मारी बिस्किटांचा केक (बिस्किटं शिळी असणं आवश्यक)
परवा मारीचा पुडा आणला तर मे महिन्यातला निघाला. बिस्किटं मऊ पडलेली. कावळा येतो रोज खिडकीत, पण त्याला तरी किती देणार. मग आयुष्यात प्रथमच केकचा घाट घातला.
बिस्किटं मिक्सरला बारीक करून घेतली. १० बिस्किटं होती. त्यात एक अंड फोडून घातलं. ३ चमचे तेल घातलं. अर्धा चमचा इनो घातलं. १ चमचा कोको पावडर घातली. २ चमचे पिठीसाखर घातली, आणखी १ चमचा चालली असती असं खाल्ल्यानंतर वाटलं. सगळं फेटून घेतलं. चाटून पाहिलं मस्त लागत होतं त्यामुळे केक फसला/बसला तरी चालणार होतं.
एकीकडे अलमीनची कढई तापायला ठेवली, त्यात कूकरची खालची जाळी असते ती ठेवली. एका स्टीलच्या वाडग्यात तूप लावून घेऊन कणिक घालून ती पसरवून घेतली, जेणेकरून केक चिकटून बसणार नाही. मिश्रण त्यात ओतलं आणि तो वाडगा कढईत ठेवला. वर एक झाकण ठेवलं, त्याला स्वयंपाकघरातला नॅपकिन गुंडाळला होता म्हणजे झाकणाच्या आतली वाफ केकवर पडणार नाही. माध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटांत केक तयार झाला होता. मस्त फुगला होता, चवही छान.
फक्त तो नॅपकिन पातळ असल्याने कढईच्या कडेने, जिथे तो कढईला चिकटलेला होता, तिथून जळाला नि त्याचा गोलाकार तुकडा कापल्यासारखा निघून आला हातात.
संदर्भ... (चूभूद्याघ्या)
खूपखूप पूर्वी, ब्लॅक-अँड-व्हाइटच्या जमान्यात नि मुंबई दूरदर्शन हे दिल्लीपासून स्वतंत्र असताना (किंबहुना, 'नॅशनल नेटवर्क'चे सावट देशभरातल्या दूरदर्शन केंद्रांवर पडलेले नसताना), मुंबई दूरदर्शन केंद्र (वरळी, बँड १ चॅनेल ४) तथा पुणे सहक्षेपण केंद्र (सिंहगड, बँड ३ चॅनेल ५) यांवर 'आवो मारी साथे' या नावाचा पारशी-गुजरातीतला एक अत्यंत लोकप्रिय असा कॉमेडी कार्यक्रम सादर होत असे. आदी मर्झबान नावाचा एक गृहस्थ तो सादर करीत असे. मला वाटते त्याचा संदर्भ असावा.
गवि
गविंनी एका लेखात त्यांच्या लहानपणची आठवण लिहिली होती. एक बाई त्यांना कायम मारी बिस्किटंच द्यायच्या, चुकून सुद्धा ग्लुकोज बिस्किटे ऑफर करायच्या नाहीत वगैरे वगैरे! त्याची आठवण झाली.
मलाही ती पूर्वीची आरारुट पासून बनवलेली निस्तेज आणि चवहीन मारी आवडायची नाहीत. पुढे ब्रिटानियाला आमची नाराजी कळली असावी. म्हणून त्यांनी मारीगोल्ड ही बऱ्या चवीची बिस्किटं बाजारात आणली. तरीही ग्लुकोज वा नानकटाई पुढे ती नावडतीच राहिली.
तर नावडतीचा केक तरी आम्हांस का आवडावा ? वयानुसार, पुन्हा एकदा आमच्या आवडी निवडी तीव्र झाल्या आहेत.
बल्लवाचार्या!
मला तसला जळकट, खरपुडी झालेला केकचा भाग आवडतो.
आणि एक - देव तारी तिला कोण मारी ... केक!