गायब झालेली माणसं

काल लॉ कॉलेज रोडवरच्या 'कोलाज ' मध्ये एका मीटिंगमध्ये डिस्कशन्स करताना जॉन मॅथ्यू मथ्थन (सरफरोशचा दिग्दर्शक ) विषय निघाला . 'सरफरोश' सारखा अप्रतिम सिनेमा देऊन हा जॉन नंतर कुठे गेला हा प्रश्न मला असंख्य लोकांनी असंख्य वेळा विचारला आहे . त्याचं उत्तर एकदा निवांत लिहितोच .पण प्रसिद्धीच्या झोतात येऊन विजेसारखी निमिषार्धात गायब होणारी माणसं हा विषय डोक्यात घोळायला लागलाच त्या निमित्ताने.काही लोक विजेसारखी चमकतात आणि क्षणार्धात गायब होतात . जणू नियतीने एकच विशिष्ट कामगिरी बजावण्यासाठीच त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं असतं . वेस्ट इंडीजसारख्या संघाविरुद्ध एकाच टेस्ट सामन्यात सोळा विकेट काढणारा नरेंद्र हिरवाणी आणि पाकिस्तानविरुद्ध चुरशीच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फोर मारून जिंकून देणारा हृषीकेश कानेटकर ही अशी काही उदाहरण . त्या एका सामन्यातल्या कामगिरीमुळे त्यांचं नाव इतिहासामध्ये ध्रुवताऱ्यासारखं अढळ झालं . त्यांनी अगोदर काय केलं आणि नंतर काय केलं याच्याशी कुणालाच देणं घेणं नाही . ते एक सामने हीच त्यांची ओळख .
संगीतकार तुषार भाटिया हे असच एक नाव . तुषार भाटिया म्हंटल की कोण हा तुषार भाटिया असा प्रश्न अनेकजण विचारतील .तुषार भाटियाने कल्ट स्टेट्स प्राप्त झालेला 'अंदाज अपना अपना ' हा एकमेव सिनेमा केला . अंदाज अपना अपना ओळखला जातो काही जबरदस्त परफॉर्मन्ससाठी , धमाल संवादासाठी आणि हसवून हसवून काही काळापुरता का होईना विवंचनांचा विसर पाडण्यासाठी . आणि तुषार भाटियांच्या गाण्यासाठी पण .अशी उदाहरणं जवळपास प्रत्येक क्षेत्रात सापडतील . इंडियन आयडॉल चे अभिजित सावंत सारखे त्याकाळी भूतो न भविष्यती लोकप्रियता पाहिलेले विजेते आता एकदमच दुर्लक्षित असण्याच्या फेजला कस डील करत असतील ? किंवा सोशल मीडियावर काही काळापुरतं ट्रेंड होऊन पुन्हा नेहमीच्या आयुष्याच्या घाण्यात शिरणारी लोक तरी काय वेगळी असतात . शाळा -कॉलेजमध्ये आपल्यासोबत असणारे काही त्याकाळी नेक्स्ट बिग थिंग म्हणून गणले जाणारे आणि आपल्याला त्या वयात कायम inferiority complex देणारे क्लासमेट्स -मित्र नंतर आयुष्यात काही तरी सर्वसामान्य करताना दिसतात तेंव्हा पण आश्चर्य वाटतं . खोटं कशाला बोला मनात आनंद पण होतोच . आपल्यामुळेपण अनेकजणांना असा आनंद मिळाला असणारच ही एक नाण्याची दुसरी बाजू झालीच . पण मला उत्सुकता आहे ती अशा आयुष्याच्या एका टप्प्यावर लाइमलाईट मध्ये असणाऱ्या आणि नंतर लाइमलाईटमधून बाहेर फेकली गेलेली माणसं या परिस्थितीशी कस डील करत असतील याची .
मला एका शोबिझ मधल्या अशाच लाइमलाईटमधून बाहेर फेकल्या गेलेल्या फिल्म डायरेक्टने एक फार कटू सत्य सांगितलं होत . तो म्हणाला होता की , आयुष्यात यशाची आणि प्रसिद्धीची प्रचंड आस ठेवून पण ती न मिळणं हे दुःख माणूस एकवेळ सहन करू शकतो पण काही काळापुरत्या या गोष्टी मिळाल्यावर त्या हातातून कायमच्या निसटून जाण हे दुःख सहन करण्याच्या पलीकडे असतो .आपले glory days आता मागे पडले आहेत आणि आता आयुष्यातला कधीही न संपणारा उतार सुरु झाला आहे ही वस्तुस्थिती स्वीकारणं ही एक खूप अवघड गोष्ट असावी . शाहरुख खान एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की , उद्या माझ्याभोवती गर्दी नाही जमली किंवा मन्नतसमोर कुणीच आलं नाही तर मला वेड लागेल . यशस्वी माणसाला असं कन्फेशन देणं सोपं असत . प्रसिद्धीच्या झोताबाहेर फेकल्या गेलेल्या माणसाला हे नेहमीच शक्य होईल असं नाही . या अल्पकाळ प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या लोकांच्या अंगी एक ठराविक टॅलेंट असतंच . मग प्रॉब्लेम नेमका कुठं येत असावा ? नशीबाचा ? मी दोन दिवसांपूर्वी 'द वाइंड रिव्हर ' नावाचा नितांत सुंदर सिनेमा पाहिला . त्यात एक भारी डॉयलॉग होता . त्यातलं एक पात्र म्हणत , " जंगलामध्ये नशीब नावाची गोष्ट नसते . म्हणजे एखादं हरीण वाघाची शिकार होतं ते हरीण कमनशिबी असत म्हणून नाही . तो शिकार होतो तो कुठेतरी कमजोर पडतो म्हणून ." ही काही काळापुरती प्रसिद्धीच्या झोतात येऊन काही काळाने बाजूला पडलेली माणसं पण कुठंतरी कमी पडलीच असावीत . Afterall life is a jungle and आपण आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर शिकार बनणार हरीण पण असतोच . पण काही लोकांना हरीण बनण्याची किंमत जास्त मोठ्या प्रमाणावर चुकवावी लागते इतकंच .
पाच तारे दिले आहेत.
पाच तारे दिले आहेत.
असे वन हिट वंडर्स अनेक असतात. आपल्यातलेही अनेक.
कॉलेजच्या मॅचमध्ये तो एकमेव विजयी षटकार एकदाच मारलेला असतो.
गॅदरिंगला सर्वांच्या स्मरणात राहील असं गाणं एकदाच गायलेलं असतं.
एकदाच धाडस दाखवून कोणा गुंडांच्या कानाखाली जाळ काढलेला असतो.
एकदाच. वन हिट वंडर्स.
रेमब्रँडट्स : I'll be there for you.. : F.R.I.E.N.D.S title song
बाबूल सुप्रियो : सोचता हूँ उसका दिल कभी मुझपे आये तो.
आर्यन्स: आँखोमें तेरा ही चेहरा
Los Del Rios : Macarena
Los Lobos : La Bamba
खूप देता येतील.
"दोन क्षण" म्हणून पुलंनी
"दोन क्षण" म्हणून पुलंनी व्यक्ती आणि वल्ली मध्ये दोन व्यक्तींच्या क्षणभराच्या प्रकाशझोताची कहाणी लिहिली आहे.
जसं कुठेतरी कमी पडल्याने बाहेर फेकले जातो तसेच कुठल्या तरी अपघाताने यश मिळून जाते असेही घडते.
मेरा नाम जोकर हा चित्रपट पडला नसता तर शैलेंद्रसिंग हा गायक चित्रपटात चमकू शकला असता असे वाटत नाही. रविंद्र जैन/राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटात पार्श्वगायन करणारे जसपाल सिंग किंवा हेमलता हे गायकसुद्धा त्याच्यापेक्षा चांगले गात असत. परंतु त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त यश शैलेंद्रसिंगला ऋषीकपूरचा आवाज म्हणून मिळाले.
अंमळ दुरुस्ती
ते "दोन वस्ताद" असं आहे. टिल्यावस्ताद आणि ज्योतीमामा. टिल्यावस्तादांनी कुठल्या तरी हुच्च संगीतवाल्याला एका मैफिलीत अस्मान दाखवलेले असते अन ज्योतीमामांनी शाहू महाराजांच्या वेळेस एका जबऱ्या पैलवानाचा पराभव केलेला असतो.
"त्यांच्या आयुष्यात ते दोनच क्षण ते जगले- शरीराने अन मनानेही. आज ते केवळ मेले नाहीत म्हणून जिवंत आहेत. टिल्यावस्ताद आणि ज्योतीमामा."
आवडला लेख्
मलाही 'दोन वस्ताद' आठवले. सुंदर लिहीले आहे.
अजून एक उदाहरण: अमिताभ च्या डॉन चा दिग्दर्शक चंद्रा बारोट.
बाय द वे, हृषिकेश कानिटकर पुढे थोडाफार खेळला. त्यानंतर महाराष्ट्राची टीम सोडून तो राजस्थान च्या रणजी टीम मधे गेला. तेथे त्यांचा कप्तान झाला आणि सलग् दोन वर्षे राजस्थान ला रणजी विजेतेपद त्याने मिळवून दिले. राजस्थान चे भारतीय क्रिकेट मधले स्थान पाहता ही प्रचंड मोठी कामगिरी होती. पण त्याची आपल्याकडे तितकी दखल घेतली गेली नाही. अमेरिकेत अशा डोमेस्टिक विजयावर पिक्चर वगैरे निघाले असते :)
मात्र (भारताचा काही काळ ओपनर असलेल्या) आकाश चोप्रा ने त्या दोन सीझन्स वर सुंदर पुस्तके लिहीलेली आहेत - आउट ऑफ द ब्लू, आणि बियॉण्ड द ब्लू
दोन्ही पुस्तके मस्त आहेत
दोन्ही पुस्तके मस्त आहेत (अर्थात क्रिकेट आवडत असेल तरच).
अशीच अजुन काही नावे आठवली -
विजय भारद्वाज (ऑस्ट्रेलिया का साउथ अफ्रिका वन डे सीरीज मधे मॅन ऑफ द सीरीज, नंतर गायब) (कर्नाटकचे किमान ६ लोक्स टीममधे असण्याच्या दिवसात हा होता
सदानंद विश्वनाथ
नोएल डॅव्हिड (ह्याच सिलेक्शनच जास्ती चर्चेत होतं, हा कधीच चमकला नाही)
रोकार्डो पोवेल्
आय पी एल मधले - पॉल वेल्थाती, स्वप्नील अस्नोडकर
मधे वाचनात आल होत की देबाशीश मोहंती ओरिसामधी ॲल्युमिनम कारखान्यात मजुरी करतो (खरे खोटे माहीत नाही)
सहृदय
हाच लेख असं नाही, तुझ्या लेखनात नेहमी सहृदयता असते. एखाद्या कलाकाराबद्दल कितीही अनादर असेल किंवा एखाद्या कलाकाराचं ते एकटंदुकटं यशसुद्धा फार कौतुकास्पद वाटत नसेल, पण तुझ्या लेखनातली सहृदयता बघून त्या सगळ्यापलीकडे व्यक्तीबद्दल कुतूहल आणि आपुलकी वाटायला लागतात. मागे तू माधुरी दिक्षित आणि तिच्या मराठी सिनेमाबद्दल लिहिलं होतंस तेव्हाही असं वाटलं. (मलाही माधुरी दिक्षित आवडत नाही.)
असो. तर एकट्या-दुकट्या यशावरून साईनफेल्डचा हा भाग आठवला.
कधीतरी चमकून जाणारे बरेच
कधीतरी चमकून जाणारे बरेच असतात. ते लोक फार विचार करत असतील असं वाटत नाही. चला एकदा प्रसिद्धी मिळाली, खूप झालं.