करोना : आज ‘मास्क’वर बोलू काही...

मूळ लेखक : डॉ. एरिन ब्रोमेज, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स, डार्टमथ येथे जीवशास्त्राचे असोसिएट प्रोफेसर
टीप : प्राण्यांमधील संसर्गजन्य रोग, त्यांच्या साथी, आणि इम्युनॉलॉजी यावर ब्रोमेज यांचे संशोधन आहे. सदर लेख त्यांच्याच संकेतस्थळावर नुकताच प्रकाशित झाला आहे. त्या लेखाचा हा स्वैर अनुवाद.

मराठी अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर

-------------------

मास्क हा विषय सार्वजनिक आरोग्याचा प्रांत आहे, त्यामुळे सध्या चालू असलेलं या विषयाचं राजकारण ही गोष्ट खेदाची आहे. अनेक कारणांनी या संदर्भात उलटसुलट मतप्रवाह प्रसृत झाले आहेत. प्रस्तुत लेखात मास्कचं महत्त्व सोप्या शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे.

Photo by Rajesh Balouria from Pexels
राजेश बलुरिया यांचे छायाचित्र (सौजन्य : पेक्सेल्स)

आपण जेव्हा श्वासोच्छवास घेतो, बोलतो, शिंकतो, खोकतो, ओरडतो, किंवा गातो तेव्हा सूक्ष्म द्रवकण आपल्या नाकातोंडावाटे आजूबाजूच्या हवेत सोडले जातात. या द्रवकणांमध्ये व्हायरसेस आणि बॅक्टेरियाही असतात. यातले बॅक्टेरिया बघणं तसं सोपं असतं. नुकताच माझ्या मुलाने शाळेत एक छोटा प्रयोग केला - कोणताही आजार नसलेला माणूस एकदा खोकला, तर त्यामध्ये किती बॅक्टेरिया असतात हे शोधून काढणं. यासाठी तो ‘न्यूट्रिअंट अगार प्लेट’वर खोकला. ती प्लेट त्यानं ’कल्चर’ केल्यावर त्यावर बॅक्टेरियाच्या असंख्य ‘कॉलनीज’ पैदा झाल्या. चित्रातला प्रत्येक ठिपका म्हणजे २४ तासात वाढलेली एक कॉलनी. एका कॉलनीत अब्जावधी बॅक्टेरिया असतात. व्हायरसेस मोजणं त्यामानानं अवघड काम. त्या करता पेशी असलेल्या टिश्युकल्चर प्लेटवर खोकल्यातले द्रवकण कल्चर करावे लागतात. हे प्रयोगही जगभर अनेक प्रयोगशाळांमध्ये केले गेले आहेत.

बॅक्टेरियाच्या असंख्य कॉलनीज
बॅक्टेरियाच्या असंख्य कॉलनीज (प्रातिनिधिक चित्र)

बोलतांना हे सूक्ष्म द्रवकण तोंडावाटे दूर फेकले जातात. त्यात ‘प’, ‘क’, ‘ट’ सारखे ध्वनी उच्चारतांना हे द्रवकण जरा जास्त लांबपर्यंत पोचतात. यातले मोठे (१०० मायक्रोमीटर व्यासाचे) कण सुमारे तीन फुटांपर्यंत लांब जमिनीवर पडतात, छोटे कण सहा फुटांपर्यंत, तर अतिसूक्ष्म कण (ड्रॉपलेट न्यूक्लीआय) खूप लांबवर जाऊन पोचतात. त्यामुळे इन्फेक्शन होण्याच्या दृष्टीने ० – ६ फुट अंतर म्हणजे धोक्याचं क्षेत्र. ६ फुटांपलीकडे ‘ड्रॉपलेट न्यूक्लीआय’ हेच काय ते धोका उत्पन्न करू शकतात.

मोठ्या द्रवकणांमध्ये अर्थातच जास्त व्हायरस कण मावतात. पण म्हणून छोटे कण कमी धोकादायक असतात असं नव्हे, कारण हे कण श्वसनसंस्थेत जास्त खोलवर, म्हणजे थेट फुफ्फुसांच्या आतपर्यंत पोचू शकतात.

सहा फुटांपर्यंत धोक्याचं क्षेत्र
सहा फुटांपर्यंत धोक्याचं क्षेत्र

समोरासमोर बोलणं (फेस-टू-फेस संभाषण)
समाजात श्वसनसंस्थेशी संबंधित संसर्गजन्य रोग पसरला असेल तर समोरासमोर बोलणं हे खूप धोकादायक ठरू शकतं. संसर्ग झाल्यापासून लक्षणं दिसू लागायला पाचएक दिवस ज्यामध्ये लागतात, अशा सध्याच्या SARS-CoV2 च्या बाबतीत ही परिस्थिती जास्तच चिंताजनक होऊन बसते.

अंतर आणि काल
अर्थातच तुम्ही समोरच्या व्यक्ती पासून जितके जास्त लांब, तितका धोका कमी. ६ फुटांपेक्षा लांबवर द्रवकण पोचता पोचता आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात विखुरले जातात, आणि धोका कमी होतो. त्याचप्रमाणे संभाषण जितका जास्त वेळ चालेल, तितका धोका जास्त.

स्थल
वारा असल्यास, किंवा वातानुकूलित जागेतील हवेच्या झोतामुळे मोठे द्रवकणही जमिनीवर पडण्याअगोदर बोलणाऱ्यापासून ६ फुटांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोचू शकतात. त्यामुळे हवेच्या या हालचालींवर लक्ष ठेवलेलं बरं. शक्य असल्यास वाऱ्याच्या दिशेला काटकोनात उभं राहून बोलणं इष्ट, जेणेकरून दोन्ही व्यक्तींच्या तोंडावाटे बाहेर पडणारे द्रवकण एकमेकांपासून दूर जातील.

मास्क
तुम्ही बोलतांना, शिंकतांना, खोकतांना, ओरडतांना, किंवा साधा श्वासोच्छवास घेतांना अगदी साधा मास्कही लावल्यानं तुमच्या नाकातोंडावाटे बाहेर पडणारे जवळजवळ सर्व मोठे आणि मध्यम आकाराचे द्रवकण मास्कच्या आतल्या पृष्ठभागावर आडवले जातात. मास्क जितका चांगल्या दर्जाचा, तितके जास्त सूक्ष्म कणही तो आडवू शकतो. मास्कचा दर्जा ठरतो, तो यावर :

  • तो चेहऱ्यावर किती चपखल बसतो
  • प्रत्यक्ष कापडातून किती हवा जाते, आणि किती हवा डोळ्याच्या किंवा चष्म्याच्या आजूबाजूने जाते
  • कोणत्या प्रकारचं कापड मास्कसाठी वापरलं गेलंय

मास्कबद्दल अनेक लेख लिहिले गेले असले तरी, अजून आपल्याकडे ‘हार्ड डेटा’ नाही. प्रत्येक मास्क वेगळा, आणि प्रत्येक माणूस तो वेगवेगळ्या प्रकारे घालतो. त्यामुळे यावर ठोस सल्ला देणं अवघड आहे. चांगला मास्क किमान ५०% द्रवकण तरी रोखून धरत असावा. विविध प्रकारची कापडं वापरून बनवलेला बहुपदरी मास्क कदाचित ९०% पर्यंत कण रोखू शकतो असा अंदाज आहे. (अधिक माहितीसाठी पाहा : Aerosol Filtration Efficiency of Common Fabrics Used in Respiratory Cloth Masks)

कापडी मास्कमुळे सर्वात छोट्या अशा ड्रॉपलेट न्यूक्लीआयपासून तुमचं संरक्षण होईल असा ठोस पुरावा उपलब्ध नाही, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. सर्वांनी कापडी मास्क वापरल्यामुळे बाहेर फेकल्या जाणाऱ्या द्रवकणांचं प्रमाण कमी होतं, हा मास्क वापरण्यामागचा मुख्य हेतू. म्हणजेच प्रत्येकानं आपापल्या नाकातोंडावाटे बाहेर पडणारे द्रवकण आटोक्यात ठेवायचे, आणि हवेत पसरणाऱ्या व्हायरस कणांची संख्या कमी करून सर्वांना असलेला धोका कमी करायचा.

माझा मास्क तुमचं संरक्षण करतो, आणि तुमचा मास्क माझं संरक्षण करतो

वेगळ्या शब्दांत सांगायचं तर – मास्क लावल्यामुळे तुम्ही जितके कमी व्हायरस हवेत सोडाल, तितका जास्त वेळ तुम्ही सुरक्षितपणे समोरासामोर संभाषण करू शकाल.

बंदिस्त जागेत मास्कची भूमिका काय?
ऑफिस सारख्या बंदिस्त जागांमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीबद्दल मी माझ्या अगोदरच्या लेखात चर्चा केलीच आहे. हवा पुरेशी खेळती नसेल, किंवा पुरेशी फिल्टर केलेली नसेल, तर व्हायरस त्या ठिकाणी साठून राहू शकतो. इथेही ‘व्हायरस एक्स्पोजर’ आणि काल हे गणित लागू होतं. त्यामुळे चांगल्या दर्जाचा मास्क वापरला तर तुम्ही हवेत कमी व्हायरस सोडता, आणि त्यामुळे जास्त काळ तुम्ही बंदिस्त जागेत सुरक्षित राहू शकता.

मी बंदिस्त आणि ‘शेअर्ड’ जागेत काम करतो. मी काय करावं?

  • उत्तम दर्जाचा, विविध प्रकारची कापडं वापरून बनवलेला, बहुपदरी मास्क वापरा. त्याला नाकावर बसणारी क्लिप असेल तर आणखी उत्तम. यामुळे जास्तीतजास्त हवा कापडामधून जाईल, आणि आजूबाजूने कमी.
  • ऑफिसमध्ये बाहेरची हवा जितकी जास्त आत घेता येईल तितकं चांगलं. त्याने बंदिस्त जागेतला व्हायरल लोड कमी होईल.
  • वातानुकूलन असेल तर त्यात उत्तम दर्जाची – शक्य असल्यास UV फिल्टर्स बसवून घ्या. दवाख्यान्यासारख्या छोट्या बंदिस्त जागेत पोर्टेबल HEPA फिल्टर सिस्टिम बसवता आली तर बघा. मॅनेजर मंडळींनी या संदर्भात प्रा. जोसेफ ॲलेन यांचा लेख जरूर वाचावा.
  • संसर्ग टाळण्यासाठीचा एक उपाय म्हणजे मास्क. १००% संरक्षण देत नसला तरी.
  • बाह्य वातावरणात, आणि बंदिस्त जागेत (फक्त थोड्या वेळेकरता) डिस्टन्सिंग उपयुक्त आहे, पण बंदिस्त जागेत केवळ डिस्टन्सिंग पुरेसं नाही.

मास्कचा वापर जीवशास्त्राच्या तत्त्वांवर आधारित आहे. त्यांचा वापर डिस्टन्सिंग, आणि हात व्यवस्थित आणि वेळोवेळी धुण्याच्या बरोबरीने केला गेला पाहिजे. प्रत्यक्ष जगात साथीचा प्रसार थोपविण्याच्या दृष्टीने त्यांचा खूप उपयोग होतो असे पुरावे उपलब्ध आहेत.

१०२ वर्षांपूर्वी देखील लोकांना मास्कचं महत्त्व माहित होतं. हा फोटो स्पॅनिश फ्लूच्या साथीच्या दरम्यान १९१८ मध्ये खेळल्या गेलेल्या जॉर्जिया टेक फुटबॉल सामन्याच्या वेळी घेतला गेला होता. पण आता मास्कचा वापर राजकारणाचा विषय बनला आहे त्यामुळे लोक अशी काळजी घेताना दिसत नाहीत.

१९१८ :  जॉर्जिया टेक फुटबॉल सामना
१९१८ : जॉर्जिया टेक फुटबॉल सामना

जाता जाता

  • मास्कमधून आत घेतली जाणारी हवा कितपत फिल्टर होते, हा मुद्दा मी बाजूला ठेवला आहे. इथे माझा भर ‘माझा मास्क तुमचं, आणि तुमचा मास्क माझं संरक्षण करतो’ यावर आहे. अगदी साधा मास्कही हे काम करतो.
  • कापडी मास्क माझं संरक्षण करतील का? काही मास्क आत घेतली जाणारी, आणि बाहेर जाणारी हवा फिल्टर करतात, पण त्यांनी मिळणारं संरक्षण हे शेवटी मास्क तुमच्या चेहऱ्यावर नीट बसतात का, आणि ते कशापासून बनवले आहेत यावर ठरतं.
  • व्हाल्व-युक्त मास्क – यातून हवा कदाचित नेहमीपेक्षा जास्त वेगाने बाहेर फेकली जाते आणि त्यामुळे द्रवकण जास्त लांबपर्यंत जाऊ शकतात. यातल्या फिल्टरमुळे तुमचं संरक्षण होत असलं, आणि मोठे द्रवकण बाहेर पडू शकत नसले तरी, व्यापक, सार्वजनिक विचार केला तर हे मास्क कुचकामी ठरतात.
  • N95 किंवा KN95 का नाही? हे मास्क आत घेतली जाणारी, आणि बाहेर जाणारी हवा फिल्टर करून उत्तम संरक्षण देऊ शकतात – जर ते व्यवस्थित बसवले गेले तरच. आणि ही गोष्ट सोपी नाही. आत-बाहेर जाणारी हवा फक्त आणि फक्त त्या विशिष्ट मटेरियलमधूनच गेली पाहिजे. आणि बहुतांश लोक हा मास्क नीट लावतच नाहीत. त्यामुळे निवडक लोकांपुरतेच हे मास्क उपयोगी आहेत.
  • मास्क नियमितपणे धुवावेत – विशेषतः तुम्ही दीर्घ काळ ते घालणार असाल तर. साधा साबण आणि पाणी यासाठी पुरेसं आहे. अधिक माहितीसाठी हे पाहा.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ :

-------------------
(अनुवादक पुण्यातील एका नामवंत वाहननिर्मिती कंपनीतून वैद्यकीय अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.)

निवेदन : सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे. प्रताधिकार उल्लंघन करण्याचा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.

मूळ लेखाचा दुवा
© 2020 Erin S. Bromage, Ph.D., Associate Professor of Biology at the University of Massachusetts Dartmouth.
This translation and the images accompanying it are provided on a not-for-profit basis and only meant for educational purposes. Neither Aisi Akshare nor the translator stand to gain anything on a commercial basis by this.

field_vote: 
0
No votes yet

उत्तम आणि उपयुक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरे आहे. अतिशय उत्तम माहीती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोज नियमित जसे बाहेर पडताना चप्पल, बूट,कपडे
वापरतो कधीच विसरत नाही तसे मास्क लोक नियमित ,रोज वापरणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वापरतील वापरतील. तरुण लोकंही मृत्युमुखी पडतायत. तेव्हा जीवन-मृत्युचा प्रश्न आहे. न वापरुन जातात कुठे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0