Skip to main content

नतद्रष्टांची किरकिर

नतद्रष्टांची किरकिर
==========

-राजीव उपाध्ये

टीप - ए०आय० निर्मित आशयाबद्दल सतत किरकिर करणार्‍यांना हा लेख मी समर्पित करत आहे. विचारमंथनात (ब्रेनस्टॉर्मिंग) मध्ये ए०आय० अचाट मदत करतो, हे ज्यांना समजू शकत नाही त्यांना हे तंत्रज्ञान माफ करो.

कालच माझ्या फेसबुकच्या कालरेषेवर एक बातमी येऊन थडकली. टुरींग पारितोषिक विजेत्या प्रा० डोनाल्ड नुथ यांनी त्यांची एक अचंबित करणारी "यशकथा" प्रकाशित केली आहे. त्यानिमित्ताने ए०आय० बद्दल पसरविले जाणारे गैरसमज आणि ए० आय० चा नवे शोध लावण्यात लागणारा हातभार हे पुरेसे उजेडात आणणे एक ए०आय० समर्थक म्हणून माझी नैतिक जबाबदारी ठरते.

ए०आय० तंत्रज्ञानाने पृथ्वीतलावर अवतार घेतल्यापासून तज्ञांमध्ये बृहत्भाषा प्रतिकृतींबद्द्ल बरेच नकारात्मक चित्र रंगवले गेले. त्यात तो थापा कसा मारतो हे पण उगाळले गेले. ए०आय०मुळे मानवी मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणारा नकारात्मक परिणाम सर्वत्र चर्चिला गेला. पण हे सर्व होत असताना ए०आय० आपली क्षमता वाढवून संशोधनातील आपली मदतनीसाची भूमिका अधिक प्रभावी बनवत होता.

प्रा० नुथ यांना अल्गोरिथ्मचे देवपिता (गॉडफादर) मानले जाते. त्यांनी आपल्या संशोधनात ॲन्थ्रोपिक च्या क्लॉड ४.६ या ए०आय० मॉडेलला आपले सहकारी बनवले आणि अनेक दिवस न सुटलेल्या समस्येचे उत्तर शोधले.

शुद्ध गणितातील अत्यंत किचकट आणि मानवी बुद्धिमत्तेसाठी अत्यंत जटील मानल्या गेलेल्या अनेक समस्या एका कोशाच्या रुपात आता ग्रथित केल्या गेल्या आहेत. त्यांना एर्डश कोश असे संबोधल जाते. हा एर्डश कोश न सुटलेल्या सुमारे एक हजार गणिती समस्यांची जंत्री आहे.

जानेवारी २०२६ मध्ये आता ए०आय०च्या मदतीने अनेक दशके न सुटलेल्या एर्डश कोशातील ३ महत्त्वाच्या समस्या ए०आय० च्या मदतीने सुटल्याचे जाहिर करण्यात आले. नील सोमाणी या संशोधकाने एर्डश समस्या क्र० ३९७ जीपीटी ५.२ हे मॉडेल वापरून काही मिनीटात सोडविली. केव्हीन बॅरेटोने आपल्या एका सहकार्‍याबरोबर एर्डश समस्या क्र० ७२८ आणि ७२९ या समस्या सोडविल्या. गणितातील नोबेल मानले गेलेले फिल्ड पारितोषिक विजेते टेरेन्स टाओ यांच्यामते स्वयंचलित ए० आय० च्या मदतीने मिळवलेले हे यश लक्षणीय आहे.

याच बरोबर गुगल डीपमाईंडने एर्डश समस्या क्र० ६५२, ६५४, ९३५, and १०४० सोडविल्याचे जाहिर केले आहे.

ए०आय०ने नव्या संशोधनाला अनेक क्षेत्रात गती दिली आहे आणि त्याचा आढावा घेणे सध्याच्या नकारात्मक वातावरणात योग्य ठरणार नाही. ए०आय० ची मदत घेऊन केलेले लिखाण, तयार केलेली एखादी कलाकृती लोक जेव्हा नाकारतात तेव्हा ते स्वत:चे हसे करून घेतात. ज्ञानाच्या इतिहासात साधने बदलत गेली, पण शोधांची किंमत कधी कमी झाली नाही. वरील शोधांचे महत्त्व ए०आय० च्या मदतीने लावल्याने त्यांचे महत्त्व कमी होते का? या प्रश्नाचे उत्तरे ठाऊक असून दिले नाहीत तर तुमच्याच डोक्याची ...

सई केसकर Sat, 07/03/2026 - 15:42

१. तुम्ही हा लेख एआयबद्दल किरकिर करणाऱ्या मानवांसाठी लिहिला आहे.
२. जर बहुतांश लेखन एआयने होऊ लागले तर मग तुम्ही कुणासाठी लेख लिहिणार?

तर्कतीर्थ Sat, 07/03/2026 - 19:11

@सई केसकर

तुमचा प्रतिसाद फारच संदिग्ध असल्याने तुमची गृहितके काय याचा अजिबात अंदाज बांधता येत नाही.

एखादा लेखक आपले पुस्तक एखाद्या लाडक्या व्यक्तीला अर्पण करतो म्हणजे ते इतरांनी वाचू नये असे सूचित होत नाही. तसेच इथे हा लेख इतरांनी वाचू नये असे अजिबात सुचवायचे नाही.

आजच दुपारी कार्नेगी विद्यापीठातील एका गणिताच्या प्राध्यापकाची मुलाखत बघितली [१] त्यांच्या दाव्या प्रमाणे ए० आय० मानवी कल्पकतेला लवकरच मागे टाकेल (माझ्यामते अगोदरच मागे टाकले आहे). हे स्वीकारले तर मुद्दा उरतो तो सध्याच्या गोंधळाचा अर्थ कसा लावायचा.

ए०आय० ची नवनिर्मिती लोकांना समजायला जड जात आहे. अजून २-३ वर्षातच मानव अजून वेगाने उत्क्रांत होऊ लागेल (भारताचं माहित नाही, पण एकंदर कठीण वाटतंय) आणि काही प्रमाणात ए०आय० शी जुळवून घेईल.

[१] https://www.youtube.com/watch?v=ivVPJhYM8Ng&t=461s