मुलांच्या जगातली 'साइकिल' आणि 'प्लूटो'

Covers

एका लहान मुलांच्या मासिकात अब्बास कियारोस्तामी या इराणी दिग्दर्शकाच्या अवघ्या साडेचार मिनिटांच्या चित्रपटाबद्दलची गोष्ट वाचनात आली होती. त्या चित्रपटात काय काय घडतं, याचं हिंदीत सचित्र वर्णन होतं. शेवटच्या परिच्छेदात 'जमलं तर हा चित्रपट बघा' एवढं एकच वाक्य होतं. मी आणि माझ्या मुलानं लगेच यूट्यूबवर तो चित्रपट बघितला. चित्रपट होता 'टू सोल्युशन्स फॉर वन प्रॉब्लेम' (एक समस्या के दो हल). आणि मासिक होतं 'इकतारा' प्रकाशनाचं 'साइकिल'. माझ्या मुलाला गोष्टीइतकाच तो चित्रपटही आवडला, आणि नंतर आम्ही कियारोस्तामीचा 'व्हेयर इज द फ्रेंड्स हाउस?' हा चित्रपटही बघितला. हे दोन्ही चित्रपट सहा-सात वर्षांच्या शाळकरी मुलांबद्दल आहेत. पहिल्या चित्रपटात (ज्याचा व्हिडियो पुढे दिला आहे) एका मुलाकडून त्याच्या मित्राचं पुस्तक चुकून फाटतं. या घटनेवर दोन टोकांच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. त्या दोन्ही प्रतिक्रिया आणि त्यांचे परिणाम कियारोस्तामी प्रेक्षकांपुढे ठेवतो.

दुसऱ्या चित्रपटात, अशाच एका सहा-सात वर्षांच्या मुलाच्या मित्राची वही चुकून त्याच्या दप्तरातून त्याच्या घरी येते. दुसऱ्या दिवशीचा गृहपाठ वहीत केला नसेल, तर शाळेतून काढून टाकीन अशी धमकी त्याला मास्तरांनी दिलेली असते. आपल्यामुळे आपला मित्र अडचणीत येऊ नये म्हणून चित्रपटाचा छोटा नायक त्याचं घर शोधायला निघतो आणि त्याचं घर शोधण्यासाठी तो काय काय करतो यावर संपूर्ण चित्रपट आहे. 'साइकिल'मधली गोष्ट वाचून दाखवली नसती आणि तिथल्या सूचनेप्रमाणे चित्रपट बघितला नसता, तर माझ्या सहा वर्षांच्या मुलाला अब्बास कियारोस्तामीचा सिनेमा दाखवता येईल असं कधी माझ्या डोक्यातही आलं नसतं.

असा चित्रपट शोधणं, त्याबद्दल एखाद्या लहान मुलाला तो बघावासा वाटेल असं लेखन आणि रेखाटन करणं, आणि मुख्य म्हणजे छपील माध्यमातून वाचकांना सहज डिजिटल माध्यमाकडे वळवणं - हा प्रयोग मला फार आवडला. 'इकतारा'ची 'साइकिल' आणि 'प्लूटो' ही दोन्ही द्वैमासिकं सतत असे नवनवे प्रयोग करत असतात. 'प्लूटो' खास ३-६ वर्षांच्या मुलामुलींसाठी, तर 'साइकिल' आबालवृद्धांना वाचता येईल अशी ही दोन नियतकालिकं आहेत. भारतातले अनेक प्रस्थापित लेखक आणि चित्रकार या मासिकांतून लिहीत-चितारत असतात. प्रोईती रॉय, प्रिया कुरियन, अतनू रॉय असे नावाजलेले चित्रकार रेखाटनं करतात. कधीकधी इर्शाद कामिल, वरुण ग्रोव्हरसारखी हिंदी चित्रपटसृष्टीतली नावंही दिसतात; तसंच सोपान जोशी यांच्यासारखे विज्ञानाबद्दल लिहिणारे पत्रकारही. पण कुणीही लिहीत असलं, तरी या मासिकातलं एकत्रित असं सगळंच साहित्य लहान मुलांना आवडावं असं असतं.

एखादी गोष्ट आवडली नाही, की लहान मुलं तिचा पद्धतशीर 'कार्यक्रम' करतात. आपण गोष्ट वाचत असताना आपल्या मुलानं आधी शून्यात बघायला सुरुवात करून मग अर्ध्या गोष्टीतून आपल्याकडे पाठ करून आपलं आपलं खेळायला लागणं असं वर्तन सुरुवातीला फारच अपमानास्पद वाटतं. पण मुलाला नक्की काय ऐकायला आवडतं (आणि मला त्याला काय वाचून दाखवायला आवडतं) याचा अंदाज येईपर्यंत असे अनेक प्रसंग मला सहन करावे लागले. मुलांवर सतत संस्कार झाले पाहिजेत, लहान वयातच त्यांच्यात देशाभिमान, मातृपितृभक्ती आणि राष्ट्रभक्ती उत्पन्न करायला हवी असं मानणारी, आणि एकूणच मुलांचं जग म्हणजे आकारानं लहान दिसणाऱ्या मोठ्या माणसांचं जग आहे या गृहीतकावर बेतलेली पुस्तकं अत्यंत कंटाळवाणी असतात. भारतातल्या आणि परदेशातल्या अनेक परीकथांमधूनही 'मुलींनी सुंदर असायला हवं आणि मुलांनी शूर असायला हवं' अशा प्रकारची साचेबद्ध प्रारूपं मुलांना लहानपणीपासूनच भरवली जातात.

पण मुलांना जी पुस्तकं आवडतात, त्यांच्या मात्र पुन्हा पुन्हा वाचून पत्रावळ्या होतात. मुलांना त्यांच्या जगासारखं जग जिथे बघायला मिळतं ते साहित्य जास्त आवडतं असं एक सरसकट विधान इथे करता येईल. माधुरी पुरंदरेंचं 'पाहुणी' नावाचं एक पुस्तक आहे. माझा मुलगा तीन वर्षांचा असताना ते त्याचं सगळ्यात आवडतं आणि त्यामुळेच पत्रावळ्या झालेलं पुस्तक होतं. त्यात यश नावाच्या मुलाची वर्गमैत्रीण शाळा सुटल्यावर काही तास त्याच्या घरी थांबायला येते, कारण तिच्या आईला काहीतरी महत्त्वाचं काम करायचं असतं. आपली मैत्रीण घरी येणार म्हणून आनंदी असलेला यश, घरातले सगळे तिचे लाड करू लागल्यावर मात्र खूप रागावतो. माझा मुलगा, ही गोष्ट यशच्या भूमिकेतून ऐकायचा हे उघड होतं. तरीही त्याला पुन्हा पुन्हा ती ऐकावीशी वाटायची. त्याच्या मनात येणाऱ्या मत्सरासारख्या काटेरी भावना इतर लहान मुलांच्या मनातही असतात हे बघून त्याला 'आपण फारच दुष्ट नाहीयोत' असं वाटत असावं.

'साइकिल'मध्ये मुलांना असं जग गवसतं. कुठलाही अंक हातात घेतला, की लक्ष वेधून घेणारी पहिली गोष्ट म्हणजे त्यातली चित्रं. या चित्रांमध्येदेखील, कापडांसारखी दिसणारी पॅचवर्क असलेली चित्रं, पेन्सिलीची रेखाटनं, भुताची गोष्ट असेल तर काळ्या किंवा राखाडी पार्श्वभूमीवर ती छापणं - असे अनेक प्रयोग होत असतात. त्यातले तांत्रिक बारकावे मला कळत नाहीत पण नवीन प्रयोग आहे एवढं मात्र नक्की कळतं. वाचनाची गोडी लागत असताना लहान वाचकांना चित्रांचा खूप आधार वाटतो. आपण अक्षरं झरझर वाचून डोक्यात चित्र काढायला शिकेलेले असतो. पण हा लेखी अक्षरांचा आणि कल्पनाशक्तीचा मेळ बसायला बराच काळ जावा लागतो. त्यामुळे छोटी मुलं नेहमी पुस्तकांची पानं उलटी पालटी करून त्यातली चित्रं पिऊन घेत असतात. हे लक्षात आल्यावर पुस्तकाचं पान फाटलं म्हणून वाईट वाटून घेऊ नये हे हळू हळू जमायला लागलं.

त्यातल्या गोष्टी, कविता वाचत असताना अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. ती म्हणजे त्यातली भाषा. क्रमिक किंवा शैक्षणिक पुस्तकं लिहिताना भाषेची एक शिस्त पाळावी लागते. आपण ज्या इयत्तेसाठी किंवा वयोगटासाठी पुस्तक काढतोय, त्या वयोगटातल्या सगळ्यांत मागे असलेल्या आणि सगळ्यांत पुढे असलेल्या अशा दोन्ही गटांतल्या मुलामुलींसाठी ते पुस्तक उपयुक्त असलं पाहिजे. लहान मुलांची भाषा त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या मोठ्या माणसांच्या भाषेतून तयार होत असते. आजूबाजूच्या मोठ्या माणसांचा आर्थिक स्तर, शैक्षणिक पातळी, भौगोलिक वास्तव्य अशा अनेक गोष्टी एखाद्या लहान मुलीची भाषा कशी असेल ते ठरवत असतात. तसंच, भाषेचं प्रमाणभाषेच्या जास्तीत जास्त जवळ असणं हादेखील एक निकष असतो. पण हल्ली बऱ्याचदा हेच निकष सरसकट बालसाहित्यालाही लावले जातात असं दिसतं.

अभ्यास आणि काही माहितीपर पुस्तकं सोडल्यास इतर ठिकाणी मुलांना काय अवघड वाटेल याचा अतिविचार त्या साहित्य निर्मितीतली उत्स्फूर्तता आणि गंमत घालवणारा ठरू शकतो. लहान वाचकांसाठी नवीन शब्द शिकायचं पुस्तकं हे एकच माध्यम नाही. ते आधीही नव्हतं आणि आता यूट्यूबसारख्या माध्यमांमुळे भाषा शिकायचे अनेक मार्ग समोर आले आहेत. म्हणून फक्त पुस्तकांतले शब्द सोपे ठेवण्याचा अट्टाहास पटत नाही. कधी कधी मुलांना गोष्टीत इतका रस वाटत असतो, की ती पुढे नेणाऱ्या सगळ्या शब्दांचा ते पाठपुरावा करतात. किंवा, एखाद्या कवितेचा नादच इतका सुंदर असतो, की शब्दांचे अर्थ समजले नाहीत, तरी लहान मुलं कविता पाठ करतात आणि शब्द एक एक करून नंतर शिकतात. 'प्लुटो'च्या (जे खरं तर खालच्या वाचनपातळीसाठी आहे) एका अंकात दर शुक्रवारी भरणाऱ्या बाजाराचं वर्णन करणारी एक कविता आली होती.

लोहे की सिगड़ी और चूल्हा
रन्दा गैंती और बसूला
गमछा चादर और गटूला
और वो वैसे वाला झूला
झूले जिस में नवजात
मिल जाते हैं जब लगती हैं
शुक्रवार की हाट

(कवी: प्रभात, 'प्लूटो' ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१)

यातले रन्दा, गैंती और बसूला हे शब्द मुलालाच काय पण मला आणि हिंदी मातृभाषा असलेल्या त्याच्या बाबालाही माहीत नव्हते. ती कविता पाठ झाल्यावर अनेक दिवस ती म्हणता म्हणताच आम्ही त्या शब्दांचे अर्थ शोधत होतो.

चांद को अटीट्युड बडा था
चांद को इगो मॅटर था,
हम क्यूँ इतना नाज़ उठाते?
कट्टी करना बेटर था!

(कवयित्री: श्रुति कुशवाहा, 'साइकिल' ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१)

या कडव्यातल्या प्रत्येक ओळीत एक नवीन शब्द आहे आणि तोही वेगळ्या भाषेतला. पण यामुळे ती कविता पाठ होण्यात कुठलीच अडचण आली नाही. जी काही अडचण आली ती त्याला 'इगो' या शब्दाचा अर्थ नीट समजावून सांगताना! कवितांचे विषयही लहान मुलांच्या आवडीचे असतात. साधारण पाच ते सात वयोगटातली मुलंमुली शी आणि शू या विषयावर भरभरून विनोद करत असतात. अशा वयात एखाद्या आधीच आगाऊ पोराच्या डोक्यात 'पिंकू का पाद' ही कविता फिट बसावी, आणि मग पाहुणे आल्यावर, 'कविता म्हण' या आज्ञेचा त्याला छानच समाचार घेता यावा, हे 'प्लूटो'मुळे जमून आलं. तो अंक येऊन आता दोन वर्षं झाली असतील पण अजूनही त्याला कविता म्हण असं सांगायचं त्याच्या आजीआजोबांचं धाडस होत नाही.

Pinku

एखादं लहान मूल जेव्हा चिकणमाती थापताना, खिडकीच्या कडेवरून गाडी फिरवत असताना, ठोकळ्यांचं घर बांधत असताना, स्वतःशीच एखादी कविता म्हणू लागतं, तेव्हा ताबडतोब कवीला/कवयित्रीला त्याचा व्हिडियो काढून पाठवावासा वाटतो. आणि 'साइकिल' आणि 'प्लूटो'मध्ये येणाऱ्या कवितांबद्दल असे अनुभव वारंवार येतात. 'प्लुटो'च्या एका अंकात 'लगना' या क्रियापदाचा हिंदीत कसा कसा वापर होतो याची अनेक उदाहरणं सचित्र दाखवली आहेत.

चश्मा लग गया है |
नया साल लगे तीन महीने हो गए है |
कपड़ों की तह लगाने में इतना मन लगा कि दाल लग गई |

हे अंक वाचताना, वाचून दाखवताना, आपणही भाषेकडे नव्या नजरेने बघू लागलो आहोत असं अनेक वेळा वाटून गेलं आहे.

आजच्या भारतात सर्वसमावेशकता प्रवाहाविरुद्ध जाणारी राजकीय भूमिका ठरते आहे. तरीही 'साइकिल' आणि 'प्लूटो' ही दोन्ही मासिकं आवर्जून ही भूमिका मांडत असतात. एका अंकात शाळेत मुलं डब्यात काय काय आणतात त्यावर एक कविता छापली होती. त्यात विक्रम नावाचा मुलगा डब्यात भरवा करेला आणतो, सारा मासा आणते आणि रशीद चिकन आणतो. पण रशीदला चिकन आवडत नाही आणि विक्रमला चिकन आवडतं. म्हणून विक्रम शेवटी म्हणतो:

काश यूँ होता की वो मेरे घर पैदा होता
और मैं उस के घर हो जाता!

Vikram

पुस्तकांतून, गोष्टींतून सौम्य पण लक्षात येईल अशा पद्धतीनं सगळ्या प्रकारची माणसं दिसतात. यात फक्त धार्मिक सर्वसमावेशकता नसते. खाण्यापिण्याचं, धंदा-व्यवसायांचं , सौंदर्याचं, भाषेचं - असं सगळ्या प्रकारचं वैविध्य बघायला मिळतं. गोष्टीला तात्पर्य न चिकटवताही गोष्टीतून काहीतरी शिकवता येऊ शकतं असा विचार मनात येतो. पण नंतर असं लक्षात येतं, की यात शिकवण्यासारखं काय आहे? ते आपल्याला तसं वाटतं कारण आपलाच जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन संकुचित आहे. जगात वेगवेगळे कपडे घालणारी, जेवण जेवणारी, बुटकी, जाड, गोरी, काळी, गरीब, श्रीमंत, खचलेली, पिचलेली, आनंदी, उत्साही अशा सगळ्या प्रकारची माणसं असतात हे एवढं आपल्या लहान मुलांनी बघणंही पुरेसं नाही का? त्यांना हे सतत दिसत राहिलं, तर कदाचित त्यांना 'सगळ्यांना समान वागणूक द्या' असं लिहून सांगावंही लागणार नाही!

दोनेक वर्षांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसमध्ये इकताराचे डायरेक्टर सुशील शुक्ला यांची मुलाखत आली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की अशी सर्वसमावेशकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. ती आपणहून येत नाही. एखादं रेखाटन करायला दिलं की नवखे चित्रकार हटकून एखादं मध्यमवर्गीय हिंदू कुटुंब चितारतात, ज्यात साडी नेसलेली आणि सिंदूर लावलेली आई असते. गोष्टीचं मध्यवर्ती पात्र नेहमीच हिंदू आणि मध्यमवर्गीय असू शकत नाही याची त्यांना जाणीव करून द्यावी लागते. कधी कधी 'साइकिल' थेट राजकीय भूमिकाही घेतं. उदाहरणार्थ, जानेवारी २०२२ अंकाच्या मुखपृष्ठावर घरातल्या आजीपासून ते नातींपर्यंत सगळ्या बायका हिजाब घालून वाचत बसलेल्या दाखवल्या आहेत.

Hijab

अशा प्रकारची राजकीय भूमिका लहान मुलांच्या मासिकानं घ्यायची गरज आहे का? माझ्यापुरतं याचं उत्तर 'हो' आहे. कारण हिजाब घालून वाचन करणाऱ्या बायका असलेलं चित्र बहुसंख्य लोकांसाठी राजकीय भूमिका ठरत असली, तरी हिजाब घालून शाळेला जाणाऱ्या अशा अनेक लहान मुली भारतातलं वास्तवही आहेत. आणि ते वास्तव योग्य वेळी लहान मुलांना दाखवण्याचं काम करणाऱ्या प्रकाशनाला माझा कायमच पाठिंबा असेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तूर्तास 'रोचक' नि 'माहितीपूर्ण' एवढेच लिहून मोकळा होतो, केवळ दखल/पोच म्हणून. बघू या, सवडीनुसार आणखी लिहायला कसे जमते ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोकं झाकलेल्या, कुंकू न लावणाऱ्या मुली-स्त्रिया वाचताना दाखवल्या आहेत, हेही मला आवडलं. चित्रातली आजीसुद्धा वर्तमानपत्र वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डोकं झाकलेलं चान चान, कुंकू लावणं दुत्त दुत्त असं काहीसं?

(ट्रोल म्हणून झिडकारू नये म्हणून अधिक स्पष्टीकरण: पुर्वी थेरडेशाहीमुळे कुंकू लावणे, साडे नेसणे आणि काय काय सोपस्कार केल्याशिवाय घरातून बाहेर पडणे बायकामुलींना अशक्य असे. अगदी लहान मुलींना सुद्धा कुंकू लावणे बंधनकारक असे. तसेच अनेक मुस्लिम घरांत बुरख्याबद्दल असते. बुरखा घातल्याशिवाय घराबाहेर पडावे असे वाटणाऱ्या मुलींना सुद्धा पुरूषांच्या दबावामुळे ते भाग पडते. मला हे असले सगळेच धार्मिक कर्मकांडाचे प्रकार स्त्रिमुक्तिच्या मार्गातले अडथळे वाटतात. बाकी, चित्र उत्तम आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गेल्या एक-दोन दिवसांतला कर्नाटकाच्या उच्च न्यायालयाचा निर्णय वाचला नाहीत का? मुलींना शिक्षण का हिजाब अशी निवड करायला लावत आहेत. ह्या चित्रात दोन्ही एकत्र दिसत आहे. मुली-स्त्रियांना शिकायच्या, वाचायच्या आधी आणि नंतरही ठरवू देत की काय कपडे, दागिने, मेकप* वापरायचा ते!

माझ्यावर आईनं कधी टिकली-बांगड्या वगैरे छानछोकी करण्याची सक्ती केली नाही; (सरकारी अनुदान घेणारी आमची शाळा टिकली-बांगड्यांची भिकारडी सक्ती करायची;) आईनं एकाही शब्दानं 'अमके केस-कपडे-मेकपमध्ये तू चांगली दिसतेस' (किंवा दिसत नाहीस) प्रकारची (पारंपरिक आणि/किंवा हिंदुत्ववादी पॅसिव्ह-अग्रेसिव्ह) कॉमेंट केली नाही. मी किती अभ्यास करते, यावरून माझं डोकं फिरवणाऱ्या माझ्या आईनं माझ्या दिसण्याबद्दल कधीही, एकही शब्द काढला नाही, चांगला वा वाईट!

त्यातून शिक्षण, वाचन, स्वातंत्र्य यांचा मेकप-कपड्यांशी अर्थाअर्थी काय संबंध? मी सरासरीपेक्षा जरा जास्तच शिकल्ये; सरासरीपेक्षा जरा जास्तच पैसे मिळवते; स्वतःला फार मोठी स्वतंत्र विचारांची बाई वगैरे समजते; आणि आता कंपनी आम्हांला इमेलं पाठवते कसे कपडे घालायचे याबद्दल. मी माझं काम किती चांगलं (वा वाईट) करते याचा माझ्या कपडे-मेकपांशी संबंधच काय! पण ही इमेलं पाठवण्याला कुणी प्रतिगामी वगैरे समजत नाही. "नशीब, 'मेकप करून या', सांगत नाहीयेत", असं मी मैत्रिणीला म्हणाले आणि त्यावरून आम्ही माना हलवल्या.

मला जे स्वातंत्र्य मिळालं त्यापेक्षाही जास्त पुढच्या पिढीला मिळावं; लहानपणी मला जेवढं स्वातंत्र्य मिळालं त्यापेक्षा जास्त आजच्या काळात असावं इतपत माझी माफक अपेक्षा आहे. माझ्या कपडे-मेकपांशी माझ्या कर्तबगारीचा काहीही संबंध नाही, हे मला माझ्या आईच्या वर्तनातूनच, एकही शब्द खर्च न करता समजलं, ते सगळ्यांना लहानपणापासून समजू देत, एवढीच माझी माफक(!) अपेक्षा आहे.

हेच मला या चित्रातून दिसलं. शिक्षण, वाचन, कर्तबगारी आणि मेकप-कपडे यांचा काहीही संबंध नाही. एरवी दिसणाऱ्या चित्रांपेक्षा हे चित्र निराळं आहे आणि ते तरी ते वेगळं नाहीये.

राहता राहिला विषय धार्मिक कर्मकांडांचा आणि बाईच्या स्वातंत्र्याचा - तर आपण स्वतः ती बाई नसाल तर तिच्या व्यक्तिगत निर्णयांबद्दल बोलणं हे तिच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणं आहे. तुम्हाला तसं काही करायचं असेल तर जरूर करा; मला ते मान्य नाही.

*मेकप - टिकली, कुंकवासकट बाकी पारंपरिकरीत्या मेकप समजल्या जाणारं सगळं जिन्नस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

> जी काही अडचण आली ती फक्त आईला 'इगो' या शब्दाचा अर्थ नीट समजावून सांगताना!

ही अडचण येणं साहजिक आहे. पण बाकी लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

@जयदीप
"तुझी चूक आहे हे माहिती असून तू सॉरी म्हणत नाहीस तेव्हा त्या वागण्याला इगो असणं म्हणतात"
अशी व्याख्या केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिपलकट्टी, प्रतिसादातील मुद्दा कळायला ३६ तास लागले. पण आता वाक्य बदललं आहे. अनेक आभार. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0