चार गझल

ललित #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

चार गझल
- अनंत ढवळे

१.

एक मी जगण्यातला देहातला कपड्यांतला
आणि दुसरा नग्न बेफिक्रा कुणी वाऱ्यातला

वाटतो जाईल वायावीण गोंगाटामधे
अर्थ मी जो आणला शोधून वैयर्थ्यातला

की न गवसावा तुला अथवा मला कुठल्या तऱ्हे
एवढा विस्तीर्ण का संबंध हा दोघांतला

आपले वैराग्य का इतके सहज स्खलनातले
वा असावा छंद हा निव्वळ उतू जाण्यातला

वाढले आहे बिचारेपण किती श्वासांतले
काय ही तगमग म्हणावी जीव की जाण्यातला

आपल्यासाठीच बनले जग उभे डोळ्यांपुढे
आपल्यापुरता प्रलय डोळे पुन्हा मिटण्यातला

*

२.

तू स्वस्थ असे बसणार किती
चढते पाणी बघणार किती

इतिहास तुला पुरणार किती
उलटी गणना करणार किती

ये जमिनीवर सोडव गुंते
नुसती स्वप्ने विकणार किती

हा तोच चिखल फसलो जेथे
ह्या रस्त्यांवर भुलणार किती

ही वेळ तुझी तू कर काही
नेहरु-नेहरु करणार किती

फसलात कितीदा हे मोजा
झोपेत तुम्ही रमणार किती

एके दिवशी म्हटले दादा
उलटे धंदे करणार किती

*

३.

तू हेही कर तू तेही कर
करता करता एग्दिवशी मर

स्टेशन-स्टेशन नुस्ता धुरळा
रस्ता-रस्ता केवळ मत्सर

लागेना कोठेही गाणे
ऐकत बसलो नुसती खरखर

माती बिलगेनाशी झाली
वाढत गेले इतके अंतर

माणूस तसाही सुंभउपट
बांधत बसतो नसलेले घर

*

४.

केली जगण्याची धडपड मग ते मेले
वाहिली दुखाची कावड मग ते मेले

जमले ते बेत जमवले अर्धेमुर्धे
उडवली सुखाची धुळवड मग ते मेले

डोईवर आग उन्हाळा होता पायी
झाली तृष्णेने तडफड मग ते मेले

उरल्यात कितींच्या गोष्टी आगेमागे
नुसती पानांची फडफड मग ते मेले

समजला तुला जर अर्थ सांग जन्माचा
बहुतांची झाली परवड मग ते मेले

***

field_vote: 
0
No votes yet