तरुणांशी संवादासाठी निराळ्या दृश्यभाषेची गरज! - वरुण नार्वेकर
तरुणांशी संवादासाठी निराळ्या दृश्यभाषेची गरज! – वरुण नार्वेकर
- ऐसी अक्षरे संपादक मंडळ
समाजमाध्यमांबद्दल नेहमीच केली जाणारी तक्रार म्हणजे आपली माहिती घेऊन आपल्याला जाहिराती दाखवल्या जातात. काही लोकांना हे अजिबात आवडत नाही. काही लोकांना त्याबद्दल विशेष भावना नसतात. काही लोक उत्साहानं जाहिराती बघतात. साधारण ३-४ वर्षांपूर्वी, समाजमाध्यमांवर लघुकथेच्या रूपात मराठीतून काही जाहिराती दिसू लागल्या, लोकांनी त्या जाहिराती आवर्जून बघितल्यामुळे 'व्हायरल' झाल्या. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की सबंध व्हिडिओ संपेपर्यंत ही कुणाची किंवा कशाची जाहिरात आहे हेच प्रेक्षकांच्या लक्षात यायचं नाही. आणि त्या गोष्टीच्या वातावरणात एखादा सिनेमा बघितल्यासारखे प्रेक्षक ओढले जायचे. मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक लोकप्रिय आणि ओळखीचे चेहरे त्या गोष्टींमधून दिसायचे. त्यामुळे भराभर स्क्रोल करणारी बोटं त्या व्हिडिओंवर घुटमळायची.
या सगळ्या जाहिराती प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. आज अशा पद्धतीनं समाजमाध्यमांवर जाहिरात करण्याची एक लाटच आली आहे असं म्हणता येईल. पण सुरुवातीच्या चित्तवेधक जाहिराती, ज्या विशेष करून समाजमाध्यमं वापरणाऱ्या मध्यमवर्गीय/उच्चमध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिकांच्या पसंतीस उतरल्या, त्यांचं दिग्दर्शन वरुण नार्वेकरांनी केलं होतं. या प्रवासाबद्दल त्यांच्याशी 'ऐसी अक्षरे'तर्फे सई केसकर यांनी गप्पा मारल्या.
ऐसी अक्षरे – सुरुवात आपण सुरुवातीपासूनच करू. तू सिनेमा आणि जाहिरात क्षेत्रात कसा आलास?
वरुण – खरं सांगायचं तर मला मुंबईला जायचं नव्हतं. म्हणजे रूढार्थानं मला 'मुंबईत स्ट्रगल करायला' म्हणून जायचं नव्हतं. मी अनेक वर्षं सुमित्रा भावेंबरोबर काम करत होतो. त्या प्रवासाची पुढची पायरी म्हणून मी मुंबईला गेलोदेखील. पण मला मुंबई काही विशेष रुचली नाही आणि मी तीन-चार महिन्यांतच परत आलो. पुण्यात आल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या क्षेत्रात काम तर करायला पाहिजे. म्हणून मी सुझलॉन नावाच्या कॉर्पोरेट कंपनीत काम सुरू केलं, त्यांच्या सीएसआर कामासाठी. तिथे जवळपास तीन वर्षं काम करत असताना मला भारताच्या अनेक दुर्गम भागांत जावं लागायचं कारण तिथेच त्यांच्या पवनचक्क्या वगैरे असतात. त्या गावांतलं सुझलॉनचं सामाजिक कार्य काय आहे यावर छोटे पाच मिनिटांचे माहितीपट तयार केले. तीन वर्षांत त्यांची सगळी गावं संपली. मग मला पुन्हा तोच प्रश्न पडला. पुण्यात राहून आपल्या क्षेत्रात काम कसं करता येईल? त्यानंतर मी जाहिरात क्षेत्रात काम सुरू केलं, मराठी कॉपीरायटर म्हणून. ही साधारण २०११ सालची गोष्ट.
त्यावेळी अजूनही लोक टेलिव्हिजनमध्येच गुंतलेले होते. आतासारखे स्वस्त स्मार्टफोन, स्वस्त डेटा पॅक अजून लोकांच्या सवयीचे झाले नव्हते. समाजमाध्यमांवर असं काही करता येईल असं अजून मराठी उद्योगांना तरी वाटत नव्हतं. पुढच्या काही वर्षांत म्हणजे साधारण २०१५मध्ये गूगलचीच एक जाहिरात आली. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी ताटातूट झालेल्या दोन मित्रांची. गोष्ट कशी सांगता येऊ शकते याबद्दल एकदम नवीन काहीतरी सापडल्यासारखं झालं.
या जाहिरातीत गोष्ट जरी त्या मित्रांची असली तरी जाहिरात 'गूगल'ची आहे हेच लक्षात राहतं. जाहिरात करण्याची ही पद्धत वेगळी होती. तेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी असा विचार केला मराठीत असं काही करता येईल. याचा पहिला प्रयोग रावेतकर ग्रुपबरोबर केला. 'रीयुनियन' नावाची मालिका केली. आम्ही वर्षाला या मालिकेसाठी तीन लघुपट करायचो. पूर्ण गोष्टीत कुठेच रावेतकरांचं नाव, किंवा त्यांच्या व्यवसायाची माहिती असं काहीच नसायचं. फक्त लघुपट संपल्यावर त्यांचं नाव दिसायचं तितकंच. या मालिका लोकांना फार आवडल्या.
रावेतकरांसाठी 'रीयुनियन'
मग हीच कल्पना आम्ही चितळे बंधूंना सुचवली.
ऐसी अक्षरे – आज जे साधारण चाळिशीच्या वयाचे आहेत, त्यांनी जितका काळ आंतरजालीय समाजमाध्यमं नसलेलं जग बघितलं आहे, आता साधारण तेवढाच काळ ते समाजमाध्यमांबरोबर जगलेले आहेत. या अर्थानं आपली पिढी वेगळी आहे. तुझी याबद्दल काय निरीक्षणं आहेत? तुझ्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात समाजमाध्यमांमुळे कसा फरक पडत गेला?
वरुण – मी आंतरजालाकडे एक नवीन माध्यम म्हणूनच बघत आलो आहे. जसं टेलिव्हिजन माध्यम आलं – ज्यावर सगळंच दिसायला लागलं. सिनेमे, नाटकं तर आलीच पण उदाहरणार्थ, एखाद्या डॉक्टरचं काय म्हणणं आहे हेदेखील आपल्याला टेलिव्हिजनमुळे समजतं. पण आंतरजालामुळे आलेली माध्यमं लोकांच्या थेट हातातच आली. हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि अजून एक महत्त्वाचा फरक असा की ही माध्यमं दोन्ही बाजूंनी प्रतिसाद देणारी आहेत. उदाहरणार्थ, टीव्हीवर एखादी जाहिरात दिली आणि ती लोकांना आवडली किंवा आवडली नाही तर त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोचणं अवघड असायचं. आता तसं नाही. समाजमाध्यमांवर एखादी जाहिरात टाकली की लोक धडाधड प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात करतात. कौतुक करतात किंवा भयंकर 'ट्रोल'ही करतात. अर्थात, अशा नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्या तुलनेनं कमीच असते. पण त्यातली भाषेची तीव्रता, टीका यामुळे त्या प्रतिक्रिया जास्त लक्षात राहतात. पण जाहिरातक्षेत्रात वारंवार वापरलं जाणारं वाक्य आहे, 'एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी'. ते जर लक्षात ठेवलं तर कशाचीच चिंता करायची गरज नाही. अर्थात, त्यामुळे सतत बॅड पब्लिसिटी मिळवू नये हेही आलंच! पण समाजमाध्यमांमुळे हा एक महत्त्वाचा फरक जाणवू लागला. आपले प्रेक्षक तात्काळ प्रतिक्रिया नोंदवू शकतात आणि त्यांवर आपलं आपल्याला हवं तितकं नियंत्रण असत नाही.
ऐसी अक्षरे – हा जो दोन्ही बाजूचा संवाद आहे, ती या माध्यमांवर एक प्रकारची 'लोकशाही' असल्यासारखं आहे. समाजमाध्यमांच्या या लोकशाहीकरणामुळे अजूनही अनेक गोष्टी बदलल्या आहेत. उदाहरणार्थ, आपण काय बघावं हे निवडून आपल्यासमोर ठेवणारी जी एक संपादकांची, निर्मात्यांची फळी होती ती या माध्यमांवर नसते. त्यामुळे कुणीही आपलं लेखन, कला, विचार या माध्यमांवर मांडू शकतं.
वरुण – मला असं वाटतं की आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपण काय बघायचं? आपल्या मनाचं कशामुळे पोषण होणार आहे? काय बघितल्यानं आपण विचारात पडणार आहोत? ही उत्तरं आता आपल्याला आपल्यापुरती शोधायची आहेत. उदाहरणार्थ, असेही काही व्हिडीओ असतात जे क्षणिक करमणूक करतात. कुणी तरी पडतानाचा व्हिडीओ असतो. तो बघून आपण हसतो. काही क्षण आपल्याला छान वाटतं. पण म्हणून आपण सतत तसेच व्हिडीओ बघायचे का? याचं उत्तर हो किंवा नाही असं काहीही असू शकतं. त्यामुळे आपण या माध्यमांकडे, त्यावरच्या करमणुकीकडे कसं बघतो त्यावर सगळं अवलंबून आहे. आपण एक मिनिटाचा व्हिडिओ बघत असू किंवा दोन-अडीच तासांचा सिनेमा बघत असू – दोन्हींकडे तेवढ्या वेळासाठी आपण आपलं मन कुणाच्या तरी स्वाधीन करत असतो. आपल्या मनाचा ताबा आपल्याला कुणाला द्यायचा आहे याची जबाबदारी आता आपल्यावरच आहे. मध्यंतरी इन्स्टाग्रामवरच मला एक रील दिसली ज्यात हृषिकेश मुखर्जींच्या एका जुन्या मुलाखतीचा एक भाग होता. त्यात ते सांगत होते की सुरुवातीला लोकांना टीव्हीवरच्या रोजचा रतीब असलेल्या मालिका फार काळ आवडणार नाहीत असं त्यांना वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. त्यावर त्यांचं निरीक्षण असं होतं की या मालिका एखाद्या ड्रगसारख्या आहेत. त्यांची सवय लागते. आता समाजमाध्यमांच्या बाबतीतही हेच प्रकर्षानं जाणवतं आहे. आपला फावला वेळ त्यांनाच मिळावा यासाठी आता इतकी माध्यमं रस्सीखेच करत असतात की त्यामुळे वाचन, लेखन हे थोडे अवकाश लागणारे छंद आता लुप्त होत चालले आहेत असं वाटतं.
मला माझ्यातच हा फरक जाणवतो. मी अनेक वर्षं सुमित्रा भावेंबरोबर काम केलं. त्या पिढीचं वाचन माझ्या पिढीपेक्षा खूपच जास्त होतं. त्यामुळे त्यांना काय बघावं हे ठरवण्यासाठी साहित्यातलेही संदर्भ असायचे. मी इतकं वाचलेलं नाही हे मलाच जाणवतं. आणि माझ्या मुलीला मी काय देणार? मी वाचलं आहे त्यातलंच काही मी तिला देणार.
ऐसी अक्षरे – आपल्या पिढीनं अजून एक खूप मोठं स्थित्यंतर कमावत्या वयात अनुभवलं आहे. ते म्हणजे कोव्हिड काळातले लॉकडाऊन. या काळात आम्हांला अनेक प्रसिद्ध, परिचित उद्योगांच्या जाहिराती समाजमाध्यमांवर दिसू लागल्या. लहानपणापासून बघितलेले अनेक ब्रँड फेसबुकवर दिसू लागले. तू त्या क्षेत्रातलाच आहेस. तू त्या काळात हे बदल कसे अनुभवलेस?
वरुण – त्यावेळी, सुरुवातीपासून जे 'इ-कॉमर्स'मध्ये (आंतरजालावरील खरेदी-विक्री) होते त्यांना अचानक फायदा झाला. 'सुहाना'सारखा ब्रँड असेल – जो 'रेडी टु कुक' (झटपट शिजवता येणारे पदार्थ) पदार्थांची विक्री करतो – अशा लोकांना बराच फायदा झाला. कोव्हिड लॉकडाऊन येण्याआधी बहुतांश लोक प्रत्यक्ष दुकानांत जाऊनच खरेदी करायचे. पण त्याआधीदेखील पुण्यातल्या हिंजवडीसारख्या भागांमधला ग्राहक खाद्यपदार्थांची ऑनलाईन खरेदी करतच होता. त्यांना आकर्षित करायला आधीपासूनच प्रयत्न चालू होते. पण लॉकडाऊन काळात जी एक मरगळ आली होती, ती दूर करायला मोठमोठे ब्रँडही आंतरजालावर आले. लोक सतत सोशल मीडियावर असणार हे ओळखून अनेक ब्रँड त्यांच्याकडे लोकांचं लक्ष जावं यासाठी जाहिराती करू लागले. त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्या ग्राहकांची पुढची पिढी आपल्याला सोशल मीडियावरच भेटणार आहे. अशी संधी शोधणंदेखील महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी कॅडबरी कंपनीच्या लक्षात आलं की सणासुदीला त्यांचा खप कमी होतो. म्हणून त्यांनी दिवाळी आणि राखीपौर्णिमेसाठी मुद्दाम वेगळ्या प्रकारे जाहिराती केल्या. त्यांची 'कुछ मीठा हो जाए'सारखी मोहीम लोकांमध्ये सहज रुजली. आणि आपण गडबडीत असलो की पटकन तो कॅडबरीचा मोठा डबा विकत घेतला जातो. त्यात आतमध्ये विशेष काहीच नसतं. ३-४ चॉकलेटं असतात आणि पॅकिंगच खूप असतं. तरी आपल्याला तो डबा घेऊन जाणं प्रतिष्ठेचं वाटावं इतकी ती जाहिरात यशस्वी झाली होती.
ऐसी अक्षरे – तुझ्या माध्यमांवरच्या काही जाहिराती खूपच वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ: रावेतकर ग्रुपनं काढलेली 'रीयुनियन' मालिका . एखाद्या जपून ठेवलेल्या आठवणीबद्दल या मालिकेचे भाग आहेत. प्रत्येक भाग एक वेगळी गोष्ट सांगतो. आणि विशेष म्हणजे त्यात कुठेही इमारतींचा उल्लेखही नाही. या मालिकेची काय गोष्ट आहे?
वरुण – रावेतकरांशी जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांच्या डोक्यात ज्येष्ठ नागरिक हे मुख्य ग्राहक होते. कारण त्या वेळी जिथे जिथे जुन्या इमारतींचं पुनर्निमाण होत होतं तिथे त्यांना ज्येष्ठ नागरिकांशीच संवाद साधायला लागायचा. त्यामुळे त्यांना आपलंसं वाटेल असं काही करायचं होतं. आणि एव्हाना ज्येष्ठ नागरिक समाजमाध्यमं आणि व्हॉटसॅपसारख्या संदेशमाध्यमांनाही व्यवस्थित सरावले होते. आपल्याला आवडलेली गोष्ट शेअर करणे, ती वेगवेगळ्या गटांमध्ये पाठवणे, पोस्ट करणे हे सगळं ज्येष्ठ नागरिक उत्साहानं करतात. म्हणून आम्ही 'रीयुनियन' ही मालिका काढली. ज्येष्ठ नागरिकांना एखादी जुनी आठवण, जुनी जागा, जुने मित्र यांची त्या जाहिरातीतून पुन्हा आठवण यावी हा त्या मालिकेचा उद्देश होता. म्हणून आम्ही सुरुवातीला 'गुलाबी मिसळ' ही जाहिरात केली. त्याच सिझनमध्ये दिलीप प्रभावळकरांबरोबर एक जाहिरात केली. या जाहिराती इतक्या यशस्वी झाल्या की पुढल्या मालिका आम्ही पन्नाशीच्या, चाळिशीच्या लोकांना आवडतील अशाही केल्या.
ऐसी अक्षरे – हा सगळा जाहिरात तयार करतानाचा विचार आहे. पण समाजमाध्यमांवर जाहिरात करताना यापलीकडेही टार्गेट करण्याची सोय आहे. म्हणजे जेव्हा समाजमाध्यमांवर जाहिराती चालतात तेव्हा त्या कुणाला दाखवल्या जाव्यात हेदेखील आपल्याला जाहिरात प्रकाशित करण्याच्या आधी ठरवता येतं. उदाहरणार्थ, ही जाहिरात मला ४०-६० वयोगटातल्या, कोथरूड ते कोरेगाव पार्क या परिघातल्या लोकांनाच दाखवायची आहे असं आधीच ठरवता येतं. याचा तुम्हाला उपयोग झाला का?
वरुण – तो पब्लिसिटीचा भाग आहेच. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की 'ती व्हॉटसॅपवर आली का?' कारण इतर कोणत्याही प्रकारे तुम्ही जाहिरात कस्टमाइझ करा, ती तुम्हाला इतर समाजमाध्यमांवरून व्हॉटसॅपवर अजून तरी प्रेक्षकांच्या सहभागाविना आणता येत नाही. त्यामुळे ती व्हॉटसॅपवर आली की ती व्हायरल झाली असं आम्ही समजतो. कधीकधी मला माझ्याच जाहिराती परत दिसतात. आणि त्यांवर 'फॉर्वर्डेड मेनी टाइम्स' (अनेकदा पुढे पाठवलेला मजकूर) अशी टिप्पणी झालेली असते. तीच 'व्हायरलतेची' खरी पावती. माझी एक 'पार्ले-जी'ची हिंदीतली जाहिरात आहे. त्यात सुहिता थत्ते आहेत. ती अशीच फिरत फिरत एकदा माझ्याच नवीन मराठी शाळेच्या एका ग्रुपवर आली. त्या व्हिडीओवरही 'फॉर्वर्डेड मेनी टाइम्स' असं लिहून आलं होतं आणि कुणाला माहीतही नव्हतं की ती जाहिरात मी केली आहे.
ऐसी अक्षरे – रावेतकर काय किंवा चितळे काय, ही दुसरी किंवा अगदी चौथी पिढी आहे आत्ता कार्यरत असलेली. त्यांना आधीची पिढी असते. त्या आधीच्या पिढीचीही काही भूमिका असते. या नवीन माध्यमांशी ते कसं जुळवून घेतात? त्यांना या माध्यमांवरच्या जाहिरातींसाठी तयार करायला काही विशेष प्रयत्न करावे लागतात का?
वरुण – माझ्या बाबतीत मी असं म्हणेन की इंद्रनीलचे वडील संजय चितळे यांना साहित्य, कला आणि सिनेमाची बऱ्यापैकी जाण आहे. या माध्यमांबद्दल त्यांना आधीपासूनच ममत्व आहे. त्यामुळे अशी अडचण आली नाही. उलट त्यांच्या असण्याची मदतच झाली. आम्ही राखीपौर्णिमेला एक 'एसटी ड्रायव्हर' नायक असलेली जाहिरात केली होती. ती इतकी प्रचंड व्हायरल झाली की स्वारगेटमधल्या अनेक बस चालकांनी चितळेंकडे येऊन खरेदी केली आणि जाहिरात आवडल्याचा अभिप्राय दिला. त्यावर एक बातमीही झाली.
पण असा एखादा माणूस असेल की जो बदलाला तयार नाही. मग अशा वेळी पुढे काही घडतच नाही. कारण या एका जाहिरातीचा खर्च १०-१२ लाख रुपये असतो. ज्यांना हा खर्च खूप वाटतो त्यांना अनेक प्रश्न पडतात. की ही व्हायरल झाली नाही तर काय? किंवा इतक्या पैशात मी अजून काय काय करू शकेन जे चिरकाल टिकेल? आणि हेदेखील साहजिक आहे. अनेकांना अजूनही वर्तमानपत्रात जाहिरात देणं अधिक उपयुक्त वाटतं. पण वर्तमानपत्र एका दिवसात बाद होतं. समाजमाध्यमांवरच्या जाहिराती कायम चालवता येतात. पण तरीही वर्तमानपत्रं जास्त लोकांपर्यंत पोहोचतील असं काही लोकांना अजून वाटतं, आणि ते एका दृष्टीनं बरोबर आहे. पण माध्यमांवरच्या जाहिरातींची वारंवारिता लक्षात घेतली तर त्यांचाही वेगळ्या प्रकारे उपयोग आहे.
किंवा अशाच फिल्म स्वस्तात करून देणारे अनेक लोक आहेत. मला सतीश आळेकर किंवा मोहन आगाशे कधीकधी येऊन खोचकपणे सांगतात, "आज आम्ही तुझ्या डुप्लिकेटमध्ये काम करून आलो!"
शिवाय कलेची किंमत कशी ठरवणार हाही प्रश्न आहेच. या क्षेत्रात लेखकांना पैसे द्यायला लोक कुरकुरतात. लेखकाचा सहभाग महत्त्वाचा आहे हे त्यांना पटवूनही द्यावं लागत नाही तरीही लोकांना लेखकांना पैसे द्यायचे नसतात. पण हेच लोक एखादा महागाचा कॅमेरा घ्यायला अजिबात पुढेमागे बघत नाहीत.
ऐसी अक्षरे – एखादा सिनेमा करताना अर्थातच लोकांना तो आवडावा आणि चालावा असा एक विचार असतोच. पण जाहिरातीचं गणित अजून थोडं जाचक असतं. एखाद्या उद्योगानं केवळ व्यवसाय वाढावा म्हणून त्यात पैसे घातलेले असतात. त्यामुळे जाहिरात करताना त्या उद्योगाचा ग्राहक कोण आहे आणि त्याची मानसिकता काय आहे याचा अधिक सखोल विचार करावा लागतो का?
वरुण – हो, सिनेमा करणं आणि जाहिरात करणं यात खूप फरक आहे. तुम्ही जेव्हा जाहिरात करता तेव्हा एक गोष्ट आधीपासूनच ठरलेली असते. ती म्हणजे जाहिरात बघून लोकांना आनंद झाला पाहिजे. लोकांना शेवटी आनंद होणार, उत्फुल्लित वाटणार याचभोवती कथा विणली जाते. एखादी जाहिरात बघून कुणाला दुःखानं रडू आलं आहे; किंवा त्यात हिंसा आहे; किंवा लोक भांडतायत असं सहसा बघायला मिळत नाही. एखादं उत्पादन विकणाऱ्या कोणत्याही जाहिरातीचा शेवट नेहमी आनंदातच होतो. मग तो आनंद कोणत्याही मार्गानं येत असेल. आता 'रीयुनियन'सारख्या मालिकेतून तो स्मरणरंजनातून येतो. आणि जाहिरातींना एक आम्ही ज्याला 'हुक पॉईंट' म्हणतो तसं एक अकस्मात येणारं वळण असतं जे अगदी शेवटच्या अर्ध्या मिनिटांत येतं. मोहन आगाशेंबरोबर एक जाहिरात केली होती त्या जाहिरातीत असाच एक एकदम अनपेक्षित हुक पॉईंट आहे. पूर्ण जाहिरातभर सगळ्यांची उत्कंठा वाढते आणि मग शेवटच्या काही सेकंदात असं काही समोर येतं की लोकांच्या चेहऱ्यावर एकदम हसू येईल. त्यांना प्रसन्न वाटेल.
रोज संध्याकाळी
या जाहिरातींचं लिखाणच त्या शेवटच्या क्षणांमधल्या आश्चर्यासाठी असतं. सिनेमा करताना असं काही बघावं लागत नाही खरं, पण भारतीय सिनेमांत 'मध्यंतर' असतं. जागतिक सिनेमांमध्ये कुठेच असं मध्यंतर वगैरे असत नाही. त्यामुळे आपल्याकडे सिनेमा करताना मध्यंतर हा 'हुक पॉईंट' ठेवावा लागतो. म्हणजे लोक बाहेर वडे, पॉपकॉर्न आणायला गेल्यावर त्यांना लवकर परत यावंसं वाटेल अशा जागेवर ती विश्रांती घ्यायची. पण तितकंच. बाकी दोन-अडीच तासांमध्ये प्रेक्षकांच्या मनात वेगवेगळ्या भावना जागृत व्हाव्यात या उद्देशानं सिनेमा लिहिला जातो. त्याला आनंदाचं काही बंधन नाही. ते कादंबरीसारखं लिखाण आहे.
आणि जाहिरातींचं लेखनही एका विशिष्ट चौकटीत बसवावं लागतं. माझ्या बाबतीत बोलायचं तर आमच्या जाहिराती दिलेल्या बजेटमध्ये बसवायला आम्हाला एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी चित्रीकरण करावं लागतं. कमीतकमी मनुष्यबळ वापरून करावं लागतं.
ऐसी अक्षरे – इतर माध्यमं आणि समाजमाध्यमं यांच्या वापराबद्दल केवळ जाहिरातींच्या दृष्टीकोनातून तुझी काय निरीक्षणं आहेत? अलीकडे लोक सतत फोनला चिकटलेले असतात. त्यामुळे आता समाजमाध्यमं टीव्ही, रेडिओपेक्षा जास्त प्रभावी झाली आहेत असं तुला वाटतं का?
वरुण – खरं तर मला यातलं सखोल ज्ञान नाही. पण असं एक निरीक्षण आहे की रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी – विशेषतः FMCG असं ज्या उत्पादनांचं वर्गीकरण होतं – यांत साबण आहे, बिस्किटं आहेत, टूथपेस्ट आहे – अशा उत्पादनांसाठी अजूनही टेलिव्हिजनला प्राधान्य दिलं जातं कारण तिथे त्यांना सतत त्या दाखवता येतात आणि लोकांना त्यांच्या ठरलेल्या आवडत्या मालिका कार्यक्रमांमध्ये त्या बघाव्याही लागतात. किंवा डीमार्ट, अमेझनसारख्या कंपन्या ज्यांना ते एखादी वस्तू किती स्वस्त देत आहेत याची आकडेवारी सांगायची असते ते वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देण्याला प्राधान्य देतात.
पण अन्नपदार्थांमध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात. आईच्या हातचे पदार्थ वगैरे असं काही करून आपल्याला गोष्ट रचता येऊ शकते. किंवा दागिन्यांच्या जाहिरातीदेखील अशा गोष्टीरूपी लिहिता येऊ शकतात आणि लोकांनाही त्या तशा रूपात बघायला आवडतात. त्यामुळे जिथे गोष्ट आहे आणि ती सांगायला वेळ हवा आहे अशा जाहिराती सोशल मीडियावर यशस्वी होतात असं निरीक्षण आहे. पण अजून या तीन माध्यमांमध्ये स्पर्धा आहे आणि त्यांतलं एकच लोकांना हवं आहे असं काही वाटत नाही.
ऐसी अक्षरे – यालाच जोडून पुढचा प्रश्न असा की सोशल मीडियावर वेळेचं किंवा कन्टेन्टचं बंधन नसतं. टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रातही वेळ आणि जागा या दोन्ही गोष्टींसाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात. आणि तितक्या जागेत आणि वेळेत आपल्याला जे सांगायचं आहे ते नीट सांगता येत नाही. असं समाजमाध्यमांवर नाही. त्यामुळे समाजमाध्यमं ही एक प्रयोगशाळा आहे असं तुला वाटतं का?
वरुण – समाजमाध्यमं ही एक दुधारी तलवार आहे. जसं सुरुवातीला मी म्हणालो की टीव्हीपेक्षा समाजमाध्यमं पटकन प्रतिसाद देणारी आहेत. ती आपल्या कलाकृतीशी लगेच बोलू शकतात. टीव्हीवर एखादी जाहिरात केली, तर ती वाईट असली तरी तशी प्रतिक्रिया लगेच देता येत नाही. आणि दिली तरी त्या प्रतिक्रियेला प्रसिद्धी मिळत नाही. इथे मात्र त्या गोष्टीचं अधिक भय असतं. आणि एखाद्या ब्रँडची जाहिरातीमुळे बदनामी झाली तरी ती जाहिरातही चिरकाल समाजमाध्यमांवर राहणार असते. लोकांनी ती भरपूर फिरवलेली असते. डाउनलोड केली जाते. त्यामुळे सावध राहावं लागतं. त्यामुळे जाहिरातींसाठी अशी प्रयोगशाळा आहे असं मला वाटत नाही पण स्वतंत्रपणे, चित्रपट, लघुपट बनवू बघणाऱ्या लोकांसाठी नक्कीच आहे. अनेकदा एखादा लघुपट, गाणं आधी सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात आणि मग त्यांना निर्माते मिळतात. पण जाहिरातींमध्ये अशी जोखीम घेता येत नाही. आम्ही एकदम सावध असतो.
ऐसी अक्षरे – तुझं सगळं काम मराठी माणसांसाठी झालेलं आहे. तू ज्या उद्योगांसाठी काम केलं आहेस त्यातली अनेक मराठी माणसांची अगदी लाडकी नावं आहेत. तर तू ज्या मराठी माणसाला मनात ठेवून काम करतोस त्या मराठी माणसाबद्दल काय सांगशील?
वरुण – एक खूप मोठी दरी दिसते. आज माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेले, म्हणजे तिशीतले आणि त्यापेक्षा तरुण लोक वेगळ्याच जगामध्ये वावरतात असं मला वाटतं. मी फक्त मध्यमवर्गीय, सुखवस्तू मराठी लोकांसाठी जाहिराती करतो. तरी या वर्गातही मला असं जाणवतं की तीस किंवा त्या खाली असलेल्या लोकांशी बोलायला वेगळी दृश्यभाषाच लागणार आहे. मी सध्या जे काही करतो आहे, त्याचा प्रेक्षक पस्तिशी ओलांडलेला आहे. मला नाही वाटत त्यापेक्षा तरुण लोक माझ्या जाहिरातींकडे आकर्षित होत असतील. तिशीखालच्या मराठी लोकांशी संवादच नाहीये. ते लोक हिंदी किंवा इंग्रजी मालिका, कन्टेन्टच बघतात. त्यामुळे सध्या ओटीटीवरही मराठी 'वेब सीरीज' (मालिका) करायला कुणी तयार नाही. ते स्पष्टपणे सांगतात की आमच्याकडे तरुण 'मराठी' वापरकर्ते आहेत. पण ते वेगळ्या भाषांतल्या मालिका बघतात.
त्यामुळे एक दुफळी आहे. पस्तीस आणि पुढच्या पिढीसाठी मी गोष्टी करू शकतो. पण जेव्हा कुणी तरी मला यापेक्षा तरुण लोकांसाठी काही करायला सांगेल तेव्हा मला वेगळा विचार करावा लागेल.
मी आतापर्यंत केलेल्या कामांपैकी फक्त भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) या चॅनलसाठी केलेली 'आई, मी आणि...' मालिका त्या वर्गानं बघितली असं म्हणता येईल. ती लहान मुलांमध्येदेखील फार प्रसिद्ध झाली. पण भाडिपादेखील ३०-४० वयोगटातच प्रसिद्ध आहे. मी हल्ली तरुण लोकांशी, किंवा लहान मुलांशी बोलतो तेव्हा, ते काय बघतात काय ऐकतात असं विचारल्यावर काहीतरी भन्नाटच नावं समोर येतात. आणि ते कोण आहेत हे शोधणंदेखील आता फार दमवून टाकणारं आहे. मुळात लहान मुलांकडे आणि विशीतल्या तरुणांकडे इतके पर्याय आहेत सध्या की त्यांनी आवर्जून मराठीतलं काही बघावं यासाठी संपूर्णपणे वेगळा विचार करावा लागेल.