॥ एका लिब्राण्डुचे चिंतन ॥

॥ एका लिब्राण्डुचे चिंतन ॥
-राजीव उपाध्ये
टीप- मी एक "लिब्राण्डू" आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. ए०आय० पृथ्वीतलावर अवतरल्यापासून मी प्रत्येक मॉडेलची "आण्डु पाण्डु लागले भाण्डु, कोण खरा लिब्राण्डु?" या ओळी देऊन काव्यपूर्ती करण्यास सांगतो. सध्याच्या ए०आय० चा याबाबतीतला अनुभव उत्साहवर्धक आहे.
"लिब्राण्डू" असूनही मराठी शारदेची सेवा करणे ए०आय० मुळे मला शक्य झाले. अर्थातच त्यामुळे ए०आय०चा ऋणी आहे. त्यामुळे सर्व ए०आय० निदकांना ही रचना समर्पित करत आहे.
आण्डु पाण्डु लागले भाण्डु,
कोण खरा लिब्राण्डु?
दोघे म्हणती मीच शहाणा,
म्हणे गर्दी, "नका रे भाण्डु"!
भिंतीवरती फिरती पाली,
खाली धावती ’झुरळे’ सारी;
’वरती’ घोषणा, दगड ’खाली’,
कोण करवी धुमश्चक्री भारी?
पुस्तक फाटे, फळा फुटला,
उठला गोंधळ वर्गामध्ये;
प्रश्न विचारुनी उत्तर शोधा,
दगड कशाला हातामध्ये?
एक म्हणे “ही क्रांती आमची!”,
दुसरा म्हणे “आम्हीच भारी!”
तिसरा येता दगड उचलतो,
चौथा करतो घोषणा सारी!
जनता मग पाहत बसली,
उडे धुरळा मग शब्दांचा;
पाली पळती, झुरळे लपली,
कुणा कळेना खेळ शब्दांचा!
शेवटी सारे शांत झाले,
बसे धुरळा रस्त्यामध्ये;
खरे उत्तर मतपेटीमध्ये,
पुस्तक हरले दगडांमध्ये!
स्लॉप- इथे तुम्ही वापरलेलं…
स्लॉप-
इथे तुम्ही वापरलेलं चित्र १००% ए.आय स्लॉप आहे. त्यात तुमची चूक नाही. सो.मि वर पाहिलं तर ह्या टेम्प्लेटात अक्षरशः हजारो विविध इमेजेस दिसतात - विषय वेगळे, पण मांडणी १००% अशीच.
हे बघून मजकूर वाचण्याची इच्छाच मरते, कारण माझ्या मेंदूला सिग्नल जातो- हे मी आधी १०० वेळा पाहिलेलं आहे.
आता हीच सध्याच्या ए.आयची कुवत आहे, जे जे काही शिकवलं गेलंय, त्यातली वेट्स वापरून तो "नव"निर्मिती करतो.
तेव्हा खूप काही वेगळा प्रॉम्प्ट न देता आळशी पणा करून जर ए.आय ला प्रश्न विचारले, तर त्याची "नव"निर्मिती स्लॉप ह्या प्रकारात मोडते.
+1
दिवसाची सुरुवात करून देणाऱ्या संकेतस्थळांपैकी ऐसी एक होतं, किमान गेली ४-५ वर्षं तरी. आता हे सतत एआय अमुक एआय तमुक असल्यानं आठवड्यातून कधीतरी एकदा बघितलं जातं हे संकेतस्थळ. तेव्हाही नवीन लेखनामध्ये जवळपास पहिलं पूर्ण पान हेच असतं. जिथेतिथे एआय बघून आता आपलं लेखन केवळ आपल्यासाठी, कुणीही फिरकणार नाही अशा जागी करायला सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्समध्ये हे वाचलं.
https://www.nytimes.com/2026/08/04/opinion/artificial-intelligence-ai-w…
पण नवीन तंत्रज्ञानाशी खेळून बघण्यापुढे हे सगळं गौण आहे.
बरं, काही दिवस वापरून बघितलं. सगळे फीचर्स वापरून बघितले. झालं. पण हल्ली आपल्या भाषेत कुणी काही लिहितच नाही अशी परिस्थिती आली आहे.
खरंच अत्यंत कंटाळवाणं आहे हे. आणि नुसतंच कंटाळवाणं नाही तर धोकादायकही. परवाच अँथ्रोपिकच्या कोंडून ठेवलेल्या मधमाशा इंटरनेटमध्ये उडाल्या आणि काहीही करू लागल्या म्हणे.
स्लॉपिटी स्लॉप!
आण्डु पाण्डु लागले भाण्डु,
कोण खरा लिब्राण्डु?
दोघे म्हणती मीच शहाणा,
म्हणे गर्दी, "नका रे भाण्डु"!
किती हे ढ काव्य! शब्द वगैरे असोच. फक्त तिसऱ्या ओळीचा शेवटच का आकारान्त आणि दीर्घ? प्रमाण मराठीत भांडू हा शब्द दीर्घान्त लिहिला जातो. एवढंही समजत नाही. स्लॉपिपणामध्ये स्लॉप आघाडीवर आहे!
चित्राबद्दल अस्वलाशी सहमत. यापेक्षा कायच्या काय बरी चित्रं आता एआय काढतं. दोन वर्षांपूर्वीचं बाळूू एआय अशी चित्रं काढत असे. स्लॉप तयार करून एवीतेवी पर्यावरणाचे घेवडे लावायचेच आहेत तर किमान चांगलं एलेलेम तरी वापरा!
मी पंचकार्ड पासून ते व्हाईब…
मी पंचकार्ड पासून ते व्हाईब/ए०आय कोडींग हा सर्व प्रवास उत्तम अनुभवला असल्याने, तंत्रज्ञानाच्या प्रत्येक टप्प्यावर किरकिर आणि रडारड करणारे लोक कसे वाहून गेले हे स्वत:च्या डोळ्यांनी बघितले आहे.
इमेल आणि वर्ड-प्रोसेसींगच्या सुरुवातीच्या काळात हाताने पत्रलेखन कसे भावनिकदृष्ट्या संपृक्त यावर लोक गळे काढत असत. इंटरनेटचा वापर/अतिवापर हा मानसिक आरोग्याला धोका इ० मौक्तिके पण तेव्हा उढळली गेली. ए०आय० लेखनाला कनिष्ठ/दर्जाहीन मानणार्याचे भवितव्य असेच असणार आहे, हे निश्चित!
…
तंत्रज्ञानाच्या प्रत्येक टप्प्यावर किरकिर आणि रडारड करणारे लोक
ए०आय० लेखनाला कनिष्ठ/दर्जाहीन मानणार्याचे
अं… मला वाटते, किरकिर तंत्रज्ञानाबद्दल१ नसून, तंत्रज्ञानाच्या तुमच्या बेसुमार अतिवापराबद्दल आहे. (चालायचेच. आपल्याला आपली सवय असते; इतरांना नसते. Been there, done that.)
झालेच तर, कनिष्ठ/दर्जाहीन हे ए०आय० लेखनाला एकंदरीत मानले जात नसावे, कदाचित; परंतु, येथे तुम्ही जो रतीब लावलेला आहे… Now, that could be a different matter.
(हे म्हणजे, राजेश१८८जी येथे रतीब घालतात. (फार कशाला, आम्हीही घालतो.) त्याला जर का लोकांनी शिव्या घातल्या, तर त्याचा अर्थ लोक मानवी लेखनाला२ शिव्या घालतात असा घेण्यास कितपत अर्थ आहे?)
मी पंचकार्ड पासून ते व्हाईब/ए०आय कोडींग हा सर्व प्रवास उत्तम अनुभवला असल्याने
बरे मग?
आमच्या विद्यार्थिदशेत, आम्ही हॉस्टेलवर असताना, वापरलेल्या पंचकार्डांचा३ पुनर्वापर आम्ही परीक्षांच्या आदल्या रात्री त्यावर ‘मला पहाटे इतक्याइतक्या वाजता उठव’ असले संदेश लिहून एकमेकांच्या खोल्यांच्या दारांखालून सरकविण्यासाठी करीत असू.
So what? How is that supposed to prove anything whatsoever?
या ‘आम्ही अनेक पावसाळे पाहिलेले आहेत, म्हणून…’-बायसला काय म्हणावे?
असो चालायचेच.
तळटीपा:
१ ते आपल्या जागी ठीकच आहे.
२ म्हणजे, राजेश१८८जी काय, किंवा आम्ही काय, हे मानव आहोत, असे गृहीत धरून. (A very big assumption!)
३ प्रत्येकाजवळ भरपूर साठा असे त्या काळात.
So what? How is that…
So what? How is that supposed to prove anything whatsoever?
तंत्रज्ञान जेव्हा नवा टप्पा गाठते तेव्हा अशी टीका होतेच. डीजिटल फोटोग्राफी आल्यावर वेट प्रोसेस कशी महान यावर चर्चा झडल्या.
बाकी माझ्या "रतीबावर" आक्षेप घेणारे रतीबामागच्या माझ्या कल्पकतेला फुटलेले धुमारे बघू शकत नाहीत हा त्यांचा परा्भव आहे. माझा नाही...
गांधी-गोळवलकर चर्चेला आक्षेप घेण्या अगोदर कुणीही हे https://aisiakshare.com/node/9607 वाचले आहे असे वाटत नाही. कदाचित लोकांच्या मनात एखाद्या कॉन्फरन्स रुममध्ये ए०सी० फूल लावून गॉसिप करत, चिरूटचा नाहीतर पाइपचा धूर सोडत केलेल्या चर्चा अस्सल असाव्यात.
मॅडम वेगळा विचार करणार्…
मॅडम
वेगळा विचार करणार्यांना जगभर सर्वत्र अनंतकाळपासून प्रस्थापितांच्या रोषाला तोंड द्यावे लागले आहे. ३० वर्षांपूर्वी मी केलेल्या कामाला/लिखाणाला, २० वर्षांपूर्वी केलेल्या फोटोग्राफीला आणि आता या कामाला असाच सामना करावा लागला आहे.
जास्तीतजास्त मला पळवून लावले जाईल पण ए०आय० थांबणार नाही!
…
वेगळा विचार करणार्यांना जगभर सर्वत्र अनंतकाळपासून प्रस्थापितांच्या रोषाला तोंड द्यावे लागले आहे.
‘Great minds think alike’ या उक्तीस ‘Fools seldom disagree’ ही प्रत्युक्ती हा पाणउतारा समर्पक तथा पुरेसा आहे. (Just sayin’…)
जास्तीतजास्त मला पळवून लावले जाईल
नाही. ते होण्याची शक्यता (निदान या संस्थळावर तरी) शून्यवत् वाटते. (इतरांना बोअर करणे हा काही गर्हणीय गुन्हा नव्हे, आणि — निदान या संस्थळावर तरी — देहदंडास पात्र असू नये.)
(वेगळे ‘तर्कतीर्थक्षेत्र’ काढून देणे, on the other hand… अर्थात, त्या परिस्थितीतसुद्धा, तुमचा वावर तेथल्यापुरता मर्यादित ठेवण्याचे बंधन तुमच्यावर राहात नाहीच, म्हणा!)
त्यामुळे, फार फार तर दोनपैकी एक गोष्ट होऊ शकेल: एक तर तुम्ही स्वतःच कंटाळून येथून निघून जाल. किंवा, येथील अन्य सदस्य (संपादना- नि व्यवस्थापनासकट) कंटाळून येथून निघून जातील. जास्तीत जास्त काय, संस्थळ बंद पडेल, इतकेच.
की फ़र्क पैंदा?
दुसरा एक मुद्दा
दुसरा एक मुद्दा
मी फोटोग्राफी करत असे तेव्हा काही समूहात ते टाकत असे. त्यात एक उंटावरून शेळ्या हाकणार्या दीड शहाण्यांचा सिक्रेट ग्रुप होता. तिथे मला फोटोग्राफी बद्दल बरीच अक्कल शिकवली जायची, पण मी त्याला कधी किंमत दिली नाही. कारण माझ्या कामाची खरी पावती मी काढलेले फोटो देशाच्या कानाकोपर्यात जेव्हा पोस्टर पासून मोठ्या होर्डींगपर्यंत वापरले गेल्याचे कळायचे तेव्हा होणार्या गुदगुल्याना तोड नसायची.
आत्मविश्वास कुठुन येतो याचे उत्तर आता तुम्हाला मिळाले असेल, अशी अपेक्षा करतो.
हा हा हा हा!
हा हा हा हा!
तुमच्या नम्र सूचनेतील गर्भितार्थ समजला!
मी फोटोग्राफी करत नाही याची खरी कारणे अशी आहेत-
० २०१८ नंतर पुण्यातला पाउस खुप वाढला आणि माझ्या प्रिमियम लेन्सेस वर बुरशी जमा होऊ लागली. ती वर्षाच्या वर्षाला काढणे आणि घरात ड्राय कॅबिनेटमध्ये लेन्सेस सांभाळणे सध्या अशक्य आहे कारण माझ्याकडे ड्राय कॅबिनेट साठी सुरक्षित जागा नाहीये.
० त्यात माझ्या पाठदुखीने बर्याच मर्यादा टाकल्या आहेत.
आद्य ए०आय०निर्मित स्लॉप…
(बोले तो, येथे (याच संकेतस्थळावर) याअगोदर अनेकदा (आमच्याकडूनच) ज़िक्र होऊन गेलेला आहे, परंतु, पुन्हा एकदा…)
पेश-ए-ख़िदमत आहे: आद्य (सर्का १९८३) ए०आय०निर्मित स्लॉपचे (काहीसे) सुप्रसिद्ध (म्हणजे, आमच्या ऐकण्यात आलेले) उदाहरण.
(I must say this: याची सर आजच्या ए०आय०निर्मित स्लॉपला नाही. आमच्या जमान्यात…)
याच्या लेखकाची ओळख येथे. (आमचे लेखनगुरू!)
असो चालायचेच.
याची सर आजच्या ए०आय०निर्मित स्लॉपला नाही
माझ्या मते याचे एकमेव कारण म्हणजे पूर्वी जी कौशल्ये कष्टसाध्य होती त्यातली अनेक कौशल्ये ए०आय०ने प्राप्त केली असल्याने त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. संगणकीय टंकन लोकप्रिय होण्या अगोदर ’सुंदर हस्ताक्षराला’ विशेष महत्त्व होते. आता त्याला फारसा दिला जात नाही. तसेच ए०आय० ने शोषणाची पारंपरिक क्षेत्रे उधळून लावली.
पण त्यानं आयुष्यातली निरर्थकता संपली का?
>>माझ्या मते याचे एकमेव कारण म्हणजे पूर्वी जी कौशल्ये कष्टसाध्य होती त्यातली अनेक कौशल्ये ए०आय०ने प्राप्त केली असल्याने त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
पण कष्टसाध्य कामं सोपी झाल्यावर वाचलेल्या वेळात तुम्ही काय करता याला काही महत्त्व आहे की नाही?
उदाहरणार्थ, मी आता एआय, सोशल मीडिया वगैरे काही वापरत नाही. एवढेच काय मी आता फोनही वाजल्यावर हॅल्लो म्हणण्यापलीकडे वापरत नाही.
यामुळे मला खूप वेळ मिळू लागला. त्यापैकी सकाळच्या वेळी मी आमच्या दोन मांजरांसाठी ताजे मासे आणायला होलसेल मासळीबाजारात जाते.
याआधी मी रोज मासळीबाजारात जात नव्हते (तो माझ्या घराच्या आणि ऑफिसच्या रस्त्यातच असूनही). पण माझ्यावर अवलंबून असलेल्या बाळांना चांगलं खायला मिळावं या उद्देशाने मी तिथे जाऊ लागले. आता तिथे जाऊ लागल्यास मला ५ महिने तरी झाले असतील. बाळ मांजरे आता बाळही राहिली नाहीत. आता तुम्ही विचार करा पाच महिने न चुकता एखादी व्यक्ती रोज मासळीबाजारात जाते म्हणजे ती तिथे काहीतरी शिकत असणारच.
तर मी खेकड्याच्या नांग्या कशा मोडायचा ते शिकले. रावस फिले कसा करायचा ते शिकले (तिथे उपस्थित असणाऱ्या मासे साफ करणाऱ्यांनी मला चाकू/कोयते/खवले काढायचे ब्रश वगैरे पुरवले). श्रावण जवळ आला की माशांच्या पोटात अंडी मिळू लागतात. त्यांना गाबोळी असं म्हणतात. तर अलीकडे प्रत्येक माशात गाबोळी सापडायची. आमच्या दोन मांजरांपैकी, चंद्रा नावाच्या मांजरीला गाबोळी अत्यंत प्रिय आहे. आणि ती खाल्ल्यावर ती अशी काही ताणून देते की दुसऱ्याच दिवशी उठत असावी. तर रोहू माशाचं कॅव्हिआर (एका विशिष्ट माशाच्या अंड्यालाच कॅव्हिआर म्हणतात. बाकी माशांमध्ये मिळणाऱ्या अंड्यांना रो (roe) हा शब्द आहे.)आवडणाऱ्या माझ्या शा नुआरकडून प्रेरणा घेऊन मीही एकदा रावसमधून आलेली गाबोळी खाऊन बघितली (मस्त मसाला लावून, थोडं कॉर्न फ्लोअर वगैरे). अतिशय उत्तम प्रकार. माशांचे कल्ले (गिल्स) लालभडक असले तरच मासा ताजा असतो. तसंच माशाचा डोळा अजून पांढरा पडला नसेल तर मासा ताजा आहे असे समजावे. सध्या हळदीची पानंही मुबलक आहेत. त्यामुळे संपूर्ण बांगडा आणून त्याला मसाला लावून हळदीच्या पानात वाफल्यास तो उत्तम लागतो (तेल लागत नाही. बांगड्यात भरपूर तेल असते). तसंच मासा रवा फ्राय करून तो वरण (मिरची लसूण आलं खोबरं असलेलं) भाताबरोबर अतिशय चविष्ट लागतो. मांदेली नावाचा इवलुसा चकचकीत मासा असतो, त्याला केरळी पद्धतीनं फ्राय केल्यास भाताबरोबर अप्रतिम लागतो. तसाच एक राणी नावाचा सुंदर चकचकीत गुलाबी रंगाचा मासा असतो (राणी या नावाला शोभेल असाच रंग). तोही मस्त लागतो. पण त्याहीपेक्षा मी आता राणी माशाच्या रंगाची रेशमी साडी शोधते आहे. मरळ, रोहू, वाम, कतला हे गोड्या पाण्यातले मासे. आणि सुरमई, पापलेट वगैरे नेहमीचे यशस्वी समुद्रातले मासे. एक गोल्डन वामही येतो, तो खरंच १८ कॅरेट सोन्याच्या रंगाचा असतो. तो १०५० रुपये किलो असतो. कारण तो समुद्रातला. नदीतल्या वामला कुणी विशेष विचारात नाही. पण त्याचं कालवण एकदम भारी लागतं.
आता श्रावण सुरु झाल्याने मी आणि काही बंगाली लोकच बाजारात येतात. आणि बंगाली लोक रोहू नाहीतर कतलाच घेतात (कारण इलीश नावाचा त्यांचा अत्यंत लाडका मासा सोन्याच्या भावाला मिळतो). आमची मांजरंही रोहू सोडून काही खात नाहीत. एकदा मी त्यांना चिलापी आणून दिला (चिलापी म्हणजे गोड्यापाण्यातली कबुतरं. ती इतर माशांना नाहीसं करून टाकतात). पण चिलापी आणला त्या दिवशी तो टाकून देऊन दोघेही उपाशी बसले. ज्यांना कॅव्हिआर खायची सवय लागली आहे ते कबुतर खातील का? तर मी असा निष्कर्ष काढला आहे की चंद्रा आणि सूर्यभान दोघेही बंगाली आहेत.
आता तुम्ही सांगा, हे सर्व ज्ञान मला चॅटजीपीटी वापरून मिळालं असतं का? आणि कसंही मिळालं असलं तरी माझ्या या लेखनाचा तुम्हाला काही उपयोग आहे का? मला या सगळ्या अनुभवाबद्दल अत्यंत प्रेम तथा स्वआदर वाटतो. कारण मी ते मिळवण्यासाठी पेट्रोल आणि पैसे खर्च केले आहेत. पण इतरांना या ज्ञानाचा काय फायदा? किंबहुना यापेक्षाही अधिक माहिती असणारे तज्ज्ञ जगात असतीलच. त्यांना ही माहिती अतिशय वरवरची आणि उथळ वाटेल. काहीही असलं तरी मला माझ्या या खऱ्या जगात जगून, हात रक्तरंजित करून घेऊन वगैरे मिळवलेल्या ज्ञानाबद्दल जितकं ममत्व वाटतं तितकं इतर कुणालाही वाटणार नाही. पण मी स्वतःची अशी समजून करून घेतली आहे की कष्ट वाचवून फोन बघत बसण्यापेक्षा अशा रोजच्या गोष्टींमध्ये अधिक वेळ गुंतवल्यास जीवनाला अर्थ आहे असा भास निर्माण करता येऊ शकेल (आफ्टर ऑल, लाईफ इज इन द मीनिंग मेकिंग). पण इतरांना हे कंटाळवाणं वाटू शकतं. विशेषतः मी रोजच माशांबद्दल बोलू लागले तर इथले शाकाहारी लोक वैतागू शकतात.
ता.क. शिवाय मासेवाले मला रोज चहा देतात. पुण्यात सलग पाच महिने कुणी मला असा आवर्जून चहा देण्याची (आणि तोही चांगला) वेळ पहिल्यांदाच आली.
हे चॅटजीपीटी नक्कीच करणार नाही. म्हणजे पुण्यातली माणसंही करणार नाहीत. पण हे गरीब मासेवालेही पुण्यातलेच आहेत. त्यामुळे ते एक असो.
…
रोहू माशाचं कॅव्हिआर (एका विशिष्ट माशाच्या अंड्यालाच कॅव्हिआर म्हणतात. बाकी माशांमध्ये मिळणाऱ्या अंड्यांना रो (roe) हा शब्द आहे.)
अं… मत्स्यजगतातले (विशेषेकरून खाद्य मत्स्यजगतातले) मला फार काही१ कळत नाही, परंतु…
- स्टर्जन मासा पुण्याच्या पंचक्रोशीत तर सोडाच, परंतु अलम हिंदुस्थानात कोठे उपलब्ध असण्याबद्दल साशंक आहे.
- दुसरे म्हणजे, काव्हियार हे शक्यतो मिठात ट्रीट केलेले असते, नाही?
- काव्हियारची किंमत काय असते, माहित्येय? ते काय असे तुमच्या पुण्याच्या मासळीबाजारात रस्त्यावर मिळून राहिले!
(तसे पाहिले, तर आमच्या यूएसएमधल्या ग्रोसरी स्टोअरांमधून एवढुश्या छोट्याछोट्या बाटल्यांतून ‘काव्हियार’ असे लेबल लावलेले काहीतरी मिळते, म्हणा. अगदी सर्रास मिळते. परंतु, ते बहुधा नकली (बोले तो, भलत्याच कोठल्यातरी माशाचे) असावे, अशी शंका आहे. म्हणजे, तेही काही फार स्वस्त वगैरे नसतेच, म्हणा — त्या एवढुश्या बाटलीला२ दहा ते पंधरा डॉलरच्या आसपास पडत असावेत — परंतु तरीही, “खऱ्या” काव्हियारच्या तुलनेत कोठेच नाही.)
(त्याव्यतिरिक्त, पूर्वी कधीतरी कोठेतरी कोठल्यातरी रेष्टॉरंटातून ‘टेक्सास काव्हियार’ नावाचे काहीतरी पाहिलेले आहे. त्याचा मात्र मत्स्यजगताशी दूरान्वयानेदेखील संबंध नसतो — टपोऱ्या मोठ्या काळ्या वाटाण्याची उसळ!३, ४)
आमची मांजरंही रोहू सोडून काही खात नाहीत. एकदा मी त्यांना चिलापी आणून दिला (चिलापी म्हणजे गोड्यापाण्यातली कबुतरं. ती इतर माशांना नाहीसं करून टाकतात). पण चिलापी आणला त्या दिवशी तो टाकून देऊन दोघेही उपाशी बसले.
चिलापी बोले तो बायेनीचान्स tilapia काय? असल्यास, I don’t necessarily blame them. आत्यंतिक बोअरिंग, कॅरेक्टरलेस मासा! (नसल्यास, चूभूद्याघ्या.)
(किंबहुना, तिलापियाहूनही शतपटीने बोअरिंग असा आणखी एकच मासा माझ्या वाटेस आलेला आहे, तो म्हणजे कॉड. (होय, तोच तो, टिपिकल इंग्रजी ‘फिश अँड चिप्स’मधला.) माणसाने तळलेला कॉड खाण्यापेक्षा स्टायरोफोमचा (मराठीत: थर्माकोल.) तुकडा (किंवा, त्याहीपेक्षा, कागदाचा लगदा) आनंदाने चघळावा, असे माझे प्रांजळ मत आहे.५ असो चालायचेच.)
पुण्यात सलग पाच महिने कुणी मला असा आवर्जून चहा देण्याची (आणि तोही चांगला) वेळ पहिल्यांदाच आली.
हे चॅटजीपीटी नक्कीच करणार नाही.
नाही करणार खरा. ए०आय०चे तंत्रज्ञान अद्यपि बाल्यावस्थेत आहे.
(परंतु, नाही करीत, तेच बरे आहे. उद्या समजा चॅटजीपीटी जर चहा करून देऊ लागला, तर तो चहा किती भिकार दर्जाचा असेल, कल्पना करा! तो पिण्याची इच्छा खरोखरच आहे काय तुम्हाला?)
पण हे गरीब मासेवालेही पुण्यातलेच आहेत. त्यामुळे ते एक असो.
अं… ते गरीब मासेवाले हे सदाशिव-नारायण-शनवार या पेठत्रयीतील (झालेच तर, बाय एक्स्टेन्शन, कोथरुडातील) रहिवासी असतील, याची शक्यता, का, कोण जाणे, परंतु, धूसर वाटते. (जातिचिकित्सेत मुद्दामच शिरत नाही.)
असो.
तळटीपा:
१ नाही म्हणायला, कच्च्या खाण्याच्या मत्स्यप्रकारांत कोणे एके काळी केवळ रुचीच नव्हे, तर बॉर्डरलाइन वाक़िफ़ियतसुद्धा निर्माण होऊ लागली होती थोडीबहुत, परंतु, बऱ्याच वर्षांत तेही फारसे घडलेले नसल्याकारणाने१अ, ते बऱ्यापैकी विस्मरणात गेलेले आहे. कालाय तस्मै नमः।
१अ महागाई कोण वाढली आहे आजकाल!१अ१
१अ१ अर्थात, वाढती महागाई हे एकमेव कारण नाही, म्हणा. इतरही घटक आहेत. परंतु, असो.
२ त्या एवढुश्या बाटलीत नक्की किती (औंस) ऐवज असतो, ते जाऊन तपासून पाहावे लागेल. (बऱ्याच वर्षांत तीदेखील खरेदी झालेली नाही.) त्यामुळे, तूर्तास सांगू शकत नाही.
३ मूळ रेसिपीमध्ये चवळीचे दाणे (black-eyed pea) वापरतात, असे कळते. मात्र, त्याऐवजी टपोरे काळे वाटाणेसुद्धा चालू शकतात, असेही वाचले. इन एनी केस, मला सामोऱ्या आलेल्या आवृत्तीत टपोरे काळे वाटाणे वापरलेले होते. (एकदाच सामोरा आला आहे हा प्रकार. (थँक गॉड!))
४ ‘शुद्ध शाकाहारी प्रकार!’ असेही ठोकून देणार होतो, परंतु, (प्रकार दक्षिण संयुक्त संस्थानांतील आहे, हे लक्षात घेता) तसा तो असेलच, याची शाश्वती नाही. (Cooking medium म्हणून काय वापरीत असतील, परमेश्वरास ठाऊक! Lard, कदाचित? म्हणजे, शुद्ध मराठीत, डुकराची चरबी? (अर्थात, मला व्यक्तिशः फरक पडत नाही, म्हणा. परंतु, प्रकार आवर्जून खाण्यालायक वाटला नाही खरा.) असो; दृष्टीआड सृष्टी!)
५ पूर्वी एकदा (एकदाच!) बेडकाच्या तंगड्या खाल्ल्यानंतर अशीच धारणा झाली होती. त्यानंतर पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. (कॉड त्या मानाने — बेचव असला, तरीही — तितकाही वाईट लागत नाही. बोले तो, आवडत नसला, आवर्जून खाण्यासारखा वाटत नसला, तरी एक वेळ तो मी पुन्हा खाऊ शकेन. (खाल्लेलाही आहे.) Actually, let me correct myself: माणसाने बेडकाच्या तंगड्या खाण्यापेक्षा स्टायरोफोमचा (मराठीत: थर्माकोलचा) तुकडा चावून चावून खावा, आणि (तळलेला) कॉडमासा खाण्यापेक्षा कागदाचा लगदा आनंदाने चघळावा. पण लक्षात कोण घेतो?)
>>स्टर्जन मासा पुण्याच्या…
>>स्टर्जन मासा पुण्याच्या पंचक्रोशीत तर सोडाच, परंतु अलम हिंदुस्थानात कोठे उपलब्ध असण्याबद्दल साशंक आहे
मी प्रतिसादात लिहिलं आहे की सामान्य माशाच्या अंड्यांना रो म्हणतात. पण काव्हिआर कितीही थोर असलं तरी ते जेव्हा प्रथमतः माशाच्या पोटातून निघतं तेव्हा ते काही कोण्या मादामच्या झाग्यातून टपकत नसणार! ते असं लिबलिबीत, साधारण पारदर्शक मेंब्रेनच्या पिशवीतच येत असणार ना? की हा मासा समुद्रातले मीठ खाऊन पोटातच अंडी क्युअर करून डब्यात भरून सील करून यूज बाय डेट लिहून देतो? तद्वत रोहूच्या पोटातली गाभोळीही तशीच असते. आता उद्या फ्रेंचांनी ठरवलं की रोहूची गाबोळी अधिक भारी, तर लोक ती सोन्याच्या भावात घेतील. हाय काय नाय काय?
पण माझा मुद्दा असा की दोन मांजरांपैकी एक माशाचे तुकडे खातो. आणि हावरटपणे खातो. मांजरी जवळ आली तर गुरगुरून तिला पळवून लावतो. किंवा ती खाऊ लागली तर तिच्या डोक्यावर एक पंजा ठेवून आपणच खातो.
पण तिला जर निवाडस्वातंत्र्य दिलं तर ती गाबोळी आणि माशाचा एखादा तुकडा खाऊन तृप्त होते.
याचाच अर्थ तिला माशाचा सगळ्यात nutrient dense भाग निवडण्याची अक्कल आहे. कारण या लिबलिबीत भागात सगळ्यात जास्त फॅट आणि प्रोटीन असतात (हे तुम्हाला चॅटजीपीटी सांगू शकेल).
आणि चंद्रावर माझा विशेष जीव आहे. कारण ती लहान असताना एकदा एसीच्या पंख्यात बसली आणि कुणीतरी एसी चालू केल्याने तिचा चेहरा फाटला. त्यात तिला तिचा एक डोळा गमवावा लागला. ती मरेल असंच आम्हाला वाटलं होतं. पण डोळा काढून पुन्हा शिवल्यावर दुखायचं थांबल्या थांबल्या ती सर्वत्र बागडू लागली. आता समजा असा माझा अपघात झाला असता तर मी आयुष्यभर डोळा गेल्याचं दुःख केलं असतं.
पण एकूणच, as a cat she has great taste. म्हणून मी त्याला caviar म्हणते आणि तिला chat noir.
Cod बद्दल सहमत. आणि tilapia म्हणजेच चिलापी.
अजून एक होपलेस मासा म्हणजे बासा.
बसा हा मासा कसा?
तो म्हणजे आपले मसाले शोषून घेऊन स्वतःचे अनंत तुकडे करून घेणारा मसोकिस्ट मासा आहे.
आणि दुसरं असं की पाश्चात्य लोक माशाची त्वचा पूर्णपणे काढून टाकण्याचा इतका अट्टाहास का करतात? स्किन ठेवली तर आतलं मांस त्या तटबंदीत व्यवस्थित शिजवता येतं. आणि मग स्किनदेखील कुरकुरीत करून घेता येते.
असो. पाश्चात्य मासे आणि त्यांच्या पाककृती मला काही विशेष आवडल्या नाहीत. उदाहरणार्थ सामन शिजवून त्यावर शेपू ठेवून अव्वाच्या सव्वा किमतीला विकणे.
फक्त ऑईस्टर छान असतात. आणि फक्त न्यू यॉर्कमधले आणि बॉस्टनच्या आसपास असलेले बेगल, क्रीमचीझ आणि स्मोक्ड सामन. Fish and chips मला कधी खावेसे वाटले नाहीत.
.
आणि चंद्रावर माझा विशेष जीव आहे. कारण ती लहान असताना एकदा एसीच्या पंख्यात बसली आणि कुणीतरी एसी चालू केल्याने तिचा चेहरा फाटला. त्यात तिला तिचा एक डोळा गमवावा लागला. ती मरेल असंच आम्हाला वाटलं होतं. पण डोळा काढून पुन्हा शिवल्यावर दुखायचं थांबल्या थांबल्या ती सर्वत्र बागडू लागली. आता समजा असा माझा अपघात झाला असता तर मी आयुष्यभर डोळा गेल्याचं दुःख केलं असतं.
(विनोदाचा क्षीण प्रयत्न)
नाही म्हणजे, पत्त्यांच्या कॅटमध्ये दोन one-eyed jacks आणि एक one-eyed king असतात, इतपत ठाऊक होते. परंतु, इथे तर आख्खी one-eyed cat आहे!
(‘कारुण्यातून विनोद’ कॅटेगरीत खपून जाईल काय?)
(Sorry. Couldn’t help it.)
अतिअवांतर: दोन मांजरी असतात. एक इंग्रज, आणि एक फ्रेंच. इंग्रज मांजरीचे नाव असते One Two Three, तर फ्रेंच मांजरीचे नाव असते Un Deux Trois. इथवर सर्व ठीक.
तर एकदा काय होते, की दोघींमध्ये पोहण्याची शर्यत लागते. कोण जिंकली असेल? आणि कशी/का?
खरे तर, मुळात या शर्यतीत तिसरी स्पर्धक म्हणून Uno Dos नावाची एक स्पॅनिश मांजरसुद्धा होती. परंतु, ती आयत्या वेळेस गायब झाली. कशी?
इस सिमेंट मे जान है
पूर्वी एक जाहिरात यायची कुठल्या सिमेंट ची आठवत नाही त्यात तो पात्र म्हणायचा "इस सिमेंट मे जान है" त्यात जान शब्द असा काही pause आणि दाब देऊन म्हणायचा की जान मध्ये जान टाकायचा.
तसे माणसांच्या लिखाणात दम असतो.
अजून पर्यंत तरी ए च्या आय च्या लिखाणात तसा दम आढळत नाही सहसा. माहितीचा धबधबा एक वेगळी बाब आहे त्यात चिंब भिजायला आवडणे हीही एक वेगळी गोष्ट आहे.
पण भावना
उदा. वरील मृत माशांच्या वर्णनात जो जिवंतपणा आहे तो माशांच्या माहितीच्या धबधब्यात वाहून गेला असता. वरील मानवी लेखनात मातेची ममता, मुलींचे नखरे,मासेवाल्यांची माणुसकी सर्व भावनांचा पट आलेला आहे.
तसा याच्या आय च्या लेखनात येत नाही.
AI मध्ये दम आहे हो.
AI controversy swirls around writer from Trinidad and Tobago who won a prestigious prize.
संपूर्ण बातमी वाचा,
https://apnews.com/article/ai-short-story-jamir-nazir-commonwealth-priz…
लेख ai द्वारे लिहून घेऊन इथे…
लेख ai द्वारे लिहून घेऊन इथे पोस्ट करायचं असेल तर माणसा न कडून प्रतिक्रिया ची अपेक्षा, माणसानी तो वाचावा ही इचछा का?
लेखक ला माझी नम्र विनंती आहे. लेख ai लिहू शकतो हे समजले आता ai त्या लेखवार प्रतिक्रिया कशा देईल हे समजून घ्यायचे आहे लेखका ने 15 प्रतिसाद ai द्वारे लिहून त्ताच लेखा खाली स्वतः च id वापरून पोस्ट कराव्यात.
एकदम नवीन आयडिया जगात पाहिल्या च वेळेस हा प्रयोग करण्यास प्लॅटफॉर्म दिला म्हणून ऐसी अक्षरे ला एकदा जागतिक पुरस्कार पण मिळेल
दुनिया खूप विशाल आहे
काय ai, ai चाललं आहे. Ai ला जितका डेटा तितके च माहित आहे ते पण खरे को खोटे काही माहित नाही.
विविध क्षेत्रात असणाऱ्या लोकांची मत अमूल्य असतात.
अगदी झाडू मारणाऱ्या व्यक्ती ची मत आणि स्किल त्याच्या कामातील ai ला माहित नसते
सरळ सपाट ai फक्त गुमराह करू शकते ( हिंदी शब्ध वापरला क्षमा )
फ्रान्स ची अती उच्च ai नी सज्ज अनुभट्टी jellyfish नी बंद पाडली.मानवी बुद्धिम्माता हीच सर्वोच आहे.
Ai माणसा मुळे अस्तित्वात आहे ai नसेल तरी माणूस असेल, ai नव्हते तेव्हा पण माणूस होता.
Repect मानवी मेंदू ची प्रचंड क्षमता आणि हुशारी
"इमेल आणि वर्ड…
"इमेल आणि वर्ड-प्रोसेसींगच्या सुरुवातीच्या काळात हाताने पत्रलेखन कसे भावनिकदृष्ट्या संपृक्त यावर लोक गळे काढत असत. इंटरनेटचा वापर/अतिवापर हा मानसिक आरोग्याला धोका इ० मौक्तिके पण तेव्हा उढळली गेली. ए०आय० लेखनाला कनिष्ठ/दर्जाहीन मानणार्याचे भवितव्य असेच असणार आहे, हे निश्चित!"
अहो मुद्दा ए.आयला कमी लेखण्याचा नाहीये, पण लेखणीला ए.आयच्या गळ्यात बांधण्याबद्दल आक्षेप आहे.
सध्याची ळ्ळ्म काही कामं फारच उत्तम करतात यात काडीचाही संशय नाही.
"मराठी लिखाण" हे मात्र त्यात अज्याबात मोडत नाही, हे मी इथे विनम्रपणे नमूद करू इच्छितो.
संकल्पनांना मोकाट सोडून त्यावर वैचारिक मंथन करणे - हे तुम्ही कराच, ए.आयसोबत बागडा, त्याला कवेत घ्या किंवा त्यासोबत वाल्ट्झ नृत्य करा. आम्हीही हे करतो.
पण त्याद्वारे तयार झालेला मसाला नीट भाजून, चव घेऊन, "जाचून परखून" मगच पाकिटातून ऐसीवर विकायला टाका -
ए.आय लिखित मजकूर हा उत्तम "पहिला खर्डा" असतोय, त्यापुढे आपल्यालाच लिहावं लागेल, नाहीतर लेखाची वाचनीयता सुमार होते
मला वाटतं असं काहीसं म्हणायचं आहे इथे.
चू.भू. द्या.घ्या.
ता.का - > मी ही ए.आयसोबत "आय हेट यू, आय लव्हयू" हया तळ्यात मळ्यात करत असतो. काही वेळा असलं खतरनाक काम करून देतो की मी त्याला गालावर चांगलीच पप्पी देतो. मग मला ए.आय हा जगात भारी वाटतो.
इतर दिवशी त्याला सांगितलेलं काम इ. दुसरीतलं पोरही चांगलं करील- ह्या लायकीचे धंदे तो करतो. मग मी ती विंडो बंद करून त्याला शिव्या घालतो.
असो.
...
हे तुम्ही कराच, ए.आयसोबत बागडा, त्याला कवेत घ्या किंवा त्यासोबत वाल्ट्झ नृत्य करा. आम्हीही हे करतो.
पण त्याद्वारे तयार झालेला मसाला नीट भाजून, चव घेऊन, "जाचून परखून" मगच पाकिटातून ऐसीवर विकायला टाका -
The point is, ते ए०आय०बरोबर बागडण्याचे, त्याला कवेत घेण्याचे, झालेच तर त्यासोबत वाल्ट्झ नृत्य करण्याचे नृत्यांगण म्हणून 'ऐसीअक्षरे'कडे पाहू पाहताहेत.
बहुतांश सहमत
"मराठी लिखाण" हे मात्र त्यात अज्याबात मोडत नाही, हे मी इथे विनम्रपणे नमूद करू इच्छितो.
मराठीच कशाला, जगातल्या कुठल्याही मानवी भाषेबद्दल मी हेच म्हणायला तयार आहे. माणसं किती निरनिराळे प्रयोग करतात आणि ते लेखन करण्यासाठी वेळ काढून, काही विचार करून, आणि सईनं लिहिलंय तसा अनुभव घेऊन मग लिहितात. (माणसंही जिलब्या टाकतातच, पण ते निराळं.)
ते सगळं वाचायला असताना का ह्या स्लॉपी जिलब्या वाचायच्या? वाचणं सोडाच, त्या नजरेसमोर तरी का याव्यात!
प्रयोग म्हणून
प्रयोग म्हणून लेखकला ai नी लिहलेलेला कोणत्या ही विषयातील लेख. लिहण्यास सांगा त्या मध्ये ते एक्स्पर्ट आहेत. फक्त बदल करायला सांगा किमान 15 प्रतिसाद त्या लेखवार ai लाच द्यायला सांगा.
बघू ai मानस पेक्षा हुशार आहे की अडाणी
Ai हुशार आहे ठीक आहे. पण ai फक्त बेरीज मध्ये हुशार, असते वजाबाकी हुशार असते ती सरळ क्रिया असते माणूस अनंत विषयवार स्वतः ची ठाम मत व्यक्त करतो. Ai बोर आहे मता मध्ये विविधता नाही एका विषयावर 100 माणसे 100 वेगळी मत व्यक्त करतात पण एकाच विषय च्या 100 लेख वर ai एक च मत व्यक्त करते जो त्याच्या कडे डेटा असतो त्या विषयावर.
माझ्यावरील टीकेचे मूल्यमापन
माझ्यावरील टीकेचे मूल्यमापन
विक्षिप्त अदिती आणि राजेश - ०/१० (फकत हुल्लडबाजी)
सई केसकर - २/१० (पेपरमध्ये काहीतरी पांढर्यावर काळे केले आहे!)
गवि - ४/१० (पेपरमध्ये काहीतरी पांढर्यावर काळे केले आहे! तसेच मुद्दा भरकटवण्याचा कल्पक प्रयत्न)
अस्वल - ५/१० (खरे तर मी ४.५ गुण देणार होतो. पण हळुहळु प्रतिसादात गांभिर्य दिसू लागले)
नवी बाजू - ५.५/१० (प्रत्येक प्रश्नाला नम्रपणे उत्तर देण्याचा प्रयत्न आवडला. आमचे एक प्रा० उत्तरपत्रिकेच्या मागे केलेले "रफ वर्क तपासून" त्याला पण मार्क देत असत, त्या प्रमाणे नवी बाजू यांच्या तळटीपा तपासून, लिखाणातली ’स्वच्छता’ विचारात घेऊन गुण दिले आहेत)
मी रचनात्मक टीका असेल तर ती गांभिर्याने घेतो. रचनात्मक टीकेत सर्व बाजू समजून घ्यायचा केलेला प्रयत्न स्पष्ट दिसतो. हे आजकाल डीझाईन स्कूलमध्ये अगदी प्राथमिक पातळीवर शिकवतात. आणि त्याचे पालन पण होताना दिसते. पण आय० आय० टी० मध्ये पण फारसे दिसले नाही. एखादाच अपवाद...
मी माझ्या डीबेट-सिम्युलेटरच्या उपयोगाचा स्पेक्ट्रम मांडायचा प्रयत्न केला. चर्चेत किंवा प्रतिसादात त्याच्या आणखी युज-केसेस शोधण्यासाठी काही कल्पना मिळाल्या असत्या तर चर्चा दर्जेदार झाली असती. पण असो...
शंका (अवांतर)
'लिब्राण्डीत नाही लिब्रू, आणि कावळ्याला आमंत्रण' या सुप्रसिद्ध म्हणीत (किंवा, वाक्प्रचारात; किंवा, हे जे काही असेल, त्यात) कावळ्याचा संबंध नक्की कोठे येतो, याबद्दल काही कल्पना आहे काय? (मला नाही, म्हणून विचारतोय.)
वाटल्यास ए०आय०ला विचारून सांगावे.
(आगाऊ आभार!)