Skip to main content

निवेदन

ऐसी अक्षरेवर प्रसिद्ध झालेल्या "मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?" या धाग्याच्या निमित्ताने त्या धाग्यावर आणि अन्य काही धाग्यांवर काही सभासदांनी ऐसीअक्षरे आणि अन्य मराठी संस्थळांबद्दल मतप्रदर्शन केलेले आहे असे दिसते. मराठी आंतरजाल हा इतर विषयांप्रमाणेच चर्चेचा विषय निश्चित होऊ शकतो. अशा चर्चांत काही बरीवाईट मते मांडण्याचेही सर्वांना स्वातंत्र्य आहे. मात्र एका संस्थळावर दुसऱ्या संस्थळाबाबत लिखाण करताना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. या संदर्भात संस्थळचालकांतर्फे स्पष्टीकरण द्यावे म्हणून प्रस्तुत धाग्याचा प्रपंच.

या धाग्यावर आणि त्या अनुषंगाने आलेल्या ऐसीअक्षरेच्या अन्य धाग्यांवर आलेली सामान्यतः विविध विषयांवरची आणि विशेषकरून ऐसीअक्षरे आणि अन्य मराठी संस्थळे यांबद्दलची मते ही त्या त्या सभासदाची वैयक्तिक मते आहेत. ऐसीअक्षरेच्या व्यवस्थापन यंत्रणेशी त्या मतांचा संबंध नाही. विशिष्ट संस्थळाबाबतची तक्रार सदस्यांनी त्या त्या संस्थळाच्या व्यवस्थापनाकडे करावी ही ऐसीअक्षरेच्या व्यवस्थापनाची भूमिका आहे. याच नव्हे तर कुठल्याही धाग्यावर कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेचा बदनामीविषयक मजकूर छापला जाऊ नये आणि छापल्यास लवकरात लवकर कारवाई होईल याची दक्षता ऐसीअक्षरे व्यवस्थापन घेईल अशी ग्वाही या निमित्ताने आम्ही देतो.