Skip to main content

बुकींग्ज

3 minutes



बुकींग्ज
====

राजीव उपाध्ये

ती ३२ वर्षांची  सॉफ्टवेअर इंजिनिअर... बाथरुम मधून बाहेर पडताच तिने आपले ओले केस मागे सरकवले. तेव्ह्ढ्यात अंगावर गुंडाळलेला टर्किश गळून पडला आणि मग तिने तसेच स्वत:ला पलंगावर झोकून दिले.  भिरकाऊन दिलेल्या ब्राच्या पलीकडे असलेला आपला फोन तिने सहज उचलला आणि मेसेजेस स्क्रोल करायला सुरुवात केली...

भूतकाळात झालेला घटस्फोट आणि त्यावर कॉर्पोरेट वर्तुळातल्या चर्चांमुळे तिच्यावर कसलाही परिणाम झाला नव्हता; तरीही तिच्या मनातल्या भावनांचा उबदारपणा आणि जगण्याची जिद्द अजिबात मावळली नव्हती. तिच्यात काही गोष्टी तशाच राहिल्या होत्या, लोकांवर विश्वास ठेवण्याची धोकादायक तयारी, एखाद्या क्षणाकडे आश्चर्याने पाहण्याची क्षमता, आणि कधी कधी स्वतःलाही न समजणारी ओढ.

ट्रॅव्हल डेस्कच्या चुकीमुळे त्यांची वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहण्याची सोय झाली होती. तिने किंवा तिच्या सहकार्‍याने  यावर कोणतीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. ट्रॅव्हल डेस्कचा हा नेहमीचाच हलगर्जीपणा असावा असं मानून दोघांनीही अवाक्षर न काढता ती वेगळी हॉटेल्स शांतपणे स्वीकारली; अन्‌ तो चुकीच्या बुकिंगचा गोंधळ तसाच राहिला.

अशातच तिच्या  टेबलवर ठेवलेला फोन थरथरला. .

‘दोघांसाठी मी एक टेबल बुक केलंय. बाकी सहकाऱ्यांपासून लांब. ट्रॅव्हल डेस्कच्या या गोंधळाचा फायदा घेऊया.’

तिने तो मेसेज रोखून पाहिला. तिने न मागताच तिला जे हवं होतं, तेच त्याने तिच्या हातात आणून दिलं होतं. तिने लगेच उत्तर टाईप केलं; जे त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तच ब्लण्ट होतं: ‘बघूया. मला सांभाळणं तुला जमेल का, यावर अवलंबून आहे. मी तर आधीच मिनीबार उघडलाय.’

दारूच्या बाबतीत ती किती बिनधास्त आहे, यावर तो कसा व्यक्त होतो हे पाहण्यासाठी तिने फोन बेडवर फेकून दिला. हातातला बिअर कॅन खाली ठेवण्यापूर्वीच, त्याचा दुसरा मेसेज स्क्रीनवर झळकला.

‘आपली हॉटेल्स वेगळी असणं, हा नियतीचाच एक खेळ आहे.’

तो दिवसभर बैठकीत तिच्या समोर बसणारा, बोलताना मुद्द्यांपेक्षा विरामांमध्ये अधिक काही सांगणारा...  पण मागच्या काही महिन्यांत नकळत तिच्या विचारांमध्ये त्याने प्रवेश केला होता.

तिने पहिल्या मेसेजला नीट उत्तर द्यायच्या आतच त्याने पुढचे पाऊल टाकले होते. तिच्या मनात चाललेल्या फँटसीला त्याने थेट शब्दांत मांडलं होतं. या गोष्टीने ती किंचित गडबडलीच, पण हे नियतीचं चक्र वाटण्याऐवजी त्याचा आधीच ठरवलेला कट असावा असा संशय तिला आला. या सगळ्याची परिणती मागे न फिरता येणाऱ्या वळणावर होण्याआधीच, तिला त्याचा हा वेग मंदावणं गरजेचं वाटत होतं.

‘नियतीचे कसले खेळ शोधतोयस, जरा जपून,’

कोणतीही गोष्ट न नाकारता आणि जेवणाचा बेत पक्का न करता, दरवाजा उघडा ठेवत तिने एक मिश्किल उत्तर टाईप केलं. संदेश पाठवल्यानंतर खोली पुन्हा शांत झाली. पण ती पूर्वीसारखी शांतता नव्हती. आता त्या शांततेत अपेक्षा मिसळली होती. त्यामुळे तिला आल्हाददायक डुलकी लागली.

अचानक वाजलेल्या बेलने ती जागी झाली तेव्हा अर्धवट उघड्या राहीलेल्या दारात एक रुबाबदार आकृती उभी असल्याचे तिला जाणवले. त्यानंतरच्या काही सेकंदातच, पलंगावर एक सावली पसरली. अजिबात संकोच न दाखवता त्याची नजर तिच्या अनावृत्त शरीरावर खिळली. आता तिच्या छातीत धडधड वाढली. तो फक्त एकाच श्वासाच्या अंतरावर होता आणि आता तिला स्वतःचा बचाव करायचा होता.

आपली मान मागे टाकत ती हलकेच हसली. "अरे, मी तर बस सहजच गंमत करत होते," तिने घाईघाईने अंगावर चादर ओढली...पण तिच्या गळ्यातल्या शिरा ताणल्या गेल्या होत्या; त्याची नजर आपल्या शरीराचा मागोवा घेत आहे याची तिला अचानक प्रकर्षाने जाणीव झाली.

शिष्टाचारांची फिकीर न करता, तो पण तिथून हलला नाही. पण घालमेल त्याच्या चेहेर्‍यावर स्पष्ट जाणवत होती.

तिने फोन उचलला आणि उर्वरित मेसेजेस न वाचताच तसेच सोडून दिले. उघड्या पसरलेल्या सामानामध्ये बसून ती फोनच्या काळ्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहिली. त्या दोघांमधील ती रेंगाळणारी शांतता, त्याने काय पाहिलं होतं याच्या अनपेक्षित धक्क्याने आणि दबावाने अधिकच गडद होत गेली.

"माहितीय का?," ती म्हणाली, "काही गोष्टी घडण्याआधीच लोक त्यांच्याबद्दल कथा तयार करतात."

तो काही बोलला नाही.

"आणि मग त्या कथांमुळेच त्या गोष्टी घडू शकत नाहीत."

एखाद्या क्षणापासून वाचवण्यासाठी लोक किती सामान्य वाक्यं वापरतात, याचं तिला नेहमी आश्चर्य वाटत असे.

त्याने खिडकीबाहेर पाहिलं.

"कदाचित," तो सावकाश म्हणाला, "लोक कथा तयार करत नाहीत. कदाचित त्यांना फक्त काही क्षण हरवू द्यायचे नसतात."

त्याच्या आवाजात आग्रह नव्हता की अपेक्षा नव्हती. फक्त एक साधा स्वीकार होता. आणि त्या साधेपणामुळेच ते वाक्य तिच्या मनात खोलवर उतरलं.

खोलीतील घड्याळाने आणखी एक मिनिट पुढे सरकवलं. वेळ चालत राहिली. शेवटी ती पटापट तयार झाली आणि  तिने पर्स उचलली. खुर्चीवर टाकलेलं जॅकेट खांद्यावर घेतलं  आणि दाराकडे चालू लागली.

तो बाजूला झाला. दोघेही कॉरिडॉरमध्ये आले. लिफ्टची वाट पाहताना कोणी काही बोललं नाही.

खाली शहर मात्र त्यांची वाट पाहत होतं...

Node read time
3 minutes