ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १

(आजपासून एक नवी साप्ताहिक मालिका सुरू करत आहोत. यात ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणालींची तुलना आणि विश्लेषण केले आहे.)

शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन

सुधीर भिडे

विषयाची तोंडओळख

आज जगभर ॲलोपथीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. तसे पाहिले तर मानवी इतिहासात प्रथमच हे घडत आहे की एकच उपचारप्रणाली जगभर वापरली जात आहे. ॲलोपथीच्या जोडीनं जगात अजून काही वैद्यकीय प्रणाली वापरल्या जातात. भारतात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि निसर्गोपचार या प्रणालीसुद्धा वापरल्या जातात. युरोपात होमिओपॅथी आणि निसर्गोपचार या प्रणाली ॲलोपथीबरोबर वापरात आहेत, तर चीन आणि आग्नेय आशियात पारंपरिक चिनी वैद्यक आणि आखाती देशांत युनानी हे वैद्यक ॲलोपथीबरोबर वापरले जाते. आता प्रश्न असा निर्माण होतो की सामान्य माणसाने कोणत्या वैद्यकाचा आधार घ्यावा?

या लेखमालेत या सर्व प्रणालींना एकच मानदंड लावून जोखण्याचा प्रयत्न केला आहे. तो मानदंड म्हणजे शास्त्रीय सत्यता. या मानदंडावर ॲलोपथी सोडून इतर प्रणाली खऱ्या ठरत नाहीत. परंतु हा काही माझा नवा शोध नाही. मी काही नवीन गोष्ट सांगत नाही. जगभर या विषयावर पुष्कळ संशोधन झाले आहे. आणि निर्णय एकच आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि निसर्गोपचार या प्रणालींना काही शास्त्रीय पाया नाही.

असे असूनही आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि निसर्गोपचार यांचा वापर वाढतच आहे. असे का? या प्रश्नाचा अभ्यास समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी विचारात घेण्यासारखा आहे. माझे मत काहीही असो. या लेखांतून वाचकांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि निसर्गोपचार या प्रणालींची माहिती मिळेल आणि वाचक त्यावरून आपापले निर्णय काढू शकतात. शेवटी हा प्रश्न आपल्या आरोग्याशी निगडित आहे.

या लेखमालेच्या वाचनानंतर असे वाटण्याची शक्यता आहे की आयुर्वेदावर टीका करण्यासाठी हे लेख लिहिले. असे उद्दिष्ट अजिबात नव्हते. होमिओपॅथी आणि निसर्गोपचार यांबाबत जास्त काही बोलण्यासारखे नाही. या दोन प्रणालींवर इतके लिखाण झाले आहे की मी अजून काही नवीन सांगू शकत नाही. आयुर्वेदाचे विश्लेषण करताना जी तत्त्वे वापरले गेली ती सर्वच युनानी आणि सिद्ध या प्रणालींना लागू पडतात. झाले असे की, आयुर्वेदावर बरीच पुस्तके वाचण्यास मिळाली, त्या प्रमाणात युनानी आणि सिद्ध या प्रणालींवर पुस्तके मिळाली नाहीत. परंतु या तीन प्रणालींचा पाया सारखाच आहे. तेव्हा जी टीका आयुर्वेदाच्या बाबतीत केली गेली ती सर्व युनानी आणि सिद्ध यांनाही लागू पडते.

ही लेखमाला एकोणीस भागात प्रस्तुत केली जाणार आहे. या लेखमालेबरोबर अजून एक लेखमाला सुरू होत आहे. त्या लेखमालेत डॉक्टर विष्णू जोगळेकर आयुर्वेदावर मी जे काही प्रश्न उभे केले आहेत त्यावर त्यांचे मत मांडतील. डॉ. जोगळेकर एम. डी. आयुर्वेद असून निवृत्त प्राध्यापक आहेत. अजूनही ते या क्षेत्रात सक्रिय आहेत.

लिखाणात माझे बंधू मेजर जनरल संजय भिडे यांचे खूप साहाय्य झाले. माझ्या लिखाणाचे ते पहिले वाचक असतात. त्यांनी अभ्यासासाठी पुष्कळ वाचन सामग्रीही उपलब्ध करून दिली. त्यांचे आभार. पुस्तके नगर वाचन मंदिरातून मिळाली. 'ऐसी अक्षरे'चे आभार.

जर आपण शास्त्रीय मानदंड लावणार असलो तर प्रथम शास्त्र म्हणजे काय हे माहीत करून घेतले पाहिजे.

विषय मांडणी

  • शास्त्र म्हणजे काय?
  • फॉल्सिफिकेशन थिअरी
  • मोजमापांचे महत्त्व
  • शास्त्रीय प्रयोग आणि शोध निबंध
  • शास्त्रीय निबंधांची विश्वासार्हता
  • शास्त्राची प्रगती न थांबणारी, अंतहीन आहे.
  • आपण शास्त्राविषयी काय माहिती घेतली?
  • Randomised controlled trials
  • तुलनेसाठी काय निकष लावावेत?

***

शास्त्र म्हणजे काय?

युरोपमध्ये सोळाव्या शतकात शास्त्र या कल्पनेचा उगम झाला. त्याआधी भारत, चीन आणि मुस्लिम देशांत यात काही शास्त्रीय सिद्धांत मांडले गेले. पण त्यांना खऱ्या अर्थाने शास्त्रीय प्रणालीतील ज्ञान असे म्हणता येणार नाही. असे का ते पुढे पाहुच. कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांची नावे सर्वांना माहीत असतात. त्यांच्या पासून शास्त्रीय विचार मांडण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. यानंतर सतत चारशे वर्षे शास्त्रीय ज्ञानवृद्धीचा प्रवाह चालू आहे. या प्रवाहातील अखंडितता याला अर्थ आणि महत्त्व आहे. आजच्या ज्ञानाच्या आधारावर नवीन ज्ञान निर्माण होत असते. ही प्रक्रिया अखंडित चालू असते. जर ही प्रक्रिया खंडित झाली तर शास्त्राच्या त्या शाखेची प्रगती खुंटते आणि ते ज्ञान विस्मृतीत जाते किंवा इतिहासात जमा होते. अशी प्रवाहितता आणि अखंडितता ऐतिहासिक भारतातील शास्त्राच्या बाबत दिसत नाही.

शास्त्राची इमारत दोन प्रकारच्या विधानांवर उभी असते. व्याख्या आणि एंपिरीकल विधाने (अनुभवसिद्ध विधान). व्याख्येचा वापर करून आणि प्रयोगाद्वारे एंपिरीकल विधाने सिद्ध करता येतात. त्रिकोणाला तीन बाजू असतात ही झाली व्याख्या. या टेबलाची उंची १.२ मीटर आहे हे झाले अनुभवसिद्ध विधान. अनुभवसिद्ध विधानाची सत्यता कोणालाही पाहता येते. कोणालाही प्रत्येक विधानाची सत्यता तपासता येणे हे शास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. एखाद्या महान शास्त्रज्ञाने एक विधान केले म्हणून ते खरे अशी प्रणाली शास्त्रात नाही.

सत्य शोधण्यासाठी शास्त्र निरीक्षणांचा (observations) वापर करते. एखाद्या प्रयोगात एक निर्णय शंभर (शंभर हा एक उदाहरणादाखल आकडा सांगितला, शंभर हा काही मानदंड नाही) वेळेला आढळून आला तर शास्त्रज्ञ त्यावरून सिद्धांत मांडते.

काही वेळा शास्त्रज्ञ आधी सिद्धांत मांडतात (Deductive reasoning). पण जोपर्यंत तो सिद्धांत प्रयोगाद्वारे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो खरा मानला जात नाही. बऱ्याच वेळेला एखादा सिद्धांत प्रयोगाद्वारे १०० टक्के खरा आहे असे सिद्ध होत नाही आणि तो धादांत खोटा आहे असेही दिसत नाही. त्या वेळेला शास्त्रज्ञ शक्याशक्यतेचा (probability) वापर करतात.

फॉल्सिफिकेशन थिअरी
शास्त्राच्या प्रगतीत विचारवंत कार्ल पॉपरची फॉल्सिफिकेशन थिअरी (प्रमेयाचा खोटेपणा सिद्ध करणे) याला फार महत्त्व आहे. जुने सिद्धांत खोटे ठरविल्यानेच शास्त्राची प्रगती होते. या थिअरीविषयी काही माहिती घेऊ.

According to Karl Popper, scientific theory should make predictions which can be tested, and the theory rejected if these predictions are shown not to be correct. He argued that science would best progress using deductive reasoning as its primary emphasis, known as critical rationalism.

Popper gives the following example. Europeans for thousands of years had observed millions of white swans. Using inductive evidence, we could come up with the theory that all swans are white.

However, exploration of Australasia introduced Europeans to black swans. Popper’s point is this: no matter how many observations are made which confirm a theory there is always the possibility that a future observation could refute it. Induction cannot yield certainty.

Popper proposed an alternative scientific method based on falsification. However many confirming instances there are for a theory, it only takes one counter-observation to falsify it. Science progresses when a theory is shown to be wrong and a new theory is introduced which better explains the phenomena.

For Popper, the scientist should attempt to disprove his/her theory rather than attempt to continually prove it.

(Karl Popper – Theory of falsification. Simply Psychology. www.simplypsychology.org/Karl-Popper.html )

स्थापित सिद्धांत खोटा पडल्याने शास्त्राची कशी प्रगती होते ते एका उदाहरणातून पाहू. जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने १९०८ साली असे सुचविले की प्रत्येक पदार्थ छोट्या कणापासून बनलेला असतो. त्या कणांना त्याने अणू असे नाव दिले. त्यानंतर अणूपेक्षा लहान कण शोधण्यात आले. साहजिकच डाल्टनचा सिद्धांत खोटा ठरला. मग जे. जे. थॉमसन या शास्त्रज्ञाने सुचविले की एका अणूत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन विखुरलेले असतात. मग प्रश्न आला की हे अवाणू कण (subatomic particles) स्थिर असतात का हलत असतात. या दोन्ही शक्यतांमुळे अजून प्रश्न निर्माण झाले. मग थॉमसनचा सिद्धांत खोडून अर्नेस्ट रदरफर्ड या शास्त्रज्ञाने असे सुचविले की केंद्रात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स केंद्राभोवती फिरत असतात. मग प्रश्न निर्माण झाला की हे छोटे इलेक्ट्रॉन्स केंद्राकडे आकर्षित होऊन केंद्रात पडत का नाहीत? कारण इलेक्ट्रॉनसवर उणे भार (negative charge) असतो आणि प्रोटॉन्सवर धन भार (positive charge) असतो. आता रदरफर्डच्या सिद्धांतात बदल करण्याची वेळ आली. हा बदल नील्स बोहर या शास्त्रज्ञाने केला. नील्स बोहरच्या सिद्धांतातही पुढे बदल करण्याची वेळ आली जेव्हा अणूच्या रचनेला पुंजभौतिकीचे (quantum mechanics) सिद्धांत लावण्याची गरज पडली. अशा प्रकारे प्रस्थापित सिद्धांत खोडून शास्त्राची कशी प्रगती होत राहते.

मोजमापांचे महत्त्व

शास्त्रज्ञ त्यांचे सिद्धांत प्रयोग करून सिद्ध करतात. अशा प्रयोगांत मापन महत्त्वाचे असते. प्रयोगात वापरले जाणारे पदार्थ आणि प्रयोगातून निर्माण झालेले पदार्थ यांचे मापन झाले पाहिजे. या शिवाय प्रयोगात भौतिक ऊर्जा – heat, electricity etc – वापरली जाण्याचे शक्यता असते. त्यांचेही मोजमाप आवश्यक असते.

मापनाशिवाय निर्णय हा केवळ गुणात्मक असू शकतो. मोजमापांत अजून एक आवश्यक गोष्ट म्हणजे आपण केलेले मोजमाप दुसऱ्या शास्त्रज्ञाला समजले पाहिजे आणि ते मोजमाप तिला वापरता आले पाहिजे. यासाठी शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय मोजमाप प्रणाली निश्चित केली आहे. या प्रणालीस SI (Standard International) System of Measurements असे म्हणतात. मापन करण्यासाठी जी उपकरणे वापरली जातात त्या उपकरणांनी निर्णय यथार्थ आणि अचूक (accurate and precise) दिला पाहिजे.

शास्त्रीय प्रयोग आणि शोधनिबंध

शास्त्रीय प्रयोगाचा निर्णय साधारणपणे एका (किंवा अधिक) गणिती सूत्रात मांडला जातो. जेव्हा अधिक प्रयोगानंतर असे ध्यानात येते की पहिले प्रमेय पूर्ण बरोबर नाही तेव्हा शास्त्रज्ञ नवीन मॉडेल सुचवितात ज्यातून नवीन निरीक्षणांचीही संगती लावता येते. आणि ही क्रिया न संपणारी असते. प्रत्येक सिद्धांताची सत्यता कायम पडताळत राहणे आणि तो सिद्धांत खरा न ठरल्यास इतिहासजमा करणे यांमुळेच शास्त्राची प्रगती होते.

यावरून असे म्हणता येईल की शास्त्रीय सिद्धांत हे पूर्ण आणि कायम सत्य कधीच असू शकत नाहीत. जोपर्यंत सिद्धांत असत्य सिद्ध होत नाही तोपर्यंत तो खरा समजला जातो. जेव्हा एखाद्या प्रयोगात असे आढळते की प्रस्थापित सिद्धांत खरा नाही तेव्हा शास्त्रज्ञ काय करते? प्रथम ती हे पाहते की तिच्या प्रयोगात तर काही चूक होत नाही? त्या नंतर शास्त्रज्ञ हे पाहते की प्रस्थापित सिद्धांत प्रयोगाच्या कोणत्या संदर्भचौकटीमध्ये सिद्ध झाला होता. शास्त्रज्ञ हे पाहते की तिचा प्रयोगही त्याच चौकटीत झाला आहे. यांपैकी कुठल्याही बाबतीत काही चूक आढळली नाही तर शास्त्रज्ञाला नवीन सिद्धांत मांडणे क्रमप्राप्त होते.

सिद्धांत तयार झाला की शास्त्रज्ञ एक रिसर्च पेपर तयार करते. तो लेख त्या विषयातील नियतकालिकाकडे पाठविला जातो. त्या ठिकाणी त्या लेखाची तज्ज्ञांकडून छाननी होते. याला पियर रिव्ह्यू असे म्हणतात.

जे तज्ज्ञ लेखाची छाननी करतात त्यांना आणि लेखिकाला एकमेकांची नावे दिली जात नाहीत. यामुळे या पद्धतीत कोणताही पूर्वग्रह (तत्त्वतः) काम करत नाही.

आपण पाहिल्याप्रमाणे आधुनिक युगात शास्त्रीय पद्धतीची सुरुवात साधारणपणे तीनशे वर्षांपासून सुरू झाली. जेव्हा शास्त्रीय संशोधन प्रसिद्ध करणारी नियतकालिके सुरू झाली, त्याच वेळेला ही पियर रिव्ह्यूची प्रथा सुरू झाली, कारण नियतकालिकाच्या संपादिकेला सर्व विषयांचे ज्ञान असणे शक्य नव्हते. तज्ज्ञांनी नवीन संशोधन योग्य रितीने केले आहे आणि काढलेले निर्णय योग्य आहेत असे एकदा सांगितले की त्यानंतर ते ज्ञान जगाला माहीत होण्यासाठी प्रसिद्ध केले जाते.

शास्त्रीय लेखांची विश्वासार्हता

शास्त्रीय संशोधन आणि लेखन यांचे वैशिष्ट्य वरील आकृतीमधून समजू शकते. एखाद्या ‘तज्ज्ञा’चा लेख वाचला तर ते त्या तज्ज्ञाचे मत असते, ते शास्त्रीय सत्य राहात नाही. याचा अर्थ त्या लेखातील सांगितलेल्या गोष्टी असत्य आहेत असे म्हणणे नाही. पण शेवटी ते एका व्यक्तीचे मत राहते. केस स्टडी याचा अर्थ एका रुग्णाचा केलेला अभ्यास. साहजिकच याची विश्वासार्हता कमी राहते. जेव्हा एखादी शास्त्रज्ञ एक प्रमेय सिद्ध करण्यासाठी एका प्रयोगाचे आयोजन करते, तेव्हा केलेल्या प्रयोगाचे निर्णय जास्त विश्वासार्ह राहतात. अशा निरनिराळ्या प्रयोगांचा केलेला आढावा जास्त विश्वासार्ह राहतो. जेव्हा आपण एखादे शास्त्रीय लिखाण वाचतो तेव्हा वरीलपैकी कोणत्या प्रकारांत ते लिखाण बसते हे पाहणे आवश्यक असते. त्यावरून त्या लिखाणाची विश्वासार्हता ठरते.

बहुतेक वेळेला शास्त्राची प्रगती ही मंद गतीने होत असते. प्रत्येक वेळी काही सनसनाटी शोध लागत नसतात. शास्त्रात प्रगती होत असताना बाहेरच्या जगाला याची जाणीवसुद्धा होत नाही. जेव्हा ही प्रगती अशा स्थितीत येते की त्या नव्या सिद्धांताच्या वापराने लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो तेव्हा लोक समजतात मोठा शोध लागला. खरे म्हणजे ही प्रगती संथ गतीने वर्षानुवर्षे होत असते.

प्रगती अखंडितपणे होत राहणे याला महत्त्व आहे. भारतात मध्ययुगीन काळात काही महत्त्वाचे शोध लागले खरे, पण त्यांत अखंडितता नसल्याने एक शास्त्रीय परंपरा निर्माण झाली नाही. शास्त्रीय परंपरेत आपल्या आधीच्या शास्त्रज्ञाने जे काम केले आहे तिच्या खांद्यावर उभे राहून आपण काम करत असतो. या प्रक्रियेत त्या जुन्या शास्त्रज्ञाचे काम खोटे ठरले तरी त्या शास्त्रज्ञाचे मोठेपण कमी होत नाही. हाच पॉपरचा सिद्धांत.

आपली उंची हे सत्य नाही. बुजुर्गांच्या खांद्यावर उभे राहिल्यामुळे आपल्या खुजेपणाचे उंचीत रूपांतर झाले आहे. न्यूटनचे असेच एक विधान आहे – “If I have seen further than others, it is by standing upon the shoulders of giants.”

शास्त्राची प्रगती न थांबणारी, अंतहीन आहे.

शास्त्राची प्रगती दोन कारणांनी होत असते. विश्वातील एखादी गोष्ट समजण्यासाठी शास्त्रज्ञ काही प्रमेय मांडतात. मग ते प्रमेय सिद्ध करण्यासाठी प्रयत्न चालू होतात. डार्क एनर्जी, डार्क मॅटर, ब्लॅक होल या संकल्पना आधी मांडल्या गेल्या. मग त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयोग चालू झाले. शास्त्राच्या प्रगतीचे दुसरे कारण मानवाच्या पुढे उभे राहिलेले प्रश्न. जैविक इंधनाच्या वापराने मानवापुढे निरनिराळे प्रश्न उत्पन्न झाले आहेत.ते सोडविण्यासाठी शास्त्र प्रयत्न करीत आहे.

शास्त्रीय ज्ञान सगळ्या बाजूंनी मोठ्या होत जाणाऱ्या पिरॅमिडसारखे असते. त्याचा पाया आणि उंची दोन्ही वाढत जातात. याचे एक उदाहरण पाहू. रेडिओलॉजीची सुरुवात क्ष किरणांपासून झाली. मग अल्ट्रासॉनिकचा वापर चालू झाला. गेल्या तीस वर्षांत सी. टी. स्कॅन आणि एम. आर. आय.च्या पद्धती आणि वापर शोधले गेले. त्याच बरोबर क्ष किरण आणि गॅमा किरण यांचा कॅन्सरच्या उपचारात वापर सुरू झाला. आपण पाहू शकतो की पाया आणि उंची दोन्ही वाढली.

आपण शास्त्राविषयी काय माहिती घेतली?

  • लिखाणात दोन प्रकारची विधाने येतात – व्याख्या आणि अनुभवसिद्ध विधाने. व्याख्यांचा वापर करून इतर विधाने सिद्ध झाली तर व्याख्या बरोबर आहेत असे समजले जाते. अनुभवसिद्ध विधाने कोणीही प्रयोगाद्वारे पडताळून पाहू शकते.
  • शास्त्रीय सिद्धांत प्रयोग आणि निरीक्षणे यातून सिद्ध होतात.
  • प्रयोगातील निरीक्षण हे मोजमाप केलेले असते. एखादी गोष्ट वाढली म्हणजे किती वाढली हे आकड्यात मोजावे लागते.
  • सिद्ध झालेले ज्ञान शास्त्रीय संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या मासिकांकडे पाठविले जाते. हे संशोधन तज्ज्ञांकडून तपासले जाते आणि योग्य ठरल्यास प्रसिद्ध केले जाते. शास्त्रीय संशोधन अशा तऱ्हेने प्रसिद्ध करणे याला फार महत्त्व आहे. यामुळेच शास्त्राची प्रगती होत असते.
  • प्रत्येक शास्त्रीय सिद्धांत पडताळून पाहण्याचे कोणालाही स्वातंत्र्य असते. अशा पडताळणीतून जर तो सिद्धांत चुकीचा ठरला तर शास्त्र त्या सिद्धांताला इतिहासजमा करते. प्रस्थापित सिद्धांत चुकीचा ठरविणे याला शास्त्रात फार महत्त्व आहे.
  • शास्त्राची प्रगती अनंतपणे, अव्याहतपणे चालू असते.

Randomised, double blind, controlled trials
वैद्यकीय व्यवसायाच्या संदर्भात शास्त्रीय चाचणीला फार महत्त्व आहे. या चाचणीला randomised, double blind, controlled trials (RCT) म्हणतात. कोणतेही नवीन औषध शोधले गेले की प्रथमतः RCT केली जाते. या चाचणीत औषध पास झाले तरच ते बाजारात आणता येते. अशी चाचणी तीन पायऱ्यांत वाढत्या (रुग्ण)संख्येने केली जाते. चाचणी साधारण एक ते दोन वर्षांपर्यंत चालते. प्रत्येक देशात अशी चाचणी घेणारी एक संस्था असते. भारतात अशा चाचण्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. या चाचणीची अधिक माहिती आपण ॲलोपथीच्या भागात घेऊ.

आपण निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. प्रत्येक प्रणालीला शास्त्रीय मानदंड लावून काय दिसते ते पाहू. वैद्यकाच्या संदर्भात काय मानदंड लावावे लागतील?
ज्या मूळ सिद्धांताच्या पायावर हे वैद्यक उभे आहे हे सिद्धांत कसे सिद्ध झाले? परत प्रयोग करून हे सिद्धांत पाहिजे तेव्हा सिद्ध करता येतील का? या प्रयोगातून काय प्रकारचे मोजमाप वापरण्यात आले?
सुरुवातीला ग्राह्य धरलेले कोणते सिद्धांत नंतर चूक ठरले?
प्रयोगांचे शोधनिबंध इतर तज्ज्ञांनी तपासल्यानंतर प्रसिद्ध केले जातात का?
रोगाच्या निदानासाठी काय प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात? या चाचण्यांत काय मोजमाप केले जाते? चाचण्यांचे निष्कर्ष मानवी हस्तक्षेपाशिवाय रेकॉर्ड होऊ शकतात का?
(आपण रक्तदाबाच्या चाचणीचे उदाहरण घेऊ. दंडाला पट्टा बांधून मशीन चालू केले की दोन मिनिटांत स्क्रीनवर रक्तदाबाचे रीडिंग येते. डॉक्टरला काय वाटले यापेक्षा डॉक्टरला काय दिसले हे महत्त्वाचे.)
औषध देण्याअगोदर RCT केल्या जातात का? RCT कुठल्या संस्थेमार्फत केली जाते? या संस्थेची स्वायत्तता कशी राखली जाते?


(क्रमशः)

field_vote: 
0
No votes yet

या लेखमालिकेत पुढे काय असणार आहे याबद्दल उत्सुकता आहे.
"उपाय होत नसेल, पण अपाय तर होत नाही ना?" हे वाक्य होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांबद्दल वापरलेलं अनेकवेळा ऐकलं आहे. पण आयुर्वेदिक औषधांत सर्रास मर्क्युरी आणि आर्सेनिक (प्रमाणाबाहेर, विषबाधा होऊ शकेल इतके) सापडतात. विशेषतः भस्म करून गोळ्या तयार करतात त्या औषधांमध्ये अगदी नक्की आर्सेनिक सापडतं. काही लोक सांधेदुखीसारख्या व्याधींसाठी ही औषधं घेतात त्यामुळे अनेक महिने/वर्षं शरीरात आर्सेनिक साठून त्याची विषबाधा होते. आर्सेनिक पॉयझनिंग अतिशय सावकाश होतं आणि त्याची लक्षणं पटकन लक्षातही येत नाहीत. तसंच होमियोपॅथी औषधांमध्ये अनेकदा स्टेरॉइड्सची भेसळ होते.
एखाद्याला अंगदुखी आहे आणि त्यानं एखादी कॉम्बीफ्लाम घेतली तर त्या २५० मिलिग्रॅममध्ये ठराविक प्रमाणात आयब्युप्रोफेन आणि पॅरासिटेमॉल आहे हे त्याला माहिती असतं. जास्त पेनकिलर घ्याव्या किंवा नाही वगैरे निर्णय नक्की आपण काय घेतो आहे हे स्पष्ट माहिती असताना घेणं, आणि "निदान अपाय तरी नाही" अशा भाबड्या समजुतीतून घेणं हा एक महत्वाचा फरक आहे.
अगदी रॅण्डमाईझ्ड कंट्रोल ट्रायल केल्या नाहीत तरी निदान विकल्या जाणाऱ्या औषधांची फार्मा कंपन्यांमध्ये कसून तपासणी होते तशी व्हायला हवी आणि त्यांच्या डोक्यावर एफडीए बसते तसं इथे कुणाचातरी सतत धाक असावा.
भारतात तयार होणाऱ्या जेनेरिक औषधांची तपासणीही विशेष चांगली नाही. हे अधिकार सगळे त्या त्या राज्यांना दिलेले आहेत त्यामुळे कायद्यांची अंमलबजावणी जितकी कडक असायला हवी तितकी ती नसतेच. पण आयुर्वेदिक किंवा होमीयोपॅथीक औषधं वैद्य जागेवर तयार करून देतात. त्यांत काय आहे हे विकणाऱ्याला सोडून कुणालाही माहिती नसतं ही गोष्टच पुरेशी चिंताजनक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात तयार होणाऱ्या जेनेरिक औषधांची तपासणीही विशेष चांगली नाही. हे अधिकार सगळे त्या त्या राज्यांना दिलेले आहेत त्यामुळे कायद्यांची अंमलबजावणी जितकी कडक असायला हवी तितकी ती नसतेच.

हे वाचून हादरलो.

अमेरिकेत उपलब्ध असणाऱ्या जेनेरिक प्रिस्क्रिप्शन औषधांचा दर्जा किमानपक्षी ब्रँडनेम औषधांइतका असतो – इथल्या एफडीएचे त्यावर कडक नियंत्रण असते – असा एक लोकप्रवाद आहे.

परंतु, इथल्या स्थानिक फार्मशीतून वितरित झालेल्या माझ्याच काही जेनेरिक प्रिस्क्रिप्शन औषधांवरील लेबलांची तपासणी केली असता, (१) मॅन्युफॅक्चर्ड बाय नामवंत-भारतीय-फार्मा-कंपनी, आणि/किंवा (२) मॅन्युफॅक्चर्ड फॉर नामवंत-अमेरिकन-फार्मा-कंपनी बाय कधी-बापजन्मी-नाव-न-ऐकलेली-फलानाढिकाना-फार्मा-कंपनी-इन-तेलंगाना, असे प्रकार, किमानपक्षी दोन बाटल्यांवर आढळले.

पूर्वी इथली जेनेरिक औषधे इथेच बनायची. त्यामुळे, इथल्या फलानाढिकाना कंपनीने का होईना, परंतु इथेच बनविलेल्या जेनेरिक औषधांच्या दर्जावर इथल्या एफडीएचे लक्ष तथा नियंत्रण असते, यावर विश्वास ठेवणे (तुलनेने) सोपे असायचे.

आजकाल (किंमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या हेत्वर्थ) अनेकदा ही जेनेरिक औषधे इतर देशांतून आयात करून येथील चॅनेलांतून वितरित केली जातात. या आयातस्रोतांमध्ये भारताचाही वाटा बऱ्यापैकी मोठा आहे, हे लक्षात घेता, आपण केलेल्या दाव्याच्या प्रकाशात चिंता निर्माण होते.

अर्थात, याचा ‌अर्थ, भारतात (किंवा अन्यत्र) बनणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी किमानपक्षी अमेरिकेस निर्यात होणाऱ्या औषधांचा दर्जा चांगला असतो, असाही घेता येणे शक्य आहेच. शिवाय, अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय बनावटीच्या जेनेरिक औषधांच्या दर्जावर अमेरिकन एफडीएचे अंतिम नियंत्रण असणे हेही अगदीच अशक्य नाही.

मात्र, या सगळ्या भानगडीतील नियंत्रणव्यवस्थांचे भिन्न स्तर, त्यांच्या नोकरशाह्या (मराठीत: ब्युरॉक्रश्या), त्यांच्या विश्वासार्हता, त्यांच्यातले आपापसातील दळणवळण, झालेच तर अंतिम नियंत्रणव्यवस्थेस (पक्षी: अमेरिकन एफडीएस) निर्मितीच्या स्रोतापाशी (पक्षी: भारतात) थेट कार्याधिकारक्षेत्र (मराठीत: ज्युरिस्डिक्शन) नसणे, या सर्व गोष्टी जमेस धरता, असे नियंत्रण अंतिमतः कितपत काटेकोरपणे करता येणे व्यवहारात शक्य असावे, याबद्दल संदेह निर्माण होतोच.

भारतीय (छोट्यामोठ्या) औषधनिर्यातदारांच्या दर्जाबद्दलचा विश्वास अनाठायी न ठरो, एवढीच या निमित्ताने (स्वार्थी) सदिच्छा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतो आहे.
शास्त्रीय पद्धतीची ओळख आणि त्यातली गृहितके मांडल्याबद्दल आभार - वाचनखूण म्हणून साठवली आहे.
पुढ्ल्या भागांची वाट बघतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किरकोळ आजार ताप, खोकला,डोकं दुखणे ,अपचन
सर्दी हे असेच बरे होतात.
काही औषध घेण्याची पण गरज नाही.
शरीर स्वतःच त्या लक्षणाचा नायनाट करते.
इथे कोणती ही pathi Kam करते.
गंभीर आजार..
कॅन्सर, टीबी, रक्त च तयार न होणे, मधुमेह,किडनी दोष हे बरे करण्याची खात्री .
जगातील कोणतीच उपचार पद्धती देवू शकत नाही सर्व एकच पातळीवर आहेत.
रोग होवूच नयेत .
दिनचर्या, आहार, पथ्य ह्या साठी प्राचीन ज्ञान जे फक्त अनुभव वर अवलंबून आहे तेच उत्तम आहे.
आधुनिक alopathy कडे त्याचे उत्तर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

Brain strock येवून बेशुद्ध झालेला व्यक्ती किंवा शरीराचे अवयव निकामी झालेला व्यक्ती,बोलणे किंवा बाकी क्रिया बंद झालेला व्यक्ती..

ह्या वर alopatgy ही आधुनिक उपचार पद्धती पण काही च खात्री नी उपचार करू शकत नाही.
असा व्यक्ती ठीक होणे हे फक्त त्या व्यक्तीचं शरीर
काय response करेल ह्या वर च अवलंबून असते.
हाडांचे आजार
ह्यांचे पणखात्री नी निदान आज पण होत नाही.
असतात फक्त शक्यता आणि प्रयोग .
अशी उदाहरणे नी बघितली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0