झुंड ची प्रतिकात्मकता

मी चित्रपट समीक्षक नाही. चित्रपटाचा रसास्वाद कसा घ्यावा याचा कोणताही अभ्यासक्रम कधीही मला अभ्यासाला नव्हता. भारतियांचे चित्रपटाचे वेड आणि त्यातून प्रत्येकाचे असणारे आकलन असाच माझाही प्रवास झालेला आहे. अन्य समाजमाध्यमात झुंड कसा दिसला याबद्दल लिहीले आहे. तेच इथे डकवतो आहे.

नागराज सिनेमा कसा बनवतो ?

कादंबरी लिहीण्याचे अनेक फॉर्म्स असतात. गोष्ट सांगण्याची एक शैली असते. पण सिनेमा ही वेगळीच भाषा आहे. ती आजमितीस भारतात सर्वात जास्त कळालेला दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. साऊथचे ताकदीचे दिग्दर्शक देखील गावकुसाबाहेरचे सिनेमे अत्यंत ताकदीने दाखवतात. ते ही प्रतिमांचा वापर करतात.

पण सिनेमा हे शास्त्र जेव्हढे नागराज कोळून पिला आहे ते माझ्या पाहण्यात अन्य कुणी नाही. उदाहरण म्हणून कर्णन आणि असुरनशी याची तुलना करूयात. असुरनपेक्षा कर्णन मधे प्रतिकांचा वापर मुक्त आहे. प्रतिकांमधून दिग्दर्शक खूप खूप बोलला आहे. हे दृश्य असे अव्यक्त संभाषण आहे. पण गोष्ट मांडण्यासाठी कर्णन आणि असुरनकडे एक ताकदवान घटना आहे जिची कथा चित्रपटाचे सूत्र घट्ट पकडून ठेवते.

नागराजच्या झुंडची पटकथा आश्चर्यजनक आहे. तिला ठराविक अशी गोष्टच नाही. ज्यांनी हा चित्रपट फुटबॉल साठी झालेले ट्रान्सफॉर्मेशन म्हणून पाहिला त्यांना नागराज समजलेला नाही. काहींना तर हा सिनेमा डॉक्युमेण्टरी वाटला. या सर्वांचे शिक्षण होण्याची गरज आहे. म्हणूनच सुरूवातीला प्रश्न विचारला आहे कि,

नागराज सिनेमा कसा बनवतो ?

यात रिंकू राजगुरूचे एक पात्र आहे. मोनिका नाव असते तिचे. तिचे सिलेक्शन केले जाते. पण पत्ता शोधत आदिवासी पाड्यावर जावे लागते. यात बच्चन आयुष्यात पहिल्यांदा बैलगाडीत बसला असावा. बसंतीच्या टांग्यात बसला होता पण त्यात मऊ मऊ कापूस होता. बच्चन सारख्या सुपरस्टारला बैलगाडीत बसवण्याची किमया नागराजने केली आहे कारण त्याला ते दृश्य हवे होते. जिथे बैलगाडीच जाऊ शकते अशा ठिकाणी राहणार्या मोनिकाचे जग त्याला दाखवायचे होते.

इथे नागराजची चतुराई अशी कि त्याने मोनिका आणि तिच्या घरचे आपसात काय बोलतात ते आदिवासी भाषेत दाखवले आहे. त्याला जाणीवपूर्वक सबटाय़टल्स नाहीत. आवश्यकता नाही म्हणून ? छे !
त्याने हे सांगायचा प्रयत्न केला आहे कि ही महाराष्ट्रातच बोलली जाणारी भाषा आहे. ही भारतीय भाषा आहे. ही पण मराठी आहे. पण ही भाषा तुम्हाला समजत नाही. आणि तुमच्या अशा अपेक्षा आहेत कि तुमची प्रमाण भाषा या लोकांनी, जिथे बैलगाडी सुद्धा जात नाही, तिथे राहणा-यांनी शिकून कागदपत्रे जमा करावीत, तुमच्या डिजिटल इंडीयाच्या सेंटरवर पायपीट + बैलगाडी + एसटी अशा वाहनांनी यावे आणि स्वत:ला सिद्ध करावे. यांचे मेरीट नाही म्हणून शिमगा करणा-यांना हा संघर्ष किती पातळ्यांवर आहे हे दाखवण्याचा जो विस्तीर्ण पट आहे त्या चित्रपटाचे नाव झुंड आहे.

हा संघर्ष म्हणजे झुंड !!
हा संघर्ष दाखवण्यासाठी त्याने फूटबॉलच्या टीमच्या पात्रांची रचना अशी केली आहे कि ज्यातून त्याला जे जे सांगायचे आहे ते ते सर्व सांगता येईल. बारामतीच्या आमराईत अस्पृशोद्धार सोसायटी आहे. आताशा नाव बदलले आहे. गेली कित्येक वर्षे या वस्तीने पवारांना निवडून दिले. पण इथे आता आता पर्यंत डुकरं आणि गटारं वाहत होती. घरं आहेत पण रया गेली आहे. सार्वजनिक संडास आत्ता बांधले. नाहीतर घाणीचे साम्राज्य होते. बारामतीचा एसटी स्टॅण्ड ओलांडून पुढे येऊन वस्ती संपताना डाव्या बाजूला खाली उतरले की हे दृश्य दिसते. उजवीकडे हिरवीगार शेती. ऊस. मोठ मोठे बंगले. कोट्यवधींचा पैसा. बारामतीच्या एकेका पठ्ठ्याने पुणे मुंबईत जागा घेऊन ठेवल्यात. एकाने भोसरीत इंडस्ट्रीयल इस्टेट टाकली आहे. मॉल्सच्या जागा त्यांच्या आहेत. दुसरीकडे हे दृश्य आहे.

हे झुंड मधून एरीयल व्ह्यू ऎंगल ने दिसते. अनेक लॉंग शॉट्स मधून ते ठळक होत राहते. क्लोज शॉट्स मधून चेह-यावरचे भाव पकडत राहते. झोपडपट्टीत फिरताना लो अ‍ॅंगलने घाण आणि कचरा टिपत राहते. हा आहे सिनेमा. ही आहे सिनेमाची भाषा. सुधाकर रेड्डी आणि नागराज ही जोडी जणू काही एकमेकांसाठीच बनलेली आहे.

झोपडपट्टीचे वास्तव दाखवताना स्क्रीन वर रखरखीत दृश्ये येत राहतात. तेच डॉनची आयटेम दिसल्यावर झाडाची हिरवी पाने दिसतात. हे बारकावे फार दंग करुन टाकतात.

विजय बारसे सरांनी फुटबॉलची टीम बनवली आणि त्यांच्यात बदल केला ही एका सामान्य दिग्दर्शकाची पटकथा झाली असती. पण नागराज त्याच्या पुढे जातो. तो बारसे सरांना एकेका खेळाडूची माहिती विचारतो. त्याच्या डोक्यात आराखडा तयार होतो. पात्र तयार होतात. मग ही पात्र तो नागपूरच्या झोपडपट्टीतच शोधतो. हीच मुलं या सिनेमाला न्याय देतील म्हणून नागराज आणि त्य़ाचा भाऊ वस्तीत जाऊन फिरत राहतात. काही वेळा मुलं त्यांना पोलीस समजून पळत सुटतात. त्यांना आपलंसं करत सिनेमासाठी तयार करतो.

सर्वच पात्रांची कहाणी दाखवण्याची गरज नाही. पात्रांची कहाणी ही भारतातल्या सर्वच झोपडपट्ट्यांच्या संघर्षाची कहाणी आहे. बाकी नाजराज टच ठिकठिकाणी आहे. त्याबद्दल बोलूच आपण.

त्यापैकी एक म्हणजे कॉलेजमधून कचरा वस्तीत फेकला जातो पण वस्तीतल्यांना कॉलेजमधे प्रवेश नाही. हा विरोधाभास एकूणच शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक दरी यावर भाष्य करतो. जागतिक महासत्तेला आरसा दाखवतो.

डिजिटल इंडीयाचा बोर्ड, पहचान पत्र के लिए पहचान चाहीए हा डायलॉग.

क्रिमिनल रेकॉर्ड मुळे पासपोर्टच काय अनेका ठिकाणी नाकारली जाणारी संधी. हा एक वेगळ्या सिनेमाचा विषय आहे. नोकरीसाठी व्हेरीफिकेशन आले तर पोलीस पैसे मिळाल्याशिवाय पाठवत नाहीत. पो व्हे वेळेत आले नाही म्हणून संधी जाते. हे प्रकार अशा वस्तीच्या माथी असतात. सदाशिव पेठेत पोलिसाची हिंमत होत नाही. नोकरी जाईल त्याची.

फूटबॉलच्या मॅचसाठी लग्नातल्या वरातीसारखे सजून आलेले सैन्य.

संधी शोधण्यासाठी परदेशात गेलेला अमिताभचा मुलगा तिथे पहिलेच वाक्य ऐकून खजील होतो तो क्षण. मी परदेशात संधी शोधायला गेलो आणि बाबाने (वडीलांनी) घरात बसूनच आंतरराष्ट्रीय संधी निर्माण केली. हा भयंकर सकारात्मक भाग आहे. नागराज इथे सोल्युशन्स पण देतो.

मंत्र्याला इंटरनॅशनल स्लम सॉकर ऑलिंपिक काय असते हे ही ठाऊक नसणे. त्यासाठी सिलेक्शन होणे हे देशाचा गौरव आहे हे त्याच्या गावीही नसणे. कारण त्यात झोपडपट्टी हा शब्द आहे. झोपडपट्टी म्हणजे आपले नाही. तो देशाचा भाग नाही. तो इव्हेंट देशाचा सन्मान नाही हा त्याचा समज. मंत्र्याचाच नाही अनेकांचा हा समज आहे. तिथे आमिताभ बच्चन उठून येतो, फार बोलका प्रसंग आहे.

यात कुठेही ऑलिंपिकचे सामने दाखवलेले नाहीत. फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. नागराज स्टाईलने.
झुंडीकडे एक शिक्षक योग्य दृष्टीकोण ठेवून जरासे लक्ष काय देतो, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. एक खेळच नाही , विविध क्षेत्रात जर असे लक्ष दिले तर झोपडपट्ट्यातली अनेक मुले ही भिंत ओलांडतील.

हे झाले नागराजच्या सिनेमाचे ठळक बिंदू.
या निमित्ताने नागराजने न बोलता केलेले अनेक ठिकाणचे भाष्य सुजाण प्रेक्षकाला विचार करायला लावेल.

या निमित्ताने देवयानी खोब्रागडेचे स्मरण होते. तिला झालेली शिक्षा योग्य होती असे तावातावाने सांगणारे एन आर आय पब्लिक. देवयानी स्वत: एक लाख रूपये मिळवत असताना तिने मेडला साडेचार लाख रूपये द्यायला हवेत असे म्हणत होते. ही मंडळी भारतात मेडला मेट्रो सिटीत सहा हजार रूपये देतात कारण कायदा. देवयानी किमान ३०००० रूपये देत होती. आता तर प्रचंड महागाई झाली आहे.

जर अमेरिकेचे हे कायदे इथे आणले तर तुम्हाला भांडीवाली पाहीजे ना ? मग तिच्या घराची व्यवस्था करा हा कायदा केला पाहीजे. ड्रायव्हर पाहिजे ? त्याला रहायला रूम द्या किंवा क्वार्टरची व्यवस्था करा. सोसायटीने सोसायटीत येणा-या कामगारांसाठी जागेची व्यवस्था केली पाहीजे. असे झाले तर झोपडपट्ट्याच राहणार नाहीत.

इथे लोक इतके इंटरनॅशनल आहेत कि झोपडपट्टीत राहणा-यांबद्दल काय वाट्टेल ते बोलतात. पण आपल्या कामवालीला दीड हजार रूपये महिना देतात. या पैशात तिने काय नरीमन पॉईण्टला लाख रूपये भाडं भरून स्टुडीओ अपार्टमेण्ट घ्यायचं का ? तुमच्य़ा टाऊन प्लानिंगमधे कामगारांचे क्वार्टर्स हा कन्सेप्टच नाही. ज्याच्या घरी कामगार असेल त्याने सोसायटीला त्या क्वार्टरचे पैस भरावेत. कि नरीमन पॉईण्टला बावाजीकडे भांडी घासायला येणा-या ड्रायव्हरने खोपोलीवरून साडेसहाच्या ठोक्याला हजर रहायचे ? ते ही रात्री दीडपर्यंत साहेबाची सेवा केल्यावर ?

असे अनेक प्रश्न आहेत.
ऑनलाईन एज्युकेशन मधे महाराष्ट्रातल्या १२००० वाड्या वस्त्या आणि गावात नेटवर्क नसल्याचे समोर आले आहे. देशात हे प्रमाण प्रचंड आहे. यांचे जे नुकसान झाले त्याचे काय ? खासगी शाळेत महाग शिक्षण मिळत असताना सरकारी शाळा बंद केल्या आहेत. तिथे या धेंडांच्या शाळा येणार आहेत.

यात ज्यांची मुले शिकत होती ते सर्व जातीधर्माचे निम्न आर्थिक वर्गाचे लोक आहेत. ते सगळे बौद्ध नसतात. मुसलमान आहेत. मराठा आहेत. धनगर आहेत. सर्व आहेत. उच्चवर्णिय नावाला असतील.

या सर्वांचे म्हणणे नागराज मांडतो. त्यामुळे तो त्यांचा सिनेमा होऊन जातो. तो दणकून आपटला असा आनंदोत्सव करणारे भारतातून हाकलून दिले पाहीजेत. यांचा देशच नाही हा.

हे कुठल्याच अर्थाने समीक्षण नाही. कारण झुंड पण नेहमीच्या पद्धतीचा चित्रपट नाही. इथून पुढे चित्रपट पाहण्याची सवय बदलावी लागेल हा संदेश झुंड देतोय. सिनेमा पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षकाला प्रगल्भ व्हावे लागेल.

सांगायला आनंद वाटतो कि ज्यांच्या परीक्षणांकडे दृढ्ढाचार्य मंडळी कुत्सित नजरेने पाहत होती त्याच झुंड मधल्या पात्रांप्रमाणे असणा-या फेसबुकनगरीतल्या भिंतीपलिकडच्यांना हा सिनेमा बरोब्बर समजला आहे.

तो फूटबॉलची गोष्ट नाही हे अनेकांनी ओळखले आहे. अभिनंदन !!
शेवटी नागराज खूप खूप आभार !!

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विषयावर प्रतिक्रिया सवडीने लिहीन.
सध्या अवांतर: - पहिल्याच वाचनात 'कोळून पिला' वाचल्यावर मुंबईतले पिला हाऊस आठवले. प्ले हाऊसचा अपभ्रंश होऊन सामान्य लोक पिला हाऊस म्हणायला लागले. त्यातून कामाठीपुऱ्याच्या जवळ असल्याने उगाचच वेगळा अर्थ डोकावू लागला. पिला हे क्रियापद चुकीचे आहे असे मुळीच म्हणणार नाही. मूठभर सदाशिवपेठी 'प्यायला' असं म्हणत असले तरी बहुसंख्य 'पिला' म्हणत असतील तर तेच बरोबर असणार. नागराजलाही अशा मूठभर अहंमन्य लोकांच्या तावडीतूनच हा समाज मुक्त करायचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भयंकरच कोंब(कॉमे)डी प्रतिसाद तुमचा. लेखकाला किरकोळीत काढण्यासाठी कोंबडी कशी करावी हे शिकून घ्यावं. तुम्हाला सदाशिव पेठी हा उल्लेख कुठे खटकला का ? ते पोलिसांबद्दल आहे हो. आणि कोळून पिणे हे नागराज साठी आहे. यात माझी अहंमन्यता दिसली असेल तर आपल्यासारख्या युगपुरूषांच्या चरणाचे तीर्थ घ्यावयास तयार आहे.

तुमचा प्रतिसाद वाचून खोल पाण्यात बुडणाऱ्या बोटीतल्या पंडीताची आठवण झाली. तो नावाड्याला न आणि ण मधला फरक विचारत राहिला. नावाडी पोहायला येतंय का हे विचारत राहिला. आभारी आहे आपला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

का चिडला येसबंद भाऊ ? त्यांनी पिले बद्दल लिहिले असेल तर ते तुमच्याशी सहमतीचे होते.
जरा शांतीत वाचून बघा परत एकदा.
आधीच चिडायचे ठरवून लिहिले असेल तर मात्र उपाय नाही.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद कॉमेडी आहे असे म्हणणे म्हणजे चिडणे असते हे पहिल्यांदाच समजले भाऊ. दादा, मी काय शाळेत गेलेलो नाही, इथे नवीन आहे म्हणजे नुकतीच अक्षर ओळख झालेली आहे. उपहास, श्लेष म्हणजे काय हे गावीही नसतं दादा आमच्या सारख्या अडाण्याच्या. बहुसंख्य म्हणतात म्हणजे ते बरोबर सदाशिव पेठी म्हणतात म्हणजे नाही हा कुठला अलंकार हे माझ्यासारख्या नवीन, शाळा न शिकलेल्या उपहास माहिती नसलेल्याला कसा माहिती असेल. आपल्यासारखे दयाळू लोक मदतीला आहेत हे पाहून बरे वाटले.

इथे पहिल्यांदा अवांतर मग जमल्यास लेखावर चर्चेची पद्धतच आहे काय ? नवीन आहे. माहिती नाही म्हणून विचारले. परत म्हणाल चिडलो ....आपले खूप खूप आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीनही सिनेमे वेगवेगळ्या धाटणीचे. प्रतिकात्मक व्हिज्युअल पण खूपच नेमकी आणि वेगळी.
असूरन मध्ये भडक हिंसा, रक्तपात आणि थेट संघर्ष आहे. तमीळ सिनेमात जातपात विषयावर सिनेमे करताना प्रखरपणे भाष्य करतात. ओरबडून काढतात. मग हिंसेला हिंसेनेच प्रतिसाद दिला तर तो जस्टीफाय करतात. हिंसेला अहिंसेच्या माध्यमातून लढा देऊ असे बाळबोध प्रकार तिकडच्या सिनेमात होत नाहीत. उघडपणे सत्य दाखवायचे कसलीही भीड न बाळगता हे अशा तमीळ सिनेमाचे वैशिष्ट्य.

तुम्ही म्हणाले तसं कर्णन मधली प्रतिकं जास्त बोलकी आणि खोलवर गोष्ट सांगणारी. मुखवटा असलेली मुलगी बरेचदा सिनेमात येते. ही गोष्ट बघणारा लागलीच अंतर्मुख होऊन विचार करू लागतो. कर्णन मधले संवाद भारी आहेत. अटक केलेल्या लोकांची महाभारतातील पात्रांची नावे ऐकल्यावर पोलीसांनी त्वेषाने मारणे. आणि शेवटी नायक म्हणजे धनुष त्याच पोलीसाला मारताना तेच संवाद बोलून मारतो हे वेगळ्या लेवलवर जाते. तमीळ भाषेत असे संवाद ऐकणं फार रिदमिक वाटतं. महाभारतातील पात्रांची नावे ज्या पद्धतीने प्रतिकं म्हणून येतात त्याला तोडच नाही. दोन्ही तमीळ सिनेमांची झुंड सोबत तुलना होऊ शकत नाही. तिनही सिनेमे वेगवेगळ्या पातळीवरील आहेत.
झुंडमध्ये जी प्रतिकं वापरलीत तीचा बाज वेगळा. उदाहरण शाहु फुले आंबेडकर यांच्या तसवीरी. आता अशीच चित्रे फँड्री मध्ये पण एका सीन मध्ये बांधलेल्या डुकराला घेऊन जाताना दाखवली आहेत त्याचा इम्पँक्ट खूपच मोठा. त्यामानाने झुंडमध्ये प्रभाव वाटत नाही. आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकरांची मोठी प्रतिमा, अमिताभ हे एकाच फ्रेममध्ये कमाल आहे. गंमत म्हणजे लफडा झाला हे गाणं वरकरणी बीभत्स आणि हिडीस वाटलं तरी ते एक प्रतिकात्मक आहे. वस्तीतील पोराटोरांचे उत्सवी हौस म्हणून ठिक. आता असं गाण हिंदी सिनेमात दाखवलं म्हणून बरी आंबेडकरी जनता भलतीच खूष झाली. म्हणजे दाखवलेली प्रतिकं किती खोलवर रुजली आहेत हे समजतं.
रिंकू राजगुरू आणि वडीलांची आदिवासी बोलीभाषा दाखवणं, त्यांचा डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी संघर्ष, बच्चन चे त्यांच्या कडे जाणं हे प्रतिकात्मक म्हणून भारी पण सगळेच सामाजिक प्रश्न, समस्या संघर्ष एकाच सिनेमात का दाखवायचे? मध्यंतरापर्यंत घेतलेली पकड नंतर सुटत जाते. सगळ्यात शेवटी बच्चनची भाषणबाजी. टिपिकल हिंदी सिनेमात भाषणबाजी दाखवतात तशी नागराजने दाखवली. नागराज बोलण्यातून सांगण्यापेक्षा मुक कृतीतून किंवा मोंटाजमधून खूप खोलवर खूप काही सांगून जातो. पिस्तुल्या, फँड्री आणि सैराट मध्ये ते अनुभवलं. नाळ हा सिनेमा नागराजने लिहिला. यंकट्टी रेड्डीने दिग्दर्शन दिले. त्यातपण शेवटी भुसा भरलेले वासरू गायीजवळ येते आणि गाय दुध देते आणि लहानगा चैत्या आईकडे धावत जातो ही प्रतिकात्मकता भाषणबाजी पेक्षा जास्त परिणामकारक.
हे माझं व्यक्तीगत मत आहे नागराजचा झुंड मध्यंतरानंतर हळूहळू सुटत जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

गरिबी विकली जात आहे.सिनेमा काढणाऱ्या ना समाज सुधारणा अपेक्षित नाही त्या मुळे ग्राउंड वर काहीच काम नाहीत.
त्यांना फक्त जाती,धर्म,गरिबी विकायची आहे.
झुंड आणि काश्मीर फाईल ह्या वरून तरी माझे हेच मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पायरेटेड प्रिंट मिळाली आहे पण सुरुवात झकास वाटल्याने लगेच बंद केला. चांगल्या प्रिंटवर पाहण्याची इच्छा आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Zee5

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अर्धा सिनेमा बघितला आणि नंतर झोपून गेलो .

अशी स्टोरी खूप सिनेमात बघितल्या सारखी वाटली
फक्त ॲक्टर वेगळे.
झोपपट्टीतील मुल म्हणजे दारुडी च असणार.

हे काही सर्व झोपड पट्टीत राहणाऱ्या मुलांना लागू होत नाही..उगाच सिनेमा वाले चुकीची प्रतिमा उभी करतात..
हे आणि अशा अनेक गैर समजुती ह्या सिनेमात पण ठासून भरलेल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0