मराठी साहित्याच्या डिजिटल दिशा

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

मराठी साहित्याच्या डिजिटल दिशा
- प्रसाद शिरगांवकर


Digital Media & Marathi

"तुम्ही सोशल मीडियावर जे काही लिहिता त्याला साहित्यबिहित्य म्हणतात हे फारच थोर आहे!" अशा आशयाचा शेरा पारंपरिक साहित्य वर्तुळात वावरणाऱ्या अनेकांकडून मी गेली अनेक वर्षे अनेकदा ऐकला आहे. मराठीतला पहिला डिजिटल दिवाळी अंक प्रकाशित होऊन २५ वर्षं झाल्यानंतरही, आणि ह्या पंचवीस वर्षांच्या काळामध्ये अनेक डिजिटल दिवाळी अंक, हजारो ब्लॉग्स, शेकडो वेबसाइट्स आणि असंख्य ई-बुक्स, पॉडकास्ट आणि मराठी युट्युब चॅनल्स आल्यानंतरही, पारंपरिक साहित्य क्षेत्रांमधली मंडळी डिजिटल पद्धतीने किंवा डिजिटल माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याला साहित्य वगैरे मानायला तयार नाहीत! अर्थात, कोणीही मान्यता देण्यासाठी डिजिटल साहित्यनिर्मिती कधी थांबली नव्हती आणि कोणी मान्यता न दिल्याने ती बंदही होणार नाही.

डिजिटल माध्यमं आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात नवा 'कंटेंट' तयार होतो आहे. शिवाय, असंख्य जुन्या साहित्यिक कलाकृती नव्या माध्यमांमध्ये 're-purpose'ही केल्या जात आहेत (उदाहरणार्थ, ऑडियो बुक्स). हे जे काही निर्माण होत आहे त्याला 'साहित्य' म्हणावं का ह्याचा, जी निर्मिती होत आहे ती कोणत्या दिशेने जात आहे ह्याचा आणि त्याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होतो आहे ह्याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न या लेखामध्ये करतो आहे.

मराठी डिजिटल साहित्यनिर्मितीची सुरुवात

मराठीमध्ये डिजिटल साहित्यनिर्मितीची सुरुवात मायबोली डॉट कॉम ह्या पोर्टलमुळे झाली. मायबोली हे १९९७ साली सुरू झालेलं पोर्टल. तांत्रिक भाषेत त्याला 'युजर फोरम' किंवा 'डिस्कशन फोरम' असं म्हणायचे. वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले, प्रामुख्याने तांत्रिक विषयांवर चर्चा करणारे, असे असंख्य इंग्रजी डिस्कशन फोरम्स तेव्हा अस्तित्वात आले होते. मायबोली हा मराठीमध्ये असलेला (कदाचित) पहिलाच डिस्कशन फोरम. सोशल मीडिया हा शब्द अस्तित्वात येऊन प्रचलित होण्याआधीचा हा मराठीतला आद्य सोशल मीडिया! (फेसबुकच्या जन्माच्या आठ-दहा वर्षं आधी अस्तित्वात असलेलं हे मराठी माणसांचं सोशल नेटवर्क होतं!)

मी आयुष्यात पहिल्यांदा परदेशात गेलो असताना १९९८ साली ह्या सोशल नेटवर्कचा भाग झालो. मायबोलीवरचं इतरांचं लिखाण वाचायला लागलो. घाबरत घाबरत तिथे लिहायला लागलो. जे लिहीत होतो त्याला प्रतिसाद मिळायला लागले. आपण सहज म्हणून लिहिलेली एखादी चारोळी, एखादी कविता जगाच्या दुसऱ्याच कोपऱ्यात असलेलं कोणी तरी वाचतं आणि क्षणार्धात त्यावर प्रतिक्रिया देतं हा अनुभव विलक्षण जादुई वाटायचा तेव्हा! सोशल मीडियाची ही जादू माझ्या आयुष्यात पंचवीसेक वर्षांपूर्वी आली. त्या जादूनं माझं आयुष्य आमूलाग्र बदललं. सोशल मीडियाच्या ह्या जादूनं माझ्या संपूर्ण आयुष्याला दिशा दिली. माझं आयुष्य घडवलं. अन माझ्यासारख्या असंख्य नवोदित लेखक/कवींचं आयुष्य घडवलं असावं.

मायबोलीवर तेव्हा आम्ही भरपूर प्रयोग करायचो. आम्ही पूर्ण दहा दिवसांचा ऑनलाईन साहित्यिक गणेशोत्सव साजरा करायचो. आम्ही मराठीतला पहिला ऑनलाईन डिजिटल दिवाळी अंक काढला होता, पुढे अनेक वर्षं काढत होतो. त्या सगळ्यामधून एक ट्रेंड सुरू झाला. मायबोलीसारखी इतर अनेक पोर्टल्स सुरू झाली. मनोगत, मिसळपाव, उपक्रम, ऐसी अक्षरे, ही आणि अशी अनेक. ह्याच सुमाराला 'ब्लॉग्ज'ही आले. कोणत्याही पोर्टलवर अवलंबून न राहता लेखकांना स्वतःचा स्वतंत्र ब्लॉग तयार करण्याची आणि त्यावर आपलं लिखाण प्रकाशित करण्याचीही सुविधा मिळाली. पुढे ऑर्कुट आणि मग फेसबुक ही सोशल नेटवर्क्स आली. ती वापरणं अत्यंत सोपं असल्याने आणि त्यांच्यावर असलेल्या 'सोशल नेटवर्किंग'संबंधी सुविधांमुळे ती झपाट्याने लोकप्रिय झाली. सोशल नेटवर्क्सच्या झपाट्यामुळे मराठी युजर फोरम्स आणि ब्लॉग्जही काही प्रमाणात मागे पडले खरे, पण अनेक पोर्टल्स अद्यापही सुरू आहेत, त्यावर नियमितपणे लिहिणारे लोकही आहेत. एकुणात, इंटरनेटच्या ह्या महाजालावर आपण मराठीत व्यक्त व्हायला हवं हा विचार रुजवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम ह्या युजर फोरम्स आणि पोर्टल्सनी केलं. ह्याचा परिणाम म्हणून डिजिटल माध्यमांमध्ये होत असलेल्या साहित्यनिर्मितीचं प्रमाण उत्तरोत्तर वाढतच चाललेलं आपल्याला दिसत आहे.

डिजिटल माध्यमं साहित्यनिर्मितीसाठी लोकप्रिय का आहेत?

डिजिटल माध्यमं आणि सोशल मीडियावर होणारी साहित्य अथवा कंटेंटची निर्मिती झपाट्याने वाढत चालली आहे. पारंपरिक माध्यमांमध्ये होणाऱ्या निर्मितीपेक्षा कैक पटीनं अन वेगानं वाढत चालली आहे. ह्याची कारणं काय आहेत ते बघू या.

१. मुक्त प्रवेश अन वावर (No entry barriers): डिजिटल माध्यमं आणि सोशल मीडिया सर्वांसाठी मुक्त प्रवेशाची माध्यमं आहेत. इथे येण्यासाठी, इथे काही लिहिण्यासाठी अन इथलं लिखाण वाचण्यासाठी कोणालाही आडकाठी नाही. कोणावरही, कोणतेही निर्बंध नाहीत. एक कंप्युटर अथवा स्मार्ट मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन अथवा डेटापॅक असलेले कोणीही ह्या विश्वात येऊ शकतात. (सध्या जगातले निम्म्याहून अधिक लोक ह्या विश्वात आहेत.) इथे व्यक्त होणाऱ्या कोणालाही व्यक्त होण्यापासून अडवलं जात नाही. व्यक्त होण्यासाठी काही पूर्वअटी लावल्या जात नाहीत. कोणाचीही अभिव्यक्ती 'प्रकाशित' व्हावी का नाही हे ठरवणारे कोणी झारीतले शुक्राचार्य असत नाहीत. जिला जे हवं ती ते लिहू शकते आणि ज्याला जे हवं ते तो वाचू शकतो. अन ह्या साऱ्या लेखन-वाचन व्यवहारासाठी पैशांचं, विकत घेण्या-विकण्याचंही एंट्री बॅरियर नसतं.

२. तात्काळ समाधान (instant gratification): डिजिटल आणि सोशल माध्यमांमध्ये केलेल्या अभिव्यक्तीवर प्रकाशित केल्याच्या काही क्षणांमध्ये प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळायला लागतात. आपण जे काही लिहिलं आहे ते जगातल्या पाच-पन्नास लोकांपर्यंत पोचलं आहे, त्यांना आवडलं आहे ह्याची पावती आपल्याला क्षणार्धात मिळते. वाचकांना आवडत नसेल तर तसाही प्रतिसाद अनेकदा मिळतो. आपलं लिखाण लोकांपर्यंत पोचण्याचं आणि त्यांना ते आवडण्याचं हे instant gratification अनेक लेखकांसाठी अत्यंत प्रेरणादायी असतं. लोकांना आवडत नसेल तर नेमकं काय आवडत नाहीये हे तपासून आपल्या पुढील लिखाणात योग्य ते बदल करत राहणंही लेखकांना शक्य होतं. तात्काळ समाधानामुळे अधिकाधिक लिहिण्याची प्रेरणा मिळत रहाते आणि critical feedbackमुळे पुढचं लिखाण अधिकाधिक दर्जेदार करत रहाण्याची शक्यता वाढते.

३. प्रयोगशीलतेला संधी (experimentation) : डिजिटल माध्यमांवर व्यक्त होण्याला काही खर्च येत नसल्याने अभिव्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून बघणं सहज शक्य होतं. एखादा प्रयोग फसला तर आपला वेळ वाया जाण्यापलीकडे फारसं काही नुकसान होत नाही. पण जमला तर अभिव्यक्तीचं पूर्ण नवं दालन आपल्यासाठी खुलं होऊ शकतं. उदाहरणार्थ, आपण कथा लिहीत असू तर कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करून बघणं. मुक्तछंद कविता लिहीत असू तर छंदबद्ध लिहिण्याचा प्रयोग करून बघणं. कथा-कविता सोडून पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची अभिव्यक्ती करून बघणं हे सारं डिजिटल माध्यमांमध्ये शक्य होतं.

४. खुला आणि सततचा संवाद (open and continuous communication) : सोशल मीडिया हे संवादासाठी तयार केलेलं माध्यम आहे. लेखकांना वाचकांशी आणि वाचकांना त्यांच्या आवडत्या लेखकांशी सहज आणि सातत्यानं संवाद साधणं इथे शक्य होतं. आपले अगदी पाच-पंचवीस वाचक असतील किंवा पाच-दहा हजार असतील तरी अशांचा समूह करता येतो, त्यांना एकत्र जोडता येतं. त्यांच्यापर्यंत आपलं साहित्य सहजतेनं पोचवता येतं आणि त्यांच्याशी सातत्यानं संवाद साधत राहणं शक्य होतं.

५. अभिव्यक्तीची नवी साधनं आणि आकृतिबंध (new tools and formats of expression) : डिजिटल तंत्रज्ञानामुळे अभिव्यक्तीचे अनेक नवे आकृतिबंध तयार होत आहेत. सध्या प्रचंड लोकप्रिय असलेली रील्स अथवा शॉर्ट व्हिडियोज हे एक महत्त्वाचं उदाहरण. केवळ तीस सेकंद ते दीड मिनिटांत एखादा विषय मांडणं किंवा अगदी फुटकळ मनोेरंजनही करणं ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट आहे. हे करायचा प्रयत्न करणारी अक्षरशः कोट्यवधी रील्स सध्या तयार होत आहेत. ह्यातली बहुसंख्य रील्स ही अत्यंत थिल्लर, फुटकळ अथवा 'टाईमपास' असतात हे जरी मानलं, तरी अभिव्यक्तीचा हा नवा आकृतिबंध अत्यंत आकर्षक आणि प्रभावी आहे हेही खरं आहे. पॉडकास्ट हादेखील एक नवा आकृतिबंध. फक्त ऑडियो किंवा ऑडियो-व्हिजुअल माध्यमात अर्धा ते एक तासाचं काही निर्माण करणं. प्रेक्षक / श्रोते ते पूर्ण पाहतील / ऐकतील अशा पद्धतीने विषय त्यात मांडणं हे देखील अत्यंत आव्हानात्मक असतं. सध्याचे मराठीतले अनेक लोकप्रिय पॉडकास्ट हे राजकीय विषय मांडणारे अथवा 'सेलिब्रिटी गप्पा' स्वरूपाचे असले, तरी हा आकृतीबंध वापरून अनेक नवे साहित्यप्रयोग करता येणं शक्य होत आहे.

डिजिटल साहित्याबाबतचे आक्षेप आणि मर्यादा

डिजिटल साहित्याबाबत अनेक आक्षेपही घेतले जातात. ह्या लेखाच्या पहिल्याच वाक्यात 'ह्याला काय साहित्य म्हणायचं का?' हा एक मोठा आक्षेप आहे! तसंच ह्या माध्यमाच्या लोकप्रियतेची जी पाच कारणं वर सांगितली त्या प्रत्येक कारणातही अनेक त्रुटी आणि आक्षेप दडलेले आहेत. उदाहरणार्थ, मुक्त प्रवेश आणि प्रयोगशीलतेला संधी असल्यानं सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीचा अक्षरशः महापूर आला आहे. "आजकाल कोणीही उठतो आणि कविता पाडतो"पासून ते "काय वाटेल ते लिहायचं अन त्याला कथा म्हणायचं" असे सर्व आक्षेप आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. तसंच, लेखकांना मिळणाऱ्या तत्काळ समाधानामुळे नवं नवं लिहिण्याची प्रेरणा जशी मिळू शकते तशीच त्याची चटक अथवा व्यसन लागून केवळ ते मिळवण्यासाठी कमअस्सल दर्जाच्या लिखाणाची भाराभर निर्मितीही केली जाऊ शकते. आणि वाचकांशी सतत संवाद साधत, त्यांच्या आवडी बघत राहिल्याने वाचकानुनयी लिखाण केलं जाण्याची शक्यता वाढत जाते.

ह्या अर्व आक्षेपांसोबतच एक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे, डिजिटल साहित्यावर संपादकीय संस्कार होत नाहीत. पारंपरिक साहित्य प्रकाशनात लेखन, संपादन, मुद्रितशोधन, छपाई आणि प्रकाशन ह्या पायऱ्या असतात. ह्या पायऱ्यांमुळे कोणतंही साहित्य प्रकाशित होण्यापूर्वी लेखक सोडून इतर लोकांच्या नजरेखालून जातं. त्यातल्या शुद्धलेखनाच्या आणि प्रमाणभाषेसंबंधीच्या चुका दुरुस्त केल्या जातात. लेखन अधिक प्रभावी होण्यासाठी सूचना दिल्या-घेतल्या जातात. डिजिटल साहित्यामध्ये मात्र लेखन-प्रकाशन ह्या दोनच पायऱ्या असतात. दोन्ही लेखक स्वतःच करतात. त्यामुळे मधल्या पायऱ्यांमध्ये होणारे संपादकीय संस्कार त्यावर होत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य वेळा डिजिटल साहित्यामध्ये शुद्धलेखनाच्या आणि प्रमाणभाषेच्या अनेक चुका राहून गेलेल्या दिसतात. शिवाय संपादकीय संस्कार नसल्यानं अनेक अभिव्यक्ती बऱ्यापैकी अपरिपक्व, ढोबळ, कच्च्या अथवा पसरट राहून जातात.

डिजिटल माध्यमांमधील धोके आणि अडचणी

साहित्याची चोरी (plagiarism, piracy, copy-paste-forwards) : डिजिटल माध्यमांमध्ये साहित्य प्रकाशित करणं जसं सोपं असतं तसं प्रकाशित केलेलं साहित्य भलत्याच कोणी कॉपी-पेस्ट करून परस्पर दुसरीकडे पाठवणं वा स्वतःच्या नावाने प्रकाशित करणंही सोपं असतं. आपलं लिखाण आपल्या नावाशिवाय वा भलत्याच कोणाच्या नावाने पसरलं जाणं हा डिजिटल लिखाणातला सगळ्यांत मोठा धोका आणि अनेक डिजिटल लेखकांची सगळ्यांत मोठी डोकेदुखी असते. खरंतर प्रताधिकार कायदा हा छापील साहित्यासारखाच डिजिटल साहित्यालाही लागू आहे. मात्र त्याची अंमलबजावणी डिजिटल माध्यमांच्या बाबतीत करणं केवळ अशक्यप्राय आहे.

ट्रोलिंग : सध्याचा सोशल मीडिया ट्रोलिंगच्या आजाराने ग्रासलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे राजकीय विचार पटले नाहीत की तिला बेसुमार पद्धतीने ट्रोल करण्याची सध्या फॅशन आहे. व्यक्तीच नव्हे तर, एखाद्या अभिव्यक्तीमधील काही भाग अथवा त्यातील पात्रांची नावं, भाषा इत्यादी काहीही पटलं नाही, ते आपल्या धर्म, जात, पंथ, देश अशा कोणत्याही अस्मितेच्या विरोधात आहे असं वाटलं तर त्या अभिव्यक्तीला आणि तिच्या निर्मात्याला सडकून ट्रोल करण्याची पद्धतही सध्या पडली आहे. हे ट्रोलिंग करताना कमेंट्समध्ये शिव्या, असभ्य भाषेत व्यक्तिगत पातळीवरची टीका करण्यापासून ते शारीरिक हल्ले करण्याच्या धमक्यांपर्यंत काहीही असू शकतं. अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा लेखकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर भीषण परिणाम होऊ शकतो.

साहित्यात व्यवहाराचा अभाव (lack of a revenue model) : पारंपरिक माध्यमांमध्ये साहित्य प्रकाशित केल्यास लेखकांना मानधन अथवा रॉयल्टी ह्यांद्वारे थोडंफार उत्पन्न मिळू शकतं. काही मोजक्या यशस्वी लेखकांना ह्या उत्पन्नावर स्वतःचं घर चालवणंही शक्य होतं. डिजिटल माध्यमांमध्ये मात्र बहुतेक ठिकाणी व्यवहार असा काही नसतो. लेखक लेखन प्रकाशित करतात, वाचक वाचतात, सगळंच फुकट. बहुसंख्य पोर्टल्सचे चालक बहुतेकवेळा पदरमोड करून हौसेपोटी आपली पोर्टल्स चालवत असतात, ते लेखकांना मानधन वगैरे काही देऊ शकत नाहीत. मोठी सोशल मीडिया ॲप्स जाहिरातींवर चालतात, त्या जाहिरातींचं उत्पन्न ॲप्सच्या मालक कंपन्या घेतात. काही कंपन्यांनी त्या जाहिरातींच्या उत्पन्नाचा काही भाग लेखकांना मानधन म्हणून द्यायला अलीकडे सुरुवात केली आहे. मात्र सध्या ह्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. एकुणात डिजिटल साहित्याला सध्या revenue model नाही.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान (challenges posed by AI) : तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेने धुमाकूळ घातला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेतील Generative AI प्रकारची ॲप्स कोणत्याही प्रकारचा मजकूर, चित्रं (आणि आता व्हिडियोजही) 'निर्माण' करू शकतात. 'अमुक विषयावर कविता लिही' अशी आज्ञा दिली की कविता निर्माण होते. 'कथा लिही' म्हणलं की कथानिर्मिती होते. सध्या Gen AIमधली मराठी भाषेतली कथा/कविता-निर्मिती अत्यंत सुमार आणि बाळबोध असते. मात्र जसजशी ही ॲप्स अधिक शिकत जातील, अधिक डेटावर ट्रेन होत राहतील तसतशी त्यांची कंटेंटनिर्मिती करण्याची क्षमता वाढत जाईल. कालांतरानं मानवी अंतःप्रेरणेनं निर्माण केलेले साहित्य कोणतं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून निर्माण झालेलं साहित्य कोणतं हे ओळखणं अवघड होऊ लागेल.

डिजिटल साहित्याच्या भविष्यातली दिशा

डिजिटल साहित्याच्या (किंवा खरंतर एकुणातच साहित्याच्या) भविष्याचा वेध घेण्याआधी थोडंसं इतिहासात डोकावून बघायला हवं. छपाईयंत्राचा शोध लागण्याआधी सर्व प्रकारचं साहित्य हे प्रामुख्यानं मौखिक पद्धतीनं व्यक्त केलं जायचं. समोर जमलेल्या प्रेक्षक-श्रोत्यांसमोर सादर केलं जायचं. शतकानुशतकं ह्या मौखिक सादरीकरणाच्या परंपरेतूनच साहित्य पुढे जात राहिलं होतं. ह्या पद्धतीला काळ आणि स्थानाच्या मर्यादा होत्या. ठरावीक कलाकृती ठरावीक काळात, ठरावीक रसिकांसमोरच सादर करता यायची. छपाईयंत्राच्या शोधामुळे ही स्थळ-काळाची मर्यादा नाहीशी झाली. कथा-कविता-कादंबरी-नाटक कागदावर छापलं जाऊन ते कोणत्याही काळी वाचलं जाईल ही क्षमता निर्माण झाली. ते छापील स्वरूपात हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचेल ह्याचीही शक्यता निर्माण झाली. मात्र ह्यामुळे जे काही छापलं गेलं आहे तेच साहित्य अशी आपली समजूत झाली आहे! ह्या, जे छापलेलं आहे तेच साहित्य ह्या समजुतीलाच आता सुरुंग लावण्याची वेळ आली आहे.

डिजिटल तंत्रज्ञानातल्या क्रांतीमुळे कोणतीही अभिव्यक्ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती कागदावर छापण्याची आवश्यकताच उरलेली नाही. डिजिटल माध्यमांच्या क्षमतांमुळे ती केवळ लिखित शब्द (text) ह्या स्वरूपातही असण्याची आवश्यकताही नाही. शब्द, चित्र, ऑडियो, व्हिडियो अशा अनेक प्रकारांमधून व्यक्त होणं आता शक्य आहे. आणि ही अभिव्यक्ती वेबसाईट्स, ई-बुक्स, ॲप्स, ब्लॉग्ज, युजर फोरम्स, सोशल मीडिया अशा अनेक प्रकारच्या व्यासपीठांवर प्रकाशित करून हजारो-लाखो वाचकांपर्यंत पोहोचवणंही शक्य आहे.

आठ-दहा हजार वर्षांच्या ज्ञात नागरी मानवी इतिहासात 'छापील माध्यमांमधलं साहित्य' ही केवळ दोन-तीनशे वर्षांची एक छोटीशी संक्रमणाची अवस्था होती कदाचित. छापील युगाआधी साहित्य मौखिक आणि performing arts स्वरूपाचं होतं. डिजिटल युगातही ते त्याच स्वरूपाचं असेल. मात्र इतिहासात असलेली स्थळ-काळाची मर्यादा ह्या युगातल्या साहित्याला, ह्या अभिव्यक्तीला असणार नाही. म्हणूनच नव्या युगातलं, नव्या माध्यमांवरचं हे नवं साहित्य अधिकाधिक उंच भराऱ्या घेत राहिल आणि निर्मात्यांचं आणि वाचका-श्रोत्यांचंही आयुष्य समृद्ध करत राहील अशी मला अनन्वित आशा आहे.

field_vote: 
0
No votes yet