नॅचरल ष्टार

"बेहेन! कॅमेरा खात नसतोय गं कुणाला. त्याला अजिबात घाबरायचं नी. फुल ऑन ॲटिट्यूडमधीच त्याच्याकडं बघायचं. लुब्रे 'पाउट' सेल्फीसाठी असतोय गं ऑडीशनमधी असले चाळे नकोत, लय वान्नाबी वाटतं ते. नीट बघा. पैले राईट प्रोफाईल मग लेफ्ट. अजिबात हलायचं नी, कॅमेरासमोर हाललं कि फेस ब्लर होतोय. फेस हरहमेशा किलेरच दिसला पायजेल. आपल्याला फेसचंच खायचंय. तर आदि राईट मग लेफ्ट अन आता फ्रंट.. असा अंगा अंगातून कॉन्फिडेन्स वाहायला पायजेल नुसता. आता इंट्रो"
समोर नसलेल्या कॅमेरासमोर टेच्यात उभी राहून प्रमिला नरहरी सपाटे फुल एनर्जीमध्ये इंट्रो देत होती.
"हाय माय नेम इज प्यामी सपाटे. आय एम ट्वेल्व यीअर ओल्ड. माय नंबर इज नाईन सेवेन थ्री थ्री थ्री. डी से डान्स मेरे रग रग में हय. आय लव्ह ड्यान्सिंग, एक्टिंग, एंड इटिंग पाणीपुरी. एंड आल्सो आय कॅन क्राय इन सेकंडस… इन जस्ट टेन सेकंड."
असं म्हणता म्हणताच प्रमिलेचे डोळे भरून आले अन ती घळाघळा रडायला लागली. ते बघून आम्हांला पण भरून येवू लागलं. मला कांकणभर जास्तच.
'मी लई पुढं जाऊ शकते फक्त मला संधी भेटत राहिली पायजेल!' म्हणत ती माझ्याकडं बघून फस्सकन हसली. नेहमीचंच होतं, आम्हाला जवा कवा ती रडतीय असं वाटायचं, तवा ती तोंड भरून हसायची.
'सी? झालं नं इथं टचिंग?
तिनं दोन्ही हाताने हार्ट केलाच. मग अंगठ्या खाली पहिलं बोट तिरकं धरून दोन बोटांच्या चुटकीसारखं स्टाईलिश टंबलर हार्ट करत डायलॉग हाणला "यालाच म्हणतात रिअल ष्टार नॅचरल टॅलेंट. हसते हसते रोना सिखो, रोते रोते हसना"
प्रमिलीला आच न पेच. आजूबाजूचे तोंडदेखलं 'वॉव यार! भारी एकदम!' म्हणायला उशीर, ती लगेच त्यांना तिच्या नव्या ऑडिशनबद्दल सांगू लागली. 'तू नागीण मै सपेरा'च्या नव्या सीझनमध्ये छोटी नागिनीचा रोल होता. त्यासाठी तिनं नागिणीसारखं सर्पटणं, डोळ्यांनी डंख मारल्यासारखं करणं असल्या कायनुकाय! सतरा गोष्टींची प्रॅक्टिस केलती.पण आजकाल सगळीकडे होतीय तशी इथे पण तिनं रिजेक्टच झाली. एज ए फ्रेंड मला लई वाईट वाटलं पण प्रमिलीनं फस्सकण हसत "एका संधीच्या नादात दुसरी संधी गेली!" म्हणत इषय संपवला...
प्रमिली कोडगी झालती का कोरडी, माहित नी… पण आजकाल ऑडिशनमधी फेल झाली तरी तिला पूज्य फरक पडत होता, बुलेटप्रूफ! शेमप्रूफ! तशी फुल्ल ऑडिशनप्रूफ झालती! इथं वर्गात माझ्या बाजूला बसून एवढं भारी परफॉर्म करायची नं, पण तिकडं ॲकचुअलीमधी काय माती खायची, काय माहीत! बरं! सीरिअलचा प्रोमो ऑनएअर येईपर्यंत तरी सुममधी गप्प बसावं! 'माझं फलानं ऑडीशन बिस्तानं ऑडीशन', म्हणून आधीच रिक्षा फिरवू ने हे सतरा येळेला बजावूनसुद्धा प्रमिली सगळ्यांसमोर भसकायचीच. इतका राग यायचा ना तिचा… पण पूज्य उपयोग! बदनाम हुये तो क्या, हिची सतत लाईमलाईटमधी राहिलं पायजेलची खाजच अपार! आता आता प्रमिली ऑडिशनमधी रिजेक्ट झाली याचं मला एवढं वाईट वाटायचं नाही पण ती सगळ्या शाळेत टिंगलीचं पात्र होणार म्हणून भीती वाटायची, मरणामातीचा त्रास व्हायचा, अतोनात चीड चीड व्हायची पण प्रमिली... 'पूज्य' फरक!
आत्तापण पोरींच्या कोंडाळ्यात फेस कसा एकदम कॅमेऱ्याच्या लेन्ससमोर आणायचा, मग तो मागे नेत कसे केस झटकायचे याचा डेमो दिला. अन मग मोतियों जैसे दांत दाखवत म्हणली,
"हाय गाईज! तुम्ही प्यामचा कोणता ड्यान्स बघणार लेट मी क्नो!"
"नो असतंय ते. के सायलेंट" मी करेक्ट केलं.
"तो स्पेलिंगमधी, आमच्या टीव्ही इंडस्ट्रीतला 'के' कवाच सायलेंट नसतोय " म्हणत स्वतःच खो खो हसली. तिचा जोक कुणालाच कळला नाही. त्यामुळ कुणी तितकं हसलं नाही. तेव्हा तनक्यात म्हणली,
"एकता कपूरमधला 'के' सोडा! हा इनसाईड इंडस्ट्रीमधला जोकय... तुम्हा बाहेरच्यांना नाही कळणार!"
अन् पूज्य सेकंदाचा सुद्धा पॉज न घेता सुरू झाली,
"एक्टिंगमधी सायलेंट पण बोलका पायजेल हे लक्षात राहूद्या."
"म्हणजे?"
"म्हणजे म्हणजे प्यामीचे फंडे"
बारा सेटचं पानी पिलेली प्रमिली बोलण्यात हार जाणारी नाहीच. एकदा सुरू झाली की बोलू बोलू इषयाचा कंडकाच पाडणार.
"फॉर एग्झाम्पलमधलं एक्झॅक्ट उदाहरण बघा. 'मला खूप वाईट वाटतंय... पण ठीके!' हे वाक्य आता तुमची प्यारी प्याम सायलेंटमधी बोलणार … सी एंड ऑब्जर्व."
क्षणात तिचा चेहरा बदलला. ॲक्टिंग करता करता तिची लाईव्ह कॉमेंट्रीपण सुरू झाली.
"अशे डोळे खाली, श्यालो ब्रीद वन टू वन, वन टू! मग होटं अशे हलके हलके थरथरले पायजेत! समोर बघायचा ट्राय केल्यासारखं करायचं पण नजरेला नजर अजिबात द्यायची नी… अन् शेवटी हळूच ऐकू जाईल न जाईल असं... पण ठीके!"
डोळ्यांतून, बॉडीतून प्रमिली अशी काय अॅक्टिंग करत होती की तिचा 'ठीके' डायरेक घुसला… इथं हार्टमधी. कोटलवार बाई अन देशमुख बाईच्या तासाला हा 'ठिके' शंबर वेळेला तरी ऐकलाय मी...
प्रमिलीची आई मेकअप आर्टिष्ट. मरणामातीची उत्साही. तिचा अंगात न मावलेला उत्साह तिने तिच्या या पोरीच्या अंगावर शावर केला. आमच्या जीवन प्रगती प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतला विविध गुणदर्शनाचा कोणताच कार्यक्रम प्रमिलीच्या परफोर्मंसशिवाय पार पडायचाच नाही. कधी क्विनमधली कंगना होऊन "मैं इंडिया से हूँ... राजौरी। राजौरी सुना है? अपने हनीमून पे अकेले आई हूँ!" म्हणत लंडन दा ठुमकावर नाचणार. "राजपूती कंगन में उतनी ही ताक़त है जितनी राजपूती तलवार में।" म्हणत घुमर करणार, "फिल्में सिर्फ़ तीन चीज़ों की वजह से चलती हैं एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट... और मैं एंटरटेनमेंट हूँ." म्हणत बूम्बाट विद्या बालन होणार. प्रमिलीच्या रिला तर शेकड्यानं केल्या असतील तिच्या आईनं.

"अभ्यास करशील तर पायावर उभी राहशील," म्हणू म्हणू माझी मम्मी माझा सूड खातीय तशी तिची आई कवाच करत नव्हती. प्रमिली म्हणतीय तसं 'तिच्या आईची सूड खाण्याची तऱ्हा जरा डिफरेंटय!' तिने करीकुलरपेक्षा एक्स्ट्रा करीकुलरवरच एक्स्ट्राचा सपाटा लावलता. शाळेचं ग्यादरिंग म्हणू नका रोटरी क्लबचा गरबा क्वीन, दांडिया धमाका, बेस्ट गरबा ड्रेस… म्हणू नका, गणेशोत्ववातलं नाटक म्हणू नका, इंटरनेटवरचं सखीचा नखरा म्हणू नका नथीचा नखरा म्हणून नका, 'डायलॉग रीला' म्हणू नका, नऊ दिवसाचे नऊ रंग म्हणू नका. जिथं स्टेज, तिथं प्रमिली… प्रमिलीची इच्छा असो नसो तिची आई तिला सगळीकडे चमचमवायचीच!
'आमच्या प्यामूत कुटून कुटून टॅलेंट भरलंय' म्हणत रविवारपासून उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत सगळा कार्यक्रम बुक करून टाकायची. अन कसंय जी गोष्ट थोडी बहुत आवडतीय ती करायला एवढ काही बोर वाटत नाही. करीकुलरपेक्षा हे एक्स्ट्राचं करीकुलर बेष्टम बेष्टच! आखिर प्रमिलीत कुटू कुटू भरलेलं टॅलेंट अन तिच्या आईचं तिला जिथं तिथं पुढं पुढं करण्याचं काम… कामाला आलं!
"किसी चीज़ को शिद्दत से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है…"
प्रमिली पाचवीत असतानाच तिला एका सीरेलमधी छोटासा रोल मिळाला. त्या सिरेलचं नाव नाही आठवत. अशाच नाव न आठवणाऱ्या सिरिअली सिरिअली करत करतच प्रमिलीला 'तू माझ्यासंगं, मी त्याच्यासंगं'मध्ये 'छोट्या आरती'चा मेन रोल मिळाला. पाचवी, सहावी आणि अर्धी सातवी ती सिरेल चाललीय. दोन दिवस नं आलं तर लगेच नोटीस धाडणाऱ्या आमच्या शाळेनं तिच्या सगळ्या बुट्ट्या चालवून घेतल्या. परीक्षेपुरतं ती यायची. आली की माझ्याच बाजूला बसायची. कोटलवारबाई उगीच एक्स्ट्राचं कवतिक दाखवत म्हणायच्या 'संधीचं सोनं करायची हौसचय माझ्या या विद्यार्थिनीला' आता त्यात प्रमिलीची तारीफ होती की माझी झाडी त्यांचं त्यांनाच माहीत. कारण मी पण पहिल्या तिनांत होते.
त्या काळात प्रमिलीचे पेपरमध्ये कितीदा फोटो आले, कितीदा गावोगाव सत्कारं झाले याची गिनतीच नाही. शाळेतले सगळेच जनं ती सीरिअलमधली 'छोटी आरती' माझ्या शाळेचीय, माझ्या वर्गातलीय, माझ्या तुकडीतलीय, माझी मैत्रीणय, माझ्या बाकावर बसतीय म्हणू म्हणू शाईन मारायचे. खोटारडे! ती शाळेत आली त्या 'डे वन'पसून माझ्याच बाकावर बसलीय. आत्तापण माझ्याच बाजूला बसतीय ती. पण मी यांच्यासारखी नाही. अप्पलपोटी! मरणामातीची खोटी!
त्या नाकझाड्या देशमुखबाई तर प्रमिलीवर एवढ्या लुब्धून असायच्या की विचारायची सोय नाही. साक्षी तनवरकडून यांच्या पोराच्या वाढदिवसासाठी खास "हॅपी बर्थडे आकाश" म्हणलेला व्हिडिओच करून पाठवून दिलता यांना प्रमिलीनं.
क्रेझ होती, ब्रो... आमच्या प्रमिलीची क्रेझ होती!
फिजिक्स सांगतंयच ना, नो स्टेट इज परमनंट! आज जो पीकवर उद्या तो स्लोपवर… एव्हरेष्टवरची शीट कवाच कुणासाठी परमनंट बुक नसती. आमच्या प्रमिलीची ती सुपरहिट शिरेल अशीच अचानक बंद झाली. त्यातला मेन लीड लय माजल्यासारखा करायचा म्हणे. टायमवर सेटवर यायचा नाही, आल्यावर पण 'ये नही ओ नही'चे राडे करायचा. टीआरपी होता तोपर्यंत चॅनेलनं चलवून घेतलं. टीआरपी पडला अन शिरेल डायरेक ऑफ एअर!
बिच्चारी प्रमिली!
त्याच्यानंतर एक नाही दोन नाही एकशे अठरा ऑडिशन दिलेत प्रमिलीनं, पण अजून दुसरा रोल काही मिळाला नाही. ष्टार्ट ष्टार्टला तिची मम्मी लई जास्त 'पर डे' सांगायची म्हणून सीरिअली गेल्या. नंतर तिचा 'गुड टाईम' गेला. प्रमिली आता कुठल्या रोलसाठी जास्त मोठी तर कुठल्या रोलसाठी जास्तच लहान वाटती सिरीअलवाल्यांना.
कालपर्यंत तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांगा लावणारे लोक स्टॉप ब्लॉकमध्ये गायब झाले. टाळ्यांचा गजर, पेपरमधले फोटो, गावोगावचे सत्कारं एकदम पॉज झालं...ज्या टॅलेंटची कालपर्यंत सगळीकडे चर्चा होती, त्याच टॅलेंटला आज मार्केटमध्ये मागणी नव्हती. सीरिअलचं ऑप्शन बंद झालं म्हणून तिच्या पप्पा मम्मींनी तिला शाळेत धाडायला सुरुवात केली. कालपर्यंत टीव्हीवर दिसणारी सुपरस्टार प्रमिली आता रोज आमच्यासोबत प्रार्थनेच्या रांगेत थांबणारी मँगो स्टूडेंट झालती. आसमानातून डायरेक्ट जमिनीवर आदळली होती.
"प्यामी सपाटे… नाव लक्षात ठेवा, कारण नेक्स्ट हाइप माझीच!" हा तिचा डायलॉग आता वर्गातल्यांसाठी रोस्ट मटेरियल झालता. तिच्या भोवतीचा घोळका संपला. कालपर्यंत तिच्या एका स्माईलसाठी सिम्प करणारी पोरं आता तिला फुल इग्नोर मारण्यावर होती. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी मर मर करणारे आता तिला बघून लेफ्ट ऑन सीन करत होते. तिचा प्रत्येक फ्लेक्स ज्यांना आयकॉनिक वाटायचा, त्यांनाच आता ती क्रिंज वाटत होता. प्रमिलीची मेन कॅरेक्टर वाली व्हाइबच ऑफ झालती.
'लाइट्स... कॅमेरा... ॲक्शन!' ऐकणाऱ्या प्रमिलीला आता चौथ्या बाकावर बसून, 'चला, मराठीचं पुस्तक काढा, पृष्ठ क्रमांक बेचाळीस! आज अपूर्णांक शिकायचे आहेत! प्रकाशसंश्लेषणाची व्याख्या काय? खारे वारे आणि मतलई वारे यांच्यातील फरक सांगा, उद्याच्या घटकचाचणीची तयारी करा' असल्या कवाच न आवडणाऱ्या गोष्टी आता तिला ऐकाव्या लागत होत्या. हे टच सुटला होता म्हणून असल, नाहीतर इथल्या टीचरनी शिकवलेलं टच करत नसल म्हणून असल, पण आज घडीला शाळेचा अभ्यास प्रमिलीला मरणामातीचा अवघड जात होता...पण काही जमत नाही म्हणून रडण्यापेक्षा जमतंय ते करून ती तिचा हॅपीनेस शोधायची. सुशांतसिंग राजपुतला फिजिक्स आवडायचं म्हणून न्यूटनचे नियम आवडतात म्हणायची आणि लिंकनशायरच्या वूल्सथॉर्प मॅनरमध्ये डीप विचारांमधी बसलेला न्यूटन अचानक सफरचंद डोक्यावर पडल्यावर कसा पळाला असल ते करून दाखवायची, मराठे पानिपतची लढाई का हारले कारणे द्या म्हणल्यावर अर्जुन कपूरला नेतृत्व दिल्याने म्हणायची… 'दोन अधिक दोन' इचारलं की माझ्या डोक्यात चार ऑप्शन उभे राहतात, देवीयों और सज्जनो कौनसा लॉक किया जाये म्हणायची… खरं तर हे सगळं ती जोकमधीच म्हणायची पण वर्गातले टीचर त्याला नको तेवढं शिरेस घ्यायचे … कालपर्यंत ज्या टॅलेंटसाठी वर्गात प्रमिलीचा उदोउदो व्हायचा, त्याच टॅलेंटचे आता डेली बेसवर धिंडवडे निघण्यावर होते. देशमुख बाईंनी तर कहर केलता. 'मुलांनो अभ्यास नाही केलात न तर प्रमिलासारखे हाल होतील. सीरिअल-बिरीअल आयुष्याला पुरत नसतात! ते गाण्यातल्या शोमधले विनर पोरं कुठायत? त्या नाचाच्या शोमधले विनर पोरं कुठायत? तो मास्टर राजू, माष्टर अलंकार कुठायत आता ? तो छोटा बच्चा जान के हमकोवाला तो अवली पोरगा कुठाय? मालगुडी डेजवाला स्वामी आता कुठाय? टीव्हीवर क्रेझ असलेली ती बारकी कॉमेडीअन गंगूबाई कुठाय?' म्हणून जाहीर सवाल करायच्या. आणि प्रत्येक उदाहरणानंतर देशमुख बाई मुद्दाम प्रमिलीकडे पहायच्या. वर्गात हसनीखुसनी दात दिसनी व्हायची. प्रमिलीची चूक व्हायला उशीर त्या अशीच एक लंबीलाट जंत्री ऐकवायच्या. आम्ही विद्यार्थी लगेच ती नावं 'हे कोण बाबा' म्हणत गुगलदेवाचा सर्च मारायचो. प्रमिलीपण तेच करायची.
"अभ्यास करा. कारण दोन दिवसांच्या टाळ्यावर आयुष्यभर पोट भरत नाही!" हे वाक्य तर कोटलवार बाईंचं पेटंट होतं.
प्रमिली आधी आधी मान खाली घालायची. हेड डाऊन करून डोळ्यांतून पाणीपण काढायची. मी तोंड बारीक करून इचारलं की लगेच 'ॲक्टिंगय गं ही' म्हणत फिस्सकन हसायची. मला तिचं ते हसू बघून रडू फुटायचं. सगळ्या वर्गाचा मरणामातीचा राग यायचा. कोटलवार बाई तर डायरेक डोक्यातच जायच्या. कारण काही महिन्यांपूर्वी याच बाई प्रमिलीचं कौतुक करताना थकायच्या नाहीत. "लिहून घ्या, माझी ही आवडती विद्यार्थिनी खूप पुढे जाणार!" म्हणायच्या. आणि आता असला अप्पलपोटेपणा अन मरणामातीचा खोटेपणा…
ज्या प्रमिलीवर अख्ख्या शाळेच्या नजरा खिळलेल्या असायच्या, त्याच शाळेत आज डेली बेसवर तिची झाडी होत होती. "संधीचं सोनं करायची संधी घालवलीस… आता शिकायची संधी मिळालीय, ती तरी घे! नायतर ही संधीपण पळत पुढे जाईल तुझ्या!" म्हणू म्हणू टोचे मारले जातायत. आईरक्ताची शपथ! दुसरी पोरगी असती तर तिनं कवाच आपल्या मम्मी-पप्पांना सांगून शाळाच बदलली असती. पुन्हा तोंड पाहिलं नसतं असल्या शाळेचं, अन् असल्या टीचरचं! पण प्रमिली शंबर टक्के नॅचरल टॅलेंट रिअल ष्टारय. ती इथं याच शाळेत राहिलीय… कारण तिची बेष्टम-बेष्ट फ्रेंड संध्या सदाशिव नेटके याच शाळेतय. हो हो… लंगडी संधीच! 'दो बुंद जिंदगी के' न मिळाल्यामुळं प्रमिलीच्या आधारानं पायं खुरडत खुरडत चलणारी…