समाजमाध्यमं आणि मानसिक आरोग्य
समाजमाध्यमं आणि मानसिक आरोग्य
- ईश्वरी मराठे
The belief that more social media = more connection, is one of the biggest myths of the 21st century.
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून मी माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा कर्मधर्मसंयोगाने माझा सगळ्यात पहिला क्लायंट सोशल मीडिया आणि गेमिंगच्या आहारी गेल्याने उपचारांसाठी आलेला होता, म्हणजे त्याची आई त्याला माझ्याकडे उपचारांसाठी घेऊन आली होती. ही गोष्ट आहे २०१९ सालची...
आज २०२४मध्ये सोशल मीडियाच्या व्यसनाचा प्रश्न आणखीनच गंभीर आणि मोठा झालेला आहे. माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पेशंटपैकी अर्ध्याअधिक पेशंट गरजेपेक्षा जास्त सोशल मीडिया वापरतात आणि त्यामुळे त्यांच्या मूळ मानसिक समस्यांमध्ये आणखी भर पडते.
सोशल मीडियाची गंमत आणि ताकद अशी आहे की ती गोष्ट जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही वयोगटाच्या, कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात सहज अडकवू शकते.
माझ्या त्या क्लायंटचंच बघा – तो अक्षरशः दिवसरात्र अखंड ऑनलाइन गेमिंग, चॅटिंग आणि शॉपिंगमध्ये वेळ घालवायचा – फोनवरच्या असंख्य ॲप्समार्फत खाणं, पिणं, कपडे, बूट, गॅजेट्स सगळं घरपोच मिळायचं; पण हे सगळं करूनदेखील त्याला एका फोलपणाच्या भावनेने ग्रासलेलं होतं. तो मला परतपरत ते सांगत होता. आपल्या मनासारखं करूनसुद्धा कशाबद्दलही आनंद, उत्साह वाटत नाही; ही त्याची मुख्य तक्रार होती. आणि हे कळत असूनही त्याला त्याच्या सवयी बदलता येत नव्हत्या. यामुळे अपराधीपणाची भावना वाढत चालली होती, आणि त्यामुळे तो पुन्हा फोन /स्क्रीनकडे वळत होता.
जरा विचार करा, असं का झालं असेल?
सोशल मिडियामुळे कोणतीही गोष्ट आपल्याला 'सहज' आणि 'लगेच' मिळते. त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागत नाही, काहीच कष्ट घ्यावे लागत नाहीत, ही भावना हीच सोशल मीडियाबद्दलची सगळ्यात उपयुक्त आणि तशीच सगळ्यात घातक गोष्ट आहे. आम्ही मानसशास्त्रज्ञ याला 'Instant Dopamine Hit' किंवा 'Instant Gratification' म्हणतो – मेंदूत आनंददायी हॉर्मोन्सचं उधाण येणं (Quick Bursts Of Pleasure Hormones) म्हणजे dopamine hit मिळणं. विचार करा, सर्वसामान्य माणसाला याची सवय लागली तर वैयक्तिक आणि सामूहिक मानसिक आरोग्यावर त्याचा काय आणि किती परिणाम होईल?
आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवातून मी एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे, कोणता तो सांगते. कल्पना करा, की दिवसभर काम करून तुम्ही दमून भागून घरी आला आहात. आल्यावर ताजेतवाने होऊन तुम्ही सोफ्यावर बसता. 'थोडा वेळ Instagram/ Youtube वर timepass करू या आणि मग व्यायाम किंवा आपल्याला आवडेल ते काही तरी करू', असं ठरवून फोन हातात घेता. म्हणता म्हणता रात्र होते आणि आपल्याला आवडेल असं काही तरी करण्याची संधी (window of opportunity) तुमच्या हातातून निसटलेली असते. मग सुरू होतं ते स्वतःला दोष देण्याचं चक्र. हा 'सोशल मीडिया ब्लॅक होल इफेक्ट' असतो.
याला मी 'ब्लॅक होल' म्हणते कारण ब्लॅक होलप्रमाणेच एकदा सोशल मीडियात गुंतत गेलं की त्यातून बाहेर पडणं कठीण असतं – कितीही इच्छा असली तरीही. बरं, मनसोक्त ४-५ तास स्क्रीनवर वेळ घालवल्यावर आनंदी आणि निवांत वाटतं का? तर तेही नाही. उलट डोपामिनची लाट ओसरून गेल्यावर मागे उरते ती एक पोकळी. हे black holeचं आणखी एक वैशिष्ट्य – त्यातून येते अपराधीपणाची भावना आणि चिडचिड, आणि त्या भावनांना दाबण्यासाठी माणूस पुन्हा वळतो – स्क्रीनकडेच.
काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक chronic Generalized Anxietyचा पेशंट रेफर झाला होता. तो म्हणायचा की त्याची चिंता फुलपाखरासारखी होती – आत्ता एका गोष्टीबद्दल तर पुढच्या क्षणाला दुसऱ्या कशाबद्दल. कोणत्याही थेरपी प्रोसेसमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःचे triggers शोधून काढणं – काय केल्यानं, किंवा काय झाल्यामुळे आपल्या चिंतेचं चक्र सुरू होतं आहे हे एकदा समजलं की त्यावर काम करणं कैक पटीने सोपं होतं; तर त्याच्याबरोबर आढावा घेतल्यानंतर असं जाणवलं की बऱ्याचदा त्याच्या चिंतेचे चक्र असे काहीसं असतं –
कंटाळा आला/ चिंता वाटली → फोन हातात घेऊन यूट्यूब / इन्स्टाग्राम उघडलं → इतर लोकांच्या आयुष्यात काय चांगलं घडतं आहे ते बघितलं → स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि मानसिक आरोग्याबद्दल कमीपणाचे विचार मनात फिरायला लागले → ते विचार गप्प करायला यूट्यूबवर सिनेमा / webseries बघितली → शरीरातले anxiety cues वाढले → पॅनिक अटॅकची सुरुवात झाली.
याच्या जोडीनं आणखी ट्रिगर नक्कीच होते, पण आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा तो सकाळी उठल्याक्षणी किंवा त्रास होत असताना स्क्रीनकडे वळत होता, तेव्हा तेव्हा त्याची चिंता आणि नैराश्य शिगेला पोचत होते. या शोधाचा फायदा करून घेऊन मग त्याच्या ट्रिटमेंटमध्ये योग्य ते बदल घडवून आणले आणि हळूहळू त्याच्या सवयी, त्याचा स्क्रीन टाइम आणि त्याचं मानसिक आरोग्य सगळे पालटले.
त्यामुळे, तुम्हाला सांगते, रावणाच्या दहा तोंडांसारखे सोशल मीडियाच्या अतिवापराचे अनेक परिणाम एकाच वेळी जाणवतात. झोप कमी होणं; किंवा शांत, गाढ झोप न लागणं; गरज नसताना किंवा गरजेपेक्षा जास्त खरेदी करणं; अतिविचार करणं; चिंता-काळजी (Anxiety) वाढणं, आणि कृतज्ञभाव कमी होणं; सोशल मीडियावरच्या घोटीव शरीरांच्या मॉडेल्सशी स्वतःच्या शरीराची अखंड तुलना करत राहणं; बाहेर जाऊन इतर लोकांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी ऑनलाइन मित्रमंडळींबरोबर वेळ घालवणं, इत्यादी. या सगळ्या गोष्टींमुळे आपण एका छानशा समूहात मजेत राहतो आहोत असा केवळ आभास निर्माण होतो.
स्क्रीनवर दिसणाऱ्या लोकांच्या फक्त शरीराशीच तुलना न होता, हळूहळू त्यांचं करिअर, ते कमवत असलेला पैसा, त्यांच्याकडे असलेल्या चैनीच्या वस्तू, म्हणजेच त्यांच्या पूर्ण आयुष्याशीच तुलना व्हायला लागते आणि मग स्वतःचं आयुष्य कधी फालतू, निरर्थक वाटायला लागतं ते कळतही नाही!
हे झालं वैयक्तिक मानसिक आरोग्यावर होणार्या परिणामाबद्दल, आता एक पाऊल पुढे जाऊ या आणि सामूहिक मानसिक आरोग्याबद्दल सुद्धा बोलू या.
गेल्या महिन्यात मी फिरायला गेले होते, अतिशय सुंदर, निसर्गरम्य ठिकाण होतं. पण तिथे काय दिसलं, तर किती तरी पर्यटक एखादी चेकलिस्ट असावी तसे एकेक स्थळ बघत होते; तिथे अगदी ठरावीक, त्याच-त्या पोझेस देऊन स्वतःचे फोटो आणि व्हिडियो काढत होते; आणि त्वरित दुसऱ्याला जागा रिकामी करून देत होते. पुढचा तिथे येऊन पुन्हा स्वतःचे तसेच फोटो काढून घेत होता. ते पाहून मला कारखान्यातल्या असेंब्ली लाइनचीच आठवण झाली. सध्या तर देवाला जाताना, मंदिरात दर्शन घेतानाही लोकांना आपल्या भक्तिभावाचे फोटो हवे असतात. अशा वेळी वाटतं, कोणतीही गोष्ट समरसून अनुभवण्याचं सुख आता हरवतच चाललं आहे!
यामुळे काय होतं, की हळूहळू व्यक्तिगत, खासगी आणि जाहीर गोष्टींमधल्या रेषा अधिकाधिक धूसर होत जातात. त्यामुळे जो परिणाम होतो त्याला मानसशास्त्रीय भाषेत mindless Consumption and experience effect म्हणतात. विचारशून्य अनुभूती.
आणखी एक, म्हणजे सोशल मिडियामुळे माणसाला स्वतःच्या नावाबाबतची गुप्तता पाळण्यातली झिंग अनुभवता येते – मी ऑनलाइन कोणत्याही नावाखाली कोणालाही, काहीही आणि कसंही बोलू शकते, मला कुणी हात लावू शकत नाही, अशी इथे मोकळीक मिळते. यामुळे समाजात एक नवा गट निर्माण झाला आहे. या गटातल्या माणसांना दमदाटी, विनाकारण कुरापती काढणं, टीका करणं, दुसर्यांना त्रास देणं, यातून ते डोपामिनचं उधाण अनुभवायला मिळतं. याचे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर भयंकर परिणाम होऊ शकतात; नव्हे, तसे परिणाम दिसायला लागले आहेत. याचाच आणखी एक पैलू म्हणजे misinformation; काहीही, वाट्टेल ते, आणि वाट्टेल तशी माहिती व्हॉट्सॅप, फेसबुकवर फिरवणे – स्वतःच्या तब्येतीविषयी, मानसिक आरोग्याविषयी, अर्थव्यवहारांविषयी अर्धवट माहिती असलेले निरोप वाचले जातात; आणि अनेक जण त्यांचं अनुकरणसुद्धा करू लागतात. यातून काही बरंवाईट झालं तर कोण जबाबदार ठरेल?
मी स्वतः सोशल मीडियाच्या दोन्ही बाजू अनुभवते – एक साधी वापरकर्ती म्हणून आणि कंटेंट क्रिएटर या नात्यानंही. एक-दोन दशकांपूर्वी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाला नाव कमावण्यासाठी मुख्य गरज होती ती योग्य शिक्षणाची, चांगल्या मार्गदर्शनाची, प्रत्यक्ष अनुभवाची, आणि क्लायंट्सबद्दलच्या विश्वासाची. आता हे चित्र बदललं आहे. आता मानसोपचारतज्ज्ञांना स्वतःची खासगी प्रॅक्टिस प्रस्थापित करायची असेल तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर शिकून घेणं अनिवार्य झालं आहे. तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया पेजवर नसलात, तिथे तुमचं प्रभावी अस्तित्व नसलं तर मग अवघड होऊन बसतं. मी माझ्या पेशंट्ससोबतच्या आदानप्रदानापेक्षाही या गोष्टीने थकून जाते. आपला अभ्यास, आपले दैनंदिन अनुभव यातून चांगल्या पोस्ट्स, रील्स कशी बनवता येतील हाच विचार डोक्यात अखंड सुरू असतो. मी बरेच दिवस त्यात वावटळीसारखी फिरले. मग मला उमगलं, की आपलं करियर, आत्मविश्वास, कष्टांचं मूल्य या गोष्टींना आपल्या इन्स्टाग्राम पेजपासून अलग करायला हवं. ही गोष्ट वागणुकीत उतरवायला मला खूप झगडावं लागलं; आजही तो झगडा सुरू आहे.
*
मुळात इन्स्टाग्राम, लिंक्डिन, यूट्यूब या सगळ्यांच प्लॅटफॉर्म्सवर मानसशास्त्रज्ञांची इतकी गर्दी झाली आहे, की मानसिक रोगांची अस्सल आणि सर्वंकष माहिती शोधून काढायची म्हणजे एक आव्हानच ठरतं. या माहितीच्या जंजाळातून आपल्याला नक्की काय लागू पडू शकतं हे लक्षात येत नाही. त्यामुळे आजकाल होतंय काय, की पेशंट्सच थेरपिस्टला येऊन सांगतात, की 'मी इन्स्टावर अमुकअमुक समस्येबद्दल वाचलं, त्यावरून स्वतःचं निदान केलं, आता तुम्ही मला त्यावरचे उपाय तेवढे सांगा.' निदान मानसोपचार असे होत नसतात!
इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्याबद्दल चर्चा होणं, लोकांपर्यंत त्याची माहिती पोचणं, हे चांगलंच आहे. घातक काय आहे, तर माहितीचा विपर्यास, घाईघाईनं केलेलं निदान किंवा पार चुकीचं निदान. हे केव्हा होतं? जेव्हा माहिती तर मिळते, पण त्यावर आवश्यक तेवढा, आवश्यक तसा विचारविनिमय होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने हा विचार करावा – सोशल मीडियावर वाचलेल्या गोष्टी डोळे मिटून स्वीकारायच्या? की आधी त्यावर खोलवर विचार करायचा?
तुम्ही लेख वाचत इथपर्यंत आला असाल, तर अभिनंदन! तुम्हाला अजूनही एकाग्रचित्त करायला जमतंय, ३० सेकंद किंवा ६० सेकंदांच्या रील्सनी तुमच्या मनाचा ताबा घेतलेला नाही.
लेखाचा समारोप करण्याआधी काही प्रश्न मांडते, ते तुम्ही स्वतःला विचारून पाहा –
- दिवसाकाठी माझा किती वेळ इन्स्टाग्राम, लिंक्डिन, स्नॅपचॅट, यूट्यूब इत्यादी ठिकाणी खर्च होतो?
- त्यापैकी किती वेळा ते समजून-उमजून केलेलं असतं? आणि किती वेळा हाताला चाळा हवा म्हणून, किंवा नकारात्मक भावना टाळायच्या म्हणून, किंवा स्वस्थ बसायचा कंटाळा आला म्हणून केलेलं असतं?
- सध्या तुम्ही सोशल मीडियावर जेवढा वेळ घालवता त्यापैकी फक्त २० मिनिटं कमी केलीत तर त्या वेळात असं काय करता येईल ज्याने फक्त डोपामिन – Pleasure Hormoneचं उधाण न येता Endorphins – आनंदाचं, समाधानाचं हॉर्मोन स्रवेल?
हे प्रश्न मी माझ्या त्या पहिल्या क्लायंटलासुद्धा विचारले होते. कोणतंही दीर्घकालीन व्यसन, अगदी सोशल मीडियाचं व्यसन असलं तरी ते दूर करायला वेळ लागतो; उपचारांची वेगवेगळी तंत्रं वापरावी लागतात; पण मुळात त्या व्यक्तीची व्यसनातून बाहेर येण्याची मनाची तयारी असावी लागते. सुदैवानं त्या मुलानंही तशी तयारी दर्शवली, त्याला मी त्याच्या व्यसनातून बाहेर काढू शकले.
दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पेशंट्सची संख्या वाढत चालली आहे, अशा वेळी त्या पहिल्या क्लायंटच्या उपचारांमधून मला मिळालेला अनुभव केवढा मोलाचा ठरला असेल हे वेगळं सांगायला नकोच.
चला तर मग, स्वतःचा फोन किंवा लॅपटॉप बाजूला ठेऊन पुन्हा आयुष्याला पूर्णपणे भेटूया?