अरुण जाखडे : आदरांजली

अरुण जाखडे यांचं जाणं धक्कादायक, दुःखद आहे. पद्मगंधा प्रकाशनाची अनेक पुस्तकं संदर्भसाहित्य म्हणून खूप मोलाची आहेत. कॉलेजात असताना समीक्षा, भाषाविज्ञानासाठी अभ्यासाचा भाग म्हणून जेवढी पुस्तकं वाचली, त्यातली बहुतांश सगळी पद्मगंधाची होती. रा.भा.पाटणकर, म.द. हातकणंगलेकर, रा.ग. जाधव, द. भि. कुलकर्णी, द. दि. पुंडे, गंगाधर गाडगीळ, हरिश्चंद्र थोरात, श्री. व्यं. केतकर अशा अनेकांची पुस्तकं तेव्हा, वाचली, पाहिली, चाळली, हाताळली ती पद्मगंधाचीच. याशिवाय लोकसाहित्यावरची केवळ रा.चिं.ढेरे यांचीच नाही तर इतर भटक्या जमातींच्या जीवनावर त्यांनी प्रकाशित केलेली संशोधनभर पुस्तकं फार महत्वाची आहेत. अहिराणी बोलीपासून ते अगदी गणेश देवींनी केलेल्या भारतीय भाषांच्या सर्वेक्षणावरील ग्रंथांच्या खंडांपर्यंत अनेक उत्तम पुस्तकं पद्मगंधानं प्रकाशित केली.

या सगळ्यात मला त्यांचं वेगळेपण आणि जाणकार संपादकीय दृष्टी दिसून आली, ती तीन पुस्तकांमुळे. त्याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा.

पहिलं पुस्तक - ‘बुधन सांगतो’ हे पुस्तक दक्षिणकुमार बजरंगे छारा - या गुजरातमधल्या दिग्दर्शकाचं असून वैशाली चिटणीस यांनी हा मराठी अनुवाद केला आहे. दक्षिणकुमार ‘बुधन थिएटर’च्या माध्यमातून ‘छारा’ - या स्वातंत्र्यपूर्वकाळापासून गुन्हेगारी जमात असा शिक्का डोक्यावर मारल्या गेलेल्या जमातीच्या लोकांसोबत अहमदाबादमधल्या छारानगर वस्तीत काम करतात. छारा जमातीची व्यक्ती म्हणून त्यांच्या वाट्याला कसं जगणं आलं आणि त्यातून त्यांनी नवी सर्जनशील वाट कशी धुंडाळली, याची कहाणी सांगणारं काहीसं आत्मकथन प्रकाराकडे झुकणारं हे एक उत्तम पुस्तक आहे. हे अनुवादित पुस्तक प्रकाशित करून जाखडेंनी मराठी वाचकांना खरोखरीच वेगळं, मौल्यवान असं काही दिलं आहे.

Arun Jakhade Image

दुसरं पुस्तक - एम. एम. कलबुर्गी यांचं ‘महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख’. या छोटेखानी पुस्तकात महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरच्या सोलापूर, उस्मानाबाद परिसरातल्या शंभराहून अधिक शीलालेखांचा अभ्यास कलबुर्गींनी केलेला आहे, त्यावरचं बहुआयामी ऐतिहासिक, पुरातत्वीय अन्वयन करणारं महत्वाचं लेखन आहे. अवघ्या शंभरेक पानांचं हे पुस्तक मोठ्या रंजक तपशीलांनी भरलेलं आहे. विजया तेलंग यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. कलबुर्गी यांचं हे एकमेव पुस्तक मराठीत उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचं मोल अधिक आहेच.

तिसरं पुस्तक - अरुण फरेरा या मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या वकिलाच्या आत्मकथनाचा पद्मगंधानं प्रकाशित केलेला मराठी अनुवाद. ‘कलर्स ऑफ दि प्रिझन’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद रुपेश पाटकर यांनी केला आहे. यात फरेरांनी युएपीएच्या गुन्ह्याखाली त्यांना झालेला अनेक वर्षांचा तुरुंगवास, तुरुंगवासादरम्यानंचं त्याचं जीवन याबद्दल लिहिलं आहे. फरेरा मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत आणि 2018 मध्ये एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून ज्या बुद्धिजीवींना, त्यांच्यावर आरोप ठेऊन अटक केली आहे, त्यात समाविष्ट आहेत, अर्थात सध्या ते तुरुंगात आहेत.

ही तीन पुस्तकं मला काहीशी वेगळी वाटली, म्हणून त्यांचा उल्लेख, अन्यथा जाखडेंनी प्रकाशित केलेली इतर पुस्तकंही वाखाणण्याजोगी आहेतच. ‘उत्तम अनुवाद’ या पद्मगंधाच्या दिवाळी अंकातही देशोदेशीच्या उत्तम साहित्यिकांच्या कलाकृती मराठीत वाचायला मिळत. अनुवादित साहित्याला वाहिलेला हा, बहुधा मराठीतला असा एकमेव दिवाळी अंक असावा. याशिवाय काही काही अगदी अचंबा वाटावा, कुतूहल चाळवावं अशीही पुस्तकं जाखडेंनी प्रकाशित केली आहेत. उदा., ‘नॉर्थ इंडियन इंडियन्सच्या अस्वल लोककथा’ हे पुस्तक.

सिमॉन द बोव्हुआरचं ‘द सेकंड सेक्स’ हे करुणा गोखले यांनी अनुवादित केलेलं पुस्तक हा पद्मगंधाच्या शिरपेचातला आणखी एक मानाचा तुरा.

नुकतंच जाखडेंनी शाहू पाटोळे यांचं ‘अन्न हे अपूर्णब्रम्ह’ देखण्या रुपात पुन:प्रकाशित केलं. ते वाचायला मागवायचं होतं पण ऑनलाईन मागवायचा कंटाळा आला. एकदा वाटलं जाखडेंना फोन करावा का, पण पुन्हा ते पैसे घेणार नाहीत, ही पंचाईत म्हणून तेही राहिलं. लोकसत्तात असताना कामाच्या निमित्तानंच चार-पाच वेळा त्यांच्याशी फोनवरच बोलणं झालं होतं, बाकी आमचा तसा वैयक्तिक फार परिचय अथवा मैत्री नव्हती, पण अमुक एक पुस्तक हवं म्हणायचा अवकाश की ते दुसऱ्या दिवशी मिळणारच, अशी व्यवस्था ते करायचे. ऑफिसच्या पत्त्यावर पुस्तकं यायची. त्यांना सांगून दमले होते, की जी पुस्तकं मला वैयक्तिक लागणार आहेत, ज्यांचा वृत्तपत्रीय कामांशी संबंध नाही, त्याचे पैसे तुम्ही घ्यायला हवेत. तर ते नेहमीच नम्रपणे नकार द्यायचे, “पैशाचं सोडा, तुम्ही पुस्तकं वाचा आणि त्यातलं बरंवाईट कळवा. चोखंदळ वाचकांना पुस्तकं पाठवायचं समाधान वेगळंय.” असं म्हणत त्यांनी एकाही पुस्तकाचे पैसे देऊ दिले नाही. पुस्तकं पाठवून विसरूनच जात. पुन्हा कधीही फोन नसे, अमुक वाचलं का? तमुक कसं वाटलं? यावर लिहा, त्यावर लिहा…असली कसलीच पृच्छा नाही की तगादा नाही. जणू वाचणाऱ्यांना व्रतस्थपणे पुस्तकं पाठवणं एवढंच त्यांचं काम. त्यातपण नवीन आलेली इतरांची पुस्तकं सुचवणार, स्वत:चं नवं पुस्तक प्रकाशित झालं तर सांगणारही नाहीत.

फिक्शन वा ‘बेस्ट सेलर’ साहित्याला असतो, तेवढा वाचकवर्ग वैचारिक नि संशोधनपर पुस्तकांना मिळेलच असं नाही, तरीही हा धोका पत्करून सतत तीन दशकं उत्तम पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी नुसतं झपाटलेपण चालत नाही, त्यासोबत लागते ती कमिटमेंट. जाखडेंमध्ये ती पुरेपूर होती. आमची कधीही भेट वा खूप दीर्घ संवाद झाला नाही, पण ज्या तर्हेची पुस्तकं ते काढत होते, त्यावरून त्यांच्या कामाचा आवाका आणि संपादकीय दृष्टी दिसत होती. जाखडेंना भेटता न आल्याची सल कायम मनात राहील.

बातमीचा प्रकार निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ती आणि त्या मागचे संचालक यांची महती कळली. ( आदरांजली.)
तीन पुस्तकांबद्दलही धन्यवाद. वाचेन एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्मगंधा ने प्रकाशित केलेले समाजस्वास्थ्यकार र.धों कर्व्यांच्या 8 पुस्तकांचा संच मला एका मित्राने वाचावयास सांगितला होता. अजून माझ्याच्याने वाचून झाला नाही. अरुण जाखडेंच्या स्मृतीला अभिवादन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अरुण जाखडे यांना आदरांजली.

आता एक काहीसा अवांतर मुद्दा:

‘पद्मगंधा’ने प्रकाशित केलेला रधोंवरचा आठ खंडांचा संच मी पुण्याला ‘इंटरनॅशनल’ मधून घेतला. खुद्द रधोंचं लिखाण यांतल्या तीनचारच खंडांत आहे. त्यातसुद्धा ‘’समाजस्वास्थ्य’ मधील निवडक लेख’ हा एकच खंड भरीव आहे, बाकी किरकोळ आहेत. (आशुकमाशुक चित्रंही ह्या एकातच आहेत.) बाकी खंडांमध्ये अनंत देशमुखांनी लिहिलेला समीक्षात्मक मजकूर वगैरे आहे, तो मला तरी फारसा वाचनीय वाटला नाही.

पण समजा मला फक्त रधोंचंच लिखाण असलेले खंड हवे असतील तर तशी सोय नव्हती. ‘आठच्या आठ सगळे घ्या, नाहीतर सोडा’ असा तो पुणेरी व्यवहार होता. हे मार्केटिंग बिनडोक आहे इतकं उघड आहे. जर त्यांतले निवडक खंड सुटे विकले असते तर जास्त खपले असते. अव्वाच्या सव्वा किंमत देऊन अनावश्यक भरताड घ्यायला लोक कचरतात आणि मग काहीच घेत नाहीत. (पैशाचा प्रश्न माझ्यासाठी मोठा नव्हता, पण इतर अनेकांसाठी तो असतो.)

दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात असं होणार नाही. समजा महाद्वार रोडवरचा दुकानदार म्हणाला की तुम्हाला जीन पॅन्ट हवी असेल तर माझ्याकडे आहे, पण तिच्याबरोबर एक रुमाल, एक छत्री, एक गजराचं घड्याळ आणि एक मोबाईल कव्हर घ्यावं लागेल तर गिऱ्हाईकं खदखदा हसतील. पण मराठी पुस्तकांच्या धंद्यात कमालीचा अव्यवहारीपणा सर्रास चालतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सुटे खंड चा प्रश्न जसा आहे तसाच भाग 1 व भाग 2 वगैरे भागात पुस्तक असेल तर येतो. मी मनकल्लोळ- नीलांबरी जोशी/ अच्युत गोडबोले यांचे 2 भाग असलेला संच घेतला. नंतर त्यातील एक हरवला.( दुसर्‍याच्या विसरभोळेपणामुळे). कुठ्लेच दुकानादार एक भाग देईनात.संच घ्यावा लागेल. आपण एकच बूट विकत घेतो का? तसे ही पुस्तके संचामधे घ्यावी लागतात असे सांगितले. मग न घेणेच पसंत केले. सुदैवाने तो भाग नंतर सापडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अरुण जाखडेंना आदरांजली.

मला 'द सेकंड सेक्स'चं भाषांतरच तेवढं माहीत होतं. (या यादीतलं मी तेवढंच एक वाचलं आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.