एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ११

समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न

सुधीर भिडे

समाजातील स्त्रियांची जी स्थिती असेल त्यावरून तो समाज किती प्रगत आहे ते मी ठरवितो.
– डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांची स्थिती भयंकर होती. बालविवाह, सती प्रथा आणि विधवांच्या पुनर्विवाहाला विरोध हे मोठे प्रश्न होते. याशिवाय स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता. दलित वर्गातील स्त्रियांची स्थिती तर फारच दयनीय होती.

स्त्रियांच्या स्थितीत सुधाराणा करण्यासाठी समाजसुधारकांनी इंग्रज सरकारकडे वारंवार अर्ज केले. त्यास यश येऊन इंग्रज सरकारने स्त्रियांच्या उत्थापनासाठी विशेष कायदे केले. स्त्रीशिक्षणाची सुरुवात होऊन सुधारणांना सुरुवात झाली.

तत्कालीन स्त्रियांची स्थिती

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. उषा पोळ-खंदारे, कोमल प्रकाशन, २०११, पृष्ठ १४०, या संदर्भातील खालील उतारा पाहा :

देवाधर्माच्या नावाखाली स्त्री आणि शूद्र यांना छळण्याचे जे काही अघोरी उपाय भटभिक्षुकांनी काढले होते ते माणसाच्या जीवनाला कलंक लावणारे होते. त्यांचे जीवन गुलामांपेक्षा हीन होते. स्त्री म्हणजे पापाचे माहेरघर, ती एक उपभोगाची वस्तू एवढीच समजूत त्या काळी होती. ती एक माणूस आहे, तिला मन भावना आहेत, तीदेखील मोठे कार्य करू शकते या गोष्टी त्यांच्या ध्यानीमनीही नव्हत्या. हिंदू धर्मात स्त्रीवर जेवढा अत्याचार झाला तेवढा जगातील कोणत्याही धर्मात झाला नसेल. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे महापाप बनले. स्त्रियांना आणि शूद्रांना धर्मानेच शिक्षणाचा अधिकार नाकारला आहे अशी शिकवण दिली जाई.

स्त्री-गुलामगिरीची वाईट परंपरा निर्माण करणारा माणूस मनू आहे असे समजले जाते. मनू हा एक देवाचा प्रेषित असे मानण्यात येते. त्याच्या सुप्रसिद्ध स्मृतीने स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्वच संपुष्टात आणले. स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही असा दंडकच त्याने घालून दिला. स्त्री हा एक प्राणी असून पुरूषांना समाधान देण्यासाठीच तिचा जन्म झाला आहे असे त्याने सांगितले.

महाराष्ट्रात राजसत्ता आणि धार्मिक सत्ता ब्राह्मणांच्या हाती असल्याने केवळ ब्राह्मणांनाच धार्मिक ग्रंथ वाचण्याचा अधिकार होता. अनेक भयंकर धार्मिक कर्मकांडांनी ब्राहमणेतर समाज रसातळाला गेला. लोकहितवादी लिहितात, ‘कोणत्यातरी शास्त्रावरून दुनियेत असा जुलूम झाला नसेल. हे सर्व शास्त्री लोक लवकर मेले म्हणजे बरे होईल.‘

स्त्रियांना पुरुष बरोबर असल्याशिवाय एकट्याने बाहेर जाण्याची बंदी होती. पुरुषांबरोबर बाहेर पडल्या तरी स्त्रियांना पुरुषामागे चार पावले चालावे लागे. स्त्रियांना रस्त्यातून चालताना चपला घालण्याची बंदी होती. स्त्रियांनी चपला घालणे धर्माविरुद्ध होते. १८६५ साली तर्खडकर जेव्हा आपल्या पत्नीबरोबर फिरण्यास बाहेर पडत त्यावेळी लोक बाहेर येऊन हा प्रकार बघत.

स्त्री शिक्षणाला विरोध

स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध आपल्या समाजात कोठून आणि केव्हा आला? भारतरत्न पां. वा. काणे धर्मशास्त्राचा इतिहास या पुस्तकात लिहितात (पृष्ठ १८१, मराठी भाषांतर) -

स्त्रियांच्या शिक्षणाचा दर्जा वेदकाली मध्य युगापेक्षा आणि अर्वाचीन कालापेक्षा पुष्कळच वरचा होता. पुष्कळशा स्त्रियांनी वेद मंत्र रचलेले आहेत. अनेक स्त्रिया अध्यात्म विद्येत निपुण होत्या. त्या शिक्षकाचे काम करीत असत. परंतु क्रमाक्रमाने स्त्रियांची स्थिती वाईट होत गेली. धर्मसूत्रांत आणि मनुस्मृतीत स्त्रियांना आश्रिताचे स्थान देण्यात आले. वेदाभ्यासाच्या बाबतीत स्त्रियांना शूद्रांच्या समान मानण्यात येऊ लागले.

मनूपासून चालत आलेला स्त्री शिक्षणाला विरोध एकोणिसाव्या शतकापर्यंत जास्त प्रखर होत गेला. जेव्हा सावित्रीबाई फुले शाळेत शिकविण्यास बाहेर पडत त्यावेळी लोक त्यांच्या अंगावर घाण टाकीत, त्यांना घाणेरडे शब्द बोलत. न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या पत्नीस शिकविण्यासाठी एका इंग्रजी स्त्रीस नेमले. ती इंग्रजी स्त्री घरातून गेल्यावर रमाबाईस आंघोळ करावी लागे. स्त्रियांनी घरात पुस्तके वाचणे यालापण बंदी होती.

काशीबाई कानिटकर (१८६१-१९४८)

काशीबाई आधुनिक मराठी साहित्यातील पहिल्या लेखिका. कादंबरी, चरित्र आणि कथा या साहित्यप्रकारांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या दोन भावांना शिकवायला पंतोजी येत; ते ऐकून, बघून त्या माहेरीच लिहायला शिकल्या. त्याकाळात स्त्रीशिक्षणाला विरोध होत असे. पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्या अशा पद्धतीने शिकल्या.


काशीबाई कानिटकर
काशीबाई कानिटकर

पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली. वयाच्या नवव्या वर्षी काशीबाईंचे लग्न वकील गोविंदराव कानिटकरांशी झाले. ते सुधारणावादी होते. हरिभाऊ आपटे, न्या. रानडे यांच्या सहवासामुळे स्त्रियांनी शिकावे अशा विचारांचे ते होते. पण उघडपणे त्याकाळात काशीबाईंचे शिक्षण सुरू ठेवण्याची सोय नव्हती. पण तरीही काशीबाई टीका सहन करीत चोरून मारून शिकत, वाचत राहिल्या. काशीबाई कानिटकरांनी डॉक्टर आनंदी जोशी यांचे चरित्र लिहिले.

आनंदीबाई जोशी

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. कल्याण इथे राहणाऱ्या गणपतराव जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कलकत्ता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी विचारवंत होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी शिकविण्याचा त्यांनी निश्चय केला.

आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे १८८३ मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 'विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया'मध्ये आनंदीबाईंना प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले. त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या.


आनंदीबाईंचे चरित्र
आनंदीबाईंचे चरित्र

डॉक्टर झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या तेव्हा कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला. अमेरिकेत शिक्षण चालू असतानाच त्यांना क्षयरोग झाला होता. पुढे काही महिन्यांतच, म्हणजे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला. केवळ २१ वर्षांच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या स्त्रियांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला.

काशीबाईंनी आनंदी जोशी यांच्या लिहीलेल्या चरित्रात त्या काळच्या समाजात स्त्रियांची काय स्थिती होती याची कल्पना येते. काशीबाईंनी हे चरित्र १८८०च्या सुमारास लिहिले. काशीबाई पुस्तकाच्या प्रस्तावनेत आपल्या नवर्‍याचे आभार या शब्दांत मांडतात. - "हे त्यांचे उपकार फिटण्यास मी सातजन्म आपल्या कातड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घातले तरी ते फिटायचे नाहीत." आजकालच्या काळात कोणतीही लेखिका नवर्‍याचे आभार अशा शब्दांत प्रकट करणार नाही.

काशीबाईंच्या पुस्तकातील काही वाक्ये उद्धृत केली आहेत.

आपल्या देशात मुलगी झाली की आई-बापांंस वाईट वाटते. मुलगी म्हणजे अतिशय नावडती वस्तू आहे. ती जगात आल्यापासून कोणालाही सुख होत नाही. याचे कारण म्हणजे आपल्यातील विपरीत विवाहपद्धती आहे. मुलगी उपवर झाली की आईबापांची साडेसाती आलीच समजावे. त्या मुलीस दुसऱ्याच्या गळ्यात बांधताना मोठा पैसा द्यावा लागतो. सासरी गेल्यावर मुलगी एखादे क्षुल्लक काम करताना चुकली तर तिच्या आईबापाच्या सात पिढ्या उद्धारल्या जातात.

आनंदीबाईने आपली आई आपल्याला कशी मारहाण करीत असे हे वर्णन केले आहे, "माझ्या आईने कधी ममतेच्या शब्दांचा उपयोग केला नाही. तिने नेहमी दगड, लाकडे आणि विस्तव यांनी मला शिक्षा केली. माझ्या सुदैवाने त्या माराच्या सपाट्यात मी लंगडी किंवा कुबडी झाले नाही ही ईश्वराची कृपा. त्या गोष्टींची आठवण झाली की मनाला किती दुःख होते."
यमुला (आनंदीबाई) तिच्या वडिलांनी जवळच्या शाळेत घातल्या बद्दल लोकांनी केलेली टीका – तात्यासाहेब दिवसेंदिवस विक्षिप्त होत चालले आहेत. मुलीला मंडळीत काय आणतात! अन तिच्याकडून वाचवितात काय! आता या मुलीला शिकवून तिला काय चाकरी करायची आहे?

सासरी मुलींचे होणारे हाल – सासरी मुलींचे अतिशय हाल होतात. मुली लहान असताना त्यांना ओळख नसलेल्या माणसांच्या सहवासात राहावे लागते. सासरची माणसे मुलींना कुजके बोलतात. आपले मनातले बोलता येत नाही. भूक लागली तरी खाण्याची चोरी. झोप आली तरी निजण्याची पंचाईत.

लग्न झाल्यावर गोपाळराव सासरीच रहात असत. रोज रात्री यमुच्या घरची माणसे यमुला गोपाळरावांच्या खोलीत जाण्यास भाग पाडत. यमु काही गोपाळरावांच्या जवळ जात नसे. यमुच्या घरची माणसे म्हणत की यमुला धाकात ठेवा. एक दिवशी रात्री गोपाळरावांनी यमुला काठीने झोडपले. यमुचे अंग काळेनिळे झाले.

अकराव्या वर्षी आनंदीबाईस ऋतुप्राप्ती झाली. त्यावेळी गोपाळराव तिला शिवले. त्यानिमिते आनंदीबाईंची आजी घर सोडून गेली. बाराव्या वर्षी यमुला (आनंदी) मूल झाले. ते दहा दिवसांतच मेले.

आनंदी मुंबईला शाळेत जात असताना आनंदीबाईंच्या पोषाखाची लोकांनी निंदा करावी, त्यांच्याकडे बघून हसावे, घराच्या खिडक्यातून त्यांना निंदास्पद शब्द उच्च्चारावेत आणि त्यांच्यावर खडे फेकावेत.

गोपाळरावांच्या वडिलांचे आनंदीच्या शिक्षणासंबंधी विचार - बायकांच्या जातीला स्वातंत्र्य आणि विद्या काय कामाची?

आनंदीबाईंचे कारपेंटरबाईंना पत्र - आम्हांस बाहेर जावे लागत नाही, सबब आम्ही जोडे कधीच घालत नाही.

सती प्रथा

हिंदू समाजाच्या उच्च जातींत अशी प्रथा होती की जर पत्नीच्या आधी पतीचे निधन झाले तर पतीच्या अंत्यविधीच्या चितेत पत्नीने जाळून जायचे. सती प्रथेविषयी आपले धर्मग्रंथ काय सांगतात? भारतरत्न पां. वा. काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात या विषयावर काही माहिती मिळते. (पृष्ठ २४६ – २४८)

वेदांच्या काळात ही प्रथा प्रचलित होती याला काही आधार सापडत नाही. प्राचीन गृह्यसूत्रांत या विधीचे काही वर्णन केले दिसत नाही. ब्राह्मण ग्रंथात विधवांनी सती जाण्यास स्पष्ट बंदी केली आहे. यावरून ही चाल ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली वागणार्‍या समाजात साधारण दोन हजार वर्षांपूर्वी निघाली असावी. सतीची चाल भारतात इतर प्रांतांपेक्षा बंगालमध्ये जास्त प्रचलित होती. १८१५ ते १८१८ या तीन वर्षांत २३६६ सतीचे प्रसंग नोंदविले गेले. त्यापैकी १४८५ बंगालात होते.

धर्मग्रंथांत विधवेच्या आचारणाचे नियम आहेत. यावरून हे दिसते की अडीच हजार वर्षांपूर्वी सती प्रथेचा प्रचलित नव्हती.

सतीप्रथेविषयी ना. वि. जोशी (पुणे शहराचे वर्णन, १८६८) लिहितात –

कायदा १८३२ साली झाला. तोपर्यंत ही वाईट प्रथा चालूच राहिली. १८२३ साली एक स्त्री सती जात असता तिचे अंग पोळून ती बाहेर निघाली आणि ती नदीकडे पळू लागली. ब्राह्मणांनी तिला पकडून सरणात फेकली आणि त्यावर मोठमोठाले ओंडे टाकून तिचा प्राण घेतला. यानंतर इंग्रज सरकारने लोकास ताकीद दिली ज्या बाईला सती जायचे असेल तिने सरकारात कळवावे आणि जर सरकार हुकूम देईल तर सती जावे. त्यानंतर सती जाताना सरकारचा पहारा उभा असे.


सती
सती

सती जाणे ही क्रूर चाल इंग्रज सरकारने ज्या वेळेस बंद केली त्या वेळेस पुण्यातील ब्राह्मण लोकांस अतिशय दुःख झाले. त्यांस वाटले की आता धर्म बुडाला. विधवा पुष्कळ होतील, अनाचार वाढेल. रस्त्यातून नेहमी विधवेचा अपशकुन होईल. बालहत्या वाढतील. हे अघोर कृत्य इंग्रज सरकारने दयाळू होऊन बंद केले एतदर्थ जरी सनातन्यांस विनाकारण दुःख झाले तरी आताचे लोक इंग्रज सरकारास दुवा देतात.

विधवांची स्थिती

सतीप्रथेविरुद्ध कायदा झाला आणि विधवांचा प्रश्न पुढे आला. विधवांची स्थिती भयंकर होती. बहुतेक विधवांना माहेरी परत पाठविले जाई. पुष्कळ कुटुंबांतून अशा विधवा दिसत. या विधवांना केस कापून आणि अंगावर लाल साडी नेसून राहावे लागे. त्यास आलवण म्हणत. कोणत्याही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्या भाग घेऊ शकत नसत. त्या आश्रितासारख्या माहेरी राहात. त्या जर सासरी राहिल्या तर अवस्था आणखीनच वाईट होई. विधवांवर अत्याचार होत. त्यामुळे काही वेळा गर्भधारणा होई. अशा स्त्रियांना आत्महत्येशिवाय काही पर्याय नसे. अशा स्त्रियांसाठी महात्मा फुले यांनी आश्रम चालू केला.

समाजसुधारकांनी विधवा विवाहासाठी प्रयत्न केले. जे लोक विधवांचे विवाहावेळी हजर असत त्यांना वाळीत टाकले जाई. लोकहितवादींनी विधवा पुनर्विवाह या विषयावर पुष्कळ लिहिले. जेव्हा त्यांच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा मुलाकडच्या बाजूने अशी अट घातली की लोकहितवादींच्या धर्मविरोधी मतांकरिता त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे तरच लग्न होईल. त्याप्रमाणे लोकहितवादींनी प्रायश्चित्त घेतल्यावरच मुलीचे लग्न झाले.

विधवाविवाहाला कायद्याने १८५६ साली संमती देण्यात आली. सतीप्रथा थांबविल्यानंतर समाजसुधारणेचे इंग्रजांनी घेतलेले हे दुसरे पाऊल होते. या कायद्यास 'हिंदू विडो री मॅरेज ॲक्ट' असे नाव होते. विधवाविवाहाची कल्पना स्पष्ट आहे - ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले असेल त्या स्त्रीस दुसरा विवाह करता येतो की नाही?

या बाबतीत आपले धर्म ग्रंथ काय सांगतात? काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात या विषयावर काही माहिती मिळते. काणे वेद, धर्मसूत्रे आणि धर्मशास्त्रे यात या विषयावर काय लिहिले आहे याचे समालोचन करतात.

विधवेची कर्तव्ये आणि हक्क (पृष्ठ २३५ – २३७)

विधवेने आमरण पालन करण्याचे नियम सामान्यत: सर्वच स्मृतींनी सांगितले आहेत. (यावरून स्मृति सतीप्रथा मान्य करत नाहीत असे समजायचे का?) विधवेला तिच्या मृत पतीची मालमत्ता तिच्या हयातीत उपभोगता येईल. विधवा स्त्रीचे दर्शन अशुभ समजत असत. त्यामुळे विधवा स्त्रीला कोणत्याही समारंभात भाग घेता येत नसे. विधवांच्या केशवपनाला वेदांचा आधार नाही. महत्त्वाच्या स्मृतींतदेखील याचा उल्लेख नाही. या रूढीचे ताबडतोब निर्मूलन होणे अगत्याचे आहे.

विधवा विवाह (पृष्ठ २४१ ते २४४)

काणे सांगतात की धर्मग्रंथातील फक्त दोन संदर्भांत विधवाविवाहाला मान्यता दिली आहे. पाच संदर्भांत नकार आहे आणि चार संदर्भ संदिग्ध आहेत. काण्यांचे स्वत:चे मत काय? ते आपले मत देत नाहीत. आजच्या काळाला अनुसरून विधवाविवाह झाले पाहिजेत असेही विधान करीत नाहीत. १८५६च्या कायद्याचा ते उल्लेख करतात. पण तो कायदा योग्य आहे असेही ते म्हणत नाहीत.

बालविवाह

धर्मशास्त्राप्रमाणे बालिका ऋतुमती होताच विवाह झाला पाहिजे. याज्ञवल्क्य स्मृतीत एक श्लोक आहे –

अथ ऋतुमती भवति दाता प्रतिग्रहिताच नरकम प्राप्नोती

कन्या ऋतुस्नात झाल्यानंतर ती देणारा आणि घेणारा दोघेही नरकात जातात. यावरून असे दिसते की अतिप्राचीन काळापासून बालविवाह ही प्रथा चालू होती. त्याचा परकीय आक्रमणांशी संबंध नव्हता.

स्त्रियांचे विवाहावेळचे वय या बाबतीत आपले धर्मग्रंथ काय सांगतात? काणे यांच्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात या विषयावर काही माहिती मिळते.

ऋग्वेदाच्या काळी मुलींची लग्ने कोणत्याही वयात होत असत. धर्मसूत्राच्या काळात लग्ने रजोदर्शनाच्या जरा अगोदर करण्यात येत. मनूने म्हटले आहे की तीस वर्षे वयाच्या पुरुषाने बारा वर्षे वयाच्या मुलीबरोबर विवाह करावा. महाभारतात वर आणि वधू यांची वये ३० आणि १० अथवा २१ आणि ७ अशी प्रशस्त असल्याचे सांगितले आहे. मुलीचे विवाह ८ ते १० वर्षांच्या दरम्यान केले पाहिजेत हा नियम सातव्या शतकात सर्वमान्य झाला आणि तो आधुनिक काळापर्यंत चालत आला.

आपण ज्या शतकाचा विचार करीत आहोत त्या काळात विवाह त्याआधीच म्हणजे आठ ते दहा वर्षांत होत असे. चौदाव्या किंवा पधराव्या वर्षी गर्भधारणा हा प्रकार सामान्य होता. अशा लहान वयात आई आणि बाळ यांच्या दोघांच्या जीवाला धोका असे. बालविवाह प्रतिबंधक कायदा फार नंतर – १९३८ साली आला.

दलित स्त्रिया

दलित वाङ्‌मयातून स्त्रियांचे जे चित्र दिसते ते भयंकर आहे. लक्ष्मण माने यांच्या उपरा या आत्मचरित्रात भटक्या जातींच्या जीवनाचे कथन आहे. त्यात ज्या प्रसंगांचे वर्णन आहे त्यावरून असे चित्र उभे राहते.

रोज आंघोळ करण्याची पद्धत / जरूरी नव्हती. रोज आंघोळ करून आणि केस विंचरून स्त्री व्यवस्थित दिसली तर तिला गावगुंडांपासून धोका असे. घाणेरडे राहणे आणि घाणेरडे दिसणे यांमुळे स्त्रिया सुरक्षित राहत..
तरुण मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना मारून टाकले जाई.
नवर्‍याने बायकोला छोट्या कारणावरून मारहाण करणे हा प्रकार सहज नेहमी घडणारा असे.
बालविवाह हाच नियम. साधारण दहा-बारा वर्षांच्या मुलींचे लग्न लाऊन दिले जाई.
पैशांची गरज पडली तर बायको दुसर्‍याकडे गहाण ठेवली जाई. पैसे परत केले की बायको परत मिळे. बायांची जात आणि गुरांची जात एकच समजली जाई.
शिवारातल्या कुंपणाच्या काठ्या घेतल्याबद्दल मान्यांच्या आईचे कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली.
बायका रस्त्याच्या कडेला झोपडीत प्रसूती करीत. शेजारच्या झोपडीतली बाई येऊन मदत करे. प्रसूतीनंतर आठ दिवसांनंतर गाढवावर बिर्‍हाड लादून पुढच्या मुक्कामास कुटुंब जाई.

मान्यांनी वर्णन केलेली, वर उल्लेखिलेली स्थिती १९३० ते १९५० या कालखंडातील आहे. आपण विचार करीत आहोत त्या कालखंडात स्थिती याहून भयंकरच असणार.

स्त्रिया आणि अंधश्रद्धा

पुरुषांपेक्षा स्त्रिया अंधश्रद्धेला जास्त बळी पडतात असे दिसते. आपण आता ज्या विश्वासांना अंधश्रद्धा समजतो त्या रूढी त्या काळी स्त्रियांच्या श्रद्धेचा विषय होत्या. स्त्रियांचे शिक्षण पुरुषांच्या मागून सुरू झाल्याने या अंधश्रद्धा जास्त काळ चालू राहिल्या.

स्त्रियांवर अंधश्रद्धेचा सर्वांत वाईट परिणाम देवदासी प्रथेमुळे झाला. ही प्रथा दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, आन्ध्र आणि तामिळनाडूत आहे. National Commission for Women यांच्यासाठी देवदासी प्रथेवर एक रिपोर्ट बनविण्यात आला. (Exploitation of Women as Devadasis and Associated Evils) या रिपोर्टप्रमाणे ही प्रथा गरिबीतून चालू राहिली आहे. जास्त मुली Scheduled Caste वर्गातील आहेत. महाराष्ट्रात येल्लम्मा देवीला साकडे घातले जाते. काही प्रश्न निर्माण झाला आणि तो सुटला तर एक मुलगी देवीस देईन असे बोलले जाते. अर्थातच मुलीच्या संमतीचा प्रश्नच नसतो. तरुण मुलीचे देवाबरोबर लग्न लाऊन दिले जात असे. त्यानंतर घर सोडून त्या मुली देवळात राहू लागत. तेथून बाहेर जाण्याचा एकाच मार्ग - वाममार्ग. ही प्रथा काहीशे वर्षे चालू आहे.

इंग्लंडमधील स्त्रियांची स्थिती

याच कालखंडात इंग्लंडमध्ये स्त्रियांची स्थिती कशी होती? इंग्लंडमधील समाजात तीन वर्ग होते. उच्च आणि मध्यम वर्गांतील स्त्रियांची स्थिती सारखीच होती. १८५७पर्यंत स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नव्हता. पुरुष बायकोला घटस्फोट देऊ शके पण स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नव्हता. स्त्रियांचे शिक्षण आपण ज्याला प्राथमिक शिक्षण समजतो तेवढेच होत असे. स्त्रियांसाठीचे पहिले कॉलेज १८४८ साली चालू झाले. स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो अधिकार १९१८ साली मिळाला. स्त्रियांचे लग्नाचे वय साधारण २० ते २५ असे. विधवाविवाह होत असत.

नोकरी-उद्योगात परिस्थिती निराळी होती. औद्योगिक प्रगती सुरू झाल्यावर कापड उद्योग आणि कोळसा खाणींतून खालच्या वर्गातील स्त्रियांनी काम करणे चालू केले होते. मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी श्रीमंत घरातून मुलांसाठी गव्हर्नेस आणि नर्सिंग ही दोनच क्षेत्रे उपलब्ध होती. फ्लॉरेन्स नायटिंगेल याच काळातील; त्यांना आधुनिक नर्सिंग सुरू करणारी व्यक्ती समजले जाते. उच्च वर्गातील स्त्रिया घर सांभाळणे या पलीकडे काहीच काम करीत नसत.

इंग्लंडमधील समाजात वर्ग होते पण जाती नव्हत्या. एकंदरीत पाहता असे म्हणता येईल की त्याच कालखंडात इंग्लंडमधील समाजातही पुरुष आणि स्त्रिया यात विषमता होती पण तरीही स्त्रियांची स्थिती भारतातील समाजापेक्षा चांगली होती.

निष्कर्ष

१८१८ साली समाजामध्ये स्त्रिया आणि अस्पृश्य यांची स्थिती सारखीच होती. स्त्रिया घरात होत्या आणि अस्पृश्य गावाबाहेर होते. दोघांचे हाल तेच. स्त्रियांवर अन्याय त्यांच्या जन्मापासून चालू होई. मुलगी जन्माला आली हे नको असे. कुटुंबाला ते ओझे वाटे. मुलीला शिक्षण देण्याचा प्रश्नच नव्हता. मुलगी ऋतुमती होण्याधीच लग्न केले जाई. ऋतुप्राप्ती झाल्यावर तिला सासरी पाठविले जाई. त्यानंतर इच्छा नसताना आणि शरीर तयार नसताना गर्भधारणा होई. पुष्कळ मुलींचे बाळंतपणात मृत्यू होत. या सर्व दिव्यातून मुली बाहेर पडल्या आणि पतीचे आधी निधन झाले तर सती या भयंकर प्रकारे स्त्रियांचे प्राण घेतले जात. सतीप्रथा बंद झाल्यावर विधवा अवस्था पुढे उभी असे. हे सर्व नियम आणि रूढी कोणी केल्या? तत्कालीन पुरोहितांनी!
या सर्व परिस्थितीत १९२०पर्यंत बराच बदल झाला सतीप्रथा जवळजवळ बंद झाली. हळूहळू विधवा पुनर्विवाह चालू झाले. मुलींच्या शिक्षणाला विरोध थोडा कमी झाला. शिक्षण प्रभागाच्या रिपोर्ट प्रमाणे १९००-१९०१ साली अठरा वर्षांखालील मुलींपैकी १% मुली शाळेत जाऊ लागल्या होत्या; या आकड्याकडे निराळ्या दृष्टीतून पाहू. भारताची लोकसंख्या त्यावेळी २५ कोटी होती. त्यात पाच कोटी मुली शाळेत जाण्याच्या वयात असतील. त्यांच्यातील एक टक्का म्हणजे पाच लाख मुली १९०० साली शिक्षण घेत होत्या. ही चांगलीच सिद्धी म्हणायची. २०११च्या जनगणनेप्रमाणे ६५% स्त्रिया साक्षर आहेत, हा शंभर वर्षात झालेला बदल!

पुढच्या भागात भाग १२मध्ये स्त्रियांच्या स्थितीत सुधारणाचे जे प्रयत्न झाले त्याचा आढावा घेऊ.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

बाटा इंडिया भारतात १९३० पासून आहे. त्यांच्याकडे त्याकाळातल्या स्त्रियांच्या (आणि एकंदर) पादत्राणांच्या विक्रीचे आकडे असावेत. थोडं अवांतर, आर्थिक परिस्थितीमुळे निम्न स्तरातल्या कुटुंबात, पुरुषांची पण चप्पल खरेदी म्हणजे फारफार तर रबरी पादत्राणे (स्लिपर्स) हेच समीकरण गेल्या काही दशकापर्यंत होते. गेल्या एक-दोन दशकात जसजसा अतिरिक्त खुळखुळणारा पैसा वाढत गेला तसा उच्च मध्यम शहरी वर्ग इतर ब्रँड कडे वळला (नायकी, अदिदास, इ.) आणि रिलॅक्सो सारख्या कंपन्यांनी कल्पकतेने नवनवीन पादत्राणे आणून आणि मार्केटींग, ब्रँड बिल्डींग करून बाटाच्या मध्यमवर्गाला आपल्याकडे खेचले. त्यामुळे रिलॅक्सो सारखे समभाग गेल्या काही वर्षात मल्टीबॅगर्स झाले.

सध्या मी १९ व्या शतकातल्या कादंबर्‍या वाचतोय. (माझं तसही कादंबरी वाचन फार तोकडं आहे). हेतू इतकाच की "काळ उलगडणार्‍या पुस्तकातून" गतकाळाचा अंदाज यावा.

वुदरींग हाईट्स (१८४७ ची कादंबरी पण गोष्टीचा काळ १८०१ च्या आसपास आहे) मध्ये नली हे पात्र आहे. ही आया आणि संपूर्णवेळ घरगडी म्हणून काम करते. पण तिला कमी दर्जाची वागणूक दिली जात होती असे वाटत नाही. उलट ती घरातलीच एक सदस्य आहे असे वाटते अपवाद फक्त एका ठिकाणी कॅथरीन तिला आपल्या रूम मधून जायला सांगते तेव्हा. (चूक तशी नलीचीच असते, कारण तिला खाजगी संभाषण ऐकायचे असते). पण एकंदर या घरगडी काम करणार्‍या स्त्रियांचे वैयक्तिक आयुष्य कसे होते? त्या अनाथ होत्या का? यावर कादंबरितून काही मिळत नाही. याउलट जमिनदार वा उच्चवर्गीय घरातल्या स्त्रियांना शारीरिक हाल-अपेष्टा फारशा नसल्याने त्यांचे आयुष्य त्या मानाने सुकर असावे असे वाटते.

प्राईड आणि प्रेज्युडस (१८१३) यात कादंबरीच्या मुख्य स्त्री पात्राच्या आईची चिंताच मुळी जॉर्जियन काळात स्त्रियांना वारसा हक्क नसल्यामुळे आहे. त्यामुळे या आईला आपल्या सगळ्या लेकींचे लग्न आर्थिक सुबत्तता असलेल्या पुरुषांबरोबर लावून द्यायचे आहे. नाहीतर त्यांच्या पाश्चात त्यांच्या मुलींना राहते घरही मिळणार नाही. पण स्त्रियांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. गावात होणारे बॉल डान्स हा प्रियकर शोधण्याचाच एक प्रकार वाटतो. पण काही कारणात्सव घरच्यांचा विरोध असेल तर पळून जाउन लग्न करणे हा पर्याय असला तरी त्यामुळे कुटुंबाची मानहान होत असावी. (खास करून धाकट्या मुलीने पळून जाउन लग्न केले तर थोरलीच्या लग्नात अडथळे येऊ शकतात, मधल्याकाळात असे भारतात पण दिसायचे)

ग्रेट एक्स्पेक्टेशन्स (१८६० मध्ये लिहिलेली कादंबरी पण कथेचा काळ साधारण १८३० असावा) यात सामान्य गृहीणी (आर्थिक दृष्ट्या सामान्य, जमिनदार नसलेल्या, उदा. मिसेस गार्गरी) स्वातोंत्र्यत्तर भारतातल्या शहरी वर्गातल्या गृहीणीप्रमाणे, धुणी भांडी, कपडे, जेवण इ. घरकामामध्ये व्यस्त दिसते. अशी गॄहिणी साक्षर असेलही कदाचित पण उत्तम लिहिता वाचता येत असेल असेही नाही. आणि समजा उत्तम लिहिता वाचता येत असले तरी, खेडेगावात (लंडन पासून दूर) असेल, अनाथ असेल (मिस. बिडी) तर अर्थार्जनाच्या (व्हाईट कॉलर जॉब) फारशा संधीही नसाव्यात. पण उच्च वर्गातल्या स्त्रियांना दूरच्या ठिकाणी जाऊन उत्तम शिक्षणाची संधी मिळत होती. (मिस. एस्टेला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या सती प्रथेचा उदो उदो केल्या जातो त्या प्रथेचा समजतील 99 टक्के लोकांशी काहीही संबंध नव्हता. सती प्रथा अपवाद होती.
स्त्री शिक्षणाचे म्हणाल तर मुगल काळात जिथे जिथे मुगलांचा प्रभाव होता भीती मुळे स्त्री शिक्षण कमी झाले .बाकी ईस्ट इंडिया कंपनी ने 1830 नंतर केलेल्या सर्वेनुसार देशात 6 लाख गुरुकुल होते. 70 टक्के हून जास्त शिक्षक ब्राहमणेत्तर (ब्राह्मण बनिया ईत्यादी सोडून) होते. वर्धमान जिल्ह्यात 6 शिक्षक चांडाळ जातीचे होते. केरळाच्या मलबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेणारे 70 टक्के विद्यार्थी दलित होते. सारांश गुरुकुलांत सर्व जातीचे विद्यार्थी शिकायचे शिक्षणात भेतभाव नव्हता. (The Beautiful Tree) या पुस्तकांत सर्वेचे सर्व आकडे आहेत. ऑनलाइन फ्री वाचता येईल. सारांश मेकालेने शिक्षण पसारविण्यासाठी ब्रिटीशांनी गुरुकुल नष्ट केले. पण नवीन शाळा उघडल्या नाहीत. परिणामी गावांत राहणारा प्रमुख रूपेण दलित समाज शिक्षणापासून वंचित झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0

आपल्या प्रतिसादात स्त्रियांच्या शिक्षणाची टक्केवारी दिलेली नाही, ती द्याल का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सती जाण्याची प्रथा सर्रास नव्हती हे मात्र सत्य आहे अपवाद काहीच ठिकाणी असावी.
माझी स्वतःच्या खानदान च्या चार पिढ्यांचा इतिहास माहीत आहे
म्हणजे 200 वर्ष पूर्वी चा .कोणी सती गेले नाही.
विवेक पटाईत ह्यांच्या शी ह्या बाबत सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तुमचे शेजारी, त्यांचे शेजारी, त्यांच्या शेजाऱ्यांचे शेजारी - ह्यांचं काय?
130 कोटींपैकी एक अशा तुमच्या घराण्यात जे घडलं नाही, त्यावरून उर्वरित भरताबद्दलही तेच लागू करणं बरोबर आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0