पुस्तक परिचय – 'रेजिम चेंज'

लेखक: मॅगी हेबरमन आणि जोनाथन स्वान
प्रकाशक: सायमन & शूस्टर
तीन वर्षांहून अधिक मेहनत, हजाराहून अधिक मंडळींच्या मुलाखती, आणि स्वतः राष्ट्राध्यक्षांशी अनेकदा बातचीत केल्यानंतर लिहिलेलं 'Regime Change' हे पुस्तक यंदाच्या वर्षीचं एक लोकप्रिय पुस्तक ठरलं आहे. मॅगी हेबरमन आणि जोनाथन स्वान यांचं एकत्र लिहिलेलं हे पहिलंच पुस्तक. डोनाल्ड ट्रम्पच्या 'शाही' किंवा 'राजसी' कारकिर्दीमध्ये डोकावणारं पुस्तक अशी या पुस्तकाची टॅगलाईन आहे. २०१७-२० मधली त्याची पहिली कारकिर्द आणि २०२५ नंतरची दुसरी कारकिर्द यातल्या बदलांवर प्रकाश टाकण्याचा हा खटाटोप आहे. हुकूमशाही पद्धतीनं राज्य चालवणाऱ्या इराणसारख्या देशांना एरवी अमेरिका 'राजवट' (regime) म्हणून संबोधत असते. तोच शब्द लेखकांनी अमेरिकेच्या सध्याच्या सरकारला उद्देशून वापरला आहे.
पुस्तकाची सुरुवात २०२५च्या न्यू इयर पार्टीनं होते. चार वर्षं सत्तेबाहेर राहिल्यानंतर नोव्हेंबर २०२४ची निवडणूक जिंकल्यानंतरची ही पार्टी आहे. स्वागताला राष्ट्रगीत आणि रोसिनीच्या संगीतावर आधारित ‘Lone Ranger’ मालिकेचं पार्श्वसंगीत, पार्टीला ट्रम्पचे निकटचे सहकारी, इलॉन मस्क आणि दुबईच्या हुसेन अजवानीसारखी अब्जाधीश मित्रमंडळी, आणि बीबी नेतान्याहूसारखे परदेशी पाहुणे आणि इतर कितीतरी हुजरेगिरी करणारी मंडळी हजर आहेत. ग्रेगरी ब्रूनोचं Hallelujah (Praise The Lord) मागे वाजत आहे. काही मिनिटात चित्रं रंगवणारी व्हेनेसा होराब्वेना येशू ख्रिस्ताचं चित्र रंगवते आहे. सगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी ट्रम्पना विचारत आहेत, "नवीन येणाऱ्या वर्षाचा तुमचा संकल्प काय"? "वर्ल्ड पीस", ट्रम्प उत्तरतात. एखाद्या थरारक आणि पकड घेणाऱ्या भयकथेची सुरुवात असावी, तसं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं ते उत्तर वाचकाच्या मनात घर करून राहतं.
लेखकांच्या मते, ट्रम्पना २०२१-२५ची चार वर्षं मिळाली असती, तर अमेरिकेच्या आणि कदाचित जगाच्याही इतिहासाला वेगळं वळण लागलं असतं. पण ती वर्षं बायडनना मिळाल्यामुळे ट्रम्प आणि त्यांच्या कंपूला नवनवीन डावपेच तयार करायला पुष्कळ मोकळा वेळ मिळाला. या मधल्या चार वर्षांत विरोधकांनी घातलेल्या खटल्यांमुळे ट्रम्पना सहानुभूतीची खेळी खेळायची एक आगळी संधी मिळाली. ६ जानेवारीला ट्रम्प समर्थकांनी केलेल्या अमेरिकन संसदेवरच्या हल्ल्याचंही बहुतांश अमेरिकन जनतेला सोयीस्कर विस्मरण झालं. २०२१-२४च्या वर्षांमध्ये कोव्हिड, महागाई अशा समस्या ट्रम्पनाही आल्याच असत्या, आणि कदाचित त्यांच्या चळवळीचा जोर २०२४पर्यंत आपोआप ओसरलाही असता. पण मधली चार वर्षं विरोधकांकडे गेल्यामुळे ट्रम्प चळवळीला आणखी धार आली, आणि त्यांच्याच पक्षातल्या त्यांना विरोध करणाऱ्या मंडळींनाही आपला विरोध मागे घ्यावा लागला. २०२५ची पहाट उजाडली तोपर्यंत, आपण आपल्या देशाचे, आणि कदाचित जगाचेही अनभिषिक्त सम्राट असल्याची स्वप्नं ट्रम्प यांना पडू लागली होती.
२०२५ संपलं तोपर्यंत ट्रम्प यांनी, एक शतकाहून अधिक काळ अमेरिकन लोकशाहीनं बांधलेल्या संस्था, रचना, आणि मूल्यं, धुळीला मिळवली. 'युनायटेड नेशन्स'ला दिला जाणारा निधी कमी करून तिला जवळजवळ लंगडं केलं. नेटोसारख्या मित्रराष्ट्रांच्या संघटनेला शत्रूसारखी वागणूक देत, पोकळ केलं. USAID या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेला कुलूप ठोकलं. जागतिक व्यापार संघटनेला पूर्णपणे बगल देऊन, जवळजवळ जगातल्या बहुतेक देशांवर व्यापारी कर लादले. सरकारी संस्थांमधील राजकीय विरोधकांची blacklist तयार करून, त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला नोकरीतून हाकलून दिलं. सगळ्या सरकारी संस्थांची, प्रत्यक्ष White Houseची, वॉशिंग्टनमधल्या सांस्कृतिक स्थळांची, Smithsonianसारख्या दर्जेदार संग्रहालयांची बेगुमान पुनर्रचना करण्याच्या भानगडीत देशाच्या अर्थकारणाची घसरण मात्र ते थांबवू शकले नाहीत. आपल्या दुसऱ्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षात जनतेनं वाखाणण्यासारखी एकच गोष्ट ट्रम्पना जमली – ती म्हणजे इस्राएलच्या ओलीस ठेवलेल्यांची सुटका करणं.
पहिल्या कारकिर्दीत ट्रम्प यांच्या भोवती पेशेवर, अनुभवी आणि जाणकार नोकरशहा मंडळी होती. त्या मंडळींनी ट्रम्पना मनाप्रमाणे वागू दिलं नाही. दुसऱ्या कारकिर्दीत अशा लोकांना आपल्या वर्तुळाबाहेर ठेवण्यात ट्रम्प यशस्वी ठरले. पदासाठी आवश्यक अशा अनुभवापेक्षा आपलं स्वतःचं लांगूलचालन, तेही अगदी अहमहमिकेनं करणारी मंडळीच त्यांनी जवळ केली. लेखकांच्या मते सध्याचं अमेरिकन सरकार ४-५ लोकच चालवत आहेत, सगळे निर्णय ही एवढी मोजकीच मंडळी घेत आहेत. आणि ही सगळी मंडळी केवळ ट्रम्पना आवडेल आणि रुचेल असंच बोलत असतात. त्यांना विरोध करण्याचं धाडस यांतल्या एकाही माणसात नाही. शिवाय २०२५मध्ये अमेरिकेच्या विधिमंडळातले रिपब्लिकन खासदारही ट्रम्पना संपूर्ण शरण आलेले होतेच. सुप्रीम कोर्टानंही ट्रम्प यांना कोणत्याही गुन्ह्यांपासून आधीच माफी देऊन ठेवली होती. या सगळ्या अनुकूल परिस्थितीनं सुखावलेले आणि सोकावलेले ट्रम्प आपल्या अधिकारांना सीमा नसल्याचं उघडउघड बोलू लागले होते.
२०२१-२४च्या चार वर्षांच्या सुट्टीत रिपब्लिकन विचारमंचानं आपले आवडते टोकाचे निर्णय 'प्रोजेक्ट २०२५' नावानं जाहीर केले. २०२४च्या निवडणुकीआधी या 'प्रॉजेक्ट २०२५'शी आपला काहीही संबंध नसल्याचं ट्रम्प सांगत राहिले. निवडून आल्यानंतर आलेला आत्मविश्वास आता त्यांना स्वस्थ बसू देईना. फुगलेल्या नोकरशाहीचा निःपात करण्यासाठी इलॉन मस्कला त्यांनी सर्वाधिकार दिले. स्थलांतरितांचा काटा काढण्यासाठी स्टीव्हन मिलर आणि रसेल व्हॉट अशा काहीशी अतिरेकी मतं असलेल्या सहकाऱ्यांना त्यांनी मोकळं सोडलं. या सगळ्या अतिरेकाचे दुष्परिणाम २०२६च्या सुरुवातीला दिसू लागले.
२०२६च्या जानेवारी महिन्यात, मिनेसोटा राज्यातील सामान्य जनता स्थलांतरितांच्या धरपकडीला कंटाळून रस्त्यावर आली. २३ जानेवारीला रने गुड नावाच्या सदतीस वर्षीय स्त्रीला सरकारच्या खास धरपकड पथकानं गोळ्या घालून ठार मारलं. २४ जानेवारीला अलेक्स प्रेटी नावाच्या तरुणाला अशाच धरपकड पथकानं गोळ्या घालून ठार केलं. स्थलांतराच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना ठार मारणाऱ्या अविचारी सरकारविरुद्ध लोकांच्या मनात प्रचंड असंतोष उफाळला.
दरम्यान ३ जानेवारीला अमेरिकेच्या डेल्टा फोर्स कमांडोंनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांची उचलबांगडी करून त्यांना रातोरात अमेरिकेत पळवून आणलं, आणि तिथे नवीन सरकारची घोषणा केली. अमेरिकन रक्ताचा थेंबही न सांडता अशी राज्यक्रांती घडल्यामुळे ट्रम्प यांचा आत्मविश्वास आता ओसंडून वाहू लागला. जगाच्या इतिहासात आपल्यासारखा मुत्सद्दी आणि सामर्थ्यशाली नेता आजपर्यंत झाला नाही, अशा चर्चा ट्रम्प आपल्या सहकाऱ्यांशी करू लागले.
फेब्रुवारी २०२६च्या ११ तारखेला इस्राएलचे पंतप्रधान बीबी नेतान्याहू, आपल्या खास माणसांबरोबर White Houseच्या तळघरात पोहोचले. तिथे त्यांनी ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांना इराणवर हल्ला करण्याच्या आपल्या योजना सादर केल्या. ट्रम्प यांच्या जवळजवळ सर्वच सहकाऱ्यांनी आणि अगदी CIAनंसुद्धा बीबी थापा मारत असल्याचा निर्वाळा दिला. मात्र अध्यक्षांचा कल पाहून कुणीही इराणवर हल्ला करण्याच्या कल्पनेला ठाम विरोध केला नाही. दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांचा जावई आणि त्यांचा एक विश्वासू मित्र इराणच्या परराष्ट्रखात्याशी चर्चा करण्याचं नाटक करत राहिले. २८ फेब्रुवारीच्या पहाटे अमेरिका आणि इस्राएलच्या विमानांनी इराणवर बॉम्बफेक सुरू केली. अमेरिकेच्या घटनेनं युद्ध सुरू करण्याचा अधिकार फक्त अमेरिकन विधिमंडळाला दिला आहे. ट्रम्प यांनी त्यातल्या एकाही खासदाराला एका शब्दानंही युद्धाबद्दल विचारलं नाही. एरवी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अशा कुठल्याही कृतीआधी अमेरिकन जनतेसमोर येऊन काही मिनिटं का होईना, पण आपली बाजू सांगतात. ट्रम्प यांनी असं काहीच केलं नाही. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणवर १२०० बॉम्बचा वर्षाव झाला. दक्षिण इराणच्या मिनाब शहरात प्राथमिक शाळेवर बॉम्ब पडल्यामुळे दीडशेहून अधिक शाळकरी मुली मृत्युमुखी पडल्या. युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या सर्वेक्षणामध्ये सुमारे ८० टक्के अमेरिकन जनता युद्धाच्या विरोधात असल्याचं बाहेर आलं. मात्र व्हेनेझुएलामधल्या गनिमी काव्याच्या विजयामुळे उन्मत्त झालेल्या ट्रम्प यांना इराणचं युद्ध आपण काही आठवड्यात उरकू शकतो याची खात्री होती.
मार्चच्या १६ तारखेला मॅगी हेबरमन आणि जोनाथन स्वान हे दोघेही ट्रम्प यांना White Houseमध्ये भेटले. ट्रम्पनं त्यांना एक कागद दाखवला, त्या कागदावर इतिहासातल्या काही समर्थ व्यक्तींची नावं होती – चेंगीझ खान, नेपोलियन, हिटलर वगैरेंच्या यादीत स्वतःचं नाव पाहून ट्रम्प हरखून गेलेले दिसले. या सर्वांमध्ये आजपर्यंतच्या पृथ्वीच्या इतिहासात आपण सर्वात शक्तिशाली असल्याचं त्यांनी या लेखकांना सांगितलं.
एप्रिल महिन्यात हे पुस्तक प्रकाशित झालं. काही आठवड्यांत संपणारं इराणचं युद्ध अजूनही सुरू आहे. युक्रेन-रशिया पाठोपाठ या दुसऱ्या युद्धामुळे अभूतपूर्व इंधनटंचाई निर्माण झाली आहे. सर्वत्र महागाईही वाढतच चालली आहे. नोव्हेंबर २०२६च्या मध्यवर्ती निवडणुकीत ट्रम्प आपली जादू पुन्हा दाखवू शकतील की नाही, हे आणखी काही दिवसांतच कळेल. तशी जादू ते दाखवू शकले, तर मात्र जगाच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वांत सामर्थ्यशाली असण्याचा त्यांचा दावा आणि त्यांच्या निष्ठावान अनुयायांचा त्यांच्याबद्दलचा ओढा खरा असल्याचं त्यांच्या विरोधकांनाही मुकाट्यानं मान्य करावं लागेल.
मॅगी हेबरमनचं ट्रम्प महाशयांवरचं हे पहिलं पुस्तक नाही. याआधीही तिनं १९७०-९०च्या काळात न्यूयॉर्क शहरात ट्रम्प यांचा उत्कर्ष कसा झाला मागोवा घेणारं पुस्तक लिहिलेलं आहे. ट्रम्पना व्यवस्थित ओळखून असणारी पत्रकार (Trump whisperer) अशी तिची स्वतःची ओळख आहे. त्यांच्या आतल्या गोटातल्या बातम्या काढण्यात तिच्याइतकं पटाईत सध्यातरी दुसरं कुणी नाही. पण अशा बातम्या लोकांच्या भल्यासाठी वेळेवर न फोडता, आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आणि फायद्यासाठी वापरल्याचा आरोपही तिच्यावर केला गेला आहे.
जोनाथन स्वान हा मूळचा ऑस्ट्रेलियन पत्रकार पहिल्यांदा अमेरिकन जनतेपुढे आला, ते कोव्हिडच्या काळात त्यानं घेतलेल्या ट्रम्प यांच्या मुलाखतीमुळं. एरवी समोरच्या मुलाखतकारांच्या प्रश्नांना सहजासहजी बगल देऊन त्यांचा मामा बनवण्यात ट्रम्प यांचा हातखंडा आहे. पण जोनाथन स्वाननं त्या मुलाखतीत ट्रम्प यांच्या उत्तरांचा पाठपुरवठा करण्याचा सपाटा चालवून त्यांचा थोडाफार तरी का होईना, पण घाम काढला.
हेबरमन आणि स्वान, दोघंही सध्या न्यूयॉर्क टाईम्ससाठी पत्रकारिता करतात. ट्रम्प या जगप्रसिद्ध वृत्तपत्रावर एक दिवसाआड कावत असतात; मात्र त्यांना टाइम्सशिवाय चैनही पडत नसावं. त्यामुळे या पुस्तकातून होणाऱ्या टीकेचा अंदाज असूनसुद्धा त्यांनी हेबरमन आणि स्वान दोघांना, २०२६च्या एप्रिलमध्ये White Houseला बोलावून मुलाखत दिली. पूर्वीचे राजेरजवाडे जसे एखाद्या बखरकाराला किंवा महाकवीला आपली कारकिर्द शब्दबद्ध करण्यासाठी सेवेत ठेवत असत, कदाचित तसाच विचार ट्रम्पही करत असावेत. मात्र स्वतःला पृथ्वीच्या इतिहासातल्या सर्वात सामर्थ्यशाली लोकांच्या यादीत पाहण्याची स्वप्नं बघणारे ट्रम्प आपण एका लोकशाही परंपरेचे पाईक असल्याचं विसरून गेलेले दिसतात. आपल्या लहरीच्या आणि पेनाच्या फटकाऱ्यानं, आपण जगाचा इतिहास आणि भूगोल बदलू शकतो, या स्वतःच्या अहंकाराला गोंजारणाऱ्या भ्रमाचा त्यांना काहीसा मद चढला आहे की काय अशी शंका हे पुस्तक वाचून कुठल्याही वाचकाला येईल.
एकोणिसाव्या शतकात अमेरिकन अध्यक्ष जेम्स मनरो यांनी अमेरिकेची पश्चिम गोलार्धाच्या सार्वभौमत्वाची भूमिका ठरवली. मनरो डॉक्ट्रिन नावानं ती प्रसिद्ध आहे. ट्रम्प यांच्या साम्राज्यवादी भूमिकेला पत्रकारांनी डॉनरो डॉक्ट्रिन असं संबोधलं. हेबरमन आणि स्वान यांच्या मते ट्रम्प हे असा कोणताही मोठा विचार किंवा तत्त्वज्ञान यांच्या फारच पुढे आहेत. त्यांच्या कोणत्याही कृतीमागे फक्त व्यावहारिक विचार असतो. मग एखादी गोष्ट इतरांसाठी अथवा जगासाठी योग्य की अयोग्य असा विचारही त्या व्यावहारिकतेच्या पलीकडे जात नाही.
सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्टुअर्ट राजघराणं राज्य करत असताना त्यांनी absolutism अंगीकारला असं म्हणतात. म्हणजे विधिमंडळ, कायदेकानून वगैरे सगळ्यांना धाब्यावर बसवून स्वतःची निरंकुश (absolute) सत्ता गाजवायची. ट्रम्प यांच्या राजकारणावर, निर्णयांवर, धोरणांवर वैचारिक बैठक थोपायची असेलच तर ती या अशा निरंकुश सत्तेच्या हव्यासाची म्हणावी लागेल.
हेबरमन आणि स्वान म्हणतात, "ट्रम्प यांच्याकडे एखादी अलौकिक किंवा अद्भुत क्षमता असलीच तर ती आहे निलाजरेपणे आणि धादांत खोटं बोलण्याची. ते एखाद्या सर्कशीतले विदूषक आहेत असं वाटण्याचा मोह होऊ शकतो. प्रत्यक्षात समोरच्या माणसाची नाडी आणि त्याचं मर्म ओळखणं यात त्यांचा हातखंडा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं मर्म वापरताना ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, हीच त्यांची सर्वांत मोठी शक्ती आहे. ते उद्या काय करतील किंवा एखाद्या प्रसंगात कसे वागतील याचा अंदाज करणं निव्वळ वेडेपणा आहे".
पुस्तकात भारताचे उल्लेख अभावानेच आढळतात. पहिला उल्लेख ३० जानेवारी २०२५च्या एका बैठकीचा आहे. युक्रेनमध्ये भारत किंवा सौदी अरेबियाचं शांतता दल ठेवता येईल असं उपाध्यक्ष व्हॅन्सनी सुचवलं असता, भारतीय लोक स्वतःचे पैसे खर्च करणार नाहीत अशी टिप्पणी करत ट्रम्पनं तो विचार हाणून पाडला. दुसरा उल्लेख २ एप्रिल २०२५चा. ट्रम्प यांनी हा दिवस अमेरिकेसाठी 'मुक्तिदिन (Liberation Day)' म्हणून जाहीर केला. जगातील बहुतेक देश अमेरिकेशी फसवा व्यापार करत असल्याचा आरोप करीत, त्यांनी बहुतेक देशांतून करण्यात येणाऱ्या आयातीवर मोठ्या प्रमाणात व्यापारी कर (tariffs) लादले. खरं तर, या व्यापारी करांचा बोजा अमेरिकन जनतेवरच पडणार होता, पण ट्रम्पना यामध्ये एक वेगळीच खेळी दिसत होती. अमेरिकेतील श्रीमंतांना करांमध्ये सवलती देण्याच्या नादात रिकामी झालेली तिजोरी भरण्याचा एक अनोखा मार्ग त्यांना सापडला होता. चीन आणि भारतासारखे देश अमेरिकेशी प्रामाणिकपणे व्यापार करत नसल्याचं जाहीर करत त्यांनी या आणि इतर अनेक देशांसाठी कर जाहीर केले. मुळात असे व्यापारी कर लादण्याचा अधिकार फक्त अमेरिकेच्या विधिमंडळाकडे आहे. पण ट्रम्प हे कुणालाच जुमानत नसल्यामुळे त्यांना विधिमंडळाकडूनही विरोध झाला नाही. कुठल्या देशावर किती कर लादावेत या चर्चेत व्यापारमंत्री हॉवर्ड लटनिक, अर्थमंत्री स्कॉट बेसन्ट वगैरेंनी सादर केलेल्या अधिकृत आकड्यांना bullshit संबोधून ट्रम्पनं फेटाळून लावले. आपल्या सावलीसारखी असणारी लाडकी तरुण सहकारी नॅटली हार्पला बोलावून तिला खरे आकडे गूगलवर शोधण्यास सांगितले, "Natalie, do your Google, do your computer thing, and give me the real numbers.” या सगळ्या वेडेपणानंतर अर्थमंत्र्यांच्या मित्रानं "Happy Liberation Day" म्हणत (कदाचित) खवचटपणे त्यांचं अभिनंदन केलं. "It's more like a Libation Day", अर्थमंत्री उद्गारले. “…मुक्तिदिन नव्हे, हा तर (आमच्या दैवताचा) अभिषेकाचा दिवस होता…”.
हेबरमन आणि स्वान यांचं ट्रम्प यांच्यावरचं हे शेवटचं पुस्तक असणार नाही. अनेक खुलासे राहिले आहेत. ट्रम्प आणि एपस्टिन संबंध, राजकीय विरोधकांना नमवण्यासाठी ट्रम्प यांनी वापरलेली तंत्रं, सिलिकॉन व्हॅलीला शरण आणताना केलेली खेळी, आपला वारस ठरवण्यामागचा त्यांचा सध्याचा विचार, त्यांच्या नजीकच्या मंडळींचा भ्रष्टाचार, या सगळ्याबद्दल आणखी खूप काही लिहिता येऊ शकलं असतं. कदाचित ट्रम्प सत्तेवर असताना यातल्या काही गोष्टींबद्दल कमीजास्त लिहिणं प्रकृतीला मानवण्यासारखं नाही, हे या धूर्त पत्रकारांना चांगलंच ठाऊक आहे. तरीही, ट्रम्प यांच्या 'राजसी' कारकिर्दीत डोकावण्याच्या निमित्तानं लेखकांनी तिच्या 'तामसी' बाजूवरही थोडाफार का होईना, पण प्रकाश निश्चितच टाकला आहे.
आपल्या दुसऱ्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाची (२०२५) सुरुवात ट्रम्प यांनी 'world peace'च्या संकल्पानं केली होती. दुसऱ्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत, त्यांनी आपल्या शत्रूंची संस्कृती समूळ नष्ट करण्याचा आपला संकल्प जाहीर केला. यातला कोणता संकल्प ते सिद्धीस नेतील आणि मानवी संस्कृतीसाठी ते कोणत्या प्रकारचे दूत ठरतील आणि पृथ्वीच्या इतिहासातल्या विक्रमादित्यांच्या अथवा चक्रमादित्यांच्या यादीत कुठे बसतील, याचं समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न Trump whisperer मॅगी हेबरमन आणि जोनाथन स्वानसुद्धा करू धजावलेले नाहीत. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी याचा नुसता विचार करू पाहिला, तरी आपल्याच डोक्याची शंभर शकलं होऊन ती आपल्या पायांवर लोळू लागतील.
—
संपादकीय नोंद – लेख प्रकाशित करतेसमयी अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांचे बहुतांशी निकाल लागले आहेत. त्यात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा धुव्वा उडाला आहे.