सपेरा, लुटेरा आणि मंडळी
सपेरा, लुटेरा आणि मंडळी
- शेखर मोघे
मागच्या काही दशकांतला सगळ्याच उद्योगधंद्यांच्या यशाचा गुरुमंत्र "आंतरजाल आणि सोशल मीडियांचा यशस्वी वापर" हा असताना, फसवाफसवीचा उद्योग यशस्वीपणे करणारे आपल्या धंद्याच्या भरभराटीसाठी समाजमाध्यमे/सोशल मीडियाचा वापर करण्यात मागे कसे राहतील?
आंतरजालाच्या आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रसाराच्या आणि लोकप्रियतेच्या मागे अनेक गोष्टी आहेत. अनेक बाबतीत "चपळ आणि तरबेज" असलेल्या फेसबुकसारख्या समाजमाध्यमांनी लोकांना काय बघायला आणि वाचायला हवे असते, लोकांचे कळप कसे तयार होतात, ते एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण कशी करतात, कुठल्या तऱ्हेच्या मथळ्यांनी, चित्रांनी किंवा लिखाणांनी लोक आकर्षित होतात आणि आपली आवड एकमेकांना कळवतात अशा अनेक बाबींचा पद्धतशीर अभ्यास केला. या अभ्यासांचा फायदा घेत "ढकला आणि ओढा" (push and pull) अशा दोन्ही तऱ्हांची वेगवेगळे लहान-मोठे गळ तयार करून जनमनाला वाढत्या प्रमाणात आपल्या पसरत्या जाळ्यात ओढले, पकडून ठेवले. जितके लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांच्या माध्यमाचा वापर करू लागले तितके त्यांचे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न वाढत गेले. त्यामुळे त्यांना व्यवसाय वाढवत राहण्याकरिता लागणारे तंत्रज्ञान आणि भांडवल दोन्हीही कालानुरूप अद्ययावत आणि वाढते ठेवत आपला जागतिक पगडा वाढवत ठेवता आला. समाजमाध्यमांच्या लोकांना "काबीज" करण्याच्या यशाची काही उदाहरणे आणि आकडेवारी :
- वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा वापरकर्तावर्ग (subscribers or users) वेगवेगळ्या तऱ्हेचा असल्याने त्यांच्या जनमानसावरच्या पकडीची प्रतवारी वेगवेगळ्या पद्धतीने लावावी लागेल – जसे वापरकर्त्यांची संख्या किंवा त्यांना जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न. कुठल्याही दृष्टीने पाहिल्यास फेसबुक आणि यूट्यूब या दोन्हींचा सिंहाचा वाटा आहे आणि "इतर" या वर्गात ट्विटर (आता X), पिंटरेस्ट, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप आणि आणखीही इतर काही नावे मोडतात.
- जगभरातले ५०%पेक्षा जास्त लोक फेसबुकवर आपापल्या मित्रवर्गाशी संबंध ठेवण्यात दिवसाचे २-३ तास घालवतात पण यूट्यूबच्या सदस्यांत अशी काही देवाणघेवाण नसते. त्यामुळे फेसबुकला समाजमाध्यमांचे सध्याचे एक उत्तम आणि सर्व तऱ्हेने प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.
- फेब्रुवारी २००४मध्ये सुरू झालेल्या फेसबुकला पहिले शंभर कोटी वापरकर्ते मिळवण्यासाठी ऑक्टोबर २०१२पर्यंत प्रयत्न करावे लागले. त्या वेळी सुमारे अर्धेच लोक रोज फेसबुकचा वापर करीत. पुढील शंभर कोटी वापरकर्ते जून २०१७पर्यंत म्हणजे ५ वर्षांपेक्षा कमी काळात मिळाले आणि त्या वेळपर्यंत दोन तृतीयांश वापरकर्ते रोजच फेसबुक वापरू लागले होते. सध्या फेसबुकचे तीनशे कोटीपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.
- सध्या जगभरांत ४२६ कोटी लोक (जागतिक लोकसंख्येच्या सुमारे ५८%) कुठल्या ना कुठल्या समाजमाध्यमाचे वापरकर्ते आहेत आणि ते दररोज सरासरी अडीच तासांकरता विविध समाजमाध्यमे वापरतात.
- जागतिक उद्योगधंदे सध्या आपल्या समाजमाध्यमांवरील जाहिरातीसाठी २०,००० कोटीपेक्षा जास्त अमेरिकी डॉलर एवढी रक्कम प्रत्येक वर्षी खर्च करतात. या आकड्यांवरून समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांच्या जागतिक क्रयशक्तीची कल्पना यावी.
अशा सुपीक कुरणात आपल्याही (जमेल तेवढे) शिरता आणि चरता यावे यासाठी फसवाफसवीच्या व्यवसायातील लोक देखील प्रयत्नशील असल्यास काय नवल?
जगातल्या प्रत्येकाचे ऑनलाईन अस्तित्व आणि म्हणून सोशल मिडियावर – बहुतेक एकापेक्षा जास्त – अकाउंट असणे हे झपाट्याने वाढले आहे. त्याचा एक कळत नकळत झालेला परिणाम म्हणजे फसवाफसवीच्या धंद्याला देखील समाजमाध्यमांवर त्यांचे गिऱ्हाईक मिळवणे सोपे झालेले आहे.
फसवाफसवी हा अनादी काळापासून चालत आलेला उद्योग आहे. मुख्यतः लोभ आणि भीती या दोन मानवी भावनांच्या कृपेने हा "उद्योग" चालतो. त्यामुळे समाजमाध्यम (सोशल मीडिया) हा एक नवीन मंच असला तरी अशा नव्या माध्यमाच्या पार्श्वभूमीवर आपले नेहेमीचेच प्रयोग करताना आणि आपली गिऱ्हाइके गटवताना या धंद्यातील लोक अजूनही "फसवाफसवी १" हे आपले अनादिकालापासून वापरात असलेले मूलतत्त्वच वापरत असावेत.
सध्याच्या समाजमाध्यमांच्या आगमनाच्या बऱ्याच आधीच्या काळातील "सार्वजनिक फसवाफसवी"चे प्रयोग मी लहानपणी अनेक वेळा पाहिले आहेत. एखाद्या बऱ्यापैकी वर्दळीच्या रस्त्याच्या जवळपास थोडासा गाजावाजा करत पोरेटोरे, हवशे, नवशे आणि गवशे अशा सगळ्यांचा मोठा घोळका जमवला जाई. कर्कश्श आवाजातली चालू सिनेमातली लोकप्रिय गाणी अथवा ‘मेरा साया’मधील "झुमका गिरा रे" किंवा ‘पाठलाग’मधील "नको मारूस हाक"सारखा एखादा लक्षवेधी नाच अशी आकर्षणे या कामाकरता उपयोगी ठरत. पुरेसा मोठा घोळका जमल्यावर आपण कसे फक्त "जनतेच्या हितासाठी धंदा" करतो हे अगदी मधाळ शब्दात वर्णन करून चाकू, कात्र्या, आरसे, कुलुपे अशा अनेकविध गोष्टींचा एकामागून एक लिलाव सुरू केला जाई. काही वेळा त्या आधी दाखवल्या जात तर काही वेळा नुसतीच एक बंद थैली किंवा पेटी लिलावात येत असे. अनेक वेळा लिलावात बोली लावणाऱ्याला १०० रुपयांची वस्तू २-५ रुपयांत मिळून गेल्यासारखे दिसत असे. पुरेशी वातावरणनिर्मिती केल्यावर एखाद्या दिसण्यात मालदार असणाऱ्याला भरीला घालत पुढील लिलावात हिरीरीने भाग घ्यायला आणि चढती बोली लावायला उद्युक्त करून शेवटी २-५ रुपयांची वस्तू १००-२०० रुपयांत त्याच्या गळ्यात बांधून हे सगळे कलाकार तिथून पळ काढत.
थोड्याशाच खर्चात दुसऱ्याला मिळाले तसे मोठे घबाड मिळवण्याचा लोभ आणि "दुसऱ्याला मिळालेली संधी मलाही मिळत असताना तिचा फायदा न घेण्याने मी माझेच नुकसान तर करत नाही ना" ही या फसवाफसवी करणाऱ्यानीच निर्माण केलेली भीती या दोन मानवी भावनांचा उपयोग करून हे उद्योजक आपला कार्यभाग साधत. चटपटीत बोलण्याने या भावनांना झटपट खतपाणी घालणे आणि फटाफट आपल्या सावजाला गटवणे हाच या नाट्यप्रयोगांचा स्थायी भाव असे. सुरुवातीला १०० रुपयांची वस्तू २-५ रुपयांत मिळवणारे आणि जाळ्यात पकडण्यासाठी हेरलेल्या लक्ष्याला हिरीरीने लिलावातली बोली वाढवायला लावणारे, तिथे जमलेल्या प्रेक्षकांपैकी वाटणारे लोकही याच खेळातले सहकलाकार असत. अशा टोळक्यासमोर एकटे-दुकटे असलेले सावज आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फारसे काही करू शकत नसे.
या समाजमाध्यमांच्या आधीच्या जमान्यात जशी एखादी मालदार असामी, आपल्या अंगठ्या झळकावत किंवा वारंवार जाडजूड खिसा चाचपत "या आणि मला लुटा" अशी जाहिरातच करत असे, तसेच काहीसे समाजमाध्यमांवर वागणारे आपण फसवाफसवीचे लक्ष्य ठरू हे का लक्षात घेत नाहीत!
समाजमाध्यमांवर अनेक लोक नियमितपणे करत असलेले वेगवेगळ्या ठिकाणी केलेले प्रवास, वाढदिवस किंवा इतर खास प्रसंगाच्या पार्ट्या, नवीन गाडी घेणे अशा सगळ्यांचे यथासांग वर्णन कुणाच्याही हातात पडणे शक्य असल्याने वाचणाऱ्याला त्या आनंदात जसे सहभागी होता येते तसेच त्यावरून वर्णन करणाऱ्याच्या खिशाचाही अंदाज मिळून फसवाफसवीसाठी आयते एक लक्ष्य मिळून जाते!
फसवाफसवी करणाऱ्या लोकांना समाजमाध्यमांच्या मार्फत त्यांचे "काम" करतांना अनेक तऱ्हेचे बुरखे पांघरता येतात. त्यामुळे समाजमाध्यमांवर घडणारे फसवणुकीचे गुन्हे कायद्याच्या चौकटीत आणणे कठीण होते. काही लोक त्यांची फसवणूक झाल्यावर फारशी वाच्यता करण्याचे टाळतात. पळवलेला ऐवज जर नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत बिटकॉईनसारख्या मालमत्तेच्या रूपात बाळगलेला असेल तर तो परत मिळवणेही सोपे नसते. अशा विविध कारणांमुळे समाजमाध्यमांच्या वापरातून फसवाफसवी करणारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पण जवळजवळ अदृश्यपणे आपला उद्योग चालू ठेवू शकतात.
जगभर चालणाऱ्या फसवणुकीतून होणाऱ्या नुकसानाचा अंदाज लागणे कठीण आहे. अमेरिकेतील एका अभ्यास लेखानुसार जानेवारी २०२१ ते जून २०२३ या काळात वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरील फसवणुकीतून अमेरिकन लोकांचे सुमारे २.७ अब्ज (अमेरिकन) डॉलरचे नुकसान झाले. एवंच फसवाफसवीच्या उद्योगाची जगभरात होणारी कमाई बरीच मोठी असावी.
ही "सपेरा, लुटेरा आणि मंडळी" (भुलवून लुटणारी) आपल्या सावजाला अनेक तऱ्हांनी पैसे गमावण्यासाठी उद्युक्त करतात.
एखाद्या वस्तूचा किंवा सेवांचा आंतरजालावर शोध सुरू केल्यावर त्याची खरी किंवा बनावट अशी सगळ्या प्रकारची माहिती शोध करणाऱ्याकडे पोचू लागते. ज्यांचा उद्देश फसवणे असा असतो ते वरच्या उदाहरणातील "१०० रुपयांची वस्तू २-५ रुपयांत" देण्याच्या आमिषाने विकत घेणाऱ्याला अशा तऱ्हेने भुलवतात आणि घाबरवतात की "आपल्याला हा सौदा मिळाला नाही तर मोठ्ठी संधी हुकेल" या भीतीने खरेदीसाठी तो लगेच पैसे पाठवून मोकळा होतो. त्यानंतर जेव्हा हाती काही लागत नाही तेव्हा आपण फसवले गेल्याचे त्याच्या लक्षात येते.
गुंतवणुकीच्या बाबतीत बनवाबनवी करणारे आपला सल्ला वापरून अनेक जण कसे अल्पावधीत कोट्यधीश बनले याची खऱ्याखोट्या व्यवहारांची उदाहरणे देत सावजाला "फक्त तुमच्यासाठीच उपलब्ध असलेल्या या गुंतवणूक संधीचा लगेच फायदा घ्या कारण आणखी काही दिवसांत (किंवा अगदी काही तासांत) ही गुंतवणुकीची संधी तुम्ही कायमची गमावून बसाल" असे भीतीयुक्त आमिष दाखवतात. अशी घाईगर्दीत केलेली गुंतवणूक ही फसवणूक आहे हे काही काळाने लक्षात येते.
समाजमाध्यमांवर जोडीदाराचा शोध घेणाऱ्यांना आपण अनुरूप जोडीदार असल्याचे भासवत, संदेश देवाणघेवाणीतून जवळीक निर्माण करून त्यानंतर आजारपण, आगाऊ घरभाडे देण्याकरता पैसे कमी पडत आहेत अशा काहीबाही खरोखरच्या वाटणाऱ्या सबबी सांगून तात्पुरती मदत म्हणून वेळोवेळी पैसे पाठवण्याची विनंती करण्यात येते. हवी असलेली जवळीक बिघडू नये म्हणून पैसे पाठवत राहिल्यानंतरही पुढे काहीच प्रगती न झाल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजते.
फसवण्याच्या "कलेतले" तरबेज लोक नवनवीन तऱ्हेचे सापळे त्यांच्या सावजांना अडकवण्यासाठी बनवत असतात. एखाद्या लक्ष्याला मोठ्या रकमेचे बक्षीस मिळाल्याचे कळवून त्याच्या प्रक्रियेसाठी काही पैसे आगाऊ मागणे, त्यांच्या खात्यातून "मनी लाँडरिंग" झाले असल्याच्या संशयाने, किंवा पाठवलेल्या पत्रातून मादक द्रव्ये वितरित केली असल्याच्या आरोपावरून पोलीस चौकशी सुरू होण्याचा धाक दाखवून, ते प्रकरण मिटवण्याकरता काही पैसे मागणे; घरातील कोणी तरी अपघातात सापडल्यामुळे त्याला लगेच इस्पितळात नेऊन तेथे ताबडतोब भरण्यासाठी पैसे मागणे; काही सोप्या कामातून बरीच कमाई करून देणारी नोकरी मिळवण्याकरता काही सुरुवातीची वैद्यकीय परीक्षा वगैरे जुजबी आणि आवश्यक पायऱ्या पार करण्यासाठी आगाऊ पैसे भरायला लावणे; अशी वेगवेगळी नाट्यसंहिता वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते. आणखीही जास्त गुंतागुंतीची तंत्रे म्हणजे एखादा QR Code स्कॅन करायला लावून किंवा बँकेतून बोलत असल्याच्या बहाण्याने बँकेतील खात्याचे किंवा क्रेडिट कार्डाचे विवरण मिळवून खात्यातील पैसे गायब केले जातात. अशा सगळ्यांच पद्धतींत "आम्ही सांगतो त्याप्रमाणे लगेच न केल्यास तुम्हालाच नंतर अतिशय कटकट होणार आहे" ही भीती दाखवून आपला कार्यभाग साधणे हेच तंत्र बहुशः वापरले जाते.
त्यांतल्या काही प्रकरणांत काही तांत्रिक बाबतीत तरबेज असणारे लुटेरे समाजमाध्यमात जाहिरातींच्या संबंधात नेहमी वापरली जाणारी व्यावसायिक विश्लेषणाची साधने (analytical tools) वापरून वय, सांपत्तिक स्थिती, आधी केलेली खरेदी अशा अनेक दृष्टीकोनातून त्यांना हव्या असलेल्या प्रकारच्या सावजापर्यंत पोचण्यास उपयोगी अशी माध्यमे शोधून त्यांच्याद्वारे खऱ्या वाटतील अशा जाहिरातीही प्रसारित करतात.
आणखी काही फसवणुकीतले तज्ज्ञ एखाद्या व्यक्तीची नकली, भासप्रतिमा तयार करून (Identity Theft/ Duplication) तिच्याद्वारे स्वतःसाठी नवीन कर्ज, उधारीवर किंवा हप्त्यावर मोठी खरेदी अशा तऱ्हेचे फायदे मिळवतात, ज्यांची जबाबदारी ज्याची identity चोरली जाते त्याला नंतर घ्यावी लागते.
सध्या समाजमाध्यमांवर अशा सगळ्याच तऱ्हेच्या व्यवहारांचा इतका सुळसुळाट आहे की त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक मानसशास्त्रीय प्रणालींचेसुद्धा व्यावहारिक नामकरण झाले आहे जसे "Fear of Missing Out" किंवा "FOMO". असे प्रकार जरी नवे वाटत असले तरी काही जुन्या काळापासून चालत आलेले वाक्प्रचार पाहिले तर फसवाफसवी हा प्रकार फारसा नवा नसून फक्त त्याचा मंच बदलला असावा असे वाटते. गाय विकणारा ती गाय कशीही असली तरी तिचे वर्णन "आखूडशिंगी बहुदुधी" असेच करत असे आणि म्हणून हा वाक्प्रचार अजूनही अस्तित्वात आहे. मारुतीच्या मूर्तीच्या बेंबीत असलेल्या विंचवाने बोटाला डंख मारला तरी त्यामुळे पीडित मनुष्य आपण कसे फसलो हे कबूल करण्याऐवजी "मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर गार वाटते" हा त्याला मिळालेला निरोप (की ज्यामुळे त्याने स्वतः फसून बेंबीत बोट घालून बघितलेले असते) आणखी चार जणांना सांगून त्यांनाही गंडवतो. ब्रिटिशांच्या भारतातील अंमलाच्या सुरुवातीच्या काळात १८व्या आणि १९व्या शतकात भारताच्या बऱ्याच भागात जोरात असणारे ठगदेखील आधी विविध प्रकारे त्यांच्या सावजाचा विश्वास मिळवून मग त्याला बेसावध असताना ठार मारून लुटत.
सावध राहिल्यास गंडले जाण्याची शक्यता कमी होऊ शकते.
१. आपल्याला फारच गडबडीने काही तरी करण्यास भाग पाडले जात आहे का हा प्रश्न प्रत्येक वेळी स्वतःला विचारा. अशी शंका आल्यास एखादे सहज पटेल असे कारण सांगून (उदाहरणार्थ, आता मी गडबडीत आहे, तुमचा नंबर दिलात तर मी उद्या फोन करेन किंवा तुमचा पत्ता द्या, मी स्वतः येऊन भेटेन) प्रतिक्रियेचा अंदाज घ्या. तसे करू द्यायला जर तुम्हाला जोरदार विरोध होत असेल तर कुठे तरी पाणी मुरते आहे. खराखुरा व्यवहार असेल तर असे काही करू देण्यास नाखूष असण्याचे काहीच कारण नाही.
२. ज्या कशाचे आश्वासन दिले जाते आहे (उदाहरणार्थ, "थोडक्या खर्चात मोठे घबाड") ते व्यवहार्य आहे का याचा विचार करून पाहा. या जगात काहीच कधीच फुकट किंवा जवळजवळ फुकट मिळत नाही आणि जो असे काही मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत असतो तो लुच्चा असण्याचीच शक्यता जास्त असते.
३. ज्याची आधी कुठलीच ओळखपाळख नाही असा कोणी तरी अचानक जवळीक साधू पाहणे हे शंकास्पद असू शकते. ज्या कुणाचा संदर्भ देऊन कोणी तरी तुम्हाला काही तरी लगेच करण्यास सांगतो आहे त्याला लगेच विचारून खात्री करून घेण्याचा प्रयत्न करा. जर अशी खात्री करून घेण्यापासून तुम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर नक्कीच काही तरी गडबड आहे.
४. कुठल्याही समाजमाध्यमावर आपल्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टींची जाहिरात करण्याची कितपत जरूर आहे याचा नेहमी संतुलित विचार करा. कुणाही तिऱ्हाईत व्यक्तीला समाजमाध्यमाद्वारे आपल्याबद्दलची सर्व तऱ्हेची माहिती आयती उपलब्ध करून दिल्यास त्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता विसरून चालणार नाही.
५. जिथे एखाद्या संधीची वारेमाप स्तुती किंवा FOMOचे भय दाखवले जाते, तेथे शक्य तेवढे प्रश्न विचारून त्या संधीची सगळीकडून पाहणी करा. त्यातून मिळालेल्या माहितीतून ती संधी किती व्यवहार्य आहे याची शहानिशा होऊन जाईल किंवा शंकास्पद विक्रेते तुमचा जागरूकपणा पाहून तुमच्या वाटेला लागणार नाहीत.
६. जिथे वरकरणी तुमच्या बँकेकडून किंवा क्रेडिट कार्ड देणाऱ्या संस्थेकडून "अमुक तमुक माहिती (फोनवरून निरोप पाठवून) लगेच द्या" अशी तातडीची विचारणा केली जाते आणि त्याचबरोबर "नाही तर खाते गोठवले जाईल किंवा क्रेडिट कार्ड रद्द होईल" अशी तंबी दिली जाते, तेथे शक्य तेवढे प्रश्न विचारून अशी माहिती खरोखरच आणि तातडीने फोनद्वारा पाठवणे जरूर आहे याची प्रथम खात्री करून घ्या, "मी बँकेत प्रत्यक्ष येऊन देतो आहे" असा खडा टाकून त्यावरची प्रतिक्रिया अजमावा आणि जर शंकानिवारण झाले नाही तर आपली माहिती पाठविण्याचे टाळा.
७. बऱ्याच वेळी ज्यांना काही गडबड करायची आहे ते प्रत्यक्ष समोरासमोर भेटण्यास नाखूष असतात. जिथे शंका असेल तेव्हा प्रत्यक्ष भेटूनच व्यवहार करण्याचा प्रस्ताव करा आणि त्यासाठी जर चालढकल केली जात असेल तर अशा व्यवहारात उडी घेण्याचे टाळा.
८. इतर काहीही असो, जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती प्रत्यक्ष न भेटता काही तरी अफाट किंवा पटकन न समजणारे गडबडीने तुम्हाला देऊ पहाते किंवा तुमच्याकडून मिळवू इच्छिते – मग ती माहिती असो, वस्तू असो, पैसे असोत – अशी कसलीही शंका येत असेल तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला – जाणकार असो किंवा नसो – त्या सगळ्याकडे पूर्वग्रहविरहित दृष्टीने बघायला सांगा. त्यात थोडा वेळ जरी घालवावा लागला तरी कदाचित त्यामुळे पुढे होणारे मोठे नुकसान टळू शकेल.
९. जिथे जिथे तुमच्याबद्दलची वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे इतरांच्या उपयोगासाठी नोंदली किंवा दिली जाणे गरजेचे असेल तेथे त्यावर ज्यांना किंवा ज्या कामासाठी दिली आहेत, त्याचा उल्लेख करा म्हणजे त्यांचा इतरत्र वापर केला जाणे थोडेसे तरी कठीण होईल.
१०. तुम्ही नेहमी वापरात असलेल्या समाज माध्यमांच्या Privacy Settingचा अभ्यास करून (किंवा माहितगारांची मदत घेऊन) त्यावरील तुमची माहिती अनोळखी लोकांच्या हातात जाऊ देण्याला आडकाठी करता येते का हे पहा.
आधी म्हटल्याप्रमाणे फसवाफसवी हा अनादि काळापासून चालत आलेला व्यवसाय करणारे अनेक उद्योजक सध्या जगभर आहेत. ते आपली गिऱ्हाइके गटवताना आणि त्यांना लुटताना वापरत असलेली "लोभ" (ज्यामुळे मासा त्यांच्या गळाला लागतो) आणि "भीती" (ज्यामुळे गळाला लागलेला मासा फार उशीर होईपर्यंत जाळ्यातून सुटण्याची धडपड करणे पुढे ढकलत राहतो) ही दोन शस्त्रे वापरतात, जसे प्रत्यक्षातील दुनियेत वापरतात तसेच समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) आभासी जगातदेखील वापरतात. या लोकांना समाजमाध्यमांच्या वापरासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानामुळे करावे लागणारे तांत्रिक बदल सोडल्यास "फसवाफसवी १" ही त्यांची पुरातन काळापासूनची कार्यप्रणाली सध्यादेखील "फसवाफसवी १.१" सारखीच राहिली आहे. मंच बदलला तरी नाटके साधारण तशीच आहेत. फक्त त्यांचे प्रयोग आता समाजमाध्यमांच्या आभासी दुनियेतदेखील होत असल्याने त्या सगळ्या कृत्रिम झगझगाटात फसवे मृगजळ, धोकादायक दलदल, रमणीय तळे आणि काठावरचा धोपट मार्ग यातील सीमारेषा जास्त धूसर झाल्या आहेत. "फसवाफसवी १"ची माहिती असल्याने या सीमारेषा थोड्या जास्त स्पष्ट दिसतील आणि त्यामुळे धोकादायक दलदलीत सापडणे टाळता येईल.
संपादकीय नोंद : आंतरजालावर कसे सुरक्षित राहावे याबद्दल याच अंकात दुसरा लेख आहे; डिजिटल जंगलात वावरण्यासाठी – जपून राहण्याचं गाईड. वाचकांना विनंती आहे की त्यांनी तोही या लेखाबरोबर वाचावा.