Skip to main content

आधुनिक जग आणि धर्माची निकड

संकल्पना

१९५० साली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीने त्यांच्या 'महाबोधी' या मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'Buddha and the Future of His Religion' (बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य) हा लेख प्रकाशित केला होता. डॉ. आंबेडकरांचा धर्मविचार समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या लेखाच्या प्रकाशनाला २०२५ साली पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आणि ह्याच वर्षी आंबेडकरी चळवळीतील घुसळणीतून ज्याची संकल्पना पुढे आली अशा 'बोधी'च्या प्रकाशनाचीदेखील सुरुवात होत आहे. 'महाबोधी' मासिकातील लेखाच्या ओघात एका सूत्राचा केवळ ओझरता उल्लेख येतो; परंतु हे सूत्र आंबेडकरी धर्मविचाराचा पाया म्हणता येईल. 'बोधी'च्या प्रकाशनाचे निमित्त साधून या सूत्राची विस्ताराने चर्चा 'बोधी'च्या वाचकांसोबत करणे निश्चितच औचित्यपूर्ण होईल. 'आधुनिक जगाला धर्माची खरी निकड आहे' हे ते सूत्र.

 

मूळ इंग्रजी लेखात ह्या सूत्राचा ओझरता उल्लेख पुढील विधानात येतो. "If the new world – which be it realised is very different from the old – must have a religion – and the new world needs religion far more than the old world did – then it can only be the religion of the Buddha." ह्या लेखाचा मराठी अनुवाद 'डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे' या ग्रंथमालिकेच्या विसाव्या खंडात (संकलन : वसंत मून) प्रकाशित झाला आहे. त्यात हे विधान पुढीलप्रमाणे शब्दबद्ध केले आहे. "आजचे आधुनिक जग प्राचीन जगाच्या मानाने फारच वेगळे आहे. त्यालाच आज धर्माची खरी निकड आहे. आणि ती निकड भागविण्यासाठी त्याला बुद्धाच्या धर्माचीच निवड करावी लागणार आहे." मराठी अनुवादात मूळ विधानाची तीन स्वतंत्र वाक्ये केल्याने विधानाचे तीन भाग स्पष्टपणे नजरेस येतात. विधानाचा तिसरा भाग, 'आधुनिक जगाला बुद्धाच्या धर्माचीच निवड करावी लागणार', सकारण आणि तुलनात्मकदृष्ट्या सिद्ध करणे हा बाबासाहेबांच्या लेखाचा प्रमुख उद्देश असल्याने ते पहिल्या दोन, विशेषतः दुसऱ्या भागाचा, 'आधुनिक जगालाच धर्माची खरी निकड आहे', उल्लेख केवळ एक गृहीतक म्हणून करत असावेत असे म्हणता येईल. मात्र असे जरी म्हटले तरी या गृहीतकाच्या तार्किक पायावरच बाबासाहेबांचा बौद्ध धर्माच्या निवडीविषयीचा युक्तिवाद अवलंबून आहे हे विसरता येणार नाही. धर्माची खरी निकड असल्याशिवाय आधुनिक जग बौद्ध (वा अन्य कुठल्याही) धर्माची निवड मुळात का करेल? ज्याप्रमाणे गरज ही शोधाची जननी असे मानले जाते त्याप्रमाणे आधुनिक जगाला असणारी धर्माची निकड हीच (बौद्ध वा इतर कुठल्याही) धर्माच्या निवडीची जननी असल्याचे बाबासाहेब इथे सुचवत आहेत. बौद्ध धर्माची निवड हा बाबासाहेबांच्या धर्मविचाराचा कळस असेल तर 'आधुनिक जगाला धर्माची खरी निकड आहे' हे  गृहीतक त्याचा पाया आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या धर्मविचाराचा पद्धतशीरपणे अभ्यास करायचा असेल तर त्याची सुरुवात ह्या गृहीतकाची उकल करण्यापासून, त्याचा मथितार्थ समजावून घेण्यापासून करावी लागेल.

 

धम्माची गरजसर्वप्रथम 'आधुनिक जगाला धर्माची खरी निकड आहे' असे जेव्हा बाबासाहेब म्हणतात तेव्हा ते नेमके कोणत्या वाचकाला उद्देशून हे म्हणत आहेत ते लक्षात घेतले पाहिजे. वरकरणी स्वयंसिद्ध वाटणाऱ्या ह्या गृहीतकाची स्वयंसिद्धता आपल्या वाचकांना सहजासहजी जाणवणारी, पटणारी वा पचणारी नाही हे बाबासाहेब जाणतात. कारण हा वाचक जरी आधुनिक जगाचा सदस्य असला तरी त्याच्या दृष्टीने आधुनिकतेचा अर्थ 'जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका' असा केशवसुती बाण्याचा आहे. ह्या वाचकाच्या लेखी जे जे 'जाळुनी किंवा पुरुनी' टाकायचे आहे त्या यादीत धर्माचा क्रमांक अगदी वरचा लागतो. कारण त्याच्या दृष्टीने धर्म म्हणजे देव-देव, सणवार, कर्मकांडे, अंगारे-धुपारे, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, प्रायश्चित्त, अंधश्रद्धा, चमत्कार, जादूटोणा, बुवाबाजी, इत्यादी, समस्त मानव जातीला अधोगतीच्या गर्तेत कायमचे अडकवून ठेवणारे भ्रामक समजुतींचे घनदाट जाळे होय. ह्याउलट त्याच्या दृष्टीने आधुनिकता म्हणजे विवेक, तर्क, नास्तिकता, इहवाद, विज्ञाननिष्ठा, यांत्रिकीकरण, औद्योगीकरण, शहरीकरण, आर्थिक सुबत्ता, इत्यादी, समस्त मानवजातीला प्रगतीच्या पथावर नेणारी कल्याणकारी प्रक्रिया. त्यामुळे आधुनिक होण्याच्या प्रक्रियेत धर्माला मानवी जीवनातून रद्दबातल करण्यावाचून पर्याय नाही अशी ह्या वाचकाची 'जहाल आधुनिकतावादी' धारणा आहे. मात्र अशा जहाल धारणेचा वाचक हा काही एकमेव वाचक नाही. आधुनिकतावादी असणारा तरीही धर्माला संपूर्ण मानवी जीवनातून नाही तर केवळ सार्वजनिक जीवनातून रद्दबातल करून त्याला व्यक्तिगत वा खासगी बाब म्हणून अस्तित्वात असू द्यायला हरकत नाही अशा मताचा वाचकदेखील आहे. धर्मा-धर्मांमधील चढाओढ, तंटे, द्वेष, कलह यांमुळे सार्वजनिक अवकाश कलुषित होऊ नये; सतत हिंसेच्या आगीत धगधगता राहू नये, म्हणून धर्म नावाचे स्फोटक प्रकरण हे शक्य तितके व्यक्तिगत आणि खासगी अवकाशात कप्पाबंद करणे आणि निधर्मी राज्यसंस्थेच्या, तसेच इहवादी कायद्याच्या अंकुशाखाली सार्वजनिक अवकाश शक्य तितका धर्मनिरपेक्ष करणे हे मानवजातीच्या एकंदर हितासाठी, शांततेसाठी आणि प्रगतीसाठी योग्य होईल अशी त्यामागची 'मवाळ उदारमतवादी' धारणा आहे. ह्यापेक्षाही अधिक सहनशील वृत्तीच्या आणि आधुनिकतावादी नसला तरी सुधारणावादी असलेल्या वाचकाच्या मते अंतिमतः सर्व धर्मांची शिकवणूक ही भूतदयावादी, मानवतावादी, माणसाला 'माणूस' बनवणारी आहे. त्यामुळे धर्माला सार्वजनिक अवकाशातून रद्दबातल करण्यापेक्षा त्या अवकाशाला सांस्कृतिक वैविध्याने समृद्ध करणे जास्त श्रेयस्कर ठरेल अशी 'सहिष्णु सर्वधर्मसमभाववादी' धारणा असणारा हा वाचक आहे.  

 

आता आधुनिकता आणि धर्म यांविषयीच्या विविध धारणांच्या या पटाच्या अगदी दुसऱ्या टोकाला असलेल्या वाचकाच्या मते आपल्यासमोर ज्या काही सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक समस्या आ वासून उभ्या आहेत त्यांचे खापर धर्माच्या नाही तर आधुनिकतेच्याच डोक्यावर फोडायला हवे. ह्या वाचकाच्या मते आधुनिक होण्याच्या अनाठायी प्रक्रियेमुळे जी उलथापालथ झाली त्यामुळे समाजाची दैवी अधिष्ठान असलेली श्रेष्ठ-कनिष्ठ उतरंडीवर, पुरुषसत्तेवर आधारलेली सनातन घडी निष्कारण बिघडली; बेबंद व्यक्तिवाद फोफावला; बेलगाम स्वैराचार बोकाळला; नीती भ्रष्ट झाली; आणि धर्म लयाला जाऊन अधर्माचे राज्य आले. यावर ह्या वाचकाला एकच उपाय दिसतो तो म्हणजे जी विश्व-संस्कृती बनू बघते आहे अशा आधुनिकतेलाच सार्वजनिक तसेच व्यक्तिगत जीवनातूनही रद्दबातल करून धर्माचे सनातन राज्य पुनर्प्रस्थापित करायचे. थोडक्यात 'जुने जाऊ द्या मरणा लागुनी'च्या अगदी विरुद्ध 'जुने ते(च) सोने' अशी या वाचकाची 'कट्टर पुनरुज्जीवनवादी' धारणा आहे.

 

आता वर चर्चिलेल्या विभिन्न धारणांच्या वाचकांमधली मतमतांतरे पाहून कोणालाही असा प्रश्न पडेल की बाबासाहेब यांपैकी नेमक्या कुठल्या वाचकाला उद्देशून मांडणी करत आहेत. 'जहाल आधुनिकतावादी', 'मवाळ उदारमतवादी' आणि 'सहिष्णू सर्वधर्मसमभाववादी' हे तिन्ही  वाचक आपापल्या परीने धर्म आणि आधुनिकतेमधला ताण सोडवायचा, त्यांच्यातले घर्षण कमी करायचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून प्रगतीच्या, सुधारणेच्या गाड्याला खीळ बसणार नाही. त्यामुळे यांपैकी एकालाही 'आधुनिक जगाला धर्माची खरी निकड आहे' असे ठामपणे वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना धर्मामुळे आधुनिक जीवनात निर्माण होणारे प्रश्न कसे सोडवायचे हाच त्यांच्या समोरचा सामायिक प्रश्न आहे. त्याकरता धर्म ज्या भ्रामक समजुतींना, दुष्प्रवृत्तींना, हिंसेला खतपाणी घालतो, त्या कशा नियंत्रित करता येईल ह्याकडे त्यांचे लक्ष आहे. त्यातल्या त्यात 'सहिष्णु सर्वधर्मसमभाववादी' वाचकाला धर्माविषयी आत्मीयता आहे असे म्हणता येईल. पण ही आत्मीयता 'सर्व धर्मांची शिकवण एकच आहे' या सबगोलंकार गृहीतकावर आधारलेली आहे; हे गृहीतक बाबासाहेबांच्या लेखी विवेकाच्या, सत्यतेच्या कसोटीवर उतरणारे नाही. [त्यामुळे ते गृहीतक धर्मचिकित्सेच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे आणि बाबासाहेबांच्या दृष्टीने साक्षेपी, सत्यान्वेषी धर्मचिकित्सा केल्याशिवाय आधुनिक जगाला असणारी धर्माची निकड जाणवणे शक्य नाही. ह्या मुद्द्याची चर्चा आपण यथावकाश करूच.] त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवे की 'सहिष्णू सर्वधर्मसमभाववादी' वाचकाला वाटणारी निकड ही धर्माची नसून आंतरधर्मीय तंट्यातून उद्भवणारा कलह शमवण्याची, त्यासाठी धर्मा-धर्मात तह वा सलोखा निर्माण करण्याची आहे. आता राहता राहिला 'कट्टर पुनरुज्जीवनवादी' वाचक. त्याला वरकरणी पाहता धर्माची निकड वाटते खरी. पण 'जुने ते(च) सोने' अशी धारणा असलेल्या ह्या वाचकाच्या मते आधुनिक जगाला धर्माची जी निकड आहे ती आधुनिकतेवरचा उतारा म्हणून. त्याच्या मते आधुनिकतेने विस्कटवलेली समाजाची घडी केवळ धर्मच पुन्हा बसवू शकतो. पण त्यासाठी प्रथम आधुनिकतेला तिलांजली देणे क्रमप्राप्त आहे. इथे हे विसरून चालणार नाही की बाबासाहेबांना वाटणारी धर्माची निकड ही आधुनिकतेच्या बाजूने आहे, आधुनिकतेच्या विरुद्ध नाही. आधुनिकतावादी असूनही बाबासाहेब धर्माच्या निकडीपाशी कसे येतात या महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा आपण करूच. पण त्याआधी बाबासाहेब नेमके कोणाला उद्देशून मांडणी करतायत या प्रश्नाची उर्वरित चर्चा पूर्ण करू या. 

 

बाबासाहेबांच्या लेखाचा शेवट बारकाईने वाचल्यास लक्षात येते की बाबासाहेबांनी यांपैकी कोणा एका वाचकाला उद्देशून मांडणी केली नसून ह्या चारही संभाव्य वाचकांमधील मतभेदांतून, वादविवादांतून, प्रसंगी भांडाभांडीतून जे आधुनिक चर्चाविश्व आकाराला येत आहे त्यात हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने मांडणी केलेली आहे. ह्या मतमतांतरांमुळे धर्माच्या प्रश्नाला नव्याने वाचा फुटली आहे आणि त्यामुळे धर्मचिकित्सेची जी ऐतिहासिक संधी निर्माण झाली आहे तिला बाबासाहेब प्रतिसाद देत आहेत. लेखाच्या शेवटी बाबासाहेब लिहितात, 

"पूर्वी एक काळ असा होता की, धर्म हा मनुष्याच्या वारसा हक्कांचा एक भाग होता. मुलगा किंवा मुलगी आपल्या आईवडिलांच्या संपत्तीबरोबर त्यांचा धर्मही वारसातील एक भाग म्हणून स्वीकारीत असे. इस्टेटीच्या बाबतीत ती घेण्याजोगी आहे किंवा नाही असा प्रश्‍न कधी कोणी विचारी. परंतु धर्माच्या बाबतीत तो धर्म स्वीकारण्याजोगा आहे किंवा नाही असा चुकूनही प्रश्‍न केला जात नसे. परंतु आज काळ फारच बदलला आहे… वाडवडिलांचा धर्म म्हणून स्वीकारलाच पाहिजे, हे बंधन त्यांनी झुगारून दिलेले आहे. काहींनी तर फारच क्रांतिकारक विचार दर्शविले आहेत. काही लोक वैज्ञानिक ज्ञानाने भारावून जाऊन धर्म कुचकामी आहे, धर्मात काही तथ्यांश नसतो, तो टाकून फेकून दिला पाहिजे ह्या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. काही लोक मार्क्सवादी विचारसरणीमुळे, धर्म ही श्रीमंतांच्या प्रभुत्वाला शरण जाण्यास गरिबांना प्रभावित करणारी अफूची गोळी आहे म्हणून धर्म झुगारून द्यावा असरे म्हणू लागले आहेत. कोणतेही कारण का असेना मात्र हे सत्य आहे की, लोकांनी आज धर्माच्या बाबतीत चिकित्सक बुद्धीची वाढ केलेली आहे. जे लोक वैचारिक पातळीवर ऊहापोह करण्याचे धाडस दाखवितात त्यांच्या मनांत प्रामुख्याने हेच प्रश्‍न उद्‌भवतात की धर्म ही खरोखर आवश्यक बाब आहे काय? आणि आवश्यक असेल तर कोणता धर्म योग्य आहे? ही वैचारिक भूमिका लक्षात घेऊन असेच म्हणावे लागते की, (या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची) वेळ येऊन ठेपलेली आहे. प्रश्‍न फक्त इच्छेचा आहे." 

 

ह्या परिच्छेदाचे बारकाईने वाचन करताना लक्षात येते की बाबासाहेबांच्या दृष्टीने आधुनिकता आणि धर्म यांतील ताणातून, घर्षणातून 'धर्म ही खरोखर आवश्यक बाब आहे काय?' हा मूलभूत प्रश्न उपस्थित होणे हीच आधुनिक धर्मचिकित्सेची खरी सुरुवात आहे. धर्माला जन्मजात वारशाचा भाग मानून एकवेळ धर्मसुधारणा होऊ शकेल, पण धर्मचिकित्सा नाही. धर्मचिकित्सेची पूर्वअट म्हणजे धर्म नावाचा जन्मजात वारसा झुगारण्याचे धाडस. अशा धाडसाशिवाय 'मुळात धर्माची गरजच काय आणि असल्यास कोणता धर्म निवडावा' ह्या कळीच्या प्रश्नांपर्यंत व्यक्तीचा प्रवासच होणार नाही. ह्या कळीच्या प्रश्नांची उत्तरे हरेक व्यक्तीने स्वतंत्रपणे, विवेकाने, निर्भयपणे शोधण्याची सामूहिक, सार्वजनिक प्रक्रिया म्हणजे धर्मचिकित्सा. याचा प्रारंभबिंदू म्हणजे धर्म हा सक्तीचा, जन्मजात वारसा न राहता धर्म ही व्यक्तीने मुक्तपणे करायची निवड बनणे. असे निवडीचे स्वातंत्र्य व्यक्ती जोवर अनुभवत नाही तोवर धर्म नावाच्या सक्तीच्या, जन्मजात वारशाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तीला धर्माची निकडही जाणवणार नाही. कारण तशी निकड जाणवायला प्रथम व्यक्तीपाशी निवडीचे स्वातंत्र्य तर हवे.

 

आता बाबासाहेब धर्माच्या निवडीच्या स्वातंत्र्यापासून सुरुवात करून धर्माच्या निकडीपर्यंत कसे येतात या प्रश्नाकडे येऊ. हा प्रश्न वाटतो तितका सरळ नाही. प्रस्तुत लेखाच्या सुरुवातीस केलेल्या चर्चेनुसार धर्माची निकड ही (बौद्ध वा इतर  कुठल्याही) धर्माच्या निवडीची जननी आहे. मात्र इथे आपण म्हणतोय की बाबासाहेब धर्माच्या निवडीच्या स्वातंत्र्यापासून सुरुवात करून धर्माच्या निकडीपर्यंत येतात. हे कसे? नक्की धर्माची निकड आधी की धर्माच्या निवडीचे स्वातंत्र्य आधी? धर्माच्या निकडीतून व्यक्ती जन्मजात वारसा झुगारून धर्माच्या निवडीचे स्वातंत्र्य धाडसाने स्वीकारते का धाडसाने कमावलेल्या निवडीच्या स्वातंत्र्यातून धर्माची निकड जाणवू लागते? हा पेच सोडवण्यासाठी आपल्याला वर उल्लेखलेल्या प्रश्नापाशी परत जावे लागेल. आधुनिकतावादी असूनही बाबासाहेब धर्माच्या निकडीपाशी कसे येतात हा तो प्रश्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मविचाराचे पायाभूत सूत्र म्हणता येईल ते गृहीतक म्हणजे 'आधुनिक जगाला धर्माची खरी निकड आहे'. आधुनिकतावादी बाबासाहेबांना धर्माची निकड का वाटली असावी?

 

या लेखातील आतापर्यंतच्या चर्चेनुसार आधुनिकतावादी भूमिकेतून वाटणारी निकड ही धर्माची नसून आधुनिकतेचे धर्मापासून रक्षण करण्याची होती; जेणेकरून आधुनिक जगाला धर्माच्या सावटातून मुक्त होत प्रगतीपथावर मोकळा श्वास घेता येईल. याउलट बाबासाहेब मात्र आधुनिकतावादी भूमिकेतूनच ठामपणे या धारणेला छेद देणारे गृहीतक मांडतात की 'आधुनिक जगाला धर्माची खरी निकड आहे'. या दोन आधुनिकतावादी भूमिकांमधे इतकी तफावत नेमकी कशामुळे पडली असावी? या तफावतीचे मूळ आधुनिकतेविषयीच्या दोन समांतर धारणांमधे शोधता येते. या समांतर धारणांना चर्चेच्या सोयीसाठी अनुक्रमे 'विरोधात्मक आधुनिकतावाद' आणि 'द्वंद्वात्मक आधुनिकतावाद' असे संबोधता येईल.

 

धर्म आणि विज्ञान यांतील परस्परविरोधातून आकाराला येतो तो विरोधात्मक आधुनिकतावाद. या विरोधाची ठिणगी पडते ती लौकिक आणि पारलौकिक जग या दोन जगांमधील संघर्षातून. लौकिक जग म्हणजे जे डोळ्यांना दिसते, इंद्रियांनी अनुभवता येते, प्रत्यक्ष प्रमाणाने जोखता येते, ज्याचे अस्तित्व पुराव्यानिशी सिद्ध करता येते असे भौतिक जग. या उलट पारलौकिक जग म्हणजे ऐन्द्रीय अनुभवाच्या आणि भौतिक नियमांच्या कक्षेबाहेरचे, काळ-अवकाश यांच्या सापेक्ष सीमांपल्याडचे आधिभौतिक जग, ज्याचे असणे हे निरपेक्ष, स्वयंसिद्ध, सार्वभौम आहे. धार्मिक परिभाषेत सांगायचं तर दैवी वा ईश्वरदत्त आहे. या दोन जगांमधील संघर्षाचे मूळ हे त्यांच्यातल्या सत्तासंबंधात आहे. लौकिक जगावर असणाऱ्या पारलौकिक जगाच्या सत्तेची प्रस्थापना, समर्थन आणि नियंत्रण ज्या यंत्रणेद्वारे होतात, ती यंत्रणा म्हणजे धर्म. धर्माची ही व्याख्या केवळ विरोधात्मक आधुनिकतावादाच्या परिप्रेक्ष्यातून केलेली नसून ती पारंपरिक धर्मकल्पनेशीदेखील सुसंगतच आहे. 

 

फरक इतकाच की पारंपरिक धर्मकल्पनेनुसार पारलौकिक जग हेच एकमात्र सत्य असून, लौकिक जग ही केवळ त्याची सावली वा प्रतिबिंब असल्याने ह्या दोन जगांमधला सत्तासंबंध हा मुळातच न्याय्य आणि त्यामुळेच समर्थनीय आहे. याचाच अर्थ लौकिक आणि पारलौकिक जगातील सत्तासंबंधांची न्याय्यता धर्माच्या समर्थनावर अवलंबून नसून, ती स्वायत्त म्हणजेच दैवी वा ईश्वरदत्त आहे. धर्म या सत्तासंबंधांची अंगभूत न्याय्यता लौकिक जगात केवळ प्रस्थापित करतो, म्हणजे लागू करतो; तिची अंमलबजावणी करून तिला स्वीकारार्हता, स्थिरता आणि मान्यता मिळवून देतो; त्यायोगे पारलौकिक जगाची भासमान प्रतिमा असलेल्या लौकिक जगाची घडी बसवतो. ही घडी ज्यांना अन्यायकारक वाटते, तिचा निषेध करत जे उतावीळपणे न्यायप्राप्तीचा, व्यवस्थाबदलाचा आग्रह धरतात त्यांना लौकिक जगाच्या भासमानतेची आणि पर्यायाने त्यांच्या स्वतःच्या आग्रहाच्या फोलपणाची ओळख पटवून देण्याचे कामदेखील धर्म करतो. पारंपरिक धर्मकल्पनेनुसार न्यायप्राप्तीचा संबंध लौकिक जगातल्या क्षणिक बदलाशी नसून पारलौकिक जगातील अढळ शाश्वताशी आहे. त्यामुळेच पारंपरिक धर्मकल्पना भासमान गतिशीलतेपेक्षा शाश्वत स्थितिशीलतेचा पुरस्कार करते. थोडक्यात पारंपरिक धर्मकल्पनेप्रमाणे 

ठेविले अनंते।

तैसेचि राहावे।

चित्ती असू द्यावे।

समाधान॥

याउलट विरोधात्मक आधुनिकतावादानुसार पारलौकिक जग हे प्रत्यक्ष अनुभव, तर्क, विज्ञान यांपैकी कुठल्याच वस्तुनिष्ठ कसोटीवर उतरण्यास असमर्थ ठरलेले काल्पनिक, आभासी जग आहे; परिणामी त्याची लौकिक जगावरील सत्ता ही सर्वस्वी अन्याय्य आणि त्यामुळेच असमर्थनीय आहे. धर्म ह्या अन्याय्य सत्तासंबंधांची केवळ भलावण करत नसून हा सत्तासंबंधांचा डोलाराच मुळी धर्म नावाच्या यंत्रणेने उभारलेला आहे. पारलौकिक नावाचे कपोलकल्पित जग हीच मुळी धर्माची निर्मिती आहे; लौकिक जगातील उतरंडींना, शोषणाला, पिळवणुकीला कायमचे समर्थन मिळावे म्हणून कावेबाजपणे केलेली निर्मिती. लौकिक जग हेच एकमेव जग आहे, तेच तथ्य आहे आणि सत्यदेखील. धर्म नावाची यंत्रणा मात्र हे शिताफीने दडवून लोकांसमोर पारलौकिक जगाचा, त्याच्या सार्वभौम दैवी सत्तेचा आभास निर्माण करते, जेणेकरून लौकिक जगातील उतरंडींना शाश्वततेचा मुलामा देता येईल.

 

त्यामुळे विरोधात्मक आधुनिकतावादानुसार लौकिक जगातील सत्तासंबंधांमधे परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने पाऊल टाकायचे असेल तर लौकिक जगाची पारलौकिक जगाशी जोडलेली दैवी नाळ तोडण्यावाचून पर्याय नाही. लौकिक जगाच्या मानगुटीवर बसवलेले पारलौकिक जगाचे आधिभौतिक भूत उतरवल्याशिवाय लौकिक जगाच्या बदलाची, प्रगतीची, विकासाची चक्रे फिरणार नाहीत. अर्थातच ह्या भुताची पकड ज्या धर्माने घट्ट केली त्याचे अधिकारस्थान विज्ञानाने आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय लौकिक जगाची स्वायत्तता प्रस्थापित होणार नाही. थोडक्यात विरोधात्मक आधुनिकतावादी मांडणीनुसार आधुनिक होणे म्हणजे लौकिक जगावरील धर्माची पकड सैल होणे आणि परिणामी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या रेट्याने लौकिक जगाची पारलौकिक जगापासून कायमची ताटातूट होणे.

 

ह्या निर्णायक ताटातुटीचे जे दीर्घकालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक पडसाद उमटतात, त्यांतून निरंतर बदलाच्या ज्या परस्परावलंबी प्रक्रिया कार्यान्वित होतात त्याला एकत्रितपणे आधुनिकीकरण म्हणता येईल. यांतील काही ठळक प्रक्रिया म्हणजे यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण, शहरीकरण, निर्वनीकरण, वस्तूकरण, बाजारीकरण, उदारीकरण, विकेंद्रीकरण, लोकशाहीकरण, इत्यादी. या एकमेकांत गुंतलेल्या प्रक्रियांचा एकत्रित, एकसंध परिणाम म्हणजे आधुनिकीकरण. आधुनिकतेचा अपरिहार्य असा मूर्त अविष्कार, ज्यात विसर्जित होऊन 'आधुनिकता म्हणजेच आधुनिकीकरण' हे महत्त्वाचे समीकरण पुढे येते. धर्म आणि विज्ञान यांतील परस्परविरोधातून आकाराला येणाऱ्या विरोधात्मक आधुनिकतावादी मांडणीला 'पारलौकिक = आधिभौतिक', 'आधुनिकता = आधुनिकीकरण' ही दोन पायाभूत समीकरणे भक्कमपणे तोलून धरतात. 

 

मात्र ह्या मांडणीचे सामर्थ्य हीच तिची मर्यादादेखील बनते. या मर्यादांवर प्रकाश टाकणाऱ्या आधुनिकतेविषयीच्या समांतर धारणेकडे आता आपण वळू या. विरोधात्मक मांडणीत धर्म आणि विज्ञान यांच्यातील परस्परविरोधाच्या रूपाने साक्षात परंपरा आणि आधुनिकताच एकमेकांसमोर विरोधक म्हणून उभ्या ठाकतात. या लढतीत अर्थातच परंपरेचा प्रतिनिधी धर्म आणि आधुनिकतेचा प्रतिनिधी विज्ञान अशी साधारण व्यूहरचना असते. अधिक विस्ताराने ह्या रचनेचे वर्णन करायचे तर एकीकडे परंपरा, धर्म, पारलौकिकता/आधिभौतिकता, स्थितिशीलता हा एक संच तर त्याच्या विरुद्ध बाजूला आधुनिकता, विज्ञान, लौकिकता/भौतिकता, गतिशीलता असा दुसरा संच. द्वंद्वात्मक आधुनिकतावाद या विरोधात्मक व्यूहरचनेला मुळापासून छेद देतो आणि तिथूनच त्याचा समांतर प्रवास सुरू होतो.

 

द्वंद्वात्मक आधुनिकतावाद आकाराला येतो तो धर्मकल्पनेतील आंतरिक द्वंद्वातून. धर्म आणि पारलौकिक जग यांच्यामधील पारंपरिकदृष्ट्या अध्याहृत नाते प्रश्नांकित करण्यातून हे द्वंद्व निर्माण होते. पारलौकिक जगाच्या असण्यावरच ज्याचे अस्तित्व अवलंबून आहे अशी पारंपरिक धर्मकल्पना आणि पारलौकिक जगाचे असणेच नाकारून अस्तित्वात येणारी आधुनिक धर्मकल्पना, ह्या दोन धर्मकल्पनांमधील हे द्वंद्व. पारंपरिक चष्म्यातून पाहिल्यास, पारलौकिक जगाशिवाय (म्हणजेच ईश्वराशिवाय) धर्माच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे विरोधात्मक आधुनिकतावाद, आणि त्या नजरेतून पाहिल्यास पारलौकिक जगाचे अस्तित्व नाकारल्यावर उरते केवळ लौकिक/भौतिक जग आणि मग आपसूकच प्रश्न उपस्थित होतो भौतिक जगाला धर्माची काय गरज? कारण तो तर विज्ञानाचा विषय.

 

द्वंद्वात्मक चष्म्यातून पाहिल्यावर मात्र नवीन प्रश्न उपस्थित होतो, 'केवळ भौतिक जग असू शकतं का?'. 'हो, का नाही असू शकत?', असा प्रतिप्रश्न केल्यास सुरुवातीचा अमूर्त वाटणारा प्रश्न मूर्त स्वरूपात समोर पुन्हा उभा ठाकतो. 'माणूस म्हणजे केवळ माणसाचं शरीर असतं का?'. पुन्हा एकदा 'हो, का नाही असू शकत?' असा प्रतिप्रश्न करायच्या आधी क्षणभर मनात प्रश्नांची मालिका तरळून जाते, 'माणूस म्हणजे केवळ माणसाचं शरीर तर मग मनाचं काय करायचं? मन तर असतं ना? अर्थातच, नाहीतर हे प्रश्न कुठे निर्माण होतायत? मग जर मन आहे तर ते नक्की कुठे आहे? शरीरातच ना? नाहीतर मग कुठे असणार? म्हणजे मन हा शरीराचाच एक अवयव का? मन म्हणजे मेंदू का? जर मन म्हणजे मेंदू तर विचार मनात म्हणजे मेंदूत येतात? मग मेंदूचा अभ्यास करणाऱ्या एकाही तज्ज्ञाला आजवर ब्रेनस्कॅनमधे विचार का बरे उमटलेले दिसले नसतील? पण विचार कसे दिसतील? जर विचार असतात म्हणजे आहेत (किंबहुना रने देकार्त म्हणतो विचारांच्या असण्यानेच आपले असणे सिद्ध होते) तर मग ते दिसत का नाहीत? जे दिसत नाही ते असू शकतं? तसं असेल तर मग ते भौतिक जगाचा भाग कसं? ते तर आधिभौतिक म्हणजे पारलौकिक जगात मोडायला हवं ना?' इथे प्रश्नांच्या साखळीला अडवत द्वंद्वात्मक परिप्रेक्ष्य एक नवी वाट सुचवते. ती कुठली? 

 

विचार दिसत नाहीत पण असतात, म्हणजे ते रूढार्थाने भौतिक जगाचा भाग नाहीत. पण म्हणून त्यांना थेट पल्याड पारलौकिक जगात धाडायचे? आणि विचारांप्रमाणेच, ते जिथून येतात ते मनदेखील दिसत नाही, मग मनाची रवानगीही पारलौकिक जगात करायची? मग मन आणि आत्मा यात फरक काय? का या दोन्हींत काहीच फरक नाही? द्वंद्वात्मक परिप्रेक्ष्य ह्या दोन्हींतल्या नेमक्या फरकावर बोट ठेवते. पारंपरिक धर्मकल्पनेप्रमाणे मर्त्य शरीर हे लौकिक/भौतिक जगाचा भाग असते तर अमर्त्य आत्मा हा पारलौकिक/आधिभौतिक जगाचा भाग असतो. या कल्पनेप्रमाणे मृत्यू म्हणजे आत्मा शरीरापासून विलग होणे. मनाचे मात्र तसे नाही. मनोविज्ञानानुसार मन हे शरीराचा अविभाज्य भाग असते. आत्म्याप्रमाणे ते शरीरापासून विलग होत नाही. मृत्यूनंतर मागे उरतदेखील नाही. पण द्वंद्वात्मक परिप्रेक्ष्यानुसार हे न दिसणारे मन (आणि त्यातील विचारही) मात्र शरीराप्रमाणे केवळ भौतिक पातळीवर असत नाही. याचा अर्थ ते आत्म्याप्रमाणे पारलौकिक पातळीवर असते असा अजिबात नाही. मनाचे असणे हे ना पूर्णपणे भौतिक पातळीवर ना त्याच्या पलीकडच्या पारलौकिक पातळीवर. ना अल्याड ना पल्याड. तर ते असते या दोन टोकांच्या म्हणजेच दोन स्वतंत्र जगांच्या मधल्या पातळीवर.

 

द्वंद्वात्मक परिप्रेक्ष्यानुसार ही मधली पातळी म्हणजे आधिभौतिक पातळी. जी भौतिकतेशी पूर्णपणे एकरूप होऊ शकत नाही पण जी भौतिकतेपासून पूर्णपणे विलग देखील करता येत नाही. त्याचमुळे भौतिक आणि आधिभौतिक पातळ्या एकाच जगात, एकाच स्थलकालात असून देखील एकमेकांशी पूर्णपणे एकात्म वा एकसंध नसतात. मात्र त्यांच्या एकात्म नसण्याने भौतिक आणि पारलौकिक अशी दोन स्वतंत्र, दुभागता येण्याजोगी जगेदेखील निर्माण होत नाहीत.  चाणाक्ष वाचकांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल की द्वंद्वात्मक मांडणी ही 'पारलौकिक = आधिभौतिक' ह्या विरोधात्मक मांडणीच्या पायाभूत समीकरणालाच छेद देते. तसे करताना ती एकीकडे पारलौकिक जगाच्या स्वतंत्र असण्याला नकार देते आणि दुसरीकडे आधिभौतिक पातळीच्या स्वतंत्र न-असण्याचा स्वीकार करते. ज्याप्रमाणे पारलौकिक जगाच्या स्वतंत्र नसण्याने पारंपरिक धर्मकल्पनेचे प्रयोजन डळमळीत होते, त्याचप्रमाणे आधिभौतिकाच्या स्वतंत्र न-असण्यातून आधुनिक धर्मकल्पनेचे प्रयोजन सिद्ध होते. ते कसे?

 

पारंपरिक कल्पनेनुसार धर्माचे प्रयोजन हे पारलौकिक जगाच्या दैवी सत्तेची लौकिक जगात अंमलबजावणी करणे. वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर विज्ञानाने पारलौकिक जगाचे अस्तित्व निकालात काढल्यावर पारंपरिक धर्माचे प्रयोजन डळमळीत होते आणि मागे उरते स्वायत्त परंतु एकारलेले भौतिक जग. एकारलेले, कारण या जगात माणूस म्हणजे फक्त माणसाचे शरीर. केवळ शारीर पातळीवरील माणूस म्हणजे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आकाराला आलेला द्विपाद प्राणी, सेपियन, ज्याचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा अधिक विकसित झाला. आपल्या विकसित मेंदूच्या बळावर आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करून हा द्विपाद प्राणी अफाट भौतिक प्रगती करतो, लौकिक अर्थाने विकासाची नवनवी शिखरे पादाक्रांत करतो, आधुनिकीकरण नावाच्या निरंतर बदलाच्या परस्परावलंबी प्रक्रियांना चालना देतो. साहजिकच भौतिक पातळीवर जिवंत असण्यात इतिकर्तव्यता मानणारा हा द्विपाद प्राणी माणूस होण्याच्या मार्गाला लागल्याचे अपवादानेच दिसते. मुळात माणूस होण्याच्या मार्गाला लागण्यासाठी माणूस-प्राणी असणे (गरजेचे असले तरी) पुरेसे नाही हे भान येणे गरजेचे. त्यासाठी विशुद्ध असणे असे नसते, त्याला लागूनच न-असणे देखील येते आणि असण्यापासून ते विलग करता येत नाही; किंबहुना न-असण्या शिवाय होणे शक्य नाही हे भान येणे गरजेचे. पण स्वायत्त भौतिकतेत बंदिस्त, आधुनिकीकरणाच्या नशेत दंग आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची झापडे लावलेल्या माणूस-प्राण्याला हे भान कुठून येणार?

 

हे भान तेव्हाच येऊ शकेल जेव्हा द्विपाद माणूस-प्राण्यातलं माणूसपण, त्यातली माणुसकी ही केवळ शरीराप्रमाणे असण्याच्या नाही तर मन आणि विचारांप्रमाणे न-असण्याच्या पातळीवर असल्याचे लक्षात येईल. ही गोष्ट तेव्हाच लक्षात येईल जेव्हा माणूस-प्राण्याचे मन, त्यातले विचार हे त्याच्या मेंदूत नसतात तर त्याच्या मनाचे आणि विचारांचे न-असणे हे इतर माणूस-प्राण्यांबरोबरच्या नातेसंबंधांतून, देवाणघेवाणींतून, भाषेतून, म्हणजेच सामाजिकतेततून घडते याची जाणीव होईल. ही जाणीव तेव्हाच होईल जेव्हा माणूस-प्राण्याचे माणूस होणे आणि माणूस-प्राण्याच्या झुंडींचे समाज होणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे नेणिवेत पाझरेल. जाणीव-नेणिवेची मशागत करत माणूस-प्राण्याचे माणूस होणे आणि माणूस-प्राण्याच्या झुंडींचे समाज होणे या परस्परावलंबी प्रक्रियांना चालना देणे हे आधुनिक धर्मकल्पनेचे प्रयोजन. आधुनिक अर्थाने धर्म म्हणजे मार्ग, द्विपाद प्राण्याचा माणूस होण्याच्या अविरत प्रवासाचा मार्ग, मानवजातीचा मानवी समाज होण्याच्या अविरत प्रवासाचा मार्ग. हा मार्ग दाखवून त्यावरील खडतर प्रवासासाठी ऊर्जा, प्रोत्साहन आणि धैर्य देणे हे आधुनिक धर्मकल्पनेचे प्रयोजन. 

 

'परंपरेचा प्रतिनिधी धर्म आणि आधुनिकतेचा प्रतिनिधी विज्ञान' ह्या सवयीच्या पण आळशी विरोधात्मक बाण्याने जर या मार्गाचा अव्हेर केला तर आधुनिकता म्हणजे केवळ भरकटलेले, दिशाहीन आधुनिकीकरण एवढाच अर्थ उरेल. म्हणून बाबासाहेब म्हणतात 'आधुनिक जगाला धर्माची खरी निकड आहे'. ह्या निकडीचा मथितार्थ कळला तरच आपल्याला बाबासाहेब आधुनिक काळात असलेल्या धर्माच्या निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय म्हणतायत ते कळू शकेल. धर्माच्या निवडीचे स्वातंत्र्य याचा अर्थ 'धर्म नावाचा सक्तीचा, जन्मजात वारसा झुगारून ऐतिहासिकदृष्ट्या उपलब्ध धर्मांपैकी कुठल्याही धर्माची निवड करण्याचे स्वातंत्र्य' असा नसून पारंपरिक धर्मकल्पना झुगारून आधुनिकतेला साजेशा धर्मकल्पनेची निवड करण्याचे स्वातंत्र्य असा होय.  

 

(पूर्वप्रकाशित)