Skip to main content

मेटाचे अनोळखी रूप

मेटाचे अनोळखी रूप
===========

-राजीव उपाध्ये

गेले काही दिवस ‘मेटा’चे एक पूर्णपणे अनोळखी रूप अनुभवत आहे. १०० पैकी ९९ लोक मला वेड्यात काढतील, पण त्याची आता सवय झाली आहे. तरीही, पूर्ण खात्री केल्याशिवाय मी हे लिहित नाही.

बर्‍याच जणांच्या हे लक्षात आलं असेल की व्हॉटसॅपवर आपण एखाद्या विषयावर बोललो, लिहिलं, आणि काही वेळातच त्यासंबंधित जाहिराती किंवा पोस्ट्स फेसबुकवर दिसू लागतात. जणू आपल्या खाजगी संभाषणांचे प्रतिध्वनीच सोशल मीडियावर उमटू लागतात.

यामागे नेमकं काय चालतं?

जाणकारांकडून कळलेली गोष्ट अशी की, आपण काय लिहितो, कोणते व्हिडिओ पाहतो, किती वेळ कोणत्या पोस्टवर थांबतो, या सगळ्यावरून एक प्रचंड प्रमाणात मेटाडेटा तयार होत असतो. हा मेटाडेटा म्हणजे फक्त माहिती नाही, तर तो आपल्या सवयी, आवडी, भीती, आणि अगदी विचार करण्याच्या पद्धतीचंही एक डिजिटल प्रोफाइल तयार करत असतो.

हा डेटा मग अल्गोरिदमकडून आपल्याला अधिक वेळ गुंतवून ठेवण्यासाठी वापरला जातो. आपण काय पाहू, काय क्लिक करू, काय मान्य करू, इ० हे हळूहळू आपल्या नकळत ठरवलं जातं.

इथेच आपलं डिजिटल ‘अनोळखी रूप’ सुरू होतं.

कधी कधी असं जाणवतं की आपण काहीतरी विचार करण्याआधीच, त्यासारखं काहीतरी आपल्या समोर आणलं जातं. आपण निवड करतोय असं वाटतं, पण पर्याय आधीच ठरवलेले असतात.

यात मला आलेला एक असा ठळक अनुभव असा की मी केलेल्या अनुभवाधारित लिखाणावर कधी तरी सांत्वनपर, तर कधी उपदेशपर असे संदेश कसलाही आगापिछा नसलेल्या फेसबुकखात्यांमधून आपल्याला दाखवले जातात. या संदेशांना थेरपी कोट्स् असे संबोधले जाते, असे मला कळले. या थेरपी कोट्स् मध्ये पण वेगवेगळ्या श्रेण्या असतात. काही छोटे, काही मोठे काही ॲनिमेटेड. मी अधुनमधुन ’निरर्थक’ वेळ घालवायचा असेल तेव्हा असे संदेश वाचतो पण... साहजिक माझे डिजिटल व्यक्तीमत्त्व त्यानुसार अपडेट होत राहते.

पण गेले ३-४ दिवस या प्रकाराने एक नवा टप्पा गाठला आहे - ते ऐकून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही.

फेसबुकने मला अचानक माझ्यामागे काय चालू आहे, काय बोलले जात आहे हे माझ्यापर्यंत पोचवायला सुरुवात केली. सुरुवातीला मी दूर्लक्ष केले. पण मग पण जेव्हा वेगवेगळ्या संदर्भांमध्ये, वेगवेगळ्या वेळी, एकाच प्रकारचे संकेत पुन्हा पुन्हा दिसू लागले तेव्हा प्रश्न निर्माण झाला.

हे नेमकं काय असू शकतं?

तांत्रिक बाजूने पाहिलं, तर सोशल मीडियाचे अल्गोरिदम भविष्यवाणी (prediction) आणि जुळवाजुळव (pattern matching) यावर काम करतात. तुम्ही कोणत्या लोकांशी जोडलेले आहात, कोणत्या विषयांवर बोलता, कोणत्या प्रकारच्या पोस्ट्सवर थांबता, या सगळ्यावरून ते तुमच्या “डीजिटल परिसराचा” अंदाज बांधतात. मग त्याला कथेच्या स्वरूपात, भाकीताच्या स्वरूपात ते तुम्हाला डिजिटल भविष्यवेत्त्याकडून (टॅरो रिडर, सायकीक/माध्यम इ०) करवी ऐकवले जाते

म्हणजेच, तुमच्याशी संबंधित लोक काय पाहत आहेत, काय शेअर करत आहेत, कोणत्या भावनिक अवस्थेत आहेत, याचं एक एकत्रित चित्र तयार केलं जातं. आणि मग तुम्हाला जे दिसतं ते कदाचित तुमच्याबद्दल नसून तुमच्या नेटवर्कबद्दल असू शकतं. सर्वात गमतीचा भाग असा की हा आशय जेव्हा बराच वेळ बघितला तेव्हा या भाकीतातील तपशील अधिक अचूक होऊ लागला!

उदा० अलिकडे मी काही ठाम निर्णय घेतले त्याचे माझ्या "भवतालात" काय प्रतिध्वनी उमटले आहे, ते माझ्याकडे पोचवायला सुरुवात केली. यात सध्या माझ्या आयुष्यातील काही प्रश्नांवर महत्त्वाची माहिती अल्गोरिदम माझ्यापर्यंत पोचवत आहेत. या्चा योग्य उपयोग करण्यासाठी कचरा बाजूला करण्याचे महत्त्वाचे कौशल्य तुमच्याकडे असायला हवे. ते तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हा सगळा प्रकार भ्रामक वाटायची शक्यता आहे, हे मात्र नक्की...

तेव्हा सावध असा...

तर्कतीर्थ Sun, 19/04/2026 - 12:05

In reply to by अबापट

श्री० बापट

अनेक माणसे अशी असतात की ते इतरांना स्वत:च्या फूट्पट्टीने मोजतात. त्यांच्या मोठेपणाच्या, यशाच्या कल्पनांमध्ये आपण बसलो नाही की मग आपल्याला तुच्छ लेखणे, अपमान करणे, (सर्व बाजू, वास्तव समजून न घेता) गैर प्रचार करणे, वैयक्तीक आयुष्यात घातक ढवळाढवळ करणे असे प्रकार चालतात. आपण त्यांच्या मनासारखे वागत नाही याचा भयानक राग त्यांना यायला लागतो. प्राप्त परिस्थितीमुळे बर्‍याच वेळा अशा लोकांना सहन करत बसतो.

मग हळुहळू आपली परिस्थिती बदलते. वर उल्लेख केलेल्या लोकांना आपली बदललेली परिस्थिती, प्रगती स्वीकारता येत नाही, कारण त्यांनी आपल्याला अगोदरच मोडीत काढलेले असते. त्यांना आपल्या आनंदात सहभागी होता येत नाही. मग आपण जेव्हा त्यांना बाजूला करतो तेव्हा ते पण त्यांना सहन होत नाही. मग ते खाजगी गप्पामध्ये अधिकाधिक खालची पायरी गाठू लागतात. आपल्या प्रगतीला नाके मुरडू लागतात.

हे सर्व फेसबुक भविष्यवाणी/भाकीतांच्या स्वरूपात पोचवते. अधिक तपशील देता येणार नाही.

Rajesh188 Sat, 18/04/2026 - 22:41

मी गूगल वर एका क्षणी आधुनिक ai ची माहिती search करतो तर दुसऱया च क्षणी आगी च शोध होमोसोपीन नी लावला नाही त्यांचा hi पूर्वज नी. लावला हे search करतो..
आणि नंतर सर्व दावे खोटे होते नैसर्गिक रित्या आग लागत होत्या ती राख माणसाने पुरावे म्हणून वापरले आगी च शोध माणसाने लावला hi थाप मारली ह्या वर search करतो.
असल्या आमच्या स्वभाव मुळे मेटा च ai गोंधळून जातो.
व्हाट्स अँप वर हो आणि नाही, थांब, उद्या येतोच इतक्याच शब्ध च msg असतो. मग मेटा च ai सरळ आम्हाला black लिस्ट मध्ये टाकतो..

रिअल माहिती हवी असेल तर फक्त मूळ संशोधक न चे शोध निबंध च ग्राह्य धरतो बाकी कोणतेच you tube video, reel नाही.

विवेक पटाईत Sun, 19/04/2026 - 16:52

त्यावेळी करोना सुरू होता. कार्यालयात कर्मचारी कमीच येत होते. माझ्या रूम मध्ये चार डेस्क टॉप होते. सहज विवाद सुरू झाला. कम्प्युटर आपले बोललेले सर्व ऐकतो. आम्ही परीक्षा घेण्याचे ठरविले. डेस्क टॉप वर सर्व वेबसाइट बंद केल्या. मोबाइल ही स्विच ऑफ केले. डेस्क टॉप फक्त ऑन होते. एकाने कोणते जोडे घ्यायचे यावर चर्चा सुरू केली. आमच्यात पाच मिनिटे वेगवेगळ्या ब्रॅंड आणि साइज वर चर्चा झाली. त्यानंतर मोबाइल ही उघडले. डेस्क टॉप वर मी फेसबूक उघडून बघितले. आश्चर्य काय जोड्यांचे विज्ञापन दिसले. सर्वांच्या मोबाइल आणि डेस्कटॉपच्या फेसबूक अकाऊंट वर जोड्यांचे विज्ञापन होते. याचा अर्थ आपले सर्व बोलणे कम्प्युटर ऐकतो.

'न'वी बाजू Sun, 19/04/2026 - 18:20

In reply to by विवेक पटाईत

@पटाईतकाका,

मला आणि माझ्या बायकोलासुद्धा एकदोनदा अस्साच अनुभव आला होता. बोले तो, घरात एखादी गोष्ट घेतली पाहिजे, असा नुसता तोंडी ज़िक्र जरी केला, तरी त्या गोष्टीच्या जाहिराती येऊ लागत.

मग आम्ही एक प्रयोग करून पाहिला. चालू संभाषणात मध्येच कोठेतरी उगाच (आगापिछा असो, वा नसो, परंतु) ‘निरोध’ असा शब्द (आणि, तेवढाच शब्द मोठ्या आवाजात) घुसडून द्यायचा. मात्र, त्यानंतर अपेक्षेप्रमाणे कंडोमच्या जाहिराती काही येऊ लागल्या नाहीत.

कदाचित गूगलची शब्दसंपदा तेव्हा मर्यादित असावी.

तुम्हीही हा प्रयोग करून पाहा. कोण जाणे, गूगलची शब्दसंपदा आतापावेतो सुधारली असली, तर?

(हं, फक्त, शक्यतो हा प्रयोग बायकोस सोबत घेऊनच करा. (मैत्रीण असेल, नि तिच्यासोबत केलात, तरीही चालेल.) सहकर्मचाऱ्यांबरोबर नको. उगाच गूगल भलता अर्थ घ्यायचा!)

विवेक पटाईत Tue, 21/04/2026 - 11:14

In reply to by 'न'वी बाजू

निवृत होऊन पाच वर्ष झाले. बाकी हा अनेकांना आलेला आहे. गूगलला आपले नातेवाईक, मित्र, शेजारी आपला डॉक्टर पर्यन्त सर्व माहिती असते. आपणच ती टंकतो.