मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०८
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
शोकांतिका?
कसलातरी शेवट दुःखी असेल तर त्याला शोकांतिका म्हणता येईल. हा शेवट असल्याचं सध्यातरी दिसत नाही.
वाचकांचा हट्टीपणा का? माझं उदाहरण बघितलं तर मला दिसतं की माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. काम करताना कंटाळा आला की मधूनच ऐसी उघडते. त्यापेक्षा जास्त मराठी-आंजा वाचायला वेळ नसतो. इतर संस्थळांवर तोच लेख आहे, हेही मला हल्ली समजायला लागलं आहे, तेही फेसबुकमुळे. हल्लीच फेसबुकवर मायबोलीवर (किमान एकेकाळी) नियमितपणे वावरणारे लोक माझ्या यादीत आले आहेत; त्यामुळे कदाचित काही लेख सापडतात.
काही वर्षांपूर्वी एक बातम्यावजा पोर्टल आलं होतं - कायतरी नामा, 'अक्षरनामा' नाही, ते नवीन आहे आठवलं नाव, 'कलमनामा'. मग ते गायब झालं. 'मी मराठी' मराठी साईट आली आणि काही वर्षांनी गायब झाली. 'मायबोली'वरचा 'संयुक्ता' नावाचा भाग फक्त स्त्रियांसाठी होता; तो त्यांनी सगळ्यांसाठी खुला केला, तेव्हा सगळ्यांना आपलं लेखन तिकडून मिटवण्याची मुभा होती. अनेकींनी ती वापरली आणि लेखन गायब झालं.
चेयरमन माओनं हे विधान केलं होतं, ह्याची मला गंमत वाटली होती. ते विधान मला पटतं - Let thousand flowers bloom. त्यात अंत तर नाहीच, पण दुःख वाटण्यासारखी काय गोष्ट आहे?
Thousand नव्हे hundred.
Thousand नव्हे hundred.
ह्यानिमित्ताने या कॅंपेनचे विकिपान वाचले. लोकांनी कम्युनिस्ट सरकारबद्दल खरे मत प्रगट करावे, खुली टिकाटिप्पणी करावी असे काहिसे या कॅंपेनचे मूळ तत्व होते. प्रत्यक्षात, सरकारच्या विरोधकांना चुन चुनके मारण्यासाठीचा हा प्लॅन होता. आपल्याकडे आजकाल चाललंय त्याची प्रेरणा हीच असावी.
संस्थळं - मराठी संस्थळं
पाच वर्षांपूर्वी सात होती. स्वप्रकाशन, संपादन सोय. संपादक/अडमिनच्या नजरेत. फुकट. वाचकांनी कुठेही जाऊन वाचण्यात अडचण नव्हती. प्रकाशन झालेल्या संस्थळावर जाऊन वाचकांनी प्रतिसाद दिले असते तर सर्वच चालू ठेवण्यात त्या त्या मालकांचा उत्साह कायम राहिला असता. एकेक संस्थळ अमुक एक प्रकारांच्या पद्धतीचे म्हणून नावाजले गेलेही असते.
मुळात नवीन इंग्रजी माध्यमातून शिकलेली पिढी मराठी लेखन टाळतेच. फेसबुकवर जाते. ( तिथे वर-आंगठे लगेच मिळतात.) जे काही जुने वाचक आहेत ते एकाच संस्थळास चिकटून बसलेले वाटतात.
विविधता गेली तर गंमत जाईलच.
मराठीसाठी एवढं तरी करायला हवं.
सानेगुरुजी आणि बटाट्याच्या चाळीतील सांडगे
साने गुरुजी यांचे इस्लामी संस्कृती नावाचे एक पुस्तक आहे. त्यात हा एक उतारा येतो जो अरबांविषयी आहे तो असा
"अरब लुटालुट करी परंतु लुटालुटीतही त्याने मर्यादाधर्म ठेवला होता. तो उगीच मारहाण करीत नसे. शक्यतो हिंसाचार टाळी, रक्तपात टाळी, " मी या व्यापाऱ्याचे ओझे फक्त कमी करतो " असे म्हणे ! आणि ज्यांना लुटावयाचे तेथे स्त्री असेल तरी बेदुइन कितीही आडदांड वा उछुंखुल असला तरी स्त्रियांशी तो अदबीने वागे. तो स्रीवर हात टाकीत नसे. तो म्हणेल " तुमचे नेसुचे लुगडे किमतीचे आहे ते मला हवे आहे तुम्ही दुसरे नेसा मी दुर जातो" आणि तो दुर जाऊन पाठ करुन उभा राहील.
हे वर्णन वाचल्यावर आठवण झाली ती सांडगे या बटाटाय्च्या चाळीतील एका पात्राची. त्यात एक बटाट्याच्या चाळीचे सांस्कृतिक शिष्टमंडळ सांडग्याच्या चाळीत जाते. ते सांडगे मोठे भारी पात्र पु.ल. नी रंगवलेले आहे. सांडग्याच्या चाळीत आता नेमके आठवत नाही पण जे नाटक बसवले जाते त्यात शिवाजी अफजलखानाचा वध करत नाही उलट अफजल खानाचेच आतडे प्रेमभावनेने बाहेर आले असले काहीतरी भन्नाट आहे ( चुकभुल देणे घेणे व्यवस्थित आठवत नाही ) असे अनेक धक्के पचवल्यावर सांस्कूतिक शिष्टमंडळ परत येते व पुढे नळावरच्या भांडणात अरे माणुस आहे की दादा सांडगे ? असे ही विचारले जाऊ लागले. हे सांडगे अगदी साने गुरुजी वरुन घेतले आहे की काय असे हे पुस्तक वाचुन वाटले.
कारण बटाटयाच्या चाळीत एक बाबा बर्वे नावाचे पात्र विनोबांवरुन घेतले आहे असे वाचल्याचे स्मरते ( पुन्हा चुकभुल देणे घेणे) तर या पुस्तकात विनोबांचा ही एक जबरदस्त धुळे जेलमधला प्रसंग साने गुरुजी सांगतात ज्यात विनोबांना मुहम्मंद यांच्या चार पेक्षाही जास्त लग्नांविशयी आणि १७ वर्षाच्या मुलीबरोबर ही त्यांनी लग्न केले असा एकाने प्रश्न केला ( हे वय १७ पेक्षा सुद्धा कमी होते असे वाचल्याचे स्मरते ते असो ) तर त्यावर साने गुरुजी मोठ्या विलक्शण शैलीत विनोबांचे उत्तर
विनोबाजी गंभीर झाले त्यांचे डोळे चमकले " थोरांच्या लग्नाचा पुष्कळ वेळा पालक होणे एवढाच अर्थ होतो त्यांना तुम्ही भोगी समजता वगैरे आणी पुढे साने गुरुजी म्हणतात " विनोबाजींचे ते कातर सकंप भावभक्तीने भरलेले शब्द माझ्या कानात घुमत आहेत "
अशा अनेक गोष्टी पुस्तकात आहेत जे खरे म्हणजे मुळातुन वाचावे असे आहे.
मला अगोदर वाटत असे की ही मंडळी सानेगुरुंजी सारखी भाबडी असावीत. पण आता अधिक विचार केल्यास तसे वाटत नाही. ही मंडळी सामाजिक धार्मिक एक्यासाठी डेस्परेट होते हे समजु शकते. पण या पुस्तकातील त्यांची मांडणी भाबड्या एक्याची आस बाळगणाऱ्या व्यक्तीची न वाटता एखादा कसलेला वकील किंवा धुर्त राजकारणी जसे मांडणी करेल तशी वाटते. हे एकीकडी दुसरा अजुन एक विचार असा आला की कदाचित या मंडळीना कठोर वास्तव जसेच्या तसे पाहण्या समजण्याची क्षमता नसावी. म्हणजे त्याला कुठला ना कुठला आदर्शवादी मुलामा देऊन च बघण्या ची त्यातुन आपल्याला हव्या त्या विचारसरणीचा प्रसार करणे हे सवय जडलेली असावी. पण तरी..... इतका अतिरेक....?
या मंडळीच्या या वागण्यातुन आलेल्या फ्र्स्ट्रेशन मध्येच पु.ल. यांना बाबा बर्वे आणि सांडगे सारखी पात्रे निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली असावी
म्हणजे हसावे की रडावे हा प्रश्न आणि हे काय चाललय काय नक्की अशी तीव्र भावना त्याकाळच्या नॉर्मल लोकांना येत असावी
चिमणराव सानेगुरुजींचे हे पुस्तक गंभीरपणे लिहिलेल नॉन फिक्शन आहे
चिमणराव तुम्ही म्हणता तसे कथे च्या कादंबरीच्या संदर्भात खरे असेल्
सानेगुरुजींचे हे पुस्तक मात्र गंभीरपणे लिहेलेले नॉन फिक्शन प्रकारातील आहे.
त्याला आचार्य विनोबा भावे आणि राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची कौतुक केलेली प्रस्तावना ही आहे.
त्यामुळे नगरकरांचे म्हणणे इथे काही लागु होइल असे वाटत नाही.
डॉ. झाकीर हुसेन हे एम ए आणी बर्लिन युनिव्हर्सिटीतुन इकॉनॉमिक्स मध्ये पी एच डी होते तरी अरब लुटारुंच्या जोक वर ते हसले नाहीत. हे विशेष प्र्स्तावनेत ते म्हणता
It is an exquisite
example of sympathetic understanding and a genuine appreciation of a life that has meant such a great deal for humanity and a true appreciation of whose work and mission can be of immense help in the process of our own national integration. The author has in unusual measure succeeded in entering the spirit of his subject.
विनोबाके तो क्या कहने बस नाम ही काफी है ते प्रस्तावनेत म्हणतात जे अगदी पटते ते असे
"गुरुजींनी हे चरीत्र भाविकपणाने लिहिलेले आहे.ज्या भाविकपणाची अपेक्षा एखाद्या निष्ठावंत मुसलमानाकडुन करता येइल. "सर्वधर्मी सनानत्व " ही भावना गुरुजींच्या ठिकाणी मुरलेली होती यामुळे हे शक्य झाले "
यावर आता काय म्हणणार धन्य आहे !
हे पुर्ण पुस्तक एक गंभीर विनोद असेल तर तो अति उच्च दर्जाचा असावा यावरील तत्कालिकांचे मौन ही बरेच बोलके आहे.
प्रोत्साहनापर -
प्रस्तावनेतली दोहोंचीही वाक्यं पाहता ती प्रोत्साहन पर वाटतात.
"गुरुजींनी हे चरीत्र भाविकपणाने लिहिलेले आहे.ज्या भाविकपणाची अपेक्षा एखाद्या निष्ठावंत मुसलमानाकडुन करता येइल." - म्हणजे चिकित्सकवृत्तीने वाचू नये कारण मुळातच भाविक वृत्तीने लिहिलेलं पुस्तक आहे.
साने गुरुजींची पुस्तकं "भावुक/भावनात्मक" असतात त्यापेक्षा हे वेगळं आहे.
तुम्ही म्हणता आहात तसे "अरब लुटारू"वर केलेल्या मेहेरबानीव्यतिरिक्त पुस्तकात अरबांना/मुस्लिमांना झुकतं माप दिलं आहे का?
अर्थात गांधींनीही स्त्रियांना बलात्कार होत असला तर आत्महत्या करावी असा सल्ला दिला होता हे वाचल्याचं आठवतं (संदर्भ शोधतो.)
तेव्हा विषयाचा अभ्यास नसताना केवळ "जनांपरी अपार कळवळा" हे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही ह्यात काय संशय?
मजकुराआधारे शिकवणारी साईट
मा तं मधील technologies शिकताना मला, विडिओ पाहून (आणि कोड लिहून) शिकण्यापेक्षा, मजकूर वाचून (आणि कोड लिहून) शिकणं अधिक सोयीस्कर वाटतं.
त्या दृश्य, श्राव्य, वाच्य वगैरे शिकण्याच्या प्रकारांपैकी बहुधा मी वाच्य या प्रकारात मोडतो. नाहीतरी मला विडिओपेक्षा वाचनच जास्त आवडतं.
माझ्या कामाचा भाग म्हणून मला नेहमीच नवनवीन IT tools, frameworks, libraries इ. अल्पकाळात शिकाव्या लागतात. हे सर्व शिकण्यासाठी युडेमी ही एक चांगली साईट आहे. पण मला विडिओ पाहत बसण्याचा खूप कंटाळा येतो. (ते tool शिकण्याचा कंटाळा येत नाही, मला ते काम आवडतं.)
युडेमीसारखी किंवा अजून चांगली - मोफत किंवा शक्यतो विकत सेवा देणारी - पण कटाक्षाने मजकुराआधारे शिकवणारी एखादी चांगली साईट आहे का?
काही साइटी प्राथमिक बाबी चांगल्या शिकवतात आणि मग अर्ध्यात सोडून देतात. मॉंगोडीबीसारख्या काही tools चे अधिकृत documentation चांगले असते. पण अँग्यूलरसारख्याचे मात्र अतिशय गचाळ असते.
प्रतिसाद, मांडणी, भाषा इ विस्कळीत वाटली तर क्षमस्व, पण मला मदत हवी आहे.
बघलं-केलं-आलं.
नुस्तं बघून मला काहीही समजत नाही. माँगोडीबी आम्हांला शिकवला तेव्हा मला काहीही समजलं नव्हतं. म्हणून माँगोनं चालवलेला कोर्सही करून बघितला. तरीही काहीही समजलं नाही. मग शिकण्यासाठी मुद्दाम एक प्रकल्प सुरू केला. त्यात माँगोच वापरला. तेव्हा मला तो वापरता येत असे. गेल्या दोनेक वर्षांत हातच लावलेला नाही.
मला कंप्युटर सायन्स येत नाही; डेटाबेसेस, SQL, NoSQL, पायथन वापरता येतात, पण 'हे असंच का' ते समजत नाही. मला त्याची गरजही पडत नाही; किंवा त्या छापाचे प्रश्न सहकर्मचारी जाणकारांवर सोडून देते. लोकांचा पायथन कोड वाचूनवाचून माझा सुधारला. सांख्यिकी आणि मशीन लर्निंग दोन्ही समजण्यासाठी मला थियरी शिकावी लागते; ती वाचून बऱ्यापैकी समजते. वापरण्याची संधी मिळाली तर बरीच जास्त गंमत समजते. (शिवाय मला थोडं बॅश येतं, लिनक्सची वापरण्याइतपत माहिती आहे) एवढ्या भांडवलावर सध्या तरी माझं बरं सुरू आहे*.
* तेही संपूर्ण खरं नाही. मी जे काम करते त्यात व्यवसाय नक्की कसा चालतो, याचं आकलन असावं लागतं. त्यासाठी कॉलसेंटरवाल्या, मॅनेजमेंट, मार्केटिंगवाल्या लोकांशी बोलावं लागतं. तांत्रिक तपशिलात न घुसता, आम्ही काय काम करत आहोत, त्यातून त्यांना काय फायदा होईल, मला त्यांच्याकडून काय हवंय वगैरे गोष्टीही समजून द्याव्या-घ्याव्या लागतात. साधी मोजणीसुद्धा आमची बरोबर आणि त्यांची चूक हे लोकांना पटेल अशा पद्धतीनं सांगावं लागतं. पण त्यासाठी फक्त कोडिंग येऊन फायदा नाही. आणि हो, मोजणी हे काम वाटतं तेवढं अजिबात सोपं नाही.
करोना विषाणूचे आगमन झाल्यास
करोना विषाणूचे आगमन झाल्यास आता वर्ष झाले आहे.
एवढ्या काळात कशा प्रकारे विषाणूचा "प्रसार होत नाही"? याविषयी खात्रीपूर्वक माहिती आता उपलब्ध झाली आहे का?
कागद/प्लॅस्टिक किंवा इतर पॅकिंगची माध्यमे.
हाताळल्या जाणाऱ्या इतर वस्तू जसे नोटा, नाणी, सार्वजनिक जागची हॅण्डल्स, बटणे,
केशकर्तनालयातील उपकरणे कंगवे, कात्र्या
हवा
यामधून प्रसार होत नाही किंवा होतो याबद्दल खात्रीशीर माहिती आता उपलब्ध झाली आहे का?
मास्क हा सगळ्यात परिणामकारक उपाय आहे हे तर दिसतेच आहे.
मास्क हाताळणे, न धुता पुन्हा वापरणे यातून प्रसार होत नसावा असे मला वाटत आहे. याविषयी काही माहिती उपलब्ध आहे का?
मी मराठी - अलक
मी मराठी - अलक
----------------------
सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! "
सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही .
मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "
--------------------------------------------------------------------------------------------------------------
आज कवी कुसुमाग्रज जयंती .
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !
...
मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "
'टीशर्ट'ला मराठीत काय म्हणणार? ट-सदरा?
बाकी, 'सनी' नावाचा मराठी मुलगा आपल्या आईला 'मम्मी' म्हणून हाक मारतो, याबद्दल आपल्याला आक्षेप दिसतो. पैकी, मराठी मुलाला 'सनी' म्हणून संबोधण्याचा भाग तूर्तास बाजूस ठेवू. (तसेही, आईबापांनी आपल्या मुलाला नक्की कसे संबोधावे, हा संबंधित आईबाप आणि मुलगा यांच्यातील खाजगी मामला आहे. इतरांकरिता तो दखलपात्र काय म्हणून असावा?) राहता राहिली गोष्ट 'मम्मी'ची. शिवाजीमहाराज आपल्या मातुःश्रींस 'माँसाहेब' म्हणून संबोधीत, ते काय ते म्लेंच्छ होते म्हणून?
('माँसाहेब'वरून आठवले. आईला 'आईसाहेब' म्हणायचे नाही - कारण म्हणे 'साहेब' हा यावनी प्रत्यय आहे - त्याऐवजी 'आईराव' म्हणायचे, अशी टूम पूर्वी एकदा म्हणे काही (सावरकरी/भाषाशुद्धीवादी) गोटांतून आली होती. त्यावरून कोणीतरी म्हणे 'यांच्या आईला मागून साहेब लागलेला चालत नाही; राव लागलेला चालतो!' अशी (काहीशी असभ्य) टीका केली होती, असे ऐकून आहे.)
----------
बाकी, 'मराठी भाषा अभिजात होणे' (अथवा 'मराठीचा अभिमान बाळगणे') म्हणजे केवळ भगव्या रंगात 'मी मराठी' असे लिहिलेला टीशर्ट घालणे, या बाबीकडे जर आपला रोख असेल, तर तो काही अंशी समजण्यासारखा आहे.
----------
(भाषा ही अभिजात (व्हॉटेव्हर दॅट मे मीन) एक तर असते, किंवा नसते. तिला अभिजात बनवणार कशी?)
अभिजात मराठी
निरनिराळ्या देशांच्या लोकसंख्या
ब्रिटेन >>>>67,886,011
फ्रांस >>>>>65,273,511
जर्मनी >>>>83,783,942
आणि आपला
महाराष्ट्र >>>124,862,220
इंग्लिश, फेंच, जर्मन, ह्या भाषांच्या अभिजातपणा म्या पामरे काय लिहावे.
विसाव्या शतकाच्या सुरवातीला नवविज्ञान बहुतांशी जर्मनीत प्रगत झाले. जेव्हा आपण इकडे
आपसात लढाया खेळत होतो तेव्हा तिकडे न्यूटन डार्विन ह्यांच्या ग्रंथांच्या आवृत्त्या निघत होत्या. आपण जर इंग्लिश शब्दांचा उगम पाहिला तर आपल्याला कळून येईल की कुठल्या कुठल्या भाषांतून आयात केले आहेत. त्यांना इंग्लिश--- मायबोलीचा -- अभिमान नसावा असे एकंदरीत दिसते आहे. आपण मराठी लोक कुठल्या स्वप्नात हरवलो आहोत देव जाणे. सर्व सामान्य लोक जी बोलतात ती भाषा. ते मोबाईलला मोबाईल म्हणतात तर आपण मोबाईल शब्द दत्तक का घेऊ नये? ते नेट ला नेट म्हणतात. वापरा तोच शब्द. खरा मुद्दा हा आहे की बारा कोटींचा महाराष्ट्र असताना आपली मराठी समृध्द का होऊ शकत नाही?
लोकसंख्येचा आणि अभिजात पणाच काही संबंध आहे असे मला म्हणायचे नाही.
मराठी अभिजात होणार नाही हे सूचित करणे बरोबर नाही.
जेव्हा लॅॅटिन ,ग्रीक .संस्कृ्त आणि तमिळ प्रगत भाषा होत्या तेव्हा इंग्रजी घास कापत होती.
श्री मोदी हलकट आहेत की नुसतेच
श्री मोदी हलकट आहेत की नुसतेच मूर्ख व अडाणी आहेत?
खाजगीत लस विकायला हॉस्पिटल्सवर २५० रुपयांची कमाल मर्यादा घातली आहे. कशाच्या आधारे?
हे स्वत:ला उजवे म्हणवणारे लोक कशाला प्रायव्हेट मार्केटमध्ये काड्या करताहेत? आपली विचारधारा काय हे समजण्याइतकी तरी शाळा शिकायला हवी माणसाने. भाषणात मात्र “धंदा करणे सरकारचे काम नाही” वगैरे तारे तोडायचे. प्राईस डिस्कव्हरी हे सरकारचे काम आहे वाटतं?!
इतकंच आहे तर सरकारने घ्यावे सगळे डोस विकत आणि द्यावेत २५० काय अन् फुकट काय.
कॉंग्रेसला नावे ठेवत कॉंग्रेसी समाजवादी चाळे करतोय हा माणूस. नुसता काळाबाजार करायचे डोहाळे. शिवाय फुकट लस द्यायची आश्वासनेही देऊन ठेवलीत. आज गब्बरसिंग हा आयडी जिथे कुठे असेल तिथे त्याच्या आत्म्याला भयंकर वेदना झाल्या असतील.
https://www.hindustantimes.com/india-news/claims-are-misleading-govt-on-message-saying-vaccine-to-be-priced-at-rs-500-101614424384176.html
श्री मोदींची दूरदृष्टी
दोन बँकांच्या खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचार्यांनी संप केला. खाजगीकरणाची ही तर नुसती सुरुवात आहे. धंदा करणे सरकारची जबाबदारी नाही हे श्री मोदींनी केव्हाच समजावून सांगितले आहे.
खरंतर मोदींना भरघोस पाठिंबा देणार्या व “२०० रुपये पेट्रोल झाले तरी चालेल; पण आमचे मत मोदींनाच“ असे म्हणणार्या वर्गाने खाजगीकरणास पाठिंबा द्यायला हवा.
सरकारी आस्थापनांमध्ये आरक्षणामुळे, ज्यांचे पूर्वज गटार साफ करणारे मजूर वगैरे होते अशा ऐतखाऊ लोकांचा बुजबुजाट वाढला होता.
खाजगीकरणामुळे आता आरक्षण जाऊन परंपरागत हार्डवर्किंग लोकांना “आपल्यातला आहे ना?” हे पाहून हार्डवर्किंग लोकांनाच कामावर घेणे शक्य होणार आहे. हार्डवर्किंग पूर्वज असलेल्यातली काही येडपट मंडळी मात्र सरकारी नोकरीत आरक्षण मिळणार म्हणून खुशीत आहेत.
श्री मोदींच्या दूरदृष्टीस तोड नाही.
गूगल गुरू, गूगल कल्पतरू
तुम्हाला या कलावती देवी अपेक्षित नसाव्यात!
गती वाढली. मूल्य कमी झाले.
गती वाढली. मूल्य कमी झाले.
जीवनाची गती वाढली आहे, असे सतत ऐकू येते. हे ऐकल्यावर मी विचार करतो की, गती वाढली आहे म्हणजे काय झाले आहे ? पायांची धावण्याची गती वाढलेली आहे का ? वा-याची फिरण्याची गती कालपेक्षा भरपूर वाढलेली आहे का ?नाही.
एक साधे उदाहरण घेऊ. ईमेल. एकमेकांना ईमेल पाठवणे आता दैनंदिन जीवनात केव्हाच रुजलेले आहे. अपवाद वगळता, बहुतेक जण इलेक्ट्रिक माध्यमातून ईमेल किंवा व्हॉटसअप मधून संदेश पाठवतात. मेल पाठवल्यानंतर कधीकधी वाचणारा लगेच उत्तर पाठवतो. पूर्वी पत्रोत्तर यायला वेळ लागे. असे मेलबाबत होत नाही. मेलचे उत्तर पत्रापेक्षा लवकर येते. काही मेल्सना कधीच उत्तर येत नाही, हा भाग सोडून देऊ. मेलला लगेच उत्तर आले तर वाटते जीवनाची गती वाढली आहे. ही गती खरे तर तंत्रज्ञानाची प्रगती असते. पूर्वी ट्रंककॉल बुक करावे लागायचे. आता देशविदेशातही लगेच फोन लागतो. पूर्वी गाडी बुक केल्यावर वर्षा दोन वर्षाने क्रमांक लागे. आता, गाड्या तयार असतात. केव्हाही जाऊन आपण खरेदी करू शकतो. सगळे जरी असले तरी सूर्य उगवायला व मावळायला अजून साधारण तेवढाच वेळ घेतो जेवढा तो शंभर वर्षांपूर्वी घेत असे. पानगळ व बहराची प्रक्रिया पूर्ण होण्याचा नैसर्गिक वेग कायम आहे. फुलांच्या सुगंधाचा दर्जा कायम आहे. चांदण्याची शुभ्रताही कायम आहे. भिजलेल्या मातीचा वास कोणत्याही वयाच्या माणसाला आवडतो. ग्रहगोलांचा वेगही कायम आहे. शनीला एका राशीतील प्रवास पूर्ण करण्यास अडीच वर्षे कालही लागत होती व आजही लागतात. काळ आपली गती कायम ठेवून आहे. सतत बदलत आहे ते तंत्रज्ञान. ते बदलत असल्याने जीवन बदलत आहे; पर्यायाने, जीवनाची गती वाढली आहे असे माणसाला वाटते. फोटो काढल्यानंर त्याचा रोल प्रिंटिंगसाठी देणे, वाट पाहणे व पंधरा दिवसांनी फोटो घेऊन जाणे हे तर पूर्वी घराघरातील नेहमीचे चित्र होते. त्यात हवीहवीशी उत्सुकता असे. आता मोबाईलवर एका मिनिटात फोटो काढता येतात. काढलेले फोटो पसंत नाही पडले तर लगेच पुसूनही टाकले जातात व नवे फोटो घेतले जातात. या प्रक्रियेत फोटो काढण्याला जी एक पत होती, महत्त्व होते ते गेले. काढलेले फोटो पंधरा दिवसांनी पाहायला मिळायचे व त्यात बदल करता येत नसे म्हणून फोटो पूर्वी गांभीर्याने काढले जात. आता ते मूल्य राहिलेले नाही.
स्त्रियांना चुलीवर जेवण
स्त्रियांना चुलीवर जेवण शिजवायचं यासाठी केवढा प्रचंड वेळ घालवायला लागायचा याचं वर्णन वाचलं. काटक्या गोळा करणं, शेणाच्या गोवऱ्या थापणं, वाळवणं, चूल पेटवणं, त्यावर रांधणं, वाढणं, उष्टी काढणं, भांडी घासणं या सगळ्यात तासन् तास जायचे. या बाबतीत गॅस आला, पण चुलीवरच्या जेवणाला वेळ लागायचा त्यातली हुरहूर गेली म्हणून मूल्य कमी झालं असं म्हणायचं का? सूर्य त्याच वेगाने उगवून मावळतो. पण आयुष्याचा प्रचंड वेळ खस्ता खाण्यात जात नाही, म्हणून तो आजकाल जास्त काळ टिकतो असं म्हणता येईल की.
इतके महाप्रचंड कष्ट होते म्हणूनच घरकामापलीकडे स्त्रियांना जाता आलं नाही. शिक्षण नाही, उत्पन्नाचं साधन नाही म्हणून पुरुषप्रधान व्यवस्थेत गुलाम म्हणून बहुतांश स्त्रियांना राबावं लागलं. ही गुलामगिरी बरीचशी कमी होणं हे मूल्यवर्धक नाही का? डॉक्टरांकडे चटकन जाता आल्यामुळे वाचलेले जीव हे मूल्य नाही का? मग पूर्वीच्या हलाखीला मूल्य म्हणत का कुरवाळत बसायचं?
फक्त स्त्रियाच कशाला?
फक्त स्त्रियाच नाहीत तर उच्चवर्णीय पुरुष, किंवा ज्यांची कामं मूलभूत गरजा भागवण्याची नव्हती ते, वगळता बाकी सगळेच.
फोटोंना पूर्वीएवढं मूल्य राहिलेलं नाही हे खरंच. पण आता इंटरनेटवर खरेदी करताना, किंवा कुठलं झाड अंगणात लावायचं याचा विचार करताना फोटो नसेल तर मी त्याकडे फार लक्षही देत नाही. किंवा लोकांनी काढलेले मांजरांचे फोटो-व्हिडिओ बघून मला फारच छान वाटतं. पूर्वी ही सोयच नव्हती. मांजर बघून आनंद मिळवणं, हाच प्रकार नवीन असेल.
पुरुषप्रधान व्यवस्थेत -
... म्हणून पुरुषप्रधान व्यवस्थेत गुलाम म्हणून बहुतांश स्त्रियांना राबावं लागलं.
हे वाचून, एका गावातील सगळे पुरुष हातात पारावर / चावडीवर गप्पागोष्टी करत, स्त्रियांना आदेश देत असे बसले आहेत आणि सगळ्या स्त्रिया त्या पुरुषांसाठी स्वयंपाक-पाणी, झाडलोट, भान्डीधुणी, नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी, मोठमोठी झाडे तोडणे, गोऱ्या-बैलांची अंडी करणे, झटक्यात बोकड कापून मांस काढणे, घरात निघणारे साप मारणे, बारा बलुतेदाऱ्या करणे... अशी सर्व कष्टाची कामे करत आहेत असं काहीसं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं.
स्त्री-पुरुष-बालके भेद सर्व
आजच्या तुलनेत काल मानवाला अधिक शारीरिक कष्ट करावे लागायचे. त्यात स्त्री-पुरुष-बालके असा भेद नव्हता, नाही, बहुतेक उद्याही नसेल.
त्या परिस्थितीत पुरुषसत्ताक व्यवस्था विरुद्ध गुलाम स्त्री असा काही element होता असे म्हणायचे असेल तर तो element आजही आहेच असे म्हणावे लागेल. पण माझ्या मते असा कोणता दखलपात्र element नव्हता, नाही.
अर्थात जगातल्या सर्वच समाजांत असे आहे असे नाही. "स्त्री ही पुरुषाची शेती, ती त्याला वाटेल तेंव्हा त्याने नांगरावी" असे विचारसरणी असणारा, त्या विचारसरणी चे समर्थन, संवर्धन करणारा मोठा समाज आहे. त्यांच्यात मात्र तुम्ही म्हणता तशी स्वपंथीय पुरुषसत्ताक व्यवस्था विरुद्ध सर्वपंथीय गुलाम स्त्री असा element कायमचा आहे.
दिवाळी अंक
दिवाळी अंक
एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद हा मराठी साहित्याच्या बहराचा काळ आहे. या काळात पुस्तकांमध्ये तसेच दिवाळी अंकांमध्ये अनेक प्रकारचे उत्कृष्ट साहित्य प्रकाशित होत गेले. अनेक लेखक त्यामुळे प्रकाशात आले. दिवाळी अंकांमधून कथा व कादंब-या प्रकाशित होत असत. त्या कादंब-या नामवंत प्रकाशकांकडून वाचल्या जात व पुढे त्यांची पुस्तके होत. स्वतःचे लेखन प्रथम वाचकांपुढे आणण्यात दिवाळी अंकांनी आघाडीची भूमिका बजावलेली आहे. नामांकित लेखकांची फळी सोडून दुसरी फळी तयार करण्यात या दिवाळी अंकांनी मोठीच कामगिरी बजावलेली आहे.
प्रत्येक दिवाळीत फराळासोबत अंक वाचण्यात आनंद असे. अंकांचा जाहिरात महिनाभर आधीच वाचायला मिळे. त्यात लेखक, व्यंगचित्रकार अशांची झलक असे. एखाद्या नव्या विषयावर लेख येणार असेल तर त्याचीही जाहिरात असे. यातून उत्सुकता तयार होई व अगदी दिवाळीचा पहिला दिवस उगवायच्या आधी दोन दिवस अंक हाती पडे. नव्वदनंतर तीस वर्षांत भरपूर दूरचित्रवाहिन्या आल्या. कथा वाहिन्यांवर मालिकांच्या स्वरुपात दिसू लागल्या. मालिका हे कादंब-यांचे व कथांचे नवे रुप. इंटरनेटच्या आगमनामुळे साहित्य इंटरनेटवरील साईटवर दिसू लागले. स्वतःच्या ब्लॉगवर तसेच इतरांनी तयार केलेल्या साईटवर साहित्य दिसू लागले. ते जगभरातील लोक वाचू लागले. संबंधित लेखक फक्त महाराष्ट्रात नाही तर जगात वाचला जात आहे. अशा जगव्यापी वाहिन्या व इंटरनेटमुळे लेखक सर्वदूर पोचला हे खरे पण छापील कागदाच्या वाचनावर परिणाम झाला. असे असले तरी दिवाळी अंकांचे आकर्षण पूर्ण ओसरलेले नाही. आजही अनेक अंक निघत आहेत व ते नवनव्या लेखकांना संधी देत आहेत. दिवाळी अंकांची जाहिरात वाचणे, अंक खरेदी करणे, अनुक्रमणिका वाचणे, संपादकीय वाचणे, साहित्याच्या शेजारी काढलेली चित्रे पाहणे व त्यात गुंतून जाणे हा आनंद इंटरनेट देऊ शकत नाही. छापील कागदावरील साहित्य वाचून मनात उठलेला भावकल्लोळ काही निराळाच. छापील दिवाळी अंक येत राहतील. येत राहावेत.
हतबलता आली आहे
शास्वती वाटत नाही.
उपचार मिळतील ह्याची शास्वती नाही.
ऑक्सिजन मिळेल गरज लागल्यावर ह्याची शाश्वती नाही.
आवश्यक औषध वेळेवर उपलब्ध होतील ह्याची शास्वती नाही.
बेड मिळेल ह्यांची शास्वती नाही.
हे सर्व मिळाले तरी जीव वाचेल ह्याची शाश्वती नाही.
लस मिळण्याची शाश्वती नाही.
किती ही काळजी घेतली तरी आपण बाधित होणारच नाही ह्याची शाश्वती नाही.
नोकरी टिकेल ह्याची शाश्वती नाही.
सर्व च बाबतीत कशाचीच शास्वती नाही.
त्या मुळे एक प्रकारे हतबल झाल्याची भावना आहे
खरोखर कठीण वेळ आणली ह्या महामारी.नी.
When Should .....
When Should You Have The Second Covid Vaccine Dose?
NDTV वरील हा लेख वाचा.
https://www.ndtv.com/india-news/coronavirus-when-should-you-have-the-2n…
वेंचुरा पद्धत वापरलेली असते.
घरच्या कुकींग ग्यास वाल्वमध्ये असते तशी. छिद्रातून ग्यास सुटतो तेव्हा तो बाजुची हवा खेचून नेतो. पुढे मिक्स होऊन ते मिश्रण जाळीदार तबकडीतून बाहेर पडते तेव्हा निळ्या ज्योतीने जळण्यायोग्य झालेले असते.
ओक्सीजन प्रेशरमध्ये असतो . छिद्रातून वेगाने निसटताना बाजूची हवा खेचतो आणि त्याची तीव्रता ( परसेंटेज) कमी होते. मध्ये एक पाण्याचा trap असतो त्यातून बुडबुडे येतात त्याने प्रमाण कळते.
एक कोडे
एका ग्रुपवर हे कोडे वाचले. नरेंद्रकडे 4 फूट लांबीचा एक फळा आहे. या फळ्यातून त्याला 3/4 फूट लांबीचे जास्तीत जास्त तुकडे काढायचे आहेत. तो किती तुकडे काढू शकेल? उरलेले फळकूट किती लांबीचे असेल? (या कोड्यासाठी रुंदीचा विचार करु नये)
1. 3/4 = 0.75 पकडून 4 ला 0.75 ने भागले तर, 4/0.75 गणितानुसार 5.333 उत्तर येते, - किंवा 5 तुकडे संपूर्ण लांबीचे आणि 1/3 फळकूट उरते
2. 3/4 + 3/4 +3/4 + 3/4+ 3/4 + 1/4 असे गणित केले तर या गणितानुसार 5 तुकडे संपूर्ण लांबीचे आणि 1/4 फूट फळकूट उरते
नरेंद्रचा हा काय जुमला आहे?
फळा / तक्ता यांचा पन्ना असतो.
म्हणजे की प्लाइवुड घेण्यास गेल्यास ते 4x6, 3x6 असे दोन साइजमध्ये मिळतात.
.
.
तर विचारलेला प्रश्न गणिती असेल पण प्रत्यक्ष व्यवहारात
वेगळा असतो. गिऱ्हाइकास एखादे शेल्फ, ड्रावर्सवाले कपाट, शोकेस करायची असते. तर सुतार लोक कमीतकमी तुकडे वाया जातील असे मापाचे करतात.
३/४ तीन - चार फुटांचे तुकडे का नऊ इंचांचे तुकडे?
------------
( अवांतर)
मला एक खोका बनवायचा होता. साधारण माप सांगितल्यावर दुकानदार म्हणाला की मिमिमध्ये अचूक माप आणा मी इथेच कापून देतो ते न्यायला सोपे. आणि योग्य साइजमधल्या तक्त्यातून कापून दिले.
कवितेने दिशादर्शक व्हावे?
ही बातमी वाचली - https://www.loksatta.com/nagpur-news/poet-aruna-dhere-poetry-appeals-to…
अरूणा ढेरे म्हणतात -
कधीकाळी कवीला कविर्मनिषी असे संबोधले जायचे. कारण, कवी हा ऋषीसारखा आहे. तो संभ्रमाच्या स्थितीत मार्गदर्शन करू शकतो. सभोवताल चौफेर अंधारात असताना जगाला एक नवीन प्रकाशवाट देऊ शकतो, असा विश्वास होता माणसांना. आज भयाची छाया दाहीदिशातून डोकावत असताना याच ऋषीच्या अर्थात कवीच्या कवितांनी पुन्हा एकदा दिशादर्शक होण्याची गरज आहे. त्यासाठी लिहित्या हातांनी पूर्ण क्षमतेनिशी आपल्या लेखणीला बळ द्यायला हवे
मी साहित्यिक वगैरे नाही. पण मला ह्याचा अर्थ समजला नाही. करोनाकाळात कवींनी काय करायचं असं ढेरे म्हणतात?
मला एक शंका आहे. मराठीत हे कवी-साहित्यिक खऱ्या जगात रहातात की त्यांचा काही वेगळा ग्रह आहे? साहित्यिक -(म्हणजे लिखाण करणारे) म्हणजे कुणी सुपरमॅन आहेत अशी त्यांची समजूत आहे का? हे शब्दांचं अवडंबर माजवून नक्की काय मिळतं? निव्वळ काहीतरी बोलायचं म्हणून आपली शब्दांची गोगलगायीसारखी वेटोळी जागोजागी टाकण्यात काय प्वाईंट आहे?
they need to to stop taking themselves so seriously, especially when they have neither the ability nor the credibility for it.
हे असलं काहीतरी ढोंगीपण बंद करायला हवं.
-----------
मी अरूणा ढेरे ह्यांना हे व्यक्तीश: म्हणत नाहीये, मला वाटतं त्यांच्याजागी आणखी कुणी मराठी साहित्यिक असते तरी त्यांनी असलेच काहीतरी अगडबंब शब्द वापरून मत व्यक्त केलं असतं.
Harald Helfgott
Harald Helfgott हे पेरु देशाचे आहेत, जेथे भाषा स्पॅनिश आहे. स्पॅनिशमध्ये Harald चा उच्चार हाराल्ड असा होतो पहा https://www.kidpaw.com/names/harald/pronounce#spanish
[उच्चारासंबंधीचे प्रतिसाद इथून हलवले आहेत. - संपादक]
मराठी लोकही इंग्रजी V
मराठी लोकही इंग्रजी V अक्षराचा उच्चार व्ह करतात आणि त्यातल्या अर्ध्या व चा बंगाली लोक ब करत असल्याने व्ह चा भ होतो.
मराठी: व्हेरी गुड :: बंगाली : भेरी गुड
मराठी : व्हिक्टरी :: बंगाली : भिक्टोडी
मराठी : युनिव्हर्सिटी :: बंगाली : युनिभार्सिटी
तसेच भाइट हाउस, भार्शन (Version) इत्यादि
अगदी!
उर्वरित भारताबद्दल अज्ञान तथा उर्वरित भारतीयांबद्दल अनास्था ही सर्वच भारतीयांच्या ठायी वसलेली आहे, त्याला कोण काय करणार?
१००%
घराजवळचं उदाहरण म्हणजे, गुजरात राज्य आणि गुजराती भाषा हे बरोबर आहे, गुजराथ आणि गुजराथी नाही.
दक्षिणेकडच्या इंग्लिश स्पेलिंग वरून थ आले असावे. त साठी th लिहितात, कारण t लिहिले तर इंग्लिश मध्ये त्याचा ट होतो, आणि थ हा त च्या जवळचा उच्चार आहे ट पेक्षा! एक भाषा दुसऱ्या लिपीत लिहिताना काय काय ligical कोलांट्या माराव्या लागतात.
बंगाली लोकांचे मिष्टिप्रेम, lol! कोलकाता एअरपोर्ट वर एक सूचना फलक वाचलेला...rossogula is considered a liquid item, and not allowed in carry on bags... असा काहीसा.
गुजराथ/गुजरात
घराजवळचं उदाहरण म्हणजे, गुजरात राज्य आणि गुजराती भाषा हे बरोबर आहे, गुजराथ आणि गुजराथी नाही.
एवढेच नव्हे, तर 'गुजरात'मधला किंवा 'गुजराती'तला 'ज' हा 'जिलबी'तला 'ज' आहे; (मराठी) 'जुलाबा'तला (किंवा 'जुलूमजबरदस्ती'तला कोणताही) 'ज' नव्हे.
दक्षिणेकडच्या इंग्लिश स्पेलिंग वरून थ आले असावे. त साठी th लिहितात
नाही, मला वाटते हे कारण नसावे. मराठीत परंपरेनेच गुजरातला 'गुजराथ' म्हणत असावेत. (जसे वडोदऱ्याला बडोदा, इंदौरला इंदूर आणि ग्वालियरला ग्वाल्हेर म्हणतात, तसे.)
----------
(बादवे, 'इंदूर'वरून आठवले. बंगालीत उंदराला 'इंदूर' म्हणतात.)
फ्रेंच भाषेतही h आणि r चा उच्चार
शिकावा लागतो.
उदाहरणार्थ
https://youtu.be/0uoh6ACUyVw
Learn French by Suchita.
रीजन्स
लिबरलायझेशन झाल्यावर अनेक परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात व्यवहार करू लागल्या. मी ज्या परदेशी कंपन्यात नोकरी केली त्या चार कंपन्या आणि नंतर एसेपी मध्ये परदेशी क्लायंट कंपन्या यांच्यापैकी कोणीही स्वतःच्या धंद्यात रीजन पाडताना भारत आणि पाकिस्तानला एका रीजन मध्ये टाकलेले पाहिले नाही. भारत, चीन एकत्र एशिया म्हणून असू शकतात किंवा इंडिया-साऊथ एशिया असा भारत, बांगला देश, श्रीलंका असा रीजन असू शकतो पण या दोन्ही मध्ये पाकिस्तान कधी नसतो.
हे भारत-पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्वामुळे असते की दोघांना एकत्र ठेवण्याचे काही फायदे नाहीत असं त्यांना वाटतं? पण पाकिस्तानला मिडल ईस्ट बरोबर ठेवण्याचाही तसा काही फायदा दिसत नाही.
अमेरिकेने पाकिस्तानवर अनेकदा
अमेरिकेने पाकिस्तानवर अनेकदा निर्बंध (sanctions) घातले असल्याने बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांची फारशी गुंतवणूक नसेल, शिवाय पाकिस्तान अगदीच किरकोळ असे मार्केट असल्याने इतकी जोखीम घेऊन कोण उद्योग करणार असे वाटत असेल.
भौगोलिक वर्गीकरण करताना दक्षिण आशियातच धरतात पाकिस्तानला आमच्या कंपनीत तरी.
मनमोकळेपणे
श्री लिमये ह्यांनी नेहमीच्याच मनमोकळेपणे आवश्यक तो बदल केला आहे. [संपादक : प्रा. बालमोहन लिमये यांच्या या लेखावरील प्रतिसाद इथे हलवले आहेत.]
र्हस्व-दीर्घ प्रकरणाचा मराठीत पुरता बट्ट्याबोळ झाला आहे ह्याविषयी इथे पूर्वी बोलणे झालेले आहे. आकार, उकार, वेलांट्या ह्यांच्या बाबतीत काही वेळा तरी सावध रहावे लागते. उदाहरणार्थ, 'वीरांगना' ह्याचा अर्थ शूर स्री असा होतो, तर 'वारांगना' ह्याचा अर्थ वेश्या असा होतो. बरेच दगड भारतीय राष्ट्रगीत गाताना "पंजाब सिंधु गुजरात मराठा" म्हणण्याऐवजी "पंजाब सिंध गुजरात मराठा" असे म्हणतात.
ह्याशिवाय इंग्रजी शब्दलेखनात साधर्म्य असलेले काही शब्द काही उच्चशिक्षित लोकांचाही गोंधळ उडवतात. उदाहरणार्थ, incident (म्हणजे घटना, प्रसंग) ह्याऐवजी incidence हा साफ चुकीचा शब्द वापरणे.
असो, ह्या विषयावर लिहू तेवढे थोडेच.
'सिंधु'/'सिंध' ('न'बांचे मत...)
हिंदीमधील त्या ओळीत बाकी विशेषनामे प्रांतवाचक असल्यामुळे “सिंध” शब्दच मला योग्य वाटतो. “सिंधु” शब्द “यमुना गंगा” च्या ओळीत योग्य ठरला असता.
मूळ बांग्लामधे “सिंधु” आहे हे खरे आहे, पण ते का, हे मला ठाऊक नाही. नबा, तुमचे मत काय?
बाकी विशेषनामांपैकीसुद्धा (कदाचित 'पंजाब' आणि 'वंग' = बंगाल वगळल्यास) कोणतेही विशेषनाम प्रांतवाचक नाही. (किंबहुना, 'पंजाब' आणि 'वंग' केवळ योगायोगाने प्रांतवाचकसुद्धा आहेत, असा दावा करता येईल.)
ही सर्व conceptual भौगोलिक प्रदेशांची लोकप्रिय नावे आहेत.
१. सिंध/सिंधु, गुजरात, मराठा: जेव्हा हे काव्य लिहिले गेले, तेव्हा हे प्रांत अस्तित्वात नव्हते. सिंध हा मुंबई प्रांताचा भाग होता. गुजरातचे काही भाग मुंबई प्रांतात होते, तर सौराष्ट्र, वडोदरा वगैरे भाग संस्थानी होते. मराठा (Mahratta - 'महाराष्ट्र'चा इंग्रजी अपभ्रंश?) असा कोणताही 'प्रांत' कधीही अस्तित्वात नव्हता. (भौगोलिक प्रदेश conceptual स्वरूपात असावा - अन्यथा लोकमान्यांचे Mahratta वर्तमानपत्र, Madras and Southern Mahratta Railway, किंवा (स्वातंत्र्योत्तर काळात परंतु महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी) अत्र्यांचे 'दैनिक मराठा' आदि एंटिट्या अस्तित्वात येत्या ना! - मात्र, त्याच्या भौगोलिक सीमा निश्चित नसाव्यात.) आणि, पुढे १९६०मध्ये जे 'महाराष्ट्र' राज्य स्थापन झाले, ते इंग्रजकालीन (अ) मुंबई प्रांत, (ब) मध्य प्रांत तथा वऱ्हाड (Central Provinces and Berar), तथा (क) हैदराबाद संस्थान या एंटिट्यांचे विविध भाग तोडून ते एकत्र जोडून बनवण्यात आले. सांगण्याचा मतलब, (हे गीत जेव्हा लिहिले गेले, तेव्हा, किंवा कधीसुद्धा) 'मराठा' असा काही प्रांत अस्तित्वात नव्हता. (असा भौगोलिक प्रदेश मात्र जनमानसात vague conceptual स्वरूपात असावा. किंबहुना, 'महाराष्ट्र' अशी काही संकल्पनासुद्धा असावी; मात्र, असा काही प्रांत किंवा राज्य ब्रिटिश राज्यात किंवा तदनंतर १ मे १९६०पूर्वी कधीही अस्तित्वात नव्हते.))
२. 'द्राविड': असा कोणताही प्रांत नव्हता. (हा एक सांकल्पनिक प्रदेश मात्र म्हणता येईल.) 'द्राविड' संकल्पनेखाली मोडण्यासारखा प्रदेश हा (अ) मुंबई प्रांत, (ब) मद्रास प्रांत, (क) म्हैसूर संस्थान, (ड) हैदराबाद संस्थान, तथा (ई) Travancore and Cochin संस्थान (बोले तो, आजचा तिरुवनंतपुरम-कोची प्रदेश?), किमान इतक्या तरी एंटिट्यांमधून विखुरलेला होता.
३. 'उत्कल' बोले तो ओरिसा/ओड़ीसा. 'उत्कल' नावाचा कोणता प्रांत तर तेव्हा अस्तित्वात नव्हताच, परंतु 'ओरिसा'सुद्धा नव्हता. त्या वेळेस तो बंगाल प्रांताचाच भाग होता. 'बिहार आणि ओरिसा' असा प्रांत पुढे १९१२मध्ये बंगाल प्रांतापासून वेगळा झाला, आणि, त्यानंतर, १९३६मध्ये 'बिहार आणि ओरिसा' प्रांतातील ओड़ियाभाषक भाग तथा मद्रास प्रांताचा उत्तरेकडील ओड़ियाभाषक भाग एकत्र जोडून वेगळा 'ओरिसा' प्रांत निर्माण करण्यात आला. सांगण्याचा मतलब, (हे गीत जेव्हा लिहिले गेले, तेव्हा) 'उत्कल' असा काही प्रांत अस्तित्वात नव्हता.
४. किंबहुना, 'वंग' बोले तो बंगाल, हा नक्की कोठला बंगाल धरायचा? १९०५ साली त्याअगोदरच्या बंगाल प्रांताची फाळणी 'बंगाल' आणि 'पूर्व बंगाल तथा आसाम' अशा दोन प्रांतांत झाली. ती रद्द करण्यात येईल, अशी घोषणा जरी पंचम जॉर्ज बादशहाने १९११ साली आपल्या भारतभेटीच्या वेळेस केली, तरी ती प्रत्यक्षात अमलात यायला १९१२चा मार्च महिना उजाडला. म्हणजेच, हे गीत लिहिले गेले, तेव्हा 'बंगाल' आणि 'पूर्व बंगाल तथा आसाम' असे दोन प्रांत अस्तित्वात होते. पैकी, 'वंग' म्हणताना रवींद्रनाथांना फक्त (तत्कालीन) 'बंगाल' प्रांत अभिप्रेत होता, 'पूर्व बंगाल तथा आसाम' नव्हता, ही गोष्ट (विशेषत: रवींद्रनाथ स्वत: मूळचे पूर्व बंगालातले जमीनदार होते, ही बाब लक्षात घेता) केवळ अतर्क्य आहे. त्याउपर, तत्कालीन बंगाल प्रांतात समाविष्ट असलेले बिहार, ओरिसा वगैरे भागसुद्धा रवींद्रनाथांना 'वंग'मध्ये अभिप्रेत नसावेत, असे मानायला जागा आहे. (अन्यथा, त्याअगोदर 'उत्कल'चा वेगळा उल्लेख येता ना.)
सांगण्याचा मतलब, 'सिंध/सिंधु, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग' हे उल्लेख प्रांतनामांचे नसून (सांकल्पनिक) भौगोलिक प्रदेशांचे आहेत. आणि, एवढा preponderance of evidence लक्षात घेता, 'पंजाब'चा उल्लेखसुद्धा प्रांतवाचक नसून (सांकल्पनिक) भौगोलिक प्रदेशाचा असावा, असे मानावयास जागा आहे.
थोडक्यात, त्या ओळीतील विशेषनामे ही प्रांतवाचक नसून (सांकल्पनिक) भौगोलिक प्रदेशवाचक आहेत.
राहता राहिली गोष्ट 'सिंधु'विषयीची. एकदा (सांकल्पनिक) भौगोलिक प्रदेशांचीच गोष्ट करायची झाली, तर रवींद्रनाथांनी (साधारणत: आजच्या सिंधशी मिळताजुळता प्रदेश, अशाच अर्थी, परंतु) सिंधु नदीच्या अवतीभवतीचा भौगोलिक प्रदेश अशा अर्थी 'सिंधु' हा शब्द योजिला असू शकेल, असा तर्क मांडता यावा काय? (वस्तुत: सिंधु नदी ही सिंधप्रमाणेच लद्दाख तथा पश्चिम पंजाब विभागांतूनसुद्धा वाहत असली, तरीसुद्धा?)
आणि “कबुतरांत मांजर ठेवायची” झाली, तर हे काव्य किंग जॅार्ज (दुसरे) यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर लिहिले गेले होते हे नाकारता येत नाही!
१. दुसरे नव्हे, पाचवे.
२. हे गीत पंचम जॉर्ज बादशहाच्या भारतभेटीसमयी ('समयी'. 'निमित्त' नव्हे.) घडलेल्या काँग्रेस अधिवेशनात गायले गेले. त्याच अधिवेशनात, बादशहाचे हिंदुस्थानात स्वागत करणारा तथा बादशहाप्रति निष्ठा करणारा ठराव (तत्कालीन पद्धतीस अनुसरून) पारित करण्यात आला. इथवर मतभेदाचा कोठलाही मुद्दा नाही.
३. त्यावरून, अधिक या गीतातील 'भारतभाग्यविधाता' वगैरे शब्दांवरून, हे गीत रवींद्रनाथांनी पंचम जॉर्ज बादशहाचे लांगूलचालन करण्याकरिता लिहिले, अशी एक किंवदन्ता अथवा लोकापवाद प्रचलित आहे, याबद्दल कल्पना आहे.
४. या लोकापवादाचे पु.लं.नी कोठेतरी (बहुधा 'वंगचित्रे'मध्ये? चूभूद्याघ्या.) केलेले सविवेचन खंडनसुद्धा वाचनात आलेले आहे. मात्र, ते फार पूर्वी वाचलेले असल्याकारणाने, तसेच ते पुस्तक तूर्तास हाताशी नसल्याकारणाने, त्यातील मुद्दे या क्षणी लक्षात नाहीत.
५. या लोकापवादाचे खुद्द रवींद्रनाथांनी केलेले खंडन असलेले त्यांचे एक पत्र उपलब्ध आहे, असे विकीवरून कळते.
६. त्या अधिवेशनात ते गीत ईशस्तुतिपर गीत म्हणून गायले गेले होते, मात्र, अँग्लोइंडियन प्रेसने बातमी देताना अनाकलनापोटी त्याचा विपर्यास केला, अशीही या घटनाक्रमाची एक आवृत्ती आहे, असे कळते. (देशी प्रेसने मात्र त्याची 'ईशस्तुतिपर गीत' म्हणूनच बातमी दिली, असे त्याच आवृत्तीत म्हटले जाते.)
७. त्या अधिवेशनात ते गीत ईशस्तुतिपर गीत म्हणून म्हटले गेले, त्यानंतर बादशहाच्या स्वागताचा तथा बादशहाप्रति निष्ठेचा ठराव पारित झाला, आणि त्यानंतर दुसऱ्या कोणाचे तरी बादशहास्तुतिपर असे हिंदी भाषेतील गीतसुद्धा म्हटले गेले, आणि ढिसाळ अँग्लोइंडियन प्रेसने या गीताची शेपूट त्या गीताला जोडून बातमी दिली, अशीही या घटनाक्रमाची एक आवृत्ती आहे, असेसुद्धा कळते.
असो. या बाबतीत कोणत्याही बाजूने कोणत्याही व्यक्तिगत निष्कर्षाप्रत मी अद्याप पोहोचलेलो नाही.
न'बा, बरेच मुद्दे मांडले आहेत.
उत्कल - तसा देश नव्हता मान्य.
खानदेश, विदर्भ,काठियावाड यासारखे उत्कल आहे.
आताआताची गोष्ट म्हणजे जनगणनेसाठी गेलेल्या माझ्या मित्राचा अनुभव. आताचा पत्ता, मूळगाव,भाषा कोणकोणत्या असे प्रश्न विचारता एक बाई "सौराष्ट्र" वर अडून बसली. कच्छ म्हणा किंवा जुनागढ, जामनगर इत्यादी हो म्हणेना. फॉर्ममध्ये सौराष्ट्र नव्हते.
(बादवे...)
जालियानवालाबागेतील घटनेपर्यंत
जलियाँवाला बाग. असो.
(बाकी ठाकुर/टागोर वादात पडत नाही. 'Tagore' हे माझ्या कल्पनेप्रमाणे 'ठाकुर'चे आंग्लीकृत स्पेलिंग असावे. अनेक बंगाली लोक इंग्रजीत आपल्या आडनावांची अशी आंग्लीकृत रूपे वापरीत, असे वाचून आहे. (उदा. बसू = Bose, मित्र = Mitter, राय = Ray किंवा Roy, चट्टोपाध्याय = Chatterjee, वगैरे. त्यातलेच ठाकुर = Tagore.) टागोर इंग्रजीत आपल्या आडनावाचे स्पेलिंग Tagore असे करीत असतीलही, परंतु, बंगालीत लिहिताना ठाकुर असेच लिहीत. मात्र, इंग्रजीत लिहिताना का होईना, टागोर स्वत:च आपले आडनाव Tagore असेच लिहीत असल्याकारणाने, मराठीत लिहिताना त्यातले कोठले रूप (किंवा कदाचित दोन्हीं?) वापरणे उचित ठरेल, याबद्दल मी साशंक आहे. तीच गोष्ट माधवराव शिंदे/सिंदिया यांजबद्दल.)
व्हिडियो पाहिला.
'सहस्र'बद्दल बाईंचे म्हणणे बरोबरच आहे. मात्र, 'सहस्त्र' हा शब्द चुकीचा आहे, हे ठसविताना, त्या (चुकीच्या) शब्दाची (संभाव्य) फोड आणि त्याचा (संभाव्य) अर्थ यांबद्दल बाईंनी जे तारे तोडलेले आहेत, त्याला तोड नाही.
सह + अस्त्र = सहस्त्र होऊ नये, सहास्त्र व्हावे.
In any case, 'सहस्त्र' चूक आहे, हे बाईंचे म्हणणे बरोबरच आहे; मात्र, ते पटविण्यासाठी उदाहरण देताना बाईंनी पतंग उडविलेले आहेत.
असो चालायचेच.
सहस्र (परत एकदा)
काही लोक 'सहस्त्रबुध्दे' असे आपल्या आडनावाचे शब्दलेखन करताना आढळतात. हे मूळ संस्कृतशी प्रतारणा करणारे असले तरी आता 'मराठी'त रुळणार/रुळले का? आंतरजालावरच्या अनेक शब्दकोशांत आणि पुस्तकांच्या शीर्षकांतही 'सहस्त्र' असे लिहिलेले दिसते. शेवटी चुकीच्या गोष्टी रुळणे ही नवी बाब नाही. सर्व सहस्रबुध्दे/सहस्त्रबुध्दे लोक आपल्या बरोबर/चूक लिखाणाशी प्रामाणिक राहून तसेच आपले नाव उच्चारत असावेत असे धरून चालतो, पण पूर्ण खात्री नाही.
उच्चार आणि लिखाण ह्यांत पूर्ण विसंगती असलेली मराठीतील एक ठळक गोष्ट म्हणजे 'पाणी' हा शब्द. आपण बोलताना (उदाहरणार्थ, "मला पाणी पाहिजे") सहसा कधीही 'पाणी' असा उच्चार न करता 'पाणि' असा उच्चार करतो, मात्र लिहिताना 'पाणि' असे लिहिणे चूक धरले जाईल.
सहसा कधीही 'पाणी' असा उच्चार
सहसा कधीही 'पाणी' असा उच्चार न करता 'पाणि' असा उच्चार करतो
'पाणि' असा उच्चार कधी ऐकल्याचे आठवत नाही. (कल्पना करून पाहातोय. कानाला चमत्कारिक जाणवते.)
----------
अतिअवांतर: बंगालीत पाण्याकरिता 'जल' (জল, उच्चारी: 'जोल') आणि 'पानि' (পানি) असे दोन्हीं शब्द आहेत. मात्र, बंगाली माणूस बोलताना पाण्याकरिता यांपैकी कोणता शब्द वापरतो, त्यावरून तो हिंदू/भारतीय आहे की मुसलमान/बांग्लादेशी, ते ओळखता येते, असे ऐकून आहे.
प्रश्न
काही प्रश्न ठरवून सोडवले जात नाहीत.
1) काश्मीर प्रश्न कधीच सुटू नये असे भारत आणि पाकिस्तान ह्या दोघांना पण (लोक नाही सरकार) वाटते .
तो प्रश्न जर सहज सुटला तर पाकिस्तान आणि भारत ह्या देशातील राजकारणी निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार .
धार्मिक मुद्ध्या शिवाय बाकी कोणत्याही मुद्द्यावर निवडणूक लढवायची झाली .
तर एकुणएक सर्व राजकीय पक्ष दोन्ही देशातील ह्यांच्या जवळ सांगण्या सारखे काहीच नाहीच.
सर्वच क्षेत्रात फक्त बोंब आहे.
हा प्रश्न मला पडतो काश्मीर प्रश्न सुटला तर भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशातील राजकीय पक्षांचे भवितव्य काय असेल.
राजेश भाऊ,
राजेश भाऊ,
स्त्रिया देखील हत्यार घेवून युद्धात सहभाग घेत आहेत. ही बातमी वाचा आणि फोटो बघा. आता हे सैनिक नक्की कोणते हत्यार वापरुन शत्रुला नामोहरम करणार आहेत ते कळाले नाही बुवा !
डिजिटल माध्यम लेखक आणि वाचक.
डिजिटल माध्यम लेखकांना वेगवेगळ्या संस्थळांवर एकच लेख कॉपी पेस्ट करावा लागतो ही माध्यमांची शोकांतिका आहे का वाचकांचा हट्टीपणा?
( वाचक फक्त वाचनमात्र राहात असतील, सभासद होत नसतील तर ते समजू शकत नाही.)
छापील माध्यमांना मर्यादा पडतात. वेगवेगळी पुस्तके, पेपर विकत घेऊन वाचक वाचू शकत नाही आणि एका ठिकाणचे लेखन दुसरीकडे प्रसिद्धीसाठी देता येत नाही.