Skip to main content

आय.आय.टी. मद्रास : चार वर्षांचा प्रवास

11 minutes

माझ्या मुलाला २०२२ साली Computer Science and Engineering B. Tech कोर्स साठी IITMला प्रवेश मिळाला आणि एक पालक म्हणून माझा ह्या संस्थेशी संबंध आला. वेळोवेळी मुलाबरोबर मारलेल्या गप्पा, कॅम्पसला दोन-तीन वेळेला दिलेल्या भेटी ह्यातून हे विश्व मला कसे दिसले, हे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

IIT Madras Life

२०२२च्या batchला कॅम्पसला यायला ऑक्टोबर महिन्याचा शेवट उजाडला. आईबाबांबरोबर आलेली मुलं. एकाच वेळेला आपले स्वप्न पूर्ण झाले, IITमध्ये आलो, त्याचा आनंद. पण नजरेत कुठेतरी भांबावलेपण, थोडी बावचळलेली देहबोली. रूम पार्टनर कोण मिळेल याची काळजी. हॉस्टेल ॲडमिशन, सायकल खरेदी ह्यात संपूर्ण दिवस गेलेला असतो. आता घरचे आजूबाजूच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला जाणार असतात. विद्यार्थी / विद्यार्थिनी त्यांच्या हॉस्टेलमध्ये. मुलांची हॉस्टेलमधली पहिलीच रात्र. डोळ्यात पाणी आले तरी ते लपवण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला असतो. काही लागले तर फोन कर, आम्ही बाजूलाच आहोत असे पालकांनी सांगितलेले असते. कितीही वाटले तरी फ़ोन केला जात नाही. खिन्न मनस्थितीत कधीतरी डोळा लागतो. मधेच जाग येते तेव्हा बाजूच्या कॉटवर असाच कोणीतरी छताकडे उदास नजर लावून पडलेला असतो. Hi hello होते, थोड्या गप्पा होतात, दोघेही रूममेट थोडे रिलॅक्स होतात आणि तिथेच हॉस्टेल लाइफला रुळायला सुरुवात झालेली असते.

 

सकाळी कॅम्पसची वॉकिंग टूर organize केलेली असते. IIT Madras गिंडी नॅशनल पार्कच्या जमिनीवर असल्यामुळे कॅम्पस म्हणजे raw जंगल आहे. आपल्या रस्त्यावर कुत्रे दिसावेत तशी हरणे बागडत असतात. (आश्चर्य म्हणजे IIT Madras मध्ये अजिबात कुत्रे नाहीत). रात्रीच्या नैराश्याचा आता मागमूस नसतो. ओरिएंटेशन सेशन उत्साहाने अटेंड केले जाते, प्रत्येक प्रोफेसर अभिमानाने आम्ही NIRF-1 आहोत, स्पोर्टसमध्ये overall championship बरेचदा आम्ही जिंकतो असे सांगत असतात. उत्साहाच्या त्या दणक्यात मेसमधले जेवणही चांगले लागते. आई वडील निघून जातात, क्लासेसना सुरुवात होते. पहिल्याच आठवड्यात गजेंद्र सर्कलचा तिसरा तुटलेला हत्ती कोठे आहे, एरोवेल कुठे आहे अशा सगळ्या सीक्रेट गोष्टी सगळ्या फ्रेशर्सना कळतात. मराठी मित्रमंडळात शिरकाव होतो. कॅम्पसचे फोटो, वीडियो काढून घरी पाठवले जातात. पहिल्या काही दिवसातच वेगवेगळे क्लब असतात, त्यांचे इंटरव्यू चालू होतात. एकमेकांच्या खोलीत येजा चालू होते. आपल्याला वाटते त्याहून खूप लवकर मुले सेट होतात. 
 

एखाद्या कोंडवाड्याचे दार उघडावे आणि आतील वासरे चौफेर उड्या हाणत उधळावीत, तशी काहीशी अवस्था पहिला महिना संपताना होते. JEE परीक्षेसाठी केलेली अचाट मेहनत आणि दोन वर्षे पूर्ण कोविडमधे घरी बसलेली ही बॅच. पहिल्यांदाच मुले on his / her own असतात. IITमध्ये आल्यावर काही दिवसातच गर्लफ्रेंड नाही मिळाली तर आयुष्यात काही राम नाही, फारच वर्षे (!) आपण सिंगल राहिलो, असा साक्षात्कार बऱ्याच मुलांना होतो. त्या दृष्टीने प्रयत्न चालू होतात. इथे काही जोड्या कायमच्या जुळतात, काही ब्रेकअप होतात. तर काही सिंगलच राहतात. असो.
 

करत करत पहिला महिना संपतो आणि Quiz 1ची वेळ येते. IITमध्ये आल्यावरची पहिली परीक्षा. मुले कसून अभ्यास करतात. पेपर सोपे होते की अवघड, किती मार्क मिळाले, हे लगेच घरी कळवले जाते. ह्याच दरम्यान घरचे भेटायला यायची एक लाट चालू होते. “या तुम्ही, पण मी हॉस्टेलवरच राहणार आहे.” असा मेसेज आधीच आलेला असतो. पाखरू आता पंख फुटून घरातून उडून गेलेलं आहे. आईबापाला जाणीव व्हायला वेळ लागत नाही. कुठेतरी थोडेसे वाईट वाटते.
 

End sem होते. एक सेमिस्टर संपते. पहिल्या semला आपल्या deptचा एक introductory course असतो आणि physics, chemistry, maths हे विषय असतात. मुलं हे विषय कोळून प्यायलेली असतात. Academic challenges ह्या semला कमी असतात. घर सोडून राहणे हा मुख्य challenge. घरोघरच्या लाडोबांना आणि लाडूबाईंना कपडे आपले आपणच धुवायचे असतात, खोली साफ ठेवायची असते. इन्स्टिट्यूट पूर्ण प्रयत्न करते मुले चांगली रहावीत, खुशीत रहावीत. तीन मुलांमागे एक senior दादा असतो. काही अडचण आली तर तो मदत करतो. माझ्या मुलाचे mentor sir तर पहिल्या semमध्ये मेसमध्ये party द्यायचे. काही मुलं इथे आल्यावर अठरा पूर्ण होतात. कितीही मोठं झाल्याचा आव आणला तरी एक लहान मूल अजून दडून बसलेलं असतं.  
 

एकदा अशाच एका फ्रेशर्सच्या groupला एक mentor sir कॅम्पसवरच्या एका ठेल्यावर दुपारी चहासाठी घेऊन गेले. तुम्हाला काय हवे ते घ्या, सरांनी सांगितले. ठेल्यावर सगळ्या पाट्या वाचल्या आणि काही आवाज आले, बोर्नविटा, बूस्ट, कॉम्प्लान. असाच आणखी एक किस्सा सांगते. एकदा एक फ्रेशर मुलगा आईला फोनवर म्हणाला, आमच्या हॉस्टेल मधे काल लाइट गेले. मग काय केलेत तुम्ही, आईने विचारले. मग आम्ही लपाछपी खेळलो. असे ते मूल अधूनमधून डोके वर काढते.
 

पहिल्या वर्षी एकूण क्लब ह्या गोष्टीला फारच महत्त्व असते. आपल्याला position of responsibility मिळावी, त्याहीपुढे आपण क्लब हेड व्हावे. किंवा एखादा नवीन क्लब चालू करावा, असे धुमारे फुटत असतात. कोणाला मराठी मित्र मंडळाचा अध्यक्ष व्हायचे असते. 
 

म्हणता म्हणता एक वर्ष संपते. ह्या काळात मुलांचे सामाजिक वजन वाढते आणि शारीरिक घटायला लागते. एकदा IIT Madrasचा एक मुलगा कुठलेच आइडेंटिटी प्रूफ न घेता चेन्नई एयरपोर्टला (campusच्या आत Madras आणि बाहेर Chennai) विमान पकडायला गेला होता. नशिबाने IIT Madras चे ICARD  त्याच्याकडे होते. त्या जोरावर त्याला आत प्रवेश मिळाला. एकूण Chennai मध्ये तमिळ लोकांना IIT Madrasचा खूप अभिमान आहे, ते जाणवते. 

 

मुलांचे वजन कमी होण्यामध्ये मेसचा खूप मोठा वाटा आहे. कुठलीही भाजी असली तरी त्याची चव सारखीच असते. ग्रेवी (म्हणजे पाणीच) unlimited असली तरी पनीर, चिकन असा शेलका माल रेशन केलेला असतो. तो कँटीनवालेच वाढतात. पोळ्यांना कुठल्याही स्निग्ध पदार्थाचा अंशही नाही. ब्रेकफास्टला एकच अंडे मिळते. (बाकी इडली, उपमा वगैरे अनलिमिटेड असते). एक अंडे किंवा कॉर्नफ्लेक्स ह्यापैकी एकच घेता येते. (ह्यामागे काय फंडा आहे ते अजून मला कळले नाही). मेसचं साम्य मुंबईच्या IPL टीमशी आहे. कागदावर मेन्यू जबरदस्त असला तरी performanceच्या नावाने पूज्य. कुठल्याच गोष्टीची चव मराठी जिभेला रुचत नाही. रविवारी sweet या सदरात एक गुलाबजाम मिळतो किंवा छोटासा ice cream चा कप. मेसचा न बिघडणारा हातखंडा पदार्थ म्हणजे ब्रेड, बटर, जॅम. मेसमधे एखादा पदार्थ unlimited घेता येणं आणि त्याला चव असणं हे गुलबकावलीच्या योगाइतके दुर्मीळ आहे. निदान 2022 सालची ही सत्यपरिस्थिती होती. असो.

 

त्यात भर घालणारी इथली हवा. कडक उन्हाळा आणि अतिकडक उन्हाळा, एवढे दोनच ऋतू. सूक्ष्म घाम सतत पाझरत असतो. एप्रिल, मे महिन्यात एकीकडे घामाच्या धारा आणि त्याच वेळी गरम लू. रात्री हॉस्टेलच्या खोलीत झोप लागणे अशक्य होते. मुलं बिचारी लायब्ररी किंवा लॅब (AC असतो) कुठेतरी रात्री थांबतात. पहाटे दोन अडीचला थोडासा थंड वारा सुटला की खोलीत येऊन झोपतात. मनापासून सुट्टीची आणि घरी जायची अगदी वाट पाहत असतात.
 

सुट्टीत घरी आलेली पोरं दोन महिन्यात अगदी टवटवीत होतात आणि परत दाखल होतात कॅम्पसमध्ये तिसऱ्या sem साठी. 
 

आता बरेचसे मुलगे येतात कावेरी हॉस्टेलला. पहिल्या वर्षी मुलगे मंदाकिनीला होते आणि मुली सुवर्णमुखीला. दोन्ही हॉस्टेल नवीनच बांधलेली आहेत. IIT Madras ची सगळ्यात चांगली हॉस्टेल आहेत. कावेरी मात्र सगळ्यात जुने, IIT Madrasचे पहिले आहे. लांबलचक पसरलेले आहे आणि अगदी निसर्गातच आहे. दार उघडल्यावर समोर हरीण असू शकतं आणि क्वचित खोलीत विंचू येऊ शकतात. कावेरीला आल्यावर मुलांचा सामना होतो IIT Madrasच्या आदिम रहिवाशांशी, माकडांशी. मंदाकिनीपेक्षा living conditions खूप वाईट होतात. आपलं चांगलं घर सोडून इकडे का आलो, असं परत एकदोन दिवस वाटतं.
 

इकडली माकडं खूपच aggressive आहेत. खोलीचं दार चुकून उघडं राहिलं तर आत घुसून खाणं पळवतात. कोणाच्या हातात खाऊ आहे असा संशय आला तर corridorमध्ये झुंडीने हल्ला करतात. आतापर्यंत त्यांना चितळे बाकरवडी, काका हलवाई बाकरवडी असे चवीचे फरक समजले असणार. (पुण्याची खूप मुलं आहेत कॅम्पसमध्ये). डार्विनचा सिद्धांत ह्या माकडांकडे बघून अगदी पटतो. माकडं कडी काढून खोलीत शिरतात, कुलरला तोंड लावून थंड पाणी पितात. खोलीत शिरली तरी phone, laptop ह्याकडे ढुंकून बघत नाहीत.
 

एक मुलगा हातात साबणाची पेटी घेऊन आंघोळीला जात होता. माकडं खाणं समजून मागे लागली. त्याला पटकन काय सुचलं, त्याने पेटी उघडून आतला साबण दाखवला, माकडं निघून गेली. एक मुलगा कूर्गला फिरायला गेला, घरी न्यायला त्याने दालचिनी आणली होती. माकडांनी खोलीत शिरून ती पिशवी फोडली पण खाता येत नाही हे कळल्यावर तिथेच ठेवली. एका महाशयांनी खिडकीत ठेवलेली डेटॉलची चपटी बाटली माकडांनी काय समजून प्यायली ते माकडंच जाणोत. त्या दिवशी बऱ्याच माकडांची पोटं बिघडली असणार. 
 

तिसरे सेमिस्टर चालू होते. अभ्यासाची व्याप्ती आणि काठिण्य पातळी वाढते. Assignments आणि submissions वाढलेली असतात. कॉलेजचीही वेळ वाढून आता जवळपास 8 ते 6 झालेली असते. Entrance exam एवढी कठीण का घेतली जाते, त्याचं उत्तर आता मिळायला लागतं. करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. पण वेळ मिळत नाही. घरी रोज होणारा फोन आता आठवड्यातून एक किंवा दोन अशा frequencyवर येतो. कुठलीच IIT study leave देत नाही. शेवटच्या दिवशी शिकवलेला अभ्यासक्रमही दुसऱ्या दिवशी परीक्षेला विचारू शकतात.
 

IITच्या आत शिरल्यावर खूप अभ्यास नसतो, एकदा आत आलं की life set असा एक गैरसमज आहे. दुसऱ्या तिसऱ्यापासून ते सातव्यापर्यंत प्रत्येक सेमिस्टर चढत्या क्रमाने कठीण होत जातं. त्यात आणखीन इकडली relative grading system. त्यामध्ये तुमच्या grades स्वतःबरोबर course-mateच्या performanceवर अवलंबून असतात. course-mateचा performance खाली गेला आणि आपला तेवढाच राहिला तरी आपली grade वर सरकते. RGगिरी करणे, हा ह्या जगातला रोजचा शब्द आहे. आठवतोय ना Three idiots मधला चतुर?
 

इकडलं जग super competitive आहे. जे आपले खास मित्र असतात, wing mate असतात, तेच closest competitor असतात. एकीकडे मैत्रीही खरी असते आणि दुसरीकडे पाय ओढाओढी चालू असते. (दोस्त fail हुआ तो बुरा लगता है, लेकीन दोस्त first आए तो उससेभी बुरा लगता है।)
 

इथे चांगलं टिकायला कुठल्या तरी groupचा भाग बनावं लागतं. हे group साधारण पहिल्या वर्षातच तयार होतात. तेच एकत्र wingmate म्हणून राहतात. हॉस्टेल मधे single room मिळणं, हॉस्टेल sports teamचा captain ह्या गोष्टी networkingच्या आधारेच होतात. 
 

इकडे येणारी मुलं कशी असतात? बरीचशी मुलं मध्यमवर्गीय मानसिकता असणाऱ्या घरातील असतात. पुस्तकी किडे नक्की नसतात. एखादा national levelचा chess player असतो, एखादा संगीतज्ञ असतो तर एखादा sportsman असतो. जे काही काम हातात घेतील, ते ही मुलं खूप dedicationने करतात. परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करणं, फसवाफसवी, हॉस्टेलमधे चोऱ्या होणं हे प्रकार अर्थातच सर्रास होतात. शेवटी मनुष्यस्वभाव आहे. सगळीकडे सारखाच असणार. 
 

एकूण पहिल्या वर्षी फुटणारे धुमारे दुसऱ्या वर्षी जरा मंदावायला लागतात. मुलं club मधे coordinator वगैरे होतात. ऐटीत freshersचे interview घेतले जातात. बऱ्याच clubना IITकडून दरवर्षी ठरावीक budget sanction झालेलं असतं. Club ज्या स्पर्धा घेतात, जी काही session conduct करतात त्यासाठी ते पैसे दिलेले असतात. ही सगळी कामं साधारण दुसऱ्या, तिसऱ्या वर्षातली मुलं करतात. Budget मुलंच calculate करतात. (बऱ्यापैकी budget स्पर्धक मुलांना frooti देणं अशा कामालाही जातं). करण्यासारख्या इथे खूप गोष्टी आहेत पण सगळ्यात आपण हात घालू शकणार नाही, हे जाणवायला लागतं. तरी interhostel, interbranch tournament होतात, त्यात जोरात भाग घेतला जातो.

     

दुसरं वर्ष संपतं. काही ब्रँचेसना internship करायची असते. ती असते तिसऱ्या वर्षानंतर. पण selection होतं जवळपास वर्षभर आधी. मुलं घरी आली तरी दोन महिने तयारी करत असतात. साधारण July महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लेखी परीक्षा चालू होतात. Semester चालू व्हायच्या दहाएक दिवस आधी मुलं कॅम्पसला पोचतात. रोजच्या चार पाच परीक्षा आणि interviewच्या प्राथमिक round होतात. कुठे गाडी पुढे पुढे सरकत असते तर कुठे initial round लाच rejection होतं. D dayच्या एकदोन दिवस आधी अगदी रात्रंदिवस बॅक टू बॅक interview चालू असतात. कुठे तिसरी राऊंड कुठे चौथी तर कुठे अगदी पाचपाच राऊंड होऊनही नकारघंटा मिळते. आशा निराशेचा खेळ चालू असतो. मुले प्रचंड प्रेशरखाली असतात. पालकांशीही अगदी सगळे शेअर करत नाहीत. Seniors चे सल्ले मात्र मुलं घेत असतात. जेवायला धड वेळ होत नाही. Internshipची drive साधारण एक आठवड्याची असते. त्याच्या पहिल्या दिवसाला day zero म्हणतात. त्या दिवशी अगदी पहाटेपासून ऑफर यायला सुरुवात होते. मग मात्र आनंदाने पहिला फोन घरीच केला जातो. बाबावाक्यम् प्रमाणम्  ह्या संस्कृतीत वाढलेल्या पालकांना मुलं आपल्याला consult करत नाहीयेत, निर्णय सांगताहेत हे पचवणं जरा जड जातं.  
 

हे सगळं आयोजित करत असते प्लेसमेंट कमिटी. प्लेसमेंट कमिटीच्या मुलांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. कंपन्यांना invite करणं, त्यांच्या executivesच्या राहण्याची व्यवस्था करणं, गेटवर त्यांना receive करणं, परीक्षा arrange करणं, interviewचे slot पाडणं अशी अनेक कामं असतातच. पण त्याचबरोबर ही मुलं बरोबरीच्या नात्याने कंपन्यांबरोबर negotiate करत असतात. कंपन्या कधीकधी pressure tactics खेळतात. ते झेलावे लागते. वीस वर्षाच्या आसपासची ही मुलं, तिशीच्या maturity नी वागत असतात. 
 

तसेच दुसरे नाव घ्यायलाच पाहिजे मराठी मित्र मंडळाचे. बाप्पांची प्राणप्रतिष्ठा अगदी थाटात करतात. विसर्जन मिरवणूक जोरदार काढली जाते. सगळे मराठी सणवार दणक्यात साजरे होतात. मराठी मनाचा मानबिंदू - नाटक. स्वतः मुलांनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं आणि अर्थातच अभिनय केलेलं नाटक दरवर्षी बसवलं जातं. गाण्याचे कार्यक्रम करतात. पहिल्या वर्षाच्या मुलांना हॉस्टेलमध्ये आल्याआल्या साधारण आजारपण येतं. त्यांना सर्वतोपरी मदत, अगदी गरज पडली तर admit करण्यापासून ही मुलं करतात.

          

2022 सालची बॅच campus मध्ये आली त्या वर्षी IIT Madrasला तीन महिन्यात चार आत्महत्या झाल्या होत्या. मुलंच काय आम्ही पालकही पार हबकून गेलो होतो. मराठी मित्र मंडळाचे दादाताई पालकांशी सतत संवाद साधत होते, त्यांना धीर देत होते. 
 

IIT Madrasला जवळपास 50% तेलुगु मुलं येतात. त्या खालोखालचा मोठा भाषिक group आहे मराठी मुलांचा. आनंदाची गोष्ट अशी की हा मराठी टक्का दिवसेंदिवस वाढतोय. 
 

तिसरं वर्ष चालू होतं. मुलं आता अगदी मुरलेली असतात. इथला अभ्यासक्रम flexible आहे. काही core courses वगळले तर जे elective courses करायचे असतात ते निवडायला खूप वाव असतो. एकदा निवडलेले विषय आवडले नाही तर drop करता येतात. Classmates असले तरी आता time table खूप वेगवेगळी झालेली असतात. तिसऱ्या वर्षी profचा (प्रोफेसर या शब्दाचा इथला short form) under graduate रिसर्च प्रोजेक्ट करता येतो. शिकवणारे सगळेच प्रोफेसर आपापल्या विषयात तज्ज्ञ असतात. तळमळीने शिकवतात. मुलांमध्ये north आणि south असे दोन गट असले तरी professors कधीही भेदभाव करत नाहीत. इथे शिस्त कडक असते. मित्राच्या सह्या मारणे (proxy मारणे) ह्याला कडक शिक्षा केली जाते. 
 

मुलं internship करून सातव्या सेमिस्टरला परत येतात. खिसे गरम असतात, कामाचा अनुभव मिळालेला असतो. Exposure खूप मिळालेलं असतं. काही जणांना pre-placement offer मिळते. ते सातव्या सेमिस्टरला थोडे निवांत असतात. Offer न मिळालेले निराश होतात. फार काळ निराश राहता येत नाही. ती झटकून अभ्यासाला लागावेच लागते. अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तशी आता फक्त placement असते. सगळी मौजमजा बाजूला ठेवली जाते. दिवाळीला घरी ये म्हटलं तर एक दिवसही मी वाया घालवणार नाही, असं उत्तर येतं. त्यातून सातव्या सेमिस्टरचा अभ्यास असतोच. मुलं दडपणाखाली आहेत ते घरच्यांनाही कळत असतं. मगाशी internshipच्या संदर्भात उल्लेख केला त्या grillमधून परत जावं लागतं. तावून सुलाखून घेतल्याशिवाय कुठलीच कंपनी ऑफर देत नाही. IITच्या जगात कुठलीच गोष्ट सहजसाध्य नसते. Opportunities ह्या मुलांना खूप मिळतात. दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत, sky is the limit अशा मिळतात. त्याला आत आल्यावरही तसेच कष्ट करावे लागतात. आपण मोठ्या पॅकेजबद्दल पेपरात वाचतो, त्याच्या पाठची जगाला न दिसणारी ही बाजू आहे. 
 

आठवं सेमिस्टर चालू होताना सगळ्यांच्या हातात नोकरी असते. पुढे शिकणार असतात त्यांच्या ॲडमिशन झालेल्या असतात. वेगवेगळ्या groupsच्या ट्रीपा निघतात. मुलं अगदी रिलॅक्स, थोड्या बेफिकीरीने वागायला लागतात. कारण नसताना lecture बंक करतात. पहिल्या सेमिस्टरला पेपर कसा गेला ते घरी कळवणारी पोरं, आता परीक्षेच्या तारखा त्याला तरी माहीत आहेत का असा प्रश्न पडतो. मेसचं दर्शन जेमतेम दिवसातून एकदा घडतं. बाकी swiggy, zomato जोरात चालू होतं. घरी यायचं तिकीट पहिल्या सेमिस्टरला जर महिनाभर आधी काढलं जात असेल, तर आता ते आदल्या दिवसांवर येतं. आता हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही, मित्रांची ताटातूट होणार म्हणून वाईटही वाटत असतं. इकडे आत शिरताना डोळ्यात पाणी असतं आणि बाहेर पडतानाही. 

        

IIT Madras ह्या संस्थेने माझ्या मुलाला काय दिलं? तर उत्तम शिक्षण, परदेशी internship करायची संधी, उत्तम नोकरी हे तर आहेच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवलं. जगात कसं वावरायचं, माणसं कशी ओळखायची, लोकांशी कसं बोलायचं, कोणाला कसं ॲप्रोच व्हायचं हे जे तो शिकला, ते घरी राहून कधीच झालं नसतं. मुलांचे नेतृत्वगुण घडवण्यात इथल्या क्लब आणि कमिट्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि सगळ्यात मोठा ठेवा असा की त्याला जिवाभावाचे मित्र इथे मिळाले. ही मैत्री आता आयुष्यभराची आहे. 

       

मुलं IIT Madras मधून बाहेर पडतील पण त्यांच्या मनातून institute कधीच बाहेर पडणार नाही.
--
गायत्री वैशंपायन
मे २०२६

Node read time
11 minutes

'न'वी बाजू Sun, 17/05/2026 - 09:12

एकंदर आढावा छान.

याव्यतिरिक्त, कँपसवरच्या रॅगिंग सीनबद्दल कुतूहल होते. परंतु, कितीही म्हटले, तरी हा लेख विद्यार्थ्याच्या पालकाच्या दृष्टिकोनातून असल्याकारणाने, (१) लेखिकेला याबद्दल प्रथमहस्त (अनुभव तर सोडाच, परंतु) माहिती(सुद्धा) असणे शक्य नाही, आणि (२) कितीही झाले, तरी विद्यार्थी याबद्दल (तपशीलवार तर सोडाच, परंतु जुजबीसुद्धा) माहिती पालकांस पुरविणार नाही. हा काही लेखिकेचा दोष नव्हे.

दुसरे म्हणजे, तेथील cul-festचाही काही ज़िक्र झालेला आढळला नाही. (Mardi Grasच म्हणतात ना त्याला? (चूभूद्याघ्या.) नाही! १९९६च्या सुमारास त्याचे ‘भारतीय’ पुनर्नामकरण होऊन ‘सारंग’ की कायसेसे केलेनीत्, असे गूगलशोधावरून कळते. धत् तेरी!) वास्तविक, अशा प्रकारच्या कँपसांवरील जीवनामध्ये cul-fest हे एक अतिशय महत्त्वाचे अंग असते. त्याचा उल्लेखसुद्धा नाही, हे खटकले. ही लेखातील एक मोठीच उणीव म्हणावी लागेल. (आयआयटी-मद्राससारख्या संस्थेवर, तेथील विद्यार्थिजीवनावर लेख लिहायचा, नि तेथील कलफेस्टचा साधा उल्लेखसुद्धा असू नये, म्हणजे मग हा लेख ‘मुक्तपीठा’करिता लिहून चुकून इथे प्रकाशित केला गेला आहे की काय, असे क्षणभर वाटून गेले. असो.)

आईबाबांबरोबर आलेली मुलं.

हा एक कॉमन सीन आहे खरा. (खरे तर ‘आईबाबांबरोबर आलेली मुले’ म्हणण्यापेक्षा ‘मुलांबरोबर आलेली आईबापे’ म्हटले पाहिजे.) मुलांच्या अंगी जर स्वतंत्र बाणा येणे असेल, तर (माझ्या मते) हे (शक्य तोवर) टाळले पाहिजे. (माझ्या वेळेस — म्हणजे, मी आयआयटी मद्रासला नव्हतो, परंतु, जेथे कोठे होतो तेथे — मी (पहिल्या वेळेससुद्धा) अट्टाहासाने एकटा गेलो होतो. (भारतासारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची स्थिती तुलनेने बऱ्यापैकी असलेल्या देशात हे शक्य आहे. (किंवा, निदान तेव्हा तरी शक्य होते. The socialist era certainly had its benefits.) फक्त, तोंड उघडता आले पाहिजे. (किंवा, ते येत नसल्यास, ते शिकण्याची हीच सुवर्णसंधी आहे!) आईबाप ही मुलांमधील स्वतंत्र बाण्याच्या विकासाच्या मार्गातली एक प्रचंड धोंड आहे. पण लक्षात कोण घेतो?)

(अर्थात, हे मी म्हणतो आहे खरा, परंतु, स्वतः बाप झाल्यानंतर, मुलगा जेव्हा गावाबाहेर कॉलेजात जायची वेळ आली, तेव्हा, (१) अंडरग्रॅडच्या प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस, आणि (२) पोस्टग्रॅडच्या किमान पहिल्या वर्षाच्या सुरुवातीस तरी, ‘व्यवस्था लावून द्यायला’ आम्ही उभयता जातीने टपकलेलो आहोत. अंडरग्रॅडच्या पहिल्या वर्षाच्या सुरुवातीस निदान अमेरिकेत सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेची अवस्था तितकीशी चांगली नाही (किंवा नसल्यागत आहे), ही (लंगडी?) सबब तरी होती. परंतु, दुसऱ्या वर्षापासून मुलाच्या हातात गाडी दिल्यानंतर काय गरज होती? जो मुलगा, कॉलेजच्या विविध उपक्रमांकरिता (उपक्रमांतील सहविद्यार्थ्यांबरोबर) गावोगावीच नव्हे, तर देशोदेशीसुद्धा आपलाआपला जाऊ शकतो, तो काय गाडी चालवत दोन तासांवरच्या कॉलेजच्या गावी जाऊ शकत नाही?

परंतु, नाही! आपण जर बरोबर गेलो नाही, तर आपल्या मुलाची आपल्या मदतीशिवाय साधी स्वतःची रूम नीट लावण्याचीसुद्धा लायकी नाही, ही प्रत्येक मराठी आईबापांची (आणि, त्यातसुद्धा, मराठी आयांची) ठाम समजूत असते. आणि मग ती self-fulfilling prophecy बनते. आणि मग, आपल्या मुलाला life skills नाहीत, life skills develop होत नाहीत, म्हणून शंख करायचा! (‘आम्ही कसे घडलो?’ हे आणखी वर! शिंच्यो, तुम्ही जे घडलात (म्हणजे, घडला असालच, तर — घडलातच, असा ठाम आरोप नाही!), ते तुमच्या आईबापांमुळे नव्हे, तर तुमच्या आईबापांच्या बावजूद, त्यांच्या नाकावर टिच्चून! पण हे यांना (म्हणजे, उदाहरणादाखल, आम्हालासुद्धा) कोण सांगणार? असो.)

साधी गोष्ट घ्या. इथे अमेरिकेत शिकायला बाहेरच्या देशांतून (अगदी भारतातूनसुद्धा, नि त्यातही मराठीसुद्धा) मुले येतात (म्हणजे, यायची. ट्रंपच्या जमान्यात इतःपर ते कितपत चालू राहील, ते सांगवत नाही. परंतु, तो वेगळा मुद्दा.), ती काय आईबापांना (‘खोली लावायला’!) बरोबर घेऊन? (अर्थात, आईबापांचा बस चलता, तो आईबाप तेथेही टपकले असतेच, म्हणा, परंतु, आर्थिकदृष्ट्या ते (बहुधा) शक्य नसावे.) त्यांचे सगळे सुरळीत चालतेच ना? मग अमेरिकेतच वाढलेल्या आमच्या मराठीअमेरिकन मुलांना (‘परंपरेने’) आईबापांच्या कुबड्या (‘खोली लावून द्यायला’) का लागाव्यात?

आमच्या मराठीअमेरिकन मुलांचेही सोडून द्या. खुद्द भारतात, एक निरीक्षण म्हणून विचारतो. आयआयटी मद्रासच्या कँपसवर मुलांबरोबर आलेल्या आईबापांबद्दल (किंवा, आईबाबांबरोबर आलेल्या मुलांबद्दल — Have it your own way!) तुम्ही बोललात. या मुलांच्या (किंवा rather या आईबापांच्या) प्रांतवार विभागणीबद्दल (अगदी काटेकोर नव्हे, परंतु सहज वरवरच्या निरीक्षणातून) काही अंदाज मांडता येईल काय? यांत मराठी आईबापांचा भरणा असल्यास आश्चर्य वाटणार नाही. झालेच तर, (कँपस दक्षिणेतले असूनसुद्धा) कदाचित काही तुरळक दाक्षिणात्य (विशेषतः तमिळ/तेलुगु, त्यातही शक्यतो काहीसे orthodox असल्यासच) आईबापही सापडणे अशक्य वाटत नाही. परंतु, मुलांबरोबर आलेले कितीसे पंजाबी/उत्तरप्रदेशी/बिहारी आईबाप तुम्ही पाहिलेत?

माझ्या मते, मराठी माणसाचे ‘गांडू’, ‘मुखदुर्बळ’ असे जे एक self-perception आहे — आणि, हे एक अत्यंत काळजीपूर्वक बिंबविलेले असे self-perception असून, त्यात फारसे खोटे असेही काही नाही! — त्याला प्रामुख्याने दोन घटक कारणीभूत आहेत. एक म्हणजे मराठी आईबाप, आणि दुसरे म्हणजे विविध मराठी अस्मितावादी पक्ष! (पैकी दुसऱ्या घटकाचे स्पष्टीकरण निदान ‘स्वार्थी vested interests’ असे तरी देता येते; पहिल्या घटकामागील कारण काही केल्या समजत नाही.) मराठी माणूस ज्या दिवशी ‘अवघा भारतचि माझा देश’ नि ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणून घाऊक भावात (आईबापांना ‘घर लावायला’ म्हणून बरोबर येऊ न देता) उत्तरप्रदेशात, बिहारात, गुजरातेत, नि भारताबाहेरसुद्धा जगातल्या वाटेल त्या खड्ड्यात जाऊन धडकू लागेल, त्या दिवशी ‘हे भय्ये नि बिहारी मुंबईत नि महाराष्ट्रात येऊन हिंदीत बोलतात; त्यांना ठोका!’ वगैरे फालतूपणा आपोआप नि ताबडतोब बंद होईल. (त्या भय्यांच्या नि बिहाऱ्यांच्या, झालेच तर गुजरात्यांच्या, पार्श्वभागांत निदान दम तरी आहे; तुमचे काय लेको? मुंबईत बसून ‘परप्रांतीयां’वर गुंडगिरी करणे हा केवळ संघटित गांडूगिरीचा परिपाक आहे; दुसरे काहीही नाही!) तसे झाल्यास या प्रादेशिक अस्मितावादी पक्षांचे दुकान बंद पडेल, त्यामुळे ते होऊ दिले जाणार नाही, हा भाग वेगळा.

परंतु, कदाचित, कोणास ठाऊक, न्यूयॉर्कर साप्ताहिकातल्या एका पुरातन परंतु सुप्रसिद्ध व्यंगचित्राच्या पंचलाइनीस अनुसरून, Perhaps, we do not have an inferiority complex; perhaps, we are inferior. आणि, हे असेच जगाच्या अंतापर्यंत चालू ठेवण्यात अस्मितावादी पक्षांचे हितसंबंध गुंतलेले असल्याकारणाने, ते ‘मराठी माणसा’स मुंबईत बसून उदरनिर्वाह करण्यापुरत्या वडापावच्या गाड्या काढून देतील (त्याने वेळप्रसंगी राडा करण्याची वेळ आल्यास हक्काच्या बांधील गुंडांची फौज निर्माण होते.), परंतु, मुंबईबाहेर/महाराष्ट्राबाहेर/भारताबाहेर जाऊन धडक देण्यास सक्षम करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण/wherewithal कधीही देणार नाहीत! म्हणायला काय जाते, ‘छत्रपती शिवाजीमहाराजांचा महाराष्ट्र’ म्हणून? छत्रपती शिवाजीमहाराज शूर होते, हे निर्विवाद आहे. त्यांनी सुरतेला जाऊन धडक मारली, झालेच तर निजामशाही, आदिलशाही, अगदी मुघल सल्तनतीससुद्धा भिडून शह दिला; ‘मी मुंबईतच/पुण्यातच/महाराष्ट्रातच राहणार’ म्हणून वडापावची गाडी नाही टाकून बसले! (आणि, जेथेजेथे म्हणून धडक मारायला गेले, तेथेतेथे ‘घर लावायला’ म्हणून जिजाऊंना नाहीतर शहाजीराजांना बरोबर घेऊन गेल्याची नोंद निदान इतिहासात तरी नाही!) पण, ‘शिवरायांच्या महाराष्ट्रा’त आज हे बोलायची सोय आहे काय?

निदान, मराठी आईबापांनी तरी (पदोपदी ‘घर लावावया’स जाऊन) मराठी माणसाच्या खच्चीकरणास हातभार लावू नये, असे मनापासून वाटते. परंतु, Charity begins at home, आणि, तिथेच बोंब असल्याकारणाने (यात yours trulyचा दोष निदान अंशतः तरी नाकारता येणार नाही, परंतु), ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान’ला फारसा अर्थ नाही.

असो. माझी रँट पुष्कळ झाली.)

एकदा अशाच एका फ्रेशर्सच्या groupला एक mentor sir कॅम्पसवरच्या एका ठेल्यावर दुपारी चहासाठी घेऊन गेले. तुम्हाला काय हवे ते घ्या, सरांनी सांगितले. ठेल्यावर सगळ्या पाट्या वाचल्या आणि काही आवाज आले, बोर्नविटा, बूस्ट, कॉम्प्लान.

हाहाहा! Mamma’s boys स्साले!

(‘आमच्या जमान्या’त असे घडले नसते. एक तर आम्हाला ‘मेंटर सर’ वगैरे प्रकार नसे. (रॅगिंग करणारे सीनियर्स अवश्य असत.) दुसरे म्हणजे, ‘आमच्या जमान्या’तल्या एखाद्या फ्रेशरास चुकून बोर्नव्हिटा नाहीतर काँप्लान प्यावेसे वाटले जरी असते — there is, after all, no accounting for tastes — तरीसुद्धा, तो ते स्वतः विकत आणून प्यायला असता. (आणि, एखाद्या सीनियराच्या उपस्थितीत जर का हे घडले असते, तर संबंधित फ्रेशराची त्यावरून इतकी रॅगिंग झाली असती, की त्यानंतर उर्वरित आयुष्यात त्याने पुन्हा कधीही बोर्नव्हिटा नाहीतर काँप्लानचे नाव आपल्या तोंडून स्वखुशीने काढले नसते. आमच्या काळचे सीनियर्स फ्रेशरांच्या मानसिक जडणघडणीची जबाबदारी आत्यंतिक गांभीर्याने घेत. असो.)

एकदा एक फ्रेशर मुलगा आईला फोनवर म्हणाला…

‘आमच्या जमान्या’त मोबाईल तर नव्हतेच, परंतु, साधा फोन लावणेसुद्धा सोपे नव्हते. (वॉर्डनच्या घरी जाऊन त्या बिना-डायलच्या हँडलवाल्या फोनमधून — Rural exchange! — एक्स्चेंजमध्ये ट्रंककॉल बूक करून तो लागण्याची वाट पाहात बसावे लागले असते. तेवढी फाईट कोण मारतो?) त्यामुळे, पोष्टकार्डे नि अंतर्देशीय पत्रे हीच काय ती दळणवळणाची साधने! (त्यात पुन्हा, एखादे वेळेस पत्र पाठवायचे जर राहून गेले, तर आपले चिरंजीव निश्चित गचकले असावेत, या खात्रीने (मराठी पालक!), आमचे पालक तारा पाठवणार. (त्या काळी भारतात तारा होत्या.) उच्छाद!)

आमच्या हॉस्टेल मधे काल लाइट गेले. मग काय केलेत तुम्ही, आईने विचारले. मग आम्ही लपाछपी खेळलो. असे ते मूल अधूनमधून डोके वर काढते.

‘प्रौढत्वी निजशैशवास जपणे’…

आमच्या कँपसवर दिवे जाणे सर्रास चालायचे. अशा वेळेस आमच्या विंगची टीम आणि आमच्या समोरच्या हॉस्टेलमधल्या आमच्याकडे तोंड करून असलेल्या विंगमधील टीम, त्या अंधारात उच्चरवात तमिळ भाषेतील यच्चयावत शिव्यांच्या भेंड्या खेळायचो. (कँपस जरी हिंदी पट्ट्यातले असले, तरी टक्केवारीने कँपसची डीफॉल्ट मातृभाषा तमिळ होती.) आणि मग, सरतेशेवटी जेव्हा दिवे यायचे, तेव्हा ‘चांगल्या खेळा’बद्दल प्रतिस्पर्धी टीमचे अभिनंदन करून, पुढील संधीस खेळ पुन्हा चालू ठेवण्याच्या बोलीवर, मेसमध्ये निमूट गिळायला जायचो.

परंतु एकंदरीतच, आमच्या पिढीला पुढच्या पिढ्यांच्या तुलनेत (पुढच्या पिढ्यांच्या तुलनेतच, अर्थात!) मॅच्युरिटी अंमळ अधिक असावी की काय, कळत नाही. पुढच्या पिढ्या त्या मानाने लाडावलेल्या वाटतात. (असे प्रत्येकच पिढी आपल्या पुढच्या पिढ्यांबद्दल म्हणते, म्हणा! आमच्या आईबापांची पिढीदेखील आमच्या पिढीबद्दल हेच म्हणत असे. (आणि आमची पिढी, ‘लेकाच्यांनी काय दिवे लावलेत त्यांच्या जमान्यात, ते दिसतेच आहे!’ म्हणून त्यांची पाठीमागे — तोंडावर बोलण्याची हिंमत तथा सोय, दोन्ही नसत. — वासलात लावीत असे. (म्हणजे साधारणपणे, विद्यमान सत्ताधारी ज्याप्रमाणे न्हेरूंच्या नावाने खडे फोडतात, तद्वत.)) त्यामुळे, पुढील पिढ्यांनी आमच्या या रँटला अजिबात जुमानू नये. असो.)

आता घरचे आजूबाजूच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला जाणार असतात. विद्यार्थी / विद्यार्थिनी त्यांच्या हॉस्टेलमध्ये. मुलांची हॉस्टेलमधली पहिलीच रात्र. डोळ्यात पाणी आले तरी ते लपवण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला असतो.

हॅहॅहॅ… Seriously?

आजकालची मुले आमच्या वेळच्या मुलांहून फार वेगळी जर नसतील, तर, ‘कधी टळतात हे लेकाचे’ याहून वेगळी अशी कोठलीही भावना त्या समयी त्यांच्या ठायी असणे शक्य नाही. (अन्यथा, महाराष्ट्र दिवसेंदिवस रड्या होत चालला आहे, या निष्कर्षाप्रत नाइलाजाने यावे लागते.)

(हॉस्टेलमधल्या पहिल्या रात्री जर आईवडील (फार दूर नव्हे, तर जवळच्याच हॉटेलात) जाणार म्हणून या मुलांच्या डोळ्यांत पाणी येणार असेल, तर मग खरोखरीच्या पहिल्या रात्री ही मुले काय ‘मम्मीऽऽऽऽऽऽ’ म्हणून हंबरडा फोडतील की काय, असा प्रश्न पडतो. ती ‘“आई” म्हणोनि कोणी’ वगैरे जी काही कविता आहे, ती बहुधा असल्याच एखाद्या प्रसंगांचे (हृदयद्रावक!!!) वर्णन करीत असली पाहिजे. (मराठी कवी, स्साले!) चालायचेच.)

काही लागले तर फोन कर, आम्ही बाजूलाच आहोत असे पालकांनी सांगितलेले असते. कितीही वाटले तरी फ़ोन केला जात नाही.

आणि, का करत नसतील, असे वाटते?

(Try to take a hint at least once in your life…)

आपल्या रस्त्यावर कुत्रे दिसावेत तशी हरणे बागडत असतात. (आश्चर्य म्हणजे IIT Madras मध्ये अजिबात कुत्रे नाहीत).

आमच्या कँपसवर मोर बागडत. (Point blank rangeमध्ये (नि पहाटेपहाटे!) ऐकण्याची वेळ आल्यास अत्यंत कर्कश वाजणारा पक्षी! मान मुरगाळण्याची इच्छा होत असे, परंतु, दुर्दैवाने भारतात तो गुन्हा असल्याकारणाने करता येत नसे.)

आणि हो, आमच्या कँपसवर भटकी कुत्रीसुद्धा पुष्कळ होती. कोणाच्याही मालकीची नसलेली, परंतु सर्वांनी सामायिकपणे अनधिकृतरीत्या पाळलेली.

ओरिएंटेशन सेशन उत्साहाने अटेंड केले जाते, प्रत्येक प्रोफेसर अभिमानाने आम्ही NIRF-1 आहोत, स्पोर्टसमध्ये overall championship बरेचदा आम्ही जिंकतो असे सांगत असतात. उत्साहाच्या त्या दणक्यात मेसमधले जेवणही चांगले लागते.

प्रत्येकच सेमिस्टरला पहिले एकदोन आठवडे मेसमधले जेवण बरे लागते, नि त्यानंतर उतरती कळा लागते, हा वैश्विक नियम आहे. ओरिएंटेशन, उत्साह, अथवा नव्याची नवलाई वगैरे भानगडींशी त्याचा काहीही संबंध नाही.

मुलांचे वजन कमी होण्यामध्ये मेसचा खूप मोठा वाटा आहे. कुठलीही भाजी असली तरी त्याची चव सारखीच असते. ग्रेवी (म्हणजे पाणीच) unlimited असली तरी पनीर, चिकन असा शेलका माल रेशन केलेला असतो. तो कँटीनवालेच वाढतात.

मेसमधील जेवणाचे वर्णन जरी बऱ्यापैकी वैश्विक (आणि, आमच्याही जमान्यातील मेसमधील जेवणाच्या वर्णनाशी बऱ्यापैकी मिळतेजुळते) असले, तरीही, आमच्या वजनाच्या बाबतीत ते घटण्याऐवजी ते वाढण्यात त्याचा खूप मोठा वाटा होता. याला कारण जेवणात ubiquitous असणारे बटाटे आणि राजमा. (Cheap raw materials!) Nausea येण्याइतका अतिरेक असे. (वास्तविक, तसे पाहिल्यास राजमा हा प्रकार अतिशय चांगला लागू शकतो. लेकिन, माहौल ही कुछ ऐसा था, त्याला काय करणार?)

आणि, जेवणातील मतलबाचे पदार्थ जरी राशन होत असले, तरी, मेसबिलात अधिक चार्जकरिता नोंद करून ‘एक्स्ट्रा’वर घेण्याची तरतूद असेच. मिल तो वैसे मिलने के लिए कुछ भी और कितना भी सकता था, सिर्फ़ उस के लिए ज़्यादा पैसा टिकाना पड़ता था।

पोळ्यांना कुठल्याही स्निग्ध पदार्थाचा अंशही नाही.

‘आमच्या जमान्या’त हिंदुस्थानात ‘डालड्या’च्या वापरावर बंदी नव्हती. असो.

ब्रेकफास्टला एकच अंडे मिळते. (बाकी इडली, उपमा वगैरे अनलिमिटेड असते).

मेसबिलातून (जास्तीच्या प्रत्येक अंड्याकरिता) जास्त पैसे टिकविण्याची तयारी असल्यास वाटेल तेवढी अंडी ‘एक्स्ट्रा’वर मिळण्यास काहीही अडचण नसावी. (आमच्या मेसमध्ये मी अनेकदा घेतलेली आहेत.) अर्थात, सकाळीसकाळी वाटेल तेवढी अंडी कोणाला हवी असतात, म्हणा!

एक अंडे किंवा कॉर्नफ्लेक्स ह्यापैकी एकच घेता येते. (ह्यामागे काय फंडा आहे ते अजून मला कळले नाही).

कदाचित, व्हेज मेस(विभाग) विरुद्ध नॉनव्हेज मेस(विभाग)? (चूभूद्याघ्या.)

कुठल्याच गोष्टीची चव मराठी जिभेला रुचत नाही.

हं! मराठी जीभ!!!

मराठी जिभेला नक्की काय रुचते?

ही जी ‘मराठी जीभ’ आहे ना, ती एक अत्यंत लाडावून ठेवलेली, झापडबंद चीज आहे. सक्तीने हॉस्टेलवर पाठवली पाहिजे, तर (आणि तरच!) वठणीवर येईल.

(‘जिभेचे चोचले’ हा वाक्प्रयोग खासा मराठी असला पाहिजे!)

(अवांतर: कधी माशी पडलेली मॅगी खाल्ली आहेत काय? (कोणाची इच्छा असल्यास तो (अति)प्रसंग रंगवून रंगवून सांगेन. अवश्य कळवावे.))

IIT Madrasला जवळपास 50% तेलुगु मुलं येतात.

(पुण्याची खूप मुलं आहेत कॅम्पसमध्ये)

आमच्या (हिंदी पट्ट्यातील) कँपसवरील ५०% ते ६०% मुले ही मद्रास (आताचे चेन्नई), मदुराई, अथवा नैवेलीहून येत. (अर्थात, कँपसवरील व्यवहारभाषा जरी हिंदी असली, तरी डी फॅक्टो बोलीभाषा ही तमिळ असे.) त्यानंतरचा मोठा भाषिक गट म्हणजे तेलुगु. (तेव्हाच्या आंध्रप्रदेशातून, अर्थात आजच्या आंध्रप्रदेश अधिक तेलंगणातून, येणारी मुले.) त्यानंतर मग दिल्लीकर, उत्तरप्रदेशी, बिहारी, थोडेबहुत बंगाली. त्यानंतर कोठे महाराष्ट्राचा नंबर लागत असे. मराठी टक्का बोले तो ३% ते ४%, बहुतांशी नागपूरकर, थोडेबहुत मुंबईकर. पुण्याचे विद्यार्थी बोले तो प्रत्येक बॅचमध्ये एक किंवा फार फार तर दोन. (कोणत्याही एका घटकेस कँपसवर पुण्याहून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १०हूनसुद्धा पुष्कळ कमी भरावी.)

(पण, हे सगळे मी का सांगतोय?)

असो. आता कंटाळा आला. लेखातील आणखीही काही परामर्श घेण्यालायक मुद्द्यांचा परामर्श घ्यायचा चुकून जर राहिलाच असला, तर (सवडीने) पुन्हा कधीतरी.

मात्र, सरतेशेवटी,

मुलं IIT Madras मधून बाहेर पडतील पण त्यांच्या मनातून institute कधीच बाहेर पडणार नाही.

काय म्हणता!

पुण्याबद्दल (विशेषेकरून ४११०३० पिनकोडाबद्दल) अगदी अस्सेच म्हटले जाते. बोले तो, माणूस ४११०३० पिनकोडातून बाहेर पडेल, परंतु, ४११०३० पिनकोड माणसातून कधीही बाहेर पडणार नाही.

असो चालायचेच.


तळटीपा:

‘चिरंजीव’ आणि ‘गचकणे’ यांतील विरोधाभास, आमच्या दोन्हीं पालकांचे (आणि, विशेषेकरून, आमच्या तीर्थरूपांचे) मराठी उत्कृष्ट असूनसुद्धा, दोघांच्याही डोक्यात बापजन्मी शिरला नसता. चालायचेच.

वस्तुतः, त्यांना ‘भेंड्या’ म्हणणे योग्य नव्हे. कारण, भेंड्यांमध्ये अंत्याक्षरीचा फॉर्मॅट असतो. म्हणजे, एका शिवीचे शेवटचे अक्षर हे पुढील शिवीचे पहिले अक्षर पाहिजे. तसे खेळणे हे अवघडच नव्हे, तर जवळजवळ अशक्य झाले असते. आम्ही जे खेळायचो, त्यास फार फार तर ‘सवालजवाब’ म्हणता येईल. असो.

स.प. महाविद्यालय पोष्ट ऑफिसाच्या अखत्यारीत येणारा विभाग. थोडक्यात, सदाशिव-नारायण-शनवार.

प्रभुदेसाई Sun, 17/05/2026 - 11:08

In reply to by 'न'वी बाजू

का कुणास ठाऊक मला तारक मेहताच्या एकमेव भिडेची आठवण झाली. "हमारे जमानेमे..."
बर ते जाऊ द्यात. कुणी IIZ म्हणजे "Indian Institute of Zombies" हा सिनेमा निदान ट्रेलर तरी बघितला आहे का? त्याचीही मला आठवण झाली.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/i…