आन्सर क्या चाहिये? : अॅडमिशन वगैरे
भाग १ : भाग २ : भाग ३ : भाग ४ : भाग ५ : भाग ६ :
भाग ७
रिझल्ट लागल्यावर मी बारावीचं मढं पुरलं एकदाचं. एवढी कडवट चव बाकी कधीच कुठल्या वर्षाने मागे ठेवली नव्हती. अख्खं वर्ष पीसीएम ह्या शब्दांतच गेलं. मि़ळाले २८९/३००. आई-बाबा खूष.
बारावीचा एवढा राग यायचं अजून एक कारण आहे. विषय मस्त होते, ह्या दळभद्र्या वर्षाने ते नीट एंजॉयपण करू दिले नाहीत. Conics, Derivatives, Integration ह्या कसल्या अफलातून कन्सेप्टस आहेत. आरामात जर चहाच्या घोटाबरोबर एखाद्यावेळी ही गणितं सोडवली तर पट्कन सुटतात. मजा येते. पण इथे कोणी मस्तपैकी वेळ घेत असं करायलाच देत नाहिये. क्रिकेट खेळताना जर फक्त जिंकायचंय म्हणून खेळलं, तर मग क्रिकेटची काय मजा? एखादा फसलेला शॉट, हुकलेला कॅच आणि मग जमलेला यॉर्कर ह्या लयीत मजा आहे. जाऊ दे. झालंगेलं इन्फिनिटीला मिळालं.
.
परत मी काही मोठ्या लोकांसारखा नाही. हे म्हणजे साले लहानपणीच आत्मचरित्रातले नायक नायिका होऊन बसतात. शाळेतल्या सुजीतला ५वीतच माहिती होतं म्हणे की त्याला डॉक्टर व्हायचंय म्हणून. गल्लीतल्या वासंतीने ९वीत एअरहोस्टेस व्हायचं स्वप्न बघितलं आणि ती ऑलरेडी सेट आहे. आपलं तसलं काही नाही- एक साधारण अंदाज आला की विज्ञान वगैरे मस्त वाटतं. त्या अर्थशास्त्र, अकाऊंट्स आणि मराठीबिराठीचं फॉर्मल शिक्षण आवडत नाही म्हणून सायन्सला गेलो. पुढे? इंजिनिरींगला जायचं, हे ठरवलं होतं. पण प्रश्न होता - कुठलं?
.
तशी बारावीनंतरची सुट्टी झकास गेली होती एकदम. बरंच फिरणं झालं. चिक्कार धमाल केली. १० दिवस कोकणात, मग पुढे शाळेतल्या मित्रांबरोबर सायकल ट्रीप झाली. दे दणादण मासे हाणले. आठवण आली तरी ढेकर येतो. उत्साह २.० च्या जोरावर आता पुढचं ठरवायला हरकत नसावी!
तेव्हा त्या आनंदात तू भी क्या याद रखेगी बारहवी...जाओ, माफ किया...
०००
आपण आता बारावीच्या निकालानंतरच्या रणधुमाळीबद्दल बोलणार आहोत तेव्हा इथे काही पात्रांची थोडक्यात ओळख करून द्यायला हवी.
.
आई-बाबा : मवाळ-जहाल पक्ष. लोकशाही ही घरात फक्त नावाला असल्याने जहाल पक्षच सरकार चालवतं. तेव्हा मवाळ पक्षामार्फत वटहुकूम काढून घ्यावे लागतात हे लक्षात आलं असेलच.
आज्जी : तुमचा एकमेव बिनशर्त सपोर्टर. जपून वापरा, हे हुकूमी अस्त्र दर वेळी चालतंच असं नाही.
शेजारचे काका-काकू : डोक्याला शॉट नं. १ आणि २. ह्यांचा मुलगा त्रेतायुगात इंजिनेर झालाय. तेव्हापासून हे स्वतःला शाहों-का-शाह म्ह्णजे इंजिनेर-ऑफ-इंजिनेर समजतात. एकटेदुकटे ह्यांच्या तावडीत सापडलात तर मेलात. गॅरेंटी आहे आपली.
समोरच्या बिल्डिंगमधला परेश : सद्गुणांचा पुतळा असलेलं एक महा आगाऊ कारटं. दुर्दैवाने (अर्थात तुमच्या) आय.आय.टी.ला निवडला गेला आहे. ह्याच्या अभ्यासाच्या सुरस आणि चमत्कारिक कथांपासून पुढली ४ वर्षंसुद्धा सुटका नाही.
इंजिनेर नसलेले नातेवाईक/बाबामित्र लोक : अतिशय चमत्कारिक जमात. कधी काय सल्ले देईल सांगता येणार नाही. २ पेक्षा जास्त एकावेळी घरी आले असतील तर संडासात लपण्याशिवाय दुसरा इलाज नाही.
इंजिनेर असलेले नातेवाईक/बाबामित्र लोक : "आम्ही केलं तेच इंजिनेरींग सर्वश्रेष्ठ" ह्या ब्रीदवाक्याचे लोक. योग्य पद्धतीने वापरले तर प्रचंड उपयोगी असतात. पण तुमचा त्यांच्यावर कंट्रोल हवा, त्यांना कंट्रोल दिलात तर तुमची चड्डी सुटलीच म्हणून समजा.
कॉमर्सला असणारे मित्र : हरामखोर साले. वेळी अवेळी "ए XXX, पिच्चर को आयेगा क्या?" म्हणून पुढली ३-४ वर्षं खिडकीतून हाका टाकणार, सवय करून घ्या. त्यातला एक जरी सी.ए.ला बसला ना, तर बाय गॉड सूड घेता येईल.
इंजिनिरींगला न जाणार्या मैत्रिणी : टाटा. अश्रूपात.
इंजिनिरींगला जाणार्या मैत्रिणी : हे तेव्हा ठाऊक नव्हतं, पण आता सांगायला हरकत नाही - Null set. {} ही जमात फार कमी. असल्याच तर दुसर्यांच्या असतात.
०००
तेव्हा अशी सगळी पात्रं बारावीचा निकाल- ते इंजिनिरींगची अॅडमिशन ह्या दरम्यान आजूबाजूला वावरत असतात. पदोपदी ११०% खात्री असलेले सल्ले देतात, इंजिनेरींगमधे कसा राम नाही इथपासून इंजिनेरींग केल्याशिवाय दुसरा उपायच कसा नाही इथपर्यंत मतं बदलत असतात. ह्यावर उपाय म्हणून एखाद्या मावशी किंवा आत्याच्या मुलाला मी खूप आशेने भेटायला जातो. तो कुठल्यातरी कॉलेजात इंजिनिरींग करत असतो ऑलरेडी. माझ्या बुडत्या जहाजासाठी ही काडी.
"मेकॅनिकल घेऊ नको. जाम बेकार. केट्यांवर केट्या लागतात."
"केट्या म्हंजे?"
"फेल!"
येवढंपण कळत नाही छाप चेहेरा करून ते मावशीमूल सालं उगाच भाव खातं. चुत्या आहे खरं तर हा अमोल. पण नाईलाज. ह्याला अजून २ केट्या लागू दे ईश्वरा, तुझ्यापुढे पेढे वाहीन.
"मग कुठलं घेऊ फील्ड?"
"प्रोडक्शन पण नको घेउस हां- लोक लायनी लावून बसतात नोकरीसाठी." मावसमुलाचा सल्ला. पुढे १० मिंटं तो काहीतरी बोलतो. दीड टक्के कळतं मला, पण बाकी well directed bouncer.
"इकडे ये सांगतो." आई आणि मावशीची नजर चुकवून तो मला प्रायव्हसीसाठी बाल्कनीत घेऊन जातो. "आय.टी किंवा कॉंम्प्स बेश्ट. सगळ्या मुली तिकडेच असतात. शिवाय वर्कशॉप पण नसतं पुढे. परत सब्जेक्ट सोप्पे असतात रे. इलेक्र्टॉनिक्स, इलेक्ट्रिकल वगैरे पण तसंच- पण थोडं कठीण आहे. शिवाय तुला लॅब वगैरे असतील. रिलॅक्स!"
.
आयला, एकूण हा अमोल वाटतो तेवढा चंपक नाही. त्याचं ऐकून मी मनात एक-दोन फील्ड नक्की करतो. इलेक्ट्रिकल घेऊया. मिळेल तरी. आयटी कॉम्प्स सालं सगळ्यांनाच पाहिजे असतं, मिळणार पण नाही. शिवाय कॉलेजात आपण मुली बघायला जाणार नाही वगैरे विचार माझ्या मनात पिंगा घालत असतात. कोल्ह्याची आंबट द्राक्षं गोड मानून घ्यायची मानसिक तयारी सुरू झाली म्हाराजा.
.
.
/* this is a C style comment. On admission system. Pun.Intended.
* नंतरचा प्रकार म्हणजे अॅडमिशन. आम्हाला Centralized admission आहे म्हणून जरा तरी बरं, नाहीतर प्रत्येक कॉलेजापुढे भीक मागायला जावं लागलं असतं अकरावीसारखं.
* पण हा प्रकार जरा कठीण. ७०% आणि ३०% वगैरे काहीतरी कोटा सिस्टीम असते. तुम्ही आधी ३०% मधे पाहिजे ती कॉलेजं टाकायची- त्यातल्या एकात जरी सीट असेल, तर तुम्हाला मिळून जाते.
* पण मग ती घ्यायलाच हवी. मग पुढच्या अॅडमिशन प्रोसेसमधून बाद तुम्ही.
* आता ह्यात जर सीट मिळाली नाही तर मग उरलेल्या ७०%त तुमचा विचार होतो. इथे सीटांची बदलणारी उपलब्धता तुम्हाला दिसत असते. त्यावरून आपले पर्याय नक्की करायचे. आपली वेळ आली की मग तिथे काय * परिस्थिती आहे, त्यावरून अॅडमिशन मिळते. ह्यात अजून सत्राशेसाठ प्रकार आहेत, पण बाकी डीटेलांत वाहून जाऊ आपण. मुख्य काम म्हणजे आपली ३०% वाली लिस्ट बनवून तयार ठेवणे.
* आता ह्यात मी कदाचित घोळ घालत असेन, पण रूपरेषा अशी काहीशी असते.
*/
.
.
कुठलं कॉलेज कुठे टाकायचं? भलतंच एखादं ३०%त टाकलं तर मिळून जाईल म्हणून मग तिथे फकस्त भारी भक्कम टाकायची- की जिकडे सीट मिळाली तर स्वर्ग. शेवटची नावं मात्र थोडी रिअलिस्टीक अशी.
७०% ला काही लिस्ट वगैरे लागत नाही. जे काय बाजारात उरलंय, त्यातूनच घ्यावं लागतं.
तर असा सगळा डोक्याला शॉट झेलून मी सगळी लिस्ट वगैरे बनवली मी. आता पुढचं पाऊल म्हणजे पैसे. पेड सीट मिळेल, पण परवडेल का? फ्री-सीट मिळवायला ३ मार्क कमी पडतयेत. बाबा मानतील का?
आई, डी.जे (संघवी)त चांगली इलेक्ट्रॉनिक्सची सीट मि़ळू शकेल. ७५००० वर्षाला-
नाही झेपणार रे राजा आपल्याला.. ते दुसरं थोडं लांब आहे, पण चांगलं आहे रे कॉलेज. तिथे फ्री सीट-
रोज १.५ तास लोकलचा प्रवास? तुटेन मी दोन दिवसांत. मला डी.जे.ला जायचंय. सांग ना बाबांना-
बघते.
.
त्या रात्री फुल टेन्शन आलं मला. काय होईल काय नाही. बाबा बहुतेक मानतील, एरवी विलनसारखे वागत असले तरी तसे चांगले आहेत. छ्या. इथेपण सस्पेन्स!
.
मग दुसर्या दिवशी सकाळी चहाच्या कपाबरोबर संसदेचं पावसाळी अधिवेशन भरलं. मारी बिस्कीटाच्या तुकड्याबरोबर बाबा मिशीत जेमतेम हसले तेव्हा मला होप्स होते. पण आईने त्यांना पेड सीटचं सांगितल्यावर पुढलं बिस्कीट न उचलताच ते उरलेला चहा प्यायले आणि गंभीर चेहेर्याने बसून राहिले. एक हाडाचा बाबाविरोधी सदस्य असूनही मला काहीतरी विचित्र वाटलं. कुछ तो गडबड हुई है दया.
पण अंतिम निकाल स्पष्ट आहे-
डी.जे. सांघवी - caught & bowled by M.O.Ney ०(१)
Golden Duck.
What the fuck
damn my luck
मारली झक.
.
तेव्हा डी.जे ची स्वप्नं - बाय बाय. दूरगावचं कॉलेज मिळेल फ्रीसीटसाठी. आता फ्रीसीट म्हटली तर मग मिळणार काय? तर म्हणे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन्स. भेंडी. ईटी.
मग बिल्डींगच्या गच्चीवर थोडावेळ बसलो उगाच. विचार केला. खूप वाईट वाटलं. खूप. रडलो थोडा. हिशेब केले. वेगवेगळ्या पद्धतीने रचून बघितलं की कुठे काही कमी होतात का? इथल्या स्कॉलरशिप, तिथल्या स्कॉलरशिप. टाटा मदत करतात. संस्था? लोन घेऊया? बाबांचा पी.एफ -
अचानक डोक्यात वाजलं काहीतरी खण्णकन. भेंडी नको असले पैसे. गरज नाही, धन्यवाद. दीड तास तर दीड तास. त्यापायी आईबाबांच्या डोक्याला शॉट देणार नाही. इंजिनीरींग करायचं दूरच्या कॉलेजातच. ठरलं.
मग जरा बरं वाटलं मला. शर्टाच्या बाहीने डोळे पुसले. पांढरा शर्ट होता, जाऊ देत.
वटवाघळं जमायला लागली गच्चीत तेव्हा खाली आलो मग.
.
दुसर्या दिवशी मग पैसे भरले फ्रीसीटचे. बाबांबरोबर पावभाजी खाल्ली नंतर बाहेर एका हॉटेलमधे.
आता बरं वाटतंय का? होय म्हाराजाssss
इंजिनीरींगला जायचं होतं ना- झालं समाधान? होय म्हाराजाssss
फ्री-सीटही मिळाली, नो टेन्शन? होय म्हाराजाssss
इंजिनीरींग चालू होणार आता. जमतंय हे. सॉलिड
थोर
झालंगेलं इन्फिनिटीला मिळालं.
हे म्हणजे साले लहानपणीच आत्मचरित्रातले नायक नायिका होऊन बसतात.
उत्साह २.० च्या जोरावर
इंजिनेर असलेले नातेवाईक/बाबामित्र लोक : "आम्ही केलं तेच इंजिनेरींग सर्वश्रेष्ठ" ह्या ब्रीदवाक्याचे लोक.
ते मावशीमूल सालं उगाच भाव खातं
थोर आहात! दरेक मुद्द्याला (मनातल्या मनात) माना डोलावत लेख वाचून काढला.
(अवांतर - जृंभणश्वानाची आठवण झाली.)
आयच्यान खोटं नाय सांगत,
आयच्यान खोटं नाय सांगत, ब्लॉगरवर ट्युलिप लिहायची तेव्हा तिचं पोस्ट आल्यावर, रामदासकाकांचं नवं पोस्ट मिपावर आल्यावर आणि एमा ग्राण्टच्या नव्या फ्यानफिकचं नोटिफिकेशन आल्यावर - वाचायच्या आधी - जे वाटायचं ते पहिल्यांदाच 'ऐसी'वर वाटलं. अजून लेख वाचलेला नाही. पहिला थोडा भाग वाचून ढेकर का काय ते दिलं. आता उरलेला दिवसभरात अधाशासारखा, मग चवीचवीनं... साल्या, ही मालिका मधेच अर्धी ठेवलीस तर बघ. बेक्कार मार खाशील.
***
ख त र ना क. (अंधश्रद्धा आणि भाषिक अभिव्यक्ती / नास्तिकता आणि भाषिक अभिव्यक्ती यांच्यातले गुंतागुंतीचे संबंध न झेपणार्या दुर्दैवी लोकांनी पुढे स्वतःच्या जबाबदारीवर वाचा. नंतर खिटखिट नाय पायजेलाय.) या धाग्याखाली एक छोटी मिरची टांग. कायच्या काय होतंय.
निव्वळ एक शि.सा.न. घालतो!
निव्वळ एक शि.सा.न. घालतो! __/\__
===
आम्ही ७०%त हरेक राउंडला कॉलेज बदलत होतो. एका राउंडला नेटवर्क प्रॉब्लेम आल्याने तर अख्खी रात्र व्हिजेटीआयच्या बाहेर रांगेत फुटपाथवर बसून रात्र काढलेली :( आमचा नंबर पहाटे २:३०ला. पहिल्या विरार लोकलने तेव्हा पहिल्यांदा घरी आलेलो :)
थ्यांकू लोकहो. मेघनातै, ललित
थ्यांकू लोकहो.
मेघनातै, ललित लिखाणाचा विजय असो. हम तुम्हारे साथ है!
@अॅडमिशन - हे सगळं बहुतेक इंजिनेरांच्या आणि न-इंजिनेरांच्या कपाळी लिहिलेलंच असणार, फक्त वेगवेगळया रूपात.. अजून काही वेगळे अन्भव असतील तर नक्की सांगा!
अॅडमिशन हा प्रकार काहीच्या काही गोष्टी करायला भाग पाडतो, याबद्दल दुमत नसावं :)
हम्म. पण त्यातले बारावीला
हम्म. पण त्यातले बारावीला कितीजणं असतात? त्यातपरत सायन्सला किती? पास कितीजण होतात? आणि सरकारी, खाजगी कॉलेज किती? फ्री, पेमेंट सीट किती? असे सगळे कुठे एकत्र बघायला मिळेल का? नक्की किती विद्यार्थी, कोणत्या केटेगरीत, किती सीटसाठी स्पर्धा करतायत.
परत अस्वलाच्या काळी खाजगी कॉलेजातपण फ्री सीट, पेमेंट सीट असणार ना?
सीट्स -
हो..
माझ्या माहितीप्रमाणे खाजगी कॉलेजांतही फ्री सीट्स होत्या- पण प्रमाण किती ते कल्पना नाही.
त्यानंतर फ्रीसीट्स बंदच झाल्या आणि सगळ्या कॉलेजांना आपापल्या मर्जीनुसार फी आकारता येऊ लागली.
@२८९ - फ्री सीटच्या मागे असल्याने एवढी मारामारी. सहसा मागणीचा क्रम कंप्यूटर>आयटी>इलेक्ट्रॉनिक्स>टेलीकॉम>मेकॅनिकल>प्रॉडक्शन असा होता.
पेमेंटसीट थोड्या कमी मार्कांनाही (२६-२७०) ला मि़ळत असावी.
आणि मॅनेजमेंटसीटचा निकष मार्कं हा कधीच नव्हता :)
पण प्रमाण किती ते कल्पना
पण प्रमाण किती ते कल्पना नाही. >> मला वाटतं ५०% असायच्या फ्री सीट्स. आणि त्यांची फी त्या त्या विद्यापीठातल्या सरकारी कॉलेज इतकीच असायची. पेमेंट सीटची फी प्रत्येक कॉलेजनुसार बदलायची बहुतेक...
त्यानंतर फ्रीसीट्स बंदच झाल्या आणि सगळ्या कॉलेजांना आपापल्या मर्जीनुसार फी आकारता येऊ लागली. >> फ्री सीट खूपखूप नंतर बंद झाल्या. २००२ की ०३ला.
सहसा मागणीचा क्रम कंप्यूटर>आयटी>इलेक्ट्रॉनिक्स>टेलीकॉम>मेकॅनिकल>प्रॉडक्शन असा होता. >> आमच्याकडे मुलांचा क्रम मेक>प्रॉड>इतर होता. मुलींसाठी तुम्ही दिलेय ते ठीक. चांगली ब्रांच न मिळालेले इलेक्ट्रीकल, इंस्ट्रु, सिव्हीलला जायचे.
आमच्यावेळी सगळ्या ३० च्या तीस
आमच्यावेळी सगळ्या ३० च्या तीस कॉलेजांमध्ये काही फ्रीसीट्स व काही पेमेंट सीट्स होत्या (प्रमाण विसरलो).
"चांगलं कॉलेज (म्हणजे केंपस जीब देणारं अशी स्वच्छ डेफिनेशन)+ पेमेंट सीट" की "चांगला कोर्स (म्हणजे काय आजतागायत नीटसे माहिती नाही - पण बहुदा जॉब सहज मिळाण्याची शक्यता असलेला) + फ्री सीट या द्वंद्वात आम्ही चांगलं कॉलेज + पेमेंट सीट स्वीकारली होती. बाबांनी फंडातून चार पैकी दोन वर्षांची फी भरली होती. दोन वर्षांची त्यांच्या व माझ्या सेविंग्जमधून.
मात्र नंतर लगोलग मिळालेल्या कँपस जॉबमधून निर्णय इकोनॉमिक ठरला :P
==
मी स्वतः शिक्षणाने इंजिनेर
मी स्वतः शिक्षणाने इंजिनेर नाही पण ज्या मित्रांना इंजिनेर व्हायचे होते त्यांचे त्यावेळचे दिवस आठवले आणि नॉस्टॅलजीक झालं.... नंतर लहान भावाला इंजिनीयरींग साठी अॅडमिशन ट्राय करत होतो तेव्हाचे 'हाल' ही पुन्हा नव्याने आठवले. (सुदैवाने त्याला इंजिनीयरींग ला अॅडमिशन मिळाले नाही तो भाग निराळा)
मोजक्या शब्दात सुसाट भिडणार्या भावना मांडल्या त्याबद्दल खूप कौतूक तुमचे. भावनांच्या अश्या तरल गुदगुल्या करणारा अस्वल आवडला, अश्याच गुदगुल्या करत रहा :)
आमच्या बारावीच्या शिक्षकांनी
आमच्या बारावीच्या शिक्षकांनी एकदा आम्हाला विचारलं होतं, "एवढ्या लोकांनी इंजिनिअर बनायचं ठरवलं तर घरं बांधायला जागा कुठून आणणार?" बारावी सायन्सच्या टीचर्सची ही कथा असेल तर इतरांची काय कथा!!
आमच्या शेजारचा एक मुलगा बुधगांवच्या कॉलेजमध्ये फिजिक्स शिकवायचा. आम्ही मोठ्या उत्साहाने त्याला विचारायला गेलो. तो म्हणाला, "वालचंदला मला अॅडमिशन मिळणार नाही आणि तुम्हाला परवडणार नाही". एकदम निराश केलं होतं त्याने. कारण सांगलीला अॅडमिशन मिळाली नसती तर त्याहून दूर जायला मिळण्याची शक्यता नव्हती. घरच्यांनी -मला आमच्या झाडून सगळ्या खानदानात सर्वात जास्त मार्क्स होते तरीही- मला कमी मार्क्स मिळाल्याबद्दल जाम जाम झापलं. मग मेरिट लिस्ट्स.. वाट पाहाणं!!! ३०-७०% काय असतं काही कळत नव्हतं आणि कुणाला कळेल असं कुणी ओळखीचंही नव्ह्तं.
खुद्द अॅडमिशनच्या दिवशी ऊसशेतकर्यांनी आंदोलन केलं. ऊसाला १२००/- रू. प्रतिटन दर मिळायलाच हवा म्हणून. पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळं बंद. कसंबसं कुणाच्या तरी स्कूटरवरून वालचंदपर्यंत पोचले. काही कळत नसलं तरी काँप्युटर इंजिनिअरिंगलाच अॅडमिशनच घ्यायचं होतं. तिथं दोनच शेवटच्या सीट्स होत्या, त्यातली एक मिळाली!!! नंतर दुसर्या दिवशी पैसे भरण्यासाठी भली मोठी रांग, दिवसभर उपाशी राहून जाम थकायला झालं होतं. वालचंदला तेव्हा फक्त ४०००/- रू ट्यूशन फी होती आणि १५००/- रू एक्झाम फी, जर्नल फी इ. इ.. माझं इंजिनिअरिं झालं आणि ती फी १०,०००/- वर पोचली. तरीही ती तेव्हा भारी आवाक्याबाहेर होती!!
तुम्ही वर्णन केलंय त्या "५वी
तुम्ही वर्णन केलंय त्या "५वी पासून माहिती असलेल्यांपैकी" मी होते, आणि माहिती पण काय, की गणिताशी दूर दूरपर्यंत संबंध यायला नको. आर्टसला जायचंय. अभ्यास आवडायचा, पण भरपूर अवांतर "नाटकं" करूनही, १०वीला ८४% मिळाले. आर्ट्सच्या रांगेत उभं राहिल्यावर "सायन्स-कॉमर्स ची लाईन तिकडे आहे" हे ऐकायला मिळालं, आणि नातेवाईक/शेजार्यांनी तर "सायन्स न घेऊन पापच करतेय" असं वाटायला लावलं. घरच्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला.
हे असं असूनही, आणि पुढच्याही आयुष्यात फारसे धक्के न खावे लागूनही, ह्या सीरीजने हलवलं. "अचानक डोक्यात वाजलं काहीतरी खण्णकन. भेंडी नको असले पैसे. गरज नाही, धन्यवाद. दीड तास तर दीड तास. त्यापायी आईबाबांच्या डोक्याला शॉट देणार नाही. इंजिनीरींग करायचं दूरच्या कॉलेजातच. ठरलं." -ह्याबद्दल :D> :D> :D> आणि लेखनशैलीला तर साष्टांग नमस्कार!
हा विडीओ बघितला का? थोडा रिलेटेड आहे.
https://youtu.be/yZlnZwDcPjY
कसलं भारी लिहीलय हो अस्वलजी.
कसलं भारी लिहीलय हो अस्वलजी. मजा आली. नुसती हसतेय.
=))
=))
फक्त फुटले =))
आई ग्ग!!! =))
तुम्हाला प्र-चं-ड नॅक आहे विनोदी लिहायची. प्रयत्न केलात तर, प्रोफेशनल लेखक व्हाल :)