प्रज्ञावंत पिकासो

प्रज्ञावंत पिकासो

अतुल देऊळगावकर

माधुरी पुरंदरे लिखित 'पिकासो' पुस्तकाचा अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेला परिचय विश्वकर्मा पब्लिकेशन्सकडून लवकरच येत असलेल्या ‘ग्रंथांचिया द्वारी’ पुस्तकातून.

२५ ऑक्टोबर १८८१ ते ८ एप्रिल १९७३ असं प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या जगद्‌विख्यात कलावंतानं स्वत:विषयी सांगितलं होतं, ‘माझ्या नावाची विश्वकोशात नोंद असेल, ‘स्पॅनिश कवी, ज्यानं चित्रकला, रेखाटन आणि शिल्पकलेतही लुडबुड केली.’ मात्र ‘एनसायक्लोपिडिया ब्रिटानिका’मध्ये त्याच्याविषयीची नोंद आहे, ‘पाब्लो पिकासो - स्पेनचा राजकीय निर्वासित - चित्रकार, शिल्पकार, नेपथ्यकार, मुद्राचित्रकार, मातकामकार (सिरामिस्ट), विसाव्या शतकातील महान व प्रभावशाली कलावंत!’

अतीव, सरसकट, नको तिथे व नको तितके वापरून गुळगुळीत करून टाकलेल्या अनेक शब्दांपैकी ‘क्रांती’ हा एक आहे. भाषा, जात, धर्म, प्रदेश अशा सर्व सीमा (खरं तर इतिहास, भूगोलसुद्धा) ओलांडून बदल घडवते, ती क्रांती! ज्यामुळे त्याआधी व त्यानंतर असे दोन कालखंड निर्माण होतात, ती क्रांती. पिकासोबाबत हे सर्व अर्थ स्पष्टपणे प्रतीत होतात. संपूर्ण कलाक्षेत्राला बदलवून टाकणाऱ्या ह्या प्रज्ञावंताचं नाव तुम्हाला माहीत असो वा नसो, त्याची कला मात्र तुमच्यापर्यंत येऊन थडकलेली असते. ही ‘पिकासो’ची देण आहे.

चित्रकला, गायन, नर्तन, अभिनय व लेखन या बहुविध कलांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या माधुरी पुरंदरे यांनी प्रथम मुंबईतील ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ व नंतर पॅरिस येथे चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचं शिक्षण घेतलं. पुढे अनेक वर्षे त्यांनी ‘आलीऑंस फ्रांसेज’ संस्थेमध्ये फ्रेंच भाषा अध्यापनाचं कार्य केलं. ‘कोसला’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘बलुतं’ अशा दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे, तर ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘लस्ट फॉर लाइफ’, ‘हॅनाज सूटकेस’ अशी जगप्रसिद्ध पुस्तकं मराठीत आणली आहेत. महान चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग यांच्या ‘लस्ट फॉर लाईफ’ या चरित्राच्या अनुवादानंतर त्यांनी स्वतंत्रपणे मराठीत लिहिलेलं क्रांतिकारक चित्रकार पिकासो याचं चरित्र सादर केलं आहे.

Picasso - Madhuri Purandare

मुखपृष्ठ : जयंत भीमसेन जोशी

साहित्य असो, चित्र, संगीत, नृत्य, शिल्प वा वास्तुकला, या कला आपल्याशी संवाद साधत असतात. त्या समजून घेण्यासाठी आपणही काही प्रयत्न करावे लागतात. त्या कलांचा वारंवार आस्वाद घ्यावा लागतो. असं केलं तरच कलावंत आणि समाज यामध्ये संवाद होऊ शकतो. आपल्याकडे चित्रकला तर कायमच उपेक्षित राहिली आहे. चित्रकारांवर आलेल्या पुस्तकांचीही संख्या अतिशय नगण्य आहे. यातून ‘आपल्याला चित्र काही कळत नाही बोवा.’ असं सतत सांगून संग्रहालयाला भेट दिलीच तर चित्रांसमोरून सर्रकन पुढे जाणारेच बहुसंख्य असतात. ही खंत टोचणी लावत असल्यामुळे पुरंदरे यांनी पिकासोच्या निमित्ताने चित्रकला समजावून सांगत विसाव्या शतकाचं दर्शन घडवलं आहे.

पाब्लोची झेप लहानपणापासूनच लक्षात येण्यासारखी होती. तो लिहायला, वाचायला येण्याआधी चित्रं काढायला शिकला. आकडे आणि अक्षरं यांना तो चित्रच मानत असे. त्यानं सगळ्या आकड्यांना चित्रात बसवलं होतं. शिक्षणाच्या नावाने मात्र त्याचा आनंदच होता. त्याला शाळेचा अतिशय कंटाळा येत असे. शाळा सुटायची वेळ झाली की तो घड्याळाकडे बघत स्वत:शीच ‘अजून पाच मिनिटं. तीन.. दोन.. असं पुटपुटत असे. पिकासोच्या एका चरित्रकारांनं म्हटलंय, ‘त्या काळात शिक्षण सक्तीचे नसल्याचे काही फायदेही झाले. पिकासो हा त्यातला एक! त्याच्यावर शिक्षण लादलं गेलं असतं तर तो किमान शैक्षणिक पात्रता गाठू शकलेला एक निराश प्रतिभावंत झाला असता. त्याचा सगळा समतोल बिघडला असता.’

त्यानं कलाशाळेत रेखाटनाच्या वर्गात नाव घातलं. कलाशाळेत, शतकानुशतकं चालत आलेली, व्यक्तिमत्त्व नसलेली ठोकळेबाज शिक्षणपद्धती होती. त्यात नवीन संशोधन करण्याची, नवीन विचार मांडण्याची इच्छा नव्हती. शाळेबाहेर पाब्लो आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त वाट करून देत असे. त्यानं निसर्गदृश्यांचा आणि वस्तूंचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची सवय लावून घेतली. त्याच्या कामात निसर्गचित्र, स्थिरचित्र, व्यक्तिचित्र, सर्व काही होतं. पुरंदरे म्हणतात,

पाब्लोच्या चित्रांचा मध्यवर्ती विषय एकच होता, माणूस! आणि शेवटपर्यंत तो कायम राहिला. त्याच्या मानवी आकृती वास्तव आणि कणखर होत्या. त्यानं पहिलं तैलचित्र केलं ते वयाच्या आठव्या वर्षी! नवव्या वर्षी तो रेखाटनं शिकला. त्याची सराईत चित्रकारासारखी नजर आणि तरबेज रेषा यांची ताकद पाहून त्याच्या चित्रकार वडिलांनी आपले ब्रश आणि पॅलेट पोराच्या हाती दिलं. त्यानंतर त्यांनी कधीही चित्र केलं नाही. त्यांच्या आशा पोरावर एकवटल्या होत्या. पण पाब्लोनं बापाविरुद्ध बंड करून त्यांचं ‘रुईस’ हे आडनाव न लावता आईचं ‘पिकासो’ स्वीकारलं.

पाब्लो कोणत्या वातावरणात मोठा होत होता, याचं विस्तृत वर्णन पुरंदरे यांनी केलं आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला स्पेनची सांस्कृतिक राजधानी बार्सलोनामध्ये ‘आधुनिकता’ हा शब्द परवलीचा झाला होता. तिथे प्रगत आणि उदारमतवादी वैचारिक परंपरा होती. त्यामुळे अनेक कलावंत याच काळात तिथे कायम वास्तव्यासाठी आले. बार्सलोनामध्ये तीन चतुर्थांश लोकवस्ती ही कामगारांची होती. पूर्वीपासून धर्मसत्तेचं पाठबळ लाभलेले गिरण्यांचे मालक कामगारांची अतोनात पिळवणूक करत होते. त्या कामगारांमध्ये जागृतीची मोहीम सुरू झाली. बुद्धिवंत, लेखक, कवी आणि चित्रकार यांच्या त्वेषपूर्ण घोषणांनी हा भाग ढवळला गेला. विद्रोही कलावंतांना भेकड, मवाळ म्हणवून घेण्यापेक्षा ‘वेडे आणि माथेफिरू’ म्हणवून घेणं जास्त आवडत होतं. कॅफे, डान्सिंग क्लब हे या क्रांतिकारकांचे अड्डे झाले होते. हे क्रांतिकारक इब्सेन, नित्शे, दोस्तोयव्हस्की, बाखुनीन आदी वाचून आपला संताप तावातावाने व्यक्त करत होते. ही नेपथ्यरचना व त्याचा परिणाम पुरंदरे सांगतात,

पाब्लो अजून लहान होता. पण काही वर्षांनंतर तोही या चळवळीपासून अलिप्त राहू शकणार नव्हता. बार्सलोनाच्या अराजकवाद्यांवर बाखुनीनचा मोठा प्रभाव होता. विध्वंसाची उर्मी हीच निर्मितीची उर्मी असते यासारखी बाखुनीनची वचनं तरुण घोकत होते. हे तो पाहत होता. पुढे कधीतरी तोही म्हणाला, ‘चित्रकला ही विध्वंसाची बेरीज असते.’

जीवन आणि कला एकमेकांवर परिणाम करतच पुढे जातात. परंतु विसाव्या शतकाच्या आरंभकाळात विज्ञान- तंत्रज्ञानामुळे या दोन्हींत आमुलाग्र बदल झाले. पुरंदरे म्हणतात,

बार्सलोनामध्ये पाब्लो आणि वीज दोन्ही एकदमच आले. प्रथम शहराच्या एका चौकात दिवे लागले, मग इतर रस्त्यात आणि घरांमध्ये. माणसांचे जीवन अंतर्बाह्य ढवळून टाकणाऱ्या विसाव्या शतकाची चाहूल लागली. त्यानंतर काही महिन्यांत पहिला चित्रपटाचा खेळ झाला, पाठोपाठ चित्रपटगृह सुरू झाले. पाब्लो या सातव्या कलेबद्दल अतिशय उत्सुक होता. अप्रत्यक्षरीत्या या कलेने त्याच्याही कामांमध्ये फार मोठा बदल घडून आला. चित्रपटकलेचा उदय त्याच्या हयातीत झाला नसता तर पाब्लो पिकासो व त्याची चित्रकला कदाचित अगदी वेगळी झाली असती.

पाब्लोला माणसं आरपार दिसत होती. कुठलाही भाबडा आणि भावुक कल्पनाविलास किंवा गुळगुळीत समजुती न ठेवता तो माणसं पाहत होता. ज्या वातावरणामध्ये, माणसांमध्ये तो राहत होता, तीच माणसं त्याच्या चित्रांमध्ये लख्ख दिसत होती. नाचणाऱ्या, शरीरविक्री करणाऱ्या बाया, पैसे मोजून मिळणारी त्यांची शरीरं, भाड्याने घेतलेल्या मिठ्या तो दाखवत होता. २४ तास तो फक्त आणि फक्त चित्रंच करत असे. या काळातच ‘इस्त्री करणारी’ हे महत्त्वाचं चित्र झालं. कामानं अक्षरशः मुरगळून गेलेल्या स्त्रीचं ते चित्र होतं. दुःख आणि वेदनेची शिकार झालेल्या उद्‌ध्वस्त माणसाबद्दल हे चित्र तळतळून बोलत होतं. त्या भावना त्या दृष्यभाषेतून समर्थपणे व्यक्त होत होत्या. त्याच्या चित्रांतून भिकारी, कष्टकरी, वेश्या, अनाथ बालकं यांची ठसठसणारी वेदना भिडत होती.

Picasso - La repasseuse (Woman Ironing)

इस्त्री करणारी - १९०४

तो पॅरिसला आला. सगळ्या काळात पाब्लोला एकटेपणाने छळलं. त्याचं जगणं म्हणजेच कला होती. दोन्हींत अपरिहार्यपणे एकटेपणा दिसत होता. त्याच्या चित्रांतली माणसं एकमेकांना भेटत होती. एकत्र असत होती. पण त्यांच्यात काहीही संवाद नव्हता. बोलण्यासारखं कोणापाशी काही नव्हतंच. एकमेकांना भेटूनही ती एकटी उरत होती. त्याच्या स्टुडिओत एक पलंग, एक वेताची खुर्ची, इझल्स, जुना पेटारा, एक टेबल, तोंड धुवायला मातीचं भांडं, गंजकी शेगडी अशी संपत्ती होती. भोवती तिला साजेसं, भिकारी-आंधळे-वेडे-म्हातारे यांचं निळं साम्राज्य होतं. या साम्राज्यात कसल्याही सोयीची गरज नव्हती. तो रात्री दहा ते पहाटे पाच-सहापर्यंत एका हातात मेणबत्ती आणि दुसऱ्या हातात निळ्या रंगानं थबथबलेला ब्रश घेऊन तो काम करत असे. कामाच्या वेळा सोडल्या तर त्याला एकटं राहायला अजिबात आवडत नसे. मित्रांची संगत ही अतिशय आवश्यक गोष्ट होती. विशेषतः साहित्यिकांमध्ये तो अधिक रमत असे. ‘चित्रकारांमधला कवी आणि कवींमधला चित्रकार असणाऱ्या या उसळत्या रक्ताच्या तरुणाला मैत्रीची गरज होती.’ असं चरित्रकारांनी लिहून ठेवलं आहे.

त्याला वेध होता तो सत्याचा. त्यामुळे जे बघावंसं वाटत नाही, बघितलं तर त्रास होतो; असं सत्यच नाकारणाऱ्यांना त्याच्या कामातून आनंद मिळावा, ते आवडावं ही कल्पनाच चुकीची होती. आणि सत्य म्हणजे आपण पाहतो तेच नव्हे, तर त्याच्या चित्रांमधून व्यक्त होतं ते सत्य!

पिकासोचं जगणं हे कलेपासून वेगळं नव्हतं. त्याच्या चित्राच्या प्रवासावरून पुरंदरे यांनी हे दाखवलं आहे. त्याचं सुरुवातीचं आयुष्य अतिशय हलाखीत गेलं. थंडी सहन न झाल्यानं, शेकोटीसाठी रेखाटनं जाळल्याचं त्यानं लिहून ठेवलं आहे. या काळातल्या चित्रांत निळ्या रंगाचा वापर जास्त असल्याने ‘निळा कालखंड’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. वेश्या, भिकारी, नर्तकी, सर्कस या चित्रांत प्रामुख्याने दिसतात. ‘मिठी’, ‘स्वस्तातलं जेवण’, ‘म्हातारा गिटारवादक’ या गाजलेल्या चित्रांचा समावेशही पुस्तकात केलेला आहे. ‘मिठी’विषयी त्या म्हणतात, एकमेकांचा आधार घेत, एकमेकांना धरून ठेवण्याची [यात] धडपड आहे. शरीराच्या रेषा जाड झालेल्या, चेहरे नसलेल्या दोन पुतळ्यांचं ते जग आहे. हा काळ पुरंदरे उलगडून दाखवतात,

त्याच्या चित्रांत दारिद्र्यातील थंड, क्रूर वास्तवता निळा रंग घेऊन आली. पण त्यात नुसती कणव नव्हती तर तिखट, बोचरी दृष्टी होती. रात्रीचा, दिवसाचा, आकाशाचा, रस्त्याचा, चेहऱ्याचा, कपड्यांचा व थंडीचा निळाच निळा रंग होता. त्यानं रंगाचं विभाजन केलं. त्याच्या रेषेची एकसंधता निखळली. ती रेषा ही जणू तुटत गेली. बारकाव्यांना त्याने पूर्ण फाटा दिला.

Picasso - Le Vieux Guitariste aveugle (The Old Guitarist)

म्हातारा गिटारवादक - १९०३

‘दम्वाझेल’ ह्या विख्यात चित्रात त्यानं वेश्यागृहात बसलेल्या आणि उभ्या काही स्त्रिया दाखवल्या आहेत. सारलेल्या पडद्यानं त्याला रंगमंचाचा आभास दिला आहे. एका बाजूला पुढ्यात फळांची टोपली आहे. सगळ्या स्त्रियांचे चेहरे मुखवट्यासारखे दिसतात. त्याच्या आत काय चाललंय, कोण आहे, याचा पत्ता लागत नाही. बाकी शरीरं, हाडं आणि मांस, बस! अत्यंत क्रूर वाटणाऱ्या या चित्रानं विलक्षण खळबळ उडवली. त्या चित्राला खोली (तिसरी मिती) नव्हती. चित्रकलेतलं यथार्थदर्शन, देहाचं अभिजात स्वरूप, प्रमाणबद्धता या नीतीमूल्यांना त्यानं धक्का दिला होता. या चित्रामुळे चित्रकलाजगतात प्रचंड खळबळ उडाली. ‘शतकानुशतकांच्या कल्पनांना जबर हादरा देणाऱ्या विसाव्या शतकाचं पहिलं चित्र’, ‘क्युबिझमचा आरंभ’ असंही या चित्राचं वर्णन केलं गेलं.

चित्रशैली स्पष्ट करताना लेखिका म्हणतात,

वस्तूचं मूळ स्वरूप हे घनरूप असतं. तिला लांबी, जाडी आणि रुंदी अशी तीन परिमाणं लाभलेली असतात. या तत्त्वावर आधारलेल्या कलावादाला क्युबिझम (घनवाद) म्हणतात. क्युबिझमचा जन्म हा कुठल्याही वस्तूची छायाचित्रसदृश प्रतिमा तयार करण्याच्या कल्पनेविरुद्ध केलेल्या बंडातून झाला होता. छायाचित्रकलेचा शोध लागल्यानंतर कलेला आता हुबेहूब प्रतिकृती निर्माण करण्याची गरजच उरलेली नव्हती. आपल्या भावना, विचार, संवेदना जास्तीत जास्त तीव्रतेने व्यक्त करणं, ही आताची गरज होती. कलेचं प्रत्येक अंग बदलून जात होतं. आकृतिबंध, रंग-रेषा, प्रकाश, अवकाश, पृष्ठभागाचा पोत, वापरली जाणारी प्रतीकं आणि वस्तुस्थितीचा लावला जाणारा अर्थ, हे काहीच आता पूर्वीसारखं असणार नव्हतं. तरीही क्युबिझम आकाशातून पडलेला नव्हता. आफ्रिकन कलेतूनच क्युबिझम आकार घेत गेला. पिकासो म्हणत असे, ‘क्युबिझम इतर कोणत्याही कलाशैलीपेक्षा निराळा नाही. तेच सिद्धांत आणि तीच तत्त्वं सगळ्यांत सारखी आहेत; लोकांना तो समजू शकत नाही, त्याला मी काय करू?’ एकदा तो रस्त्यावरून जात असताना तोफा वाहणाऱ्या लष्करी गाड्यांचा ताफा आला. त्यावर रंगांचे आडवे पट्टे मारलेले होते. तो ओरडला, ‘याचा शोध आम्ही लावलाय.’ आकृतीच्या बाह्यरेषा तोडण्याकरता रंगांनी आकृतीचं विभाजन केलं होतं. तेच तंत्र इथं वापरलं होतं. जंगलात तोफा चटकन दिसू नयेत म्हणून ही योजना होती.

Picasso - Les Demoiselles d'Avignon

दम्वाझेल - १९०६-७

त्याचं हे क्युबिस्ट चित्र तीस हजार फ्रँक्सना विकलं गेलं. आधुनिक चित्रकाराच्या एका कामाची एवढी किंमत होण्याची ही घटना ऐतिहासिक होती.

क्युबिझमनं केवळ चित्रकलेत उत्पात घडवून आणला नाही तर शिल्प, नृत्य ,संगीत, वास्तुकला, साहित्य या सर्व ललित कला ढवळून काढल्या. साहजिकच त्याला विरोधही प्रचंड झाला. मूर्तिमंत कुरूपता, अधोगती, सर्वनाश म्हटलं गेलं. कुठलीही गोष्ट समजली नाही किंवा धक्का देणारी असली तर तिला क्युबिस्ट म्हणायचा प्रघात पडला, आईबापांच्या मनाविरुद्ध वागणारा तरुण मुलगा, चांगल्या घरातली बाई व्यभिचारी निघाली, तर क्युबिस्ट.

पिकासोच्या हाताशी किंवा खिशात वेगवेगळ्या आकारांच्या वह्या असत. त्यात तो सतत रेखाटनं करत असे. सर्व प्रकारच्या शैली, तंत्र आणि विषय त्यांत असत. तो कोणाकडूनही काहीही शिकायला तयार असे. त्याने प्रागैतिहासिक आफ्रिकन कलेपासून घनवादाचं तत्त्व घेतलं. त्यानंतर तो ग्रीक, रोमन, एट्रस्कन, बारोक कलांशी, आणि सेझान, पुसँ, मायकेलअँजेलो या कलाकारांशी नातं जोडून घेण्याचा प्रयत्न करत होता.

प्रस्तुत पुस्तकातल्या पिकासोचं कलाजीवन आणि वैयक्तिक आयुष्य दोन्हींविषयीच्या समर्पक मांडणीमुळे हा कलावंत समजत व उमजत जातो. पिकासो चित्रकलेएवढाच त्याच्या बायकांविषयी प्रसिद्ध आहे. सिग्मंड फ्रॉईड यांनी ‘काम (इरॉस) व मृत्यू ह्या माणसाच्या उपजत वृत्ती आहेत.’ असा सिद्धांत मांडला. पिकासोमध्ये ह्या दोन्ही भावना तेवढ्याच प्रबळ होत्या. तो अतिशय लहान वयापासूनच वेश्यागमन करत असे. त्याचे अनेक बायकांशी संबंध आले. आयुष्यभर त्याला मृत्यूचं भय वाटत राहिलं. कित्येक वेळा तो घराबाहेर पडत नसे. हा भागसुद्धा पुरंदरे यांनी अतिशय परखडपणे दाखवला आहे. त्याची संशयी वृत्ती किंवा बायकांशी हिडीस वागणूक याविषयी त्यांनी लिहिलंय.

पिकासोत जेवढी घडवण्याची शक्ती होती तेवढाच तो आक्रमक, विध्वंसक होता. तो जेवढा प्रेमळ व हळुवार होता, तेवढाच क्रूर. त्याच्याजवळच्या सर्वांनीच हे सोसलं.

१९१२ साली त्यानं उभट गोलाकृतीत केलेल्या एका खुर्चीच्या चित्रावर खुर्चीची वेताची जाळीच चिकटवली आणि ‘कोलाज’ नामक नव्या कलेचा आरंभ झाला. (फ्रेंच भाषेत कोलाज म्हणजे अनेक गोष्टी एकत्र चिकटवणे.) ‘कोलाज ही चित्रकलेतील साचेबध्दपणाला मारलेली सणसणीत चपराक होती.’ असं अनेक समीक्षक मानतात. त्यानंतर चित्रात वस्तू, कागद, छापील कागद वगैरे चिकटवायला सुरुवात झाली. पुढे संगीत, वास्तुकला, साहित्य, चित्रपट ह्या कलाक्षेत्रांत कोलाज दिसू लागला.

पॅरिसमध्ये स्थलांतरित झाल्यावर पिकासो, स्पेनमधील उलथापालथींबाबत माहिती करून घेण्यात फारसा उत्सुक नसे. १९३३ साली स्पेनमध्ये प्रजासत्ताक सरकार स्थापन झालं. या काळात त्याचे अनेक कलावंत मित्र कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. परंतु राजकीय भूमिका घेणं हे त्याला पसंत नव्हतं. (एकदा त्यानं रशियन क्रांतीचं स्वागत केलं होतं.) तेव्हाच जर्मनीत हिटलर सर्वसत्ताधीश झाला. एरवी बोलण्यात नसली तरी त्याच्या चित्रांत या घडामोडींची जाणीव दिसू लागली. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या राक्षसांवर चाल करणारे योद्धे चित्रांत दिसले.

२६ एप्रिल १९३७. स्पेनमधल्या जेमतेम सात हजार वस्तीच्या एका गावात बाजाराचा दिवस असल्यामुळे जवळपासच्या खेड्यांतून खरेदी-विक्रीसाठी शेकडो लोक तिथे आले होते. अचानक दुपारी आकाशात भिरभिरत विमानांच्या पहिल्या तुकडीने बॉम्बवर्षाव व मशीनगन्सचा मारा सुरू केला. पाठोपाठ वीस मिनिटांच्या अंतराने आणखी काही विमानांनी बॉम्ब हल्ला केला. भयानं हादरलेले रहिवासी ओरडत, किंचाळत गावाबाहेर पळत सुटले. तेव्हा विमानांनी पाठलाग करत टिपूनटिपून माणसं मारायला सुरुवात केली. जनरल फ्रँकोच्या दिमतीला असलेल्या जर्मन हवाई पथकांनी रात्री आठ वाजेपर्यंत थैमान घालून स्पेनमधल्या गर्निका या गावाचं स्मशान करून टाकलं. १६५४ लोकांचा बळी गेल्याचं वृत्त आणि छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर संपूर्ण जगाची झोप उडाली. पुरंदरे लिहितात,

पिकासो हादरुन गेला. बातमीचा पहिला धक्का ओसरला. त्याने वृत्तपत्रांतली छायाचित्रं पाहिली आणि ‘कधीही बांधिलकी न मानणारा’ पिकासो यापुढे ‘बांधिलकी मानणारा चित्रकार’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

पिकासोची ‘स्वप्न आणि फसवणूक’ ही रक्तानं आणि भीतीने चिंब अशा जाणिवांची अभिव्यक्ती असणारी चित्रमालिका, हा हुकुमशहा फ्रँकोचा केलेला कडवा निषेध होता. फ्रँको म्हणजे स्पेननं आजवर पाहिलेल्या सगळ्या दु:स्वप्नांचा अर्क होता. पिकासोला तो केसाळ, गलिच्छ, आकाराने प्रचंड दिसणार्‍या आणि भयानक सुळे असणाऱ्या राक्षसासारखा दिसत होता. धापा टाकणाऱ्या रक्तबंबाळ बैलाच्या रूपात स्पॅनिश जनता दिसत होती. आपल्या पोरांना उराशी कवटाळून घर सोडून, किंचाळत पळत सुटलेली स्त्री ही त्याची मायभूमी स्पेन होती. मदतीकरता ती हाका मारते आहे, आक्रोश करते आहे, पण कोणी येत नाही आणि येणारही नाही.

एखाद्या सुप्त ज्वालामुखीचा अचानक स्फोट व्हावा असं सार्वकालिक चित्र ‘गर्निका’ झालं. त्याआधी असं काही नव्हतं, नंतरही काही झालं नाही. ह्या चित्रनिर्मितीबद्दल लिहिताना पुरंदरे यांची लेखणी धारदार होते :

आपल्या मित्रांशी व बायकांशी क्रूरपणे वागणारा पिकासो गर्निकाच्या हल्ल्यानंतर व्यक्तिस्वातंत्र्य आणि अस्मिता यांचं भवितव्य धोक्यात आहे, हे जाणवताच चवताळून उठला. आपल्या सर्व शक्तीनिशी सर्व सुविधांसह तो मैदानात उतरला.

त्यानं ३५१ X ७८२ सेंमी.चा प्रचंड मोठा कॅनव्हास भिंतीवर आणून बसवला. कधी उभं राहून तर कधी शिडीवर चढून लांब दांड्याच्या ब्रशनं काम करावं लागत असे. त्यानं कधी नव्हे ते आपला स्टुडिओ सर्वांना खुला केला. हे चित्र म्हणजे त्याच्या दृष्टीने एक संदेश होता. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं होतं. लोकांच्या नजरेसमोर ते चित्र घडत जावं, असं त्याला वाटत होतं. ‘गर्निका’ एका युद्धात घडणाऱ्या भीषण संहारामधली वेदना आणि क्रौर्य व्यक्त करतं. पण त्यात कुठे बंदुका, बॉम्ब किंवा त्यांनी केलेला संहार दिसत नाही. फक्त तुटलेली तलवार दिसते. एक लोंबता उघडा, जुनाट पिवळा प्रकाशाचा विजेचा दिवा दिसतो. चित्राची जातकुळी ग्रीक-रोमन युद्धचित्राची आहे. ‘गर्निका’या गावावर नाझी विमानांनी केलेला हल्ला या घटनेबद्दल कसलीही माहिती या चित्रातून मिळत नाही. कुठल्याही काळाचं, घटनेचं, देशाचं बंधन त्याला नाही. प्रत्येक बारीकसारीक कामावर सही तारीख राहणाऱ्या पिकासोनं ‘गर्निका’वर मात्र सही कधीच केली नाही, तारीखही घातली नाही. सर्व काळातल्या लष्करी जमातीने केलेला सर्व काळातला अन्याय म्हणजे ‘गर्निका’!

Picasso - Guernica

गर्निका - १९३७

पिकासोनं फॅसिझमविरोधी भूमिका घेतली आहे, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ‘पिकासो! स्वातंत्र्य!!’ अशा घोषणा देणाऱ्या तरुणांची त्यांनं निराशा केली नव्हती. फॅसिस्ट प्रचारकांनी स्पेनचे कलासंग्रह आणि धार्मिक कलाकृती धोक्यात असल्याचा प्रचार चालवला होता. एका मुलाखतीत पिकासोनं या आरोपांचा स्पष्ट इन्कार केला होता. पिकासो सांगत होता, ‘स्पेनचं युद्ध हा प्रतिगामी शक्तींनी जनतेशी, स्वातंत्र्याशी मांडलेला लढा आहे. माझ्या चित्राचं नाव मी गर्निका ठेवणार आहे. अलीकडच्या काळातल्या माझ्या इतर चित्रांप्रमाणे त्यातही लष्कर या जमातीविषयी मला वाटणारी किळस व्यक्त करणार आहे. या जमातीनंच स्पेनला वेदना आणि मृत्यू यांच्या समुद्रात बुडवलं आहे.’

दुसऱ्या महायुद्धाचे घनदाट ढग सर्वत्र दिसू लागले. जर्मनांनी ज्यू लोकांच्या बरोबरीनं कम्युनिस्टांचं शिरकाण चालू केलं. या काळात अनेक चित्रकार, साहित्यिक, अभिनेते पिकासोच्या स्टुडिओत किंवा कॅफेमध्ये जमत असत. त्यात जाँ-पॉल सार्त्र, सिमोन द बोव्हार, आल्बेर काम्यू, जाँ कोक्तो प्रभृती असत.

युद्ध सुरू झाल्यावर त्यानं शिल्पांवरही काम चालू केलं. पिकासोनं आपल्या न्हाणीघराचं शिल्पकलेच्या स्टुडिओत रूपांतर केलं. एक दिवस घरात पडलेल्या असंख्य जुन्या मोडक्या वस्तूंमध्ये सायकलची बैठक आणि गंजकं हँडल सापडलं. त्यानं त्या वस्तूंचा संबंध जोडला आणि 'बुल्स हेड' हे सुप्रसिद्ध शिल्प जन्माला आलं.

Picasso - Bull's Head

बुल्स हेड - १९४२

१९४३च्या आरंभी पॅरिस पूर्णपणे जर्मनांच्या ताब्यात गेलं. नाझीविरोधी कारवायांना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून पाच शाळकरी विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. पिकासोचे अनेक मित्र तुरुंगात गेले; कित्येक भूमिगत झाले. ज्यू, कम्युनिस्ट, दहशतवादी आणि भूमिगत चळवळींशी संबंध असल्याचा संशय असलेल्यांना अटक करणं, ठार मारणं, हद्दपार करणं नित्याचंच झालं होतं. कुणीतरी पिकासो हा ज्यू किंवा अर्धा ज्यू असल्याची आवई उठवली. दुसऱ्या एखाद्याला गेस्टापोंनी तत्काळ उचललं असतं. ‘संशयास्पद हालचालींमुळे’ अनेक वेळा अनेक जर्मन अधिकारी त्याच्या स्टुडिओत येऊन गेले. पण त्याचं स्पॅनिश नागरिकत्व त्याच्या मदतीला धावून आलं. ते ओळखपत्र पाहून निघून जात.

एकदा काही जर्मन अधिकाऱ्यांनी गर्निकाची छायाचित्रं पाहिली. त्यांनी विचारलं,‘ हे तुम्ही केलंय?’

‘नाही; तुम्ही !’ तो शांतपणे उत्तरला.

जर्मनांबरोबर हे असले विनोद करण्यामागचा धोका तो नक्की ओळखून होता. पण त्यानं तो पत्करला होता. त्यानं फ्रँको आणि हिटलर यांसारख्या हुकूमशहांचा रोष ओढवून घेतला होता. धमक्या येऊनही त्याच्या कामात कुठलाही बदल झाला नव्हता. एका फ्रेंच चित्रकारानं विचारलं,

‘ सध्या तुम्ही काय करत आहात?’

‘जे करणं शक्य आहे, ते करतो, मला जे हवं तेच करतो.’ पिकासो म्हणाला,‘ आम्ही कलाकार अविनाशी असतो. तुरुंगात असेन वा यातनातळात, मी माझ्या कलेच्या जगात सर्वश्रेष्ठ असेन. मग मला माझ्या कोठडीच्या जमिनीवर माझ्या ओल्या जिभेने चित्रं काढावी लागली तरीही...’

दुसरं महायुद्ध संपलं. युद्धकाळात फ्रेंच कम्युनिस्ट पक्षानं दाखवलेलं अतुलनीय धैर्य, फ्रान्सच्या स्वातंत्र्याकरता दिलेली कडवी झुंज, केलेला त्याग, यामुळे जनमानसात आणि राजकीय विरोधकांमध्येही पक्षाची प्रतिमा उंचावली होती. पिकासोनं कम्युनिस्ट पक्षात जाण्याचं ठरवलं. पिकासोच्या पक्षप्रवेशाची बातमी ५ ऑक्टोबर १९४४ रोजी सर्व वर्तमानपत्रांनी ठळकपणे छापली.

माझं कम्युनिस्ट पक्षाचं सभासद होणं, ही माझ्या आयुष्याची आणि कलाकृतीची झालेली तर्कशुद्ध परिणती आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, चित्रकला हा केवळ मनाला आनंद देणारा विरंगुळा आहे, असं मी कधीही मानलं नाही. माझी शस्त्रं आहेत रेषा आणि रंग. त्यांच्या आधारे जगाला आणि माणसाला जास्त खोल जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आलो आहे. कारण हे ज्ञान आपल्याला प्रत्येक दिवशी जास्त मुक्ततेकडे नेतं. माझ्या पद्धतीने मला सर्वात सत्य, योग्य, उत्तम असं जे वाटलं ते मांडण्याचा मी प्रयत्न करत आलो.

मी कम्युनिस्ट पक्षात जाताना एकही क्षण घुटमळलो नाही. मुळात मी नेहमीच त्यांच्याबरोबर होतो. आत्तापर्यंत सभासद झालो नव्हतो, हा एक प्रकारचा भाबडेपणा होता. मला जवळचे वाटणारे सगळे मला तिथे भेटतात. मोठे कलावंत, थोर कवी, विचारवंत. मी पुन्हा माझ्या बांधवांमध्ये आलो आहे.

पिकासोच्या कम्युनिस्ट पक्षप्रवेशाचं अमेरिकेत व इतर काही देशांत वाईट स्वागत झालं. कलेच्या बांधिलकीबाबत वादालाही पुन्हा उकळी आली होती. या काळातच त्याला कधी नव्हे तेवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. त्याच्यापेक्षा कितीतरी तरुण असलेले चित्रकारही मागे पडले. कलाकार म्हणून पक्षासंबंधात त्यानं अनेक वर्षं कसोशीने अनेक कर्तव्यं पार पाडली. वार्ताहर आणि त्यांना मुलाखती देणं, याचा त्याला तिटकारा होता. पण नव्या बांधिलकीबाबत कसल्याही प्रश्नांची उत्तरं त्यानं टाळली नाहीत. त्याला प्रवासाचा अतीव कंटाळा होता, तरी जगात अनेक ठिकाणी भरलेल्या जागतिक शांतता परिषदांना तो पूर्णवेळ उपस्थित असे. स्पॅनिश रिपब्लिकन पक्षाला पिकासोनं लक्षावधींची मदत दिली.

१९४९च्या एप्रिल महिन्यात पॅरिसला दुसरी जागतिक शांतता परिषद भरवली गेली. कम्युनिस्ट पक्षानं त्याची जोरदार तयारी केली होती. त्यासाठीच्या भित्तिपत्रकाचं कामसुद्धा पिकासो पाहत होता. ‘एक चित्र द्या’ अशी विनंती त्याला केली गेली. पिकासोनं एक देखणा आणि तंत्रदृष्टीने अतिशय यशस्वी लिथोग्राफ केला. गडद करड्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या शुभ्र रंगाचं, मऊ रेशमी पिसांचं, डोक्यावर लहानसा ऐटबाज तुरा असलेलं, अतिशय लोभसवाणं कबुतर जन्माला घातलं आणि शांततेच्या प्रतीकाचा जन्म झाला. काही अवधीतच हे प्रतीक अवघ्या जगानं आपलंसं करून घेतलं.

Picasso - Dove of Peace

शांततेचं प्रतीक - १९४९

८ एप्रिल १९७३ रोजी पिकासोचं निधन झालं. काही तासांतच जगभरातली वृत्तपत्रं, टीव्ही, रेडिओवरून ही बातमी प्रसृत झाली. जगभर अनेक भाषांतून अनेक लेख लिहिले गेले. कित्येक पुस्तकं छापली गेली. अजूनही त्याची व त्याच्या कलेची चिकित्सा चालूच आहे. पुरंदरे लिहितात,

एक क्रूर, भावनाशून्य, सतत पछाडलेला, विलक्षण बंडखोर, वादळी व्यक्तिमत्त्व असलेला सुलतान काळाच्या आड गेला होता. लहरी, तऱ्हेवाईक, स्वतःच्या मस्तीतच लांबलचक आयुष्य जगलेल्या एका नवाबाचा अंत झाला होता. त्याच्या अवाढव्य निर्मितीमध्ये त्याचं खरंखुरं क्रांतिकारक काम बुडून गेलं होतं.

सर्वसामान्य लोकांना पिकासोबद्दल काय वाटत होतं?

त्यांच्या नजरेपुढे होता तो स्वातंत्र्यप्रेमी स्पॅनियार्ड, कम्युनिस्ट, अखेरपर्यंत हिरवटपणा जपणारा, बायकांचा वेडा, चौकटीची पँट घालून विदुषकी चाळे करत फोटोला पोज देणारा, अनाकलनीय चित्रांची प्रचंड निर्मिती करणारा आणि त्यावर कोटींनी पैसे कमावणारा पिकासो!

पुरंदरे यांनी प्रत्येक प्रकरणाची सुरुवात करताना काही अवतरणं दिली आहेत. तसेच इतरत्रही पिकासोची वक्तव्यं आहेत. त्यातून त्याची ‘दृष्टी’ लक्षात येते.

आपण काय करणार आहोत हे जर आपल्याला आधीच नक्की कळलं तर मग ते करण्यात काय अर्थ आहे?

चित्रकलेत आपण सर्व करून पाहावं, तो आपला हक्कच आहे. अट एकच, तीच गोष्ट परत करायची नाही.

कोण म्हणतं लोकानुनय करणाऱ्यांनाच यश मिळतं? मी दाखवून दिलं आहे की, प्रत्येकाच्या विरोधात जाऊनही यशस्वी होणं शक्य आहे. कसलीही तडजोड न करता आणि यशाच्या शिखरावर असताना मी मला हवं ते करू शकतो.

सत्य हे एकमेव असतं, तर एकाच विषयावरची अनेक चित्रं करणं शक्य झालं नसतं.

निसर्ग आणि कला या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. निसर्ग जे व्यक्त करू शकत नाही, ते आपण कलेद्वारे व्यक्त करतो.

माझ्या दृष्टीने कलेमध्ये भूतकाळ आणि भविष्यकाळ नसतो. कलाकृती वर्तमानाशी नातं सांगत नसेल तर तिच्यात काही अर्थच नाही.

चित्रकला माझ्याहून शक्तिमान आहे. तिला हवं ते ती माझ्याकडून करून घेते. मी काही बोलत नाही... सगळं रंगवतो...

चित्रकार आपल्या संवेदना आणि दृष्टीपासून मोकळं, सुटं होण्याकरता चित्रं करतो.

सगळ्यांना चित्रकला समजून घ्यायची आहे. पक्ष्यांचं गाणं समजून घेण्याचा आपण प्रयत्न का करत नाही?

अमूर्त कला अस्तित्वात नसते हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे...

प्रत्येक कामाच्या सुरुवातीला कुणीतरी माझ्याबरोबर काम करत आहे, अशी भावना मला होते. पुढे मात्र मी एकटाच राहतो.

मी माझं चित्र कसं केलं? हे विचारायचा उद्योग कोणी करणार नाही, अशा स्थितीपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्याचा संबंध काय? फक्त भावनेपासून माझ्या चित्रांना मोकळं करता यावं ही इच्छा आहे...

प्रत्येकाजवळ सारखी ताकद असते. सर्वसामान्य माणूस ती हजार लहान गोष्टींवर वाया घालवतो. मी ती सगळी एकाच गोष्टीवर केंद्रित करतो.

माझं कम्युनिस्ट पक्षाचं सभासद होणं, ही माझ्या आयुष्याची आणि कलाकृतीची झालेली तर्कशुद्ध परिणती आहे.

चित्रकला नेमकं काय व्यक्त करते? चित्रनिर्मिती कशी होते? चित्रकलेतले विविध प्रवाह कसे निर्माण झाले? त्यामागचं तत्त्वज्ञान काय? त्याचा इतर कलांवर कसा परिणाम झाला? अशा बहुविध दिशांनी कलावंत आणि कला यांच्याकडे पाहण्याची दृष्टी पुरंदरे यांनी दिली आहे. चरित्रलेखनाचा अतिशय अभिनव व आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

चित्रं, विश्लेषणं, पिकासोच्या अनेक मुलाखती, पिकासोच्या बायकांची कैफियत, टीकाकारांची मतं, इतर लेखकांची मतं यांमुळे पिकासो सर्व बाजूंनी दिसत जातो. त्यातून चरित्रनायकाच्या स्वभावातल्या गुणदोषांचं तटस्थ सादरीकरण होत जातं. पुरंदरे यांनी ठिकठिकाणी दादाइझम, क्युबिझम, झ्म्प्रेशनिझम, सररिअलिझम इत्यादी संकल्पनांचा उगम, त्याचा प्रसार करणारे चित्रकार यांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे नवख्या वाचकालाही चित्र समजून घ्यायला मदत होते. पुस्तकाच्या अखेरीला त्यांनी १८८० ते १८७३ या कालखंडातल्या प्रत्येक वर्षी राजकारण, साहित्य, विज्ञान, चित्रकला या क्षेत्रातल्या उल्लेखनीय घटना दिल्या आहेत. ह्या काळात भीषण संहार, भूकबळी, अशांतता, विनाशाची भीती यांनी जगाला ग्रासून टाकलं; त्याच वेळी हे सर्व टाळून सुंदर जग करण्याची आस घेऊन कार्यरत असलेल्या विभूतीही होत्या. महात्मा गांधी, अल्बर्ट आईनस्टाईन, सिग्मंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन, जाँ-पॉल सार्त्र, पाब्लो पिकासो यांनी हे शतकच नाही तर सहस्रक घडवलं. त्यावरून जग आणि भारत कसा घडत होता, हे लक्षात येतं. ‘पिकासो’ वाचण्यासाठी पुरंदरे यांनी असा समग्र आणि विशाल कॅनव्हास उपलब्ध करून दिल्यामुळे ‘पिकासो’ वाचन हा एक प्रगल्भ अनुभव होतो.

Picasso

पिकासो

Picasso - Self portraits

पिकासो - सेल्फ-पोर्ट्रेट्स

---
अतुल देऊळगावकर
atul.deulgaonkar@gmail.com

‘पिकासो’
ले. माधुरी पुरंदरे
पृष्ठे - ३५८, किंमत - रु.११०/-, पुरंदरे प्रकाशन

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदर!
पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण झालीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे परीक्षण आधी फेसबुकवर वाचलं होतं पण इथे एकत्रित, चित्रांसकट ते अधिक प्रभावी झालं आहे.
पुस्तक नक्की वाचणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदा योगायोगानं 'गर्निका' प्रत्यक्षात बघता आलं. ते अंगावर आलं. ह्याच प्रदर्शनाच्या सुरुवातीला ती इस्त्री करणारी होती. तिच्यावरून मात्र नजर हटेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला. सेल्फ पोर्ट्रेटस आवडली. गार्निका खरच अंगावर येते.
इस्त्री करणारी 'मुरगळून' गेलेली स्त्री हे वर्णनच तुम्ही इतकं चपखल केलयत. खरच मुरगळूनच गेलीये ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0