आन्सर क्या चाहिये? : सुरुवात
[टायटल वाचून कन्फ्यूज झाला असाल, तर मी स्वतःला १ पॉईंट दिलेला आहे. पुढे वाचा.]
"आजकाल कुठल्याही महानगरात जर तुम्ही एखादा दगड भिरकावून मारलात, तर तो एखाद्या इंजिनेराला लागण्याची शक्यता सर्वाधिक आहे."
~ एका इंजिनेराच्याच रिसर्चवरून.
.
तर अशी परिस्थिती असताना, कुठल्याही इंजिनेराने स्वतःबद्दल गोड गैरसमज बाळगायचं काहीच कारण खरं तर नसावं. पण असे गैरसमज असतात, आणि त्याला इंजिनेरच काय, पण डॉक्टरही काही करू शकत नाहीत. तर सांगण्याचा मुद्दा काय? इंजिनेर सध्या नग्गद झाले आहेत.
असू देत. पूर्वी बँकेतले क्लार्क होते. त्याआधी कदाचित स्वातंत्र्यसैनिक असतील. त्याही आधी कदाचित ईस्ट इंडिया कुंपणीतले सैनिक. काही कल्पना नाही.
पण मुद्दा असाय, की आज इंजिनेर जेवढे सर्वसामान्य वाटतात, तेवढे ते अजून ४० वर्षांनी वाटतीलच असं नाही!
.
तेव्हा त्या ४० वर्षांनतरच्या वाचकांसाठी म्हणून हा प्रपंच आहे, असं मी माझ्या मनाला बजावलं आणि हे सगळं लिहायचा घाट घातला.
शिवाय असा मी असामी, एका मुंगीचे महाभारत वगैरे ग्रंथ आम्ही आजकाल उशाशी ठेवूनच झोपतो. हो.
.
तर ही एका इंजिनेराची गोष्ट. अगदी सामान्य, मुंबईच्या भाषेत चिंधी. प्रस्तुत इसम हा असाच शंभरातील नव्व्याण्णवावा (ह्या शब्दात काहीतरी गडबड आहे.)
काही खास केलं नाही, विद्यापीठात नाव आलं नाही, कधी बारावीत बोर्डात आला नाही आणि दहावीतही तसा नेमकाच. सर्वार्थाने मिडिऑकर. त्याच्या इंजिनेरींगची कहाणी. शहर -मुंबई. उपनगर - कुठलंही. काळ- नेहेमीचाच. बाकी डिटेल्स पुढे येतीलच. तेव्हा निवांत र्हावा.
शिवाय ह्यातल्या बर्याचशा गोष्टी मुंबैसारख्याच इतर इंजिनेरांनाही लागू असतीलच. तेव्हा मुंबैचा उल्लेख प्रातिनिधिक समजावा किंवा समजू नये.
शीर्षकाबद्दल खुलासा
तुम्ही इंजिनेर असाल, तर शीर्षकाबद्दल अधिक काय बोलणे? पण सर्वांसाठी म्हणून -
इंजिनेरींगात ज्या अनेक लॅब वगैरे उच्छाद असतात, त्यात ग्राफ्स, रिडींग्स वगैरे प्रकार असतात. त्यात अचूक किंवा साधारणपणे जुळतील अशी उत्तरं असल्याशिवाय लॅब संपत नाही आणि परिक्षकाची सही मिळत नाही. तेव्हा मुंबैतल्या इंजिनेरींग कालेजातले विद्यार्थी समजून उमजून रिडींग, ग्राफ्स वगैरे काढण्यात वेळ घालवत नाहीत.
हा एक नमुनेदार संवाद बघा-
"एक काम करेगा?"
"बोल ना"
"मेरे लिये ग्राफ छापेगा? XYZ सब्जेक्ट का है. लॅब ३."
"ओके. आन्सर क्या चाहिये?"
"५.६ अमुकतमुक"
"डेटा पॉईंटस"
"६-७. पूरा लाईन पे मत रख. २ इधर उधर .."
"हा, बे. पता है. पर मेरे लिये ABC का ट्यूटोरिअल लिख दे."
"डन."
तेव्हा इंजिनेरांचा प्रमुख प्रश्न "ऐसा क्यू?" वगैरे नसून "आन्सर क्या चाहिये?" असा असतो. त्याला हे लेखन अर्पण.
फक्त सुरूवातीसाठी एवढी ब्यांडविड्थ खर्च केल्याचं खरं तर एक इंजिनेर म्हणून मला दु:ख व्हायला हवं. पण आधुनिक संत बच्चू. त. गोडबोले त्यांच्या एका ओवीत म्हणूनच गेले आहेत-
बँडविड्थ अफाट
कीबोर्ड हाती
बडवता संगती
पुस्तकु गळे
क्रमश:
[ 'ऐ'सक्लेमर - हे काल्पनिक/सत्यघटना ह्यांचं विचित्र मिश्रण आहे. कधी त्यातला भाग अस्सल वाटेल, कधी काहीही वाट्टेल ते लिहिलं असेल. नाईलाज आहे. लेखनातला "मी" किंवा "मै" सत्य वगैरे गोष्टींना फारशी धूप घालत नाही. ललित वगैरे म्हणू शकता, पण एका इंजिनेराच्या आजूबाजूला जे काही घडतं, त्यातला बराचशा अंश ह्यातून डोकावेल. तेव्हा जास्त लोड घेऊ नये, ही आगाऊ विनंती. अधिक लोड घेतल्यास फ्यूज उडल्याची जबाबदारी सर्वस्वी वाचकाचीच राहील.]
हे म्हणजे परिक्षकांनी
हे म्हणजे परिक्षकांनी सुरवातीच्या चान चान डायग्राम्सना भुलावे म्हणून उत्त्मोत्तम गोष्टी आम्ही आधी मांडत असु आणि नंतर तीच वाक्य एकदा अॅक्टिव्ह व्हॉइसात तर पुढिल परिच्छेदात पॅसिव्ह वॉईसात लिहून ८ मार्काचे किंवा १६ मार्कांसाठी लागणार्या लांबीचे उत्तर तयार करत असु. पण सुरवात नेमकी होणे हे यशाचे मुळ गमक!
इथेही सुरवात झक्कास झालीय!
विंजीनेर शोभतोस हो! :P
या ब्बात. वाचतोय...
या ब्बात. वाचतोय...