Skip to main content

वही

5 minutes

वही
==

राजीव उपाध्ये


तर काय झालं, ते हिवाळ्याचे दिवस होते. पाऊस नुकताच थंडीच्या कुशीत विरून गेला होता, पण त्याचा ओला, गारठलेला श्वास अजूनही गावभर पसरला होता. छपरांच्या लाकडी कडांवरून पाण्याचे जड थेंब टिप-टिपत होते. बैलगाड्यांच्या चाकांनी चिखलात कोरलेल्या भेगांमध्ये पाणी साचले होते. त्या कुंद हवेत एक विचित्र गंध फिरत होता. ओल्या मातीचा, कोळशाच्या धुराचा आणि जुन्या चिर्‍यांवर साचलेल्या शेवाळाचा.

मी असाच रस्त्यावर भटकत होतो. इथले रस्ते जिथे शेवटचा दम टाकतात, तिथेच हा पण संपला. एका अथांग विहिरीपाशी, मंदिरातल्या झाकोळलेल्या गाभा‍र्‍यापाशी, आणि कायमचे डोळे मिटून पडल्यासारख्या भासणा‍र्‍या बंद दुकानांच्या रांगेपाशी.

मी या गावात एक अनोळखी वाटसरू म्हणून पाऊल ठेवले होते, अन् इथल्या लोकांनी मला अन्नाचा एक घास दिला. या गावावर माझा हक्क म्हणावा तर एवढाच होता; आणि तोसुद्धा कपड्यावर बसलेल्या धुळीसारखा मी शक्य तितका  अदृश्य ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

पहिल्या आठवड्यातच गावातल्या शांततेच्या पोटात दडलेली एक गोष्ट मला दोनदा ऐकू आली...

पहिल्यांदा ती मी त्या विहिरीवर ऐकली. पाणी भरताना बायकांचे आवाज अचानक श्वासात विरून जायचे. लोखंडी रीळावरून दोरी घासताना होणा‍र्‍या वेदनादायी किरकिराटाच्या आड शब्द लपवले जात. जणू विहिरीच्या तळाशी अंधारात बसलेल्या कुठल्याशा अदृश्य जिवाला ते ऐकू जाण्याची भीती होती.

दुस‍र्‍यांदा ती मला मंदिरात दिसली. तिथे ती केवळ अफवा उरली नव्हती; तिने एक जिवंत, भीतीदायक रूप धारण केले होते.

एक चामड्याची एक जुनी, काळी पडलेली वही. असंख्य हातांनी शेकडो वेळा दुमडल्यामुळे त्या वहीची मधली घडी चामड्यासारखी नाही, तर एखाद्या सापाच्या कातडीसारखी गुळगुळीत आणि चमकदार झाली होती. तिच्या कडा तडकल्या होत्या. देवळातल्या भटणीने ती उघडली की, वर्षानुवर्षांचा जुना धूर, बारीक धूळ आणि मृत हातांच्या स्पर्शाचा एक कोंदट वास सगळीकडे पसरत असे.

ती भटीण स्वतः जख्ख म्हातारी होती. चेह‍र्‍यावरच्या सुरकुत्या इतक्या खोल होत्या की  भावना नव्हत्या उरल्या, तिचा चेहेरा एक निर्जीव भूगोल झाला होता. ती चामड्याची वही जपून ठेवत असे, विहीर पाणी ठेवते अगदी तश्शी खोल, शांत, थंड आणि कोणताही अर्थ न लावता.

गावातल्या सावकारणीला वाटायचे की त्या वहीमधल्या नोंदी लोकांसमोर वाचल्या जाव्यात. तिच्या आवाजात सत्ता होती आणि वाट पाहण्याइतका अथांग पैसा. लोक म्हणायचे ती सगळ्यांवर विश्वास ठेवते; पण ते चुकीचे होते. तो विश्वास नव्हता, ती एक हिंसक भूक होती. "एकदा गोष्ट जिभेवरून सुटली की ती सत्य बनते, हवेत सोडलेले शब्द परत गोळा करता येत नाहीत, ते पावसासारखे माणसाच्या आयुष्यात झिरपत राहतात," हे तिचे तत्त्व होते.

ती वही तीनदा मोठ्याने वाचली गेली. आणि प्रत्येक वाचनाबरोबर गाव अधिक कडू, अधिक हिंसक होत गेले.

पहिले भांडण विहिरीच्या काठावरच झाले. सकाळचे दाट धुके पाण्यावर तरंगत होते. विहिरीचा दगडी कडा शेवाळामुळे निसरडा झाला होता. दोरी ओढताना पुलीवरून जुन्या हाडांच्या करकरण्यासारखा आवाज येत होता. विहिरीतून बादली बाहेर आली की ओल्या दगडावर पाण्याचा अर्धचंद्र उमटायचा.

कुंभारीण तिथे उभी होती. तिच्या बोटांवर सुकत चाललेल्या लाल मातीचे वाळलेले डाग होते.

"माझ्या मृत आईचं नाव त्या चामड्यावर नाही!" ती किंचाळली. तिचा आवाज विहिरीच्या तळाशी धडकून संपूर्ण चौकात घुमला. "मृतांनी केलेल्या पाप-पुण्याचा हिशेब जिवंतांच्या घशाशी का बांधताय?"

तिने त्या वहीकडे पाहिलेसुद्धा नाही. भटणीच्या थरथरत्या हातात ती वही तशीच दुमडलेली राहिली—हट्टी आणि काळी.

त्या रात्री गावात डाळतांदळाच्या खिचडीचा खमंग वास पसरला होता. तसंच जळणा‍र्‍या ओल्या लाकडाचा धूर होता, आणि लोकांच्या मनात साचलेल्या जळजळीचाही तिखट गंध होता.

दिवस गेले, पाऊस पुन्हा तुटून पडला. छपरांच्या पत्रांवर त्याचा अखंड, भितीदायक आवाज घुमत राहिला. सावकारणीने आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावर उभे राहून गर्जना केली—"कर्ज फेडा!" तिच्याकडे धान्याची कोठारे तुडुंब होती पण  मनात इतरांबद्द्ल कमी विश्वास. ओल्या वा‍र्‍यात तिची शाल फडफडत होती.

कुणितरी एकजण तिच्या  बाजूने उभा राहिला. "फेडाच ते!" तो ओरडला, कारण गमावण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हते. दुपारी तो सावकारणीच्या पायाशी जाऊन बसला.

संध्याकाळपर्यंत कोणीतरी त्याला रस्त्यात गाठून तोंडावर बेदम मारले. मी मारताना पाहिले नाही; मी फक्त एवढेच पाहिले की गटारातून वाहणा‍र्‍या लालसर पावसाच्या पाण्याखाली तो उभा होता आणि त्याच्या ओठाच्या कोप‍र्‍यात साचलेले रक्त गंजासारखे काळवंडले होते.

मग हळुहळु आकाश एकदम स्वच्छ झाले. विहिरीचा दगडी काठ तीव्र उन्हात तांबूस चमकत होता.

एक तरुणी धावत आली आणि विहिरीच्या कड्यावर चढून उभी राहिली. तिला क्षितिजाच्या पलीकडे काय आहे, हे पाहण्याची उत्सुकता होती. तिने मागे  जमलेल्या शांत गर्दीकडे पाहिले आणि एकच प्रश्न फेकला, "आपण या म्हाता‍र्‍यांच्या शब्दांवर विश्वास का ठेवायचा?"

प्रश्न लहान होता, पण त्याचा स्फोट मात्र अथांग झाला.

क्षणभर सगळे स्तब्ध झाले. विहिरीवरच्या बादल्या थांबल्या, दो‍र्‍या हातांतच गोठल्या, माणसांचे श्वास थांबले. फक्त मंदिराच्या छतावरून टपकणा‍र्‍या पाण्याचा 'टिप-टिप' आवाज येत राहिला.

आणि तिथेच शब्दांचा खेळ संपला... अनियंत्रित हिंसेचा खेळ सुरू झाला. लोक घरांत शिरले. मी त्याला 'लूट' म्हणणार नाही, मी त्याला भूक म्हणेन. दारे धडाधड उघडली गेली, फुगलेल्या लाकडाने आक्रोष करत कुरकूर केली. जुन्या, धूळ साचलेल्या पेट्या ओढून बाहेर आणल्या गेल्या, त्यांची तांबड्या कुलपांची झाकणे उघडून फेकली गेली.

आत साठवून ठेवलेल्या धान्याचा तो कोरडा, गोडसर, धुळकट वास एकदम हवेत पसरला—जणू अनेक महिन्यांचे अंधारलेले ऊन एकदम बाहेर फुटले होते.

मापे भरली गेली, मापे चिखलात रिकामी झाली. गव्हाचे दाणे पोत्यांतून कोसळताना सळसळत होते. जव चिखलात सांडत होता आणि लहान मुले गुडघ्यावर बसून तो वेचत होती. लोकांनी जे आपले आहे असे वाटले ते घेतले... मग थोडे अधिक घेतले... आणि मग समोर दिसेल ते सर्व ओढून नेले.

मंदिराच्या दारात एक आंधळा गायक उभा होता. छपरातून पाण्याचे गार थेंब त्याच्या उघड्या पाठीवर टिपकत होते. त्याचा चेहरा निरभ्र आकाशाकडे होता, डोळे पांढरेफटक निरुपयोगी होते. कंठातून आवाज फुटत नव्हता, तरी तो गळा ताणून गात राहिला. त्याचा मऊ, जिद्दी आणि ओळखीचा स्वर धुरासारखा चौकात पसरत होता.

आयुष्यभर ज्याचे गाणे ऐकून लोक मोठे झाले होते, तेच लोक आज त्याच्या अंगाला घासून निघून जात होते—खांद्यावर धान्याची तुडूंब पोती वाहून नेताना. कोणी त्याच्याशी वाद घातला नाही, कोणी त्याला थांबवले नाही. ते फक्त पुढे निघून गेले... आणि ते मौनच सर्वात जास्त भयंकर होते.

रात्र पडली. गावातल्या चुली पेटल्या. ताज्या भाजलेल्या भाकर्‍यांचा वास गल्लीबोळांतून वा‍र्‍यासोबत वाहू लागला. तो वास ओल्या गोणपाटाच्या, दिव्याच्या तेलाच्या, चिखलाच्या आणि घोड्यांच्या शेणाच्या वासात घट्ट मिसळून गेला. कुत्री डबक्यांत पडलेले भिजलेले दाणे चाटत फिरत होती. कुठेतरी बाळ रडत होते, तर कुठेतरी दारूच्या नशेत कोणीतरी मोठ्याने हसत होते. गावाला अनेक महिन्यांनंतर आज पोटभर खाल्ल्याचा वास येत होता... आणि त्या वासात एका सुप्त, घाणेरड्या अपराधाची किनार विणलेली होती.

काहीच बदलले नाही. चामड्याची ती काळी वही अजूनही मंदिराच्या अंधारात तशीच दुमडलेली आहे, आणि ती विहीरही अजून तशीच आहे. पहाटे बादली खाली सोडली की साखळीचा धातू दगडावर घासत एका एकट्या प्राण्यासारखा आक्रोष करतो. मग गडद, स्वच्छ आणि दात दुखावतील इतके हाडे गोठवणारे थंडपाणी वर येते.

गावातील माणसे पार बदलून गेली आहेत, विहीर मात्र तीच आहे.

त्या रात्री मीसुद्धा मी जी भाकरी खाल्ली तिचा वास गोड होता, तिच्यातून गरम वाफ निघत होती आणि तिच्या कडक कडा मोडताना कुरकुरीत आवाज येत होता. मी विचारले नाही ती गोणी कोणाची होती, मी विचारले नाही ते धान्य कुठल्या कोठारातून लुटले होते.

बाहेर गार वारा बंद दुकानांच्या लाकडी झडपांना आदळत होता. आत, अंधारात लोक शांतपणे अन्न ढकलत होते. उद्या ते पुन्हा न्यायाच्या बाता मारतील. उद्या ते कर्जाबद्दल बोलतील. उद्या ते कोणाचे देणे बाकी आहे यावर एकमेकांचे गळे पकडतील.

पण त्या रात्री... ते फक्त भूक शमवत होते. आणि मीही.

 

Node read time
5 minutes