाली.

 

या आत्मचरित्रातील सर्वाधिक उत्कंठावर्धक प्रकरण म्हणजे त्यांच्या The Hindus: An Alternative History या पुस्तकावरील वाद. प्रकाशकांनी मुद्दाम हे प्रकरण शेवटी ठेवले आहे. २००९मध्ये त्या जयपूर साहित्य महोत्सवात या पुस्तकाविषयी बोलण्यासाठी भारतात आल्या होत्या. त्यानंतर दीनानाथ बात्रा यांनी या पुस्तकावर आक्षेप घेतला आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. जवळपास वर्षभर पेंग्विन प्रकाशनाने खटला लढवला. अखेरीस न्यायालयाबाहेर तडजोड झाली. त्यानुसार पेंग्विनने पुढे हे पुस्तक प्रकाशित न करण्याचे आणि उपलब्ध प्रती मागे घेण्याचे मान्य केले.

 

वेंडी स्पष्ट सांगतात की, या करारात कुठेही "बंदी" हा शब्द नव्हता. पुस्तकावर अधिकृत बंदी घालण्यात आली नव्हती, तसेच प्रती नष्ट करण्याचाही उल्लेख नव्हता. उलट या वादामुळे पुस्तकाची लोकप्रियता प्रचंड वाढली. सर्व उपलब्ध प्रती विकल्या गेल्या आणि मागणी इतकी वाढली की एकदा हे पुस्तक ॲमेझॉनवरील विक्री क्रमवारीत नवव्या, तर दुसऱ्या वेळी बाराव्या क्रमांकावर पोहोचले. बाराव्या क्रमांकाचा स्क्रीनशॉट त्यांनी काढून फ्रेम करून घरात लावले.

 

पुढे त्यांचे प्रकाशक मित्र रवी सिंग यांनी पेंग्विन सोडल्यानंतर स्पिकींग टायगर ही प्रकाशनसंस्था सुरू केली. त्यांनी वेंडींना न्यूयॉर्कमध्ये भेटून पुस्तकाचे हक्क परत मिळाल्यास ते पुन्हा प्रकाशित करण्याची इच्छा व्यक्त केली. वेंडींनी आनंदाने होकार दिला आणि नंतर हे पुस्तक या प्रकाशनसंस्थेतर्फे पुन्हा प्रकाशित झाले.

 

या संपूर्ण वादाच्या काळात त्यांना प्रचंड प्रमाणात शिवीगाळ करणारे संदेश आणि ई-मेल येत होते. एका संदेशात तर अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने त्यांच्या वडिलांविषयीही उल्लेख करण्यात आला होता. वेंडी सांगतात की, त्यांनी असे सर्व संदेश जपून ठेवले; मात्र त्यांपैकी एकालाही उत्तर दिले नाही.

 

आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा मुलगा मोठा झाल्यानंतर त्या विद्वान मित्र डेव्हिड ग्रीन यांच्यासोबत राहू लागल्या. दोघांनी मिळून अनेक ग्रीक नाटकांचे भाषांतर केले, काही संशोधनपर निबंध लिहिले आणि साहित्यावर एकत्र काम केले. त्या म्हणतात, "जसे इनगॉल्स यांनी मला पौराणिक साहित्य समजावून दिले, तसेच डेव्हिडने मला साहित्याची नवी दृष्टी दिली."

 

ग्रीक आणि लॅटिन भाषांचे विद्वान असलेल्या डेव्हिडच्या फार्महाऊसवर राहताना त्यांनी डुकरांच्या पिल्लांच्या जन्मापासून ते गायींचे दूध काढण्यापर्यंत अनेक ग्रामीण कामांचा अनुभव घेतला. तेथे त्यांनी घोडेस्वारीचाही भरपूर आनंद घेतला. पुढे दोघे प्रेमात पडले, काही काळ एकत्र राहिले आणि नंतर विभक्तही झाले. २०११ साली डेव्हिड यांचे निधन झाले.

 

विद्यापीठातील कारकिर्द, वैयक्तिक आयुष्य, सामाजिक वातावरण, विद्यार्थी-विद्यार्थिनी, संशोधन आणि मैत्री अशा अनेक विषयांवर वेंडी लहान-लहान उपप्रकरणांमध्ये लेखन करतात. प्रत्येक उपप्रकरणाला स्वतंत्र शीर्षक असल्यामुळे वाचन अधिक सोपे आणि रंजक होते. विशेष म्हणजे या आत्मचरित्रातून वाचकाला विद्यापीठीय जीवनाचे एक समृद्ध, बहुआयामी आणि जिवंत चित्र अनुभवायला मिळते.