Skip to main content

मनपिशाच

7 minutes

हा जो पुरुष आहे तो एका परदेशी कंपनीत मॅनेजर आहे. त्याचं नाव आहे मॅनेजर. ही जी स्त्री आहे ती त्याची बायको आहे आणि तिचे नाव बायकोच आहे. ह्या क्षणी हॉस्पिटलच्या स्पेशल रूम मध्ये असहाय अगतिक स्थितीत लोळागोळा होऊन पडली आहे. मॅनेजर बायकोच्या समोर खुर्चीवर बसला आहे.
त्याच्या क्षुब्ध मनांत अनेक अर्थशून्य वादळें निर्माण झाली आहेत,दुसरें तरी काय करणार?
वेळ, रात्रीचे आठ वाजले आहेत.
आठचा राउंड करून डॉक्टर तिला तपासून गेले. तपासणी आपली नेहामिचीच. म्हणजे ब्लड प्रेशर स्तेथेस्कोप ऑक्षिजन लेवल इत्यादि. केस पेपर वर काहीतरी खरडून डॉक्टर बाहेर पडले.
तो डॉक्टरांच्या बरोबर बाहेर गेला.
“कशी आहे तब्येत तिची?”
“सुधारणा निश्चित आहे. पण..”
“पण काय?” त्याने आशेने विचारले.
“इट्स ए लॉंग हॉल.बरेच दिवस लागतील.”
जगायला का मरायला? हा डॉक्टर साला असच बोलतो. तुम्हाला काय पाहिजे असेल तसा अर्थ काढा. संदिग्ध. तो काही बोलला नाही. आमच्या ऑफिसमध्ये नोकरीला असता तर लाथ मारून हाकलला असता.
परत येऊन बायकोच्या बेडच्या जवळ खुर्ची होती त्यावर येऊन बसला.
“काय म्हणाले डॉक्टर?” तिने विचारले.
“इंप्रूव्हमेंट आहे.”
“यू आर सच ए स्वीट लायर. किती माझी काळजी करतोस.” ती क्षीण हसत म्हणाली, “भोग आहेत माझे ते भोगले पाहिजेत.”
तू काय कमी खोटारडी आहेस? तुला खर म्हणायचे आहे कि यू जस्ट डोंट केअर, इन फॅक्ट नेव्हर केअर्ड. तू केवळ वाट बघतो आहेस. केव्हा एकदा...

नर्स आली. काही न बोलता ती ड्रिप लावण्यात मग्न होती. बरी होती दिसायला. सडपातळ. नाकेली. त्याने नर्सवरची नजर काढून घेतली. बायको बघत नव्हती म्हणून बरे. बायकांना पुरुषांच्या नजरा बरोबर समजतात. ती म्हणेल,“मी अशी इथे हॉस्पिटलमध्ये मरणासन्न आणि ह्याच्या डोक्यात नर्स.”
त्याला स्वतःचीच लाज वाटली.
ड्रिप लावून झाले होते.“हे चालेल आता दोन तास. मग रात्री दुसरे काही नाही.”
आता नर्स प्लास्टिकच्या पिशवीत गोळ्या शोधात होती. ओह ती लांबसडक नाजूक बोटं! ती बोटं त्याला बोलावत होती. कमऑन.
“हम्,घ्या ह्या गोळ्या.” नर्स आता त्याच्या जवळ उभी होती. कसल्यासा डीओचा सुगंध दरवळला.
“कंटाळा आला गोळ्या खायच्या.हे काय जगणं झालं.सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या. केव्हा एकदा सुटेन असं झालं आहे.देवा उचील रे मला एकदा.”बायकोच रडगाणे सुरु झालं. तसा तो भानावर आला. ही बायको अशी रंगाचा बेरंग करते. त्याला वाटलं आपण सुद्धा देवाची प्रार्थना करावी,“माझी पण सुटका कर.”
मघाच्या सुगंधाची जागा आता सडैल वासाने घेतली होती. गेले कित्येक दिवस हा दुर्गंध त्याचा पाठलाग करत होता.
बायकोच्या डोळ्यात झोप दाटली होती. झोपेच्या गोळ्या. आता ती गाढ झोपी जाईल.इथे थांबण्यात अर्थ नव्हता.
तो खोलीच्या बाहेर पडला. नर्सेस स्टेशनकडे गेला.ती लांबसडक, गोरी गोमटी, चाफेकळी नाक बसली होती. कुठले तरी इंग्लिश पुस्तक वाचत बसली होती. तो जवळ गेला तरी तिने लक्ष दिले नाही.
भाव खातेय.
“तुम्ही इथे नवीन जॉईन झालात काय? पूर्वी कधी बघितलं नव्हतं.” संभाषण सुरु करायाल हे ठीक होते.
“तुमची नेहमीची नर्स साघ्या सुट्टीवर आहे. माझी ड्युटी लागली.”
त्याला उगीचच वाटलं की “तुमची नेहमीची” वर तिने जरा जोर दिला होता.
ह्या कुत्सित बायका! हेल विथ देम.
“मी जरा डिनर करून येतो.”
पुढ त्याला म्हणायचे होतं,“चल, तू पण चल ना.” पण असं काही बोलला नाही. तो वळला आणि चालायला लागला.
“मला नाही बोलावणार?” कुणीतरी गोड आवाजात विचारालं.
त्याला क्षणभर वाटलं, नर्स बोलली. त्यानं अपेक्षेने वळून पाहलं.
ती पुस्तक वाचण्यात दंग होती. त्याला भास झाला असणार.
अलीकडे हे असे भास व्हायला लागले होते. भास आणि आवाज. त्याच्याशी बोलण्याचा कुणीतरी प्रयत्न करत होतं.
आधी मस्तक सुन्न व्हायचे. दृष्टी धूसर व्हायची. कधी वादळातून वाट चालणाऱ्या एकाकी वाटसरूची जाणीव व्हायची. सायकॉलॉजिस्ट म्हणाला होता हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत.
“चल.ये माझं बोट पकड.”
मग फक्त घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज.ती दूरवरून मारलेली हाक. कोण बोलावत होतं? आई का बाबा?
डोक्यात धुकं. मेंदूच्या जागी कापूस भरलेला. सगळ्या शरीरात कापूस भरलेला माणूस. स्टफ्ड माणूस. अस्वल, माकड, भू भू आणि पलीकडे आपण. हा पहा मनेजर! विक्रीची किंमत? पन्नास लाख प्लस पर्क्स फक्त दरवर्षी.विकत घ्या आणि कामाला बसवा. एक केबिन द्या. आणि एक मुसमुशीत सेक्रेटरी द्या. भुसभुशीत मनेजरची खुशखुशीत सेक्रेटरी! अखेर गाडी ह्या स्टेशनावर येऊन थांबली.
जेवणासाठी सॉलिड एक तासाचा हॉल्ट.
जवळच्या हॉटेलात त्याचे ठरलेले टेबल होते. एका बाजूचे. वेटरही त्याला ओळखायला लागले होत्र. बरोबरच आहे म्हणा. गेले दोन महिने तो रात्रीच्या जेवणासाठी तो इथे येत होता. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. माइंड फ्रेश करण्यासाठी इथे डोळे गार करणारी हिरवळ दिसत नव्हती.चालायचंच.
वेटर आला, “येस्स सर?”
काल काय खाल्लं होतं बरं? ते पण सालं आठवत नाही.
“आण काहीतरी. पनीर पराठा आण. जा.” त्याने निरिच्छपणे ऑर्डर दिली.
“सर, तुम्ही कालपण हीच ऑर्डर दिली होती.”
हल्ली म्हणजे तासापूर्वी लाय केलं त्याची आठवण रहात नाही.
“असं म्हणतोस? आण काहीतरी. तुम्हारी पसंद. जो मर्जी होगी वो लेके आओ.”
वेटरने समोर मश्रूम सूप आणून ठेवले.
कुठूनतरी नाजूक आवाजात कोणीतरी बोलले, “तुमने बुलाया और मै चली आई.”
त्याने सूपवरून नजर हलवली.
समोर ती उभी होती. तीच ती नर्स बाई.
“तू- आय मीन -तुम्ही?”
“तू म्हणालास तरी चालेल. तशी मी तुझ्या पेक्षा लहानच आहे. अरे, तू मला बोलावलेस मग मी तुला नाही कशी म्हणू? थोडा उशीर झाला. काय करणार? रिपोर्ट वगैरे लिहायचे असतात.” ती लडिवाळपाने म्हणाली.
त्याचा मूड थोडा सुधारला. पण हिला आपल्या मनातले कसे समजलं? मनकवडी वगैरे आहे कि काय?
“काय घेणार?”
“खायला नाही आले मी.”
“नाही म्हणजे मी खाणार आणि तू अशी बसणार. बरं नाही वाटत. मलाच संकोचल्यासारखे वाटेल.”
“बरं आता तू म्हणतोस आहेसच तर हॉट कॉफी घेते.”
कॉफी पिता पिता सटर फटर बोलणे चालू होते.
“मॅनेजर,माझ्याकडे एक प्रपोजल आहे.थोडं खर्चिक आहे पण तुझी आणि तुझ्या बायकोची दोघांची सुखरूप सुटका होईल.”
प्रपोजल म्हटल्यावर त्याला वाटले आता कशी वळणावर आली. पण नाही हे प्रपोजल तसले नसावे.
“ऐकव तरी. पैशाचे मागून बघता येईल.”
“अहं. अहं. सबसे बडा रुपय्या. जास्त नाही फक्त पाच लाख. ते काही तुला जड नाहीत. नो निगोशिएशन्स. ह्या कामासाठी पाच लाख काही मोठी रक्कम नाही. तुझी पेस्लीप पाहिली आहे मी. तुझे सगळे व्यवहार माहित आहेत. ब्लॅक किती व्हाइट किती.“
“चार लाख?”
“तुला काय वाटतंय कि मंडईत मेथीची जुडी घेतोयस?”
त्याच्यातला मॅनेजर जागा झाला.
“चल साडे चार. तुम भी खुश, हम भी खुश.”
मॅनेजरने नेहमीचे टेकनिक वापरले. जो निगोशिएशन्स करत नाही तो कसला मॅनेजर!
टफ कस्टमर. हिच्यावरून पाच ओवाळून टाकायला हरकत नाही.
“ओके. डन. बोल. प्रपोजल बोलशील की नाही.””
नर्स बाईने प्रपोजल सांगितले. मॅनेजरने विचार केला आपण ह्याच्यात फसणार तर नाही ना.
“हे बघ. इतकं सारं कशाला करायचं? ऑ. तसं बघितलं तर दोन एक महिन्याचा प्रश्न आहे. बिचारी. आपसुकच जाणार आहे. पाच लाख. नॉट वर्थ.”
“बिच्चारी काय. मॅनेजर,चुकीची कल्पना. मलाही बरच काही ज्ञान आहे. ती तशी नाही जाणार. पुढील दहा वर्ष तुझा पिट्टया पाडून चरकातल्या उसा सारखा तुला ओरबाडून पिळून काढून तुझी जवानी विझवून मग जाईल. थोड्याच दिवसात डॉक्टर तुला सांगणार आहेत. की आता ह्याना तुम्ही घरी घेऊन जा. तुला फ्लॅटमधली एक रूम आय शी यू मध्ये बदलावी लागेल. दर आठवड्याला एक ऑक्षिजन सिलिंडर. सोडून दे. जमेल तिची सेवा करायला. तुझ्याच्यानं नाही होणार रे.आणि काय रे तिचे जगणे. ड्रिप वर जगतेय, गोळ्या घेताना रोज रडते. तू तिला मुक्ती दिलीस तर ती थँक्यू म्हणून अखेरचा निरोप घेईल. विचार कर.”
“पैसे क्याश, अॅडवांसमध्ये. कसला विचार करतो आहेस. मिनीच्या वेळेस काय विचार केला होतास? तसा आत्ता कर.”
“मिनी? मिनी कोण?”
“मिनी. दामिनी, तुझी पीए. तू जिला लाडाने मिनी म्हणायचास ती. तिने गळफास घेतला. का तू दिलास.”
कोण आहे ही. अमानवीय. हिला कसे माहित आहे सगळे.
“मला कसं माहित? मला सगळं माहित आहे. माझ्यापासून काही लपत नाही. आपणच तर दोघांनी जाउन मायलॉनचा दोर त्या बाबूभाईच्या हार्डवेअर दुकानातून आणला. मीच तर ती आयडीया तुला दिली. अजून सांगू? ती ही...”
बापरे कोण आहे ही बाई. सांभाळ रे बाबा. ही तुझा केव्हाही घात करेल. हिच्या पाशातून सुटका कशी करून घ्यायची?
“हीना स्वतःच्या कर्माने मेली. माझा काही सबंध नाही. पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे.” मॅनेजर गुरगुरला.
“हो का? पोलिसांनी दिली असेल पण मी. व्हाट अबाउट मी? तू जेव्हा ते विषारी मद्य तिला पाजलेस तेव्हा मी बाजूला उभी होते. मीच ती पावडर ग्लास मध्ये टाकली. बर ते जाउदे. मग काय विचार ठरला. इतके झाले त्यात अजून एक.” नर्स छद्मीपणे हसली.
प्रपोजल ठीक ठाक होते. पण ही उद्या उलटली तर? ब्लकमेल करायला लागली तर?
आयडीया.
“नंतर माझ्याशी लग्न करशील?” त्याने हुकमी पान टाकले. म्हणजे त्याला आपलं असं वाटलं.
“लग्न अन् तुझ्याशी? काय वेड लागलय का मला? तू लंपट साला एक नंबरचा, भेकड, षंढ. नामर्द...”अश्या अचकट विचकट शिव्या येत राहिल्या.
“चूप. एकदम चूप. आता एक शब्द जरी जास्त बोललीस तर गाठ माझ्याशी आहे. लक्षात ठेव.”
“अरे तू काय करशील रे. अं. नामर्द माणसा. मला भ्या दाखवतोस?”
तिरीमिरीत तो उठला, आजवर कुठलीही स्त्री त्याला अशी बोलली नव्हती. स्त्रिया म्हणजे कश्या लीन दीन दुबळ्या नतमस्तक असायला पाहिजेत. समर्पण करणाऱ्या. ही म्हणजे काहीच्या काही. हिचे जगणे म्हणजे जिंदगीभरची रिस्क. केव्हा पलटून दंश करेल काही सांगता येणार नाही.
त्याने समोरची सुरी उचलली, नर्स बाईचे पोनी टेल पकडून त्याने मागे खेचले आणि सुरी उगारून म्हणाला. “बोल. पुन्हा बोल. मला शिव्या देतेस? हरामी औरत.”
“सोड माझे केस, यू आर हर्टिंग मी. बोलेन बोलेन हजार वेळा बोलेन, भिते की काय? आणि काय करशील?“
आता मात्र त्याचा तोल गेला, सर्व बंध तुटले. त्याने त्वेषाने हातातली सुरी तिच्या डोळ्यात खुपसली. अगदी खोल खोल. पुन्हा पुन्हा. जगाचा अंत होईपर्यंत.
एक रक्ताची चिळकांडी, मॅनेजरच्या समोरच्या टेबलावर कोकम सोड्याने भरलेला ग्लास आडवा होऊन खाली पडला. फुटला.
सगळ्यांनी आवाज ऐकला.
फक्त मॅनेजरने नाही ऐकला.
आवाजाने गजबजलेले हॉटेल शांत झाले. सगळीकडे भयाण शांतता,
एक अस्फुट किंकाळी.
कोणाची? मॅनेजरची नाही, मॅनेजरच्या टेबलाच्या बाजूच्या टेबलावर एक कुटुंब जेवण करत होते. त्यातल्या स्त्रीची किंकाळी. तिचा लहान मुलगा डोळे विस्फारून ते दृश्य अनिमिष डोळ्यांनी टिपत होता. त्या स्त्रीने मुलाचे डोळे हाताने झाकले आणि त्याला घेऊन बाजूला गेली.
गल्ल्यावर बसलेला शेट्टी धावत आला.
“रवी. पोलिसांना फोन कर. दरवाजे बंद कर कुणालाही बाहेर जाऊ देऊ नकोस.”
“अरे बाप रे. काय हे. काय झाले.”
मॅनेजरच्या उजव्या डोळ्यात सुरी मुठी पर्यंत आत घुसली होती. आत पार मेंदू पर्यंत.
पोलिसांची गाडी आणि अम्ब्युलन्स येऊन पोहोचले. मॅनेजरला उचलून स्ट्रेचरवर घेतला. हॉटेलचे पेट्रन माना वळवून वळवून बघत होते.
“मेला का?”
“अजून नाही, थोडी घुगधुगी होती. पण वाचणार नाही.”
इवेन्चुअलि एवरी बडी इज गोइंग टू डाय.
“पन्नास लाख प्लस पर्क्स”चा अशा प्रकारे अंत झाला.
समाप्त

Node read time
7 minutes