आन्सर क्या चाहिये? : वर्कशॉप
एफीला आल्यावर जर मी वर्कशॉपबद्दल बोललो नाही तर करंटाच ठरेन मी. तेव्हा पुढच्या सगळ्या गोष्टींकडे जायच्या आधी जरा वर्कशॉपबद्दल बोलू काही.
.
वर्कशॉप हे प्रकरण बरचसं मोदींसारखं आहे. एकतर लोक त्याचे खंदे समर्थक तरी असतात किंवा कट्टर विरोधक तरी.
वर्कशॉप मला फार आवडतं म्हणणारे लोक एकीकडे आणि मेलो तरी बेहत्तर पण वर्कशॉपात पाऊल टाकणार नाही असं म्हणणारे लोक दुसरीकडे. अशी विभागणी असते.
.
सुदैवाने माझी अकरावी-बारावीत फिटिंग ह्या प्रकाराशी ओळख झालेली होती. त्यामुळे बाकीची पोरं वर्कशॉपला जेवढी टरकून असायची, तेवढा मी टरकून नव्हतो. फिटींग म्हणजे लोखंडाचा एक तुकडा दिलेला असतो, त्याला सांगतील तसं घासून पुसून, तासून तासून शेपमधे आणायचं. पुढे त्यात हजार डीटेल्स असतात, पण फायलिंग करणं, मग त्या जॉबला ऑयलिंग करणं, त्याचं व्यवस्थित ड्रॉईंग करणं ह्या बेसिक गोष्टी. लेथ मशीन वगैरे पहिल्यावर्षी वापरायला देत नाहीत, तेव्हा तो प्रकार नुसता बघायचा असतो. बाकी कार्पेंट्री, स्मिथी वगैरे मंडळी नवीन होती. पण जाम इंट्रेश्टिंग.
.
०००
वर्कशॉपमधले लोकही बहुतेक सगळे नमुनेच असायचे. एकतर त्यांचं आणि इंग्लिशचं फारसं जमत नसे. जेमतेम कामापुरतं इंग्रजी वापरून ते उरलेलं सगळं आम्हाला हिंदीत किंवा मशीन लँग्वेजमधे सांगत.
आता फायलिंग करताना, ती फाईल (एक हत्यार असतंय हे, पेपरची फाईल नव्हे.) कशा पद्धतीने त्या जॉबवर चालवायची, त्याच्या पद्धती एक सर सांगत होते.
Draw filing बद्दल सांगताना त्यांना वास्तविक म्हणायचं होतं की खूप जोरात फाईल करू नका, मग जॉब खराब होईल.
त्यांच्या खास वर्कशॉप इंग्रजीत मग सर म्हणाले "Don't just फाईल फाईल फाईल. फाईsssल, फाईsssल अॅंड फाईsssल.
.
आमच्या सोबत असलेल्या अॅना नामक सुंदरीचा "हू इज अण्णा?" असा उल्लेख करून तिची छबी धुळीला मिळवणारे आणखी एक सर होते.
.
तिसरे एक सर होते, त्यांना आम्ही पॉकेट डायनॅमो म्हणायचो. जेमतेम साडेचार फूट उंचीचा हा इसम होता. लांबून पाहिलं तर दिसलेही नसते. पण त्याची भरपाई करायला म्हणून त्यांना जो काही सणसणीत आवाज दिला होता, त्याच्या आठवणीने मला अजूनही किट्ट होतं. हे सर आजूबाजूला असले, तर तुम्ही मेलात. कारण ते दीड फर्लांगावरच्या माणसाशी आरामात बोलत, आणि मग जवळचा माणूस भेलकांडायचा.
.
वर्कशॉपमधे काही काही लोक का होते, ते मला कधीच कळलं नाही. आम्ही जिवाच्या आकांताने ते फायलिंग करत असताना एक माणूस तिथे दरवेळी खुर्चीवर बसून घोरत असायचा. मधूनच जाग आली की इकडेतिकडे बघून तो "ऑंडेर्सनोमन्लोक. क्यूटीर्पीचुक्ला" असे काहीतरी अगम्य उद्गार काढून परत झोपून जायचा.
एक निव्वळ मुलांवर खेकसणारे सर होते. आम्ही कितीही चांगला जॉब केला, प्रचंड मेहेनत घेऊन काही काम केलं तरी ते त्यांना कधीही पसंत पडायचं नाही.
.
एकदा माझा एक मित्र रोजच्या प्रॅक्टीकलमधे त्याचा मेल- जॉईंट घेऊन उभा होता. हे सर आले.
क्या बनाया है ये?
सर, जॉब है...
जॉब नही, भंगार है ये. फेक दो. दुसरा उठाओ पीस. चलो.. - असं म्हणून त्यांनी त्याचा तो जॉब बाजूच्या एका लोखंडाच्या ढीगात फेकून दिला आणि ते निघून गेले.
.
आमच्या एका मित्राची तर भलतीच पंचाईत झाली होती. मेल-फीमेल जॉईंट्स जे बनवायचे असतात, ते एकमेकांत व्यवस्थित फिट बसतात- म्हणूनच ते सूचक वगैरे नाव आहे त्याला! तर ह्या आमच्या मित्राने उत्साहाच्या भरात दोन्ही जॉबना फिमेल जॉईंटस बनवून टाकलं. मग ते सर त्याला अमाप उपहासाने म्हणले होते - "जितना चाहिये उतना टाईम लो, पर अब ये तुम कैसे जॉईन करेगा वो बताओ."
पोरांना रडकुंडीला आणण्याचा ह्या सगळ्या लोकांना बहुतेक बोनस मिळत असावा.
.
अर्ध्या वर्षानंतर मला कळायला लागलं- ज्या पोरापोरींची वर्कशॉपमधे मेहेनत करायची तयारी होती, त्यांच्याकडे हे सगळे सर वेगळ्या नजरेने बघत. उरलेल्यांना आपल्या काटेरी वागणूकीचा यथेच्छ प्रसाद देत!
कारण वर्षाच्या शेवटी जेव्हा करो या मरो वेळ आली, तेव्हा ह्यातल्या कित्येक सरांनी आमच्या चुकांकडे काणाडोळा केला. एरवी नरकातील दैत्य वाटणारे ते सर तेव्हा आम्हाला अगदी समजून "ऐसा करनेका. क्या? समझा?" या भाषेत बोलायला लागले. अनेकांचा कार्पेंटरी जॉब सेकंदात ठीक करून दे, एखाद्याच्या फिटिंगच्या जॉबला मार्क मिळू शकतील अशा आकारात आणून दे- कुणाच्या पाठीवर थाप मारून "नर्वस नय होने का. ये देखो-" असं म्हणून क्षणार्धात त्याचा प्रॉब्लेम सोडवून दे - हे सगळं मेहेनती पोरांसाठी.
पण चुकार लोकांना ते तशाच मिलिटरी खाक्यात उत्तरं देत. खतरनाक होते हे पब्लिक!
.
०००
वर्कशॉपमधलाच एक किस्सा. एकदा मी गुमान फिटिंगच्या लॅबमधे त्या जॉबला गोंडसपणा देत होतो.
"हाय!". मान वर करून बघितलं तर वर्गातली अप्पर १०%तली एक पोरगी माझ्यापाशी येऊन उभी.
.
"हाय." मी थोड्या आश्चर्यजनक बेफिकीरीने म्हणालो. आश्चर्याचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. बेफिकीरी दाखवण्याचा उद्देश तुम्ही समजू शकता.
.
"आय अॅम अमुकतमुक> अॅक्चुअली मुझे थोडी हेल्प चाहिये थी-ये जॉब देख ना...."
.
ओक्क्के, असा प्ल्यान आहे काय.
जॉबच्या वेळीच
आमची आठवण?
बाकी सर्वदिन
असशी कोठे?
नकळत फुलटॉस दिलाय बयेने. डीप मिडविकेटला कोणी नाहिये तेव्हा बिन्दास मिड-विकेटला भिरकावून देतो.
.
"सॉरी- मुझे बोला है की ऐसा हेल्प करेंगे तो दोनो का मार्क्स कटेगा. तुम्हारा जॉब सच मे काफी बकवास हुआ है. सॉरी- नया चालू करना पडेगा. उधर जा के कलेक्ट कर नया पीस." तिच्यासाठी नवा जॉब चालू करणे ही जवळपास काळ्यापाण्याची शिक्षा होती. हॅ हॅ हॅ
उर्वरीत इंजिनेरींगात मग पुन्हा ती ललना परत आजूबाजूला फिरकली नाही. च्यायला, समझती नही है बात को.. आ जाती है रात को?
.
०००
एकंदरीत वर्कशॉप मानवलं पण मला. काम करायला मजा यायची. मेहेनत चिकार होती. कदाचित गधेमजुरीही वाटेल कुणाला. पण सॉलिड मजा यायची.लेक्चर्स झाल्यानंतर मग लॉकररूमकडे धावत जायचं. तिथून सगळी हत्यारं अवजारं घेऊन पळतच तो ओवरऑल (बॉयलर सूट?) घालायचा.
मग ते सर एकदा तरी खेकसणार. नंतर तासभर फिटींग. एकदा हातात जॉब आला की मग आजूबाजूचं काही लक्षात यायचंच नाही. तो घासूनघासून चकाचक करणं हे कर्तव्य. अर्जुन आणि पोपटाचा डोळा वगैरे टाईप. बरेचदा मित्रांना मदत. अधेमधे उगाच एखादा पाणचट जोक आणि त्यावर काहीच्याकाही हसणं-
असलं सगळं होऊन वर्कशॉप संपलं की घामाचे ओघळ अनुभवत शांतपणे कँटीनच्या कॉरीडोरमधे मारलेलं मँगोला- क्या बात है, दाल भात है!
ह्या वर्कशॉपची आणि माझी फारकत एक घाव दोन तुकडे अशी झाली- दुसरं सेमिस्टर संपल्यावर अचानक एका दिवशी लक्षात आलं की वर्कशॉप आता संपलं! नाही म्हणायला मेकॅनिकलच्या मित्रांचा वर्कशॉपशी नंतरही नित्याचा संबंध येत राहिला. त्यांच्याकडून वर्कशॉपमधल्या गोष्टी कानावर यायच्या.
.
०००
मग एकदा ती गोळा केलेली अवजारं एका ज्यूनियरला विकली आणि त्या पैशांतून कुठल्यातरी सेमची पुस्तकं विकत घेतली. माझा ओवरऑल मात्र आलिकडेपर्यंत घरीच होता. आईने त्याच्यापासून तर्हेतर्हेची फडकी बनवली असावीत कदाचित. What a tragic death for a warrior.
क्रमशः
तळटीप - मेक (मेकॅनिकल)च्या पोरांचा वर्कशॉपचा अन्भव अर्थात जास्त परिपूर्ण का काय म्हणतात तो असेल, तेव्हा जे कोणी मेक हा लेख वाचतील, कृपया हेल्प!
१/२ थाप पकडलीतच.. @"म्हातारा
:ड १/२ थाप पकडलीतच..
@"म्हातारा संन्यासी" किंवा "शाही आव्हान"- फार जवळचा तर्क आहे!
पुस्तकं म्हणजे "निराली पब्लिकेशन", "टेक्नोवा" "टेक्निकल" आणि त्याहूनही नीच दर्जा म्हणजे "फॅनॅटिक्स" सिरीजच्या नोट्स असलेली.
सिनिअर्स बरेचदा वर्गात येऊन ही सेकंड्सेकंड हँड पुस्तकं विकायला बघायचे - अक्षरशः घासाघीस करून मग आम्ही ह्या नोट्स घेतल्या आहेत.
बाकी फारीन ऑथर्सची पुस्तक घेऊन शायनिंग मारणारी पोरंसुद्धा परीक्षेच्या आधी २ दिवस टेक्नोवाच्याच शरणी जायची.
फोर्जिंग....अम्म्म एक
फोर्जिंग....अम्म्म एक लोखंडाची सळी हातोड्याने ठोकठोकून वाकवून वर्तुळाकारात करण्याचा जॉब होता एफीला, पण तोही लिंबूटिंबूच. प्रत्येकी एक जॉब असा नव्हता. ब्याचला एक होता. बाकी शीट मेटलचा डब्बा तयार करणे (टमरेलसदृश आकाराचा) हाही प्रकार होता. सुतारकामात पॅटर्न मेकिंग बहुधा होतं पण विसरलो आता. पण हे जे कै होतं ते फक्त एफीला. पुढे फक्त लेथ थ्रेडिंग, मेट्रॉलॉजी वगळल्यास वट्टात वर्कषॉपचा संबंध नव्हता. हे हेवीड्यूटी भाग प्रॉडक्षन ब्रँचला होते. बहुधा तुमच्या वेळचं सीओईपी राहिलं नाही. ;)
वाचतोय
अर्ध्या वर्षानंतर मला कळायला लागलं- ज्या पोरापोरींची वर्कशॉपमधे मेहेनत करायची तयारी होती, त्यांच्याकडे हे सगळे सर वेगळ्या नजरेने बघत. उरलेल्यांना आपल्या काटेरी वागणूकीचा यथेच्छ प्रसाद देत!
कारण वर्षाच्या शेवटी जेव्हा करो या मरो वेळ आली, तेव्हा ह्यातल्या कित्येक सरांनी आमच्या चुकांकडे काणाडोळा केला. एरवी नरकातील दैत्य वाटणारे ते सर तेव्हा आम्हाला अगदी समजून "ऐसा करनेका. क्या? समझा?" या भाषेत बोलायला लागले. अनेकांचा कार्पेंटरी जॉब सेकंदात ठीक करून दे, एखाद्याच्या फिटिंगच्या जॉबला मार्क मिळू शकतील अशा आकारात आणून दे- कुणाच्या पाठीवर थाप मारून "नर्वस नय होने का. ये देखो-" असं म्हणून क्षणार्धात त्याचा प्रॉब्लेम सोडवून दे - हे सगळं मेहेनती पोरांसाठी.
पण चुकार लोकांना ते तशाच मिलिटरी खाक्यात उत्तरं देत. खतरनाक होते हे पब्लिक!
हे आमच्याकडे अगदि अस्सच होतं.
स्थिर हातानं कौशल्यानं खरंतर हे जॉब्ज पाच-दहा मिनिटात व्हायला हवेत.
मला दोन दोन तास आदलाअपट करुनही (किम्वा आदल आपट केल्यानच) जमत नसे.
हात स्थिर नव्हता.
.
इंजिरिअरिंग डृऑइंग्/ग्राफिक्सला चित्रं काढतानाही हात स्थिर रहात नसे. सगळी शीट काळी होइ.
मी मग ओह "शीट" म्हणे.
कसे कोण जाणे पण जिथे स्थिर हाताचा सराव नि हॅण्ड - आय कॉर्डिनेशन लागतं; तिथे हाच गुम्त होइ/होतो.
बुटांची लेस बांधतानाही प्रचंड गोंधळ होतो.
पण ह्याची भरपाई अधिक कष्ट केल्याने ह्या वर्कशॉपवाल्या मंडळींच्या सहाय्याने होइ.
का कोण जाणे तर्काच्या गोष्टी चांगल्या जमत. इंजिनिअरिंग ड्रॉइंगमधील निव्वळ रेखांचे तीन प्रतलातील प्रोजेक्शन्स काढणे,
विविध वस्तूंचा फ्रंट व्ह्यू , बॅक व्ह्यू नेमका समजत असे. त्यामुळे शीट काळी अस्ली तरी त्यातील कंटेंट अचूक असे.
शिवाय अत्यल्प वेळात पूर्ण केलेले असे कैकदा .
इंजिनिअरिंगचे बहुताम्श पेपर निम्म्या वेळात देउन बाहेर पडलो होतो, ते अजून आठवते.
वर्कशॉपचा अॅप्रन कधीच आवडला
वर्कशॉपचा अॅप्रन कधीच आवडला नाही. पहिल्यांदा फाईलिंग, मग टिनिंग, कारपेंटरी, ब्लॅकस्मिथी आणि सर्वात शेवटी वेल्डिंग असा क्रम होता. हे कमी की काय म्हणून वर्कशॉपची लेक्चर्स पण असायची. आम्हाला बाजीराव नावाचे कुणी मेकॅनिकल डिपार्टमेंटचे मास्तर होते. जाम इरिटेटिंग होता माणूस.
पहिल्याच प्रॅक्टिकलला मेल-फीमेल जॉईंट का असतो आणि तो तसाच का बनवायचा , तो कुठे उपयोगात येतो का असले नसते प्रश्न तोंड वर करून विचारायला गेले होते. त्याला विचारले त्याने मला फक्त एकदा नखशिखांत न्याहाळले आणि सरळ दुर्लक्ष करून निघून गेला. पुढे मग 'घासणे' हे क्रियापद व्यवस्थित समजले. नंतरची चार वर्षे ती शेड दिसली तरी फाईलचा कुंईकुंई आवाज ऐकू येई. कारपेंटरीतलं आणि टिनिंगमधलं काम आवडलं होतं. सेलो टेप होल्डर आणि ड्स्टपॅन तिथं बनवलं होतं. नंतर रीतसर दहा रूपये भरून ते विकत घेऊन घरीही घेऊन गेले होते. ब्लॅकस्मिथीवरती वाढलेलं आंब्याचं झाड कॉलेजच्या आवारातलं सगळ्यात अनरिचेबल झाड असावं. तिथल्या कैर्या आणि आंबे कधीच तोडलेले दिसत नसत, जाम घमघमाट असे तिथे. ब्लॅकस्मिथीची शेड बाहेरून जितकी बरी वाटायची, तितकीच आत गेल्यानंतर काळीकुट्ट होती. तिथला घण काही उचलता यायचा नाही. तरीही तिथले इन्स्ट्रक्टर्स प्रत्येक प्रॅक्टिकलला आम्हाल किमान पाचवेळा घण उचलायला लावायचे. वेल्डिगला मुल्ला नावाचे एकाच वेळी महाजहाल आणि महाप्रेमळ गृहस्थ होते. समोर शिल्ड धरलं की वेल्डिंग कुठे करायचं हे दिसायचं नाही आणि काढलं की डोळे जातील म्हणून भीती वाटायची.
आता मुंबईत आल्यावर विद्यार्थ्यांना वर्कशॉपची टूल्सपण विकत घ्यायला लागतात हे कळालं. आम्ही फक्त मिनिड्राफ्टर, ड्रॉईंगशीट होल्डर आणि तो निळा अॅप्रन इतकंच काय ते विकत घेतलं आणि परत विकलं. हो, ड्रॉईंगशीटवरून आठवलं. आयएस कन्व्हेन्शन शीट नावाचा एक छळ आम्हाला होता. कंटाळा करून ती पूर्ण करायला मी चार महिने लावले.
आम्हाला नाही
सीओईपीत सुद्धा विकत घ्यावी लागत.
आम्हाला पहिल्या वर्षी कारपेन्ट्री आणि एक फाईलिंगचा जॉब होता. त्याची सर्व साधने करवत, रंधा, कानस वगैरे कॉलेजनेच उपलब्ध करुन दिली होती. अॅप्रनबाबत आता नक्की आठवत नाही पण तो विकत नक्कीच घेतला नव्हता. कदाचित एखाद्या सीनियरचा उसना आणला असावा असे वाटते.
हो
जितपत अाठवते त्यानुसार प्रत्येक ब्याच (२० विद्यार्थी)ला मिळून ७-८ करवती व साधारण तेवढेच रंधे असत. (आमच्या ४० विद्यार्थ्यांच्या वर्गात २ ब्याचेस होत्या) प्रत्येकाला आपला जॉब करण्यासाठी पूर्ण वेळ उपकरणे मिळत नसल्याने 'एकमेकां साहाय्य करु' या भावनेने पटापट जॉब केले जात.
फायलिंगसाठीच्या चांगल्या कानशींचा खूपच तुटवडा होता. २० विद्यार्थ्यांना मिळालेल्या १० कानशींमधून २-३च कानशींना बऱ्यापैकी थ्रेडिंग असल्याने तिथे तर अशा सहकारी भावनेची फारच गरज होती.
मेकॅनिकलच्या मुलांना पुढच्या वर्षांमध्ये स्वतःचे साहित्य विकत घेतलेले पाहिले आहे. मात्र अनेकांना पहिल्या वर्षीच्या निकालानंतर ब्रँच बदलण्याची आशा असल्याने, अशी खात्री असलेली मंडळी दुसऱ्या वर्षीचे प्रवेश होईपर्यंत अशी उपकरणे विकत घेत नसत.
अॅप्रन मात्र मिळत नसे. तो विकतही घेतला नव्हता. मेकॅनिकलच्या सीनियर विद्यार्थ्यांकडून उसना आणला होता.
आमच्याकडे कुणी ही टूल्स विकत
आमच्याकडे कुणी ही टूल्स विकत घेतल्याचं ऐकलं नव्हतं.
आता थतेचिचांच्या बाबांच्या वेळचा विषय निघाला आहे म्हणून- आमच्या इंजिनिअरिंगच्या काळात वालचंदला सुरू होऊन ५० वर्षे झाली म्हणून माजी विद्यार्थी सोहळा आयोजित केला होता. तेव्हा घेतलेल्या मुलाखतींदरम्यान त्या लोकांना तुम्हीही जर्नल स्वतःच लिहायचात का असं विचारण्यात आलं होतं. तेव्हा पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ब्रिटिश प्राध्यापकांनी काही जर्नल्स आणली होती तिथून त्यांनी कॉपी केली आणि मग अशीच स्वतः जर्नल न लिहिण्याची परंपरा खूप जुनी आहे हे दिसून आलं होतं.
हा हा
जर्नल आणि असाईनमेंट्सबद्दल अस्वलशेठ लिहितीलच. सीओईपीत विशेषतः संगणक-इलेक्ट्रॉनिक्स-इनस्ट्रुमेंटेशन या तीन शाखांमध्ये एक प्रचलित असलेली परंपरा म्हणजे कॉपी करण्याऐवजी इंडेक्स पेज बदलून जुनेच जर्नल दाखवणे. अनेक विषयांचे मास्तर लोक फक्त इंडेक्स पेजवरच सही करत असत. त्यामुळे फक्त इंडेक्स पेज बदलले की सगळ्या असाईनमेंट आणि जर्नल क्षणार्धात रेडी होत असे. जर्नलमधील आतल्या पानांवर कधीच सही केलेली नसल्याने ते जुने की नवे हे कळण्यास काहीही मार्ग नव्हता. वर्षानुवर्षे त्याच त्या असाईनमेंट असल्याने वेळेची फारच बचत होत असे.
अर्थात पहिल्या वर्षी मास्तर पकडतील म्हणून जुने जर्नल हाताने लिहून कॉपी केले होते. मात्र दुसऱ्या वर्षापासून मास्तरांना या असाईनमेंट आणि जर्नल्समध्ये फारसा रस नाही हे लक्षात आल्यावर ल्याबमध्ये जाऊन जुनी जर्नले धुंडाळणे हा एक उपद्व्याप होऊन बसला.
या जर्नलं भरण्यावरून आठवलं -
या जर्नलं भरण्यावरून आठवलं - आमच्या कॉमर्स कॉलेजातही हा खुळचटपणा असायचा. एकदोन वसतीगृहात रहाणारी शहाणी बाळं हे जर्नल स्वतःच्या स्वतः भरायची. मग त्यांचं जर्नल बेग-बॉरो-स्टील पद्धतीने मिळवून त्याचं जाहीर वाचन व्हायचं.
म्हणजे चित्र असं:
कँटीनच्या टेबलांची दिशा बदलून चाळीसेक मुलं मुली समोर जर्नल धरून बसलेली आहेत. एक कोणीतरी त्या शहाण्या बाळाचं जर्नल हातात धरून खुर्चीवर उभा आहे. समोर पाण्याचा मोकळा ग्लास धरला आहे (आवाज मोठा येण्यासाठी), आणि तो जर्नलचं वाचन करत आहे, आणि जन्ता भक्तिभावाने ते लिहून घेत असे.
बीकॉम इतका जुनाट कोर्स दुसरा नसेल. "प्रॅक्टिकल" वगैरे गोंडस नाव दिलेलं असायचं, पण मुळात ती घोका-ओका टैपची प्रश्नोत्तरंच असायची. खर्या अर्थाने प्रॅक्टिकल्स दिली असती - उदा. ब्यांकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट काढून आणा, किंवा चहावाल्याचे अकाउंट्स लिहा, किंवा दिघीच्या आयसीडीमध्ये जाऊन इंपोर्ट प्रोसीजर्स समजावून घ्या - तर अर्ध्या पब्लिकची फें फें उडाली असती.
अगदी सहमत!!
>>बीकॉम इतका जुनाट कोर्स दुसरा नसेल. "प्रॅक्टिकल" वगैरे गोंडस नाव दिलेलं असायचं, पण मुळात ती घोका-ओका टैपची प्रश्नोत्तरंच असायची. खर्या अर्थाने प्रॅक्टिकल्स दिली असती - उदा. ब्यांकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट काढून आणा, किंवा चहावाल्याचे अकाउंट्स लिहा, किंवा दिघीच्या आयसीडीमध्ये जाऊन इंपोर्ट प्रोसीजर्स समजावून घ्या - तर अर्ध्या पब्लिकची फें फें उडाली असत>>>>
+१
बी.कॉम. च्या प्रॅक्टिकल्स अतिशय "इम्प्रॅक्टिकल" असतात.
बर्याचदा हे जर्नल आवड्त्या मुलीशी बोलण्यासाठी निमित्त म्हणून मदतीला यायचे.अनेक जणांची प्रेमप्रकरणं जर्नल पासून सुरू होउन लग्नाच्या बोह्ल्यापर्यन्त गेलेली पहिली आहेत.
ड्रॉईंग बोर्ड का आणि विकत
ड्रॉईंग बोर्ड का आणि विकत घ्यायचा मला कळालं नाहीय. घरी पण शीट्स काढत बसायचात का तुम्ही लोक? वालचंदच्या सिव्हिल ड्रॉईंग हॉलमध्ये परिक्षेचे ३२ हॉल्स होत असत, राहिलेले टिळक हॉलच्या बाजूच्या क्लासरूममध्ये जायचे. आम्ही एकदा एका टोकाला उभे राहून किंचाळल्यावर दुसर्या टोकाला ऐकू जातं का हे पाहायचा पराक्रम केला होता. माझ्या व्हॉल्युमला पण दुसर्या टोकाला जाणं जमलं नव्हतं. आणि तो सोडून मेकॅनिकल ड्रॉईंग हॉल आणि दोन-तीन होते वेगळे. सीओईपीमध्ये याहून मोठे असू शकतील. त्यात जर पब्लिक होस्टेलला राहणारं असेल वेळेचाही प्रॉब्लेम नाही.
मग ड्रॉईंगबोर्ड घ्यायचाच कशाला?
चहामारी! 'इंडेक्स पेज बदलून
चहामारी! 'इंडेक्स पेज बदलून जुनेच जर्नल दाखवणे' Shock हे बरंय!
अर्थात हे स्वातंत्र्य किंवा सोय ही फक्त सीनियर वर्षांमध्येच उपलब्ध झाली. फर्स्ट इयरची प्रॅक्टिकले आणि फायलींनी बाकी प्रचंड त्रास दिला. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि अप्लाईड सायन्स या विषयांच्या मास्तरांनी तर झोपाच उडवल्या होत्या. आकृतीत व्होल्टमीटर काढताना त्याचा व्यास ४ मिमी हवा, किंवा रेझिस्टन्स (/\/\/\) दाखवताना त्याच्या रेषांमधील कोन ४५-४८ डिग्रीपर्यंतच हवा. आय अॅम नॉट किडिंग! वर्गाची विभागणी ४ ब्याचेसमध्ये करुन नंतर रँडम पद्धतीने कोणाची तरी फाईल तपासली जात असे. जर त्या फायलीत एखाद्या व्होल्टमीटरचा व्यास ६ मिमी सापडला किंवा वायरी जोडतात तिथे थोडा गॅप किंवा खोडल्यासारखे दिसले तर संपूर्ण ब्याचला पुन्हा एकदा ती असाईनमेंट करावी लागे. जर अशा तीनचार चुका सापडल्या तर सर्व असाईनमेंट पुन्हा कराव्या लागत! एफीतील वर्कशॉप आणि या अशा असाईनमेंटमुळे जितके टीमवर्क शिकलो तितके पुढे बारा-तेरा वर्षाच्या कॉर्पोरेट लाईफमध्येही शिकलो नाही.
जीट्यावाला/वाली कोणी आहे का?
रेषांमधील कोन ४५-४८ डिग्रीपर्यंतच हवा.
भयाण. हा अत्याचार आहे.
मास्तरने मला बाणाची डोकी पाहीजे तशी नाहीत म्हणून शीट काढायला लावलेली. शेजारच्या दादाच्या कृपेने जीट्या मारायला मी पाचवी-सातवीतच शिकलेलो. अॅरो हेड्स वगैरे पण जीटी मारली मग. काही दिवसांपुर्वी कालीजात जाणं झालं तिथं एफीची जन्ता सॉल्लिड वर्क्स का एज उघडून रेघोट्या काढत बसलेली. प्रोजेक्शन्स ऑफ लाईन पण त्याच्यावर म्हणे.
सध्या बहुदा शीटा हातानंच काढलेल्या असाव्यात अशी सक्ती नाहीये.
आमचे वर्कशॉपचे मास्तर लोकं लै म्हणजे लैच भारी होते. पहीला अर्धा वेळ आम्हाला जो काही जॉब असेल त्याच्याशी खेळू द्यायचे. नंतर स्वत:च करून द्यायचे. इतकं करून पण मी शेवटच्या दिवशी जॉब आणि जर्नल दोन्ही हरवलं. सबमिट केलेला जुना जॉब आणि जर्नल त्यांनीच काढून दिलं मग. :ड
ड्रॉईंगशीट्स नाहीत पण पहिल्या
ड्रॉईंगशीट्स नाहीत पण पहिल्या वर्षात फ्लोचार्ट्स असे हवेत धरून प्रत्येक आकाराची टोकं आधी आपल्या कागदावर मारून घेऊन मग बिंदू जोडले की फटाफट काधून होतात हे कळाले होते. बाकी एफीमध्ये बेसिक इलेक्ट्रिकलच्या एका प्रॅक्टिकलला आम्ही जर्नल आणलं नाही म्हणून मास्तरांनी खूप झापलं. एकतर आणा म्हणून सांगितलेलं नसताना जर्नल मागणं ही त्यांचीच चूक. आम्ही बराच वेळ माना खाली घालून बसलो. मग नंतर दिलेला कसला तरी एक्सपेरिमेंट करताना एक मोठा बल्ब उडाला. तेवढं कारण घेऊन आम्ही मुली किंचाळत इलेक्ट्रिकलच्या लॅबमधून पळून समोरचा रस्ता-विहिरसदृश्य प्रकरण-बाग इतकं सगळं पार करून इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटात पोचलो होतो. ते सर पुन्हा कधीही आम्हाला रागावले नाहीत. :-)
बाकी इलेक्ट्रिकलच्या नाही, पण बेसिक सिव्हिलच्या जर्नलमध्ये सरांनी खूप रडवलं होतं. मापं घेण्याची एक चेन असते तिची आकृती काढून-काढता काढता पुसून सगळं काळंकुट्ट झालं होतं.
आमच्या कॉलेजात कॉम्प्युटर, आय
आमच्या कॉलेजात कॉम्प्युटर, आय टी आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन अश्या तीनच ब्रॅन्चेस होत्या, त्यामुळे वेगळ्याने टूल्स्/ड्रॉईंग बोर्ड वगैरे विकत कधीही घ्यावे लागले नाहीत. एप्रन आम्ही रूममेट्स आलटून पालटून वापरायचो, कारण आमच्या वर्कशॉप्सच्या बॅचेस वेगवेगळ्या होत्या. वर्कशॉपचा वापर अभ्यासक्रमासाठी सोडल्यास नाटकांचे सेट तयार करण्यासाठीच जास्त केलेला आठवतो. पण रात्रभर वर्कशॉप वापरायला मिळावं म्हणून सरांना फार मस्का मारायला लागायचा. जॉब्स नीट पूर्ण करायला लागायचे. मग आम्ही रात्री कितीही ड्रिल तोडले, वेल्डिंगच्या स्टिक्स संपवल्या तरी ते काही म्हणत नसत, उलट आम्हाला काही जमलं नाही तर त्यात दुसर्या दिवशी मदत करत. एकदा वेल्डिंग करताना माज म्हणून शिल्ड न घेताच वेल्डिंग केलेलं, दुसर्या दिवशी दिवसभर डोळे मिटून बसावं लागलं, मित्रांच्या शिव्या खाल्या त्या वेगळ्याच.
ड्रॉईंग बोर्ड्सचा वापर आम्ही नाटकाच्या प्रॅक्टीसच्या वेळी सेट लावायला लेव्हल्स म्हणून करायचो. दर वेळी ते सगळे बोर्ड्स २ मजले वर चढवून न्यावे लागत. कॉलेजने कधीही नाटकासाठी पुरेसे पैसे दिले नाहीत.
टूल विकून.......... पुस्तकं घेतली?
>>एकदा ती गोळा केलेली अवजारं एका ज्यूनियरला विकली आणि त्या पैशांतून कुठल्यातरी सेमची पुस्तकं विकत घेतली.
=)) =))
काय राव!!! इतका वेळ तुम्ही जे सांगाल ते ऐकलं म्हणून काय काहीही फेकायचं?
टीप: पुस्तकांची नावं "म्हातारा संन्यासी" किंवा "शाही आव्हान" अशी असतील तर एकवेळ मान्य करता येईल.