'नीट'चा फज्जा - डॉ. हृषिकेश रांगणेकर

'नीट'चा फज्जा
डॉ. हृषिकेश रांगणेकर
बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक, उत्सुक मुलांचा दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही फज्जा उडाला आहे. २४ साली मोठा स्कॅम, पेपरलीक, एकाच सेंटरवरच्या सलग अनेक जणांना ७२० पैकी ७२० वगैरे वगैरे; २५ साली प्रचंडच भयंकर पेपर आणि हो, ह्यावर्षीही पेपर लीक झाला आहे आणि आता तर National Testing Agency (NTA) ने नीट पुन्हा घेतली जाणार हे जाहीर केलं आहे. NTA हा "Never Trust Agency" चा शॉर्ट फॉर्म आहे याची खात्री होत चालली आहे.
फ्रस्ट्रेशन, संताप, दु:ख, चीड, हतबलता ह्या सगळ्या भावनांचा कल्लोळ विद्यार्थीवर्गात झाला आहे.
महाराष्ट्रात यावर्षी आणखीन एक मोठी गम्मत झाली. बहुप्रतीक्षित नीटच्या पेपरच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला!! मुलं दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेच्या टेन्शनमध्ये, संपूर्ण तयारीत, आणि बारावीचा रिझल्ट लागला! जणू दुसरा कुठलाही दिवस वर्ज्य होता. एक दिवस थांबले असते तर त्सुनामी आली असती!! महाराष्ट्रातल्या मुलांच्या फोकसवर परीक्षेच्या आदल्या दिवशी बोर्डाने यशस्वीरित्या पाणी ओतलं.
जी NTA ही परीक्षा राबवते तीच ते JEE (Main), CSIR, UGC NET सारख्या पंधरा परीक्षा घेते. पण ह्या एजन्सीचा नीटवर जास्त लोभ दिसतो.
नीट परीक्षेच्या आधी NTA ने ट्विट्सचा सपाटा लावला होता. त्यात मुलांचं समुपदेशन नाहीच, उलट त्यांना घाबरवणं, धमक्या देणं असले प्रकार केले गेले. जणू ही परीक्षा नसून एखादं युद्ध आहे. एकदम थिल्लर अप्रोच.
नीटची परीक्षा द्यायला वयाचं बंधन नाही! बारावी बोर्डात केवळ पन्नास टक्के पुरतात. बावीस पंचवीस लाख मुलं ही परीक्षा देतात. संपूर्ण वर्षात एकच चान्स. त्यात JEE Mains – Advanced सारखी चाळणी पद्धत नाही!! एकच परीक्षा. त्यामुळे होतं असं की सिस्टीमवर ताण येतो, गैरप्रकार घडतात. ७२० मार्कांच्या परीक्षेत तब्बल सत्तर, पंच्याहत्तर टक्के मुलं ३००च्याही खाली असतात. या परीक्षेला चाळणी लागली तर किती गैरप्रकार टळतील, मनस्ताप वाचेल. पण नाही!
ह्या नीटची आणखी गम्मत आहे. NTA बाकी तमाम परीक्षा ऑनलाईन घेतं. उदा. JEE. संगणकाची उपलब्धता, इंटरनेट आणि तत्सम इन्फ्रा असणाऱ्या सेंटरवर ह्या परीक्षा होतात. ह्या सगळ्याच परीक्षा MCQ based असल्याने चार पैकी एका पर्यायावर क्लिक करुन शेवटी पेपर submit करायचा. नीटचं मात्र तसं नाही. इथं पेनाने गोल मार्क करायचे. त्यात वेळ जातो हा भाग आहेच, पण नक्की किती मार्क करायचं? थोडा थोडा राहीला, किंवा शाई थोडी बाहेर गेली तर कम्प्युटर वेगळंच उत्तर पकडणार नाही ना? अशी भीती मुलांच्यात असते. चुकून वेगळ्या पर्यायाला मार्क केलं तर सुधारण्याचा चान्स नाही. (negative स्कोरिंगमुळे उलट मार्क कट होणार). इतर परीक्षांत मात्र, online असल्यामुळे उत्तरपत्रिका review करुन उत्तरं बदलण्याची मुभा ती submit करेपर्यंत असते. (पन्नास लाख रुपयात विद्यार्थ्याची नीटची answer key च बदलून देणारे लोक आहेत असंही कानावर आलंय. ते एक असो.)
सक्षम मनुष्य वर बसला नसेल तर त्याची शिक्षा, त्याच्या चुकांचे परिणाम सर्वसामान्यांना भोगायला लागतात हे वेगवेगळ्या उदाहरणांत स्पष्ट होतं.
सहज चौकशी
हा असा भेदभाव फक्त 'नीट'बद्दल काय, याबद्दल कधी कुणी अधिक माहिती काढली आहे का?