Skip to main content

कल्परिक्षा

1 minute

"मॅडम, मधे बसलात तर वारा लागणार नाही. साईडला बसा."

"बरं, थॅंक्स."

(थोड्या वेळाने)
"रिक्षा जरा फास्ट चालवाल का दादा?"

"नाही हो; इतर रिक्षांपेक्षा आपली रिक्षा हळू जाते."

"काय हो? इंजिनात काही बिघाड?"

"नाही नाही. वजन जास्त आहे. म्हणजे, बलास्ट लावलेत, त्यामुळे."

"बलास्ट?"

"हो. जहाजात गुरूत्वमध्य फार उंचावर असला तर जहाज कलू शकतं, बुडू शकतं. तसं होऊ नये म्हणून जहाजाच्या खालच्या भागात पाणी भरतात. तसंच, जहाजाच्या होल्डच्या एका भागात कार्गो भरतात तेव्हा वजनाचा समतोल रहावा म्हणून दुसर्‍या भागातल्या बलास्ट टँकमध्ये पाणी भरतात."

"पण त्याचा इथे काय संबंध?"

"सांगतो मॅडम. जोराचं टायफून आलं तर रिक्षा डुगडुगू नये म्हणून मी बलास्टचा विचार केला. मग विचार आला, की वाऱ्यासाठी किंवा बाहेरचं दृश्य बघायला काही उतारूंना एका बाजूला बसायला आवडतं. तसं झाल्यास रिक्षाच्या एक बाजूचं वस्तुमान दुसर्‍या बाजूपेक्षा अधिक होतं, आणि रिक्षाचा समतोल जातो. म्हणून रिक्षाखाली ऑटो-बॅलन्सीन्ग बलास्ट बनवला. तुम्ही डावीकडे बसलात तर बलास्टचं पाणी उजवीकडे. तुम्ही उजवीकडे बसलात तर बलास्टचं पाणी डावीकडे."

"क्काय?"

"खरंच सांगतोय मॅडम. तुम्हालाही जाणवलं असेल ना - इतर रिक्षांच्या तुलनेत आपण अगदी सहज प्रवास करतोय. अहो स्पीडब्रेकर किंवा खड्ड्यांचे धक्केही बलास्ट शोषून घेतो. आणि पाण्यामुळे रिक्षा उन्हाळ्यात थंडदेखील राहते."

"अगदी कल्पवृक्ष दिसतोय तुमचा बलास्ट."

"हो हो, अगदी बरोबर बोललात.

रिक्षाला समतोल,धक्क्यांचं शोषण,
तापमानात घट दुपारच्या पारी
अहो बलास्टवाली रिक्षा येता दारी"

Node read time
1 minute

'न'वी बाजू Fri, 29/05/2026 - 23:33

…रिक्षात जर का असा बलास्ट (आणि, तोही, पाण्याचा) भरू लागले, तर रिक्षाचे केवळ वजनच नव्हे, तर आकारसुद्धा काहीच्याकाही मोठा होणार नाही काय?

(किंवा मग, बलास्टसुद्धा पाहिजे, तो ऑटोबॅलन्सिंग(म्हणजे, त्याकरिता बहुधा शक्यतो लिक्विड?)सुद्धा पाहिजे, नि त्याने जागासुद्धा जास्त व्यापायला नको, म्हणजे मग पाऱ्याचा बलास्ट वापरावा लागेल की काय? म्हणजे मग किंमत काहीच्याकाही वाढणार. आणि मग पाऱ्याच्या टॉक्सिसिटीच्या नावाने प्रॉडक्ट सेफ्टीवाले नि एनव्हायरनमेंटवाले बोंबलणार. त्रांगडेच आहे सगळे!

किंवा मग, पॅसेंजरचा आकार नि वजन कमी करावे लागेल.

नाही, कल्पना रोचक आहे, परंतु व्यवहार्य वाटत नाही.)

(अवांतर: होडक्यांमध्ये नि पडावांमध्ये बलास्ट (नि तोही ऑटोबॅलन्सिंग वगैरे) वापरत असावेत काय? Size matters!)