ब्लूज संगीत अल्प परिचय
ब्लूज संगीत अल्प परिचय
पाश्चात्य जगात समाजमान्य/रूढ, परंतु भारतात ज्या संगीतप्रकाराबद्दल फारशी माहिती नाही,अशा ब्लूज संगीताबद्दल सामान्य माहिती / तोंडओळख करून देण्यासाठी हे टिपण. या टिपणात क्लिष्ट सांगीतिक माहिती न देता, या संगीतप्रकाराचा उगम, कारणे, प्रसार व प्रभाव यावर थोडी माहिती देत आहे.
गेली किमान शंभर दीडशे वर्ष अस्तित्वात असणारा आणि गेल्या शतकभर पाश्चिमात्य संगीतातील अनेक संगीतप्रकारांवर प्रभाव टाकणारा संगीतप्रकार म्हणजे ब्लूज संगीत.
ब्लूज संगीत एका अर्थाने अमेरिकेतील शोषित वंचित लोकांचं, म्हणजे आफ्रिकेतून अमेरिकेत नेलेल्या, गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांचं किंवा गुलामगिरीवर बंदी आल्यानंतरही आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अत्यंत तळाला राहिलेल्या गुलामांच्या पुढच्या पिढ्यांनी निर्माण केलेलं संगीत. एका दृष्टीने अमेरिकेतील काळ्या लोकांचं संगीत हे.

एक वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा म्युझिकल फॉर्म म्हणून ब्लूज साधारणपणे गुलामगिरीचा काळ संपला त्या काळात, म्हणजे साधारणपणे १८६०च्या दरम्यान पुढे आला.परंतु रेकॉर्डेड फॉर्ममध्ये हे संगीत येण्यास १९१२ उजाडले.
ब्लूज हा मुख्यतः गेय प्रकार आहे. संगत करणारा वाद्यवृंद हा कमी महत्त्वाचा. घटनाकथन, कथा, आख्यान वगैरेपेक्षा भावना व्यक्त करण्यावर ब्लूजमध्ये भर असतो.
सामान्यपणे खडतर व असहाय्य जीवन असल्यामुळे 'आर्त' भावना या संगीतात जास्त. याचे एक उदाहरण म्हणून हे गाणं "मूड इंडिगो" (हे क्लासिक ब्लूज नाही, हे आहे जॅझ स्टँडर्ड ब्लू)
गरिबी व साधनांचा अभाव यामुळे सुरुवातीच्या ब्लूजमध्ये वाजवली जाणारी वाद्ये म्हणजे माऊथ ऑर्गन (हार्मोनिका), किंवा बँजो, खुळखुळे, क्वचित फ्लूट आणि मिळतील त्या प्रकारचे ड्रम्स.
त्यापूर्वीच्या काळात तर पैसे नसल्याने कलाकार स्वतःच वाद्ये तयार करून त्याचा वापर करत उदा. डीडली बो नावाचं एकतारी तंतुवाद्य, वॉशबोर्ड (ताल/लयीसाठी वापरला जाणारा फळा) वगैरे.

डीडली बो
तत्कालीन प्रस्थापित गोऱ्या समाजाचे संगीत हे खूप वेगळे असे. या गोऱ्या संगीतावर युरोपीय संगीत (शास्त्रीय आणि सुगम) व गोऱ्या अमेरिकन कंट्री संगीताचा प्रभाव जास्त असे.
अमेरिकेच्या (USA) दक्षिण भागात, जिथे गुलामगिरी जास्त प्रमाणात होती त्या भागात म्हणजे मिसिसिपी डेल्टा भागात ब्लूजची सुरुवात झाली. (या भागात शेती भरपूर आणि त्या शेतीत अपरिमित राबणारे आफ्रिकन मजूर हे या ब्लूजचे जनक).
हे आफ्रिकन वंशाचे मजूर अशिक्षित व शोषित. त्यांच्या या तत्कालीन परिस्थितीचे प्रतिबिंब ब्लूज कवनांमध्ये दिसते.
सुरुवातीच्या ब्लूजमध्ये मुख्यतः अडाणी पीडित गुलामांचं अध्यात्मिक संगीत असे. उदा :
Do, Lord,
do, Lord,
Lord, remember me Hallelujah
Oh, when I'm in trouble,
Down on my knees,
When I was in trouble,
Lord, remember me,
अशा पद्धतीची देवाची आळवणी करणारी गाणी, वर्क सॉंग्स, फिल्ड हॉलर्स इत्यादीचा भरणा असे.
सुरुवातीच्या काळातील ब्लूजमध्ये मुख्यतः AAB किंवा AAAB पद्धतीच्या रचना असत. म्हणजे एकच ओळ दोनदा किंवा तीनदा म्हणाली जाई आणि त्यानंतर दुसरी ओळ स्वतः गायक किंवा कोरस म्हणत असे.
उदाहरणार्थ बी बी किंग नावाच्या प्रख्यात कलाकाराचे लोकप्रिय गाणे :
Thrill is gone
The thrill is gone away
The thrill is gone, baby
The thrill is gone away
You know you done me wrong, baby
You'll be sorry
Someday
यानंतरच्या काळात जुलूम, अत्याचार दडपशाहीपासून लांब व बरे जगण्याच्या संधी उपलब्ध असणाऱ्या जागांकडे या वर्गाचे स्थलांतर होत गेले. जसजसे हे होत गेले तसतसे त्याचे प्रतिबिंब ब्लूजमधे येऊ लागले.
जुलूम, त्यातून जगवण्यासाठी देवाची आळवणी, कष्टप्रद जीवन इत्यादी विषयांकडून स्थलांतर, नवीन, तुलनेनं बऱ्या जागेची ओढ इत्यादी विषय डोकावू लागले.
याच काळानंतर अत्यंत बेसिक अशी वाद्ये मागे पडून गिटार, सॅक्सोफोन, डबलबेस / बेस गिटार, आणि पियानो हेही ब्लूजमध्ये रूढ झाले.
ब्लूज संगीताचा प्रभाव अमेरिकेत नंतरच्या काळात उदयाला आलेल्या आलेल्या बहुतांश संगीत प्रकारांवर पडला. जॅझ, रॉक अँड रोल, रिदम अँड ब्लूज, रॉक, एवढेच काय तर अगदी तसे तुलनेने नंतर आलेले हिपहॉप यावरही ब्लूज संगीताचा प्रभाव आहे.
ब्लूज हा संगीत फॉर्म जरी अतिशय जुना म्हणजे साधारण शंभर वर्षांपूर्वीचा असला तरीही नंतरच्या काळातील अनेक मोठमोठे कलाकार त्याचे ऋण जाहीरपणे मान्य करतात. एल्विस प्रिसली, रोलिंग स्टोन्स, एरिक क्लॅप्टन, जॉन लेनन इत्यादी १९५० ते १९७०च्या दशकांमधील कलाकार ब्लूज संगीताचा आपल्या संगीतावर पडलेला प्रभाव जाहीरपणे मांडतात.१९५०-६०नंतर ब्लूज हे फक्त आफ्रिकन अमेरिकन लोकांपुरते मर्यादित असे संगीत राहिले नाही. या काळानंतर हे अमेरिका युरपमधील मेनस्ट्रीम संगीताचा भाग झाले, ग्लोबल संगीत झाले.
ब्लूज संगीत उदयाला आले USA च्या दक्षिण भागात. परंतु या भागात आफ्रिकन अमेरिकन लोकांचे शोषण फार. शिवाय जिम क्रो सारखे उघड वर्णभेद करणारे कायदे आणि आफ्रिकन अमेरिकन लोकांना प्रगती करण्याची संधी अत्यंत कमी. म्हणून या दक्षिण भागातून उत्तरेकडे(जिथे असले कायदे नव्हते,वर्णविद्वेष कमी होता आणि प्रगतीच्या संधी जास्त होत्या) आफ्रिकन अमेरिकन लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. आधी तुरळक पण १९१०-१९७० च्या काळात मोठ्या प्रमाणावर. एकंदरीत साठ लाख आफ्रिकन अमेरिकन लोकं स्थलांतरित झाली. हा समाज जिथे गेला तिथे आपले संगीत बरोबर घेऊन गेला आणि मग जिथे यांचे स्थलांतर झाले त्या जागांवर ब्लूजच्या स्थानिक स्टाईल्स निर्माण झाल्या (जसं शिकागो ब्लूज,मोटाऊन ब्लूज, वेस्ट कोस्ट ब्लूज, कंट्री ब्लूज वगैरे) दक्षिणेतील आफ्रिकन अमेरिकन लोकांबरोबरच गरीब असे गोरे लोकही ब्लूज संगीत करू लागले. नंतर जास्त व्यापक गोऱ्या समाजातही ब्लूज संगीत पसरू लागले तेव्हा, म्हणजे १९६०-७०च्या दशकात ब्लूज रॉक हाही एक ब्लूज चा प्रकार लोकप्रिय होऊ लागला.
हेच गाणे नंतर एल्वीस प्रिसलीनेही रेकॉर्ड केले.
ब्लूज संगीतातील काही जुनी गाणीही खूप लोकप्रिय होती आणि नंतरच्या काळातही त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली. अशा गाण्यांना 'ब्लूज स्टँडर्ड' अशी संज्ञा आहे.
आफ्रिकन अमेरिकन माणसांचा मग ते कुठल्याही सामाजिक स्तरातील असला (श्रीमंत / गरीब) तरी एक भावनिक कनेक्ट या जुन्या गाण्यांशी असतो. उदा. रॉबर्ट जॉन्सनचे १९३६ सालचे 'स्वीट होम शिकागो' हे गाणे.
याचे एक गंमतशीर उदाहरण द्यायचे झाले तर २०१२च्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी (व्हाईट हाऊसमध्ये) 'ऑल स्टार्स ब्लूज' नावाचा कार्यक्रम झाला. यात ब्लूज संगीत करणारे मोठेमोठे कलाकार (बी बी किंग, बडी गाय, मिक जॅगर, जेफ बेक इत्यादी) होते. या कार्यक्रमात थोडा आग्रह केल्यावर राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनीही 'स्वीट होम शिकागो' हे गाणे गायले.
१९६०-७०च्या काळानंतर ब्लूज संगीत जगभर पसरले. अनेक प्रस्थापित कलाकार ब्लूज किंवा ब्लूजचा प्रभाव असलेली गाणी करू लागले.
इतकेच काय, तर एकेकाळच्या अमेरिकेतील दक्षिण भागातील वंचित शोषित असलेल्या या लोकांच्या संगीताचे मोठमोठे फेस्टिवल्सही होऊ लागले.
एरिक क्लॅप्टन हा एक मोठा कलाकार. हा अनेक वर्षे क्रॉसरोडस गिटार फेस्टिवल नावाचा कार्यक्रम भरवतो. यात जुन्या नव्या मोठमोठ्या कलाकारांना पाचारण करतो आणि एक अनौपचारिक स्वरूपात सर्व कलाकार आपली कला सादर करतात.
भारतातही ब्लूज संगीताचे चाहते आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरपर्सन आनंद महिंद्र हे त्यातील एक. गेली काही वर्षे ते महिंद्रा ब्लूज फेस्टिवल मुंबईत भरवतात. या वर्षीही मार्च महिन्यात हा फेस्टिवल पार पडला. या कार्यक्रमात जगभरचे उत्तमोत्तम जुने नवे कलाकार आपली कला सादर करतात.
पुण्यातही कोरेगाव पार्कातील शिशा कॅफेमध्ये ब्लूज अँड जॅझ क्लब काही काळ होता (सध्या सुरू आहे का ते माहीत नाही).
संदर्भ म्हणून ब्लूज संगीतातील मोठ्या कलाकारांची यादी इथे देत आहे. सर्वांची गाणी युट्यूबवर उपलब्ध आहेत.
१. बी बी किंग
२. मडी वॉटर्स
३. रॉबर्ट जॉन्सन
४. जॉन ली हुकर
५. स्टिव्ही रे व्हॉन
६. बडी गाय
७. जिमी हेंड्रिक्स
८. ब्लाईंड लेमन जॉन्सन
९. बो डीडली
१०. एरिक क्लॅप्टन
११. बेसी स्मिथ
१२. रे चार्ल्स
व इतर अनेक.
हा झाला या संगीतप्रकारासंबंधी दिलेला अल्प परिचय.
या संगीतप्रकारात जास्त रुची कुणा वाचकाला असल्यास धागा पुढे चालवता येईल.
प्रतिक्रिया
वा!
वा वा! जबरदस्त. ब्लूजशी फारचा परिचय नाही आहे, पण आता एकेक करून ऐकून बघतो. मागे तुम्ही रॉकसंगीताबद्दलचा धागा काढला होता तेव्हापासून मार्क नॉफलर/डायर स्ट्रेट्सची बरीच गाणी ऐकली आहेत.
बाकी कृष्णवर्णीयांचं संगीत गाणारा क्लॅप्टन हा इंग्लंड फक्त गोऱ्यांसाठी, काळ्यांना घालवा छाप बडबडतो असं ऐकलं आहे.
क्लॅप्टनचे लॉजिक काही कळत
क्लॅप्टनचे लॉजिक काही कळत नाही.गंडलेलं आहे बऱ्याच बाबतीत. गेल्या वर्षी त्याने लसीच्या विरोधीही भूमिका घेतली होती.
पण तो वेगळा विषय. ब्लूज/ रॉक अँड रोल संबंधित दिग्गज आफ्रिकन अमेरिकन कलाकारांशी तो अतिशय जिव्हाळयाने वागत असावा असे त्याच्या कार्यक्रमांमधून वाटते
.
वाह! फारच सुंदर परिचय.
स्वीट होम शिकागो आवडतं आहे. मी अमेरिकेत असताना आमच्या शहरापासून शिकागो जवळ असल्याने आम्ही मित्र मैत्रिणी अनेकदा वीकेंडला शिकागोला जायचो. तिथले ब्लूज बार फार आवडायचे.
सॅम कुकचं A change is gonna come हे गाणं तुम्ही सुरुवातीला जी परिस्थिती वर्णन केली आहे त्याचं उदाहरण आहे. त्याला एका 'व्हाइट्स ओन्ली' हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी नाकारली होती. त्या प्रसंगानंतर आणि स्वतःच्या आयुष्यातील अशा अनेक घटनांबद्दल त्यानं हे गाणं लिहिलं. पण मला माहिती नाही की ते अगदी थेट ब्लूज या प्रकारच्या मोडतं का. ते गाणं आणि नंतर अनेक वर्षांनी न्यू ओर्लिन्सच्या जॉन बूटीने परत गायलेलं तेच गाणं ही दोन्ही मला खूप आवडतात.
https://www.youtube.com/watch?v=fPr3yvkHYsE (सॅम कूक)
https://www.youtube.com/watch?v=BU1GfIxT1jQ (जॉन)
हे ' ब्लुजोत्तर ' वाटते.
हे ' ब्लुजोत्तर ' वाटते. ब्लूजच्या काळाबद्दल आहे. स्टाईलही तशीच आहे . पण ब्लूज मध्ये एवढे ऑर्केस्ट्रेशन नसते.
एवढे लिहून मी खाली बसतो.
लेख आवडला. शिकागो परिसरात
लेख आवडला. शिकागो परिसरात राहात होतो तेव्हा काही वेळा ब्लूज बार्समध्ये गेलो होतो. पण इतक्या जुन्या काळच्या आठवणी त्या बारच्या वातावरणाप्रमाणेच धुरकट आहेत.
ब्लूज, सोल आणि जाझ यांच्या परस्परसंबंधांवर लिहाल का काही?
ब्लूज, सोल आणि जाझ यांच्या
ब्लूज, सोल आणि जाझ यांच्या परस्परसंबंधांवर लिहाल का काही?
फार मोठा विषय गुरुजी . बघुयात जमते का ते.
Etta James
https://www.youtube.com/watch?v=cZag0E32is0
आभार.
धाग्याबद्दल आभार. येते किमान काही आठवडे बहुतेक ब्लूज ऐकत ऐकत कामं करेनसं दिसतंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख
लेख आवडला. पण पाश्चात्य संगीत फारसे ऐकले नसल्यामुळे कनेक्ट होता आले नाही. पाश्चात्य संगीत ऐकण्यांत मला जो अडथळा वाटतो तो सुरांचा नाही तर शब्दांचा. शब्द कळले नाहीत तर खरा आस्वाद घेता येत नाही. इंग्रजी चित्रपट बघतानाही हाच अडथळा होता. पण पुढे सबटायटल्स आल्यावर तो प्रश्न सुटला.
ब्लूजची ओळख आवडली
ब्लूजची ओळख आवडली. मी प्रचलीत पॉप संगीतप्रेमी आहे. नवीन वर्ष नवीन गायक, नवीन बँड. फार क्वचित २-३ वर्षापूर्वी ऐकलेलं पॉप पुन्हा ऐकतो.
माझ्या डोक्यात कृष्ण्वर्णीय संगीत आणि रॅप याची सांगड आपसूक झाली होती. पण काळ खूप पुढे गेला आहे. जसं ब्ल्युज कृष्णवर्णीयेतरांनी स्विकारलं तसं आलिकडे रॅप कृष्णवर्णीयेतरही गातात. पूर्ण रॅप गाण्याचा चाहतावर्ग मर्यादीत असावा पण पॉप संगीतातल्या छोटाश्या तुकड्यात एखाद रॅपर हमकास असतो. जो बर्याचवेळा कृष्ण्वर्णीय असतो/असते. बरीच गाणी आहेत पण चटकन आठवले ते मरून५-कार्डी बी चं गर्ल्स लाईक यू , आणि डुआ लिपा-डाबेबी चं लेव्हिटेटींग