Skip to main content

पेपरफुटीवर कायमचा उतारा: 'ओपन क्वेश्चन बँक' संकल्पना

पार्कात संध्याकाळच्या फेरफटक्यादरम्यान अचानक 'पेपरफुटी'चा विषय निघाला. सध्या NEET ची परीक्षा असो वा सरकारी भरतीचा पेपर, कुठे ना कुठे हे गैरप्रकार घडताना दिसतातच. या समस्येची मूळ कारणे शोधताना आणि त्यावर काही अनोखे, तंत्रज्ञानप्रणीत उपाय विचारताना मांडलेले हे विचार खालीलप्रमाणे आहेत:

सत्ता, संपत्ती आणि लालसेपोटी माणूस नैतिकतेच्या कोणत्याही खालच्या पातळीवर घसरू शकतो, हीच मानवी स्वभावाची एक काळी बाजू आहे. प्रामाणिकपणे पैसा कमवण्यासाठी अपार मेहनत, संयम आणि वेळ द्यावा लागतो. याउलट, अनैतिक आणि चुकीच्या मार्गाने कमी वेळेत, विनासायास अफाट संपत्ती मिळवता येते. याच मोहातून गुन्हेगारी जन्माला येते. अगदी मृत्युदंडाची शिक्षा ठाऊक असूनही लोक काही लाखांच्या सुपारीसाठी कोणाचाही जीव घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत.

मग पेपरफुटीचे क्षेत्र तरी याला अपवाद कसे ठरेल? इथे तर कोचिंग माफिया कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायला तयार असतात आणि काही उत्सुक उमेदवारही काही लाख रुपये फेकायला सहज तयार होतात. जिथे लाखोंची आणि कोटींची उलाढाल असते, तिथे सुरक्षेच्या कितीही कडक यंत्रणा उभारल्या, तरी माणसाच्या हव्यासामुळे पेपर फुटणे थांबवणे जवळपास अशक्य होऊन बसते.

एक नाविन्यपूर्ण उपाय: प्रश्नांचा उघडा संच (Open Question Bank) : यावर पार्कातील चर्चेदरम्यान एक अत्यंत व्यावहारिक आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेला एक अनोखा उपाय सुचला. "पेपर फुटूच नये असे वाटत असेल, तर संभाव्य प्रश्न आधीच सर्वांना जाहीर करून टाका!"आजच्या डिजिटल युगात हे ऑनलाइन पद्धतीने सहज शक्य आहे. संकल्पना खालीलप्रमाणे असू शकते:

मोठा खुला प्रश्नसंच (Open Question Bank): परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांच्या प्रमाणात आधीच एक मोठा प्रश्नसंच सर्व उमेदवारांसाठी सार्वजनिक (Open) केला जावा. उदाहरणार्थ, जर प्रत्यक्ष परीक्षेत १०० प्रश्न विचारले जाणार असतील, तर १० ते १५ हजार प्रश्नांचा संच खुला केला जाऊ शकतो; आणि जर ५० प्रश्न येणार असतील, तर ५ ते १० हजार प्रश्नांचा संच सार्वजनिक करता येईल. प्रश्नांची एकूण संख्या लक्षात घेऊन ही प्रमाणबद्धता ठरवण्याचे स्वातंत्र्य परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडे असावे.

पारदर्शक आणि यादृच्छिक (Randomized) प्रणाली: परीक्षा ऑनलाइन घेतली जावी. उमेदवारासमोर प्रत्येक प्रश्नासाठी 10-100 असे पर्याय स्क्रीनवर असतील. पर्याय किती हे परीक्षा घेणारी संस्था ठरवेल. त्याने कोणत्याही क्रमांकाचे बटन दाबले की त्या १०,००० प्रश्नांच्या संचातील एक प्रश्न त्याच्या स्क्रीनवर येईल. अशा प्रकारे तो पूर्ण शंभर प्रश्न सोडवेल. यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रश्नपत्रिका पूर्णपणे वेगळी आणि यूनिक बनेल.

‘Pass' बटनाची सोय: सामान्यतः परीक्षार्थी कठीण प्रश्न शेवटी सोडवतात. यासाठी प्रत्येक प्रश्नाच्या चार उत्तरांच्या पर्यायांसोबत 'Pass' हे पाचवे बटन असावे. जेणेकरून तो प्रश्न नंतर पुन्हा स्क्रीन वर येईल आणि परिक्षार्थी सोडवू शकेल.

वेळेचे अचूक नियोजन: प्रत्येक प्रश्न उमेदवाराला वाचण्यासाठी १० सेकंद आणि उत्तर देण्यासाठी ३० सेकंद (सध्या बहुतेक येवढाच वेळ दिला जातो). यामुळे संपूर्ण १०० प्रश्नांची परीक्षा नियोजित वेळेत अतिशय सुरळीत पार पडेल.

त्वरित पारदर्शकता आणि ईमेल कॉपी: परीक्षा संपताच उमेदवाराने दिलेली उत्तरे आणि संबंधित प्रश्नांसह संपूर्ण उत्तरपत्रिका त्याला स्क्रीनवर पाहता येईल. मात्र, कोणते उत्तर बरोबर किंवा चूक आहे, हे त्या वेळी दाखवले जाणार नाही आणि मिळालेले गुणही प्रदर्शित केले जाणार नाहीत. परीक्षेतील पारदर्शकता आणि नोंद सुरक्षित ठेवण्यासाठी, उमेदवाराने सोडवलेली ही संपूर्ण उत्तरपत्रिका त्याच्या नोंदणीकृत ई-मेलवर त्याच वेळी आपोआप पाठवली जाईल.

लाखो विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी हजारो संगणकांचा (Computers) बंदोबस्त करणे प्रशासकीयदृष्ट्या कठीण असते. परंतु, या मध्यवर्ती डिजिटल प्रणालीमुळे ही परीक्षा एकाच दिवसाऐवजी महिनाभर टप्प्याटप्प्याने चालवता येऊ शकते. प्रश्न आधीच सार्वजनिक असल्यामुळे "पेपर लीक झाला" या संकल्पनेलाच पूर्णपणे पूर्णविराम मिळेल. परिणामी, कोचिंग माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त होईल आणि कोणत्याही प्रकारची हेराफेरी किंवा भ्रष्टाचार करणे पूर्णपणे अशक्य होऊन जाईल.