Skip to main content

रूममेट

कॉलेज रियूनियन संपले, मग न्यूयॉर्कहून परत येताना अंकुशची गाडी फिलाडेल्फियाला रात्री अडीच वाजता पोचली. "इतक्या अपरात्री मला पिकअप करायला रेल्वे स्टेशनावर येऊ नकोस, अन्या", असे अंकुशनेच अनन्याला – त्याच्या पत्नीला – सांगितले होते. अन्याचा मुद्दा असा की अशा अडनाडी वेळी उबरसाठी वाट कशाला बघतोस? पण आपल्या सोयीसाठी कोणाच्या झोपेचे खोबरे व्हावे, हे अंकुशला पटेना.

 

उबर बोलावण्याआधी अनायासे समोर बस आली, ती अंकुशने पकडली. रडत रखडत सव्वातीन वाजता बस त्याच्या स्टॉपपाशी पोचली. फिलाडेल्फिया स्टेशन चुकायच्या भीतीने आधीच गाडीच्या प्रवासात तो नीट झोपला नव्हता, सूटकेस ओढत घरी येईपर्यंत त्याचे अंगअंग शिणले. बेडरूममध्ये खुडबूड करण्याऐवजी लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर तो प्रवासातल्या कपड्यांतच आडवा झाला.

 

कमीत कमी आवाज करत पायजमा बदलून तो बिछान्यात जाऊ शकला असता, म्हणा. अर्धवट जागून कुशीवर वळून अन्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला असता. कदाचित केसांतून हात फिरवला असता. आणि "ट्रिप कशी झाली" विचारले असते. त्याने "ठीक झाली" म्हटले असते. अन्याला आणखी जाग असती, तर तिने विचारले असते, "कॉलेज रियूनियनसाठी या वर्षी काही खास इव्हेंट होता का?" तो म्हणाला असता, "हो, हडसन नदीवर लंच क्रूझ साडेचार तासांची". तिने पेंगत विचारले असते, "तुझा हॉस्टेल रूममेट सदानंद आला होता?" त्याने म्हटले असते, "नाही, यावेळी नव्हता तिथे". मग दोघांनी कूस बदलून झोपायचा प्रयत्न केला असता.

 

तिला-त्याला दोघांना जाग असती, तर त्याने आणखी सांगितले असते का? कोणास ठाऊक. त्याच्या हॉस्टेल ग्रूपपैकी ती फक्त सदानंदला ओळखत होती; त्याला या वेळी यायला जमले नव्हते. अमेरिकेत स्थायिक झालेले राज, नीरज, रणजीत, तिघेही या खेपेला न्यूयॉर्कला आले होते;  पण अन्याची यांच्यापैकी कोणाशीही ओळख नव्हती. आदल्या रात्री हॉटेलच्या बारमधले तासन‌्‌तासाचे गप्पाष्टक हेच अंकुशसाठी खरे रियूनियन होते. कॉलेजच्या वीस-पंचवीस बॅचेसमधल्या सत्तर-ऐंशी अनोळखी लोकांचा रिव्हर क्रूझमधला गोंगाट नव्हे. बौद्धिक पातळीवर अन्याला हा मुद्दा निश्चित समजला असता. पण या अर्धवट झोपलेल्या अवस्थेत बहुधा नाही.​ ​

 

*

 

गप्पासत्रात काय झाले होते? राजला नेहमीसारखी कॉलेजच्या फर्स्ट ईयरमधली एक खोडी आठवली होती. एका शनिवारी रातोरात त्यांनी मुलींच्या हॉस्टेलच्या कुंपणाला कंडोमच्या फुग्यांच्या माळा बांधल्या होत्या. गेल्या तीस वर्षांत राजकडून कथा ऐकायची तर तपशील बदलत चालले होते. आधी मागच्या खिडकीतून दिसणारी एकच माळ होती. मग एका वर्षी कंडोमच्या माळेने "RITA" नंतर एकदा "RAJ KI RANI RITA" लिहिले होते. मग, राजचे लग्न झाल्यानंतर लिहिलेले नाव कहाणीतून नाहीसे झाले. एक, मग दोन, मग तीन माळा समोरच्या फाटकाला, मग कुंपणाला चहूकडे लोंबायला लागल्या. अंकुशने खुद्द काय ते बघितले नव्हते. जमेल तितक्या शनिवार-रविवारी तो रास्ता पेठेत आत्याच्या घरी चार सकस जेवणांवर ताव मारून यायचा. अंकुशसाठी कथेच्या सगळ्याच विसंगत आवृत्त्या निव्वळ ऐकीव होत्या.

 

अधूनमधून राजच्या कथेत यायचे, की कंडोमचा खोका आणून दिला तो सदानंदने. हे खरे असणार, याबाबत अंकुशला खात्री होती. खोका वाघोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून आला असणार – सदानंदचा किशोरदादा तिथे ज्यूनियर मेडिकल ऑफिसर होता – दर महिन्याला एक्स्पायरी झालेले कंडोमचे खोकेच्या खोके तिथे कचऱ्यात टाकून द्यायचे, अंकुशने हे आपल्या डोळ्याने बघितले होते. सदानंद एकदा अंकुशला वाघोलीला बाईकवर बसवून घेऊन गेला होता. सदानंद केंद्रावर पुष्कळदा जात असणार. तिथले लोक त्याला "छोटू डॉक्टर" म्हणून हाक मारत होते. तरुण शिकाऊ नर्सपासून जख्ख म्हाताऱ्या सफाई-मावशीपर्यंत सगळ्यांशी तो गप्पा मारत होता. अंकुशच्या आत्याच्या वयाच्या हेड नर्सबाईंनी तर सदानंदला ऑफिसात बोलावले. थोड्या वेळाने बाहेर आल्यावर त्यांनी दिलेली "खास कोकणातल्या फणसाच्या सांदणाची वडी" सदानंदने अर्धी अंकुशला दिली होती.

 

अंकुश त्या काळात बुजरा होता; सदानंदसारखी अनोळखी लोकांशी, विशेषकरून मुलींशी मैत्री करणे त्याला जमले नसते. आणि राजसारखे मुलीला पटवायला तिच्या पाठीमागे लागणेही जमले नसते.

 

आणि हो, राज आज इतका सभ्य सद्गृहस्थ आहे, पोरकट खोडीची त्याची ही कथा अंकुशने अन्याला सांगायचे ठरवले असते, तर तिचा आजच्या राजबाबत निश्चितच गैरसमज झाला असता. हे ओळखून अन्याला ही कथा सांगायचा विचार अंकुशने रद्द केला असता.

 

*

 

नीरजची कॉलेजची मोठी आठवण म्हणजे त्या चौघांची गोव्याची बाईक ट्रीप. अंकुशला चांगले आठवत होते – कॉलेजमध्ये नीरजची बुलेट म्हणजे त्याचा जीव की प्राण! यूएसमध्ये आल्यावर त्याने लवकरात लवकर एक हार्ली-डेव्हिडसन घेतली होती, पण त्याचे खरे समाधान झाले नव्हते. वीस वर्षांनी खटपट करून, भरपूर पैसे मोजून, त्याने अक्षरशः खास भारतातून इम्पोर्ट करून आताची बुलेट आणली होती.

 

कॉलेजकाळात नीरज मोबाईक घेऊन महिन्यात एकदा तरी खंडाळा-महाबळेश्वर असा कुठे-कुठे एकटा-दुकटा जायचा. गोव्याची वाट लांब, घाटात एका गाडीला दुसरीची साथ बरी, म्हणून त्याने सदानंदला बरोबर यायला सांगितले. हा शहाणपणा पुढे उपयोगी ठरला. एरवी नीरज "तुझ्या हीरो होंडाला काही पावर, काही जोरच नाही!" अशी सदानंदची चेष्टा करायचा.

 

खरे तर आधी सदानंदने अंकुशला "आमच्याबरोबर गोव्याला यायचे का?" विचारले होते. अंकुश सदानंदबरोबर गावातल्या गावात बाईकवरून पुष्कळदा इकडे-तिकडे गेला होता. सदानंद बाईक आरामात, घाई न करता चालवायचा. हीरो होंडाला पिकअप कमीच होता हे खरे, पण ट्रॅफिकमध्ये धसमुसळेपणा करायचा सदानंदचा मुळातच स्वभाव नव्हता. लांब प्रवास असला, तरी त्याच्या डबलसीटवर अंकुशला पूर्णपणे सुरक्षित वाटले असते. सदानंदला वेगाचे थ्रील कळत नव्हते, असे मात्र मुळीच नव्हते. वाघोलीला जाताना येरवड्यानंतर नगर रस्ता मोकळा होता, तेव्हा सदानंदने बाईक सुसाट पळवली होती. अंकुशने सीटच्या कडा इतक्या घट्ट आवळून धरल्या होत्या, की दोन्ही हाताच्या करंगळ्यांची नखे त्याच्या पंजांमध्ये रुतली होती. त्या महिन्याचे केस अंकुशने अजून कापायचे होते; वाऱ्यात केसांच्या बटा कपाळावर फडाडा आपटत होत्या. हवेचे कानातले वेगात घोंगवणे थरारक होते. गोव्याला जायला अंकुश हो म्हणाला असता, तर सदानंदच्या बरोबर हा थरार त्याला पुन्हा शेकडो किलोमीटर अनुभवता आला असता. तरी अंकुश नाही म्हणाला. अंकुशचे वडील दर महिना पैसे पाठवत, पण महिन्याच्या शेवटी त्याचा अकाउंट बॅलन्स जवळजवळ शून्य व्हायचा. या ठिकाणी साथीला फक्त सदानंद नाही, तर बड्या बापाचा बेटा नीरजही होता. असला खर्च अंकुशला परवडणारा नव्हता. आत्याच्या घरी कार्यक्रम आहे, अशी सबब त्याने दिली. सदानंदने आग्रह केला नाही. त्याला खरे कारण कळत होते. अंकुशला आणखी ओशाळवाणे वाटावे, अशी परिस्थिती केली नाही.

 

अशा प्रकारे त्या गोवा ट्रिपवर नीरज-सदानंदसोबत राज-रणजित, असे चौघेजण गेले होते. त्या ट्रिपमध्ये पाहिलेल्या अंजुना बीचवरच्या उघड्यानागड्या हिप्पी-हिप्पिणींच्या थव्यांबाबत वर्णन नीरज चघळत-चघळत सांगायचा. एका हिप्पिणीला नीरजने बुलेटवर राईड दिली, ती त्याच्या कंबरेभोवती हात घालून कशी खेटून बसली होती ते सांगायचा. अमेरिकेत आल्यानंतर त्याच्या कथांचे केंद्र गोव्यात अनुभवलेले मोकळे वातावरण, समुद्र आणि निसर्ग झाले. लिफ्ट दिलेली बाई पोक्त झाली. स्मृतीचे चमत्कार म्हणावे.

 

गोव्याहून परत येताना घाटात नीरजचे एक टायर पंक्चर झाले होते. पंक्चर झालेले टायर घेऊन सदानंद आणि नीरज घाट उतरून खालच्या गावात गेले, तर त्या अपरात्री टायर पंक्चर दुरुस्तीचे एकही ठिकाण उघडे नव्हते. सदानंद पुन्हा घाट चढून ट्रिपलसीट करून राज-रणजितना खालच्या गावात घेऊन आला. घाटात वाट बघताना राज-रणजितनी झाडीत खुसफूस ऐकली. कुठलेतरी मोठे जनावर असणार हे समजून ते भीतीने हादरून गेले होते. त्यांना न्यायला सदानंद पोचला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. अर्थातच नीरजने हा भाग बघितला नव्हता. ही पुरवणी कथा नेहमीप्रमाणे रणजितने सांगितली.

 

ही विस्कळित बिनमुद्द्याची हकीकत सुसूत्र करून अन्याला सांगणे अंकुशला अजिबात जमले नसते. म्हणजे ही कथा अर्ध्या झोपेतच काय, जागेपणीही तिला सांगायचे त्याला सुचले नसते.

 

*

 

धोक्याच्या प्रसंगी बाईक घेऊन सदानंद मदतीला येण्याची आणखी एक कथा रणजित नेहमी सांगायचा, ती या वेळीसुद्धा सांगितली. एका शनिवार रात्री हॉस्टेलमधली ८-१० मुले जमेल तितक्या बाईक्स आणि २-३ फास्ट मुलींना घेऊन सिंहगडावर पार्टी करायला गेली होती. आमच्या वरल्या बॅचचा राजीवसिंग, म्हणजे बॉस पटियालेवाला, याने वाढदिवस साजरा करायचा जंगी बेत आखला होता. शनिवार, म्हणजे अंकुश हॉस्टेलवर नव्हताच. पण जरी तो हॉस्टेलवर असता तरी त्याला आमंत्रण नसतेच – एकदोन बाईकवर डबलसीट मोकळी होती, असे असून. बॉस पटियालेवालाच्या लफ्फेबाज हिंदीवाल्या, फाडफाड इंग्लिशवाल्या, बाईकवाल्या कंपूत आपले अस्तित्वही लक्षात येणारे नव्हते, असे अंकुशने मनातल्या मनात म्हटले. गोष्ट ऐकताना दर वेळी अंकुश हा विचार मनातल्या मनातच करायचा. आजच्या आपल्या अमेरिकेतल्या सफाईदार इंग्लिश बोलण्याची त्या गँगच्या हिंग्लिश गुर्मीशी तुलना करता अंकुशला चिडायला व्हायचे. पण रणजितला त्या गँगचे आकर्षण होते. अंकुशचा मुद्दा त्याला कळलाच नसता, पटायचे दूर.

 

रणजित आठवणी सांगत राहिला. बॉस पटियालेवाल्याच्या फौजी ओळखी होत्या. त्याने आर्मी कँटीनमधून एक डझन हेवर्ड ५००० बियर, दोन ओल्ड मंक रमच्या बाटल्या मिळवल्या होत्या. शिवाय चखणा-फरसाण, रम मिक्स करायला सॉफ्टड्रिंक, सगळे भरपूर होते. गँगपैकी कोणाचातरी भल्यामोठ्या स्टिरियो स्पीकरचा कॅसेटप्लेयर बूमबॉक्स होता. अंकुशला तो बूमबॉक्स ओळखीचा होता. सीनियर ईयरच्या सिंगलसीटर विंगमधल्या त्या बूमबॉक्सच्या संगीताचा गोंगाट ज्यूनियर ईयरच्या डबलसीटर विंगपर्यंत त्रास द्यायचा. सीनियर ईयरच्या धनदांडग्या मुलांबाबत हॉस्टेल वॉर्डनकडे तक्रार करण्यात काहीच उपयोग नव्हता, हे अंकुश ओळखून होता.

सिंहगडावर पार्टी

अशा प्रकारे बाई-बाटली-बेंडबाजा घेऊन बाईकचा तांडा सिंहगडावर पोचला, तेव्हा रणजितच्या आठवणीनुसार रात्रीचे दहा वाजले होते. शेकोटी पेटवून थोडीशी दारू रिचवून डान्स-दंगा सुरू होईपर्यंत अकरा वाजले असतील. साधारण त्या वेळेला एक माणूस काठी टेकवत टेकवत पायवाटेवरून पार्टीजवळ आला. "आम्हांला वाटलं कोणी भिकारी आहे." रणजित म्हणाला. तो तोंडपाठ केल्यासारखी कथा सांगत राहिला. "मी त्याला म्हणायला लागलो, आमचं अजून खाऊन व्हायचं आहे, नंतर ये. पण तो चिरक्या आवाजात ओरडायला लागला. "म्हाराजांच्या गडावर दारू पिताय, घाणेरडे चाळे करताय, आणि मला भिकारी समजतायत भडवे हरामखोर!" आम्ही त्याला म्हणालो, "सिंहगड सगळ्या देशाचा आहे, तुझ्या बापाचा नाही!" तर तो आणखी चेकाळला; "बापाचं नाव काढता! म्हाराजांच्या मावळ्याला सांगताय गड कोणाचा, डुकरिणीची अवलाद!" मग आमच्यापैकी दोघाजणांनी त्याला धक्के देत पायवाटेला लावलं. "म्हातारचळ लागलाय तुला, तात्या! चल फूट!" तो बोंब मारतच पायवाटेवरून खाली गेला."

 

"पार्टीचा मूड पुन्हा जमायला वेळ लागला, पण जमला." रणजित पुढचे सांगत राहिला. "दारूचा प्रभाव म्हण, मला जोराची शू लागली. पार्टीपासून दूर झाडीमागे पोचलो, तर परसाकडे जायची भावना झाली, तर आणखी जरा लांब लपून हगायला बसलो. मागे मायकल जॅक्सनचं गाणं चालू होतं, ते मला शब्दशः आठवतं: It's close to midnight\ And something evil's\ lurking in the dark. ऐकत-ऐकत गाणं गुणगुणण्याच्या नादात पार्टीच्या दिशेने काहीतरी गडबड ऐकू आली, खरी. हागायचं अर्धवट होतं, म्हणून थोडा वेळ मी लक्षच दिलं नाही… ती माझी चूक, मान्य आहे. हल्लागुल्ला बूमबॉक्सच्या आवाजापेक्षा वाढला, तेव्हा माझी फाटली. जितक्या गोष्टींना दगा देता आला, सगळ्यांनी दगा दिला. पाण्याची बाटली कलंडून सगळं पाणी सांडलं. पाचोळ्यानं ढुंगण पुसायला अंधारात हातांनी आजूबाजूला चाचपडलं, हातात एक पान येईना. चड्डी तशीच ओढायला गेलो, तर ती एका सँडलच्या बक्कलमध्ये अडकली, आणि धड उभंही राहाता येईना. कसं तरी करत झिपरसुद्धा न लावता धडपडत निघालो, तर झुडपांतून बाहेर येण्यापूर्वी मला एकापाठोपाठ एक बाईक चालू होऊन रेस केल्याचे आवाज आले. झुडपांतून बाहेर येतो, तर रस्त्याच्या वळणावरून पसार होणाऱ्या शेवटच्या दोन-तीन बाईक दिसल्या. दांडुके घेऊन शिव्या ओरडत पाठलाग करणारे पाचसहा गुंड दिसले. गाड्यांच्या मागच्या दिव्यांच्या उजेडात शेंदरी चेहऱ्यांचे राक्षस मागे लागलेले दिसले. मी पटकन पुन्हा दाट झुडपांत लपकून दडलो. ओरडणे ओसरत होते, तशा गाण्याच्या शेवटच्या ओळी ऐकू आल्या, ते स्वच्छ आठवतंय Your body starts to shiver \ For no mere mortal can resist \ The evil…, आणि संगीत बंद पडलं. पण ते गुंड तिथेच राहिले. विखुरलेला कचरा गोळा करत होते. साले दळिद्री."

 

इथे नीरज मध्ये बोलला. "गाड्या झूम करत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. मी सगळ्यात पुढे होतो. मी रस्त्यात गाडी आडवी करून सगळ्यांना थांबवलं. रजीवसिंग खेकसला माझ्यावर, रुका क्यों पेहेन्देलॉरे, मरवाएगा पोहसडीवाले", नीरजने रजीवसिंगच्या पंजाबी-हिंदीची नक्कल केली ती तंतोतंत की बेकार, हे कळण्याइतपत पंजाबी भाषेची ओळख अंकुशला नव्हती. नीरज कथेची तळटीप सांगत राहिला. "मी म्हटलं, बॉस, प्लीझ, गिनके देखते हैं, सब आये हैं कि नहीं. आधी आकडे मोजून, मग नावानी गिनती केली. लक्षात आलं की, रणजित, तू नव्हता आमच्याबरोबर. सदानंदच्या पाठीमागे डॉली बसली होती, तिला तो म्हणाला, "तू नीरजच्या मागे बस आणि हॉस्टेलवर सुरक्षित जा. मी वर जाऊन आणतो रणजितला. रजीवसिंग म्हणाला, ए पेवकूफ, हमारे साथ नहीं आया लौंड़ा तो पॉहॉत सही छिपा होगा कहीं पे. छोड़ दे, सुबह आ जाएगा! रणजित, तुला सोडून द्यायचं म्हणाला रजीवसिंग, तेव्हा मला त्याचा इतका भयंकर राग आला! सदानंद म्हणाला की महाराजांना मानाचा मुजरा करून त्या लोकांशी कसं बोलायचं ते मला कळतं. आणि बाईक वळवून तो गडाच्या दिशेने निघून गेला. आम्ही बाकी सगळे न थांबता हॉस्टेलला पोचलो. आमचा मुख्य विचार की पोरींना गुपचूप त्यांच्या हॉस्टेलच्या आत कसं पोचवायचं. आम्हा पोरांच्या खांद्यावर चढून पोरींनी हॉस्टेलच्या मागच्या भिंतीवरून आत उड्या टाकल्या, आणि आम्ही म्हटलं की ॲडव्हेंचर संपलं! अंऽऽ. बरं. ते आदलं रजीवसिंगचंऽऽ. आता पुढे घडलेलं माहीत आहे आपल्याला. तसा विचार केला, तर रजीवसिंगचंच बरोबर होतं, नाही का? तूच सांग रणजित, तू तर खरंच लपलेल्या जागेवर सुरक्षित होतास. बरोबर?"

 

रणजित म्हणाला, "भविष्य माहीत असतं, तर? अर्थातच! त्या गुंडांना कुठे माहीत होतं, की किती जण होती, आणि पैकी एक जण मागं राहिलाय? ते शोधतच नव्हते तर मी सापडतोय कशाला? भविष्यातून मागे वळून बघितलं तर सगळेच निर्णय बिनचूक करता येतात! पण त्या दिवशी, त्या झुडपाच्या जाळीतून बघताना मात्र मला नव्याण्णव पॉइंट नऊ टक्के वाटत होतं, की मी आज त्या गुंडांच्या तावडीत सापडणार. माझा श्वास भात्यासारखा फुसफुसत होता आणि नाकातला शेंबूड फराफरा फुरफुरत होता. खोकल्याची उबळ आणि शिंक मी दाबून धरत होतो. आणि आवाजाचं सोड… माझी पँट बरबटली होती, गुवाची घाण पसरून मी सापडणार अशी भीती मला वाटायला लागली होती!"

 

"जेव्हा रस्त्यावरून जवळ येणारा गाडीचा दिवा दिसला, मला वाटलं की वाचलो आता. पण एकटी एक बाईक येताना बघून एक गुंड ओरडला, "रेडियो आन् दारू परत न्यायला आला येडझवा!" बाईक थांबायच्या आधीच त्याची पहिली लाठी सदानंदला लागली, आणि माझ्या पोटात धस्स झालं. सदानंद ओरडला असेल तर मला ऐकू आलं नाही. तो बेशुद्ध होऊनच खाली पडला असणार. नक्कीच. गुंडांनी त्याच्या अंगावर बूमबॉक्स टाकला आणि लाठीनं त्याच्या पोटावर बॉक्स फोडला. लाथा मारून त्याला किती वेळ त्याला बुकललं मला माहीत नाही. मी गच्च डोळे मिटले. पण कानात येणारा धप्, धप्, फत्, फत् आवाज संपता संपत नव्हता. सदानंद काहीच आवाज करत नाही, हे त्या गुंडांच्या लक्षात आलं. अरे मेला, मेला! झवणा मेला! चल, चल! सोड त्याला! चल, चल! गुंड धावल्याचं मला ऐकू आलं, आणि मग सगळे आवाज बंद झाले. माझ्या लक्षात आलं, कधी कोणास ठाऊक मी फतकन खाली बसलेलो होतो. माझ्या मांड्या चळाचळा कापत होत्या. कितीतरी वेळ मी तसाच बसून राहिलो. मग कधीतरी डोक्यात नाही, पोटाच्या खळग्यात जाणवलं, की गुंड खरोखरच गेलेलेयत. पण तरी मला उठून उभं राहाता येईना. झाडीमागून अक्षरशः हातापायांवर रांगत रांगत मी जायला लागलो. खांद्यांत त्राण नव्हतं, सारखं सारखं थांबत शेवटी सदानंदजवळ पोचलो. तो बेशुद्ध होता, पण उथळ श्वास घेऊन घेऊन विव्हळत होता. मी त्याचा गार हात हातात घेतला. आणि आडवा झालो. निश्. चेष्. ट."

 

रणजित दर वेळा ही गोष्ट सांगताना नाटकी पॉझ घेत "निश्. चेष्. ट." अशी तीन अक्षरे उच्चारायचा. आणि अंकुश आतला संताप आत दाबून दात-ओठ चावायचा. या वर्षी सदानंद नव्हता, पण आदल्या अगणित वेळी सदानंद बाजूला असला, तर या ठिकाणी रणजितचा हात अलगद हातात घेई. सदानंद मृत्यूसमोर जिवाची भीक मागत होता, आणि या भंपक "निश्. चेष्. ट." रणजितला सदानंदकडून वर्षानुवर्ष सांत्वनाची दानत मिळावी!

 

गांडीत खरी गू नसलेल्या भेकड रण"भीत"ऐवजी त्या दिवशी आपण सदानंदबरोबर असायला हवे होते, या विचाराची शंभर कलमे दर वेळेसारखी अंकुशच्या मनात गर्दी करून आली. बापाच्या काळ्या पैशांवर मुजोर झालेला बॉस पटियालेवाला तुझ्या-माझ्या मैत्रीच्या लायकीचा नाही, असे पटवून अंकुशने सदानंदला त्या पार्टीला जाऊ दिले नसते. जायचेच कुठल्या किल्ल्यावर तर इतिहासाची खरी चाड असलेले तू आणि मी बाईक घेऊन जाऊ, रात्री लोहगड चढू, विंचूकाट्यावरून सूर्योदय बघू;  असे वेगळे पर्याय अंकुशने सुचवले असते. जायचेच म्हटले सिंहगडावर पार्टीला, तर अंकुश सदानंदबरोबर गेला असता. त्या गर्दीत आणखी एक, त्याला आमंत्रण होते की नाही कोणाला कळलेही नसते. त्या वयस्कर गावकऱ्याने गडाच्या पावित्र्याबाबत कानउघडणी केली, ती सदानंदला पटणारीच होती. अंकुशने सदानंदला "आपण दोघे लगेच निघू" म्हटले असते, आणि हॉस्टेलवर परत आणले असते. तेव्हा पार्टी सोडून गेले नसते, तरी अंकुश लघवीचा जोर व्हावा इतकी चिकार दारू प्याला नसता. त्याला परसाकडे जायची घाई झालीच नसती – सकाळी घड्याळ लावावे इतका त्याचा प्रातर्विधी नियमित असे. लागलीच असती घाई, तर पार्टीपासून इतका दूर लपून हगला नसता. या उद्दाम दारूपार्टीला हुसकावून लावण्यासाठी गावातली तरुण मंडळी येताच अंकुशने सदानंदला हात धरून ओढत बाईककडे आणले असते. काही करून अंकुश मागे राहिल्यामुळे सदानंद परत आला असता, तर अंकुश झाडीमागून धावत बाहेर आला असता, आणि ओरडला असता, "हा शिवाजी महाराजांचा भक्त मला न्यायला परत आला आहे, या घाणेरड्या कचरा-सामानासाठी नाही." हा अवसर हातचा निसटून सदानंद जखमी झाला असता, विव्हळणारा बेशुद्ध सदानंद अंकुशला दिसला असता, तर हातपाय गाळण्याऐवजी अंकुश पायवाट उतरून खालच्या गावातून मदत घेऊन आला असता. त्या परिस्थितीत सदानंदला एकटे सोडणे योग्य नसते, तर अंकुशने त्याला थंडी वाजू नये, म्हणून पार्टीसाठी आणलेली चादर त्याच्या अंगावर घातली असती. त्याचे ओठ कोरडे होऊ दिले नसते, बाटलीने थेंबथेंब पाणी पाजले असते. त्याचा हात धरून रात्रभर जागती पाळत ठेवली असती.

 

पहाटे पायवाटेवरून गडावर काम करणारे येऊ लागले, आणि हा जबर जखमी तरुण बघून त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावली. अंकुश बरोबर असता, तर तो ॲम्ब्युलन्सबरोबर हॉस्पिटलात गेला असता. अंकुशने सदानंदच्या हॉस्पिटलमध्ये वाघोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा फोन नंबर मिळवला असता, आणि सदानंदच्या किशोरदादाला कळवले असते, आणि त्याने गावी त्याच्या आईबाबांना कळवले असते. झाले असे, की सोमवारी सकाळी अंकुश आत्याच्या घरून परत आला होता, मग कळवले होते; तसा विलंब झाला नसता.

 

सदानंदला ससून हॉस्पिटलला ट्रान्स्फर केले गेले. कवटीत स्रवलेले रक्त साफ करण्यासाठी गंभीर शस्त्रक्रिया करावी लागली. मेंदूची सूज कमी होईपर्यंत पंधरा दिवस त्याला वैद्यकीय कोमामध्ये ठेवले होते. अंकुशने त्याला बघितले, तेव्हा वस्तऱ्याने सदानंदचे टक्कल केलेले होते. चेहऱ्याचा डावा भाग इतका सुजला होता की लालबुंद अर्ध्या मुखवट्यावर बंद डोळ्याची नुसती एक खाच दिसत होती. दोन का तीन बारगड्या आणि डाव्या हाताचे एक हाड फ्रॅक्चर झाले होते.

 

त्याची शुश्रुषा करायला सदानंदची आई तातडीने पोहोचली होती. बसल्या जागी तिला हुंदके फुटून रडू येई. एक दिवशी तिने अंकुशला विचारले, "पार्टनर ना तुम्ही दोघं… कसं घडलं रे हे माझ्या सदाला?" शब्द नव्हे, तर डोळ्यांनी आरोप केला, "… तू असून?" अंकुश शंभर प्रकारे हे घडायचे थांबवू शकला असता. सदानंदच्या आईला देण्याआधी शंभर प्रकारे शंभर उत्तरे निरस्त झाली होती.

 

रणजित म्हणाला तसे.

"निश्. चेष्. ट."

अंकुश. रणजितइतकाच. अगतिक.

 

इथे अमेरिकेत अन्या सदानंदला आणि त्याच्या बायकोला एक-दोनदा भेटलेली होती. त्याची बायको तशी बुजरी, पार्श्वभूमीत अदृश्य होणारी असली, तरी मनमोकळा सदानंद तिच्या बऱ्यापैकी लक्षात राहिला होता. अर्थातच. त्याच्या कॉलेज जीवनात असा प्राणांतिक प्रसंग गुदरला होता, त्याची गोष्ट अंकुशने तिला सांगितली असती, तर तिला कदाचित संदर्भ लागला असता. पण रणजितच्या आत्मकेंद्री आख्यानातला शब्दन्‌शब्द आठवून अंकुशचे मन कडवट होत होते. तटस्थपणे त्याचा वृत्तांत सांगणे अंकुशला जमणे शक्य नव्हते.

 

शिवाय अन्याच्या घरचे लोक सेनेचे कार्यकर्ते होते. बॉस पटियालेवालाची मराठी अस्मितेला तुच्छ मानणारी घमेंड, सिंहगडावर दारूपार्टी... या प्रास्ताविकातच संवाद रूळ बदलून वेगळ्याच दिशेला गेला असता. थोडा कल वाटला तरी अंकुशने बहुधा ही कथा अन्याला सांगण्याबद्दल नको असे ठरवले असते. आज नाही. नंतर कधी. कोणास ठाऊक.

 

*

 

ऑफिसची तयारी करण्यासाठी अन्याचा रोजचा साडेपाचचा गजर होता. आताची वेळ तिच्या साखरझोपेची, पडतील तर तिच्या स्वप्नांची आणि जागलीच तर तिच्या आपल्या विचारांची. बेडरूमच काय, एक घर गुण्यागोविंदाने शेअर करायचे, म्हणजे व्यक्तीला इतकी तरी भावनिक प्रायव्हसी हवी. लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर अवघडून झोपलेल्या अंकुशचे हे असे धोरण.